कानाला खडा

फणीश्वर नाथ 'रेणु' ह्यांच्या 'तीसरी कसम, उर्फ़ मारे गये गुलफ़ाम' ह्या हिंदी कथेचा स्वैर अनुवाद. (ह्याच कथेवर 'तीसरी कसम' हा चित्रपट आधारित आहे.)

हिरामण गाडीवान रोमांचित होत होता.

हिरामण गेली वीस वर्षे बैलगाडी हाकतो आहे. सीमेपार असलेल्या नेपाळच्या मोरंग राज्यातून धान्य व लाकडे आणलेली आहेत त्याने. कंट्रोलच्या काळात रेशनचा माल गुपचूप इथून तिथे पोहोचवला आहे. पण ह्याआधी कधी अंगावर असे रोमांच फुलले नव्हते.

कंट्रोलचा काळ! हिरामण तो काळ विसरणे शक्य नाही! सिमेंट व कपड्याच्या गाठोड्यांनी भरलेली गाडी चारदा जोगबनीमध्ये विराटनगराला पोहोचवून हिरामण निडर झाला होता. काळाबाजार करणारे फारबिसगंज*चे सारे व्यापारी त्याला तरबेज गाडीवान मानत. मोठ्या पेठेचे मोठे शेट स्वत: त्याच्या बैलांची प्रशंसा करत.

पाचव्या खेपेला मात्र सीमेच्या ह्या बाजूला, तराईमध्ये, गाडी पकडली गेली.

व्यापार्‌याचा मुनीम गाडीतच लपून बसला होता. पोलीस निरीक्षकाच्या भल्यामोठ्या विजेरीचा प्रकाश किती प्रखर असतो हे हिरामणला ठाऊक होते. जरा डोळ्यांवर पडला तर माणूस तासभर आंधळा होतो. उजेडाबरोबर गर्जना झाली, “ए! गाडी थांबव, नाहीतर गोळी घालेन,साल्या!”

वीसच्या वीस गाड्या करकरत थांबल्या. हिरामण आधीच म्हणाला होता, “ह्या विसाची विषबाधा होणार!” निरीक्षक साहेब त्याच्या गाडीत दडलेल्या मुनिमावर प्रकाशझोत टाकून राक्षसी हसले, “हा हा हा! मुनीमजीऽऽऽ! ए गाडीवाना, साल्या, माझ्या तोंडाकडे काय बघत बसलायस? ह्या पोत्याच्या थोबाडावरची घोंगडी हटव!” हातातील छोटी काठी मुनिमाच्या पोटात मारून म्हणाले, “ह्या पोत्याच्या! स्साला!”

निरीक्षक साहेबांचे आणि त्याचे जुने वैर असावे. नाही तर इतके पैसे देऊ करूनही पोलीस निरीक्षक बधत नाही हे कसे शक्य आहे? मुनीम तिथल्या तिथे चार हजार रुपये देत होता. निरीक्षकाने पुन्हा काठीने त्याच्या पोटात मारले. “पाच हजार!” पुन्हा काठी. “आधी खाली उतर.”

मुनिमाला गाडीतून खाली उतरवून निरीक्षकाने त्याच्या डोळ्यात प्रकाशझोत मारला. मग दोन शिपायांबरोबर रस्त्यापासून वीस-पंचवीस पावले दूर झाडीत नेले. गाडीवानांवर व गाड्यांवर पाच-पाच बंदुकधारी शिपायांचा पहारा होता. हिरामणला कळून चुकले की ह्या वेळेस सुटका नाही. तुरुंग? हिरामणला तुरुंगात जाण्याची भीती नव्हती. पण त्याच्या बैलांचे काय? त्यांना बरेच दिवस चारा-पाण्याशिवाय उपाशी, तहानलेल्या अवस्थेत सरकारी पांजरपोळात राहावे लागेल. मग त्यांचा लिलाव होईल. भावाला आणि भावजयीला तोंड दाखवण्याची सोय राहणार नाही. त्याच्या कानात लिलावाची बोली घुमू लागली, एक – दोन – तीन! निरीक्षक व मुनीम ह्यांच्यात सौदा होत नव्हता बहुतेक.

हिरामणच्या गाडीजवळ तैनात शिपायाने आपल्या भाषेत दुसर्‌या शिपायाला हळूच विचारले, “काय रे? मामला फिसकटला वाटतं?” मग पान-तंबाखू देण्याच्या निमित्ताने तो त्या शिपायाजवळ गेला.

एक – दोन – तीन! तीन – चार गाड्यांचा आडोसा होता. हिरामणचा विचार पक्का झाला. त्याने हळूहळू आपल्या बैलांच्या गळ्यातील दोर्‌य़ा सोडल्या. गाडीवर बसल्या बसल्या दोघांना एकमेकांशी बांधले. काय करायचे ते बैल समजले. हिरामण खाली उतरला व जोडलेल्या गाडीपासून बैलांना मोकळे केले. दोघांच्या कानाशी गुदगुल्या करत मनातल्या मनात म्हणाला, “चला भाऊ, जगलो वाचलो तर अशा गाड्या पुष्कळ मिळतील. एक – दोन – तीन! पळा!”

गाड्यांच्या आड रस्त्यापलीकडे घनदाट झाडी पसरली होती. श्वास रोखून, आवाज न करता तिघांनी झाडी पार केली. मग एक दोन करत दुडकी चाल! मग दोन्ही बैल ताठ मानेने तराईच्या जंगलात घुसले. रस्त्याचा वास घेत, नदी-नाले ओलांडत, शेपट्या उंचावून धावत सुटले. हिरामण त्यांच्या मागे धावत होता. रात्रभर तिघे धावत होते.

घरी पोहोचल्यावर हिरामण दोन दिवस बेशुद्ध होता. घरी पोहोचताच त्याने कानाला खडा लावला. त्याने शपथ घेतली की यापुढे अशा बेकायदा वस्तू वाहून नेणार नाही. त्याच्या बैलगाडीचे काय झाले कोणास ठाऊक. पोलादी आस होते तिला. दोन्ही नसली तरी एक चाक नवे होते. गाडी रंगीत गोंड्यांनी सुशोभित होती.

त्याने दोन शपथा घेतल्या आहेत. पहिली, गाडीतून चोरीचा माल न्यायचा नाही. दूसरी, बांबू! प्रत्येक संभाव्य उतारूला तो सर्वप्रथम विचारतो, “काही चोरीचं सामान तर नाही ना?”आणि बांबू? बांबू वाहून नेण्यासाठी कोणी पन्नास रुपये जरी देऊ केले तरी हिरामणची गाडी मिळणार नही. दुसरी गाडी बघावी.

बांबूने भरलेली गाडी! गाडीतून चार हात पुढे व मागे बांबू बाहेर आलेले. गाडीवर नियंत्रण राहात नाही. म्हणजे एक तर ताब्यात नसलेली बैलगाडी, त्यात खरैहिया शहर! हे कमी म्हणून रस्ता दाखवत पुढे चालणार्‌या व्यापार्‌याच्या महामूर्ख नोकराचे लक्ष मुलींच्या शाळेकडे. मग काय, वळणावर झाली घोडागाडीशी टक्कर. हिरामणने बैलांची दोरी ओढण्याआधीच घोडागाडीचे छप्पर बांबूत जाऊन अडकले. घोडागाडीवाल्याने तडातड चाबूक मारत शिवीगाळ केली होती!

गाडीत बांबू नेणे तर सोडा, हिरामणने खरैहिया शहराला जाणेच सोडले. आणि फारबिसगंज ते मोरंग ये जा सुरू केली तर बैलगाडीच गेली! मग काही वर्षे हिरामण दुसर्‌याच्या गाडीला आपले बैल जोडून चालवत होता. येणार्‌य़ा पैशातील अर्धे गाडीवाल्याचे आणि अर्धे बैलवाल्याचे. गाडी हाकण्याची मजुरी शून्य! अशा अर्ध्यामुर्ध्या कमाईत बैलांचेच पोट भरेना. शेवटी, गेल्या वर्षी त्याने स्वत:ची नवी बैलगाडी बनवून घेतली.

देव त्या सर्कशीतल्या वाघाचे भले करो. गेल्या वर्षी ह्याच जत्रेत वाघाचा पिंजरा ओढणारे दोन्ही घोडे मेले. जत्रा चंपानगरहून फारबिसगंजला जाण्यास निघाली तेव्हा सर्कशीच्या व्यवस्थापकाने, जो पिंजरा ओढून नेईल त्या गाडीवानास शंभर रुपये देऊ असे जाहीर केले. एक-दोन गाडीवान तयार झाले. पण त्यांचे बैल वाघाच्या पिंजर्‌याच्या दहा पावले दुरूनच घाबरून हंबरू लागले व दोरी तोडून पळून गेले. हिरामण आपल्या बैलांच्या पाठीवरून मायेने हात फिरवत बोलला, “भाऊ, अशी संधी पुन्हा येणार नाही. हाच मोका आहे आपली स्वत:ची बैलगाडी बनवून घेण्याचा. नाही तर ही ५०% भागीदारी कायमची. अरे, पिंजर्‌यात बंद असलेल्या वाघाला काय घाबरायचं? तुम्ही मोरंगच्या तराईत डरकाळ्या फोडणार्‌या वाघांना पाहिलय. आणि मी आहे ना सोबत.”

सर्व गाडीवान टाळ्या पिटू लागले. हिरामणच्या बैलांनी सार्‌यांची लाज राखली होती. एक एक करून दोन्ही बैल वाघाच्या पिंजर्‌याला जुंपले. जुंपताच उजव्या बाजूचा बैल भरपूर मुतला. दोन दिवस हिरामणने नाकावरील कापड काढले नाही. मोठ्या पेठेतील मोठ्या शेटजीसारखे नाकावर कापड घेतल्याशिवाय वाघाची दुर्गंधी सहन करणे कोणालाही शक्य नाही.

हिरामणने वाघाच्या पिंजर्‌याची गाडीवानी केली आहे. तेव्हाही अंगावर असे रोमांच फुलले नव्हते. आज त्याच्या गाडीत चाफ्याच्या फुलांचा सुवास दरवळतोय. पाठीवर रोमांच फुलले की तो पंचाने आपली पाठ झटकत होता.

हिरामणच्या मते, चंपानगरची भगवती माई गेली दोन वर्षे त्याच्यावर प्रसन्न आहे. गेल्या वर्षी वाघाचा पिंजरा वाहून न्यायला मिळाला. मोजून शंभर रुपये भाडे, शिवाय प्रवासखर्च, चहा-बिस्किटे, आणि वाटेत माकड, अस्वल व विदूषकांचा खेळ फुकटात. आणि ह्या वेळी गाडीत बसणारी ही बाई. बाई कसली, चाफ्याचे फूल आहे, फूल. गाडी कशी सुगंधित झाली आहे.

कच्च्या रस्त्यावर बैलगाडीचे उजवे चाक छोट्या खड्ड्यात गेल्यामुळे जरासा धक्का बसला. गाडीच्या आतून एक हलकासा सुस्कारा ऐकू आला. हिरामणने उजव्या बैलाच्या पाठीत रट्टा घालून म्हटले, “साल्या, गाडीत पोती भरलेली नाहीत. काही कळतं की नाही तुला?”

“मारू नकोस त्याला!”

त्या न पाहिलेल्या बाईच्या आवाजाने हिरामण चकित झाला. तिचे बोलणे एखाद्या लहान मुलासारखे नाजूक, एखाद्या फसफसणार्‌या पेल्यासारखे होते.

मथुरामोहन तमाशा बारीत लैलाचे काम करणार्‌या हीराबाईचे नाव ज्याने ऐकलेले नाही असा माणूस शोधून सापडायचा नाही. पण हिरामणचे सगळेच वेगळे. सलग सात वर्षे जत्रेत गाडी हाकली पण तमाशा, नाटक, बायस्कोप चित्रपट एकदाही पाहिले नाहीत. लैला किंवा हीराबाईचे नावही त्याच्या गावी नव्हते. पाहणे तर दूर राहिले. त्यामुळे जत्रा संपण्याच्या पंधरा दिवस आधी रात्री काळी ओढणी लपेटलेली बाई पाहून तो जरा गडबडला. तिचे सामान घेऊन आलेला नोकर गाडी-भाड्याविषयी त्याच्याशी घासाघिस करू लागला तेव्हा तिने मान हलवून त्याला थांबवले. गाडीला बैल जोडताना हिरामणने नोकराला विचारले, “बाबा रे, काही चोरीचा माल तर नेत नाहीत ना?” नोकराने फक्त हाताच्या इशार्‌याने त्याला गाडी हाकायला सांगितले आणि अंधारात गायब झाला. हिरामणला जत्रेत तंबाखू विकणार्‌या म्हातारीच्या काळ्या साडीची आठवण आली.

अशा स्थितीत काय गाडी हाकणार?

एक तर अंग रोमांचित होत होते. दुसरे म्हणजे गाडीत पुन्हा पुन्हा चाफा फुलत होते. बैलांना ओरडला तर गाडीत बसलेली बाई "इस-बिस" करू लागे. त्याची स्वारी! एकटी बाई. तंबाखू विकणारी म्हातारी नाही. तिचा आवाज ऐकल्यापासून तो वारंवार मागे वळून पाहतो आहे; पंचाने आपली पाठ झटकतो आहे. काय लिहिले आहे ह्या वेळी नशिबात हे त्या जगन्नियंत्यालाच ठाऊक! बैलगाडी पूर्वेला वळल्यावर गाडीत चांदणे पडले. त्या प्रकाशात तिचे नाक चमकू लागले. हिरामणला सारे रहस्यमय, अद्भूत जाणवत होते. समोर चंपानगर ते सिंधिया गावापर्यंतचा विस्तीर्ण प्रदेश. ती कुणी डाकीण किंवा पिशाची तर नाही?

बाईने कूस बदलली. चांदण्याने पूर्ण उजळलेला तिचा चेहरा पाहून हिरामणने कसेबसे स्वत:ला चित्कारण्यापासून रोखले. ही तर परी आहे! परीने डोळे उघडले. हिरामण पुन्हा समोर रस्त्याकडे बघू लागला, व जीभ तालूला लावून बैलांना च्‌-च्‌-च्‌ करू लागला. त्याची जीभ केव्हापासून सुकून लाकूड झाली होती.

“नाव काय रे तुझं, भाऊ?”

केवढा फेनील आवाज. हिरामणचे रोम रोम पुलकित झाले. त्याच्या दोन्ही बैलांनीही हा गोड आवाज ऐकून कान टवकारले.

“माझं नाव? माझं नाव हिरामण.”

ती हसली. त्या हसण्यात सुगंध होता.

“तर मग मी तुला मीता म्हणेन, भाऊ नाही. माझं नावही हीरा आहे.”

हिरामणचा विश्वास बसला नाही, “स्त्री आणि पुरुषाच्या नावात फरक असतो.”

“अरे खरंच, माझं नाव हीराबाई आहे.”

हिरामण कुठे आणि हीराबाई कुठे, खूप फरक आहे दोघात.

“कान टवकारून गपचूप ऐकून तीस कोसांचा रस्ता पार होणार आहे का?”, हिरामण बैलांना म्हणाला. “हा डाव्या बाजूचा बुटका एक नंबरचा बदमाश आहे.” हिरामणने डाव्या बैलाला दोरीचा हलका फटका लगावला.

“मारू नकोस; हळूहळू चालू दे. घाई काय आहे?”

हिरामणला प्रश्न पडला की हिला कसे संबोधायचे. तू, तुम्ही की आपण? त्याच्या भाषेत मोठ्यांना 'आपण' म्हटले जाते. कचराही बोलीत दोन-चार वाक्ये बोलणे ठीक आहे, पण दिलखुलास गप्पा मारायला गावरान भाषाच हवी.

आश्विन-कार्तिक महिन्यांत पहाटे पडणार्‌या धुक्यावर हिरामणचा राग जुना होता. कैकदा धुक्यात तो रस्ता चुकला होता. पण आज ह्या पहाटेच्या धुक्यातही तो प्रसन्न आहे. वारा नदीकिनारी असलेल्या शेतातील धान्याच्या बहरलेल्या पिकाचा गंध आणत होता. सणासुदीला गावात असाच सुगंध पसरलेला असतो. त्याच्या गाडीत पुन्हा चाफ्याचे फूल फुलले. त्या फुलात एक परी बसली होती. जय भगवती.

हिरामणने डोळ्यांच्या कोपरातून पाहिले की मीता हीराबाईचे डोळे सतत त्याच्याकडे वळताहेत. त्याच्या मनात एक अज्ञात रागिणी झंकारू लागली. देहाला झिणझिण्या येत होत्या. तो म्हणाला, “ बैलांना मारलं तर तुम्हाला का वाईट वाटतय?”

हीराबाईने त्याला पारखून घेतले. हिरामण अस्सल हिरा आहे. चाळीस वर्षांचा तगडा, काळा-सावळा खेडुत. त्याला आपली गाडी व आपल्या बैलांशिवाय जगातील इतर कोणत्याही गोष्टीत फारसा रस नाही. घरी एक विवाहित, लेकुरवाळा मोठा भाऊ आहे जो शेती करतो. हिरामण भावापेक्षा वहिनीला जास्त मानतो. आणि घाबरतोही. हिरामणचेही बालपणी लग्न झाले होते. पण सासरी पाठवणी होण्याआधीच त्याची पत्नी वारली. हिरामणला तिचा चेहराही धड आठवत नाही. दुसरे लग्न? दुसर्‌यांदा लग्न न होण्याची बरीच कारणे आहेत. वहिनीचा हट्ट आहे की हिरामणचे लग्न कुमारिकेशीच लावणार. कुमारिका म्हटल्यावर पाच - सात वर्षांची मुलगी. शारदा कायदा गेला चुलीत. कोणताही मुलीचा बाप अडचणीत असल्यावाचून बिजवराला आपली मुलगी देत नाही. पण वहिनी अडून बसली आहे. तिच्यापुढे भावाचे काही चालत नाही. हिरामणने ठरवले आहे, लग्नच करायचे नाही. ती कटकटच नको. लग्नानंतर गाडीवानी कशी करणार? आणि काय वाटेल ते झाले तरी हिरामण गाडीवानी सोडायला तयार नाही.

हीराबाईने हिरामणसारखी निष्कपट माणसे फार कमी पाहिली होती. त्याने विचारले, “तुमचे घर कोणत्या जिल्ह्यात आहे?” कानपुर हे उत्तर ऐकून तो इतका जोरजोरात हसू लागला की बैल बिथरले. हिरामण हसताना मान खाली करायचा. हसून झाल्यावर म्हणाला, “कानपुर! मग नाकपुरही असेल?” आणि हीराबाईने नाकपुरही आहे म्हटल्यावर त्याची हसता हसता पुरेवाट झाली.

“दुनिया अजब आहे. काय एक एक नावं असतात! कानपुर, नाकपुर!” हिरामणने हीराबाईच्या कानातील फुलाच्या आकाराचे कर्णभूषण निरखून पाहिले. नथीतील रक्तवर्णी नाग पाहून भयभीत झाला.

हिरामणने हीराबाईचे नाव ऐकले नव्हते. तमाशाच्या बारीतील स्त्रियांना तो नायकिणी समजत नसे. काम करणार्‌या स्त्रिया त्याने पाहिल्या होत्या. सर्कस कंपनीची मालकीण व तिच्या दोन्ही तरुण मुली वाघाच्या पिंजर्‌याजवळ येत, त्याला अन्न-पाणी देत, त्याच्यावर प्रेम करत. हिरामणच्या बैलांनाही मोठ्या मुलीने पाव-बिस्किटे दिली होती.

हिरामण हुशार आहे. धुके उडून गेल्यावर त्याने आपल्या चादरीचा पडदा करून गाडीला लावला. “आणखी फक्त दोन तास! त्यानंतर प्रवास करणे अवघड आहे. कार्तिकातील सकाळचे ऊन तुम्हाला सहन होणार नाही. कजरी नदीच्या किनारी तेगछियाजवळ थांबू दुपारभर.”

समोरून येणार्‌य़ा गाडीला दुरून पाहून तो सतर्क झाला. बैलांकडे व रस्त्यावरील चाकांच्या खुणांकडे लक्ष देऊ लागला. त्यांना ओलांडताना दुसर्‌या गाडीवानाने विचारले, “जत्रा संपली का रे?”

हिरामण म्हणाला की त्याला जत्रेचे काही माहीत नाही. त्याच्या गाडीत 'बिदागी' (माहेरी किंवा सासरी निघालेली मुलगी) आहे. हिरामणने कोणत्या गावाचे नाव सांगितले कोणास ठाऊक.

“छतापुर-पचीरा कुठे आलं?”

“कुठे का असेना, तुम्हाला काय त्याचं?” हिरामण स्वत:च्या हजरजबाबीपणावर हसला. पडदा लावूनही पाठीवर रोमांच येतच होते.

हिरामण पडद्यातील भोकातून पाहतो. हीराबाई एका काडेपेटीच्या आकाराच्या आरशात आपले दात निरखत होती. मदनपुरच्या जत्रेत हिरामणने एकदा बैलांसाठी कवड्यांची माळ विकत घेतली होती. छोट्या छोट्या नाजूक कवड्यांची.

तेगछियाची तिन्ही झाडे दुरून दिसत. पडदा जरासा सारून हिरामण म्हणाला, “पहा, तेगछिया आलं. दोन झाडं औषधी वडाची आहेत आणि एक - काय बरं नाव त्या फुलाचं, तुमच्या कुर्त्यावर छापलय ना, ते; खूप वास असतो त्याला, त्याचा सुगंध दोन कोस दूर पसरतो. त्या फुलाला तंबाखूतही घालतात.”

“त्या आमराईपलीकडे काही घरं दिसतायत. गाव आहे की देऊळ?”

विडी पेटवण्याआधी हिरामणने विचारले, “विडी ओढली तर चालेल? तुम्हाला वासाने त्रास नाही ना होणार? तो नामलगरचा देवडी दरवाजा आहे. ज्या राजाच्या जत्रेतून आपण आलोय त्याचे आहे. काय दिवस होते ते!”

हिरामणने 'काय दिवस होते ते!' असे म्हणून तिची उत्कंठा वाढवली. हीराबाईने छकड्याचा पडदा बाजुला खोचला.

“कोणते दिवस?,” हनुवटीवर हात ठेवून आपले मोत्याच्या दाण्यासारख्या दंतपंक्ती दाखवत तिने विचारले.

"नामलगर देवडीचा काळ. काय होतं आणि काय झालं.”

हिरामण गप्पा छान रंगवायचा. "तू पाहिलायस तो काळ?", हीराबाईने विचारले.

“पाहिला नाही, पण त्याबद्दल ऐकलय. राज्य कसं गेलं ह्याची अतिशय दु:खद कहाणी आहे. असं म्हणतात, राजाच्या घरात देवानं जन्म घेतला. किती झालं तरी देवच तो. इंद्रलोक सोडून मृत्युलोकी जन्म घेतला म्हणून त्याचं तेज कमी होणार आहे का? सूर्यफुलाप्रमाणे डोक्याभवती प्रभावळ होती त्याच्या. पण राजानं नाही ओळखलं त्याला. नजरेचा दोष, दुसरं काय. एकदा तिथं एक गोरा साहेब आपल्या मडमेसोबत विमानानं आला. त्या साहेबालाही ओळखता आलं नाही. शेवटी मडमेनं ओळखलं. तो तेजस्वी चेहरा पाहून बोलली, “ए मॅन राजा, हे माणसाचं मूल नाही, देव आहे.”

हिरामणने यस-फस करत मडमेची नक्कल केली. हीराबाई मनापासून हसली. हसताना तिचा सार देह हलतो.

तिने आपली ओढणी नीट केली. त्या वेळी हिरामणला वाटले ... वाटले …

”मग? पुढे काय झालं, मीता?”

“गोष्टी ऐकण्याचा बराच षोक दिसतोय तुम्हाला. काळा माणूस राजा झाला काय, महाराजा झाला काय, शेवटी काळाच. साहेबासारखी बुद्धी कुठून येणार त्याच्यात. मडमेचं म्हणणं सगळ्यांनी थट्टेवारी नेलं. मग देव वारंवार राणीच्या स्वप्नात येऊ लागला. म्हणायचा, सेवा करू शकत नसाल तर मला जाऊ द्या, मला तुमच्याकडे राहायचं नाही. त्यानंतर देवाची लीला सुरू झाली. पहिल्यांदा सुळे असणारे दोन्ही हत्ती मेले, मग घोडा, मग पटपटांग.”

“पटपटांग म्हणजे काय?”

हिरामणचे मन चंचल झाले आहे. त्यात जणू इंद्रधनुष्य उमलू लागले आहे. त्याच्या बैलगाडीत कुणी देवलोकीची स्त्री बसली आहे. देवता त्या देवताच.

“पटपटांग म्हणजे धन-दौलत, मालमत्ता सगळं गेलं. देव स्वर्गास निघून गेला.”

दृष्टिआड होत चाललेल्या देवळाच्या कळसाकडे पाहून हीराबाईने खोल श्वास घेतला.

“देवानं जाता जाता सांगितलं, ह्या राजघराण्यात कधीही कोणालाही दुसरा मुलगा होणार नाही. ऐश्वर्य मी सोबत घेऊन जात असलो तरी गुण राहतील. त्या देवाबरोबर इतर देव-देवताही गेल्या. फक्त सरस्वती माता मागे राहिली. तिचेच ते देऊळ आहे.”

देशी घोड्यांवर ओझी लादून येणार्‌या व्यापार्‌यांना पाहून हिरामणने छकड्याचा पडदा ओढून घेतला. बैलांना चेतवून मग विरहिणीचे वंदनागीत गाऊ लागला:

हे सरस्वती माते, ऐक गार्‌हाणे

मदतीला ये तू धावून माते

घोडेवाल्या व्यापार्‌याने विचारले, “गावातले व्यापारी काय भावाने कापड विकत घेतात?”

लंगडा घोडेवाल्या व्यापार्‌याने उत्तर दिले, “सत्तावीस-अठ्ठावीसपासून तीस. जसा माल, तसा भाव.”

तरुण व्यापार्‌याने विचारले, “जत्रेचा काय हालहवाल, भाऊ? तमाशाची बारी कोणती आलीये, रौता की मथुरामोहन?”

सूर्य माथ्यावर आला होता. हिरामण आपल्या बैलांशी बोलू लागला, “अजून एक कोस जायचय. जरा दमानं घ्या. तहान लागली असेल ना तुम्हाला? तुम्हाला आठवतं, एकदा तेगछियाजवळ सर्कशीतील विदूषकात व माकडाचे खेळ करून दाखवणार्‌यात जुंपली होती. विदूषक अगदी माकडासारखे दात विचकून चिं चिं करत होता. काय माणसं असतात एक एक!”

हिरामणने पुन्हा पडद्याच्या भोकातून पाहिले. हीराबाईचे सारे लक्ष कागदाच्या एका तुकड्यावर होते. हिरामणचे मन आज सुरांवर तरंगत होते. त्याला वेगवेगळ्या प्रकारची गाणी आठवत होती. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी विरहिणी, मजूर, नाच्यापोरे एकाहून एक सरस गझल, खेमटा वगैरे गायचे. आता कसली ती भोंग्यातून भाँ भाँ करणारी गाणी गातात लोक. काय दिवस आलेत. हिरामणला नाच्यापोर्‌यांच्या गाण्यांची आठवण आली -

सजनवा बैरी हो ग'य हमारो! सजनवा!

अरे, चिठिया हो तो सब कोई बाँचे; चिठिया हो तो

हाय! करमवा, होय करमवा

गाडीच्या लाकडावर बोटांनी ताल धरून हिरामनने गाणे मध्येच थांबवले. नाचातल्या नाच्यापोर्‌याचा चेहरा हीराबाईसारखाच होता. कुठे गेला तो काळ? दर महिन्याला गावात नाचणारे यायचे. नाच बघायला जाण्यावरून हिरामणला अनेकदा वहिनीचा ओरडा खावा लागला होता. भावाने घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती.

आज हिरामणवर माता सरस्वतीची कृपादृष्टी असावी. हीराबाई म्हणाली, “व्वा! किती छान गातोस तू!” हिरामणचा चेहरा लाजेने लालबुंद झाला. तो मान खाली घालून हसू लागला.

आज तेगछियाचे महावीर स्वामीही हिरामणला काही करू शकत नाहीत. तेगछियाच्या खाली एकही गाडी उभी नाही. नेहमी इथे बैलगाड्यांची व गाडीवानांची गर्दी असते. आज फक्त एक सायकलवाला बसलेला होता. महावीर स्वामींचे स्मरण करून हिरामणने गाडी उभी केली. हीराबाई पडदा सारू लागली. हिरामणने पहिल्यांदाच तिला डोळ्यांनी खूण केली, सायकलवाला टक लावून पाहत होता.

बैलांना सोडण्याआधी खाली गवत पसरून गाडी त्यावर टेकवली. मग सायकलवाल्याकडे पुन्हा पुन्हा पाहून त्याला विचारले, “ कुठे जायचय? जत्रेला? कुठून आलात? बिसनपुरहून? तरुण असून एवढ्यात थकलात?”

तो बारीकसा तरुण सायकलवाला हळू आवाजात काहीतरी बोलला, व विडी शिलगावून उठून उभा राहिला.

हिरामणला जगाच्या नजरेपासून हीराबाईला दूर ठेवायचे होते. त्याने चोहीकडे पाहिले. कोठेही गाडी वा घोडे दिसत नव्हते.

कजरी नदीचा क्षीण ओघ तेगछियाजवळ येऊन पूर्वेकडे वळला होता. हीराबाई पाण्यात बसलेल्या म्हशींना व त्यांच्या पाठीवर बसलेल्या बगळ्यांना पाहत बसली.

“जा, घाटावर जाऊन हात-तोंड धुऊन घ्या,” हिरामण बोलला.

हीराबाई गाडीतून उतरली. हिरामणच्या छातीत धडधड होऊ लागली. नाही, नाही! पाय सरळच आहेत, उलटे नाहीत. पण तळवे एवढे लाल का? गावच्या लेकी-सुनांसारखी हीराबाई खालमानेने सावकाश घाटाकडे जाऊ लागली. कोण म्हणेल ही तमाशातली बाई आहे? बाई नव्हे, मुलगी. कदाचित कुमारीच असेल.

हिरामण गाडीवर बसला. त्याने आत पाहिले. एकदा इकडे तिकडे बघून घेतले, आणि मग हीराबाईच्या तक्क्यावर हात ठेवला. मग तक्क्यावर कोपर ठेवून रेलला. त्याच्या देहात सुगंध भरला. तक्क्याच्या अभ्र्‌यावर भरलेल्या फुलांना बोटांनी स्पर्श केला, त्यांना हुंगले. हाय! इतका सुगंध! हिरामणला एका बैठकीत पाच चिलिम गांजा प्याल्यासारखे वाटले. हिराबाईच्या छोट्या आरशात त्याने आपला चेहरा बघितला. डोळे एवढे लाल का झालेत?

हीराबाई परतली तेव्हा तो हसून म्हणाला, “आता तुम्ही गाडीवर पहारा द्या, मी आलोच.”

हिरामणने आपल्या झोळीतून स्वच्छ गंजी काढला. पंचा झटकून खांद्यावर टाकला व हातात बालदी घेऊन निघाला. त्याच्या बैलांनी 'हुँक – हुँक' करत त्याला काहीतरी सांगितले. हिरामण जाता जाता त्यांना म्हणाला, “हो, तहान सगळ्यांनाच लागली आहे. परत आल्यावर गवत देतो, तोवर मस्ती करू नका.” बैलांनी कान हलवले.

हिरामण आंघोळ करून कधी परत आला ते हीराबाईला कळलेच नाही. कजरीच्या प्रवाहाकडे पाहता पाहता रात्रीची राहिलेली झोप तिच्या डोळ्यांवर आली होती. हिरामण नजिकच्या गावातून न्याहारीसाठी दहीसाखरेचे पोहे घेऊन आला आहे.

“उठा, थोडं खाऊन घ्या.”

हीराबाई जागी झाली, आणि आश्चर्याने पाहू लागली. एका हातात मातीच्या नव्या मडक्यात दहीसाखरेचे पोहे, आणि केळीची पाने. दुसर्‌या हातात पाण्याने भरलेली बालदी. डोळ्यांत प्रेमळ आग्रह!

'एवढे जिन्नस कुठून आणलेस?”

“ह्या गावाचे दही-पोहे प्रसिद्ध आहेत. चहा मात्र फारबिसगंजला पोहोचल्यावरच मिळू शकेल,” हिरामण बोलला.

“तूही एक पत्रावळ घे. का? तू खाणार नसशील तर बांधून आपल्या झोळीत ठेवून दे. मीही खाणार नाही.”

“ठीक आहे, पण आधी तुम्ही खाऊन घ्या,” हिरामण लाजत बोलला.

“आधी - नंतर वगैरे काही नाही. तूही बस खायला.”

हीराबाईने स्वत:च्या हातांनी त्याची पत्रावळ घेतली, त्यावर पाणी शिंपडले, दही-पोहे वाढले. हिरामण सुखावला, कृतकृत्य झाला. हिरामणला वाटले जणू साक्षात भगवती माता नैवद्य देत होती. लालचुटुक ओठांवर गोरसाचा स्पर्श. पोपटाला कधी दूध-भात खाताना पाहिले आहे?

गाडीत झोपलेली हीराबाई व जमिनीवर सतरंजी अंथरून झोपलेला हिरामण एकाच वेळी उठले. जत्रेला जाणार्‌या गाड्या तेगछियाजवळ थांबल्या आहेत. लहान मुलांची चिवचिव ऐकू येत आहे.

हिरामण गडबडीत उठला. गाडीत डोकावून खुणेने दिवस मावळल्याचे सांगितले. गाडीला बैल जोडताना इतर गाडीवानांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. गादी हाकताना बोलला, “सिरपुर बाजारातील इस्पितळाच्या डॉक्टरीणबाई आहेत. जवळच कुडमा गावात रोग्याला बघायला जातायत.” हीराबाई छत्तापुर - पचीरा हे नाव विसरली. गाडीने थोडे अंतर कापल्यावर तिने हसून विचारले, “पत्तापुर – छपीरा?” हसून हसून हिरामणचे पोट दुखू लागले. “पत्तापुर – छपीरा! हा हा हा, ते छत्तापुर - पचीराचेच गाडीवान आहेत. त्यांना कसे सांगू? ही ही ही!”

हीराबाई स्मित करत गाव बघू लागली.

रस्ता तेगछिया गावातून जात होता. गावची मुले परगावची गाडी पाहून टाळ्या पिटत पाठ केलेल्या ओळी ऐकवू लागले:

“लाली-लाली डोलिया में

लाली रे दुलहनिया पान खाए!”

हिरामण हसला. लाल - लाल डोलीत नवी नवरी! नवरी पान खाते आहे, नवर्‌याच्या फेट्याला तोंड पुसते आहे. अगं नवरे, तेगछिया गावच्या मुलांना विसरू नकोस. परत येते वेळी बोर व गुळाचे लाडू आण. तुझा पती चिरायू होवो. हिरामणचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अशी किती स्वप्ने पाहिली होती त्याने. तो आपल्या बायकोला घेऊन परत येत आहे. प्रत्येक गावाची मुले टाळ्या वाजवत आहेत. अंगणातून बायका वाकून वाकून पाहताहेत. पुरुष विचारताहेत, “ कुठली गाडी आहे? कुठे चाललाय?” त्याची बायको मेण्याचा पडदा जरासा सारून डोकावते आहे. आणखी बरीच स्वप्ने. गावाबाहेर पडल्यावर त्याने डोळ्यांच्या कोपर्‌यातून गाडीत पाहिले. हीराबाई कसला तरी विचार करत होती. हिरामणही विचारात गढला. थोड्या वेळाने गुणगुणू लागला -

“सजन रे झूठ मति बोलो, खुदा के पास जाना है

नहीं हाथी, नहीं घोडा, नहीं गाड़ी,

वहाँ पैदल ही जाना है. सजन रे"

हीराबाईने विचारले, “मीता, तुझ्या स्वत:च्या बोलीभाषेत एखादं गाणं नाही का?”

हिरामण आता बेधडक हीराबाईच्या नजरेला नजर देऊन बोलू लागला आहे. तमाशातली बाईदेखिल अशी असू शकते? सर्कशीची मालकीण मड्डम होती. पण हीराबाई! गावच्या बोलीभाषेतील गाणे ऐकायचे आहे तिला. तो मोकळेपणाने हसला. “गावची बोली समजेल तुम्हाला?”

“हूँ - ऊँ - ऊँ!” हीराबाईने मान डोलावली. तिच्या कानातले डूल हलले.

हिरामण थोडा वेळ काही न बोलता गाडी हाकत राहिला. मग म्हणाला, “तुम्हाला गाणं खरंच ऐकायचय? गावाकडची गाणी ऐकण्याची एवढी हौस आहे? मग गाडी जरा आडवाटेने न्यावी लागेल. वाहत्या रस्त्यात कसा गाऊ?” हिरामणने बैलांची दोरी ओढून जरा डावीकडे घेतले व म्हणाला, “हरिपुरवरून जाणार नाही आता आपण.”

त्यांना रुळलेली वाट सोडताना पाहून मागच्या गाडीच्या गाडीवानाने विचारले, “काय रे गाडीवाना, वाट सोडून भलतीकडे कुठे निघालास?” हिरामणने हवेत चाबूक फिरवत उत्तर दिले, “वाट सोडून? तो रस्ता नननपुरला जात नाही.” मग स्वत:शी बडबडू लागला, “इथल्या लोकांचं हेच वाईट आहे. येता-जाता चांभारचौकश्याच फार. अरे बाबा, तुला जायचं आहे तिथे जा ना. गावंढळ लेकाचे!” नननपुरच्या रस्त्याला गाडी नेऊन हिरामणने बैलांची दोरी सैल सोडली.

हीराबईने पाहिले, नननपुरची वाट खरेच निर्जन होती. तिच्या डोळ्यांतील भाव ओळखून हिरामण म्हणाला, “ घाबरू नका. हा रस्तासुद्धा फारबिसगंजला जातो. वाटेवरचे लोकही चांगले आहेत. रात्रीपर्यंत पोहोचू आपण.”

हीराबाईस फारबिसगंजला पोहोचण्याची घाई नव्हती. हिरामणवर तिचा एवढा विश्वास बसला होता की मनात अजिबात भीती नव्हती. हिरामण स्मित करीत कोणते गाणे ऐकवावे ह्याचा विचार करू लागला. हीराबाईला गीत व कथा दोन्हीचा षोक होता. बस! महुआचे गाणे. तो बोलला, “बरं ,तुम्हाला ऐकण्याची इतकी इच्छा आहे तर मी तुम्हाला नदीकाठी घाटावर राहणार्‌या महुआचे गाणे ऐकवतो. त्यात गाणे आणि गोष्ट दोन्ही आहे.”

किती दिवसांनी भगवतीने हिरामणची ही इच्छा पूर्ण केली होती. जय भगवती! आज हिरामणचे मन प्रसन्न होते. तो हीराबाईचे स्मितहास्य पाहत होता.

“ऐका! आजही परमार नदीवर महुआचे बरेच जुने घाट अस्तित्वात आहेत. ती ह्याच परिसरातली होती. नदीच्या घाटावर राहणारी असली तरी साध्वींहून कमी नव्हती. तिचा बाप दारू पिऊन दिवस-रात्र बेशुद्ध पडलेला असायचा. तिची सावत्र आई साक्षात राक्षसीण होती. अतिशय धूर्त आणि चलाख बाई. रात्री गांजा-दारू-अफूची चोरटी विक्री करणार्‌यांसारख्या तर्‌हेतर्‌हेच्या लोकांशी तिची ओळख होती. अगदी घट्ट मैत्री. महुआ कुंवार होती. राक्षसीण तिला राब राब राबवायची. महुआ वयात आली होती पण सावत्र आई तिच्या लग्नाचं काही मनावर घेत नव्हती. एक रात्री काय झालं ते ऐका.”

हिरामणने गुणगुणत गळा साफ करून घेतला, व गाऊ लागला:

“हे अ-अ-अ- सावना-भादवा के, र- उमड़ल नदिया, में, मैं-यो-ओ-ओ,

मैयो गे रैनि भयावनि-हो -ए-ए-ए-ए;

तड़का-तड़के धड़के करेज-आ-आ मोरा

कि हमहूँ जे बार-नान्ही रे-ए-ए.”

श्रावण-भाद्रपदातली दुथडी भरून वाहणारी नदी, भयानक रात्र, विजांचा कडकडाट, मी ही अशी लहान मुलगी. माझं काळीज धडधडतय. घाटावर एकटी कशी जाऊ? तेही कुणा परगावच्या अनोळखी प्रवाश्याच्या पायाला तेल लावायला! तिने खिडकी बंद केली. ढगांच्या गडगडाटात धो धो पाऊस पडू लागला. महुआ आपल्या आईची आठवण काढत रडू लागली. आज तिची आई असती तर तिने महुआला आपल्या कुशीत घेतले असते. 'ह्यासाठीच मला नऊ महिने पोटात वाढवलं होतंस का ग आई?', महुआ आईवर रागावून म्हणाली. 'एकटी का मेलीस?'

हिरामणने पाहिले की हीराबाई दोन्ही कोपरे तक्यावर ठेवून गुंग होऊन गाणे ऐकत होती व त्याच्याकडे बघत होती. तिचा तो तल्लीन चेहरा किती निरागस दिसत होता! हिरामणने गळ्यात कंप आणला.

“हूँ-ऊँ-ऊँ-रे डाइनियाँ मैयो मोरी-ई-ई,

नोनवा चटाई काहे नाही मारलि सौरी-घर-अ-अ।

एहि दिनवाँ खातिर छिनरो धिया

तेंहु पोसलि कि तेनू-दूध उगटन"

हिरामणने थांबून विचारले, “भाषा कळतेय का फक्त गाणंच एकताय?”

“कळतेय. उगटन म्हणजे अंगाला लावण्याचं उटणं,” हीराबाई बोलली.

“अरे वा!”, आश्चर्यचकित होऊन हिरामण उद्गारला. तर, रडून काय उपयोग? सौदागराने महुआची पूर्ण किंमत दिली होती. केस पकडून तो तिला ओढत नावेवर घेऊन गेला. नावाड्याला शीड उभारून नाव पाण्यात लोटण्याचा हुकूम दिला. शिडात वारा भरताच नाव एखाद्या पक्ष्यासारखी झेपावू लागली. महुआ रात्रभर रडत, तडफडत होती. सौदागराच्या नोकरांनी तिला धमकावले, “गप्प बस, नाहीतर नदीत फेकून देऊ.” हे ऐकून महुआला एक युक्ती सुचली. मोर तारामंडळातील तारा ढगाआडून बाहेर आला. तो पुन्हा ढगाआड लपताच महुआने पाण्यात उडी टाकली. सौदागराचा एक नोकर महुआवर लुब्ध झाला होता. त्यानेही तिच्या मागोमाग पाण्यात उडी मारली. प्रवाहाविरुद्ध पोहणे सोपे नाही. त्यात भाद्रपदातील नदी. महुआ नदीच्या घाटावर वाढलेली होती. मासा पाण्यात कधी थकतो का? महुआ मासळीसारखी पाणी कापत चालली होती. तिचा पाठलाग करणारा सौदागराचा नोकर हाका मारत होता, “महुआ, थांब. मी तुला पकडायला येत नाहीये. तू मला आवडतेस. आपण आयुष्यभर एकत्र राहू.” पण...

हिरामणचे आवडते गाणे होते हे. महुआचे गाणे गाताना त्याच्या डोळ्यांसमोर श्रावण-भाद्रपदातील नदी येते; अमावस्येची रात्र व तीत पुन:पुन: चकाकणार्‌या विजा येतात. त्या विजांच्या प्रकाशात लाटांशी झुंजणार्‌या अबोध महुआची झलक दिसते. त्या मासळीच्या हालचाली आणखी जलद होतात. आपण सौदागराचे नोकर आहोत असे त्याला वाटू लागते. महुआ काहीही ऐकत नाही, बोलत नाही. मागे वळून पाहतही नाही. आणि तो पोहता पोहता थकला आहे.

ह्या वेळी महुआ स्वत:हून त्याच्या हाती लागली असे त्याला वाटले. त्याने महुआला स्पर्श केला. ती त्याची झाली. त्याचा थकवा नाहीसा झाला. पूर आलेल्या नदीत पंधरा-वीस वर्षे प्रवाहाविरुद्ध वाहणार्‌या त्याच्या मनाला किनारा लाभला. आनंदाश्रुंना आवरणे अशक्य झाले.

त्याने हीराबाईपासून आपले पाणावलेले डोळे लपवण्याचा प्रयत्न केला. पण हीरा त्याच्या मनात शिरून कधीची सारे काही पाहत होती. आपल्या थरथरणार्‌य़ा आवाजावर ताबा मिळवत त्याने बैलांना झापले, “काय आहे ह्या गाण्यात कोणास ठाऊक. ऐकलं रे ऐकलं की लगेच पाठीवर शंभर मणाचं ओझं लादल्यागत करू लागतात दोघे.”

हीराबाई दीर्घ श्वास घेते. हिरामणच्या अंगांगात आनंदाच्या लाटा दौडतात.

“तू तर अगदी उस्ताद आहेस, मीता!”

“काहीतरीच!”

आश्विन-कार्तिकातला सूर्य थोडा वेळ तळपून कोमेजून जातो. सूर्यास्तापूर्वी नननपुरला पोहोचायचे होते. "पटापट पाय उचला रे. चला, चला. ले-ले-ले-ए हे,य!," हिरामण आपल्या बैलांना समजावतो आहे.

नननपुर येईपर्यंत तो बैलांना उत्तेजन देत होता. दर वेळी जुन्या स्मृतींना उजाळा देत होता. "विसरलात, चौधरीच्या मुलीच्या वरातीत किती गाड्या होत्या पण आपण त्या सगळ्यांना हरवलं होतं. तसे धावा. च्‌ च्‌ च्‌! नननपुर ते फारबिसगंज अंतर तीन कोस आहे. आणखी दोन तास!”

नननपुरच्या बाजारात आजकाल चहासुद्धा मिळू लागला होता. हिरामणने आपल्या तांब्यात चहा भरून आणला. त्याला माहीत होते की बारीतल्या बायका दिवसातून अनेकदा चहा पितात. चहा म्हणजे त्यांचा जीव की प्राण!

हीरा हसता हसता गडाबडा लोळू लागली. “अविवाहित पुरुषाने चहा पिऊ नये हे तुला कोणी सांगितलं?”

हिरामण लाजला. आता काय सांगणार? लाज वाटण्यासारखीच गोष्ट आहे. एकदा भोगले आहे त्याने. सर्कशीच्या मालकिणीच्या हातचा चहा पिऊन बघितला होता. चांगलाच प्रभाव पडला होता!

“प्या, गुरुजी,” हीरा हसत बोलली.

“काय, बाई!”

नननपुरच्या बाजारात दिवेलागण झाली होती. हिरामणने प्रवासात वापरण्याचा कंदील पेटवला आणि गाडीच्या पाठी लटकवला. आजकाल शहरापासून पाच कोसावर राहणारे गावकरीही स्वत:ला शहरी समजू लागले आहेत. दिवा नसलेल्या गाडीला दंड करतात. दहा लफडी!

“तुम्ही मला गुरुजी म्हणू नका.”

“तू माझा उस्ताद आहेस. शास्त्रात लिहिलं आहे, एक अक्षर शिकवणाराही गुरू व एक राग शिकवणाराही उस्ताद!”

“बाप रे! शास्त्र-पुराणांचीही माहिती आहे तुम्हाला! मी कोण? मी काय शिकवणार तुम्हाला?”

हीरा हसून गुणगुणू लागली, “हे-अ-अ-अ- सावना-भादवा के-र!”

हिरामण आश्चर्यचकित झाला. एवढी आकलनशक्ती! साक्षात महुआ!

गाडी सीताधार नदीच्या सुकलेल्या प्रवाहाच्या उतरंडीवरून गडगडत खाली उतरली. हीराबाईने एका हाताने हिरामणचा खांदा धरला. तिची बोटे बराच वेळ हिरामणच्या खांद्यावर तशीच राहिली. त्याने आपली नजर आपल्या खांद्यावर स्थिरावण्याचा अनेकदा प्रयत्न केला. चढण लागल्यावर तिची सैलावलेली बोटे पुन्हा त्याला घट्ट धरू लागली.

समोर फारबिसगंज शहराचे दिवे चमकत आहेत. शहरापासून थोड्या अंतरावर मेळ्याच्या कंदिलांचा छायाप्रकाशाचा नाच सुरू आहे. डबडबलेल्या डोळ्यांना प्रत्येक दिवा सूर्यफूल भासतो आहे.

फारबिसगंज हिरामणचे घर आहे.

किती वेळा तो इथे आला आहे ह्याची गणतीच नाही. मेळ्याचे सामान गाडीत भरले आहे. बाईची सवारी? हो, एकदा. जेव्हा त्याची वहिनी पहिल्यांदा सासरी आली होती तेव्हा. त्या वेळीही गाडीला असेच चारी बाजूंनी झाकून बंद केले होते.

हिरामण आपल्या गाडीवर ताडपत्री लावत होता. सकाळ होताच रौता तमाशा बारीच्या व्यवस्थापकाशी बोलून हीराबाई बारीत भरती होईल. परवा जत्रा सुरू होणार. ह्या खेपेला पुष्कळ पाले पडली आहेत. फक्त एक रात्र. आज रात्रभर ती हिरामणच्या गाडीत राहणार. गाडीत नव्हे, घरात!

“ही गाडी कोठून आलीये? अरे, हिरामण, तू! कुठल्या जत्रेतून आलायस? काय भरून आणलयस गाडीत?”

एका गावचे गाडीवान एकमेकांना शोधून जवळ जवळ गाड्या लावू लागले. आपल्या गावच्या लालमोहर, धुन्नीराम, आणि पलटदास इत्यादी गाडीवानांना पाहून हिरामण धास्तावला. तिथे पलटदास गाडीच्या आत डोकावून वाघ पाहिल्यागत दचकला. हिरामणने खुणेने सर्वांना गप्प केले. मग गाडीकडे चोरट्या नजरेने पाहून दबल्या आवाजात बोलला, “चूप! तमाशाच्या बारीतली बाई आहे.”

“तमाशातलीऽ ऽ ऽ!”

“? ? ? ?!”

एक नाही, चार हिरामण! चौघे स्तिमित होऊन एकमेकांकडे बघू लागले. तमाशा शब्दाचा परिणाम! हिरामणने पाहिले की तिघांचा श्वास अडला होता. लालमोहरने खुणेने जरा दूर जाऊन बोलू असे सुचवले. हिरामण गाडीकडे वळून बोलला, “हॉटेलं उघडली नसतील, हलवायाकडून काही मिठाई आणू?”

“हिरामण, ऐक. मी आता काही खाणार नाही. तू खाऊन घे.”

“हे काय आहे? पैसे?” पैसे देऊन हिरामणने फारबिसगंजमध्ये कधी खाल्ले नव्हते. त्याच्या गावाचे इतर गाडीवान कधी कामी येणार? तो ते पैसे घेऊ शकत नव्हता. हीराबाईला म्हणाला, “ उगाच जत्रेच्या बाजारात हुज्जत घालू नका. ठेवा ते पैसे.” संधी साधून लालमोहर गाडीजवळ आला. नमस्कार करत म्हणाला, “चार माणसांच्या जेवणात दोन जास्त सहज खाऊ शकतील. चुलीवर भात चढवला आहे. हे-हे-हे! आम्ही एकाच गावचे आहोत. गावची माणसं असताना हिरामणने हॉटेल किंवा हलवायाकडचे का खावे?”

हिरामणने लालमोहरचा हात दाबला, “जास्त बडबड करू नकोस.”

गाडीपासून थोड्या अंतरावर जाऊन धुन्नीराम अस्वस्थपणे बोलला, “तू थोर आहेस, हिरामण! त्या वर्षी सर्कशीचा वाघ, यंदा तमाशातली बाई!”

हिरामण दबल्या आवाजात म्हणाला, “बाबा रे, वेडंवाकडं ऐकूनही गप्प राहायला ही आपल्या मुलुखातील बाई नाही. एक तर पश्चिमेकडची आहे, वर तमाशातली!”

“पण मी तर ऐकलय की तमाशाच्या बारीतल्या बायका वेश्या असतात,” धुन्नीरामने शंका काढली.

"छ्यॅ!” सर्वांनी एकमुखाने झिडकारले. “काय माणूस आहे हा! तमाशात वेश्या? हे ह्याचं डोकं! सांगोवांगीच्या गोष्टी नुसत्या!”

धुन्नीरामने आपली चूक कबूल केली. पलटदासला एक गोष्ट सुचली. “हिरामण, बाईमाणूस एकटी कशी राहणार गाडीत? काही झालं तरी बाई ती बाई. काही लागलं तर काय करेल?”

हे सर्वांना पटले. हिरामण बोलला, “बरोबर आहे. पलट, तू गाडीजवळच थांब. आणि हो, बोलताना जरा जपून.”

हिरामणच्या शरिरातून गुलाबाच्या अत्तराचा सुगंध येत आहे. नशीबवान आहे. गेल्या वेळी कितीतरी महिने त्याच्या अंगाला येणारा वाघाचा वास गेला नव्हता. लालमोहरने हिरामणच्या पंचाचा वास घेतला, “ऍ-हॅ!”

हिरामण चालता चालता थांबला. “लालमोहरदादा, मी काय करू सांग ना. मी तमाशा बघावा असा हट्ट धरून बसलीये ती.”

“फुकटात?”

“अन्‌ ही बातमी गावापर्यंत गेली तर?”

“नको रे बाबा. एक रात्र तमाशाचा खेळ पाहायचा आणि आयुष्यभर बोलणी खायची.”

लालमोहरच्या गाडीशेजारी लाकडं भरून आलेल्या काही गाड्या आहेत. त्या गाडीवानांचा प्रमुख, म्हातारा मियाँजान हुक्का पीत म्हणाला, “काय रे, मीना-बाजाराचा माल कोण घेऊन आलाय?”

मीना-बाजार! मीना-बाजार तर वेश्यावस्ती आहे! वाटेल ते काय बोलतोय हा म्हातारा? "तुझ्या अंगाला सुगंध येतोय," लालमोहर हिरामणच्या कानात कुजबुजला.

लहसन लालमोहरचा नोकर आहे. वयाने सगळ्यात लहान. पहिल्यांदा आला असला म्हणून काय झाले? लोकांच्या घरी नोकरी करत लहानाचा मोठा झाला आहे. तो पुन्हा पुन्हा कसलातरी वास घेत होता. त्याचा चेहरा लाल झालेला हिरामणला दिसला. हा धडधड करत कोण येत आहे? “कोण, पलटदास? काय रे?”

पलटदास येऊन मुकाट उभा राहिला. त्याचा चेहराही लालबुंद झाला होता. हिरामणने विचारले, “काय रे? काय झालं? बोलत का नाहीस?” पलटदास काय उत्तर देणार? हीराबाईशी जपून बोल असे हिरामणने त्याला आधीच बजावले होते. तो गपचूप जाऊन हिरामणच्या गाडीवर गाडीवानाच्या जागी बसला होता. “तूसुद्धा हिरामणसोबत आहेस का?”, हीराबाईने विचारले. पलटदासाने मान डोलवून हो म्हटले. हीराबाई पुन्हा आडवी झाली. का कोणास ठाऊक, तिचा चेहरा पाहून व बोलणे ऐकून त्याचे काळीज धडधडू लागले. रामलीलेच्या खेळात सुकुमार सीता अशीच थकून पहुडलेली होती. जय हो! सियावर रामचंद्र की जय! पलटदासाच्या मनात जयजयकार घुमू लागला. तो वैष्णव होता. कीर्तनकार होता. त्याने आपल्या हाताची बोटे बाजाच्या पेटीवरून फिरवल्यासारख्या खाणाखुणा करून थकलेल्या महाराणी सीतेचे पाय चुरण्याची इच्छा व्यक्त केली. हीराबाई संतापाने फणफणत उठून बसली व म्हणाली, “वेड लागलय की काय तुला? चालता हो!”

तिच्या संतप्त डोळ्यांतून ठिणग्या निघत असल्याचा पलटदासाला भास झाला. तो काय उत्तर देणार? त्याने तिथून धूम ठोकली. तो जत्राच सोडून पळून जाण्याचा मार्ग शोधत होता. “काही नाही. एक व्यापारी भेटला. लगेच स्टेशनला जाऊन गाडीत सामान भरायचय. जेवायला वेळ आहे अजून. तोवर मी जाऊन येतो.”

खाताना धुन्नीराम व लहसनने पलटदासची भरपूर निंदा-नालस्ती केली. क्षुद्र माणूस आहे. नीच आहे. पै-पैचा हिशोब ठेवतो. खाऊन झाल्यावर धुन्नी व लहसन गाडी जोडून हिरामणच्या जवळ आले. चालता चालता हिरामण जरा थबकून लालमोहरला म्हणाला, “जरा माझ्या खांद्याचा वास घेऊन बघ.”

लालमोहरने त्याचा खांदा हुंगला व डोळे मिटून घेतले. तोंडातून "आह्हा!" असा अस्फूट चित्कार निघाला.

“खांद्यावर जरा हात ठेवला तर एवढा सुगंध! कळलं!”, हिरामण बोलला. लालमोहरने त्याचा हात पकडला . “तिने खरंच तुझ्या खांद्यावर हात ठेवला होता? हिरामण, तमाशा पाहण्याची अशी संधी पुन्हा मिळणार नाही, सांगून ठेवतो.”

“तूही येशील पाहायला?” चौकात लालमोहरची बत्तिशी चमकू लागली.

आपल्या बैलगाडीजवळ पोहोचल्यावर हिरामणला कोणीतरी हीराबाईशी बोलताना दिसला. धुन्नी आणि लहसन दोघे एकाच वेळी बोलले, “कुठे होतास? बारीचे लोक कधीचे शोधताहेत.”

हिरामणने जवळ जाऊन पाहिले - अरे, हा तर तोच सामान उचलणारा नोकर जो चंपानगरच्या जत्रेत हीराबाईला गाडीवर बसवून अंधारात गायब झाला होता.

“आलास, हिरामण? बरं झालं. इथं ये. हे घे तुझं भाडं आणि ही घे बक्षिसी. पंचवीस-पंचवीस, पन्नास!” हिरामणला वाटले की कोणीतरी आपल्याला आकाशातून खाली ढकलून जमिनीवर पाडले आहे. कोणीतरी का, ह्याच सामान उचलणार्‌याने. आला तरी कोठून? ओठांवर आलेले शब्द हिरामणने गिळून टाकले. बक्षिसी! तो तसाच स्तब्ध उभा राहिला.

हीराबाई म्हणाली, “घे! आणि हे बघ, उद्या सकाळी रौता बारीत येऊन मला भेट. तुझ्यासाठी पास बनवून देईन. काही बोलत का नाहीस तू?” लालमोहर म्हणाला, “हिरामण, मालकीणबाई एवढ्या बक्षीस देतायत तर घे.” हिरामणने लालमोहरकडे धारदार नजरेने पाहिले. कुठे काय बोलावे ह्याचा जराही पाचपोच नाही लालमोहरला. “आपली गाडी आणि बैलांना सोडून कोणीही गाडीवान मेळ्यात तमाशा कसा बघणार?”, हे धुन्नीरामचे स्वगत हीराबाईसकट सार्‌य़ांनी ऐकले.

पैसे घेत हिरामण म्हणाला, “मी काय बोलणार?” त्याने हसण्याचा प्रयत्न केला. तमाशातली बाई तमाशात जात होती. हिरामणचा काय संबंध?! सामान उचलणारा नोकर रस्ता दाखवत पुढे झाला, “ इथून या.” हीराबाई जाता जाता थांबली. हिरामणच्या बैलांना म्हणाली, “बराय बंधुंनो. येते मी.”

बैलांनी बंधू शब्दावर कान हलवले.

“? ? !”

“लोकहो, आज रात्री रौता संगीत बारीच्या फडावर साक्षात अप्सरा पहा! तुम्हाला ऐकून अतिशय आनंद होईल की जिच्या नखर्‌यांवर आणि हावभावांवर हजारो माणसे जीव ओवाळून टाकतात ती मथुरामोहन बारीची सुप्रसिद्ध नर्तकी कुमारी हीरादेवी यंदा आमच्या बारीत सामील झाली आहे. लक्षात ठेवा. आज रात्री. अप्सरा कुमारी हीरादेवी!”

तमाशा बारीच्या ह्या द्वाहीने जत्रेत सगळीकडे उत्साह संचारला. हीराबाई? कुमारी हीरादेवी? लैला, अप्सरा? ही तर सिनेमा नटीच्य़ाही वरताण आहे.

तेरी बाँकी अदा पर मैं खुद हूँ फिदा,

तेरी चाहत को दिलबर बयाँ क्या करूँ!

यही ख्वाहिश है कि इ-इ-इ तू मुझको देखा करे

और दिलोजान मैं तुमको देखा करूँ।

किर्र-र्र-र्र-र्र क़ड़ड़ड़डड़ड़ड़र्र-घन-घन-धड़ाम.

प्रत्येकाचे हृदय नगार्‍याप्रमाणे वाजत होते.

लालमोहर धावत, धापा टाकत आला व म्हणाला, “ अरे हिरामण, इथे काय बसलायस? चल, बघायला चल, घोड्यावरून वाजत गाजत हीराबाईचा जयजयकार होत आहे, पत्रकं वाटतायत.” हिरामण लगबगीने उठला. लहसन म्हणाला, “धुन्नीकाका, तुम्ही इथेच थांबा, मी जरा बघून येतो.”

धुन्नीच्या विरोधाला न जुमानता तिघे बारीच्या दवंडीमागे जाऊ लागले. कोपर्‌या-कोपर्‌यावर थांबून, ढोल-ताश्यांचा आवाज बंद करून घोषणा केली जात होती. घोषणेच्या शब्दा-शब्दाने हिरामण पुलकित होत आहे. हीराबाईचे नाव, नावासहित नखरे-ठुमके वगैरे ऐकून त्याने लालमोहरच्या पाठीवर थाप मारली, “धन्य आहे, धन्य आहे. आहे की नाही?”

लालमोहर म्हणाला, “आता बोल. अजूनही तमाशा बघणार नाहीस?” सकाळपासून धुन्नीराम आणि लालमोहर त्याला समजावून थकले होते, “ बारीत जा आणि तिला भेटून ये. जाताना एवढी सांगून गेलीय.” पण हिरामणचे आपले एकच पालूपद, “काहीतरीच काय?मी नाही जाणार. तमाशातली बाई तमाशात गेली. आता तिच्याशी काय देणं-घेणं? ओळखही दाखवायची नाही ती.”

मनातून तो जरा खट्टू झाला होता. द्वाही ऐकल्यावर लालमोहरला म्हणाला, “पाहायला हवं, नाही?”

दोघे चर्चा करत रौता बारीच्या दिशेने जाऊ लागले. तंबूपाशी पोहोचल्यावर हिरामणने लालमोहरला खुणावले. चौकशी करण्याची जबाबदारी लालमोहरची होती. त्याला कचराही बोली अवगत होती. लालमोहरने काळा कोट परिधान केलेल्या एका माणसाला म्हणाला, “अहो साहेब...”

काळा कोटवाला तोर्‌यात बोलला, “काय आहे? इथे काय काम आहे?”

लालमोहरची कचराही बोली गडबडली. एकूण रागरंग पाहून म्हणाला, “गुलगुल, नाही, नाही, बुलबुल, नाही...”

हिरामणने पटकन सावरून घेतले, “हीरादेवी कुठे राहतात सांगाल का?” त्या माणसाचे डोळे लाल झाले. समोर उभ्या नेपाळी गुरख्याला हाक मारून म्हणाला, “ह्या लोकांना इथे येऊन कसं दिलस?”

“”हिरामण!” तोच फेनील आवाज. कोठून आला? तंबूचा पडदा सारून हीराबाईने बोलावले. “इथे ये, आत. बहादुर! ह्याला नीट बघून घे. हा माझा हिरामण आहे. कळलं?”

नेपाळी दरवान हिरामणकडे पाहून किंचित हसला व निघून गेला. काळा कोटवाल्याकडे जाऊन बोलला, “हीराबाईचा माणूस आहे. त्याला अडवायचं नाही, म्हणाली.”

लालमोहर नेपाळी दरवानाकरता पान घेऊन आला, “खा.”

“बाप रे! एक नाही, पाच पास. आठ आणेवाले! म्हणाली, जत्रेत आहेस तोवर रोज रात्री ये बघायला. सगळ्यांचा विचार करते. म्हणाली, तुझ्या मित्रांसाठीही पास घेऊन जा. तमाशातल्या बायांची बातच न्यारी, नाही?”

लालमोहरने लाल कागदाच्या त्या तुकड्यांना स्पर्श केला. “पा-स! व्वा, हिरामणभाऊ! पण पाच पास कशाला? पलटदास अजून परत आलाच नाहीये.”

हिरामण म्हणाला, “जाऊ दे. नशिबात नाही बिचार्‌याच्या. हो, पण आधी सर्वांनी गुरूची शपथ घ्या की ह्या गोष्टीची गंधवार्ताही गावात किंवा घरी पोहोचणार नाही.”

“कोण साला गावात जाऊन सांगणार आहे? पलटा बोलला तर पुन्हा त्याला सोबत आणणार नाही,” लालमोहर उत्साहाने बोलला.

हिरामणने आज आपली पैशाची थैली हीराबाईकडे ठेवली आहे. जत्रेत दरवर्षी खिसेकापूंचा सुळसुळाट असतो. साथीदारांवरही विश्वास ठेवता येत नाही. हीराबाई राजी झाली. हिरामणची काळ्या कापडाची थैली तिने आपल्या चामड्याच्या पेटीत ठेवून दिली. त्या पेटीला वरून कापडाचे आवरण होते व आतून चमचमणारे रेशमी अस्तर!

लालमोहर व धुन्नीरामनी हिरामणच्या हुशारीची व त्याच्या भाग्याची पुन्हा पुन्हा प्रशंसा केली. दबलेल्या आवाजात त्याच्या भाऊ-भावजयीची निंदा केली.

“हिरामणसारखा हिरा भावाच्या रूपानं लाभला आहे म्हणून! त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर!”

लहसनचा चेहरा पडलेला आहे. घोषणा होत असताना जो गायब झाला तो संध्याकाळ झाल्यावर उगवला.

लालमोहरने मालकाच्या नात्याने त्याला शिव्या देत झापले.

चुलीवर खिचडी चढवत धुन्नीराम बोलला, “आधी हे ठरवा की गाडीजवळ कोण राहणार.”

“कोण काय? हा लहसन.”

लहसन रडू लागला, “मालक, हात जोडतो. एक झलक तरी पाहू द्या.”

हिरामण उदार होऊन म्हणाला, “बरं, बरं, एक झलकच काय, एक तास बघ. मी येतो.”

खेळ सुरू होण्याच्या दोन तास आधीच नगारा वाजू लागला. नगारा वाजू लागताच लोक पतंगांप्रमाणे आकृष्ट होऊ लागतात. तिकिटाच्या खिडकीवर जमलेली गर्दी पाहून हिरामणला खूप हसू आले, “लालमोहर, तिथे बघ, लोक कशी धक्काबुक्की करताहेत.”

“हिरामणभाऊ!”

“कोण, पलटदास? कोठला माल आणलाय?”, लालमोहरने परगावच्या माणसाप्रमाणे विचारले. पलटदासाने हात चोळत क्षमा मागितली, “चूक झाली; तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. पण ती खरंच सुकुमार सीतेसारखी दिसत होती.” हिरामणचे मन नगार्‌याच्या तालावर डोलू लागले होते. “पलट्या, तिला आपल्या गावच्या बायांसारखी समजू नकोस. हे बघ, तुझ्यासाठीही पास दिलाय. घे, आणि तमाशा बघ.”

लालमोहर म्हणाला, “पण एका अटीवर पास मिळेल. अधूनमधून लहसनलासुद्धा ...”

पलटदासला काही सांगण्याची गरज नव्हती. तो नुकताच लहसनशी बोलून आला होता.

लालमोहरने दुसरी अट सांगितली, “गावी जर हे कळलं!”

“राम राम!”, जीभ चावत पलटदास बोलला.

“आठ आणेवालं फाटक इथं आहे,” पलटदासने दाखवले. फाटकावर उभ्या दरवानाने पास हातात घेऊन एक एक करून त्यांचे चेहरे निरखले. म्हणाला, “हे तर पास आहेत. कुठे सापडले?”

आता लालमोहरची कचराही बोली ऐकावी. त्याचा संताप पाहून दरवान घाबरला - “सापडलायला कशाला हवेत? जाऊन कंपनीला विचार आपल्या. चारच नाहीत, आणखी एकही आहे.” लालमोहरने खिशातून पाचवा पास काढून दाखवला.

एक रुपयावाल्या फाटकावर नेपाली दरवान तैनात होता. हिरामण त्याला हाक मारून म्हणाला, “ए शिपाईदादा, सकाळी ओळख करवून दिली आणि इतक्यात विसरलास?”

नेपाळी दरवान बोलला, “ही सगळी हीराबाईची माणसं आहेत. सोड त्यांना. पास आहेत मग कशाला अडवतोयस?”

आठ आण्याचा दर्जा!

तिघांनी तमाशाचा तंबू आतून प्रथमच पाहिला. पुढे खुर्च्या आणि बाक होते. पडद्यावर राम वनवासाला निघाल्याचे चित्र होते. पलटदासाने ओळखले, व पडद्यावरील राम, सीता व लक्ष्मणाला हात जोडून नमस्कार केला. “जय हो, जय हो!” त्याचे डोळे पाणावले.

“लालमोहर, लोक सगळे थांबलेत की निघालेत?”, हिरामणने विचारले.

लालमोहरने आपल्या शेजारी बसलेल्यांशी ओळख करून घेतली आहे. तो म्हणाला, “खेळ अद्याप सुरू झालेला नाही. अजून लोक जमवतायत.”

पलटदासाला ढोलक वाजवता येत असल्यामुळे तो नगार्‌याच्या तालावर मान डोलवत काडेपेटीवर ताल धरत आहे. विड्यांची देवाणघेवाण करत हिरामणनेही ओळखी करून घेतल्या. लालमोहरच्या एका परिचिताने अंगावर चादर लपेटून घेत म्हटले, “ नाच सुरू व्हायला अजून वेळ आहे. तोवर एक झोप काढून घेतो. ... आठ आण्याच्या जागा सर्वात उत्तम. मागे उंचवट्यावर आहेत. जमिनीवर ऊबदार पुआल लाकूड! हे - हे! खुर्च्या-बाकांवर बसून ह्या थंडीत तमाशा बघणारे हळूहळू चहा प्यायला उठतील बघ.”

तो माणूस आपल्या सोबत्याला म्हणाला, “खेळ सुरू झाला की उठव मला. नाही, खेळ सुरू झाल्यावर नको, हिरिया बोर्डावर आली की उठव.”

हिरामणच्या काळजात कळ उठली. ...हिरिया! काय फालतू माणूस आहे! त्याने लालमोहरला डोळ्यांनी खुणावले, “ह्या माणसाशी बोलण्याची काही गरज नाही.”

ढण-ढण-ढण-धडाम! पडदा उघडला. हे-ए, हे-ए, हीराबाई सुरुवातीलाच रंगमंचावर आली. तंबू खच्चून भरला होता. आश्चर्याने हिरामणचे तोंड उघडे राहिले होते. लालमोहरला एवढे हसू का येत होते? हीराबाईच्या गाण्याच्या प्रत्येक ओळीवर तो विनाकारण हसत होता.

सुंदरीचा दरबार भरला आहे. ती भर दरबारात जाहीर करते की जो सहस्रदल फुलांचे सिंहासन बनवून देईल त्याला तो मागेल ते बक्षिस दिले जाईल. ... असा कोणी कारागीर असेल तर त्याने सहस्रदल फुलांचे सिंहासन बनवून आणावे! किडकिड-किर्रि-! काय नाचते! काय गाते! तुला माहीत आहे, हा माणूस म्हणतो की हीराबाई विडी-सिगरेट, पान-जर्दा काही खात नाही. बरोबर सांगतोय. अतिशय धूर्त रांड आहे. कोण म्हणतो रांड आहे? दाताला मशेरी कुठे लावली आहे? पावडरने दात घासत असेल. मुळीच नाही. उगीच कोणीतरी पराचा कावळा करतोय. तमाशात नाचणार्‌या बाईला वेश्या म्हणतोय. तुला का झोंबलं? रांडेचा भडवा कोण आहे? मारा साल्याला! मारा! तुझ्या... ह्या कोलाहलात हिरामणचा आवाज तंबू दणाणून सोडतो आहे, “या, एकेकाचं मुंडकंच लोळवतो.”

लालमोहर समोर येईल त्याला लाठीने मारत सुटला होता. पलटदास एकाच्या छातीवर बसला आहे - “साल्या, सीतेला शिवी देतोस! तेही मुसलमान असून?”

धुन्नीराम सुरुवातीपासून चूप होता. मारामारी चालू झाल्याबरोबर तो तंबूच्या बाहेर पळून गेला.

काळा कोटधारी बारीचा व्यवस्थापक नेपाळी शिपायाला घेऊन धावत आला. फौजदार साहेब चाबकाने मारू लागले. चाबकाचे फटके खाऊन लालमोहर कळवळला आणि कचराही बोलीत भाषण देऊ लागला, “फौजदार साहेब, मारताय तर मारा. हरकत नाही. पण हे पास पहा. एक पास पाकिटातही आहे. बघताय ना, साहेब. तिकिट नव्हे, पास! ... मग आमच्यादेखत तमाशातल्या बाईला कोणी वेडंवाकडं बोलला तर आम्ही त्याला कसे सोडून देऊ?”

झाला प्रकार बारीच्या व्यवस्थापकाच्या लक्षात आला. त्याने फौजदाराला समजावले. “साहेब, माझ्या लक्षात आलय. हा सारा त्या मथुरामोहन बारीवाल्यांचा कट होता. तमाशा चालू असताना भांडण सुरू करून आमच्या बारीला बदनाम करण्याचा ...साहेब, ह्यांना सोडा, ही हीराबाईची माणसं आहेत. बिचारीच्या जिवाला धोका आहे. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, साहेब!”

हीराबाईचे नाव ऐकताच फौजदाराने तिघांना सोडून दिले. पण तिघांच्या लाठ्या काढून घेतल्या. व्यवस्थापकाने तिघांना एक रुपया दराच्या खुर्च्यांवर बसवले. “तुम्ही इथे बसा. मी तुमच्यासाठी पान पाठवतो.” तंबू शांत झाला, आणि हीराबाई परत बोर्डावर आली.

नगारा पुन्हा वाजू लागला.

थोड्या वेळाने तिघांना धुन्नीरामची आठवण आली. अरे, धुन्नीराम कुठे गेलाय?

“मालक,अहो मालक,” लहसन तंबूच्या बाहेरून हाका मारत होता, “अहो लालमोहरसा-हे-ब!”

लालमोहरने तारस्वरात उत्तर दिले, “इथे, इथे! एक रुपयाच्या फाटकातून ये.” सारे प्रेक्षक वळून लालमोहरकडे बघू लागले. लहसनला नेपाळी शिपाई लालमोहरकडे घेऊन आला. लालमोअरने खिशातून पास काढून दाखवला. आल्या आल्या लहसनने विचारले, “मालक, कोण काय बोलत होता तुम्हाला सांगा तर खरं. नुसतं त्यांचं थोबाड दाखवा!”

लोकांनी लहसनची रुंद व भरदार छाती पाहिली. थंडीच्या दिवसातही तो उघड्या अंगाने आला होता. ह्या माणसांचे चेलेही सोबत आहेत! ललमोहरने लहसनला शांत केले.

तमाशात काय पाहिलत हे त्या तिघा-चौघांना विचारू नका. कसे लक्षात राहणार? हिरामणला वाटत होते की हीराबाई पहिल्यापासून त्याच्याकडे टक लावून पाहत गात व नाचत होती. लालमोहरच्या मते ती त्याच्याकडे बघत होती. तिला कळून चुकले आहे की लालमोहर हिरामणहून जास्त शक्तिशाली आहे. पलटदासच्या मते रामायण सुरू आहे. तोच राम, तीच सीता, तोच लक्ष्मण आणि तोच रावण! सीतेचे हरण करण्यासाठी रावण वेगवेगळी रूपे धारण करतो. राम व सीताही रूप बदलत असतात. इथेही सहस्रदल फुलांचे सिंहासन बनवणारा माळ्याचा मुलगा राम आहे.

ती लावण्यवती सीता आहे. माळ्याच्या मुलाचा मित्र लक्ष्मण आहे आणि सुलतान रावण आहे. धुन्नीरामला बराच ताप चढला आहे. लहसनला विदूषकाची भूमिका सर्वात जास्त पसंत आहे. त्याला त्या विदूषकाशी दोस्ती करायची आहे. विदूषकसाहेब, दोस्ती करणार?

एका गाण्याची अर्धी ओळ हिरामणच्या हाती लागली आहे, “मारे गए गुलफाम!” हा गुलफाम कोण होता? हीराबाई रडत गात होती - “अजी हाँ, मारे गए गुलफाम!”

बिचारा गुलफाम!

तिघांच्या लाठ्या परत करत हवालदार म्हणाला "लाठ्या-काठ्या घेऊन नाच पाहायला कसले येता?”

दुसर्‌या दिवशी अख्ख्या जत्रेत ही बातमी पसरली की हीराबाई मथुरामोहन बारीतून पळून आल्यामुळे यंदा मथुरामोहन बारी आलेली नाही. तिचे गुंड आले आहेत. हीराबाईसुद्धा काही कमी नाही. तेरा लाठीधारी पेहेलवान पदरी बाळगते. काय बिशाद आहे कोणाची छेड काढण्याची!

दहा दिवस, दहा रात्री!

हिरामण दिवसभर स्वार्‌या घेऊन गाडी हाकायचा. संध्याकाळ झाली की तमाशाचा नगारा वाजू लागे. नगार्‌याचा आवाज येताच हीराबाईची हाक कानात रुंजी घालू लागे - भाऊ ...मीता ...हिरामण ...उस्ताद गुरुजी! दिवसभर त्याच्या मनाच्या एका कोपर्‌यात कोणतेतरी वाद्य वाजत असे. कधी पेटी, कधी नगारा, कधी ढोलकी तर कधी हीराबाईचे पैंजण. त्या सार्‌यांचा तालावर हिरामणचे उठणे-बसणे, हिंडणे-फिरणे सुरू होते. बारीच्या व्यवस्थापकापासून ते पडदा उघडणार्‌यापर्यंत सारे त्याला ओळखतात. ...हीराबाईचा माणुस आहे.

पलटदास रोज रात्री तमाशा सुरू होण्याआधी रंगमंचाला हात जोडून श्रद्धापूर्वक नमस्कार करत असे. लालमोहर एक दिवशी आपली कचराही बोली हीराबाईला ऐकवायला गेला. हीराबाईने त्याला ओळखलेच नाही. तेव्हापासून खिन्न आहे. त्याचा नोकर लहसन त्याला सोडून तमाशात भरती झाला आहे. विदूषकाशी त्याची मैत्री झाली. दिवसभर पाणी भरतो, कपडे धूतो. म्हणतो, परत गावी कशाला जाऊ? गावात काय ठेवलय? लालमोहर उदास असतो. धुन्नीराम आजारी पडल्यामुळे घरी निघून गेला आहे.

हिरामण आज सकाळपासून तीनदा गाडीत सामान लादून स्टेशनला आला आहे. का कोणास ठाऊक, आज त्याला वहिनीची आठवण येत आहे. ...धुन्नीराम तापात काही बडबडला तर नसेल? इथेच किती बरळत होता - सुंदरी, सिंहासन! लहसन मजेत आहे. दिवसभर हीराबाईला बघत असेल. काल सांगत होता, हिरामणसाहेब, तुमच्या कृपेने अतिशय मजेत आहे मी. हीराबाईची साडी धुतल्यानंतर ते पाणी गुलाबाचे अत्तर होते. त्यात माझा पंचा बुडवून ठेवतो. वास घेऊन बघा. रोज रात्री हिरामणला कोणा ना कोणाकडून ऐकावे लागते की हीराबाई रांड आहे. तो तरी किती जणांशी भांडणार? स्वत: पाहिल्याशिवाय लोक वाटेल ते कसे बोलतात? लोक राजालाही त्याच्या पाठीवर शिव्या घालतात. आज तो हीराबाईला भेटून सांगणार आहे की तमाशात असल्यामुळे लोक तिच्याविषयी वाईट-साईट बोलतात. त्यापेक्षा तिने सर्कशीत काम करावे. सर्कशीतील वाघाच्या जवळ जाण्याची हिंमत असते का कोणाची? तिथे हीराबाई सुरक्षित असेल! कोठली गाडी येत्येय?

“हिरामण, ए हिरामणभाऊ!” लालमोहरची हाक ऐकून हिरामणने वळून पाहिले. ...लालमोहरने गाडीत काय माल चढवला आहे?

“हीराबाई तुला स्टेशनावर शोधत्येय. ती चाललीय,” लालमोहर एका दमात बोलला. मेळ्य़ातून ती लालमोहरच्याच गाडीत बसून आली आहे.

“चाललीय? कुठे? हीराबाई ट्रेनने जात्येय?”

हिरामणने गाडी सोडली. गोदामाच्या चौकीदाराला म्हणाला, “दादा, जरा माझ्या गाडी आणि बैलांवर लक्ष ठेवा. आलोच मी.”

“उस्ताद!” बायकांच्या विश्रामगृहाच्या दारापाशी हीराबाई चेहर्‌यावरून ओढणी घेऊन उभी आहे. त्याची थैली पुढे करत बोलली, “घे! देवा! बरं झालं भेट झाली. मी तर आशा सोडली होती. आता आपलं भेटणं होणार नाही. मी निघाल्येय, गुरूजी.”

सामान उचलणारा आज कोट-पॅंट घालून साहेब झाला होता. मालकाप्रमाणे हमालांना हुकूम सोडत होता - “बायकांच्या डब्यात चढवा. कळलं?”

हिरामण हातात थैली धरून गपचूप उभा राहिला. हीराबाईने आपल्या कुर्त्याच्या आतून थैली काढून दिली होती. थैली पक्ष्याच्या शरिरासारखी गरम होती.

“गाडी येत्येय,” सामान उचलणारा हीराबाईकडे बघत बोलला. त्याच्या चेहर्‌यावरचे भाव स्पष्ट होते - हे जरा अती होत आहे.

हीराबाई अस्वस्थ होऊन म्हणाली, “हिरामण, आत ये. मी परत मथुरामोहन बारीत चालले आहे. माझ्या मुलुखातली बारी आहे. ...वनैलीच्या जत्रेत येणार आहेस नं?”

हीराबाईने हिरामणच्या खांद्यावर हात ठेवला. ...ह्या वेळी उजव्या खांद्यावर. मग आपल्या थैलीतून रुपया काढत बोलली, “एक गरम चादर विकत घे.”

इतक्या वेळानंतर हिरामणच्या तोंडून शब्द फुटले, “छ्यॅ! जेव्हा बघावं तेव्हा पैसे-पैसे! काय करायचिय चादर?”

हीराबाईचा हात तसाच थांबला. तिने हिरामणच्या चेहर्‌याकडे बारकाईने पाहिले. मग म्हणाली, “तुला वाईट वाटलं, मीता. का? महुआला व्यापार्‍यानं विकत घेतलय, गुरुजी.”

हीराबाईचा गळा दाटला. सामान उचलणारा बाहेरून म्हणाला, “गाडी आली.” हिरामण खोलीच्या बाहेर आला.

सामान उचलणार्‌याने विदूषकासारखा चेहरा करून म्हटले, “फलाटाच्या बाहेर पळ. विनातिकिट पकडलं तर तीन महिने तुरुंगाची हवा खावी लागेल...”

हिरामण गपचूप फाटकाच्या बाहेर जाऊन उभा राहिला. स्टेशनवर रेलवेचे राज्य होते. नाहीतर त्या हमालाचे थोबाड फोडले असते हिरामणने.

हीराबाई बरोबर समोरच्या डब्यात चढली. एवढे आकर्षण! गाडीत बसल्यावरही हिरामणकडे एकटक पाहात आहे. ते पाहून लालमोहरला दु:ख झाले. नेहमी मागे मागे, कायम भागीदारी सुचते.

गाडीची शिट्टी वाजली. हिरामणला भास झाला की त्याच्या अंतरंगातून आवाज निघून शिट्टीसोबत ऊंच गेला - कू-ऊ-ऊ! छ्यॅ!

-छि-ई-ई-छक्क! गाडी हलली. हिरामणने आपल्या उजव्या पायाच्या अंगठा डाव्या टाचेने दाबला. उरातली धडधड कमी झाली होती. हीराबाई जांभळ्या रुमालाने चेहरा पुसते. रुमाल हलवून इशारा करते ...आता जा. शेवटचा डबा गेला, फलाट रिकामा, सारे रिकामे ...रिते ...मालगाडीचे डबे! जणू काही सगळे जगच रिते झाले. हिरामण आपल्या बैलगाडीकडे परतला.

त्याने लालमोहरला विचारले, “तू गावाला परत कधी जाणार आहेस?”

लालमोहर म्हणाला, “इतक्यात गावी जाऊन काय करणार? इथे चार पैसे कमावण्याची संधी आहे. हीराबाई गेली, आता जत्रा संपेल.”

“ठीक आहे. घरी काही निरोप द्यायचाय?”

लालमोहरने हिरामणला समजावण्याचा प्रयत्न केला. पण हिरामणने आपली गाडी गावाकडे जाणार्‌या रस्त्याला वळवली. आता जत्रेत काय राहिले आहे! रिकामा मेळा!

कच्चा रस्ता बरेच अंतर रेल्वे लाईनला समांतर जातो. हिरामण कधी रेलगाडीत बसलेला नाही. गाडीत बसून, गाणे गात गात जगन्नाथला जाण्याची त्याची जुनी इच्छा पुन्हा जागृत झाली. पाठीवर आजही रोमांच फुलताहेत. आजही राहून राहून त्याच्या बैलगाडीत चाफ्याचे फूल फुलत आहे. पुन्हा पुन्हा एका गाण्याच्या तुटक्या ओळीवर नगार्‌याचा ताल अडतो आहे.

त्याने वळून पाहिले, पोती नाहीत, बांबू नाहीत, वाघही नाही - परी ...देवी ...मीता ...हीरादेवी ...महुआ - कोणी नाही. निसटलेले मुके मुहूर्त बोलू पाहात होते. हिरामणचे ओठ हलत होते. कदाचित तो तिसरी शपथ घेत असावा - तमाशातल्या बाईला गाडीत …

हिरामणने आपल्या बैलांना रट्टा घालत फटकारले, “वळून वळून रेल्वे लाईनकडे काय बघताय?” दोन्ही बैलांनी दुडकी चाल धरली. हिरामण गुणगुणू लागला, “अजी हाँ, मारे गए गुलफाम....!”

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* : फॉर्ब्सगंज

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

उत्तम! अनुवाद फर्मास जमला आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अनुवाद छानच जमलाय. मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! खूप छान!
बरेच वर्षापुर्वी पाहिलेला चित्रपट. खूप आवडलेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेखन. हे आठवणे अपरिहार्य.
दिगम्भा कसे आहेत, कुणास ठाऊक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

दिगम्भांच्या सुंदर लेखाच्या दुव्याबद्दल आभारी आहे. त्या वेळी, कसा कोण जाणे, वाचनात आला नव्हता पण आज तुमच्यामुळे वाचता आला. त्यांच्या सर्वच मतांशी मी सहमत आहे असे नाही, पण रसग्रहण उत्तम आहे ह्यात शंका नाही. राज कपूर त्या भूमिकेत शोभला नाही हे मला पटत नाही. मुळात, हिरामन हे पात्र कथेत तरुण नाहीच, तर चाळिशीचे आहे. आपले नेहमीचे मॅनरिझ्म्स बाजूला ठेवून राज कपूरने केलेला सहजसुंदर अभिनय हा त्या चित्रपटाच्या बलस्थानांपैकी एक आहे असे मला वाटते. त्या लेखावरील तुमच्या प्रतिसादात ज्या गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला आहे त्यांची सत्यासत्यता आपल्यासारख्या बाहेरच्या माणसांना कधी कळेल असे वाटत नाही. अशा वादविवादात गुंतलेला प्रत्येक जण स्वतःचे समर्थन व दुसर्‍यावर दोषारोप करत असतो. चित्रपट मूळ कथेशी ईमान राखून काढल्यास व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी होणार नाही, तेव्हा शेवट बदलावा हे राज कपूरने शैलेन्द्रला सुचविल्याचे मी इतरत्र वाचले आहे. तसेच हिरामनची भूमिका राजने करावी ही शैलेन्द्रची इच्छा होती, दोस्ती खात्यात राजने अतिशय कमी पैशात काम केले, चित्रपट रखडण्यास वहीदा रेहमान कारणीभूत होती इत्यादीही वाचले आहे. पण आपल्यासाठी ही सारीच ऐकीव माहिती. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही? एक वहीदा रेहमान सोडल्यास बाकी सारे संबंधित काळाच्या पडद्याआड गेले आहेत. तेव्हा आपण प्रेक्षकांनी असल्या आरोप-प्रत्यारोपांत न अडकता एका तरल कलाकृतीचा आनंद घ्यावा आणि रेणु, शैलेन्द्र, व सार्‍या कलाकारांचे मनोमन आभार मानावेत हेच इष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

या मूळ गोष्टीच्या कॉपीराईटबद्दल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरेच की!
रेणू यांचा मृत्यू १९७७मधील आहे म्हणजे त्यांचे साहित्य अजूनही आपोआप (मृत्यूनंतर ६० वर्षांनी होते तसे) प्रताधिकार मुक्त होत नाही. त्यांनी स्वतःच्या हयातीत ते प्रताधिकारमुक्त केले होते किंवा प्रकाशकांनी मृत्यूपश्चात ते प्रताधिकारमुक्त केले किंवा कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भाषांतर मस्त जमलंय. त्या निमित्ताने दिगम्भांचा लेखही वाचायला मिळाला; तो ही आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाचायला सुरवात केली आणि इतका गुंतून गेलो की हिरामणच्या भूमिकेत शिरलो. उत्तम भाषांतराची ही पावतीच समजा. फार पूर्वी चित्रपट पाहिला होता. राजकपूरचा मुद्राभिनय आणि वहिदाचे 'पान खाये सैंया' विसरु शकत नाही. शैलेंद्रच्या आठवणीने मन उदासही झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0