भुवभुवाट... !!

दिल्लीहून येतांना झेलम एक्सप्रेस लेट आलेली. पहाटे तीन वाजता पोहोचल्यावर फलाटावरही बसवेना आणि अशा वेळेला फोनही करवेना. सरळ बाहेर आलो तर हातगाडीवर झक्क चहा मिळाला. रिक्षावाले किधर जाना है साब म्हणून मागे लागले होते. त्यांना टाळून सरळ मोलेदिना बस स्टॅण्डपर्यंत चालत आलो. रात्रीच्या वेळी अव्वाच्या सव्वा रेटने रिक्षा चालू असल्या तरी इथं शेअर रिक्षा चालू असते. ती परवडते. शेअर रिक्षाने स्वारगेट आणि स्वारगेटवरून पुन्हा टमटम असं करत एकदाचा सिंहगड रस्त्याला पोहोचलो. त्याने आत यायला नकार दिल्याने सगळं लटांबर सांभाळत एक दोन एक दोन करत चालू लागलो.

पहाटेचे साडेचार वाजले होते. रस्त्यावर जीव जाणा-या म्हाता-यासारखे खांबावरचे काही दिवे तग धरून होते. चांगलीच थंडी पडली होती. पाठीवरचं ओझं आणि हातातल्या बॅगने लागलेली रग यामुळं पावलं झपाझप पडत होती. आता सोसायटीचा रस्ता आला होता. रस्त्यावर मागे पुढे कुणीच नव्हतं. निर्मनुष्य वेळ... थंडीमुळं नीरव शांतता होती. दूर कुठंतरी दुधाच्या कॅनचा आणि सायकलच्या घंटीचा आवाज येत होता. वर्तमानपत्रं आणायला मुलं चालली असतील असा मनात विचार आला...

असा विचारात होतो आणि इतक्यात ..

भुऑव्ह.. व्हूफ.. ऑऑ.... भॉ !!!

असा भयप्रद आवाज छातीत शिरला. पाठोपाठ `भुफ' असा आणि पंख फडफडल्यासारखा आवाज आला.. या अनपेक्षित आवाजानं हृदयात एकदम धस्स झालं. अचानक धडधड वाढली. छाती चांगलीच धडधडायला लागली होती. माझ्या पुढ्यात कान फडफडवत एक कुत्रं येऊन उभं राहीलं . माझं आपादमस्तक निरीक्षण करत मी किती घाबरलोय याचा ते अंदाज घेत होतं. आपल्या पराक्रमाचा बहुधा त्याला आनंद होत असावा. मला चांगलाच धक्का बसलेला दिसून आला असणार बेट्याला... ! त्याच्या या यशानंतर आता माझ्याकडे पहात त्याचा गुर्र असा आवाज सुरू झाला होता.

तिरक्या रेषेत उभं राहून मान खाली वळवून नाक वरच्या दिशेला येईल अशा बेताने ते गुरगुरत अणकुचीदार दात दाखवत होतं. चेह-यावर गाडी खड्ड्यात आपटल्यावर पुणेकरांच्या चेह-यावर मनपाच्या आठवणीने उमटतात तसे हिंस्त्र भाव होते. दिवसा किती गरीब दिसतात ही कुत्री... पण आत्ता तरी ते भयंकर दिसत होतं. मी थोडा गडबडलो पण चालणं चालूच ठेवलं.

हा अपमान त्याला सहन झाला नसावा कारण माझ्यामागे एकदम उं उं उं उं अशी स्टार्ट घेऊन भॉ असा मोठा आवाज झाला. या वेळी मात्र अनपेक्षित नसूनही मघाच्या पेक्षा हा आवाज मोठा असल्यानं पोटातच गोळा आला. थंडीच्या दिवसांत रात्रीचे आवाज स्पष्ट ऐकू येतात. अगदी रेल्वे स्टेशनला गाडी आली ना, कि इंजिनाचे उच्छवास आम्हाला नगर रोडला ऐकू यायचे. शिट्टी तर घराशेजारीच वाजल्यासारखी स्पष्ट ऐकू यायची. आणि हे तर दोन फुटांवरच घशात डॉल्बी डिजिटल सराऊंड साऊंड असल्यासारखं आवाज काढत होतं...

तर आपल्या या महानायकाने त्या शांत वातावरणात ध्वनी प्रदूषण केल्याबरोबर मागच्या लेनमधली चार पाच कुत्री खाडकन जागी झाली आणि कर्तव्यतत्पर होऊन ...उं उं.... भुवॉक.. भुवॉक.. भुवॉक.. भुवॉक... भो SS भो SS भो SS भो SS भो SS असं भुंकू लागली. रस्त्याच्या कडेला गर्दी जमली कि काही विचार न करता माणसं त्या गर्दीत शिरतात तसं ही कुत्रीदेखील आवाज दिला कि, "का? कशासाठी ?" असले फालतू प्रश्न न विचारता भुंकायला सुरूवात करतात. या आळीची भुंकाभुंक त्या आळीत पोचते आणि असं करत करत काही क्षणातच गावभर भुंकावळ उठते.. जणू साहीत्यसंमेलनातला कवीकट्टाच !!

बरं इतके सगळे जण अकस्मात भुंकायला लागल्यावर पहिली सुरूवात कुणी केली हे लक्षात न राहील्यानं शास्त्रीय गायनात जसे पुन्हा पुन्हा आलाप घेतले जातात त्या कौशल्याने गळे साफ केले जातात. त्या आवाजाने गुरख्याचीही झोपमोड होते आणि मग त्याच्या काठीचा आवाज ऐकू येऊ लागतो. आत्ताही थोड्याच वेळात त्या रामप्रहरी नीरव शांततेचा भंग करत संसदेचा आखाडा चालू झाला.

पहाटेच्या त्या वेळी असा भुवभुवाट सुरू झाल्यानं (आणि ते ही मला सावज समजून ) त्या कुत्र्यावर मी जरा चिडलोच. मी घाबरलोय हे मात्र चेह-यावर अजिबात दाखवलं नाही. लग्न झाल्यापासून हा अभिनय अंगवळणी पडलाय....

आजूबाजूला पाहीलं, तर दगडही दिसेना. बरं कुत्रं तरी केव्हढं ? एखाद्या बारीक चणीच्या आणि नारायण हे सामान्य नाम असलेल्या कुठल्याही पुढा-याएव्हढं. पण बाकि आवाजही तोच आणि आवेशही !!

मी जरा सावध पवित्रा घेत हातात काठी असल्याचा आव आणत समोरच्या ना-यावर उगारल्यासारखा केला.. आणि काय आश्चर्य ..!!

दिल्लीहून आलेल्या आदेशानंतर जसा सगळा आवेश गळून जातो तसं ते पुढच्या पायात वाकत मागच्या पायांनी स्वतःला ओढू लागलं..

माघार कि प्रहार ?

नक्कीच माघार..!!

ही माघार घेतानाचे आवाजही ठरलेले असतात.

भॉ मधला आत्मविश्वास जाऊन आ..अ‍ॅ..बॅ बॅ असे चित्रविचित्र आवाज घशातून येऊ लागतात. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर पत्रकार परिषदेतलं नेत्याचं बोलणं असतं तसं हे भुंकणं असतं.

तुम्हाला पटणार नाही पण कुत्र्याचं भुंकणं ही एक बारकाईनं अभ्यास करण्याची गोष्ट आहे हे माझं ठाम मत झालंय. तुम्ही जितका त्याचा सखोल अभ्यास कराल तितकी तुम्हाला माणसंही कळत जातील असं आपलं मला वाटतं... आता माझी मतं पटायलाच पाहीजेत असा काही आग्रह नाही.

लहानपणी माझ्याकडं एक पाढरंभुभ्र कुत्रं होतं. आकाराने मोठी कुत्री दिसली कि त्याचा आवेश बघण्यासारखा असायचा. सोडा मला बघतोच यांच्याकडं...अशा तावात ते पिल्लू हातातून निसटायला पहायचं. पण त्याला भुंकायला यायचं नाही. त्याचं पहीलं भुंकणं ( जसं बाळाचे पहिले बोबडे असतात ) अजून लक्षात राहीलंय. कोवळ्या आवाजात ' उं.. आभौ... आभौ ...' असा आवाज काढला कि त्याला कित्ती कित्ती आनंद व्हायचा ! मग मी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून कौतुकाने "लब्बाड..." असं म्हणायचो....

आणि मोठ्या कुत्र्यांकडून मार खाल्ल्यावर मात्र ते 'कुईई... कुईई...कुईई....कुईई....' असा कॅसेट अडकल्यासारखा नॉनस्टॉप आवाज काढायचं. गावठी कुत्र्यांचं हेच वैशिष्ट्य असतं. मालकाचे सगळे गुण त्याच्यात पुरेपूर उतरलेले असतात. फिदीफिदी

इंग्लीश कुत्री बघा. जर्मन शेफर्ड....! डबल हड्डी, डबल लेयर क्लास वन .. !! काय रूबाब असतो त्यांचा...!!!

रस्त्यावरून हा कुत्रा कधी एकटा दिसणार नाही. सोबत बहुधा एखादी सुंदर तरूणी किंवा ड्रायव्हर किंवा घरगडी त्याला साखळी लावून चाललेला दिसतो. त्यांचं पाहून काही मध्यमवर्गीय जंतूही हा कुत्रा पाळतात. पण त्यांच अल्शेशियनला घेऊन फिरायला जाणं खूपच विनोदी दिसतं. मालक कुत्र्याला नाही.... तर कुत्रा मालकाला घेऊन फिरायला चालल्यासारखं ते दृश्य असतं.

कुत्र्याबरोबर मलाही बघा.. मी याचा मालक आहे ... असा अविर्भाव चेह-यावर असला कि मालक वन बीएचकेवाला मध्यमवर्गीय आहे हे साफ कळून येतं. बरं अल्सेशन कुत्रा आहे म्हणून चट्ट्यापट्ट्याचा टी शर्ट आणि लोंबणारी बर्म्युडा घालून जायचं असतं एव्हढंच त्यांना माहीती असतं.

हल्ली सकाळी फिरायला जायचं म्हणजे एकतर महागडा ट्रॅकसूट किंवा बर्म्युडा घालून जायचं असं समीकरण झालेलं दिसतं. त्यातही साडी किंवा अजागळ गाऊन मधली बायको आणि टीशर्ट बर्म्युडा आणि पायात चप्पल असा नवरा दिसला कि हे जोडपं मराठी आहे हे लांबूनही कळून येतं.

आणखी एक कुत्रं असतं बघा, डाबरमन नावाचं ! हे कुत्रं आपल्या मारवाडी माणसासारखं अस्वस्थ असतं. सुट्टीच्या दिवशी कोचावर लोळत टीव्ही पहावा किंवा दिवसभर सोशल नेटवर्किंग साइट्सवर बसून चाट करावं असे टिपीकल मध्यमवर्गीय विचार यांना मान्यच नसतात. एका जागेवर न बसता सतत आपली भुंडी शेपूट हलवत घरभर याचं हुंदडणं चालू असतं. पाण्यात सळसळणारी मासोळी आणि फरशीवर वळवळणारं हे तुकतुकीत श्वान अगदी सारखेच. बरं हुंदडतांनाही ते नीट नाही हुंदडत. नव-याच्या रूमालाला, शर्टाला किंवा प्रत्यक्ष नव-यालाच नाक लावून पाहणा-या बायकांप्रमाणे हे हुंग ते हुंग अशी याची हुंगाहुंगी चालूच असते. मधेच मालकाकडे पाहील आणि पुढच्याच क्षणाला कोप-यात नाक लावून काहीतरी हुंगत बसेल. ( ज्यांच्या घरात डाबरमन कुत्रं आहे त्या पुरूषाचं काही खरं नसतं ..)

तर सांगायचं म्हणजे या रूबाबदार इंग्लीश कुत्र्यांचा आवाजही भारदस्त असतो. फाटक उघडं राहील्यानं रस्त्यात येऊन बसलेल्या अल्सेशिअन कुत्र्यामुळं रहदारी थांबलेली मी पाहीलीय. हे कुत्रं खूप कमी भुंकतं. रस्त्यातून निघालं कि गावठी कुत्री त्याच्या अंगावर भुंकत असतात. त्यांना थोडासुद्धा भाव न देता भांडुपच्या रस्त्यावर गोठे बांधून आणि परप्रांतियांच्या मुद्द्यांवर चालणा-या मराठी माणसाच्या अरण्यरूदनाकडे दुर्लक्ष करून जाणा-या भैय्याच्या रूबाबात ते रस्त्यानं चालत असतं. बरं भुंकणारी कुत्री पण पोलिसांचा मार खाणा-या राडा फेम राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे सुरक्षित अंतरावरून आपला पराक्रम गाजवत असतात. मधेच हे धूड लघुशंकेसाठी थांबलं कि मग यांची जी पळापळ सुरू होते ती बघण्यासारखी असते !!

थोड्या वेळाने दहा बारा कुत्री एकत्र झाली कि त्यांना पुन्हा जोर येतो. नवनिर्माणाचा मंत्र जपत ते पुन्हा चाल करून येतात. या वेळी त्या अल्सेशनला किंचित राग येतो. बराच वेळ त्यांना भुंकू दिल्यावर हे ... वुफ्फ... इतकाच आवाज काढतं..... !

गायनाच्या आधी गायकानं तंबो-यावर सा SS लावतांना आधी आलापी घ्यावी आणि त्यावरूनच गायक काय ताकदीचा आहे त्याचा अंदाज यावा तसंच त्या दहा बारा कुत्र्यांच्या बाबतीत झालेलं असतं. तरीही जाता जाता मुक्तछंदातल्या कवितांचा भडिमार करून ती सुरक्षित ठिकाणी निघून जातात. इंग्लीश कुत्री किती जरी रूबाबदार असली तरी गावठी कुत्र्यांशिवाय गावाची ओळख पूर्ण होत नाही.

गावठी कुत्र्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मातीतलीच असल्यानं एकमेकांशी जुळवून घेणं काही त्यांना जमतच नाही. दोन कुत्री एकमेकांसमोर आली कि कुठलंही निमित्त काढून त्यांची एकमेकांवर गुरगुरायला सुरूवात होते. असं वाटतं आता हे एकमेकांना फाडून खातील.. पण दहा मिनिटं तरी नुसतंच गुरगुरणं .....नंतर एखादा भॉ असा आवाज आणि खडाखडी.. दोन भावांनी एकमेकांना जाहीर सभेत इशारे द्यावेत ना... तसं. ! इशारे देऊन झाले कि वातावरण तंग होऊन जातं. तर यांचं आपलं वेगळंच !

रेल्वेत बसायच्या जागेवरून वाद घालताना प्रकरण झेपत नाही असं दिसताच "ए, जाऊदे चल.. चल. चल, सोडून दिलं.." असं म्हणत माघार घेणा-या किंवा तुळशीबागेत / दादरला भैय्याला अतिक्रमणाबद्दल जाब विचारल्यामुळं चार पाच भैय्ये एकत्र झाले कि पवित्रा बदलत " आता कामाला उशीर होतोय म्हणून निघतो " असं पुटपुटत जाणा-या.मराठी माणसाप्रमाणं भांडण संपतं. .

कधीकधी कुत्रावळ सुरू होते तेव्हा उगाचच झाडून सगळी कुत्री रस्त्यानं पळत असतात. काही रस्त्याच्या या बाजूनं काही त्या बाजूनं. ज्या बाजूला जास्त कलागत असेल त्याच्या विरूद्ध बाजूच्या कुत्र्यांचं तिकडंच लक्ष असतं. सगळं लक्ष तिकडं देऊन भन्नाट स्पीड मधे रस्ता ओलांडण्यामुळं एक तर ते कुत्रं तरी चिरडलं जातं किंवा मग जोरात ब्रेक मारल्यामुळं एखादा छोटामोठा अपघात घडून येतो. बरं पुढच्या वाहनाने का ब्रेक मारले हे मागच्याला माहीत नसल्यानं तो जोरजोरात शिव्या घालत हॉर्न देऊ लागतो. कधी कधी तर खाली उतरून पुढच्या वाहनाकडे येऊन मग रीतसर अक्कल काढणे वगैरे विधींना यथासांग सुरूवात होते. पुढचा काय कमी असतो होय ? काही कळतं का इथून सुरूवात करून गाडीला ब्रेक शो साठी दिलेले नाहीत अशा वळणाने पुढचं संभाषण जाऊ लागतं. एव्हाना कुत्र्यांची कलागत थांबून ती कान टवकारून इथं काय चाललंय हे समजावून घ्यायचा प्रयत्न करत असतात. त्यातून प्रेरणा घेऊन मग नव्याने भांडणाला सुरूवात होते..!

खरी मजा येते ती कुत्र्यांचा गुलाबी सीझन सुरू झाल्यावरच. एखाद्या कुत्रीच्या मागे सात आठ कुत्री असतात. ही भौतेक त्यांची ऐश्वर्या राय असावी..
चुकलंच.. ऐश्वर्या कपडे घालून सिनेमाभर वावरते. वातानुकूलित पेहराव म्हणजे मल्लिका किंवा राखी सावंतच ! हा सोहळा म्हणजे साक्षात राखी सावंतचं स्वयंवरच असतं. स्वयंवर सुरू झालं कि सगळं भान विसरून आपले महानायक कडाकडा भांडत असतात. या वेळी थेट हल्ले होतात, चावे काढले जातात. दोन दोन दिवस घनघोर युद्ध चालू असतं. त्यातलं एखादं दांडगं कुत्रं स्वयंवर जिंकतं आणि आपली मल्लिका / राखी नि:श्वास सोडते. तोपर्यंत तिला तिष्ठत बसावं लागलेलं असतं...!

एक बघा हं ..आपल्या हद्दीत फाटके कपडे घातलेला किंवा अवतार झालेला मनुष्य आला कि ही भटकी कुत्री त्याला चोर समजून त्याच्या अंगावर धावून जातात. गबाळा अवतार यांना कसा कळतो हे एक कोडंच आहे. पण स्वच्छ पांढ-या कपड्यातला पुढारी आला कि त्याला भुंकलेलं कुत्रं आजतागायत माझ्या पाहण्यात नाही. यांना कुत्रीही फसतात. उलटपक्षी त्या दिवशी अतिक्रमणवाल्यांना पाहून रस्त्यावरचे पथारीवाले एकजात गायब व्हावेत तसं एकही भटकं कुत्रं दिसत नाही. बघा आठवून !
कोट टाय वाले दिसले कि मात्र कुत्री जरा दबकूनच असतात. शेपूट हलवत असतात. इंग्लीश झाडणा-यापुढं आपण नाही का कमरेत वाकून तोंडभर हसून गोंडा घोळवत असतो...!

एखादे दिवशी मग खरंच कुत्रं पकडणारी गाडी येते आणि असतील नसतील ती कुत्री पकडून घेऊन जाते. त्यांचं काय होतं हे देवालाच ठाऊक. एक मात्र खरं , पुढचे दोन चार दिवस एक विचित्र शांतता परिसरात नांदत असते. भुंकण्याच्या आवाजाची इतकी सवय झालेली असते ना, कि वातावरणातलं चैतन्य हरवल्यासारखं वाटू लागतं.

दोन चार दिवसांनी जरा सवय होते. मग घरातलं बाईंमाणूस म्हणतं.. "बरं झालं नेली पकडून ते. उच्छाद मांडला होता नुसता. दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका.. ना टीव्हीवरच्या मालिका बघता येत होत्या ना डोळ्याला डोळा लागू देत होती. "

हे बाकि खरं हं. वामकुक्षी किंवा टीव्हीवरच्या मालिका यांच्यासाठी राखून ठेवलेली दुपारची वेळ वाया गेली कि बायकांचा मूड गेलाच. मग कारणीभूत नव-रा का असेना ...फिदीफिदी! रात्रीची झोपमोड मात्र तणतणायला पुरेशी असते. रात्री अकरा साडेअकराची कुत्र्यांची भुंकाभूक झाली कि पुन्हा दीडला एकदा मैफील जमते. पुन्हा झोपायचा प्रयत्न करावा तर एखादा तास झोप होत नाही तोच कुठंतरी अगदी जवळच कुत्र्याचं रडणं सुरू होतं..
रात्रीच्या वेळी ते इतकं भेसूर आणि अभद्र वाटतं कि काळजाचा ठोकाच चुकतो. आता झोपेचं खोबरं झालेलं असतं पार. जितकं दुर्लक्ष करावं तितकं कान देऊन आपण ते ऐकत राहतो. मग एखादा रिक्षावाला झोपमोड होऊन त्याला शिव्या घालून दगड मारेपर्यंत ते चालूच राहतं.

ते जाऊन दूर कुठंतरी रडू लागतं. आता आवाजाची तीव्रता कमी झालेली असते. पण कुत्रं का रडतं याचा विचार सुरू होतो अशा वेळी. त्याला ना खायला मिळतंय , ना प्यायला. त्यातून जागोजागच्या ड्रेनेज आणि उकिरड्यांनी त्यांना झालेले रोगही भयानक असतात. आता तर काय, जंगलात पण माणसाची वस्ती पोहोचली.. शिकार करायला प्राणी कधीचेच उरले नाहीत. हल्ली माणसंही खायला घालत नाहीत. दिवसभर आशेवर राहून रात्री मग उपाशी पोटी मग रडत असतील..

माणसाचं तरी काय आहे ? जमिनी धनदांडगे बळकावत चाललेत, रस्त्यात अतिक्रमणं, दूरवरच्या शाळेत जीव मुठीत ठेवून मुलांना पाठवणं, पाणी येईल का नाही, बेशिस्त रहदारी, कडाडलेली महागाई, मैदानाअभावी कोमेजणारी लहान मुलं, ओरडणारा बॉस, पुन्हा पुन्हा निवडून येणारे गुंड .. एक ना दोन. दिवसभर शरीरातला जीवनरस शोषून घेतल्यावर रडण्याचंही त्राण उरलेलं नसतं त्याच्यात. त्या कुत्र्यासारखाच तोही तितकाच असहाय्य असतो.. !

म्हणूनच मला नेहमी वाटतं कि कुत्र्यांच्या भुंकण्याचा जितका अभ्यास करावा तितका माणूसही कळत जातो. .....

अनिल सोनवणे
६ डिसें २०१०, पुणे.

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

उत्तम निरीक्षणे आणि मस्त पञ्चेस!! शेवटचे वाक्यही मस्तच.

लेख आवडला. निरीक्षणे विशेषतः जास्त आवडली. अन उपमाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असेच म्हणतो!!

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त भुभु ललित!
रात्री अपरात्री येणारा प्रत्येकजण हा चोर आहे असे गृहीत धरुन भुभु लोक आपली ड्युटी बजावतात.
मागे लागणार्‍या कुत्र्यांना हाड करायच्या ऐवजी शिट्टी वाजवून यु यु करायचे की एकदम अनपेक्षित रित्या बधीर होतात. काही सुधरतच नाही त्यांना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

वि वा शिरवाडकर ह्यांचं एक कुत्र्याचं आत्मवृत्तही खुसखुशीत होतं.
तुम्ही माणसाच्या नजरेतून कुत्र्याबद्दल लिहिलय; त्यांनी कुत्र्याच्या नजरेतून माणसाबद्दल लिहिलं होतं.
आत्ता त्या लेखाचं नाव आठवत नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अशी प्राणिकेंद्रित ललिते मराठीत किती असतील? फार नसावीत. श्री.दा.पानवलकरांची "सुंदर" ही कथा त्याचे एक अतिशय सुंदर उदाहरण म्हणून सांगता यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या माहितीत एका भुभीचे आत्मवृत्त आहे. त्याचे नांव 'मी जेनी' शब्दांकन अनंत अंबादास कुलकर्णी , श्रीविद्या प्रकाशन. वि वा शिरवाडकरांच काही मला माहित नाही. संदर्भ सापडला तर द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कुसुमाग्रजांच्या काही कथांचं "निवडक कथा" नावने संकलन आहे एक. बहुतेक शांता शेळकेंनी केलेलं आहे. त्यात आहे ही कथा! पण आत्ता शोधल्यावर ते पुस्तक एकाही साइट वर सापडलं नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण कुसुमाग्रज लेखक नव्हे कवी होते; लेखक होते ते वि वा.
.
थ्यांक्स विशेष अशासाठी की संदर्भलोलुपतेने झपाटलेल्या ह्या साइअटवर निदान माझे विधान प्राथमिक विचारत तरी आता घेतले जाइल.
इथे "शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचे वर्ष हे त्यांच्या जन्मवर्षानंतरचे आहे " असे म्हटलो तरी संदर्भ द्या, दुवे द्या. कशावरून राज्याभिषेक हा जन्मापूर्वी झाला नव्हता वगैरे वगैरे प्रश्न येउ शकतील.
ह घ्या. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

येस्स!

शिरवाडकरांच्या काही कथांचं "निवडक कथा" नावने संकलन आहे एक. बहुतेक शांता शेळकेंनी केलेलं आहे. त्यात आहे ही कथा! पण आत्ता शोधल्यावर ते पुस्तक एकाही साइट वर सापडलं नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिरवाडकरांच्या काही कथांचं "निवडक कथा" नावने संकलन आहे एक. बहुतेक शांता शेळकेंनी केलेलं आहे. त्यात आहे ही कथा!

ही कथा वि वा शिरवाडकरांच्या निवडक कथातून उचललेली आहे ? वाचायला पाहीजे हा कथासंग्रह.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

अहो हे लेखन, हा धागा उचलेला नाहिये. हे माणसाला कुत्री कशी वाटतात ते लिहिलय. त्या कथेत कुत्र्याला दुनिया कशी दिसते/दिसत असेल ते लिहिलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

संदर्भलोलुपतेने झपाटलेल्या ह्या साइअटवर

याचा पक्का संदर्भ द्या पाहू.

या एका विधानावरून असे विधान करता येणार नै. विदा जमवा अन मगच पाहू काय ते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेमध्ये केशवसुतांची पुढील कविता आपण सर्वांनी वाचली असेलः

आजीच्या जवळी घडयाळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाऊक;
त्याची टिक टिक चालते न कधिही,आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि,तरी ते सारखे चालते
इ.इ.

गल्ल्याबोळात राहणार्‍या बेवारशी गावठी कुत्र्यांजवळहि असे काही चमत्कारिक घडयाळ असावे असा माझा तर्क आहे.

रात्री दहासाडेदहापर्यंत ही कुत्री शांत असतात आणि आपापल्या कामात व्यग्र असतात. तेव्हा त्यांचे अस्तित्व आपणास विशेष लक्षात येत नाही. पण ह्या वेळेनंतर जर कोणी त्यांच्या गल्लीत शिरला तर ती एकसमयावच्छेदेकरून भुंकायला लागतात. रात्रभर त्यांची वागणूक अशीच असते. पहाटे पाचसवापाच वाजले की ती पुनः शांत होऊ लागतात आणि येणार्‍याजाणार्‍या प्रत्येकाला चॅलेंज करीत नाहीत. त्यांचा हा भुंकणे-मोड ह्याच वेळांना कसा ऑन-ऑफ होतो? कुत्र्यांच्या जवळी घडयाळ कसले आहे चमत्कारिक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढेच नाही तर कधी-कधी फक्त रात्री त्या गल्लीतला कुत्रा भुंकला तर जणू त्याला प्रत्युत्तर म्हणून दोन-एक कुत्री इकडून भुंकतात, हा संवाद बराच वेळ चालतो पण गल्ली कोणी सोडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार छान. लेखाच्या समारोपाची दोन वाक्य संपूर्ण लेखातल्या खेळकर शैलीला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.
प्राणीकेंद्रित ललिते : मंत्रींची "मी मांजर होतो "(बहुधा. नक्की नाव आठवत नाही) ही कथा, आनंद यादवांची "माउली" , माडगुळकरांची 'सत्तांतर'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंत्रींचा तो मांजराचा लेख तेव्हा फार आवडला होता.

हा लेखही आवडला.
आमच्या गल्लीतही फार कुत्रे होते. स्कूटरींवर ते फार भुंकायचे. १९९२-९३ च्या पुढे वेगवेगळ्या स्कूटरी आल्या. तरी कुत्रे फक्त बजाजवरच भुंकायचे अशी एक थिअरी होती. रात्रीच्या वेळेस, गल्लीत रहाणारे बहुतेकसे स्कूटरवाले जरा घाबरतच गल्लीत शिरायचे. स्कूटर-कुत्रा अशी शर्यत बरेचदा दिसायची, पण कुत्रे कधी कोणाला चावल्याचं आठवत नाही.

आमच्या जिन्यासमोर कायम एक-दोन कुत्रे पसरलेले असायचे. मी त्यांना नेहेमी सांगायचे, इथे जिन्यासमोर बसू नका, थोडे बाजूला व्हा, पण ऐकलं नाही. एकदा मीच घाईघाईने घरातून बाहेर पडत होते तेव्हा एकाच्या पायावर पाय पडला. त्याने प्रतिक्षिप्त क्रियेने दात काढले. माझं रक्त आलं. मग सात इंजेक्शनं घ्यायला लागतील असं समजलं. सहा कुत्र्याची, एक धनुर्वाताचं. कुत्रा बिचारा दयनीय चेहेरा करून दोन दिवस माझ्याकडे बघत होता. मग त्याला अर्धा ब्रेडलोफ दिला तेव्हा कुठे पुन्हा तो नॉर्मल झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भऊऊऊऊऊऽऽऽऽऽऽ

कार्टून्समध्ये कुत्रे असा आवाज काढून दाद देतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दिल्लीहून येतांना झेलम एक्सप्रेस लेट आलेली.

पहिल्याच वाक्याला अडखळलो. वाक्याचे प्रयोजनच कळले नाही. म्हणजे, 'सूर्य पूर्वेस उगवलेला' अशा वाक्याने जर कोणी एखाद्या लेखाची सुरुवात केली, तर जे काही वाटेल, ते वाटले.

झेलम एक्सप्रेस ही दररोज किमान चार तास आणि सरासरी बारा ते चौदा तास उशिरा निघाली आणि/किंवा पोहोचली नाही, तर रेल्वेदरबारी ते फाऊल धरले जाते, आणि संबंधित ड्रायवरास झेलम एक्सप्रेसनेच प्याशिंजर म्हणून प्रवास करण्याची शिक्षा ठोठावली जाते, अशी आख्यायिका प्रचलित नसल्यास ती या क्षणी आम्ही बनवली, असे समजले जाण्यास आम्हांस प्रत्यवाय नाही.

उलटपक्षी, 'आज झेलम वेळेवर निघाली/पोहोचली' हा साधारणतः 'दोन सरदारजी बुद्धिबळे खेळत होते'च्या तोडीचा विनोद समजला जावा. (अर्थात, दोन्ही सरदारजींनी बुद्धिमंत असण्यास आम्हांस व्यक्तिशः काहीच अडचण नाही म्हणा; परंतु तरीही, असा विनोद ऐकलेला आहे, आणि 'दो.स.बु.खे.हो.' हा जर विनोद होऊ शकत असेल, तर मग 'आ.झे.वे.नि./पो.' हा किमान तितक्याच दर्जाचा विनोद का होऊ नये, हे कळत नाही.)

असो. तरीसुद्धा, उर्वरित लेख रोचक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0