छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २७: विनोद
या वेळेचा विषय आहे "विनोद".
वेगवेगळ्या माध्यमांतून होणारा विनोद देखील फार वेगवेगळ्या जातकुळींचा असतो. 'छायाचित्रणाच्या माध्यमातून सादर केला गेलेला विनोद' हे एक रोचक समीकरण आहे; कधी हा विनोद विसंगती टिपतो, कधी विनोदानंतरचा चमकता क्षण टिपतो, कधी आकार-रचना इत्यादी गोष्टींतून तयार झालेले विनोदी चित्र टिपतो तर कधी विनोदी अंगविक्षेप किंवा हावभाव टिपतो. विषय तसा पुरेसा मोकळा ठेवला आहे, छायाचित्रणाचा विनोदाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाला तरी पुरेसा आहे.
निकष खालीलप्रमाणे असतील,
१) विषयाची चाकोरीबद्ध आणि अपेक्षित मांडणी न करता वेगळे परिप्रेक्ष्य (वापरला एकदाचा तो शब्द!) देण्याला प्राधान्य असेल.
२) निर्माण झालेला विनोद फार खळखळून हसविणारा नसला, चेहेर्यावर हलके स्मित उमटवणारा मिश्किलपणा असला तरी चालेल; विषय छायाचित्रणाच्या माध्यमातून प्रभावीपणे व्यक्त करण्याला प्राधान्य असेल.
३) छायाचित्रणातले तांत्रिक कौशल्य.
-----
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते.
तसा प्रयत्न जरूर करावा. उत्सवी फोटो हे अनेकदा जनरल मोकळ्या पद्धतीने घेतलेले असतात .. त्यातल्या विवक्षित गोष्टि कातरून केंद्रित केल्याने वेगळा परिणाम साधता येईल..
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट १८ ऑक्टोबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. १९ ऑक्टोबर रोजी निकाल घोषित होईल व विजेता पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
मागचा धागा: विषय "व्याक्तिचित्रे" आणि विजेते छायाचित्र मॅडमको गुस्सा क्यूं आता है?"
Taxonomy upgrade extras
स्पर्धेची मुदत.
ऐसीवरचे तमाम विनोदी प्रतिसाद वाचल्यावर, इथले अनेक सदस्य या धाग्याला चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा होती / आहे पण विनोदी छायाचित्र टिपायला थोडा अधिक वेळ लागू शकतो त्यामुळे मुदत ३१ ऑक्टोबर २०१३ पर्यंत वाढवून देत आहे.
काही वेळेस छायाचित्रातला विनोद थोडा उघड करायचा असेल किंवा त्याच्याकडे अधिक लक्ष वेधायचे असेल तर त्याला समर्पक शीर्षक देणे फार महत्वाचे वाटते.
या लिंकवर विनोदी छायाचित्रणाची अनेक उदाहरणे आहेत. त्यातील वेगळ्या रंगाच्या अंड्याचे 'रेसिझम'असे असलेले शीर्षक मला फार आवडले.
वरील नंदन यांच्या छायाचित्राचे शीर्षकही आवडले.
Toilet humour!
ऐसी-अक्षरे च्या मुख्य पानावरील 'Toilet humour' चे छायाचित्र पाहून माझ्या संग्रही असलेले हे छायाचित्र टाकण्याचा मोह आवरला नाही... :)
एका दुकानाच्या स्वच्छतागृहात लावलेली ही (अमेरिकन पुणेरी) सूचना ;)
कॅमेरा : मोबाईल (सॅमसंग) - ५ मेगापीक्सल.
संपादकः width="" height="" टाळावे
विषय चांगलाच कठीण आहे
पण वर दिलेल्या चित्रांच्या लिंक मुळे बरीच मदत झाली. एक असे छायाचित्र सापडले
ह्या चित्रातली छोटी मुलगी, आमच्या ग्रुप मधे सगळ्यात छोटी असल्यामुळे तिच्याबरोबर काय काय धमाल चाळे करत असतो आणि ती पण करुन घेत असते.
दूध नाही आवडत...
Olympus E-PL1 with Canon FD 24mm F2.8 manual focus
24mm F5.6 1/125s Iso 200
जर्मन सूचना
(स्पर्धेसाठी नाही)
जर्मनीतल्या एका शौचालयाच्या दारावर हे चित्र डकविलेले पाहिले.
टॉयलेटमधला ब्रश नक्की कश्यासाठी आहे याबद्दलचा संभ्रम दूर करणारी चित्रमालिका. :)
.......१. पार गंडलं बघा गडी..................२. तरी गंडलंच............... ३. आत्ता कुटं जराश्या टकुरं चालतंय.............४. आंगाश्शी !!
---
शब्दार्थ : डावीकडून -
१. Ganz Falsch = अजिबात चुकीचे. २. Falsch = चुकीचे, ३. Fast Richtig = जवळजवळ बरोबर, ४. Richtig = बरोबर
ठीक
पण या चित्राला ४ विनोदी श्रेणी बघून मात्र गंमत वाटली.
प्रस्तुत चित्रास 'भडकाऊ'१ अशी श्रेणी देऊन विनोदी श्रेणी एकाने कमी केली आहे.
केवळ (आणि खास) तुमच्याकरिता!
कंपूबाजीचा विजय असो.
अगदी!
===============================================================================
१ 'भडकाऊ' ही श्रेणी आम्हांस (का कोण जाणे, पण) विनोदी वाटते, हा भाग अलाहिदा.
अलाहिदा
भडकाऊ' ही श्रेणी आम्हांस (का कोण जाणे, पण) विनोदी वाटते, हा भाग अलाहिदा.
आम्हांसही!! जणू काय तो प्रतिसाद वाचून कोणी ग्यानवापी (मशीद, हो नैतं गैर्समज व्हायचा) किंवा अक्षरधाम१ फोडू पाहणारे =))
१ अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे विचारात न घेतल्याबद्दल कम्यूनलपणा आरोपू पाहतील त्याजवरून अजून भडकाऊ श्रेणी मिळोन अजूनच विनोदनिष्पत्ति२ होईल.
२निष्पत्ति नामक शब्द वापरला की अगदी विदग्ध३ की कायसेसे वाटते आणि त्याचबरोबर पान खाऊन रसनिष्पत्ति झाली अशा अर्थाचे कायसेसे वाक्य पुलंच्या पानवाला प्रकरणात वाचलेले आठवते आणि पान खायची इच्छा प्रबळ होते.
३म्हणजे नक्की काय याचा अजमास अजूनही लागलेला नाही, जळून दग्ध होण्याशी काही संबंध असावा असे प्रामाणिक मनास वाटत असले तरी याचे मराठी साहित्यनर्डीय वर्तुळात 'गारठागुणोत्तर' जास्त असल्याने तो अजमासे वापरल्या४ जातो.
४मराठी आंजाचे या शैलीबद्दलचे ऋण पुन्हा एकदा मान्य करून, तळटीपसम्राट 'न'वी बाजू यांचे आभार मानून त्यांच्याच ष्टायलीत रजा५ घेतो.
५बोले तो, फुल्ली पेड६.
६ वृक्षविशेष पुसू पाहणारांच्या तोंडास पर्णे पुसल्या गेली आहेत.
कदाचित असेही असावे -
मला वाटले ते असे, की झेब्रा क्रॉसिङ्ग जिथे संपते तिथे दुभाजकावर खरे तर झाडे नसावीत. म्हणून 'जाये तो जाये कहां'.
पण भारतीय बांधकामात अश्या गोष्टी लोकांवर सोडल्या जाणे हे नेहमीचेच आहे. त्यामुळे कदाचित वेगळी गंमत असावी असे वाटले. लोकांनीही त्या झुडुपांतून वाट काढलेली दिसत आहे.
चित्रचौकट - उपाय
चित्र प्रतिसाद चौकटीच्या बाहेर जात आहे, कृपया उपाय सुचवावा.
.........१. विड्थ् = ७०० आणि हाईट् = ५०० किंवा ५५० ठेवून पाहा. अंक इंग्रजीत असले पाहिजेत. देवनागरीत असल्यास चालणार नाहीत.
२. इन्पुट फॉर्मॅट् Full HTML ठेवा. एकदा चित्र आवाक्यात आले की हाईट् योग्य ती निवडून चित्रचौकट निश्चित करा.
स्पर्धेचा निकाल.
कार्यबाहुल्यामुळे निकालाला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व!
स्पर्धेला प्रतिसाद थोडा उशीरा सुरू झाला असला तरी भरगोस आला त्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे आभार. यावेळेस स्पर्धेत भाग घेण्यापेक्षा स्पर्धेचा निकाल तयार करणे किती कठीण असतो याचा अनुभव घेते आहे. विशेषतः, ज्यात चांगली विनोदनिर्मिती झाली आहे त्याला महत्व द्यायचे की छायाचित्रणाच्या कलात्मकतेला महत्व द्यायचे यात गोंधळ उडला होता त्यामुळे निकालाबरोबरच मला आवडलेल्या सर्वच छायाचित्रांचा उल्लेख करणे महत्वाचे वाटतेय.
धनंजय यांचे 'स्थिर-प्रस्थान' आणि ओ नाम्या यांचे कोठेच न जाणार्या झेब्रा क्रॉसिंगचे 'जाये तो जाये कहां' ही चित्रे एका जातकुळीची वाटली आणि आवडली. विसुनानांचे ग्राहकाची थट्टा हे चित्रदेखिल आवडले. घासकडवींनी नंतर मागे घेतलेले (सकारण) चित्र पाहून दहा मिनिटे हसण्यात गेली. एकूणच लहान मुले आणि पाळीव प्राणी विनोदी चित्रांसाठी नित्यनियमाने विषय देत असतात हे या स्पर्धेच्या निमित्ताने लक्षात आले. काही चित्रे खळखळून हसविणारी नसली तरी त्यातले साटल्य (मराठी साहित्याला एक अफालातून शब्द बहाल केल्याबद्दल धन्यवाद नंदनशेट!) आवडले उदाहरणार्थ 'मी' यांचे 'क्वीनच्या सायकली' आणि अदितीचे 'जोर लगाके हय्या' हे चित्र. नंदन यांचे चित्र विनोदी नसले तरी त्यात एक टपोरा क्षण अगदी छान टिपला गेलाय. काही पाट्या तुफान विनोदी आहेत पण छायाचित्रणाच्या निकषावर त्यांना निवडता आले नाही. तर निकाल खालीलप्रमाणे,
तृतीय क्रमांक - ऋता यांचे 'लाजलेल्या हत्तीचे' चित्र.
द्वितीय क्रमांक - अदितीचे 'बाटलीची सवय वाईट' हे चित्र.
प्रथम क्रमांक - अमुक यांचे 'भुतापाठी श्वानराक्षस' हे चित्र.
टीप - अदितीचे चित्र अगदी शेवटपर्यंत पहिल्या क्रमांकावर होते पण अमुक यांनी शेवटी दिलेल्या चित्रातली कल्पकता, शीर्षक, विरोधाभास, छायाचित्रनातले कौशल्य या निकषांवर अधिक उजवे वाटले, शिवाय ते समयोचितही आहे.
विजेत्या प्रतिसादकांचे अभिनंदन आणि स्पर्धेत भाग घेऊन (अथवा न घेताही) आपल्या चित्रांनी इतरांच्या चेहर्यावर हसू उमटवलेल्या प्रतिसादकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.
अमुक यांनी पुढील विषय द्यावा ही त्यांना विनंती.
धन्यवाद !
धन्यवाद रुची.
पुढले पाक्षिक आव्हान लवकरच देतो.
(अदितीचेही आभार. तिचाच कॅमेरा हाताळण्याची परवानगी मिळाल्यावर भटकायला बाहेर पडलो असताना हे दृश्य टिपले होते.
तसेच शीर्षकासाठी 'भुतापाठी श्वानराक्षस' आणि 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' असे दोन पर्याय मी सुचविले असता तिने 'भुतापाठी श्वानराक्षस' हे निवडले. माझीही पसंती तीच असल्याने शेवटी ते ठेवले. त्यामुळे प्रथम क्रमांकाचे श्रेय तिचेही आहे.)
कठीण विषय आहे.
माझ्या मते हा कठीण विषय आहे. कदाचित त्यामुळेच काही प्रतिसाद आले नाहीत. विषय अगदी साधा-सोपा असला तर बरे, असे मला वाटते; ज्याच्यामुळे मुख्यतः हौशी (amateur) फोटोग्राफर्सना पण हुरूप येईल. पुढील स्पर्धेसाठी पुढील काही विषय सुचवावेसे वाटतात.
वास्तू (architecture), लहान मूल, मोठे हास्य (big smile), कुटूंब, कार, ट्रेन, पक्षी, पोशाख (costume), सण/उत्सव, फटाके, फुले, अन्नपदार्थ, नवे आणि जुने, काळे आणि पांढरे (black and white), सुट्टी (vacation), नक्षी (patterns), पाळीव प्राणी, केवळ १ रंग (लाल/हिरवा/निळा इ.), इंद्रधनुष्य, सावली, विविध आकार (shapes), हात, डोळे, चेहरा, contrast, टेक्नॉलॉजी, वर्तुळे (circles), मैत्री, अलिप्त (standing out from the crowd), खेळणी, लाकूड, झाडे इत्यादी.