मैत्री

मैत्री

आख्खा गांव त्याला 'पिसो आंतोन' म्हणून ओळखायचा. एकटाच राहायचा तो. त्याची खरी कहाणी कुणालाच माहिती नव्हती, कुणी म्हणायचं त्याची बायको त्याला सोडून गेली म्हणून तो वेडा झाला तर कुणी म्हणायचं त्याचं घर त्याच्या मोठ्या भावाने बळकावलं, त्या धक्क्याने त्याचं डोकं फिरलं. पण आंतोनला कशाचीच फिकीर नव्हती. आपल्याच तारेत असायचा. आमच्या घराजवळ एक जुनं घर होतं. बंदच असायचं कायम. त्या घराच्या पडवीत आंतोनने स्वतःचा संसार थाटला होता. पावसाची झड येवू नये म्हणून केलेला एका कळकट मेणकापडाचा आडोसा, एक-दोन ठासून भरलेल्या गोणपाटाच्या पिशव्या, दोन-तीन भांडी, एक दहा ठिकाणी पोचे पडलेली थाळी, एक पेला आणि भिंतीला खिळे ठोकून बांधलेल्या दोरीवर लोंबकळणारे दोन कपडे आणि एक सतरा ठिकाणी भोकं पडलेला चौकड्यांचा टॉवेल, ही आंतोनची एकूण स्थावर-जंगम इस्टेट!

तसा आंतोनचा अवतार थोडासा भितीदायक होता. निरुंद, चिंचोळा चेहेरा, खोल गेलेले डोळे, काळ्या-पांढऱ्या दाढीचे बोट-बोट वाढलेले खुंट, तेल-पाणी नसलेले राठ, सगळा रस चोखून फेकून दिलेल्या आंब्याच्या कोयीसारखे पिवळट, पांढरे, विस्फारलेले केस आणि पाठीला किंचित पडलेलं पोक. अर्धी खाकी ढगळ विजार, वर पांढरा सदरा आणि विजारीतून डोकावणारे करकोच्याच्या पायांसारखे लांबोडके, काटकोळे पाय. वाड्यावरची सगळी मुलं त्याला जरा घाबरूनच असायची. तसा तो कुणाच्या वाटेला जायचा नाही. दर दुपारी तो कुठेतरी जायचा, बहुधा बाजारात, जमिनीकडे झुकलेली नजर, हात पाठीमागे एकमेकात गुंफलेले आणि सतत हलणारे, काहीतरी पुटपुटणारे ओठ. अश्या आवेशात तो झपझप पावलं टाकत निघाला की वाटेतली पोरं आपसूकच बाजूला व्हायची. मी तेव्हा नऊ-दहा वर्षांची असेन. माझ्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती त्यामुळे माझ्याकडे भरपूर मोकळा वेळ होता आणि आंतोन माझ्या नित्य कुतूहलाचा विषय!

त्यात नुकतीच मी भा. रा. भागवतांची पुस्तकं वाचायला सुरवात केली होती. त्यांतल्या हिरो, फास्टर फेणेसारखं आपणही काहीतरी धाडसी करावं असं खूप वाटायचं. आमच्या परसांत एक चिकूचं मोठ्ठं झाड होतं. त्या झाडावर चढून अगदी वरच्या फांदीच्या बेचक्यात बसलं की समोरचा आख्खा रस्ता दिसायचा. माझ्या बाबांची एक मोठ्ठी, अवजड, रशियन बनावटीची दुर्बिण होती. ते त्या दुर्बिणीला खूप जपायचे, आम्हा मुलांच्या हाती पडू द्यायचे नाहीत, पण दुपारी घरात सामसूम असली की सगळ्यांची नजर चुकवून मी हळूच कपाटातून ती दुर्बीण काढून चिकूच्या झाडावर चढायची आणि रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचा लोकांचं निरीक्षण करायची. आंतोनचं तर अगदी फारच बारकाईने. मी मनातल्या मनात त्याला पोर्तुगीझांचा हेर ठरवून मोकळी झाले होते. रोज त्याला वाटेवरून येताजाताना मी दुर्बिणीतून बघायचे, माझ्या खास हेरवहीत तश्या नोंदीही करायचे. पण माझे हे उद्योग आंतोनला कळले असतील हे मात्र स्वप्नातही खरं वाटलं नसतं. पण एकदिवस आंतोन चालता-चालता थबकला आणि सरळ झाडात लपलेल्या माझ्याकडे तोंड करून मोठ्ठ्याने म्हणाला, ' डीटेक्टिव्ह गो तू, बोरे, बोरे'. मी हादरलेच एकदम. सरळ सरसर झाडावरून उतरून दुर्बिणीसकट घरात पळून जाणार, एवढ्यात आंतोनने मला हातानेच जवळ बोलावलं,

'चोवया चोवया' दुर्बिणीकडे बोट दाखवत, मिस्किल हसत तो म्हणाला. मी विचारात पडले. आंतोनला सगळी मुलं घाबरायची शिवाय कुणाला न सांगता त्याच्याशी असं बोलणं माझ्या आईला अजिबात आवडलं नसतं, पण आंतोनच्या निर्व्याज हास्यात असं काहीतरी होतं की मला त्याच्याशी बोलल्याखेरीज राहवेना. मनाचा हिय्या करून मी दबक्या पावलांनी फाटकाजवळ गेले. आमच्या भल्या-मोठ्या लोखंडी गेटच्या पलीकडे आंतोन उभा होता आणि अलीकडे मी. धीर करून मी दुर्बीण त्याच्या हातात दिली, आंतोनने दुर्बिणीतून इकडे-तिकडे बघितलं, पलीकडे आंब्याच्या झाडावर एक खार चढत होती, ती त्याने मला दाखवली आणि 'देव बोरे कोरू' असा तोंडभर आशिर्वाद देऊन तो आपल्या वाटेला लागला.

आमची मैत्री अशी झाली. फाटकाआडून. पिंजारलेल्या केसांचा, पन्नाशीतला 'पिसो आंतोन' आणि दोन वेण्या घातलेली, शाळकरी पोरगी मी! त्या दिवसापासून रोज दुपारी आमच्या गप्पा व्हायच्या. कधीतरी तो माझ्यासाठी बाजारातून गरमागरम पाव घेऊन यायचा आणि घरी रोज सकाळी जाम-बटर लावलेला पाव खाताना रडगाणं गाणारी मी आंतोनच्या त्या काळ्या नखांच्या मळकट हातातून घेतलेला तो सुका पाव आनंदाने खायची. कधी मी एखादा आंबा घरातून लपवून आणून त्याला द्यायची. अशी आमची जगावेगळी मैत्री होती. पण आमच्यामधल्या अदृश्य भिंतीची जाणीव आंतोनला ही होती आणि मलाही. फाटक उघडून आत यायचा त्याने कधीच प्रयत्न केला नाही.

मला वाटायचं की मी आंतोनशी बोलते हे घरात कुणाला माहिती नाही. पण एक दिवस आंतोनशी बोलताना मी सहज मागे वळून पाहिलं तर माझी आई व्हरांड्यात बसून मासिक वाचत होती, पण तिचं सगळं लक्ष आमच्याकडे होतं. साहजिकच आहे, आपली दहा वर्षांची मुलगी एका अनोळखी, तेही गावाने वेड्या ठरवलेल्या माणसाशी बोलते हे बघून कुठल्या आईच्या काळजात धस्स होणार नाही? उलट इतर कुठलीही आई असती तर तिने आपल्या लेकीला 'काही गरज नाही त्या माणसाशी बोलायची' असंच दरडावून सांगितलं असतं, पण माझ्या आईने मला आंतोनशी बोलू नको असं कधीच सांगितलं नाही. ती फक्त आमच्यावर नजर ठेवून असायची तेसुद्धा आम्हाला न कळेल अश्या बेताने.

माझ्या आणि आंतोनच्या निरपेक्ष मैत्रीचं महत्व कळण्याइतकी माझी आई सुजाण होती. आज जेव्हा माझ्या मुलांचं आईपण मी निभावतेय तेव्हा माझ्या आईच्या समजूतदारपणाचा खरा अर्थ मला समजतोय. तिची मुलगी म्हणून माझं रक्षण करणं तिचं कर्तव्य होतं, ते तिनं चोख निभावलं पण त्याचबरोबर, 'त्या वेड्याशी बोलू नकोस अजिबात' असं काहीबाही मला सांगून माझ्या कोवळ्या मनात अविश्वासाचं बी तिने कधीच रुजू दिलं नाही. त्या पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीभर माझी आई दुपारी झोपली नाही पण माझी आणि आंतोनची जगावेगळी मैत्री तिने अबाधित राहू दिली हे विशेष.

शब्दार्थ

पिसो - वेडा
चोवया - बघुया (गोव्यची ख्रिश्चन कोकणी)
बोरे बोरे - बरे बरे
देव बोरे कोरु - देव तुझे भले करो

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

खूप आवडलं हे ललित. तुमच्या आंतोन सारख्याच माझ्या आठवणीतल्या एक 'वेड्या आज्जी' आठवल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ललित आवडलेच. असाच एकजण स्वप्निल नामक प्राणी मिरजेत ओळखीचा झाला होता, अजूनही आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खुप आवडल ललित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'त्या वेड्याशी बोलू नकोस अजिबात' असं काहीबाही मला सांगून माझ्या कोवळ्या मनात अविश्वासाचं बी तिने कधीच रुजू दिलं नाही.

आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी एका वर्तमानपत्रासाठी गेले वर्षभर 'घार हिंडते आकाशी' नावाचं पालकत्वाशी निगडीत असे सदर लिहित होते त्यातला हा एक लेख! आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

शेफाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन खेचून घेणारं आहे. आवडलं. नेहमी लिहित रहा इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान! कधीही न पाहिलेला अंतोन, ते फाटक आणि एक लहान मुलगी असं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.
तुमच्या आईचेही विशेष कौतुक वाटले.
या वेड्यांमध्ये एक वेगळे शहाणपण आणि अपार वेदना भरलेली असते असा अनुभव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण लेख आवडला. पण शेवटच्या परिच्छेदाच्या जागी एखादं छोटंसं, रूपकात्मक वाक्य आणखी आवडलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखन-कथा-अनुभव आवडलेच.
बहुदा वृत्तपत्र लेखनासाठीअसेल पण जरा आटोपते घेतल्यासारखे वाटले.

इथे देताना शब्दमर्यादा नसल्याने तुमच्या मूळ लेखनाला मुक्त वाव द्या ही विनंती Smile

बाकी (माझ्यासाठी)अनवट शब्द लेखनाची मजा वाढवत आहेतच, त्याच बरोबर लेखनातील परिसर केवळ शब्दयोजनेने समजून येत आहे. लिहित रहा.. वाचत आहोतच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी बरोबर ओळखलंत! आठशे शब्दांच्या मर्यादेत अंतोनची एवढीच कहाणी बसत होती! प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसलेही मळभ नसलेले आरस्पानी लेखन.
पिसो अंतोन आणि छोटी मुलगी यांच्यातली निर्व्याज मैत्री भावून गेली.
आणि त्याबरोबरच, एका आईचेही सुजाण वर्तन आवडले.

***
सदर कोठे प्रसिद्ध झाले आहे? त्याची काही लिंक आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 'घार हिंडते आकाशी' ह्या नावाने माझं सदर 'दैनिक हेराल्ड' नावाच्या वृत्तपत्रात गेले वर्षभर प्रसिद्ध होत होतं. पुढच्या रविवारपासून 'चितरंगी रे' ह्या नावाचं नवीन ललित सदर येतंय माझं. www.dainikherald.com/गुलमोहर पुरवणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं लेखन. अजून येऊ देत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

सुंदर ..

अंतोन आणि छोटी मुलगी यांच्यातली निर्व्याज मैत्री ... फारच छान ..
डोळ्यासमोर कथा घडते आहे असं वाटलं ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

लेखन आवडले. अगदी जराशी जी.एंच्या एका कथेची आठवण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

लेखन आवडले.
मोजक्या शब्दात नेमकं टिपलं आहे सगळं.
लिहित रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0