दिवाळी टू दिवाळी लिहिण्यामागची कारणं…

'ऐसी अक्षरे'चा दिवाळी अंक छानच झाला आहे. संपादक मंडळाचे आणि सहभागी लेखकांचे अभिनंदन!

माझ्या लेखावरील प्रतिसादात मन यांनी विचारलेला प्रश्न आणि त्यासंदर्भात त्यांनीच काढलेला एक धागा याच्या अनुषंगाने काही लिहावं असं वाटलं. तसा प्रयत्न करतो आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून प्रथम लिहायला सुरूवात झाली ती 'मनोगत'वर. कविता पोस्ट करून. आपली कविता या माध्यमातून झटकन लोकांपर्यंत पोचते, त्यावर लगेच प्रतिक्रिया येतात ही भावना सुखावणारीच होती. पुढे मग 'ऐसी अक्षरे'वर थोडं लिहिलं. (इथे श्रावण मोडकांची आठवण येणं अपरिहार्य आहे, इंटरनेटवरील मराठी विश्वाबाबत ते माझे गाईडच होते. मी त्यांना मनोगताच्या आधीपासून व्यक्तिशः ओळखत असल्याने 'ऐसी अक्षरे'वर मोडक आहेत हे कळताच मीही तिथे खातं उघडलं!). याच काळात फेसबुकवरही वावर होऊ लागला. फेसबुकने अनेक नव्या लेखकांना (आणि विशेषतः कवींना) चांगलं व्यासपीठ दिलं. मी दिवाळी अंकात कविता देणे हा उपक्रम २००९ साली सुरू केला. पहिल्यांदा 'मौज'मध्ये कविता आली तेव्हा भारी वाटलं होतं. त्यानंतर मौजेत नियमितपणे कविता दिल्या. पण फेसबुकवर कविता वाचून जितका प्रतिसाद मिळाला तितका मौजमधून आला नाही. म्हणजे दिवाळी अंकातल्या कवितांची नोंद घेतली जात असणारच, फक्त लगेच कवीला कळवलं जात नाही. (याचं एक कारण म्हणजे मौजसारख्या अंकातून लेखक-कवींचे पत्ते-फोन नंबर दिले जात नाहीत. काही अंकातून दिले जातात. अर्थात ते प्रत्येक अंकाचं 'पॉलिसी मॅटर' आहे.) मजा अशी होती की फेसबुकची रीच मोठी असल्याने जवळच्या मित्रांनाही 'च्यायला हा कविता करतो?' असा साक्षात्कार झाला. (हे मित्र मौजेपासून दूर होते!) फेसबुकमुळे प्रत्येकाला स्वतःची अशी ओळख करून द्यायची सहज संधी मिळाली. (यातलं 'सहज' महत्त्वाचं आहे.)

सुरूवातीला अशा ओळखीमुळे आनंद मिळालाच. पण मग पुढे असं झालं की इंटरनेट आपल्यावर अधिराज गाजवू लागलं आहे की काय असं वाटू लागलं. म्हणजे मी इतर कुणाहीइतकंच गूगल वापरतो, पण अधिराज्य म्हणून मला जे म्हणायचं आहे ते लेखकीय दृष्टीकोनातून. फेसबुकवर विविध ग्रुप्स दिसले. तिथे चर्चा सुरू असलेल्या दिसल्या. संकेतस्थळंसुद्धा चर्चेनं गजबजू लागली. यात फारसा भाग न घ्यायचं एक कारण म्हणजे त्यात द्यावा लागणारा वेळ. दुसरं म्हणजे मला स्वतःला बोलायला अधिक आवडतं. मित्राला प्रत्यक्ष भेटण्यातला आनंद माझ्या दृष्टीने कधीही मोठा असतो. मित्राला पाहिलं की होणारा आनंद कॉलेजच्या दिवसांपासून आजतागायत कायम आहे. प्रत्यक्ष बोलताना खूप काही चटकन सांगता येतं. पुस्तकं हाताशी असतात. त्यातला संदर्भ दाखवता येतो. चित्र/स्केच काढून एखादा मुद्दा मांडला येतो. शिवाय माणसाला समोर बघत बोलणं यात जिवंतपणा आहे. शब्द, हावभाव, डोळे - सगळ्यातून एक चित्र उभं राहतं. त्यामुळे कट्ट्यावर बसून मित्राला टाळी देणं हे फार थोर आहे. ते रिप्लेस करता येत नाही. (हे सगळं मी माझ्याबद्दल सांगतोय अर्थात. असं प्रत्येकाचं असेलच असं नाही.) इंटरनेटवर हे शक्य होत नव्हतं. खूप लिहिलं जातंय, खूप बोललं जातंय - पण कुणीच दिसत नाही याचा काहीसा कंटाळा येऊ लागला. इंटरनेटमुळे अनेक नवीन लेखक-कवी माहीत झाले ही अर्थातच जमेची बाजू. पण या माध्यमाच्या काही अंगभूत गुणधर्मांमुळे आपण इथे कितपत जोडले जाऊ असा प्रश्न पडला. एखादं मासिक घरी येतं तेव्हा मी ते उत्सुकतेनं हातात घेतो, कुणी काय लिहलं आहे ते पाहतो. पण हे महिन्यातून एकदा होतं. इंटरनेट चोवीस तास सुरू असतं. टी.व्ही. असह्य झाल्याने जानेवारी २०१३ पासून आम्ही तो बंद केला. इंटरनेट असह्य अजिबात झालं नव्हतं (आणि अजून झालेलं नाहीही), पण 'अब तक छप्पन' मधला डायलॉग उसना घ्यायचा झाला तर 'इंटरनेट तो जरूरी है, लेकिन उसकी आदत से बचना ज्यादा जरूरी है!' असं काहीसं झालं. खूप चर्चा, मत-मतांतरे, दृष्टीकोन…एकूणात चांगलीच गर्दी जमली होती. त्यामुळे लक्ष्मी रोडला संध्याकाळी ६ वाजता मी जसा जाऊच शकत नाही तसं झालं! (फेसबुकबाबत अवधूत डोंगरेने अनुभव २०१२ च्या दिवाळी अंकात चांगला लेख लिहिला आहे, वाचण्यासारखा आहे.)

गर्दीहून महत्त्वाचा भाग लिहिण्याबद्दलचा आहे. सतीश काळसेकरांशी बोलताना एकदा ते म्हणाले होते की इंटरनेटवर चांगलं लेखन होत असेलच. पण मी स्वतः नेट वापरत नाही आणि दुसरं म्हणजे ते तुकड्या तुकड्यातलं लेखन आहे असं वाटतं. म्हणजे नेटवरच्या पन्नास तुकड्यातून एक 'लेखक' मी कसा शोधायचा? माझंही असं झालं होतं. फेसबुकपेक्षा ब्लॉग्ज, ऐसी अक्षरेसारखी संकेतस्थळं इथे अधिक सविस्तर, दीर्घ लेखन होतं. ते सकसही असतं. 'उपक्रम'सारख्या उपक्रमामुळे विज्ञानविषयक लेखन लोकांपर्यंत पोचलं. त्यामुळे त्याचं महत्त्व आहेच. पण तरीही एक पूर्ण लेखक तयार होणं, तो वाचायला मिळणं हे होत नव्हतं. कदाचित अधिक दीर्घ लेखन (कथा, कादंबरी इ. स्वरूपात) नियमित केलं जाऊन पुढे ते होईलही.

नेटवरच्या वावरात आपणहून मैत्री करणं, गप्पा मारणं हे माझ्याकडून फारसं झालं नाही. याचं कारण पुन्हा 'माणूस न दिसणं' आणि 'लिहून गप्पा मारायचा कंटाळा असणं' हेच आहे. 'लिहून' बोलण्यात पुष्कळ वेळ द्यावा लागतो. शिवाय समोरचा काय म्हणतो आहे या उत्सुकतेने सतत अपडेट बघत राहणं यातही वेळ जातो. फेसबुकवर मेसेजला उत्तरच न येणं, कमेंटमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरच न येणं असेही अनुभव आल्याने गोची झाली. आलेल्या प्रत्येक मेल, मेसेजला एका ओळीची का होईना पण पोच गेली पाहिजे ही माझी सवय होती (आणि आहे). त्यामुळे 'इंटरनेट वर्तना'चा कधीकधी त्रास होऊ लागला. या सगळ्यातून माझा फेसबुकचा वापर मर्यादित झाला. माणूस कधीच समोर नसणं, त्याचा आवाजही ऐकू न येणं हे निरूत्साही करणारं वाटू लागलं. माझ्या भिडस्तपणामुळे मीही आपणहून कधी कुणाचा फोन नंबर मागितला नाही हेही खरं आहे. मुख्य म्हणजे आपण फेसबुकवर जास्त वेळ घालवतो आहोत असं वाटू लागलं. त्यामुळे मग मी जिथे काम करतो त्या मिळून साऱ्याजणी, आंदोलन या मासिकांसंदर्भातील बातम्या, लेख शेअर करणे, अगदीच क्वचित एखाद्या चर्चेत मत नोंदवणे, अधूनमधून कविता पोस्ट करणे, इतपतच वापर होऊ लागला. 'लाईक' ही मात्र चांगली सोय. जास्त न बोलता आपला पाठिंबा दर्शवता येतो!

इंटरनेटची व्याप्ती, संकेतस्थळांची गुणवत्ता सगळं पाहता इथे वरचेवर लेखन करायला खरं तर काही हरकत नाही. चर्चेचा कंटाळा असेल तर त्यात भाग न घेणं हा पर्याय उपलब्ध असतोच. तरीही माझा कल प्रिंट मीडियात लिहिण्याकडे जास्त आहे. असं का याचा शोध घेताना जी कारणं सापडली ती नोंदवतो -

'संपादक' या भूमिकेबद्दलची माझी (काहीशी घट्ट) धारणा - संकेतस्थळाचे संपादक कोण हे कळू शकत नाही. दिवाळी अंक सोडता इतर वेळी प्रकाशित होणाऱ्या लेखांचं संपादन असं होत नाही. त्यामुळे मी लिहिलेला लेख खरंच कसदार आहे की नाही याबाबत मला संपादकीय अभिप्राय मिळत नाही. तो थेट प्रकाशितच होतो. संकेतस्थळाच्या ध्येयधोरणाशी विसंगत असं काही आढळलं तर मॉडरेटर तो लेख काढून घेतो किंवा त्यात बदल करतो. संकेतस्थळावरच्या एकूण लेखनाला ठरीव आकार असा नसतो. म्हणजे एखाद्या मासिकाचा अंक निघतो तसा इथे 'एक अंक' नसतो. सगळं लेखन एकामागे एक येत असतं. हे खरं तर या माध्यमाचं वेगळेपण म्हणून उठून दिसणारं असलं तरी 'संपादकीय काम' होण्याबाबत मी थोडा आग्रही असतो. मुद्रित माध्यमात ते होतं. (आता तिथे इतर वेगळ्या गमती आहेत हा भाग सोडा!) याबाबत बोलताना बिपीन कार्यकर्ते म्हणाले की जर एखाद्याला संपादकीय तपासणी करून हवी असेल तर मॉडरेटरकडे लेख पाठवून तसं करता येऊ शकतं. ही स्वागतार्ह गोष्ट आहे. ऑनलाईन माध्यमाबाबतचा एक गैरसमज दूर करणारी आहे. (फक्त संस्थळावर तशी सूचना कुठे दिसत नाही.)

अनुभव, मुक्त शब्द, अंतर्नाद, परिवर्तनाचा वाटसरू आणि इतर मासिकांचं स्वरूप आपल्याला माहीत असतं. त्यांची संपादकीय भूमिका परिचयाची असते. आणि संपादकाने लेख स्वीकृत केला म्हणजे तो चांगला असल्याची पावती असते. संकेतस्थळ या माध्यमाचं स्वरूप वेगळं आहे, हे नव्याने सुरू झालेलं माध्यम आहे हे खरं, कदाचित काही वर्षांनी तिथेही संपादकीय निर्बंध येतील, पण सध्या तरी संपादनाअभावी काहीसं बिचकल्यासारखं होतं. काही वर्षं सुरू असलेली मासिकं आणि नव्याने सुरू झालेली संकेतस्थळं अशी तुलना करणं योग्य नाही खरं तर, पण माझ्यासारख्या होतकरू लेखकाला नावाजलेल्या मासिकाच्या संपादकाच्या टिप्पणीचं महत्त्व वाटतं हे खरं आहे. म्हणजे मी विनोदाने 'मुक्त शब्द'बद्दल माझ्याच लेखात काही लिहिलं असलं तरी हरिश्चंद्र थोरातांना माझा एखादा लेख आवडणं हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे.

स्वरूप - मासिक आणि संकेतस्थळ यांच्या स्वरूपात - 'दिसण्यात' आणि 'असण्यात'ही फरक आहे. ज्याला 'यूझर एक्सपिरिअन्स' म्हणतात त्यात फरक आहे. प्रिंटचा संस्कार अनेक वर्षांचा आहे. छापलेला मजकूर, विशिष्ट फाँट (मौजच्या बाबतीत हे फार लागू व्हायचं!), विशिष्ट लेआऊट (चित्रासह किंवा अंतर्नाद, आजचा सुधारक सारखा चित्राशिवायही), वाचकांची पत्रे, संपादकीय मनोगत यातून येणारा माझा 'एक्सपिरिअन्स' जुना आहे. दर महिन्याला अमुक एक मासिक 'कुठली वार्ता' आणतं आहे ही उत्सुकता, पोस्टाने अंक घरी येणं, अंक आल्या आल्या मुखपृष्ठ, अनुक्रमणिका बघणं, मुख्य म्हणजे संपादकीय मनोगत वाचणं या सगळ्यातून प्रिंटचा 'अनुभव' उभा राहिला आहे. हा 'अनुभव' मला संकेतस्थळावर येत नाही. पान उलटणे आणि स्क्रोल करणे यातच मुळात एक गुणात्मक फरक आहे. प्रिंट माध्यमातून मिळणारा अनुभव 'पर्सनलाईज्ड' झालेला आहे. मासिकाशी अशा अनुभवाने जोडलं गेल्याने त्या मासिकात आपलंही काही लेखन यावं ही ऊर्मी प्रबळ असते.

मासिक हे एक उत्पादन म्हणूनही समोर येतं. मी स्वतः 'मिळून साऱ्याजणी' या मासिकात सहसंपादक म्हणून काम करतो. त्यामुळे मासिकाच्या 'उत्पादना'तल्या दर महिन्याच्या तापांची मला कल्पना आहे. एक मासिक हातात घेतल्यावर 'यात बरंच काम झालं आहे' हे लक्षात येतं. दिवाळी अंक काढताना ऐसी अक्षरेच्या संपादकांना 'तापा'चा अनुभव आला असेलच. राजेश घासकडवींनी तसं म्हटलंही आहे. (हा दिवाळीपुरताच आहे अर्थात. दर महिन्याला नाही.) अर्थात संकेतस्थळाला अंक प्रिंट करायला लागत नाही हा काही त्यांचा दोष नव्हे. शिवाय तिथे साईटसंबंधीच्या तांत्रिक भानगडी बऱ्याच असतात. पण शेवटी सगळं 'अनुभवा'पाशी येतं हे खरं!

कोलाहल - याविषयी मागे लिहिलं आहेच. तरी थोडं अधिक मांडतो. प्रतिक्रिया, प्रतिवाद यामुळे डिस्टर्ब व्हायला होतं. मी तर चांगल्यापैकी हळव्या मनाचा आहे. (विनोद नाही करत, खरंच सांगतो आहे!) त्यामुळे इंटरनेटवरून वाद घालणं मला अजिबात जमत नाही. 'दोन द्यावेत-दोन घ्यावेत' यात मी फार कच्चा आहे. शिवाय लेखन ही मुळात अतिशय गंभीरपणे करायची गोष्ट आहे. तो आत्मशोधच असतो. सतत चर्चा, प्रतिक्रिया यात रमत गेलो तर त्यामुळे लेखन मार खाईल अशी भीती वाटते. त्यामुळे या कोलाहलापासून दूर राहावं असं वाटतं. मासिक महिन्यातून एकदा येत असल्याने ते आपोआपच तुम्हाला संयमी बनवतं. इंटरनेट आपल्याला काहीसं उतावीळ बनवतं.

रीच - इंटरनेटची रीच हा मुद्दा अनेकदा चर्चिला गेला आहे. त्याबाबतची आकडेवारीही उपलब्ध आहे. भारतात त्याची रीच अजूनही कमीच आहे हे मान्य व्हायला काहीच हरकत नसावी. महाराष्ट्रातल्या छोट्या गावात मराठी मासिकं जातात. तिथे इंटरनेटची उपलब्धता आणि वापर अजूनही कमीच आहे. इंटरनेटवर लिहिणारा, वाचणारा, चर्चा करणारा वर्ग हा प्रामुख्याने शहरी बुद्धीजीवी वर्ग आहे. त्यामुळे जेव्हा माझा 'अनुभव'मधला एक लेख वाचून नांदेडजवळच्या एका गावातील मुलीचा फोन आला तेव्हा मला बरं वाटलं होतं. (असाच एक फोन त्याच लेखाबद्दल वाईच्या एका मुलीचा आला होता. तिच्या वडिलांचं रद्दीचं दुकान होतं आणि तिने तो लेख रद्दीत घातलेल्या अंकात वाचला होता! एकूणात आजचं लेखन उद्याची रद्दी असली तरी उद्याची रद्दीही गप्प बसत नाही हे आश्वासक आहे!)

व्यक्तिगत मर्यादा - इंटरनेटवरील सगळ्या कोलाहलातही गंभीरपणे लिहिता येऊ शकतंच. असं सकस लिहिणारे अनेक लेखक ऐसी अक्षरेवर आहेतच. त्यामुळे मी संकेतस्थळावर फार लिहीत नाही यामागे वर दिलेली कारणं जशी आहेत तसंच माझा कमकुवतपणा हेही एक कारण आहेच. आणि कदाचित हेच कारण सर्वात प्रबळ असावं!

एक मात्र मी मान्यच करेन की ऐसी अक्षरे, उपक्रम सारख्या संकेतस्थळांवरून आणि फेसबुकवरसुद्धा उत्तम लेखन झालं आहे आणि होत आहे. (इतर संकेतस्थळांचा मला अनुभव नाही). सतीश वाघमारे, राजेश घासकडवी, प्रकाश घाटपांडे, (विक्षिप्त अशी ती) अदिती, अरविंद कोल्हटकर, संजोप राव, चिंतातुर जंतू, प्रभाकर नानावटी आणि इतरही अनेक दमदार लेखकांची ओळख झाली ती इथेच. अनुभवकथन, व्यक्तीचित्रण, ललितलेखन, विज्ञानविषयक लेखन आणि समीक्षात्मक लेखन प्रामुख्याने होताना दिसतं. विज्ञानविषयक लेखन तर या माध्यमाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. मला वाटतं कथा नाही लिहिल्या जात. सामाजिक-राजकीय-आर्थिक घडामोडी यावर लेखन - चर्चा पुष्कळच होते, पण अधिक मूलभूत लेखन व्हावं असं वाटतं. त्यादृष्टीने 'काफिला'सारख्या साईटशी तुलना करून बघता येईल.

ऑनलाईन मीडियाचा अनुभवही कालांतराने अधिक 'पर्सनलाईज्ड' होऊन त्याची व्याप्ती अधिक वाढेल ही शक्यता तर आहेच. काही नवीन लेखनप्रकारही इव्हॉल्व्ह होतील. या माध्यमाची ताकद बघता काहीच अशक्य नाही. (फक्त वीजनिर्मिती वगैरे चांगली होवो!)

तर इतकी बडबड करायचं कारण म्हणजे मन यांनी विचारलेला प्रश्न! तेव्हा त्यांचे आभार आणि उत्तर फारच लांबलं म्हणून माफीही!

(मी वर म्हटलं तसं प्रिंट आणि ऑनलाईन मीडियाबाबतचा हा माझा अनुभव आहे. अनुभवाला व्यक्तीच्या मर्यादा अर्थातच येतात. मला जे वाटतं ते प्रत्येकालाच वाटेल असं नाही. त्यामुळे इतरांना याबाबत काय वाटतं हे ऐकायला (वाचायला!) मला आवडेल. आणि संवाद करायचा झाला तर मला 'तू' म्हणावं ही एक आग्रहाची विनंती. 'तुम्ही' म्हटलं की आता आपलं उर्वरित वगैरे आयुष्य सुरू झालं की काय असं वाटायला लागतं….:)….)

धन्यवाद,

उत्पल

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

तुर्तास प्रांजळ मतप्रदर्शन/मुक्तचिंतन इतकेच म्हणेन.
दिलेली मते वैयक्तीक असल्याने त्याचे खंडन करण्यात / पुरवणी जोडण्यात काही हशील वाटत नाही.

पण इतके सगळे असूनही तुमचे लेखन तुम्हाला जमेल/रुचेल तितकेवेळा इथे देत जा.. आम्ही वाचायला उत्सूक आहोत इतकेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अहाहा. काय समयोचित (आणि मार्मिक आणि प्रामाणिक) मुक्तचिंतन आहे!
(माझ्या आजूबाजूला आठ-एक कागदी दिवाळी अंक, साताठ पुस्तकं, तीन बिनकागदी दिवाळी अंक पडलेत. 'हे वाचू की ते वाचू' अशा हावरेपणात काहीच धड सुधरत नाहीये. हा लेख मला आवडतो आहे, हे पहिल्या परिच्छेदापासून लक्षात येत असूनही इकडे-तिकडे न करता, तो सलग वाचून काढण्याकरता मला कष्ट पडले, यातूनच या माध्यमाचे दुष्परिणाम मला पटले!)

ब्लॉग्स, संस्थळं आणि फेसबुक याबद्दलचं निरीक्षण अगदी पटलं. या ठिकाणांची प्रकृती अगदी वेगळी आहे. त्याची बलस्थानं - मर्यादा लक्षात यायला जरा वेळ जाईल. तूर्तास इथे उपलब्ध होईल ते सगळं आपल्याला निदान ठाऊक तरी व्हावं याची खातरजमा करण्यातच लई वेळ जातो आहे. असंच चालू राहिलं, तर अवघड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुमची मतभिन्नता मान्यच आहे. फक्त एक वेगळा परस्पेक्टिव्ह म्हणून ...

>> एखादं मासिक घरी येतं तेव्हा मी ते उत्सुकतेनं हातात घेतो, कुणी काय लिहलं आहे ते पाहतो. पण हे महिन्यातून एकदा होतं. इंटरनेट चोवीस तास सुरू असतं.<<

मुद्दा म्हणून पाहता हा वरवर ठीक वाटतो, पण टीएलएस किंवा तत्सम छापील नियतकालिकं ही साप्ताहिकं आहेत. म्हणजे ती दर आठवड्याला प्रकाशित होतात आणि त्यात वाचनीय मजकूर पुष्कळ असतो. ते वाचण्यात माझी जितकी तारांबळ उडते तितकी इंटरनेटवर होत नाही. ह्याचं कारण माझ्यापुरतं तरी उघड आहे : इंटरनेटवर सोशल मीडिआवर (म्हणजे फेसबुक, मराठी संस्थळं वगैरे) जे प्रकाशित होतं त्यातलं मला आवर्जून वाचावंसं वाटतं असं साहित्य फारच थोडं असतं. त्यामुळे ते वाचण्यात माझा फारसा वेळ जात नाही.

>> समोरचा काय म्हणतो आहे या उत्सुकतेने सतत अपडेट बघत राहणं यातही वेळ जातो. फेसबुकवर मेसेजला उत्तरच न येणं, कमेंटमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरच न येणं असेही अनुभव आल्याने गोची झाली. आलेल्या प्रत्येक मेल, मेसेजला एका ओळीची का होईना पण पोच गेली पाहिजे ही माझी सवय होती (आणि आहे). त्यामुळे 'इंटरनेट वर्तना'चा कधीकधी त्रास होऊ लागला. या सगळ्यातून माझा फेसबुकचा वापर मर्यादित झाला.<<

ह्याकडे कुणी कसं पाहावं ते बऱ्यापैकी व्यक्तिसापेक्ष आहे, पण माझा अनुभव असा आहे की प्रत्यक्ष आयुष्यातही असं वागणारे लोक असतातच. आणि आपण त्यांना टाळतो किंवा आपल्यात जवळीक निर्माण होत नाही. ह्याउलट इंटरनेटवर ज्यांचं वर्तन असं त्रासदायक नाही असे लोकही असतातच. श्रावण मोडक हे तुमच्यामाझ्या परिचयाचं उदाहरण. त्यामुळे 'कुठेही जा, लोक सारखेच असतात' ह्याचा प्रत्यय मला इंटरनेटवरही येतो असं म्हणेन.

>> 'संपादक' या भूमिकेबद्दलची (काहीशी घट्ट) धारणा <<

चांगला संपादक मिळणं ही प्रिंट मीडिआमध्येसुद्धा भाग्याचीच गोष्ट आहे. श्री. पु. भागवत आता नाहीत, आणि जेव्हा होते तेव्हा मोजक्यांनाच लाभले. ज्यांनी माझ्या लिखाणाची विधायक चिरफाड केली, आणि त्यातून मला काही शिकायला मिळालं असे मला भेटलेले लोक एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. फेसबुक किंवा मराठी संकेतस्थळांवरसुद्धा असे लोक, अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच, पण मला लाभले आहेत. मात्र, ह्या लोकशाही माध्यमाची ताकद ही, की त्यासाठी (म्हणजे त्या लोकांचा मला लाभ होण्यासाठी) त्यांना संपादक असण्याची गरजच नव्हती. माझ्या लिखाणावर त्यांनी केलेल्या जाहीर आणि खाजगी टिप्पणीतून आणि त्यातून उद्भवलेल्या संवादातून मला हा लाभ झाला.

>> हे नव्याने सुरू झालेलं माध्यम आहे हे खरं, कदाचित काही वर्षांनी तिथेही संपादकीय निर्बंध येतील <<

खरं तर, हा प्रवास उलट झाला. म्हणजे मनोगतासारख्या काही जुन्या संस्थळांवर संपादकीय निर्बंध जास्त होते. तुम्ही लिहिलेलं साहित्य तिथे लगेच प्रकाशित होत नसे. ह्याला प्रतिक्रिया म्हणून 'मिसळपाव'वर ते निर्बंध सैल झाले. ते लोकशाही प्रवृत्तीला अधिक पोषक असल्यामुळे ते आता जवळपास प्रमाण झालं आहे. जुन्या जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

संपादकीय भूमिका वगैरे - हे फॉर्मल, लिखित स्वरूपात जरी उपलब्ध नसेल, तरी ते अप्रत्यक्ष असू शकतं. म्हणजे, अवैज्ञानिक किंवा अंधश्रद्धामूलक लिखाणावर 'उपक्रमा'वर जितका टीकेचा वर्षाव होईल, तितका कदाचित इतर एखाद्या संस्थळावर होणार नाही. किंवा, आधुनिक म्हणता येतील अशा कविता 'ऐसी'वर जितक्या दिसतील, त्या मानानं इतर संस्थळांवर दिसणार नाहीत; ह्याउलट रविकिरण मंडळातच अजूनही अडकलेली मंडळी 'ऐसी'वर तितकीशी फिरकत नाहीत, वगैरे.

>> सतत चर्चा, प्रतिक्रिया यात रमत गेलो तर त्यामुळे लेखन मार खाईल अशी भीती वाटते. <<

हा मुद्दा रास्त आहे. पण संस्थळावर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचा समाचार घेतलाच पाहिजे असा काही नियम नाही. अनुल्लेखानं मारता येतंच. मनाच्या हळवेपणाविषयी मी काही बोलणार नाही, पण 'दोन दिले - दोन घेतले' असंच असायला हवं असंही नाही. किंबहुना अनेकदा इतर लोकही तुमच्या बाजूनं हिरिरीनं लढताना इथे दिसतील. अशा गोष्टीनं एखाद्याचा हुरूप वाढूही शकेल.

कथालिखाणाची कमतरता - खरं सांगायचं तर, सध्या छापील माध्यमातही सकस कथालेखनाचा दुष्काळच जाणवतो. आतापर्यंत मी २०१३चे जेवढे दिवाळी अंक चाळले, त्यात विशेष उल्लेखनीय फिक्शन मला तरी अद्याप सापडलेलं नाही. दर वर्षीचा माझा अनुभव जवळपास असाच आहे (किमान गेली १०-१५ वर्षं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

समयोचित आणि मराठी आंजाची योग्य जागा दाखवणारं लेखन, असं आत्ता म्हणावंसं वाटत आहे.

मी तंत्रज्ञानफ्रीक, कदाचित फ्रीक म्हणावं एवढी नाही, पण फॅन जरूर आहे. दर दोन-तीन वर्षांनी घर बदलणं (आत्ता, ऐन दिवाळीत तेच सुरू होतं), कधी देशच बदलणं अशा प्रकारच्या चक्रात असल्यामुळे छापील पुस्तकं, मासिकं विकत घेणं आता बंद केलं आहे. जी काय होते ती इ-खरेदी. उपलब्ध असणारं स्थानिक ग्रंथालय आणि इ-साहित्य/इ-पुस्तकं यामधे खूप वेळ जातो. अशा वेळेस मराठी साहित्य/लेखन पुरेशा प्रमाणात जालावर उपलब्ध नाही अशी तक्रार करावीशी वाटते. (साधनाचा अंक अॉनलाईन आहे, साहित्यसंस्कृतीवर काही कथा उपलब्ध आहेत.)

थोडा टाईमपास म्हणून माझ्यासाठी सुरू झालेली, मराठी आंजा ही गोष्ट गंभीरपणे घेण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न (मेघनाने दिवाळी अंकाच्या संपादकीयवर केलेली टीका आणि) उत्पलमुळे आली आहे.

संस्थळावर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचा समाचार घेतलाच पाहिजे असा काही नियम नाही. अनुल्लेखानं मारता येतंच.

ही गोष्ट प्रत्यक्षात करता येते, त्यापेक्षाही अधिक सहजतेने जालावर करता येते.
प्रत्येक वेळेस हे आदानप्रदान 'दोन दिले - दोन घेतले' अशा प्रकारेच होते असं नाही. उत्पल-चिंतातुर जंतू अशी जी देवघेव वर झालेली दिसत आहे, तशीही ती असते. असहमतीवर सहमत होऊ शकणारे लोक जालीय संवादासाठी निवडले की हळवेपणाही आड येऊ नये. कोणीतरी शांतपणे या लेखनाची दखल घेतली आहे आणि पुढच्या दिवाळी अंकाचं काम सुरू झालं की याची आठवण करून देतील असंही होईल.

अशा प्रकारची मतभिन्नता दिसत रहावी म्हणूनही उत्पल ऐसी अक्षरेवर दिसत रहावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय म्हणायचय ते समजतय. काही कारणानं तुमच्या भूमिकेत बदल झाला, जालवावर आवडीचा होउन तुम्ही लिहू लागलात तर आनंद होइल.
तोवर जालावर इतरत्र जाउन तुमचं आणि तुमच्यासारख्यांचं लिखाण धुंडाळत बसणं हाच एक पर्याय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अदिती सोडता कुणीही तुम्हीचा तू केलेला नाही ही तक्रार प्रथम नोंदवतो.

@ ऋषिकेश : हो…जरूर. प्रयत्न करेन. धन्यवाद…

@ मेघना : धन्यवाद… 'इथे उपलब्ध होईल ते सगळं आपल्याला निदान ठाऊक तरी व्हावं याची खातरजमा करण्यातच लई वेळ जातो आहे' - हे पटलं….

@ चिंतातुर जंतू : साप्ताहिकाबद्द्ल तुम्ही म्हणताय ते एकदम मान्य! (मी ईपीडब्ल्यू काही महिन्यांपूर्वी सुरू केलं. ते माझ्या औकातीच्या बाहेरचं आहे हे माहीत असूनही. आता दर आठवड्याला अंक येऊन पडल्याचं पाहिलं की मला भीतीच वाटते. मागचा अंक नुसता चाळून होईपर्यंत पुढचा येतो! त्यादृष्टीने इंटरनेट परवडलं असंच म्हणावं लागेल. पण मी स्पेसिफिकली मासिक याच प्रकाराबद्दल बोलतो आहे. अगदी पाक्षिकसुद्धा नाही. दिलेलं नीट वाचून, जिरवून, त्यावर माझं काही म्हणणं तयार होणं यासाठी मला तीस दिवस हा कालावधी योग्य वाटतो. शेवटी जगात ज्ञान इतकं प्रचंड आहे की समजून घेण्याला अंतच नाहीये खरं तर…

'कुठेही जा, लोक सारखेच असतात' हे मान्यच.

संपादकांबद्दल तुम्ही म्हणताय त्यावर मी विचार करतोय. 'संपादक असण्याची गरज नव्हती… लिखाणावरील टिप्पणीतून आणि संवादातून लाभ झाला' हा मुद्दा मह्त्त्वाचा आहे. संपादक हा आवश्यकच आहे असं मला अजूनही वाटतंय, पण एकूण मला तुमचाही मुद्दा रोचक वाटतोय. इंटरनेटला व्यासपीठ म्हणून मोठ्या प्रमाणात लोकांकडून उचलून धरलं जाणं हे घडण्यामागे तिथे संपादक नव्हते हे आहेच. माध्यमाचं स्वरूप, तिथल्या साहित्याची गुणवत्ता आणि संपादकाची आवश्यकता या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करता येऊ शकेल असं वाटतंय….

'संपादकीय भूमिका वगैरे - हे फॉर्मल, लिखित स्वरूपात जरी उपलब्ध नसेल, तरी ते अप्रत्यक्ष असू शकतं.' - हाही मुद्दा रोचक…

अखेरीस सगळंच व्यक्तीसापेक्ष आहे. त्यामुळे शेवटी प्रत्येकाची विशिष्ट माध्यमाशी 'सूटेबिलिटी' हाच मुद्दा आहे फक्त…

@ अदिती : हो. साहित्यसंस्कृतीवर कथा आहेत. 'कथालेखन फारसं होत नाही' असं मला म्हणायचं होतं. तसं स्पष्ट न म्हटल्याने जरा गडबड झाली.

तुझ्यासारख्या हिंडत्या-फिरत्या लोकांना इंटरनेट हा मोठाच आधार वाटणार यात शंकाच नाही.

तंत्रज्ञान फॅन मीही आहेच. पण मी डिप्लोमा इंजिनियर कसा झालो हा विषय पुलंच्या भाषेत सांगायचं तर नास्तिकाला आस्तिक करणारा आहे. पुढे काही वर्षं इंजिनियरिंग उत्पादनं विकण्यात घालवली. पण इंजिनियर म्हणून माझ्याहून चुकीचा माणूस सापडणं अशक्य! माझं एकूणच तंत्रज्ञानावर (खरं तर विज्ञानावर) प्रचंड प्रेम आहे. पण हे प्रेम म्हणजे कुंग फू पांडा मधला पो कुंग-फू वर करतो तसं प्रेम आहे. एका बॉयलर कंपनीत सेल्स इंजिनियर म्हणून काम करताना आमच्या डिझाईन डिपार्टमेंटमधले लोक मला अवतारी स्त्री-पुरूष वाटायचे. आणि मी फक्त सेल्सकरता बडबड करणारा लेसर मॉर्टल! मला उपक्रम किंवा ऐसी अक्षरेबद्दल जिव्हाळा वाटण्यामागे विज्ञानविषयक लेखन हे फार महत्त्वाचं कारण आहे.

सांगायचा मुद्दा असा की गूगलशी ओळख वाढताना, विकीपीडीया वापरताना - एकूणच इंटरनेटच्या महाकाय रूपाला सामोरं जाताना आदराने भारून जायचे अनेक प्रसंग आले. फक्त माझं आतूनचं जोडलेपण लेखनाशी, सामाजिक प्रश्नांशी असल्याने 'तंत्रज्ञानाचा मारा'सुद्धा मी सहजतेने रिचवू शकत नाही. मला वाटतं की तंत्रज्ञान चांगल्या मित्रासारखं असावं. त्याने 'फ्रेंडीन्नीड' तर असावंच, पण 'आता याला एकटं सोडूया' असा सूज्ञपणाही त्याने दाखवावा! (अर्थात पुन्हा आपण स्वतःपाशीच येतो. वापरकर्ता 'मी' असल्यामुळे वापर किती करायचा हेही मीच ठरवायचं असतं.)

'असहमतीवर सहमत होऊ शकणारे लोक जालीय संवादासाठी निवडले की हळवेपणाही आड येऊ नये.' हे मान्यच!

@ मन : धन्यवाद! जालावर लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिंतन आवडल. या निमित्त आंतरजाल व प्रिंट मिडिया या दोन्ही माध्यमात लीलया वावर करणार्‍या श्रावण मोडकांची आठवण तीव्रतेने झाली. दोन्ही माध्यमांच्या मर्यादा व बलस्थाने ओळखून त्याचा सक्षम वापर त्यांनी केला.जालीय चक्रव्युहात अडकण्याचा धोका तर आहेच.पण तो इतरही ठिकाणी आहेच. मला तर कधी कधी जालीय लेखनात मनोविकारांची छटा दिसते. मी ही त्यात आलोच. प्रत्येक आयडी मागे माणुसच आहे ना शेवटी. असो.....उत्पल तुम आगे बढो हम तुम्हारे साथ (पीछे) है| Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

चिंतन आवडलं.

संपादक आणि संपादन याविषयावर काही -

संकेतस्थळाचे संपादक कोण हे कळू शकत नाही. दिवाळी अंक सोडता इतर वेळी प्रकाशित होणाऱ्या लेखांचं संपादन असं होत नाही. त्यामुळे मी लिहिलेला लेख खरंच कसदार आहे की नाही याबाबत मला संपादकीय अभिप्राय मिळत नाही. तो थेट प्रकाशितच होतो.

सर्वप्रथम - ऐसीवर संपादक कोण आहेत हे जगजाहीर आहे. सध्या सक्रिय असलेले संपादक - राजेश घासकडवी, ३_१४_विक्षिप्त अदिती, मुक्तमुनीत, चिंतातुर जंतू, ऋषिकेश. दिवाळी अंकासाठी जयदीप चिपलकट्टी, अमुक व मेघना भुस्कुटे यांनीही जबाबदारी उचलली.

वर संपादक हा शब्द वापरला आहे, पण जालीय संदर्भात त्या शब्दाच्या अर्थच्छटा बदलतात. छापील माध्यमात लेखन-संपादन-सुधारणा-अनुमती-प्रकाशन-वाचकांच्या प्रतिक्रिया ही साखळी सुनिश्चित आहे. यात एक आधी एक नंतर असं होत नाही. भूमिकाही ठरलेल्या रहातात. जालीय माध्यम वेगळं आहे, त्यामुळे ही साखळी आणि या भूमिका बदललेल्या आहेत. जालावर लेखन-प्रकाशन-जरूर पडल्यास संपादन (हे लेखकही करू शकतो)-प्रतिक्रिया-चर्चा-फीडबॅक-सुधारणा-पुनर्प्रकाशन अशी अधिक लवचिक साखळी आहेे.

संपादकांच्या जबाबदाऱ्यांचंही विकेंद्रीकरण झालेलं आहे. म्हणजे चार संपादक ज्या प्रकारचा फीडबॅक देऊ शकतात त्यापेक्षा कितीतरी अधिक समृद्ध फीडबॅक ऐसीवरची विविध क्षेत्रात पारंगत असलेली, वेगवेगळे दृष्टिकोन बाळगून असणारी मंडळी देऊ शकतात. वैचारिक लेखनाबाबत हे अधिक प्रभावीपणे दिसतं. अनेक चर्चाप्रस्ताव म्हणून चांगले असतातच - पण तो मूळ प्रस्ताव आणि त्यावर झालेली चर्चा यातून जे सम्यक चित्र वाचकाच्या डोळ्यापुढे ते कितीतरी पटीने प्रभावी असतं, ज्ञान समृद्ध करणारं असतं.

लेखन म्हणजे काय, याची व्याख्याही बदललेली आहे. मूळ लेखन + वाचकांचे प्रतिसाद यातून एक नवीन 'लेख' बनतो. वाचकांचे प्रतिसाद विस्कळित असल्यामुळे या नवीन प्रकाराला योग्य तो आकारबंध नसतो हे खरं आहे. पण कोणी लेखकाने म्हटलं की हे सगळे मुद्दे एकत्र करून माझा लेख सुधारावा - तर हे स्वातंत्र्य आज आहेच. 'खाली झालेली चर्चा, तीत आलेले मुद्दे समाविष्ट करून हा सुधारित मसुदा प्रसिद्ध करतो आहे. मूळ लेख संदर्भासाठी त्याखालीच ठेवलेला आहे' असं लेखकाला म्हणता येतं. हे करण्याची पद्धत नाही इतकंच.

फीडबॅकविषयी - ऐसीवर सर्व लेखांना तारका देण्याची सोय केलेली आहे. तारका देण्याचे अधिकार किमान दोनशे लोकांकडे आहेत. पुन्हा, चार संपादकांना तो लेख आवडतो की नाही यापेक्षा अधिक व्यापक सुजाण वाचकवर्गाला त्याविषयी काय वाटतं हे त्यातून दिसून येतं. ही पद्धत फूलप्रूफ नाही. तरीही मला खात्री वाटते की चारपेक्षा अधिक तारका मिळालेलं सर्वसाधारण लेखन हे तीन तारका मिळालेल्या लेखनापेक्षा सर्वसाधारणपणे अधिक वाचनीय, अधिक चांगल्या दर्जाचं दिसून येईल. (काही अपवाद अर्थातच असणार, ते वगळून) ही फीडबॅक पद्धती लेखकाला वापरता येते. तसंच वाचकालाही चांगलं लेखन निवडण्याची सोय देते. छापील माध्यमातलं लेखन अधिक वाचकांपर्यंत पोचतं खरं, पण किती लेखकांना असा स्टॅंडर्डाइज्ड आणि हमखास प्रतिसाद मिळतो?

थोडक्यात छापील माध्यम आणि आंतरजाल यात फरक आहेतच. बऱ्याच फरकांकडे आपण 'माझा कंफर्ट झोन काय आहे, मला कसली सवय आहे' या दृष्टिकोनातून पाहतो. अर्थातच एकाची तुलना दुसऱ्याशी होताना पहिल्याचे मानदंड वापरले जाणं स्वाभाविक आहे. मात्र आंतरजालीय माध्यम पुरेसं वेगळं असल्याने या मानदंडांच्या व्य़ाख्या थोड्या बदलाव्या लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ प्रकाश घाटपांडे : धन्यवाद...:)..हो, श्रावणचा दोन्हीकडचा सहज संचार भारीच होता…

@ राजेश घासकडवी : हो. ऐसी अक्षरेचे संपादक माहीत आहेत. मला इतर संकेतस्थळांबाबत म्हणायचं होतं. तसं स्पष्ट न म्हटल्याने गडबड झाली. मला असंही एक वाटतं की संपादकांची फक्त नावंच न देता प्रत्येक संपादकाची थोडक्यात ओळख करून देणंही चांगलं होईल. म्हणजे त्या त्या संपादकाचं कार्यक्षेत्र, अभ्यासविषय, आस्थाविषय इ.

संपादक, लेखक, वाचक यांच्या एकत्रित योगदानाबद्दलचा तुमचा मुद्दा पटला. या माध्यमाचं हे मोठं बलस्थान आहे हे खरं. तारकांबाबत मला नीटसं माहीत नव्हतं. सविस्तर वाचतो.

'आंतरजालीय माध्यम पुरेसं वेगळं असल्याने या मानदंडांच्या व्य़ाख्या थोड्या बदलाव्या लागतात.' - हे पटलं. वेगळ्या पद्धतीने हाताळणी करत या माध्यमातून लेखक-वाचकांना एक नवीन वैचारिक व्यासपीठ मिळेल याची खात्री आहे. तशी सुरूवात झालेली आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि घासकडवींचा प्रतिसाद दोन्ही आवडले. मला वाटतं की जालावर, म्हणजे ऐसी, मिपा, मनोगत सारख्या सायटींवर, संपादक हा शब्द editor या अर्थी न वापरता moderator या अर्थानी वापरला जातो.
म्हणून जालावर

'संपादकाचं कार्यक्षेत्र, अभ्यासविषय, आस्थाविषय इ. '

या गोष्टी काहीशा गौण ठरत असाव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !