पेपर

'मी तुझ्याबद्दल लिहू का रे? त्याच्या खांद्यावर हनुवटी रुतवत लडिवाळपणे तिने विचारलं.

'काय लिहिणार आहेस'? त्याने विचारलं.

'हेच, तू मला किती आवडतोस, आज इतक्या वर्षांनंतर देखील', त्याच्या डोळ्यात खोलवर बघत ती म्हणाली.

'अजिबात नको, तुला माहितेय मला हा सगळा 'पब्लिक डिसप्ले ऑफ एफ़ेक्शन' मुळीच आवडत नाही', तिच्या चेहेऱ्यावर आलेल्या बटा हळूवारपणे तिच्या कानामागे सारत तो म्हणाला.

'का पण?' ती फुणफुणली.

'बस, असंच', मिश्किल हसत तो म्हणाला. हसताना त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात तयार होणाऱ्या चुण्या तिला फार आवडत. त्या एकेका चुणीच्या मखमली आवरणात इतक्या वर्षातल्या सहप्रवासाची एकेक आठवण निट घडी करून व्यवस्थित ठेवून दिलेली असे.

'हं', लटका रागाचा सुस्कारा टाकून ती त्याच्यावर रेलून पेपर वाचायला लागली. दिवसभराच्या दिवाळीच्या वर्दळीत दोघांनाही उसंत मिळाली नव्हती. त्याने पुढ्यातलं पुस्तक उचललं. पुढची पंधरा एक मिनिटं तशीच शांततेत गेली. तिच्या केसातून फिरत असलेली त्याची बोटं. तिला येणारी सुखद गुंगी.

तेवढ्यात मुलांच्या खोलीतून तिच्या नावे खलिता आला. 'मम्मा, झोप येत नाहीये, गोष्ट सांग ना'.

पेपर तसाच टेबलवर टाकून ती लगबगीने निघाली, सगळी पानं तशीच उघडी, अस्ताव्यस्त.

'अगं, पेपरची नीट घडी तरी करून ठेव जरा, ' काहीश्या नाराजीने तो म्हणाला.

त्याच्याकडे डोळे वटारून पहात तिने घाईघाईने पेपर आवरून ठेवला आणि ती वर पळाली.

तिने कसातरी घडी करून ठेवलेला पेपर त्याने परत उघडून त्याची सुबक घडी घातली, पेपर कुणी उघडलाच नाही अशी शंका येण्याइतपत व्यवस्थित घडी.

मुलांना गोष्ट सांगून थोड्या वेळाने ती परतली. परत तिने पेपर हातात घेतला. धसमुसळ्यासारखा उघडला. तो तिच्याकडे रोखून पाहत राहिला.

'काय झालं'? परत त्याच्यावर रेलत तिने विचारलं. काही न बोलता त्याने तिच्या हातातल्या पेपरकडे सहेतुक पाहिलं.

'ओ, तू परत घडी घातलीस?' तिने हसत त्याला विचारलं. खरं तर तो परत घडी घालून ठेवणार हे तिला माहिती होतंच. आणि तिला ते माहिती असणार हे त्यालाही ठाऊक होतंच. तब्बल तेरा वर्षांचा अनुभव होता दोघांच्याही गाठीला.

'कधी शिकणार आहेस तू पेपर परत व्यवस्थित घडी घालून ठेवायला'? कपाळाला आठ्या घालत त्याने विचारलं, पण त्याचे तपकिरी डोळे हसत होते.

'अंहं, कधीच नाही. मी ऐशी वर्षांची झाले ना तरी नाही.', खळखळून हसत ती म्हणाली. तिचं हे पावसाच्या धारांसारखं उन्मुक्त खळखळून हसणं त्याला फार आवडायचं.

'म्हणजे, मी आयुष्यभर असंच तुझा पेपर घडी करत बसायचं?'

'हो. तू रिटायर झाल्यावर तुला काम नको का काही? नाहीतर माझी कामं अधिक प्रभावी पद्धतीने कशी करायची ह्याच्यावर माझंच बौद्धिक घेत बसशील!', तिने म्हटलं.

'ह्याच्यावर लिही', तिच्या डोक्यावर हलकेच टप्पल मारत तो म्हणाला. 'यशस्वी नात्याची गुरुकिल्ली. बायकोने वाचलेल्या पेपरची नीट घडी करून ठेवणे'.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

हल्कंफुल्कं . .. पपण अअजून खुलवून लिहिता आलं तर बरं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars