टबुडी टबुडी जसवंती

गोष्ट तशी खूप जुनी आहे. आई,नाना १९४५ च्या सुमारास मुंबईत आले. मुंबईला त्यांचे कोणीच नव्हते. फक्त नानांची नोकरी भक्कम होती. परवडेल अशी जागा, त्यावेळच्या मुंबईच्या हद्दीबाहेरच मिळत होती. मालाड मुंबईच्या बाहेर होतं. स्टेशनपासून साधारण १० मिनिटांवर एका चाळीत दोन खोल्यांची जागा त्यांना मिळाली. पहिल्या मजल्यावर, ते धरुन तीन बिर्‍हाडे होती. पाणी खालून विहीरीवरुनच आणावे लागे. संडास त्याच मजल्यावर पण बराच लांब. बाकी शेजार कॉस्मॉपॉलिटन! एका बाजुला सिंधी तर दुसर्‍या बाजुला गुजराथी. हे गुजराथी खूपच श्रीमंत होते. (हो, त्याकाळी श्रीमंतही चाळीत रहात.) त्यांची जागा मोठी होती. नवरा, बायको, त्यांची छोटी मुलगी,जसवंती,एक म्हातारी आणि एक मुनीम. घरांत एक चोवीस तासांचा नोकरही होता. तो खास, या नवर्‍याला सांभाळायला ठेवला होता. कारण, हा नवरा साधारण तिशीचा असला तरी वेडा होता! कुणा गरिबाघरच्या सुस्वरुप मुलीशी त्याचे लग्न करुन देण्यात आले होते. त्याचे मानसिक वय ८-१० वर्षांचे होते. होता अगदी निरागस मनाचा. पण जेंव्हा झटका येई तेंव्हा दोघांनाही आवरत नसे. मुनीम एखाद्या हिंदी सिनेमात दाखवावा तसा लबाड होता. प्लॉट एकदम फिल्मी, पण खराखुरा! प्रचंड प्रॉपर्टी मुलाच्या नांवावर. मुलगी छान बाहुलीसारखी, पण मुनीमजीच्या चेहेर्‍यात आणि तिच्यात साम्य आहे,अशी शेजारपाजारी कुजबुज!

रहायला आल्यावर आई-नानांना हा प्रकार कळला.हळुहळु संवय झाली.तो मुलगा हुंदडत आमच्या घरांत घुसे,माझ्या आईकडे खाऊ मागे. त्याला माझ्या आई-नानांचा लळा लागला.चाळीतले बाकी लोक त्याला अत्यंत घाबरायचे आणि अर्थातच टाळायचे.त्या मुलाला सकाळी नोकर खालच्या अंगणात घेऊन जाई. तिथे, कोवळ्या उन्हात त्याच्यासाठी खुर्ची मांडे.मग तो,नाईट ड्रेसमधे,मोठ्या ऐटीत त्या खुर्चीवर बसून एकच गोष्टीचे पुस्तक हातात धरुन मोठ्यांदा वाचू लागे.

अंधेर नगरी,गंडु राजा
टक्का सेर भाजी, टक्का सेर खाजा.

पुस्तकांत प्रत्यक्षांत काय लिहिलेले असायचे कुणास ठाऊक. पण हे वाचल्यावर त्याला रोज तितकेच खदखदून हंसु येत असे. त्याचे त्याच्या मुलीवर कमालीचे प्रेम होते. तिला खेळवत तो लाडाने "टबुडी, टबुडी जसवंती" असे म्हणत असे. मुलीला मात्र तो कधीच इजा करत नसे.

आमच्या घरांत येऊन तो आई-नानांबरोबर कॅरम खेळत असे.म्हणजे बोर्ड आमचा आणि सोंगट्या त्याच्या.त्याचा नेमही बर्‍यापैकी लागत असे.जिंकला की त्याला हर्षवायु व्हायचा.पण हरला की रागाने सर्व सोंगट्या गोळा करुन स्वारी घरी धूम ठोकत असे.मोठा खोडकर स्वभाव होता त्याचा.आमच्या घरांत एक आरामखुर्ची होती.नाना त्यांत संध्याकाळी दमून आले की विसावायचे.हा मुलगा कोणाचे लक्ष नसताना,वरचा एक दांडा काढून कापड होते तसे लावून ठेवायचा.बहुतेक वेळा,नाना सावधपणे बसून पडल्याचे नाटक करायचे. तसे झाले की हा दारांत उभा राहून उड्या मारत टाळ्या वाजवायचा आणि मनसोक्त हंसायचा. पण कधीकधी लक्ष न राहून नाना जोरात पण पडले होते, असं आई सांगायची. माझ्या आई-वडिलांना त्याची कणव यायची आणि ते त्याच्याशी माणुसकीने वागायचे.घरी तो कधी अनावर झाला की, तो दुष्ट मुनीम, नोकराच्या मदतीने त्याला उलटा टांगून मिरच्यांची धुरी देत असे.अशा वेळेला तो मुलगा,मालती बेन, वासुभाई असा धावा करायचा. मग नाना त्यांच्याकडे जाऊन त्याला सोडवायचे.तो अगदी स्फुंदत नानांना मिठी मारायचा.

एकदा, नोकरीवरुन परत येताना, बाजारहाट करुन आई दोन्ही हातात मोठ्ठ्या पिशव्या घेऊन घरी आली.दरवाज्याजवळ कुलुप उघडत असताना,हा मुलगा आला, "मालतीबेन, मालतीबेन सुं लाव्या?' आई त्या दिवशी काही कारणाने कावलेली होती. तिने त्याची चेष्टा करत,'पेंडा,बर्फी, गाठिया' असे उत्तर दिले. वेडा असला तरी त्याला ती चेष्टा कळली.अचानक व्हायोलंट होत त्याने आईचे केस गच्च धरले! त्याची पकड जबरदस्त होती.आईला काय करावे ते कळेना.शेवटी तिने कुलुपच त्याच्या डोक्यांत घातले.त्याच वेळी त्यांचा नोकरही धावून आला.त्याला चुचकारत घरी नेले.

नानांना घरी आल्यावर आईने झाला प्रकार सांगितला. पण ते दोघे धीराचे.त्यांनी ती जागा सोडली नाही.कारण दुसर्‍या दिवशी हा मुलगा सोंगट्यांचा डबा घेऊन दारात हजर! चेहेर्‍यावर अपराधी भाव होते, त्याला तोंडाने क्षमा मागता आली नाही तरी त्याच्या आविर्भावावरुन ते कळत होते. नानांनी मुकाट्याने कॅरम बोर्ड काढल्यावर त्याला मनापासून आनंद झाला.

पुढे, आमच्या जन्माच्या आधीच ते कुटुंब जागा सोडून दुसरीकडे रहायला गेले. जाताना तो मुलगा आई-नानांकडे पुन्हा पुन्हा वळून बघत रडत होता. त्यावेळी आईलाही डोळ्यांतले पाणी आवरले नाही.

तळटीपः - माझ्या आईच्या आठवणींतील ही एक सत्यकथा आहे. ती मला जशी उमजली तशी तुमच्यासमोर मांडत आहे. पुढे, कित्येक वर्षांनंतर, दिलीप प्रभावळकरांचा 'चौकटराजा' हा सिनेमा टीव्हीवर बघताना, आमच्यापेक्षाही जास्त आईला रडु येत होते.

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (9 votes)

प्रतिक्रिया

हा लेख वाचून चित्रकाराने एखाद्या सुंदर चित्रासाठी हलक्या हाताने पेन्सिलीने रूपरेखा काढून ठेवल्याचा भास झाला. या रूपरेषेत रंग भरून अत्यंत दर्जेदार चित्र होण्याची क्षमता आहे. कृपया विस्तार करण्याचा विचार करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येकाची एक कुवत असते. त्याप्रमाणे मी केवळ एक नॅरेटर आहे, मी लेखक नाही. त्यामुळे यात कोणालाही रंग भरुन एक दर्जेदार चित्र बनवायचे असेल तर त्याला माझी काहीच आडकाठी नाही. ही सत्यकथा लोकांपर्यंत पोचावी एवढाच माझा उद्देश होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाच तारका दिल्या हेत लिखाणाला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

स्वतः ना पाहिलेल्या व्यक्तीचे चित्रण करणे तसेही कठीण असावे. इथे मात्र (अशा दोनेक व्यक्ती परिचित असल्याने की काय माहित नाही) पण लेखन भिडले
अतिशय प्रांजळ चित्रण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संवेदनशील चित्रण. आईच्या आठवणीतल्या पोतडीत अजूनही काही चिजा असतील ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बाप रे! हा धागा आजच वाचला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला. दुसर्‍या टोकाचा 'बाळूगुप्ते' आठवून, चाळीत अशा नॉन-सामान्य-स्पेक्ट्रम लोकांना मिळणार्‍या अवकाशाबद्दल पुन्हा विचार करावासा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचे त्याच्या मुलीवर कमालीचे प्रेम होते

या वाक्याच्या आधीपर्यंत मी आपला लेख असाच उगाच वगैरे म्हणून वाचत होतो.
पण या चार पाच शब्दांनी एकदम हातापायातली शक्तीच गेल्यासारखं झालं.

सुंदर लिहिलंय.
धन्यवाद!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच वाचले. अतिशय आवडले. गुर्जी आणि नंदन, दोघांशीही सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आजच वाचले. अतिशय आवडले. गुर्जी आणि नंदन, दोघांशीही सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन