Skip to main content

खेळघर - रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

(समीक्षेत याची जिम्मा होईल का, याबद्दल किंतू आहे. जर होत नसेल, तर सरळ 'सध्या काय वाचताय?'मधे घालून टाकावे.)

आज ’खेळघर’ (रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) वाचलं. आधीच कबूल करते, माझी प्रतिक्रिया थोडी गोंधळलेली आहे.

मी एका सवर्ण कुटुंबातली, मार्कबिर्कं मिळवणारी, वाचणारी-बिचणारी, मुंबईत राहणारी व्यक्ती. आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचं अमुक इतपत भान नसलं, तर व्यक्तिमत्त्वात फाउल धरतात; त्यामुळे वर्तमानपत्रं नि आता इंटरनेटच्या माध्यमातून अद्ययावत इत्यादी राहायला धडपडणारी. मला आमटे कुटुंबीय ठाऊक असतात. उत्तरोत्तर त्यांना मध्यमवर्गात मिळत गेलेली प्रतिष्ठा आणि त्यांचं बालाजीसदृश पापमुक्ती देणारं स्टेटसही. अवचटांचं मुक्तांगण आणि त्यांची दिवाळी अंकातली प्रथितयश होत गेलेली कचकड्याची साहित्यिकी ठाऊक असते. मला बंगांचं ’सर्च’ही ठाऊक असतं आणि बालमृत्यूंवरच्या संशोधनापेक्षा फेमस झालेलं ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’सुद्धा. मला समाजवादी पार्श्वभूमी असलेले मित्र असतात. त्यांच्या कुटुंबातला वेगळेपणा आणि माझी सर्वसामान्य नेमस्त हिंदूबिंदू पार्श्वभूमी जमेस धरूनही आमचे प्रश्न आणि आमचं गोंधळलेपण बरंचंसं सारखंच, एकाच टप्प्यावरचं.

अशात गोष्टीबिष्टीत म्हणून तरी एखाद्या माणसाला असली यशस्वी सामाजिक प्रयोगाची परीकथा लिहावीशी वाटते, याचं अप्रूप वाटलं. मजा वाटली. जवळीक वाटली. पण मला तिनं भारून नाही टाकलं.

या लिहिण्यातल्या रचनेत, तिच्या भाषेत किती तुटलेपणा असावा? ती भाषा कुठलीच नाहीय. ना शहराची, ना गावाची. ना बाईची, ना बुवाची. ना पुण्याची, ना मुंबईची. ना ती पात्रानुसार बदलते, ना नेपथ्यानुसार. ती फक्त लेखक नामक प्राण्याची भाषा आहे, इतकंच सारखं कळत राहतं. आयन रॅण्ड जर अमुक एका वयाच्या नंतर वाचली, तर तिच्या गोष्टीतली तीच एकसारखी दिसत राहते नि वैताग-वैताग होतो तसं काहीतरी ही गोष्ट वाचताना होत राहतं. लेखकाची स्वप्नंबिप्नं ठीक आहेत. पण म्हणून ही अशी प्लॅस्टीकची भाषा नि कटाउट्ससारखी माणसं कशी बरं माफ करावीत? केवळ तेवढ्याकरता पुस्तकावर फुली मारावी, असं हे पाप. दुसरं म्हणजे यातल्या कित्तीतरी पात्रांच्या वास्तवातल्या ओरिजिनल स्रोतांची कल्पना सहज करता येते. नि गोष्टीतली पात्रं इतकी कचकड्याची-द्विमित उरतात की डोक्यातला ’हे पात्र कुणावरून रंगवलं असेल बरं’चा चाळा शेवटापर्यंत संपतच नाही. तिसरं आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे तिच्यातला आशावाद. हा आशावाद कमालीचा भोळाभाबडा आणि कृतक आहे. इतका की, "सामाजिक कामामधले हे अमुक चार प्रयोग आणा, त्यात अमुक अमुक दोष होते हे नोंदा, त्याला तेव्हाच्या सामाजिक घडामोडींची एक जनरल बॅकग्राउण्ड द्या, थोडी मार्क्सवाद-लोहिया-डावा विचार-आणीबाणी इत्यादी चवीपुरती चर्चा, आणि मग सरतेशेवटी जनरल शांतिनिकेतन टाईप फुलंबिलं-सर्जनाचा सोहळा-नातेसंबंध हेच प्रगतीचा पाया.. डन! एक मस्त पॉझिटिव्ह गोष्ट तयार आहे बघा..." अशी मुलाखतच जणू लेखक देतो आहे असं चित्रही माझ्या मनानं तत्परतेनं रंगवलं.

तरी मी पुस्तक वाचलं. त्यात रचनेचं नावीन्य आहे. मुलाखती, डायरी, प्रथमपुरुषी निवेदन, तृतीयपुरुषी निवेदन, भाषणं... असे नाना फॉर्म्स आहेत. पण हे काही मला धरून ठेवणारं कारण नाही. मी पुस्तक वाचलं, कारण मलाही गोड शेवट असणारे हिंदी सिनेमे आवडतात. अजून काय इतकं काही संपलेलं नाही, अजून काहीतरी करण्याजोगं मस्त सापडेल, आपली निष्क्रियता आपण संपवू शकू, आपल्याला मजाही येईल, असं मला अजूनही अधूनमधून वाटत असतं. चांगले भारीपैकी धक्के खाऊनही मी अजूनही आवडलेल्या माणसांच्या प्रेमात वेडगळासारखी पडतच असते.

असल्याच वेडगळ प्रयोगाची गोष्ट सांगणारं (की सांगू पाहणारं?) पुस्तक, म्हणून बहुतेक मी ’खेळघर’ वाचलं असणार. म्हटलं ना, मी गोंधळलेय!

समीक्षेचा विषय निवडा

मन Thu, 07/11/2013 - 17:27

In reply to by ऋषिकेश

असा विचार नस्तो करायचा.
नाकाखाली जे येइल ते वाचत सुटायचं.
हातात घेतल्यावर वाचवत नसेल तर सोडून द्यायचं.
वाचण्यापूर्वीच "वाचू की नको" कशाला?
हा का ना का

ऋषिकेश Thu, 07/11/2013 - 17:32

In reply to by मन

सध्या वाचायला बरेच आहे.
मात्र जवळ लायब्ररी नसल्याने आता पुस्तके विकत घ्यावी लागत आहेत. मेघनासारख्यांनी शिफारस केली तर डोळे झाकून विकत घेतो म्हणून विचारले.
व्यक्तीपूजा रे निव्वळ व्यक्तीपूजा ;)

मन Thu, 07/11/2013 - 17:46

In reply to by ऋषिकेश

घरपोच लाय्ब्ररीच्या मीही शोधात आहे.
तुमच्या माहितीत आल्यास मला कळवा. माझ्या माहितीत आल्यास तुम्हांस कळवितो.
बादवे, ह्यावरून आठवले. मी काय वाचत बसेन ह्याचा नेम नाही. सुटी होती तीनेक दिवस+ मागेपुढे एक दोन आथवड्यात काहिच काम नाही.
श्रीराम लागू ह्यांचं "वाचिक अभिनय", विलास फडके ह्यांचं "अशी माणसं अशी साहसं" , द मा मिं चं "हसवणूक" आणि अजून एक, जी एंचं "हिरवे रावे",
प वि वर्तक ह्यांचं "वास्तव रामायण" आणि एका निवृत्त कॅप्टनचं पु ना ओक स्टाइल "प्राचीन भारतीय विमानशास्त्र" वाचून काढलं. (ह्यातली अर्धी पुस्तकं मागेच वाचून झाल्ती. त्यामुळे पुनर्न्वाचनात निवडक भागच वाचावा लागला. जसं की हिरवे रावे पूर्ण वाचण्यापेक्षा पुन्हा पुन्हा "राक्षस" हीच कथा वाचून काढली. )
नारायण धारपांच "चेटकीण" पुन्हा वाचलं; त्यातही उत्तरार्ध.
सदाशिव अमरापुरकरांचं अभिनयाबद्दल एक पुस्तक आहे, ते ही हाती घेतलं पण लांबी , रुंदी, त्यातली भाषा आणी हाताशी असलेला वेळ ह्यांचा ताळमेळ बसला नाही; सोडून दिलं.
रत्नाकर मतकरींचं "गहिरे पाणी" सुद्धा समोर असूनही त्यामुळेच वाचता लां नाही.
कुणाला अभिनय शिकायचा असेल, काही टिप्स तिथून नक्कीच मिळतील.
.
हे सगळं का वाचलं? समोर होतं म्हणून.
वाचून होइपर्यंत "आपण पुस्तक वाचत आहोत" हेच मुळी ध्यानात आलं नाही. मला कुणीच काही नक्की वाच असं recommand ही केलं नाही.

मेघना भुस्कुटे Thu, 07/11/2013 - 17:54

In reply to by मन

अमरापुरकरांचं पुस्तक भाषांतरित आहे का? ते मला आवडलं होतं.

अजून अवांतर: तुम्हीच ना हो ते? 'लोक का वाचतात' असा धागा काढणारे?!

मन Fri, 08/11/2013 - 09:38

In reply to by बॅटमॅन

@मेघु तै:- मराठीत आहे पुस्तक. माझ्या सवयीप्रमाणे आगापीछा न पाहता मधूनच वाचण्यास सुरुवात केली. झेपलं नाही . ठेवून दिलं. अनुवादित आहे की नाही ह्याची कल्पना नाही.
.
तुम्हीच ना हो ते? 'लोक का वाचतात' असा धागा काढणारे?!

हो. मी वाचतो असं सुचवायचं असेल तर माझं वाचन आणि इथल्या सदस्यांच्या वाचनाची तुलना करणं ही एक धमाल आहे.
चुकून सिग्नल मोडणारी व्यक्ती आणि आख्ख्या मुंबैत गोळीबार करत सुटलेला कसाब ह्या दोघांनाही तांत्रिकदृष्ट्या कायदाच मोडलाय. पण त्याची तुलना तरी होते का?
आपले दुखरे गुडघे सांभाळत फार तर आपल्या बंगल्यातील तळमजतल्या खोलीवर जायलाच काय ती एखाद दोन पायर्‍यांची चढउतार करणारे एखादे अशक्त पेन्शनर श्री साठे आणि
एवरेस्ट किम्वा तत्सम शिखरं चढणारे धाडसी गिर्यारोहक हे तांत्रिकदृष्ट्या दोघेही चढौतार करतात. पण त्याची तुलना तरी होते का?
.
म्हणूनच साठ्यांनी अचंब्यानं विचारलेला प्रश्न आहे तो हा :- "कसं काय बुवा चढता तुम्ही इतकी मोठमोठी शिखरं?!"

मेघना भुस्कुटे Fri, 08/11/2013 - 09:48

In reply to by मन

(मेघुतै! गहिवरलेय हो मी इथे. समोरची स्क्रीन दिसायचे वांधे झालेत.)

ते असो. मनोबा - कशाला उगाच स्वतःला कमी लेखतोस? अशानेच नाकाने कांदे सोलणार्‍या शिष्ट विद्वानांचे फावते हो.

मन Fri, 08/11/2013 - 17:07

In reply to by ऋषिकेश

ऋ दादा, सॉरी.
मेघु आजी, सॉरी.

मेघना भुस्कुटे Fri, 08/11/2013 - 17:26

In reply to by मन

आता सॉरी, पहले कायको झक मारी? ते काही नाही, तू शिक्षा म्हणून दवण्यांचं एक पुस्तक तीनदा वाचून काढ. तरच तुझ्या सॉरीला अर्थ आहे.

बॅटमॅन Fri, 08/11/2013 - 18:27

In reply to by मेघना भुस्कुटे

मेघु तैंशी सहमत. दवणे, सानेगुर्जी आणि एखादे व्हिक्टोरियन नीतिकथामृत पाजणारे बुक्क वाचलेस तर उद्धार होईल हो तुझा!!

ऋषिकेश Thu, 07/11/2013 - 17:36

In reply to by मेघना भुस्कुटे

मग जाऊ दे.. नै घेत!

नुकतंच रशियन डायरी वाचलं. भिकार अनुवाद! घडणार्‍या घटना कितीही रोचक असल्या तरी पुस्तक पूर्ण करू शकलो नाही.
बरेच दिवसांनी पुस्तक अर्धवट ठेऊन देताना फार वैट वगैरे वाट्लं :(