अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (४)

अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (३)

The evil that men do lives after them
The good is oft interred with their bones..

फ्रंटलाईन् हे कडव्या डाव्या गटातले पाक्षिक, हिंदु समुहाचं. सरकारी पॉईंट्-ऑफ-व्ह्युपेक्षा वेगळं, अगदी १८० अंश विरुद्ध. मातब्बर लेखक मंडळी. एन् राम, असघर अली इंजिनिअर, नूरानी ही नावं आठवतात. त्यावेळी प्रवीण स्वामी, जयती घोष, चित्रा सुब्रह्मण्यम हे तरूण रक्ताचे पत्रकार उमेदवारी करत होते तिथे. नंबुद्रीपादही लिहीत असत कधीतरी. डेन्स मॅटर असे. चित्रेही असत. मद्रास रबर फॅक्टरीच्या, टी. व्ही. सुंदरमच्या जाहिराती असत. कूर्ग कॉफीच्या बागेच्या जाहिराती मधोमध असत. शेवटी त्रावणकोर बॅंकेची चौकट. फ्रंटलाईन् आले रे आले की बाबा त्याचा ताबा घेत. शेजारीच ऑर्गनायझर असे! आता त्यातली मौज मला कळते. हे म्हणजे शेवटच्या प्रेषिताच्या मांडीला मांडी लावुन आदि शंकराचार्य बसावे तसे झाले! तसे फक्त मोतीलाल बनारसीदास आणि रद्दीच्या दुकानात शक्य आहे.

फ्रंटलाईन् वाचायला पेशन्स हवा असे, पत्रकार फार मेहनत करून अंक तयार करत. आकडेवारी, कायद्याचे दाखले, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष मांडून तर्ककठोर मार्क्सिस्ट डायलेक्टिक्सचा डोलारा उभा केलेला असे. चिरेबंदी माहिती असे. पण बर्‍याच वेळा एकांगी. प्रश्नाला दुसरी बाजु असु शकते एवढे म्हटले आणि जरा पडदा किलकीला केला की डोलारा डळमळला! मग लगेच डिफेन्सिव होऊन पेटी बूर्झ्वा, डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटेरिअट अशा शेलक्या संज्ञा वापरून पूजा बांधली जात असे. कधीकधी वाचकांचे पत्रव्यवहारही मस्त सररिआलिस्टिक असत, दालीच्या चित्रातल्या ओघळणार्‍या घड्याळासारखे! सोविएत रशियाने गेल्या वर्षात किती हजार टन गहू पिकवला आणि तसा गहू मार्क्सिस्ट केरळात का पिकवता येऊ नये अशा बादरायण संबंधांचे विचार दुड्ढाचार्य नेमक्या शब्दांत मांडत असत. भारत कितीही अशिक्षितांचा देश म्हटला तरी अशा नमुन्यांच्या दावणीला बांधला गेला नाही. त्यामुळे ऑल इज नॉट लॉस्ट, होप फ्लोटस्!

जर तुम्ही या सगळ्या जगड्व्याळ पसार्‍यापलिकडे पाहु शकलात तर मात्र काही खरेखुरे माहितीचे 'गोल्डन नगेटस्' हाती लागत असत. हिंदुचे बौद्धिक प्रस्थ सहजासहजी झुगारुन देता येत नसे.

राजीव गांधी या नावाला तेव्हा अजुनही वलय होतं. चहुबाजुला लागलेल्या आगी आटोक्यात आणुन, समझोते करून त्यांनी लोकशाही बळकट करायचा प्रयत्न चालवला होता. '८३ च्या ब्लॅक जुलै दंग्यांमध्ये हजारो तमिळ कापले गेले आणि लंकेतला प्रश्न पेटला होता. कै. इंदिरा गांधीनी तमिळ बाजुला भारताचे वजन टाकले होते आणि भारतात एलटीटीई आणि अन्य संघटनांसाठी ट्रेनिंग कॅम्प्स चालू केले होते. तमिळ प्रश्नावर हिंदु आणि फ्रंटलाईनमध्ये तपशीलवार बातम्या येत असत. प्रश्न चिघळला तसे निर्वासितांचे लोंढे रोज भारताच्या किनार्‍यावर थडकत होते. तमिळ पक्ष सरकारच्या मागे हात धुवून लागले होते. रामस्वामी पेरियारांपासुन द्रविड राजकारण कमालीचे तीक्ष्ण झाले होतेच, प्रभाकरनचे एम जी आर आणि करूणानिधी दोघांशीही घट्ट संबंध होते. उग्र निदर्शनं चालली होती आणि लोक फार व्हायलंट झाले होते.

जाफनात लंकेच्या सेनेने वाघांची केलेली कोंडी, त्यानंतर भारताचा हस्तक्षेप, त्यानंतर राजीव-जयवर्धने करार आणि शेवटी शांतिसेना पाठवण्याचा निर्णय! सगळे कसे आखल्याप्रमाणे होत होते. भारताने हस्तक्षेप केला नसता तर इज्रायल किंवा अमेरिकेने केला असता अशा किंवदंता पसरल्या होत्या. आमच्या लेखी ह्या सगळ्या घडामोडी म्हणजे जी.के. वाढवण्याच्या संधी होत्या! आठवीत-नववीत कुवळेकर सर संस्कृत शिकवायला होते आणि शब्द-धातु-रूपावलीबरोबरच आमचे सामान्य ज्ञान वाढवत असत. नव्या शाळेत शायनींग मारायला हे तास फार उपयोगी पडायचे. मी पुरेपुर शायनींग मारायचो. जाफना, किलिनोच्ची, किट्टु, करूणा, बालासिंघम, ले. ज. दिपेंदरसिंह, मे. ज. अशोक मेहता ही नावे फटाफट सांगायचो. प्रश्नामागे, उत्तरामागे, लिहुन येणार्‍या प्रत्येक ओळीमागे हाडा-मांसाची माणसं आहेत हे जाणवत नव्हतं. सरड्याची धाव कुंपणापर्यंत.

कोल्हापुरचे डॉ. धनंजय गुंडे हे एक प्रसिद्ध, आणि प्रसन्न, व्यक्तिमत्त्व आहे. मला वाटते एकदा ते त्यांच्या व्याह्यांना, एम. पी. विरेंद्रकुमार यांना घेऊन आमच्या घरी आले. विरेंद्रकुमार हे पीटिआय चे मानद अध्यक्ष, मल्याळ मनोरमाचे सर्वेसर्वा होते. ते आले असताना बोफोर्स हा शब्द मी ऐकला असे आठवते. हे मला लक्षात असायचे काहीच कारण नाही, पण गुंडे-विरेंद्रकुमार आमच्यासाठी मैसुरपाक की तसेच काहीतरी घेऊन आले होते त्यामुळे मी त्यांच्यासमोर जास्त वेळ घोटाळलो असणार. नंतर बोफोर्स हा परवलीचा शब्द होऊन बसला, पानिपतासारखा. परीक्षा निकालात बोफोर्स झाले, कागल साखर कारखान्याच्या लढतीत बोफोर्स झाले वगैरे..

चित्रा सुब्रह्मण्यम् नावाची रिपोर्टर स्विडिश हॉवित्झर तोफांबाबत डिस्पॅच पाठवित होती. जेव्हा जिनिवातल्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा मला जिनीवा कुठे आहे हे माहित नव्हतं. लिहिणारी बाई कोण आहे ते माहित नव्हतं. पण तोफा माहित होत्या. पैसे खातात हे ऐकुन माहित होतं. कॉन्स्पिरसी थेअरीज बर्‍याच होत्या त्यावेळी. लंकेतल्या यशाला शह देण्यासाठी पाश्चात्य शक्तींनी भारताविरुद्ध हाकाटी उठवली आहे वगैरे.. दोन-चार बडी कॉन्ग्रेसी नावं, म्हणजे राजीव गांधींचे निकटवर्ती, फोडणीत पडल्यावर इंटरेस्ट वाढला. कोल्हापुरात तर सगळेच कॉन्ग्रेसी! पण बाबा भीडभाड न ठेवता सरळ बोलायचे, पटो न पटो. कोल्हापुरचे लोक दिलदार, त्यामुळे सगळे बोलणे झाल्यावर 'सोडा वो साहेब, जरा च्या घेऊयात काऽय? आनी वयनी, जरा मिरची भजी करनार काय!' असा समारोप व्हायचा.

पण कुणालाच कल्पना नव्हती की हे प्रकरण एवढे शेकणार आहे म्हणुन. अरूण सिंगांनी राजिनामा दिला आणि दाल में कुछ काला है! अशी चर्चा सुरू झाली. मग अरूण नेहरू दुरावले. मग आणखी काही. जहाजात पाणी शिरू लागलं होतं. मधू लिमये, मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, अटलबिहारी, असे सगळे मिळून हल्लाबोल करू लागले होते. मला वाटतं त्या वेळी देशात इतकी तलखी पसरली होती की कोणीही यावे, सरकारला टपली मारून जावे!

पण व्ही. पी. सिंगांनी बंडाचं निशाण फडकावलं आणि सरकारच्या शिडातली हवाच काढल्यासारखं झालं. सार्‍या प्रांतातले सत्राप, सुभेदार एका तंबुत यायला तयार झाले. चंद्रशेखर, देवीलाल, लालूप्रसाद, मुलायम, हेगडे, देवेगौडा, करूणानिधी, एनटीआर, महंता, बिजू पटनाईक. मी त्यावेळी मोठ्या उत्साहाने पेपर वाचत असे. बर्‍याच मतदारसंघातले विरोधी उमेदवार, त्यांचे नाना पक्ष यांबद्दल फार कुतुहल होतं मला. हाजिपुरहुन पासवान किती मतांनी निवडुन आले, भोंडसी के बाबा कोण, मांडा के राजा कोण हे सगळे जिभेच्या टोकावर असे.

राजीव गांधी सत्तेतुन बाहेर फेकले गेले. नवी मिसळ मात्र देशाच्या पचनी पडली नाही. संगीत खुर्चीचा खेळ अजुन सुरू व्हायचा होता.

||क्रमशः||

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

हे म्हणजे शेवटच्या प्रेषिताच्या मांडीला मांडी लावुन आदि शंकराचार्य बसावे तसे झाले! तसे फक्त मोतीलाल बनारसीदास आणि रद्दीच्या दुकानात शक्य आहे.

असे म्हणू नका हो! म्हणजे, मोतीलाल बनारसीदासकडे एक वेळ ठीक आहे, पण शेवटच्या प्रेषिताची रवानगी रद्दीच्या दुकानात झाली, असे कळले, तर फतवे निघू शकतात, नि काही देशांत तर ब्लास्फेमी कायद्यांखाली जबरदस्त शिक्षा होऊ शकतात, असे ऐकलेले आहे. तेव्हा जरा सांभाळून!

(बाकी, शंकराचार्यांस त्रिभुवनसंचारस्वातंत्र्य आहे. सबब, त्यांना खुशाल, निर्धास्तपणे कोठेही धाडता यावे. रद्दीच्या दुकानात, नाहीतर जगातल्या एकमेवाद्वितीय अजबखान्यात!)

सोविएत रशियाने गेल्या वर्षात किती हजार टन गहू पिकवला आणि तसा गहू मार्क्सिस्ट केरळात का पिकवता येऊ नये अशा बादरायण संबंधांचे विचार दुड्ढाचार्य नेमक्या शब्दांत मांडत असत.

यामागील तुलना ही कदाचित चुकीच्या आधारावर बेतलेली असावी, अशी शंका येते. केरळ आणि सोविएत रशिया यांच्या लोकसंख्यांची तुलना लक्षात घेता, केरळात आजवर गव्हाचा एक दाणादेखील जरी उगवला असला, तरी तो सोविएत रशियाच्या गव्हाच्या वार्षिक उत्पादनाच्या कितीतरी पटींसमान आहे, असे दरडोई उत्पादनाच्या तत्त्वास अनुसरून सहज मांडता यावे. (दुनिया झुकती है, स्टटिस्टीशियन चाहिए|)

जेव्हा जिनिवातल्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा मला जिनीवा कुठे आहे हे माहित नव्हतं.

अहो, ते सोडा! जिनीव्हा कोठे आहे हे आमच्या शाळेतील (कधीमधी) खुद्द भूगोल शिकविणार्‍या बाईंना ठाऊक नव्हते. नकाशातल्या 'जेनोआ'वर बोट ठेवून 'जिनीव्हा इटलीत आहे' म्हणून दडपून दिले होते बाईंनी, महाराजा, आहात कोठे? द्या टाळी!

(असो. या लेखमालेतील आपले आजवरचे लेखन बेहद्द आवडले, अशी या निमित्ताने पोच. हा वर जो चालला होता, तो आमचा असाच चावटपणा - तितक्याच गांभीर्याने घ्यावा, नि सोडून द्यावा, ही प्रार्थना.)

==========================================================================================
या निमित्ताने 'मोतीलाल बनारसीदास' नावाची काही चीज असते, याचे ज्ञान झाले, याबद्दल आपले आभार. आमच्या अज्ञानास पारावार नाही! (चालायचेच.)

"Equus africanus asinus"-अभिधानांकित प्राणिविशेषाच्या पचनसंस्थेचे पार्श्वांग. येथे जगातली कोणतीही वस्तू अथवा व्यक्ती आढळते. कारण कोणी ना कोणी कधी ना कधी ती तेथे धाडलेलीच असते!

बाईंचा शिकविण्याचा मुख्य विषय खरे तर मराठी. पण आपल्या शाळांच्या दिव्य प्रथेस अनुसरून कधीमधी काही वर्गांना भूगोलही शिकवायच्या. तस्मै श्री गुरवे नमः|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लक्षात आले होते ते! पण लेखनातच पळवाट ठेवलीय की. नाव घेतलेच कुठे मुद्दलात, आमचा बामणी कावा हो!

एक एराटा टाकतो याच कमेंटमध्ये: विरेंद्रकुमार हे मातृभूमी समुहाचे सर्वेसर्वा होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुनिया झुकती है, स्टटिस्टीशियन चाहिए

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

खूप छान लिहीताय _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम.. वाचतो आहोत..
कॉग्रेसमध्ये नेमक्यावेळी पाचर मारणारे व्हिपी होते.. त्यांना त्याचा पुढे फायदा उचलता आला नाही वगैरे ही बाब अलाहिदा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!