जॉनी मॅड डॉग

जॉनी मॅड डॉग

आफ्रिकेतल्या एका देशात यादवी छेडली गेली आहे. एका गावावर हल्ला होतो आहे. हल्ला करणारे सैनिक हे अगदी १२ ते १५ वर्षांचे दिसताहेत. त्यांचा एक कमांडर मोठा दिसतो आहे. प्रत्येक घरातले सगळे लोक शिव्या घालून बंदुकीच्या जोरावर तुडवून बाहेर काढले जातात. गावाच्या चौकात एकत्र केले जातात. काही लोक दयेची याचना करत असतात. जे जास्त बोलतात ते लक्ष वेधून घेतात. एका क्षणात निवाडा होतो - गोळ्या अगदी सहजतेने चालतात. अशी चौकशी आणि निवाडा चाललेला असतानाच एका लहान दहा वर्षाच्या मुलाला पुढे आणले जाते. त्याचा बाप म्हणतो त्याला सोडा यात मुले कशाला? सैनिकातला एक जण विचारतो तुझा कोण तो? उत्तर येते 'मुलगा'. त्याची आई पण रडत प्राणांची याचना करू लागते. सैनिक आता चेकाळलेले असतात. त्या मुलाच्याच हातात एक बंदुक देण्यात येते. बापानी मुलाच्या दयेची भीक मागितली म्हणून मुलानेच बापाला गोळ्या घालायच्या असा आदेश निघतो.

मुलगा ते करू शकत नाही. कुणीतरी त्याचे ट्रिगरवरचे बोट दाबते. एक क्षण ती ए के ४७ थडथडते. एका स्त्रीच्या रडण्याचा करूण आवाज आणि जल्लोष असे दोन्ही ऐकू येऊ लागते. मुलाला आपण काय केले हे लक्ष्यात येण्याच्या आत सैनिकांत सामील करून घेतले जाते.

या बंडखोर टोळक्याचा म्होरक्या असतो एक जेमतेम चौदा पंधरा वर्षांचा थंड डोळ्यांचा मुलगा - जॉनी मॅड डॉग. कोणतेही शालेय शिक्षण नसलेला पण स्वतःला हुषार मानणारा.

बंडखोर बाल सैनिकांची ही तुकडी पुढे निघते. आता प्रमुख शहरावर बंडखोर चालून जायला निघतात. आधीच्या लुटीतून एकाने नवरीचा पांढरा पोषाख लुटलेला असतो त्याने आता तो परिधान केलेला असतो. एका सैनिकाने एका लहान मुलीचा फ्रॉक घातलाय. कुणी कान टोपी घातलीय. एकाने तर परीचे पंख घातले आहेत. जॉनीच्या कानात कुड्या, गळ्यात क्रॉस आणि विवीध माळा आहेत. आहेत. एकाने एक हेल्मेट घातले आहे. या विनोदी दिसणार्‍या तुकडीच्या हातात मात्र अतिशय घातक आणि विध्वंसक अशी शस्त्रे आहेत.

याच शहरात लाओकोले ही साधारण सोळा वर्षांची मुलगी आपले वडील आणि लहान भाऊ फोफो सोबत रहात असते. लाओकोले शाळेच्या परीक्षेचा अभ्यास करत असते. बंडखोर आता शहरावर हल्ला करणार आहेत हे ती रेडियोच्या बातम्यांमध्ये ऐकत असते. राष्ट्राध्यक्षांनी युनायटेड नेशन्सची मदत मागितल्याचे ही ऐकू येते.एका ठिकाणी या गटाची गाठ अजून एका सशस्त्र तुकडीशी गाठ पडते. प्रश्नांच्या फैरी झडतात. मोठ्याने ओरडून उत्तरे दिली जातात. ओळख पटते. हे ही आपलेच! ताकद वाढते, तसा उन्मादही वाढतो. निसर्गरम्य जंगलातून चालत ही तुकडी एका ठिकाणी पोहोचते. आता शहरात जायचे आणि टिव्ही स्टेशन ताब्यात घ्यायचे आहे असा आदेश निघतो जॉनी ज्याला जनरल संबोधतो तो हा आदेश देतो.

रात्रीचे सेलेब्रेशन आणि झोप घेऊन तुकडी ताजीतवानी होते. आता मुख्य शहरावर हल्ला! एक जोरदार स्फोट घडवून शहरावर हल्ला होतो. अडवायला कुणी नसतेच. तरीही अंदाधुंद गोळ्या चालवत आक्रमण होते. जे काही विरोधी सैनिक असतात त्यांची प्रेते रस्त्यावर पडलेली दिसतात. एका लहान बाल सैनिकाला हे सहन होत नाही. तो हातात बंदूक घेऊन उलट पळत सुटतो. तुकडीच्या मागे जनरल असतो. त्याचे काहीही म्हणणे ऐकून न घेता तो म्हणतो 'मर' आणि गोळ्या घालतो. त्याची बंदूक जीवनापेक्षा जास्त मूल्यवान - ती उचलून घेतो!

गोळ्या आणि स्फोटाचे आवाज ऐकू येतात तशी लाओकोले अस्वस्थ होते. तिच्या वडिलांना सांगते तिला परिस्थिती योग्य वाटत नाही. तिच्या वडिलांनी आपले दोन्ही पाय या आधीच्या नुकत्याच झालेल्या सशस्त्र लढ्यात गमावलेले असतात. किडुकमिडूक घेऊन लाओकोले वडिलांना सांगते की चला आपल्याला शहर सोडले पाहिजे. आपला लहान भाऊ फोफो त्याला झोपेतून उठवून तयार करते. वडिलांना चला म्हणते. दोन्ही पाय नसलेले वडील परिस्थिती लक्षात घेऊन म्हणतात की. तू जा! मी येणार नाही. लाओकोले त्याला तयार होत नाही. पण वडील लाओकोले ला बाहेर घालवून दार लावून घेतात.

निर्वासितांच्या लोंढ्यात लाओकोले आणि तिचा भाऊ सामील होतात. या शहरात कुठे जायचे याची काहीच दिशा नाही.इकडे या अतिरेकी पिशाच्चांसारख्या फिरणार्‍या सैनिकांच्या तुकडीला एक गाडी दिसते. गाडीत एक साधे मध्यमवयीन जोडपे असते. ते हात वर करतात. पण काहीही चौकशी न करता गाडीतल्या लोकांना गोळ्या घालून ती प्रेते फेकून देतात.

आता गाडी मिळाल्यावर वेग वाढतो. घोषणा देत गाडी शहराच्या निर्जन रस्त्यावरून फिरू लागते. अचानक एक माणूस डुक्कर घेऊन जाताना दिसतो. त्याला लुटेरा ठरवून त्याचे डुक्कर लुटून घेतले जाते.

लाओकोले लोंढ्यात चालते आहे. एक मोठा स्फोट होतो. आक्रमणाचा आवाज येतो. लोंढा फुटतो. जो तो जीव वाचवायला धावू लागतो. लाओकोले आता लोंढा सोडून फोफो सोबत शहरातल्या निर्जन झालेल्या रस्त्यावरून चालते आहे. पलीकडून या तुकडीची गाडी येते. दुरून कुठून तरी एक गोळी सुटते. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून गाडी थांबते. अंदाधुंद गोळ्या चालायला लागतात. यामुळे थबकलेली लाओकोले एका इमारतीत आश्रय घेते. एका मुलाला तेथे बंदूक सापडते. बंदूक जमा केली जाते.

एक टोपली घेतलेला मुलगा पकडून आणला जातो. काय विकतो अशी चौकशी केल्यावर तो मुलगा सफरचंद असे म्हणतो. टोपलीत संत्री निघतात. त्याला खोटारडा घोषित केले जाते. त्याचे हात त्याच्याच शर्टाने मागे बांधले जातात. या सगळ्यांपासून तो लहान मुलगा पळायला लागतो. त्याबरोबर जॉनीची बंदूक त्या मुलाचा वेध घेते. नकळतपणे लाओकोले या घटनेची मूक साक्षीदार बनते. टोळी विजयाचा घोष सुरू करते. जॉनीला मात्र पुढे जाऊन अजून येथे कुणी आहे का हे पाहायचे असते. तो चालत चालत नेमका लाओकोले जेथे लपलेली असते तेथपर्यंत येतो. जॉनीला समोर पाहून लाओकोले जिन्यावरच थबकते. आता आपल्यावर गोळ्या चालणार आणि भावाला दिसू नये म्हणून त्याचे डोळे हाताने झाकून घेते. जॉनी चे डोळे तिच्याकडे पाहत राहतात. काही क्षण तसेच जातात. इतर सैनिक जॉनीला हाका मारू लागतात म्हणून जॉनी गाडीकडे परततो.

सुरक्षेसाठी लाओकोले आता त्या इमारतीतच चांगली जागा शोधायचा प्रयत्न करते. त्या निर्जन इमारतीतल्या एका पिंपात ती फोफो ला लपून बसायला सांगते. पळत पळत लाओकोले वडिलांकडे परत येते. त्यांना कुणीतरी गोळी घातलेली असते. तिला पाहून मग त्यांची शुद्ध हरपते. लाओकोले मुकपणे रडते. पण त्यांचा जीव वाचवायला त्यांना एका व्हिलबॅरो मध्ये घालून इस्पितळाकडे पळत सुटते. रस्त्यात फोफोला लपलेल्या ठिकाणी शोधायचा प्रयत्न करते पण तो तेथे नसतो! लाओकोले सैरभैर होते.पाशवी बाल सैनिकांची तुकडी पुढे निघते. एका क्षणी एक गोळी सुसाटत येते आणि एका सैनिकाचा वेध घेते. एका क्षणात धावपळ होऊन सगळे लपतात.
फक्त नवीनच सामील करून घेतलेला लहान मुलगा... त्याच्या हातूनच त्याच्या वडीलांना गोळी घातलेली असते तो!
तो शांतपणे चालत राहतो. स्वसंरक्षणासाठी त्याला चक्क एक कवायत किंवा प्रशिक्षणात वापरतात तशी लाकडी बंदुक असते.
तो शांतपणे चालत राहतो - दुसरी गोळी त्याचा वेध घेते!

जखमींना हलवले जाते. स्नायपर्सचा शोध ही टोळी खुनशीपणाने घेऊ लागते. एका इमारतीत अत्यंत क्रूरतेने गोळ्या घालून त्यांचा बंदोबस्त करतात.मेलेल्या सदस्याला एकप्रकारे श्रद्धांजली दिली जाते. जखमींना इस्पितळात घेऊन जातात. इस्पितळ युनायटेड नेशन्सच्या अखत्यारीत आहे. तेथील आंतरराष्ट्रीय सैनिक या टोळीला सांगतात की आत शस्त्रे चालणार नाहीत ते येथे ठेवा आणि आत जा. एक जण म्हणतो, ' हऊ कॅनाय लिव गन्स? गन्सार मा मदर अँ फादर, यु फकीन...'

लाओकोले आपल्या वडीलांना इस्पितळात कसेबसे आणते. उपचाराची काहीशी सोय होते. आता ती फोफोला शोधायला बाहेर पडते. टोळी आता चालत बीच वर पोहोचली आहे. जनरल कडून ठोस आदेश नाही. संपर्क धड होत नाही. मघाशी लुटलेल्या डुकरावरून जॉनी आणि डुक्कर लुटणारा यांचा वाद होतो. जॉनी म्हणतो डुक्कर मार. तो म्हणतो नाही. जॉनी डुकरावर बंदुक चालवतो. माणसांना कचाकचा मारणारा, आपले काही तास आधी मिळालेले डुक्कर मेले म्हणून दु:खी होतो!

लाओकोले इस्पितळात परत येते. मृत्युच्या तांडवात जन्माचा सोहळा होत असतो. इस्पितळात नवीन मूल जन्माला येते हे ती पाहते.

रात्र होते. डुकराची मेजवानी सागरकिनारी सुरू होते. तेथे असलेल्या मुलीला जॉनी सांगतो मला गोळ्या मारु शकत नाहीत. त्या माझ्या आजूबाजूने जातात पण मला लागत नाहीत. कारण माझ्या कडे हे मंतरलेले ताईत आहेत. ते माझे रक्षण करतात. 'बुले गो अराउं मी. दे डों ट्च मी'. मी विशेष आहे हे ठसवण्याचा त्याचा प्रयत्न. ती विचारते तू कधी पासून लढतो आहेस. तो म्हणतो अगदी लहान असल्या पासून. 'आ हॅ नो फामिली'.ती कोण वगैरे विचारण्याचा प्रश्न नसतोच. येवढ्या माहितीवर सागर किनारी संभोग रमतो.

पहाटे युएन ची अजून कुमक शहरात येते. टोळी शहराच्या इतर भागात अंदाधुंद गोळीबाराचा धुडगूस सुरू करते. गोळीबार झाल्यावर एका इमारतीत जॉनी घुसतो ते इस्पितळ असते. आत पांढर्‍या चादरींवर प्रेते. सगळे नग्न. मृत्यूचा नंगा नाच या शब्दाला जागणारे दृष्य!
एक म्हातारा तेथे एका प्रेताजवळ शांतपणे बसला आहे. जॉने आज्ञा देतो 'उठ'. म्हातारा लक्षही देते नाही. मागून टोळीचा अजून एक जण येतो आणि त्याला गोळी घालतो. तो वयस्क माणूस निर्जीव होऊन कलंडतो. उठ म्हंटल्यावर उठत नाही म्हणजे काय? बाहेर एका बाईचे लहान मूल एक बाल सैनिक हिसकायचा प्रयत्न करतोय. ती नाही म्हणतेय, रडतेय, याचना करतेय.

लाओकोले आता डोक्यावर आपली बॅग घेऊन पळत सुटलीय. एका सायकलवाल्याला तिने दोनशे डॉलरमध्ये आपल्या वडीलांना हलवण्यासठी पटवले आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना आता इस्पितळाने सोडून दिले आहे. पळताना तिच्या लक्षात येते की ते आता मरण पावलेत. त्यांना स्मशानात लाओकोले पुरते.

सायंकाळ होते. परत विजयाचा उन्माद. त्या उन्मादात जॉनीला नवीन मैत्रिण भेटते. तिची चुंबने घेत असतानाच कालची प्रेमिका तेथे येते व नव्या मुलीला रागाने थांबवायचा प्रयत्न करते. अंगावर धाउन जात रागात 'आय विल किल या' असे म्हणत ती तिला खरच गोळ्याच घालते!
हे पाहणारा दुसरा गट क्षणात तिलाही गोळ्या घालतो. दोघी धाडकन मरून पडतात!
एका क्षणात होत्याचे नव्हते होते!

आपले तिच्यावर प्रेम होते हे जॉनीच्या लक्षात येते. पण आता उशीर झालेला असतो. जॉनीला दु:ख म्हणजे काय याची चव कळते.

तो ती रात्र तिच्या प्रेताजवळ बसून घालवतो. दुसरा दिवस सकाळ जॉनी जनरल ला रिपोर्ट करतो. जनरल म्हणतो मी काही जनरल वगैरे नाही. मी आता प्रेसिडेंटचा सिक्युरिटी गार्ड आहे.
युद्ध संपले!
युद्ध संपले??
मग आता काय करायचे? जॉनी विचारतो.
त्याला काही उत्तर नसते.
पैसे? जॉनी विचारतो.
कसले पैसे? तू लुटले ना लोकांना? मग?

थोड्या उर्मट बोलाचाली नंतर तो सो कॉल्ड जनरल जॉनी ला तोंड काळे करायला सांगतो. क्षणांपूर्वी आपले असलेले लोक जॉनीला परके होतात.

लाओकोले चालत एका वस्तीत पोहोचते. काही अनाथ मुलांना एकत्र करून कुणीतरी बसलेले असते. ती विचारते माझ्या भावाला शोधतेय. त्याचे नाव फोफो. तेथे एक चार पाच वर्षांची गोड चेहेर्‍याची मुलगीही आहे. ती उठून लाओकोले कडे येते. बहुदा तिलाही मोठी बहीण असावी.
लाओकोले विचारते, 'आईबाप कुठे आहेत हीचे?'.
'मेलेत' उत्तर येते.
लाओकोले तिला उचलून घेते.
इतर काही विचारण्याचा प्रश्न नसतोच. लाओकोले तिला आंघोळ घालते. आणि तिला घेऊन चालू लागते.

तिला एका ठिकाणी जॉनी दिसतो. ती त्याला हाक मारते आणि लक्ष वेधून घेते. तेथे मदतीचा ट्रक धान्याची पोती घेउन आलाय. तो लुटायचा प्रयत्न होतो. त्यात ती परत दिसेनाशी होते. जॉनी तिचा शोध घेऊ लागतो. एका ठिकाणी ती त्याला त्या लहान मुली सोबत बसलेली दिसते. तो तिला बंदुकीच्या जोरावर बाहेर काढतो. ते तिच्या घरी पोहोचतात.

बंदुक रोखुन प्रश्नांच्या फैरी सुरू होतात. 'दिस गल यो दोता..?' तुझे मुलगी आहे का ही? व्हेज यो फामेले? तुझी फॅमिली कुठाय? आणि व्हेज यो मानी? पैसे?लाओकोले म्हणते तुला वाटते की पैसे कुठे ठेवलेत मी तुला सांगेन मॅड डॉग? तो चपापतो. तुला माझे नाव कसे माहिती म्हणतो? मॅ डोग्ज्फिनिश! मॅड डॉग मेला!

माझा लहान भाऊ कुठे आहे? लाओकोले विचारते.
कोण तुझा भाऊ?

तू एका लहान मुलाचा खून केलास संत्र्यांकरता.
जॉनी म्हणतो मी त्याला संत्र्यांसाठी नाही मारले. तो खोटे बोलला आणि पळू लागला म्हणून मारले.

ती भेदक प्रश्न विचारते, मग आता तुझी त्यांना गरज उरली नाही वाटते?
जॉनी उत्तर देत नाही. तो तिला त्याच्या गळ्यातली एक माळ देण्याचा प्रयत्न करतो. ती ते नाकारते. आता तो जवळ यायचा प्रयत्न करतो.

एका गाफिल क्षणी लाओकोले त्याची बंदूक हिसकते आणि त्याला दस्त्याने एक तडाखा देते. जॉनी कोसळतो. मग ती त्याला दस्त्याने तडाख्यावर तडाखे देते... गलितगात्र झालेला जॉनी हाताने नाही म्हणतोय. आता तो बंदुकीच्या समोर असतो.

लाओकोलेच्या हाती पुस्तक नसून बंदूक असते.
लाओकोलेचे बोट आता चापावर आहे.
पहिल्यांदाच लाओकोलेच्या डोळ्यातून अश्रू ओघळतो.

---------------------

चित्रपट संपल्यावर मी नुसताच बसून राहिलो विमनस्कपणे.
चित्रपट अंगावर आला नाही, तर धडकला!

ही २००८ ची निर्मिती आहे आणि या घटना साधारणपणे २००३ मध्ये घडल्या आहेत. गेली काही दशके चाललेली आफ्रिकेतली यादवी. त्याचे हे भेसूर चित्रण. हा चित्रपटही नाही आणि ही डॉक्युमेंटरीही नाही. त्याच्या अधेमधेच कुठेतरी आहे. यातले अनेक कलाकार खरोखरीचे बाल सैनिक होते. त्यांची शस्त्रे हाताळण्याची पद्धती हे सहजतेने सांगते.

युद्ध होत राहते. कोण जिंकते आहे, कुणाशी जिंकते आहे? कशावर विजय मिळवलाय हे ही त्यांना आणि आपल्यालाही समजत नाही. कहाणी दोन पातळ्यांवर उलगडत(?) जाते. एक जॉनीच्या आणि दुसरी लाओकोलेच्या पातळीवर. त्यांचे मार्ग एकमेकांना छेदत राहतात. दिग्दर्शन दाखवत राहते की त्यांचे मार्ग एकमेकांच्या विरुद्ध आहेत.

ही कहाणी खरंतर उलगडत नाही. गुंतत जाते. यात काही कथाही नाही. फक्त एकामागे एक घडत जाणार्‍या दोन दिवसातला घटनाक्रम. अनेक आयुष्ये संपवणारा. यातले मृत्यू शेवटचे संवाद बोलून श्वास वगैरे घेऊन येत नाहीत. एक गोळी आणि खाडकन मृत्यू. इतर काही भानगडींसाठी तेव्हढा वेळच नाही. लाओकोलेच्या वडिलांचा मृत्यूही असाच चालतीवर होतो. मृत्यूला काही किंमतच नाहीये आणि जीवालाही! किंमत एकाच गोष्टीला आहे बंदूक. ज्याच्याकडे बंदुक त्याच्याकडे सत्ता. भलेही ही ती काही क्षणांचीच का असेना!

भावभावना गोठवून टाकणारे क्रौर्य आहे, रासवट संभोग आहे. विजयाचे जल्लोष आहेत. पण कशावर कसला तरी विजय मिळवला आहे. कसला हे ही त्यांना आणि आपल्यालाही कळत नाही. एका ठिकाणी बाळाचा जन्म होतो तो प्रसंग आणि त्या नंतर येणारा एका बाल सैनिक एका आईकडून एक बाळ हिसकू पाहतो तो प्रसंग हादरवतात. काहीही झाले तरी पुढे जाऊन काय? जन्म झाला तरी त्याचे पुढे बाल सैनिकच बनणे काय? हीच मुले पुढे जर जगून वाचून मोठी झालीच तर परत तेच चक्र सुरू? फोफो चे काय झाले? तो ही असाच बाल सैनिक म्हणून कोठे तरी सामील झाला असेल का? मुलाच्याच हातून घडवलेला वडीलांचा मृत्यू. पुढे त्या मुलाचे हातातली लाकडी बंदुक घेऊन मृत्यूला कवटाळणे, आपण सुन्नच होत जातो!

हे सारे घडत जाते. हिंसा दिसत राहते. आपण आगतिक होऊन पाहात राहतो.त्या बंदुकींच्या लहरींवर जीवनाचे आणि मृत्यूचेही हिंदोळे हलत राहतात.लाओकोले आता बंदुकीचा चाप दाबते की नाही हे प्रेक्षकांवर सोडले आहे...इमान्युएल डोंगालाचे हे लिखाण आहे. तो स्वतः ही या युद्धा॑तून गेला होता. त्यामुळे अगदी प्रत्यक्षदर्शी सादरीकरण आहे. संगीत अप्रतिम आहे. श्रद्धांजली दिली जाते त्या इमारतीतले इट इज माय वर्ल्ड हे गाणे म्हणणे अंगावर काटे आणते. ही मुले जंगलातून चालत असताना मागे मार्टीन ल्युथर किंग चे प्रसिद्ध भाषण ऐकू येत असते 'आय हॅव अ ड्रीम'.
अशा गोष्टींचा प्रभावी वापर आहे चित्रपटात.

चित्रीकरण अगदी निराळे आहे. कसे ते पाहायलाच हवे. काही प्रसंगात पडद्याचा अर्धा भाग झाकलेलाच असतो. क्लोज अप्स मध्ये फक्त अर्धाच चेहरा दिसतो. प्रत्येकाला येथे अर्धीच कथा माहिती आहे. सगळ्याचे जणू अर्धेच स्पष्टीकरण आहे असे चित्रीकरण सुचवत राहते.

चित्रपट संपला आणि माझ्यासमोर ते फ्लेक्स येत राहिले.
राजाचे राज पण आज पण उद्यापण आणि हातात पिस्तुल घेतलेला माणूस.
अराजक आणि बंदुकांची क्षणिक सत्ता!

आपली पण वाटचाल याच दिशेने होते आहे का, हा प्रश्न अस्वस्थ करायला लागला.

चित्रपट - जॉनी मॅड डॉग Johnny Mad Dog
दिग्दर्शन - जीन स्तिफन स्वेर
कथा - एमॅन्युएल डोंगाला
पटकथा - एमॅन्युएल डोंगाला आणि जीन स्तिफन स्वेर

प्र. भू.
जॉनी - क्रिस्तोफ मिनी
लाओकोले - डेझी व्हिक्टोरिया वँडी

पुरस्कार
कान्स - २००८ होप पुरस्कार
द्युवेले - २००८ उत्कृष्ट पटकथा

टीपः चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहे. परंतु तो अधिकृत आहे की नाही हे न कळल्याने दुवा दिला नाही.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

जमाना सुधर रहा है अशा गैरसमजात काही देशांत काही उच्च्भ्रू लोक राहतात. आपल्या नागरी/ उपनागरी समकालींचे बालपणीचे आणि आजचे जीवन यांची तुलना करून ते जगात सगळं काही आलबेल आहे असं मानतात. आपल्याला स्पर्श न झालेलं जग कुठे गेलं आहे याच्याशी त्यांना काही देणंघेणं नसतं. त्याच नादात प्रस्थापित व्यवस्थांनी 'बुद्धीचा' आधार ठरवून घातलेल्या नियमांनी निर्बुद्ध जगाचं 'दॄष्टीआड सृष्टी' टाइपचं शोषणही करत असतात. मूलतःच जग अल्पसंख्यांचे हित जास्त कसे जपले जाईल असे बनले आहे असे वाटत असताना तंत्रज्ञानाने ह्या हितार्थ्यांची संख्या अजूनही कशी कमी करता येईल यासाठी मदत केली आहे. म्हणून सौख्यांच्या अशा बेटांभोवतीचे भयाण जीवनांचे महासागर कोणाच्या खिजगणतीतही नसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अवघड आहे. पिच्चर बघवणार नसला तरी एकदा पाहीनच!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

च्च च्च.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नुसतं वाचूनच अंगावर काटा येतो. इतका भीषण चित्रपट बघवेल की नाही असा विचार मनात आला. आणि नंतर मग वाटलं की हेच भीषण वास्तव जगणारांचं काय झालं असेल?

युद्ध होत राहते. कोण जिंकते आहे, कुणाशी जिंकते आहे? कशावर विजय मिळवलाय हे ही त्यांना आणि आपल्यालाही समजत नाही.

हे या सिनेमाचं बलस्थान वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात आफ्रिकेचा उल्लेख आहे म्हणून अशी स्थिती केवळ तिथेच आहे असा गैरसमज होऊ शकतो. भारतात असेच आहे. बहुतेक नक्षलवादी अल्पवयीन आहेत. मणिपूरमधे मी जेव्हा 'अतिरेक्यांचे मनपरिवर्तन' वैगेरे मुद्दा काढला तर
१. ते ९-१५ वयाचे आहेत
२. त्यांचे शिक्षण शून्य असते
३. त्यांच्या मृत्यूविषयक संवेदना बोथट केलेल्या असतात
४. त्यांना पगारीसारखे पैसे दिले जातात
५. ते समाजापासून दूर म्हणून भावनाशून्य असतात
६. फक्त आज्ञा पाळणे म्हणजे जीवन (आर्मीची तुलना करू नये, सैनिक 'कोणतीही' आज्ञा पाळत नाही.) असा त्यांचा मेंटल सेट केलेला असतो

अशी माहिती मिळते, आणि जरा काही वर्क करेल असे सुचवा असे सांगीतले जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद अरुणजोशी - आपल्या नक्षलवादाला हे चित्रण अगदी सरळपणे रिलेट करता येते.
पण त्यावर कुणी इतका 'सरळ' चित्रपट काढेल का? शक्य वाटत नाही कारण आपल्या देशातल्या मिडियावर कम्युनिस्टांचा घट्ट पगडा आहे. नक्षलवादी हा प्रश्न आहेच यात शंका नाही. आणि ते याच मार्गाने जात आहेत यातही वाद नाही. बंदुकांना जीवापेक्षा जास्त किंमत हे समीकरण अतिशय धोकादायक असते. आणि तेच त्या भागातही घडवण्याचा प्रयत्न चाललाय की काय असे वाटते. म्हणून चित्रपट जास्त अस्वस्थ करतो.

असेही - 'गन्स आऊट लिव्ह ह्युमन्स!'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

"बंदुकांना जीवापेक्षा जास्त किंमत " हे असे इतकेच नाहीये.
" सत्तेला जीवापेक्षा जास्त किंमत " असं त्याचं व्यापक रूप आहे.(सत्ता = मुन्शिपाल्टी वा राज्य सरकारातली सत्ता हस्तगत करणे; इतकेच नव्हे. तर तुमच्या प्रभाव क्षेत्रात तुम्ही कायद्याच्या वर असणे.
उदा:- लिट्टे , सत्यसाईबाबा, शिवसेना , इमाम बुखारी वगैरे वगैरे हे सारेच त्यांच्या त्यांच्या पॉकेट्स मध्ये कायद्याच्या वर आहेत; त्यांच्या अनुयायांच्या त्यांच्यावरील निस्सिम प्रेम, त्याग , भक्ती वगैरे वगैरे मुळे.)
.
भारतात लोकशाहीच्या नावाखालीही बंदूक न वापरता, किंवा क्वचित वापरुनही वाट्टेल त्याचा संहार स्वतःचा प्रभाव कमावण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी होतो.
.
दरवेळी नक्षलवादी हेच काय ते वाईट, किम्वा क्रूर असे म्हटले की गंमत वाटते. नक्षलवाद्यांव्यतिरिक्तही मेनस्ट्रीममधली मंडळी भयंकर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नक्षलवाद्यांव्यतिरिक्तही मेनस्ट्रीममधली मंडळी भयंकर आहेत.

खरोकहर भयंकर आहेत. (टायपो तसाच ठेवला आहे... मेक्स सेन्स Wink )

पण चित्रपटातले चित्रण चटकन रिलेट होईल असे तेच उदाहरण डोळ्यासमोर आले...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

वृत्तपत्रीय भाषेचा तडका , उथळ अतिसुलभीकरण बाजूला काढलं, तरी खरोखर जे घडलं असण्याची शक्यता आहे, तेसुद्धा.....
.
.
.
जाउ देत, तुम्हीच वाचा.
छळच बनले औषध
http://www.loksatta.com/chaturang-news/suppression-becomes-medicine-3507...
ग्रेसला तो भीषण दिवस लख्ख आठवतो. ९ ऑक्टोबर १९९६. युगांडाचा स्वातंत्रदिवस. अतिरेक्यांचा हल्ला होणार अशा अफवा पसरलेल्या होत्या. त्यामुळे तणावाचे वातावरण होतेच. यापूर्वीही अनेकदा अफवांनी घबराट माजवली होती. त्यावेळी काही घडले नव्हतेच, पण या काळरात्री मात्र अतिरेक्यांनी डाव साधला आणि गाठलं लहान लहान मुलींना. पुढचा सगळा घटनाक्रम एखाद्या चित्रपटात घडावा तसा अकल्पित, अनाकलनीय आणि क्रूर!
ग्रेस अकालो, एक मध्यमवर्गीय स्वप्नाळू मुलगी. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी आई-वडिलांकडे हट्ट करून सेंट मेरीज या खास मुलींच्या हायस्कूलमध्ये दाखल झाली. तिच्या गावातल्या खूूप कमी मुलींना ही संधी मिळत असल्याने ती फार उत्साही होती. शिक्षणाचं महत्त्व तिला उमगू लागलं होतं. म्हणूनच तर विद्यापीठात गेलेली पहिली मुलगी होण्याचा मान आपण मिळवायचाच, हे तिनं पक्क ठरवलं होतं.
पण घडलं वेगळंच. ९ ऑक्टोबरच्या रात्री लॉर्ड्स रेझिसटन्स आर्मी (एलआरए)चे अतिरेकी थेट मुलींच्या वसतिगृहात शिरले. बंदुकांच्या धाकाने त्यांनी १३९ मुलींना जबरदस्तीने बाहेर काढले. त्यांना चार रांगा करायची तंबी दिली. आणि साऱ्या निघाल्या, जंगलाकडे जाणाऱ्या चिंचोळ्या, अंधाऱ्या वाटेने.. अधांतरी भविष्याकडे. यावेळी ग्रेस होती फक्त १५ वर्षांची!
ग्रेसच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर रॅशेल यांना ही खबर लागताच त्यांनी अतिरेक्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापुढे गयावया केल्या. मात्र निर्दयी अतिरेक्यांनी तिलाही जिवे मारण्याची धमकी दिली. सिस्टर रॅशेल नमल्या नाहीत, डगमगल्या नाहीत. त्या मुलींच्या मागे धावत राहिल्या. अखेर एलआरएच्या लोकांनी त्यातल्या १०९ मुलींना सोडून दिलं. पण ग्रेस तेवढी सुदैवी नव्हती.
झाल्या प्रकाराने ग्रेस गांगरून गेली. त्यांचा हेतू काय, आपल्याला इथे का आणलं गेलं या विचाराने ती सुन्नपणे चालत होती. संवेदना बोथट झाल्याप्रमाणे कृती घडत होत्या. भीतीने, दहशतीने, पुढे काय वाढून ठेवलंय या विचाराने या मुली रडत होत्या, भीतीने किंचाळत होत्या. त्यांचा तो आक्रोश पाहून एलआरएचा कमांडर मोठमोठय़ाने हसत होता.
या आठवणी सांगताना, ग्रेस आवंढा गिळते, ''त्या रात्री चालताना भीतीने आम्हा मुलींची अवस्था वाईट झाली होती. माझा शरीरावरचा ताबा सुटला होता. लघवीने पायजमा ओला झाला होता. जवळपास महिनाभर आम्ही युगांडाच्या जंगलात भटकत होतो. मग आमचे दोन गट करण्यात आले, सुदानवर हल्ला करण्यासाठी आम्हाला नेले जाणार होते, असे कमांडरच्या सूचनांवरून कळत होते.''
ग्रेसबरोबरीच्या अनेकजणींना जंगलातून मैलोनमैल चालणं असह्य़ होऊ लागलं. पोटात अन्नाचा कण नसल्याने अनेक मुली रस्त्यात कोलमडून पडल्या. ज्यांनी पुढे चालण्यास नकार दिला त्यांना ठार केलं गेलं, ग्रेसच्या डोळ्यांदेखत! कुऱ्हाडी, बंदुका अनेकदा धारधार सुरे यांनी मुलींना भीती घातली जात होती. मुली चालत होत्या.
ग्रेस सांगते, ''सुदानच्या आसपास आम्ही पोहोचताच आम्हा मुलींच्या हातात एके-४७ देण्यात आल्या. पण त्या बंदुका चालवायच्या कशा हे आम्हाला शिकवण्यात आलंच नाही. 'तुमची तहानभूकच तुम्हाला हे शिकवेल' असं कमांडर सांगत होता आणि ते खरंही झालं. आम्हाला 'सुदान पीपल्स लिबरेशन आर्मी' (रढछअ) च्या विरोधात अनेकदा प्रत्यक्ष युद्धभूमीवर पाठवलं गेलं. त्याआधी परस्पर गटात आमची विभागणी करण्यात आली होती. अनेक सुंदर मुलींना वरिष्ठ कमांडरांशी लग्न करण्यास भाग पाडण्यात आलं. ज्या मुलींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला वा ज्यांनी नवऱ्याला स्वीकारण्यास नकार दिला त्यांना मारून टाकण्याचं काम आमच्यावर सोपवण्यात आलं. कित्येक दिवस अन्नाचा कण पोटात गेला नाही. जगायचं तर कुणालातरी मारावं लागेल, ही अट घातली गेली. कमांडरच्या कोणत्याही सूचनेला नकार देणाऱ्यांना शिक्षा एकच, अमानुष शारीरिक छळ. त्या कमांडरने माझ्यावर किती वेळा बलात्कार केला, जबरदस्तीनंतर माझी झालेली स्थिती आठवूनही आता भीती वाटते. मी नुकती उमलणारी कळी होते, पण त्या अत्याचारांनी मला दगड करून टाकलं. वारंवार होणाऱ्या बलात्कारांमुळे संवेदना कुठे उरल्या होत्या, तरीही मी जिवंत होते.'' ग्रेसचे हे अनुभव अंगावर शहारे आणणारे होते.
सुदानच्या सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराला उत्तर देताना ग्रेसला भोवळ आली. ती खाली कोसळली. ग्रेस ठार झाली असे वाटल्याने एलआरएच्या म्होरक्याने तिला एका खड्डय़ात पुरून टाकले. मात्र ग्रेस जिवंत होती. सात महिन्यांच्या या अनन्वित छळानंतर ९ एप्रिल १९९७ रोजी ग्रेस तेथून निसटण्यात यशस्वी झाली. सलग दोन आठवडे अन्नपाण्याशिवाय, थांबले तर संपले, या भीतीने चालत राहिली. अखेर सुदानच्या एका गावात पोहोचल्यावर काही लोकांनी तिला युगांडा सैनिकांच्या हवाली केलं. त्यांनी सिस्टर रॅशेलकडे तिला सोपवलं व ग्रेस कुटुंबीयांकडे परत आली.
ग्रेस परत आली, पण तिचे मन शांत नव्हते. त्या भयानक आठवणी तिचा पिच्छा सोडत नव्हत्या. शारीरिक अत्याचाराच्या जखमांचे व्रण मनावरही झाले होते. ती अस्वस्थ होती. आपण सुटलो, पण अनेकांना त्या नरकात मागे ठेवून आपण एकटे परत आलोय, यामुळे जगण्याविषयी अपराधी भावना तिच्या मनात होती. अजूनही तिचे सवंगडी अतिरेक्यांच्या ताब्यात आहेत, या विचाराने ती दुखी होत होती.
जवळजवळ एक महिना तिने या घालमेलीत घालवला. पण घडलेल्या घटनांनी ग्रेस अकाली प्रौढ झाली, कणखर झाली. भळभळत्या जखमा घेऊनच ग्रेसने परत शाळेत जाणे सुरू केले. त्याच शाळेत जिथून तिचे अपहरण झाले होते. या अपघातानंतरचा शाळेचा पहिला दिवस तिला विसरणं शक्य नाही, ती म्हणते. पण कुटुबांच्या पाठिंब्यामुळे ग्रेस उभी राहिली. ' शाळेत पुन्हा दाखल होणं, ही माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर घटना ठरली असे वाटते. शिक्षणाने मला धीर आला. भविष्याविषयी आशा वाटू लागली.'
ठरवल्याप्रमाणे तिने युगांडा ख्रिश्चन विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे तिला अमेरिकेतील स्कॉलरशिपविषयी माहिती मिळाली. त्या आधारावर तिने 'जॉर्डन महाविद्यालयात' प्रवेश मिळवला तेथून पदवी घेतली. तर क्लार्क विद्यापीठातून 'आंतरराष्ट्रीय विकास व सामाजिक बदल' या विषयातून एम.ए. पूर्ण केले. मात्र भूतकाळ ग्रेसला स्वस्थ बसू देत नव्हता.
कुठल्यातरी उदात्त हेतूने आयुष्याने आपल्या बाजूने कौल दिला, याची जाणीव तिला आहे व त्याबद्दल ती ऋणी आहे. ती म्हणते, ''या घटनेनंतर मी शाळेत जाऊ शकले, कुटुंबाचा पाठिंबा व प्रेम याचा मला आधार होता. मी सुदैवी ठरले. पण त्यांचं काय, ज्यांना हे मिळू शकत नाही. त्यांच्यासाठी काम करायचे आहे. बालसैनिकांच्या व्यथा अजूनही खऱ्या अर्थाने दुर्लक्षितच आहेत. त्या रोखण्यासाठी काम करायचे आहे.''
बालसैनिक या अमानुष, जुलमी प्रथेने ग्रेसच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. २००७ साली, तिने आपले अनुभव मांडणारे, 'गर्ल सोल्जर: अ स्टोरी ऑफ होप फॉर नॉर्दन युगांडाज् चिल्ड्रन' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाने युगांडामधील बालसैनिकांच्या ज्वलंत समस्येवर प्रकाश टाकला. २००९ सालच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बालसैनिकांचा व एलआरएच्या कारवायांचा मुद्दा छेडला गेला. ग्रेसला यावेळी खास आमंत्रित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर याविरोधात ठोस कारवाईची गरज असल्याचे ग्रेसने ठामपणे सांगितले.
युद्धाने पोळलेल्या, बालसैनिकांना भूतकाळातील जखमा विसरण्यासाठी शिक्षण हे उत्तम औषध ठरू शकतं. १० वर्षांहून अधिक काळ युद्धखोरीचे साक्षीदार असणाऱ्या मुलांनाही समाजाने स्वीकारले, त्यांना पाठिंबा दिला, शिक्षण व योग्य समुपदेशन दिले तर त्यांच्यातही सुधारणा होऊ शकते, असे ग्रेसने यावेळी ठासून सांगितले.
तिच्यासारख्या अनेक बालसैनिकांसाठी, पीडित महिला व मुलींच्या सुरक्षितता व हक्कांसाठी ग्रेसने काही समविचाारी लोकांच्या मदतीने 'युनायटेड आफ्रिकन्स फॉर वुमेन्स अ‍ॅन्ड चिल्ड्रेन्स राइट्स' ही सेवाभावी संस्था २००९ मध्ये स्थापन केली. लष्करी कलहाचे बळी ठरलेल्या मुलांची ती प्रतिनिधी आहे तर बालहक्क, शांतता यांची खंदी समर्थक आहे. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये लेक्चर्स देऊन 'बालसैनिक' या प्रथेविरोधात ती आवाज उठवते आहे. अवघ्या तिशी-बत्तिशीतील तिचा दुर्दम्य आशावाद कमालीचा आहे.
अजूनही बालसैनिकांविरुद्धचा लढा संपलेला नाही. २००९ ते २०१२ या कालावधीत तब्बल ६०० मुलांचे कांगो, सुदान व युगांडा येथून एलआरएमार्फत अपहरण करण्यात आले आहे. लहान मुले भडकाऊ भावनांचे सहजासहजी लक्ष्य ठरतात व त्यांच्या मनात सुडाचे विष पेरले की त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो, या हेतूने एलआरए कडून लहान मुलांना लक्ष्य केले जाते. शिवाय लहान मुलांवर विरोधी सैन्याकडून हल्ला होण्याची शक्यता कमी असते, असाही हेतू असतो.
ग्रेस म्हणते, ''माझी शोकांतिका मी सांगितली, पण अजूनही कित्येकांच्या व्यथा अव्यक्तच आहेत. जगभरातील अनेक फुटीरतावादी संघटनांनी लहान मुलांची आयुष्य पणाला लावली आहेत, लहानग्यांचे भविष्य काळवंडून टाकलं आहे. त्यांना जगाकडून मदतीची गरज आहे, अपेक्षा आहे. लैिगक हिंसाचाराला दरवर्षी हजारो लहान मुले बळी पडतात. पण मला आशा आहे, परिस्थिती बदलेल असा विश्वास आहे.''
ग्रेसच्या पुस्तकातील तिचे भीषण अनुभव ऐकून अनेक वाचक, विद्यापीठातील मुले तिला विचारतात, 'तुला रडावेसे वाटत नाही,' तिचे उत्तर असते, ''कोवळ्या मुलांचे आयुष्य करपून जात आहेत. सर्वत्र शांतता नांदायला हवी, हे माझं ध्येय आहे. माझ्या दुखासाठी पुन्हा कधीतरी आसवं गाळत बसेन, आत्ता नाही.''

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धन्यवाद मन. ग्रेसच्या त्या कहाणी वृत्तपत्रीय भाषेचा तडका वाटत नाही. खरे तर वृत्तपत्रात देण्यासाठी बहुदा पचेल इतकी हलकी केली आहे. यातले तपशिल अजून भयंकर असतील अशी मला खात्री आहे.
असा अजून एक गट आहे जो किडुकमिडूक गुन्ह्यासाठी मुलांनाच मुलाचे नाक, कान किंवा ओठ कापण्याच्या भयानक शिक्षा देतो. या गटाला खरे ख्रिस्ती देवाचे राज्य स्थापन करायचे आहे. प्रचंड दडपशाही आणि अनेक खंडण्यांचे गुन्हे याच्या नाववर जमा आहेत. या गटाच्या म्होरक्याला अडवण्यासाठी मोठी मोहीम उघडली होती. अगदी ओबामाला साकडे घातले गेले होते. पण त्यावेळी अध्यक्षांनी स्पष्ट सांगितले होते की यात काहीही आर्थिक हीतसंबंध नसल्याने त्यांना या प्रकरणात काही करणे शक्य नाही.
त्यावरून बराच गदारोळ उडाला होता!

आफ्रिकेतील बालसैनिक आणि मानवी तस्करी हा खरोखर मोठा विषय आहे. माध्यमांना त्यात 'तेव्ह्ढा' रस नाही. कारण त्यात ठोस असे अर्थकारण नाही असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

+१
Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!