सोन्याचे झाड

मुलांच्या परीकथांत बर्‍याचदा सोन्याच्या झाडांचे वर्णन असते. या अशा झाडांच्या सोनेरी फांद्यांवर म्हणे झगमग करणारे हिरे, मोती आणि इतर रत्ने लटकलेली असतात वगैरे वगैरे. अर्थातच डोके ठिकाणावर असलेला कोणताही सुज्ञ माणूस परिकथेत असलेल्या या सोन्याच्या झाडावर विश्वास ठेवणार नाही. तरीसुद्धा, वाचकांचा विश्वास बसो किंवा न बसो, पण ऑस्ट्रेलियामधील शास्त्रज्ञांनी अगदी खर्‍याखुर्‍या अशा सोन्याच्या झाडाचा शोध लावला आहे ही गोष्ट मात्र सत्य आहे. हे झाड म्हणजे पश्चिम ऑस्ट्रेलिया मधील खनिज संपन्न भूमी असलेल्या व इ.स.1800च्या आसपास जेथे सोने सापडल्यामुळे सोने शोधण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती त्या कालगूर्ली भागात असलेले आणि पूर्ण वाढ झालेले असे एक निलगिरीचे झाड आहे. हे निलगिरीचे झाड, विश्वास बसणार नाही पण आपल्या फांद्यांत आणि अगदी पानापानांत सुद्धा सोन्याचा अंश बाळगून आहे.

पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या शहरात Commonwealth Scientific and Industrial Research Organisation (CSIRO) या नावाची एक संस्था आहे. या संस्थेत संशोधन करणार्‍या संशोधकांना या निलगिरीच्या झाडाच्या फांद्यात आणि पानात सुद्धा सोन्याचे अगदी सूक्ष्म कण सापडले आहेत. या शास्त्रज्ञांच्या मताने हे निलगिरीचे झाड भूगर्भात अगदी खोलवर सोने असलेल्या जमिनीवर उभे आहे आणि दुष्काळाच्या काळात खोलीवर असलेले भूगर्भजल या झाडाच्या मुळांकडून शोषले जात असताना त्याबरोबरच सोन्याचे सूक्ष्म कण सुद्धा या झाडाच्या मुळांकडून शोषले जातात व हे कण नंतर झाडाच्या फांद्यांत वा पानात साठून राहतात. ‘नेचर कम्युनिकेशन्स‘ या नियतकालिकाच्या अंकात या अभ्यासाबद्दल प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, CSIRO शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत वाढवलेल्या आणि रानटी जंगलात वाढलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या झाडांवर प्रयोग केल्यावर ते या निष्कर्षावर आले आहेत.

डॉ. मेल्व्हिन लिन्टेर्न हे CSIRO मधे संशोधन करणारे geochemist, या सोने सापडण्याच्या क्षणाला, आर्किमिडीजच्या प्रसिद्ध ‘युरेका‘ क्षणासमान असलेला एक ‘युरेका‘ क्षणच मानतात. ते म्हणतात:
” आम्हाला असे काही आपल्याला सापडेल अशी काही अपेक्षाच नव्हती. आम्ही ज्या एका विशिष्ट झाडावर संशोधन करत होतो ते झाड 30 मीटर किंवा एखाद्या 10 मजली इमारतीच्या उंची एवढ्या खोलीवरून हे सोने वर शोषून घेत होते असे आम्हाला आढळून आले. निलगिरीच्या झाडांची मुळे अतिशय खोलवर म्हणजे अनेक दशक मीटर खोलात जाऊन तेथील पाणी शोषत असल्याने त्या पाण्याबरोबर भूगर्भात असलेले सोन्याचे कण सुद्धा शोषून वर आणतात असे दिसते आहे. थोडक्यात म्हणजे हे झाड एखाद्या हैड्रॉलिक पंपाचे काम करताना दिसते आहे. परंतु शोषले गेलेले हे सोन्याचे कण झाडाच्या दृष्टीने विषारी असल्याने, हे झाड, सोन्याचे कण आपल्या फांद्या आणि पाने यांच्याकडे हलवून तेथे साठवून ठेवते व ही पाने व फांद्या गळून पडल्या की त्याबरोबर ते सोने टाकून देते असे दिसते आहे.”

CSIRO च्या पर्थ येथील प्रयोगशाळेत संशोधन करणार्‍या या संशोधकांनी या प्रयोगासाठी मेलबर्न मधील Australian Synchrotron उपकरणाच्या सहाय्याने व Maia detector हा शोधक वापरून या झाडाची एक्स-रे छायाचित्रे घेण्यात यश मिळवले आहे. या छायाचित्रांमुळे मानवी केसाच्या फक्त एक पंचमांश एवढाच व्यास असलेल्या सोन्याच्या या सूक्ष्म कणांचे विश्लेषण त्यांना करता आले आहे. शास्त्रज्ञांना असेही लक्षात आले आहे की सोने शोषले जाण्याची प्रक्रिया फक्त निलगिरीच्या झाडांद्वारेच फक्त होत नसून इतर झाडांच्या पानांतही असे सोन्याचे कण सापडले आहेत. CSIRO शास्त्रज्ञांना अकेशिया मुल्गा (Acacia Mulga) या झाडाच्या पानातही असे सोन्याचे कण आढळले आहेत. या बाबतीत टिप्पणी करताना डॉ. मेल्व्हिन लिन्टेर्न म्हणतात: ” आम्हाला मोठ्या वृक्षांशिवाय त्या वृक्षांच्या छायेत वाढलेल्या झुडपांच्या पानात सुद्धा सोन्याचे कण सापडले आहेत त्यामुळे हे सोन्याचे कण एखाद्या विशिष्ट वृक्षाच्या पानात फक्त सापडतात असे मुळीच नाही.”

या झाडांच्या फांद्यात आणि पानांत सोने आढळते म्हणून ते सोने मिळवण्याच्या मागे जर कोणी लागेल तर त्याच्या पदरी निराशा येणेच संभवनीय आहे कारण या झाडांमध्ये असलेले सोने अतिशय कमी प्रमाणात असते. भूगर्भात सोने असलेल्या जागी उगवलेल्या साधारण 500 वृक्षांमधून मिळू शकणारे सोने एकत्रित केले तर फार फार एखादी अंगठी त्यातून बनवता येईल. असे जर असले तर CSIRO च्या शास्त्रज्ञांनी लावलेल्या या शोधाचा प्रत्यक्षात उपयोग तरी काय? असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. मेल्व्हिन लिन्टेर्न म्हणतात की शास्त्रज्ञांनी सोने शोधण्यासाठी विकसित केलेली ही प्रायोगिक प्रणाली शास्त्रज्ञांमध्ये biogeochemical sampling या नावाने ओळखली जाते. ही प्रणाली भविष्यकाळात अतिशय उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. एखाद्या जागेवर उगवत असलेल्या वनस्पती व वृक्ष यांच्या नमुन्यांचे या प्रकारे विश्लेषण करून त्या वनस्पती किंवा वृक्ष यांच्या फांद्या किंवा पाने यात कोणत्या एखाद्या धातूचे सूक्ष्म कण जर आढळत असले तर ज्या भूमीवर या वनस्पती किंवा वृक्ष उगवलेले आहेत तेथे खनन आणि त्यामुळे तेथील पर्यावरणाची हानी हे दोन्ही न होऊ देता त्या भूमीखाली धातूंची खनिजे दडलेली आहेत का? याचा शोध घेणे सहज आणि अतिशय कमी खर्चात शक्य होऊ शकेल. लिन्टेर्न यांच्या म्हणण्याप्रमाणे, एखाद्या भूमीमधील खनिजांची उपलब्धता तपासण्याची ही पद्धत, कमी खर्चात व पर्यावरण नष्ट न होऊ देता आपला हेतू सहज साध्य करू शकते. या पद्धतीने जस्त आणि तांबे यासारख्या धातू खनिजांच्या भूमीखालील अस्तित्वाचा शोध घेणे शक्य आहे.

श्री. निजेल रॅडफोर्ड हे एक निवृत्त mining Geochemist आहेत. त्यांनी खाणींमध्ये मिळणार्‍या धातू खनिजांचा शोध घेण्यात आपले सर्व व्यावसायिक आयुष्य व्यतीत केलेले आहे. ते या शोधाबद्दल म्हणतात:

” वृक्षांमधून मिळणारे सोने या विषयावर अनेक मंडळींनी पूर्वी बरेच अंदाज बांधलेले होते. परंतु वृक्षांच्या पानात असलेल्या सोन्याच्या सूक्ष्म कणांचा शोध ही गोष्ट भूगर्भ खनिजांच्या शोधाच्या दृष्टीने क्रांती घडवणारा आणि ज्याच्यावर संपूर्ण विश्वास टाकता येणे शक्य आहे असा शोध आहे.”

खरे सांगायचे तर हे सगळे वाचून माझी थोडी फार निराशाच झाली आहे. माझ्या मनात मी सोने पिकवणार्‍या एका मोठ्या शेताची कल्पना केली होती. या शेतात हजारो झाडे भूगर्भातील सोने शोषत उभी असणार होती आणि या हरित सोन्याच्या खाणीपासून मिळणारे सोन्याचे पीक, खाली गळून पडलेली पाने गोळा केली आणि त्यावर प्रक्रिया केली की त्यापासून मिळणार होते. खाणीतून सोने काढणे हा एक अत्यंत गलिच्छ, खर्चिक आणि पर्यावरणास हानी पोचवणारा असा उद्योग मानला जातो. जर आपण या झाडांना जास्त प्रमाणात सोन्याचे शोषण करण्यास भाग पाडू शकलो तर या प्रकारची हरित खाण अगदी आदर्श ठरेल. जगात एकूणच सोन्याची वानवा आहे. मागच्या दशकात सोन्याच्या नवीन साठ्यांच्या लागलेल्या शोधात त्याच्या आधीच्या दशकाच्या मानाने 45% तरी घट झालेली आहे. सोन्याचा साठ्यात घट होत असल्याने आंतर्राष्ट्रीय सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होऊन सोन्याचे दर आता आभाळाला टेकतील की काय असा संभ्रम निर्माण होतो आहे. इ.स 2000 आणि 2013 या कालात सोन्याचे दर 482 % वाढले आहेत. अमेरिकन सरकारने केलेल्या जिऑलॉजिकल सर्व्हे प्रमाणे जगात आता फक्त 51000 टन सोने सर्व रिझर्व्ह मिळून उरले आहे.

मात्र डॉ. मेल्व्हिन लिन्टेर्न यांनी शोधून काढलेल्या या सोन्याच्या झाडाचा शोध यासाठी महत्त्वपूर्ण मानला पाहिजे की जमीनदार उभ्या असलेल्या झाडांच्या पानांचे विश्लेषण करून व पर्यावरणाची कोणत्याही प्रकारे हानी न होऊ देता त्या जमिनीखाली सोन्याचे साठे दडलेले आहेत का? हे शोधून काढणे आता शक्य होणार आहे.

16 नोव्हेंबर 2013

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

जीवांचे देह काय काय खातात, काय काय पचवतात, काय काय त्यागतात, त्याची जी एक मोठी रेंज आहे ती मला नेहमीच विस्मयचकित करत आली आहे. मीच आतापर्यंत इतकं काही खाल्लं आहे कि त्याच मशीन मधे इतकी रसायनं प्रोसेस झाली यावर विश्वास बसत नाही.

बाकी सोन्याबद्दल माझं काही मत नाही. मानवाच्या शाश्वततेच्या शोधाचा सोन्याच ध्यास एक प्रतिकात्मकता दाखवतो इतकेच वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.