पेन्शन-३

*************************************************************************************
पेन्शन-१
पेन्शन-२

तेवढ्यात करूणा बाहेरुन आली आणि एका नजरेत तिने रागरंग ओळखला..
*************************************************************************************

हे कसे इथे इतक्या संध्याकाळी? ही वेळ तर मित्रांसोबत खालच्या आवाजात महत्त्वाच्या चर्चा करायची असते नं? का पंढरी किराणावाल्याचे तोंड टाळुन फिरुन राह्यले, देव जाणे. पंढरीकडे उधारी तश्शीच आहे आज महिना झाला. मी गेले की लगोलग चवकशी करतो यांची आणि त्याचे ते तिरकस बोलणे, 'दत्ताभाऊंना सांगा एकदा भेटायला, वहिनी.' अजुन पंढरीची माणुसकी संपली नाही म्हणुन आमची उधारी चालते अजुन, पण त्याचंही काय चूक? अनुच्या पायाला लागली आहे भिंगरी आणि त्यांचे ते अठरापगड मित्र, येणे-जाणे, पत्रके चोरुन छापणे आणि चिकटवणे ह्या सगळ्यात संसार करायला काही वेळ मिळत असेल तर आश्चर्यच म्हणायचं! मागे एकदा भेटली तर सांगत होती थोडंफार. तिचे विचार आणि माझे विचार. हेच पहा आता, तिचं म्हणणं की मीसुद्धा चूल आणि मूल यातुन बाहेर यावं, बीए झाल्यासारखं काही काम करावं. पैश्यासाठी नाही, तर काही उपयोग शिक्षणाचा म्हणुन. मी म्हटलं तिला, की बाई, शिक्षण झालंय म्हणुन आज काय बरोबर, काय चू़क हे कळतंय मला. हे इथे नसताना, घरात ही अशी परिस्थिती असताना मी काय करावं म्हणतेस? मुलांचा भार अण्णांवर सोडुन देऊन शाळेत शिकवायला जाऊ का? अण्णांची पेन्शन आहे चालु, करतात ते मदत जमेल तशी. त्यांचे औषधं, आल्यागेल्याच्या हातात काही बिस्कीटं, मुलांची हौस एखादवेळेस, अजुन काय पाहिजे? पण तिला पटणं कठीण.

अण्णांची पेन्शन आज जमा झाली असेल. उद्या आणतिल कदाचित. मागे एकदा दत्ताभाऊ मोठ्या तोंडानी घेऊन गेले धरमपेठेत नव्या बिर्‍हाडी अण्णांना. दोन दिवसात अण्णा आले परत. कुठेही थुंकतात, एनिमा घ्यायला उठतात तेव्हा झोपमोड होते, पेन्शनचे पैसे जसे इथे खर्च करता तसे तिथे खर्च करत नाही, एक ना दोन तक्रारी दत्ताभाऊंच्या. म्हणायला आपलाच बाप तरी ही तर्‍हा.

आज कोणता मुहूर्त साधुन आले काय माहित! चेहरा तापलेला दिसतो. अण्णांची पाठ धरली आहे दुपारपासुन, हाताला धरून सगळं करावं तेव्हा होतं. दत्ताभाऊ काही बोलले नसले म्हणजे ठीक, नाहीतर डोकं धरून बसतिल अण्णा रात्रभर.

"कधी आले तुम्ही, दत्ताभाऊ? अनु नाही का आली? अण्णा तुम्ही बरे आहे नं?" अण्णा नुस्ते बघत बसले माझ्याकडे. डोळे, कान लाल झालेले. कपाळावरची शीर ताठ झाली दिसत होती. म्हणजे नक्कीच काहीतरी बोलाचाली झाली.

"नाही, तिला जरा मीटींग होती. घरी चक्कर झाली नव्हती नं बरेच दिवस. अन्तुला भेटुन येऊ म्हटले. तुम्ही बाहेर गेल्या होत्या म्हणुन थांबुन बोलत बसलो. जुन्या गोष्टी म्हणजे एकदा सुरू झाल्या की कुठे जातील काही नेम नाही."

"काय झालं? अण्णांशी काही वाद झाला का?"

"वाद जुनाच आहे वहिनी. त्यात आता तुम्ही पडू नका. आमच्या नशिबात जसं व्हायचे ते झाले, होईल. पण एकदा कानफाट्या झाला की तेच नाव. मनात गाठी बसल्या की बसल्या! मुला-मुलांत डावं-उजवं आणि अपेक्षा मात्र सारख्या वागण्याची! आजचा वाद पैश्यावरुन, पण जखम जुनीच आहे. तोंडावर तोंड पडलं की काहीतरी ठसठस बाहेर पडते. इथेच हिशेब करतो सगळा, त्याला दुसरा जन्म नाही. त्यांनाही नाही आणि मलाही. मुलांसाठी येतो मी. अन्तुला पाहिलं की विष्णु आठवतो. धकाधकी चालुच असते पण काहीतरी निमित्त काढुन भेटतो. काही हवं-नको बघता येत नाही मला, पण त्याला इलाज नाही. तुम्हाला तर माहितच आहे सगळे."

मग थांबुन म्हणाले, जाऊ द्या, येतो मी.

मला नक्की कळत नाही, पण ह्या घरात आल्यापासुन हे बघत आली आहे. तिघांची तोंड तीन दिशांना. सदाभाऊ जेव्हाही आले तेव्हा म्हणजे मला पहा न् फुलं वहा. 'ह्यां'ची तर गोष्टच वेगळी, आपण कुठे चुकलो नाही पाहिजे. मग हवी तितकी मरमर करतील. पण जग तसं नाही. थोडा स्वार्थही साधता आला पाहिजे. नाही तर मग संसारात कशाला पडायचं? पण प्रामाणिक आहेत, साधे आहेत. छक्केपंजे समजत नाहीत, करणं त्याहुन दूर. दत्ताभाऊंचा प्रसंग सांगते, लग्नात मानपान नीट झाला नाही म्हणुन आई जरा नाराज होत्या तेव्हा दत्ताभाऊंनी माझी बाजु घेतली. पण स्वत:च्या लग्नात अण्णांना बोलावलं नाही. वळलं तर सूत, नाही तर भूत. प्रसंग पाहुन वागायला हवं माणसानं. अण्णांचं वय झालं, त्यांचं उरकत आलं. अरे, त्यांनी कर्तव्य नसेलही केलं पण तुम्ही काय वेगळं करता? पण मुलांचा फार लळा आहे त्यांना हेही तितकंच खरं. मला काही कळत नाही कोणाचं वागणं.

गेले. चिमणी, अन्तु मागे मागे गेले त्यांच्या. पाठीवरुन हात फिरवला, बोलले नाहीत काही. वेगळा स्वभाव आहे.

"अण्णा, तुम्ही मनावर घेऊ नका त्यांचं बोलणं. तुम्हाला त्यांचा स्वभाव माहित आहे नं. वेडवाकडं बोलतात पण पुन्हा येतात, करतात. काही लागलं सवरलं तर तेच आहेत हाकेला ओ द्यायला. जाऊ द्या झालं. आपलेच दात आणि आपलेच ओठ."

तशातही मला तिच्या स्वभावाचे कौतुक वाटले. ही मुलगी आज आहे म्हणुन थोडातरी आधार आहे. पण दत्ताचे बोलणे काळजात किती घरं पाडत गेले हे तिला काय सांगायचे? आता गेल्या दिवसांची भुते पिंगा घालत राहतील. भिंतीवरच्या हलत्या सावल्यांमधुन आठवणी पाझरतील. सगळे नको-नकोसे होऊन जाईल. मुलांमध्ये फरक केला का? कोणाचा कान जास्त उपटला? आणि कोणाला झिडकारले? तेव्हा सगळी तारेवरची कसरत होती, तीन मुले, दोन भावांचे संसार, परत आलेली बहिण. तिनेच सुचवले होते बापुसाहेबांना, एकाला जा घेऊन म्हणुन. बापुसाहेबांचा विष्णु लाडका, घेऊन गेले. तेव्हा मला वाटले होते थोडा भार हलका झाला म्हणुन. पण बहिणीलाच का नाही पाठवले बापुसाहेबांकडे तेव्हा? इथे रहायची तशी तिथे. पण नाही झाले. दगडाखाली हात सापडल्यासारखे झाले का आपले?

पाठ शेकली. दोन घास खाल्ले, जप केला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. पुरःसर गदांसवे झगडता तनु भागली. केकावलीची सर त्या लाँगफेलोच्या म्हणण्याला जरा तरी येईल का?

....and our hearts though stout and brave,
Still like muffled drums are beating
Funeral marches to the grave..

पाऊस रिपरिप पडतो आहे, विष्णु घोकतो आहे..

मान्धाता नृपराज तो कृतयुगालंकार झाला हत
जेणे रावण कुंभकर्ण वधिले श्रीराम तोही गत
श्रीकृष्णादिक थोरथोर नृपती गेले न ज्याचि मिती,
परी जी गेली न वसुंधरा तव-प्रति येई तुझ्या संगती

विष्णु पूर्णेच्या भवर्‍यात अडकला आहे, लाल पाणी रोंरावते आहे चारी बाजुने. एक मोठा ओंडका, एक काळा साप प्रवाहात पलट्या मारत त्याच्या आजुबाजुने जातो आहे. मी जागीच खिळुन राहिलो आहे. तोंडातुन आवाज फुटत नाही, पाय मणामणाचे झाले. पुन्हा गटांगळ्या, डोके खाली गेले. पण हिकमतीने हात मारत विष्णु सरकला काठाकडे, भवरा तोडुन! काठावर पाहतो तो डोक्याला ही मोठी खोक.. वाचला. किती दिवस मागतो रे, मरशील का द्राक्षं खाल्ल्यावाचुन? मर भोसडिच्या. बापुसाहेब, कशाला द्राक्षं घेऊन आले तुम्ही? राहिला असता तसाच रडत.

काय?!? पोलिसातली नोकरी सोडुन आलास? सत्यानाश झाला! अरे मेश्राम, ते दिवस गेले.. गांधींनी पंचा नेसला म्हणुन नेहरूने नाही ना नेसला? आता त्याच कॉन्ग्रेसला गुजरातेत माती खावी लागली की नाही? अधोधो गंगेयं पदमुपगता स्तोकमथवा, विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः.

फार थंडी पडली आहे आज. खोलीत ओल मावत नाही आणि अंथरूण गार झाले आहे.

"अण्णा, उठले का? चहा देऊऽऽ?" करुणा उठली ते कळलेच नाही, विडी भिंतीवर विझत का नाही?

उठलो. आवरले. कोटटोपी अंगावर चढविली. पाठ अजुन सरळ झाली नाही, मी इथे आहे म्हणुन आठवण देते. आज पेन्शन मिळेल. डोके अजुन धरले आहे, कालच्यासारखे अजुन किती दिवस दाखवायचे आहेत रे दत्ता दिगंबरा? कॉन्ग्रेस नगर पोष्ट आले.

"आण्णासाहेब, आज सही नेहेमीसारखी आली नाही तुमची. पण हरकत नाही, चालायचेच. तुमच्या हाताखाली तयार झालो आम्ही!" कोपरकर चिखलदर्‍याला होता, चांगला माणुस.

तिनशे विस रुपये. एक प्लेट मिरची भजे देना. और एक बिडी बंडल. नही वो नही, वो दुसरावाला.. आज संध्याकाळी गोल्ड कॉईन फ्रुट ब्रेड घेऊ, अन्तु-चिमणीला आवडते. पंढरीचे फिटले का? घरी जाऊ झाले. आता फार फिरत बसायला नको.

अण्णा, कुठे गेले तुम्ही, मला बागेत घेऊन चला नं! मला कोणीच नाही नेत.

अरे, आता आलेत ते! जरा हात पाय धुतील, जेवतील, की तुला घेऊन सरळ बागेत?

पडतो जरा. संध्याकाळी पोट्ट्याला घेऊन जातो बागेत.

अण्णा, फुगा! घे बाबा.. मुलगा खेळतो खूप. रेतीत उड्या काय, रिंगण काय! परवा मला म्हणाला बाबा कशे दिसतात म्हणुन. अरे माझ्यासारखाच नाही का दिसत तो, पण तुला कसे आठवणार?

अण्णा मला द्राक्षं! दे रे एक अर्धा किलो.. इतना महंगा! पण ठीक आहे, रोजरोज थोडीच घेतो आपण.

अन्तुचा हात धरून अण्णा रस्ता ओलांडु लागले. घरी आले, त्यांनी जुना अल्बम काढला आणि अन्तुला मांडीवर घेऊन फोटो दाखवु लागले. हा मीच शिकारी हॅट घातलेला, हा कडेवरचा दत्ताकाका. हा कडदोर्‍यातला तुझा बाबा..

क्रमशः

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

हे म्हणजे फटाक्यांतली 'चमन चिडिया' पेटावी आणि वर न उडता जागच्याजागीच ठिणग्या पाडत गरगर फिरुन विझावी, तसं वाटलं.

गोष्टीला पुढे वाढवता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही वाटले जरा लवकर ताटावरुन उठलो की काय. समाप्त नाही क्रमशःच. योग्य बदल करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडेश

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मस्त लिहीताय. और आनदेव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आगे भी लिखो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0