पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (५)

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (४)
************************************************************************************************
गुलाल करताना समाधान मिळाले पण सिनेमा रिलीज व्हायला २००९ साल उजाडावे लागले. या ना त्या कारणाने. मधल्या काळात पोटापाण्याची व्यवस्था करायलाच हवी ना! अनुराग कश्यपच्या बहुचर्चित 'ब्लॅक फ्रायडे' मध्ये थापाचा रोल केला. तो कस्टम्स इन्स्पेक्टर ज्याने पैसे खाऊन RDX ने भरलेले ट्रक्स पास करुन दिले. पुढे त्याच RDX ने मुंबईच्या नरड्यावर पाय दिला. पण हा रोल शेवटच्या एडिटिंगमध्ये कट झाला. पियुषने लिहिलेली २ गाणी मात्र 'ब्लॅक फ्रायडे' मध्ये आहेत. 'अरे रुक जा रे बंदे..' आणि 'भरम भाँप के..'. दोन्ही इंडियन ओशनने गायलीत.

हळुहळु इतर कामे मिळू लागली. मकबूल हाही मैलाचा दगड म्हणावा असा चित्रपट. मॅकबेथ् मीटस् गॉड्फादर इन मुंबई! 'बँको'च्या कॅरेक्टरवर बेतलेला 'काका' साकारताना पियुष अभिनयातला क्लास दाखवुन देतो. नासीरुद्दिन, ओम पुरी, पंकज कपूर, इरफान, तबु या जबरदस्त रथी-महारथींमध्ये पियुषचा काका अजिबात दबुन जात नाही, उलट उठून दिसतो! पोटच्या पोराची महत्त्वाकांक्षा पाहुन सुखावाणारा, साठमारीत सापडून तो चेचला जाऊ नये म्हणुन आपणच त्याला बुकलून काढणारा, हळव्या हातांनी घास भरवणारा. आधी मकबूलच्या खांद्याला खांदा लाऊन लढणारा अन मग त्याची निर्भत्सना करणारा, गोळीला गोळीने उत्तर देणारा. लक्षात राहील असा अभिनय!

आता कामं मिळू लागली होती. जरी अभिनय नाही तरी इतर काही. मनोज वाजपेयीच्या '१९७१' चा स्क्रीनप्ले, शुजीत सरकारच्या 'यहाँ' चा स्क्रीनप्ले आणि डायलॉग्ज. मधेच माधुरीच्या, यशराज फिल्म्सच्या 'आजा नचले' मध्ये एक ऑपेरा गाणेही! 'टशन' साठी गाणी आणि आमीर खानच्या 'गज़नी' साठी डायलॉग्ज. एक ना दोन..

मग २००९ मध्ये गुलाल रिलीज झाला आणि बॉलिवुडने पियुष मिश्रा या नावाची दखल घ्यायला सुरुवात केली. तो चमकलाच तसा! आधी म्हटल्याप्रमाणे हा राजकीय विषयावरचा चित्रपट. पण पियुषच्या अष्टपैलु कामाने त्यात गहिरे रंग भरले. 'राणाजी' गाण्यातले शब्द पहा: 'जब दूर देस के टॉवर में घुस जाये रे एरोप्लेन!' यातली राजकीय जाणीव, मांडणीतली स्फोटक प्रगल्भता हे मिश्रण कुठून येते? आयुष्यात घेतलेले अनुभव, मनात चरत गेलेल्या जखमा आणि उसळी घेण्याचा स्वभाव असेल कदाचित..

स्वतःच्या शैलीत, मस्तीत काम करू शकणारा पियुष आता दारूपासुन लांब राहू लागला. दारूने होणारे नुकसान फक्त शरीर उध्वस्त करते असे नव्हे तर संवेदनादेखील बोथट करते. दारूच्या कुबड्या फेकून देऊन वाटचाल करायचा निर्धार केला त्याने. आणि तब्बल पाच वर्षांच्या प्रयत्नांनी, घरच्यांच्या आधाराने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने बाटली आडवी झाली! आता काठावर बसून शांतपणे वाहुन गेलेल्या पाण्याकडे पाहताना तो म्हणतो,

आदत जिसको समझें हो वो मर्ज़ कभी बन जाएगा
फिर मर्ज़ की आदत पड़ जाएगी, अर्ज़ ना कुछ कर पाओगे
और तबदीली की गुंजाईश ने साथ दिया तो ठीक सही..
पर उसने भी गर छोड दिया तो यार बडे पछताओगे..

आज पियुष मिश्रा या नावाला वजन आहे, ओळख मिळाली आहे. 'देवारिस्टस्' या अनोख्या कार्यक्रमात त्याचा मस्तमौला अवतार पाहाण्यासारखा आहे. सावरकरांच्या अंदमानातल्या कोठडीत गेल्यावर मन भरून आलेला, भरभरून बोलणारा पियुष बोलण्याच्या भरात जरासा फसतो. सावरकरानी अंदमान समुद्रात उडी घेतली आणि ती त्रिखंडात गाजली असे म्हणतो! पण नंतरचा त्याचा रचणारा, गाणारा अवतार नेहेमीसारखाच 'स्ट्रेट-टु-द-पॉईंट'.

असा कलाकार बॉलिवुडमध्ये किती जणांना रुचेल, पचनी पडेल, अशी शंका येते. अर्धवट, नव्या ट्रेंडच्या मागे धावणार्‍या निर्मात्या-दिग्दर्शकांसाठी तो आजचा 'हटके' कलावंत आहे खरा. पण पियुष मिश्रामध्ये दडलेल्या कलागुणांना वाव देणारे, हे जालीम मिश्रण जाणीवपूर्वक हाताळणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतील.

कोण्या एका गावातल्या एकुलत्या एका विहीरीच्या पाण्यात काहीतरी ऐब आला आहे हे माहित असलेला एक माणुस. कळवळून सांगतो सगळ्यांना पण कोणी त्याचे ऐकत नाही आणि पाणी घरोघरी प्यायले जाते. ऐब असला तरी गोऽड पाणी ते! पिऊन, पिऊन गावातली इतर सगळी माणसं विचित्र वागू लागतात. पण त्या सर्वांच्या लेखी वेगळा वागणारा हा एकटाच, त्यामुळे वेड्याचा शिक्का त्याच्या कपाळी यावा यात नवल नाही!

पियुष मिश्रा हा असा एक वेडा माणुस आहे...

||समाप्त||

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

फार सुरेख. मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं