वाज्दा

'वाज्दा' (Wadjda) हा पूर्णतः सौदी अरेबियात चित्रित झालेला पहिला चित्रपट आणि त्या देशाची पहिलीवहिली ऑस्कर प्रवेशिकाही. त्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे एका सौदी महिलेने दिग्दर्शित केलेला हा पूर्ण लांबीचा पहिलाच चित्रपट.

वाज्दा ही ११ वर्षांची मुलगी एक सायकल मिळवण्याचा (आणि आपल्या मित्राला स्पर्धेत हरवण्याचा) ध्यास घेते - पण अशा देशात जिथे स्त्रियांनी सायकल चालवणं सोडाच; पण आपला आवाजही पुरुषांच्या कानी पडू देणं, हे निषिद्ध मानलं जातं. (वाज्दाच्या शाळेची मुख्याध्यापिका "A woman’s voice shouldn’t be heard. A woman’s voice is her nakedness." या शब्दांत विद्यार्थिनींना तंबी देते). या मुख्य सूत्रासोबतच वाज्दाच्या आईचे उपकथानकही [वाज्दाच्या वेळी उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे अजून मुलं - मुख्य म्हणजे मुलगा - होण्याची संपलेली शक्यता; त्यामुळे नवर्‍याला दुसरा घरोबा करण्यापासून रोखण्याचे प्रयत्न; कामावर जाताना पुरुष ड्रायव्हरची सहन करावी लागणारी अरेरावी (वाज्दासारखाच इथेही 'वाहना'चा प्रश्न)] सोबत येते.

चित्रपटाचं कथानक काही फार निराळं आहे, अशातला भाग नाही. लहान मुलांनी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती गोष्ट त्यांचा संपूर्ण ताबा कसा घेते आणि ती मिळवण्यासाठी त्यांना काय गंमतीशीर/हृदयद्रावक उपद्व्याप करावे लागतात; याचं चित्रण मजिद मजिदीच्या चित्रपटांत आलं आहे. (पहा: चिल्ड्रेन ऑफ हेवन; थोड्याफार फरकाने 'कलर ऑफ पॅराडाईज'). अगदी साध्या वाटतील अशा गोष्टींवरही लादलेली बंधनं झुगारण्याचा प्रयत्न करणारी मुलगी हे जाफर पनाहीच्या 'ऑफसाईड'चे कथानकही 'वाज्दा'सारखेच. (सायकलचे ८०० रियाल जमवण्यासाठी वाज्दाही आपल्या मैत्रिणींना त्यांच्या आवडत्या फूटबॉल संघांच्या रंगांचे ब्रेसलेट्स बनवून विकते).

'सायकल मिळवण्याची धडपड' हे कथासूत्र म्हटलं की 'द बायसिकल थीफ'चीही ओघानेच आठवण येते. लहान मूल, सायकल ह्या समान दुव्यांसोबतच कनिष्ठ/मध्यम वर्गात घडणारे कथानक; नैसर्गिक संवाद; प्रत्यक्ष जागेवर केलेले चित्रीकरण आणि समाजात घडू पाहणार्‍या बदलांची घेतलेली दखल या बाबीही इतालियन नववास्तववादी चित्रपटांच्या जातकुळीतल्या.

या दोन प्रवाहांचं प्रतिबिंब (वाच्यर्थाहून 'प्रतिमा' उलट Lol जरी 'वाज्दा'त पडलेलं दिसून येत असलं, तरी या चित्रपटाची स्वतःची अशी काही वैशिष्ट्यं आहेत.

पहिल्या वाक्यात लिहिल्याप्रमाणे, सौदी अरेबियात पूर्णपणे चित्रित झालेला हा पहिलाच चित्रपट. युद्ध, अतिरेकी इस्लाम, तेल आणि वाळवंट यापलीकडचं सामान्य सौदी जनजीवन त्यामुळे प्रथमच चित्रपटातून जगासमोर आलं आहे. 'माणूस हा इथून तिथून सारखाच' हे कागदावर वाचणं निराळं आणि त्याचा प्रत्यक्ष वा माध्यमांतून प्रत्यय येणं निराळं. दुर्दैवाने अगदी लोकशाहीतल्या माध्यमांचे वर्तनही याबाबत बरंचसं एकांगी असतं. अगदी अलीकडे जॉन मकेनने 'फॉक्स न्यूज'च्या बातमीदाराच्या चिथावणीला घातलेला लगाम हा रसेल पीटर्सच्या विनोदी व्हिडिओतल्या सत्याला अधोरेखित करतो. ओबामा काय किंवा या वर्षीची 'मिस अमेरिका' काय; फक्त एखाद्याला 'अरब' म्हणणे ही पश्चिमेत, विशेषतः संयुक्त संस्थानांतील कट्टर धार्मिक उजव्यांत किती जहाल शिवी आहे, याबद्दल काही निराळं सांगायला नकोच. निव्वळ 'वाज्दा'सारख्या चित्रपटांमुळे यात काही फरक पडेल, असं मानणं भाबडेपणाचं होईल - पण तरीही हे अगदी छोटं, आश्वासक पाऊल आहे; हेही खरं.

इतर कुठल्याही देशाप्रमाणे, सौदीतल्या रोजच्या जगण्यातही अनेक अंतर्विरोध आहेत. 'वाज्दा'तून ते सूचकपणे समोर येतात. अमेरिका हा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असलेल्या देशात अमेरिकेच्या व्यापारी-सांस्कृतिक प्रभावखुणा स्कूलबसेसच्या विवक्षित रंग आणि रचनेपासून ते संगीतापर्यंत दिसून येतात. (खुद्द वाज्दाची भूमिका केलेल्या वाद मोहम्मद ह्या मुलीने स्क्रीन्टेस्टच्या वेळी गाणं म्हणून दाखवलं ते जस्टिन बिबरचं!). ब्रेसलेट्स विकून पुरेसे पैसे जमा करण्याचा बेत अयशस्वी ठरल्यावर वाज्दा शाळेतल्या कुराणपठण स्पर्धेत भाग घेऊन त्या बक्षिसाची रक्कम मिळवण्याचं ठरवते, यातला उघड विरोधाभास -- त्या स्पर्धेची 'स्पेलिंग बी' स्पर्धेसारखी रचना; कुराण पाठ करण्यासाठी वाज्दाने वडिलांच्या व्हिडिओ गेम कन्सोल आणि डीव्हीडीचा केलेला वापर; कुराणातल्या ज्या निरनिराळ्या 'सुरा' ती पाठ करण्याचा प्रयत्न करते - त्यांची शिकवण आणि तिची वा शाळेतल्या इतर विद्यार्थिनींची त्या वेळची वागणूक -- यासारख्या गोष्टींतून अधिक गहिरा होत जातो. त्या मानाने शाळेच्या ('ब्रेकिंग बॅड'मधील मरीसारख्या दिसणार्‍या) मुख्याध्यापिकेची वेशभूषा व खाजगी आयुष्य यांचा तिच्या शिकवणीशी न बसणारा मेळ तुलनेने अधिक साटल्यविरहित.

चित्रपटाच्या निर्मितिप्रक्रियेतही हा विरोधाभास दिसून आला. केवळ स्त्री आहे म्हणून चित्रीकरणाचा परवाना मिळवण्यात दिग्दर्शिका हैफा अल-मन्सूरला काहीच अडचण आली नाही; पण संभाव्य अडचणींचा आणि परिणामांचा विचार करून सार्वजनिक जागी तिने दिग्दर्शन केलं ते बंदिस्त व्हॅनमध्ये बसून वॉकी-टॉकीवरून सूचना देत.

या चित्रपटातील बंडखोरीही अशीच संयत, मर्यादित आहे. आमूलाग्र बदल हे जरी कुठल्याही क्रांतीचे ध्येय आणि लक्षण असले, तरी बर्‍याचदा ती घडून येण्यासाठी लहान लहान घटनांची संततसाखळी कारणीभूत असते. नखशिखांत बुरख्यात असूनही केवळ निराळ्या प्रकारचे बूट घातले म्हणून जेव्हा वाज्दाला शाळेत मुख्याध्यापिका सुनावते; तेव्हा ती अगदी सहजपणे बूट काळ्या रंगात रंगवून मोकळी होते. दिग्दर्शिकेने वरील मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे, स्त्रियांचं शोषण किंवा कथानायिकेची अलम दुनियेविरूद्ध बंडखोरी दाखवणं हा चित्रपटाचा हेतूच नाही. अखेरच्या दृश्यात, वाज्दा गल्लीत आपल्या मित्राला मागे टाकून पुढे येते आणि हमरस्त्याला येऊन थांबते. यातली मर्यादित स्वातंत्र्याची सांकेतिकता अगदी उघड आहे.

वाज्दा झालेली वाद मोहम्मद आणि तिच्या आईच्या भूमिकेतली रीम अब्दुल्ला यांचा अभिनय नैसर्गिक/जिवंत आहे, असं म्हणणं हे 'क्लिशे' ठरेल. दोघींचाही आपापल्या भूमिकेतला सहज वावर हे चित्रपटाचं बलस्थान. त्या तुलनेने, वाज्दाच्या अब्दुल्ला नावाच्या मित्राची भूमिका गोड असली तरी ती काहीशी वाज्दाच्या पात्राला पूरक म्हणून बेतलेली वाटते. रियाधच्या उपनगरातला उष्ण, धुळीचे लोट वाहत असणारा अर्धविकसित फिकट तपकिरी रंगाचा परिसर आणि त्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारी संपूर्ण काळ्या बुरख्यातील आकृती हे टिपणारं चित्रीकरणही उल्लेखनीय. मुख्य म्हणजे शेवट अपेक्षित वळणाने जात असला तरी ढोबळ सांकेतिकता, बेगडी बंडखोरी आणि सोपी भावनाविवशता ह्या गोष्टींचा दिग्दर्शिकेने बव्हंशी यशस्वीपणे टाळलेला मोह - निव्वळ पहिलटपणाचे कवतिक म्हणून नव्हे, तर या सार्‍या गोष्टींमुळे हा चित्रपट नक्कीच उल्लेखनीय ठरतो.

तळटीप -
अव्वल, खता, मुंकिन, अहद, अदब, सवार, हरामी (चोर), खल्लास ('पुरे' या अर्थाने) हे परिचित शब्द संवादांतून डोकावत राहतात. चित्रपटाच्या नावाचे इंग्लिश स्पेलिंगही थोडे रमजान-रमादान बदलाची आठवण करून देणारे. कुतूहल म्हणून 'वाजिद' या शब्दाचा अरेबिकमधला अर्थ शोधला असता तो 'शोधक' असा निघाला (The Finder, The All-Perceiving, The Inventor and Maker). कथानकाच्या संदर्भात तोही यथार्थच.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

आता हा चित्रपट बघणे आले. उत्तम परिचय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

छान ओळख.
'अलीकडे काय पाहिलत' मधे टाकण्याऐवजी वेगळा धागा हवा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो. स्वतंत्र धागा पाहिजे होता. सौदीतही हे वारे वाहत आहेत, हे पाहून आनंद झाला. पिच्चरची खास नंदनस्टाईल ओळख जबरी आवडली हेवेसांनल.

पुन्हा एकदा वाचताना खल्लास या शब्दाचे अरबी मूळ दिसले. फक्त अरबी-फारसी लोनवर्डांचा तक्ता मराठीत कुणी केला पाहिजे, से अ काईंड ऑफ "हॉब्सन-जॉब्सन" फॉर मराठी.

हाही शब्द तख़्त इ. शी निगडित असावा असा संव्शय येऊ लागलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तूर्त मिठाईचे दुकान असण्यापेक्षा हलवायाशी मैत्री पुरे आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

परिचय मस्तच..
थोड्याच वेळात याचा वेगळा धागा तयार करतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाह! खासच आहे परिचय. पाहावाच लागेलसे दिसते. उतरवण्यात व पाहण्यात यील लवकरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाज्दा नांव वाचून प्रथम आन्द्रे वाय्दा (Andrzej Wajda) या प्रसिद्ध पोलिश दिग्दर्शकाची आठवण झाली. ('अ‍ॅशेस् अ‍ॅन्ड् डायमन्ड्स्' हा त्याचा विशेष गाजलेला चित्रपट.) 'j' चा उच्चार 'य' होणे हे पूर्व यूरोपात आहेच. त्यामुळे वाय्दाचा अर्थ शोधला. 'जिप्सींचा प्रमुख' असा अर्थ एके ठिकाणी मिळाला. त्यामुळे हे Wadjda आणि Wajda दोनही शब्द भिन्न असावेत असे प्रथमदर्शनी दिसते. ('थालेपारट' लेखाच्या निमित्ताने झालेला ज<-->य उहापोहही आठवला Smile ).

बाकी, चित्रपटाची ओळख माहितीपूर्ण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! बघायला हवा हा चित्रपट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डीव्हीडी येईपर्यंत वाट पहावी लागणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चित्रपटास व्यवस्थित सॉकेटमध्ये बसवणारी काळजीपूर्वक ओळख आवडली. मी चित्रपट पाहीन असे वाटत नाही. मुलांचा दुर्दम्य आशावाद-निरागसपणा वगैरे वगैरे गोष्टींचा आजकाल कंटाळा येतो आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या चित्रपटाबद्दल अशी प्रतिक्रिया झाली नाही. पण 'मुलांचा दुर्दम्य आशावाद..'वगैरे दाखवणार्‍या इराणी सिनेमांचा कसा वीट येतो ते मी अनुभवले आहे. तसाच स्त्रियांची मुस्कटदाबी दाखवून 'पाहा, पाहा हा छळ. काय हा दैवदुर्विलास!' प्रकारच्या तथाकथित स्त्रीसमतावादी सिनेमांचाही येतो. त्यामुळे प्रचंड सहमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चित्रपट गोग्गोड नसावा असं हे आणि हे वाचून वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वाह! सुंदर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते