आठवणीतले प्रवास दुचाकीवरचे - भाग ३

हीरो होंडावरचा गोव्याचा प्रवास झाल्यावर नंतर पोटापाण्याच्या उद्योगांमध्येच एवढा गढून गेलो की दुचाकीवर कुठे लांब जाण्याचा प्रश्नच आला नाही. तेव्हा झालेले प्रवास म्हणजे तळेगांव, मुंबई वा दिल्ली. यातील तळेगांवला दुचाकीने जात असे, पण ते म्हणजे जलतरण तलावापर्यंत जाऊन पायाचा अंगठा(च) बुडवून येण्यासारखे होते.
नाही म्हणायला एकदा लोणावळा-खोपोली-कर्जत-नेरळ-कल्याण असा प्रवास केला होता. खोपोली-कर्जत-कल्याण हा रस्ता तेव्हा खूपच छान होता. छान म्हणजे काय, तर एकेरीच होता, पण रहदारी तुरळक असे. आणि पावसाळा नुकताच होऊन गेलेला असल्याने सगळ्या ओढ्या-वहाळांना मुबलक पाणी होते.
अखेर सहा वर्षे लघु-चित्रपटांच्या दुनियेत काढल्यावर मला जाणवले की आता या क्षेत्रातच आपली कारकीर्द घडवायची असेल तर पुणे सोडून मुंबईला स्थलांतर करणे भाग आहे. आणि मुंबईला स्थायिक व्हायची नावड बहुधा माझ्या गुणसूत्रांमध्ये आहे. माझ्या तीर्थरूपांनी मुंबईच्या गर्दीला कंटाळून राजीनामा देऊन मुंबई सोडली आणि कोल्हापूर गाठले. १९६३ साली.
मुंबईत रहायचे म्हटले तर ठरलेला साचा होता. लोखंडवाला कॉंप्लेक्स मध्ये पीजी म्हणून एक रूम घेणे. फ्लॅटच्या हॉलमध्ये सामायिक टेलिफोन (सेलफोनची स्वप्नेही पडू लागली नव्हती), ज्यावर प्रोड्यूसर मंडळी तुम्हांला बोलावू शकतील. बाकीचे पीजी तुमच्यासारखेच 'स्ट्रगलर्स'. आता मी सहा वर्षांत झालेल्या ओळखींच्या बळावर 'स्ट्रगलर्स'पेक्षा एक-दोन पायऱ्या वर होतो एवढेच.
छे. काही जुळत नव्हते. परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्यापेक्षा सरळ पाटी पुसून सगळे गणित नव्याने मांडणे (नेहमीप्रमाणे) बरे वाटले. त्याप्रमाणे मी माझा क्षेत्रबदलाचा निर्णय जाहीर केला. तेव्हा हातात असलेल्या एका कामासाठी अमदावाद आणि गोवा इथे एकेक आठवड्याचे शूटिंग होते ते आटपले की नारळ घ्यावा असा बेत आखला.
त्यातला अमदावादचा दौरा खूपच त्रासदायक झाला. ऐन उन्हाळ्याची सुरुवात. आणि अमदावादचे मचूळ पाणी. अंघोळीनंतर डोक्यावरचे केस डुकराच्या केसांसारखे राठ होत. आणि लिटर लिटर पाणी पिऊनही तहान निमत नसे. थंड दूध प्याल्यानंतर जरा घशाकडे बरे वाटे. एकदाचे काम संपले अन पुण्यास परतलो.
आता गोवा. मी गोव्याला स्कूटरने जावे नि काम संपल्यावर येताना अजून दोनचार दिवस राहून मग लांजामार्गे निवांत परत यावे असा बेत ठरवला.
स्कूटर होती सुपर एफई. एका माणसाला आरामात घेऊन जाईलशी. सामान भरले नि चालू पडलो.
वरंधा घाट हा रस्ता मी का घेतो प्रश्न नेहमी भोर ओलांडल्यावर पडायला लागतो. भोर ते घाटमाथा हा रस्ता अति कंटाळवाणा आहे. घाटाच्या आधीच्या घाट्या भरपूर. शेजारून नदी वाहते तेवढाच काय तो विरंगुळा.
त्या रस्त्याची मध्ये एक गंमत झाली. नीरा-देवघर धरणाच्या विस्तारीकरणाच्या भानगडीत तो रस्ताच पाण्याखाली गेला. कायमस्वरूपी. आता हा रस्ता पाण्याखाली जाईल ही कल्पना पाटबंधारे खात्याच्या लोकांनाही नव्हती की त्यांनी ती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लोकांना दिली नाही हे ठाऊक नाही. पण काही काळ तरी वरंधा घाट बंद होता असे ऐकल्याचे स्मरते. आता तो सुरू आहे. अजूनही तितकाच भिकार आहे.
पुण्याहून निघायला दुपार ओलांडून गेली होती. वरंध्याच्या त्या नामांकित रस्त्याने उतरून गोवा हमरस्त्याला लागलो. अंधार पडेल म्हणून न थांबताच मजल मारत होतो. सुपर एफईची बैठक मोटरसायकलीसारखी एकसंध असल्याने जरा बूड ऐसपैस टेकून बसता येत होते.
कशेडीचा घाट ओलांडेस्तोवर चांगलेच सांजावले.
खेडला भरणा नाक्यावर खेड गावाकडे वळण्याच्या रस्त्यावर उजव्या कोपऱ्यावर एक छोटेसे हाटेल होते. पोलिस स्टेशनच्या अगदी समोर. त्या हाटेलात जरा टेकलो. एकंदर थाट 'दोन मिस्सल एक स्पेशल' असा होता. पण आतल्या अंधाऱ्या बाजूला पडदे लावलेल्या छोट्याछोट्या खोल्या पाहिल्यावर इथे 'पेय'पानाची सोयही आहे हे कळले. मग मी बाहेरच एक बिअर मागवली. दिलीनही त्याने.
वा! काय अनुभव होता. नुकताच पडलेला अंधार, हमरस्त्यावरची माफक वर्दळ. शेजारच्या टेबलावरून 'एक शेवचिवडा, एक भजी' असली ऑर्डर, माझ्या पुढ्यात एक एलपी आणि हातात विल्स किंग.
त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या रस्त्यावरून गेलो तेव्हा तेव्हा तिथे थांबून एक(च) बिअर घेतल्यावाचून गेलो नाही. आता चार वर्षांमागे पाहिले तर त्या हाटेलाने आपला कळकटपणा झटकून एका बारचे रूप धारण केले होते. हं. संपला अनुबंध.
खेडहून निघाल्यावर अंधार जाणवायला लागला. रात्री कुठे रहायचे याचा विचार असा केलेला नव्हता. चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा या चारही ठिकाणी राहता आले असते. त्यातले चिपळूण फारच जवळ म्हणून टाळले. तसेही उन्हाळ्यात चिपळूणला नको नको होते. संगमेश्वरला थांबण्याचा मोह होत होता, म्हणून तिथे एस्टी स्टँडच्या कोपऱ्यावर स्कूटर थांबवली आणि एक सिगारेट पेटवली. 'अजून पुढे जावे' असा कौल मिळाला. पुढे चालू पडलो. रत्नागिरीला जायला हरकत नव्हती, पण हातखंब्यापासून दहा किलोमीटर आत फेरा मारण्याचा कंटाळा आला. म्हणजे उरले लांजा.
तिथे पोहोचेस्तोवर पार रात्र होऊन गेली होती. अख्खे लांजा गाव चिडीचूप झालेले दिसत होते. बापू घरी असला तर ठीक म्हणत स्कूटर वेरवली फाट्यावरून आत घेतली. आणि बापूचे घर बंद दिसले. पण परत रत्नागिरीला जाण्याचा कंटाळा आला म्हणून मी तरीही दार ठोकत बसलो. अखेर शेजारच्या आवाठातून एका आजीबाईंनी "साने साखरप्याला गेलेत" म्हणून वार्ता प्रक्षेपित केली. "त्यांचे साडू आहेत स्टँडसमोर रहायला" हीसुद्धा बातमी दिली.
बापूच्या साडूंना मी भेटलो होतो असेन दहा वर्षांपूर्वी एकदा. तेव्हा ते राजापूरला होते. बदली होऊन लांज्याला आल्याचे बापू बोलला होता एकदा, पण भेट अशी झाली नव्हती.
स्वार्थासाठी नाती-ओळखी पणाला लावायची वेळ आली की मी मागे हटत नाही. एस्टी स्टँडसमोर शेतकी खात्यातले भिडे एवढ्या मजकुरावर मी रात्री साडेदहा वाजता त्यांना शोधून काढून उठवलेच. माझे जेवण झालेले नाही म्हणताना त्यांनी लाल तांदळाचा भात नि कुळथाचे पिठले असे रांधले (त्यांची बायको माहेरी गेली होती). ढेकर देऊन हमरस्त्यावरचे ट्रकचे आवाज ऐकत खळ्यात झोपलो.
सकाळी त्यांनी केलेले दडपे पोहे खाऊन निघालो. त्यानंतर वीस वर्षांत (मला) गरज न पडल्याने त्यांची भेट झाली नाही.
कोंकणातल्या उन्हाळी सकाळचे प्रसन्न वातावरण अनुभवत वाटूळ - ओणी - राजापूर - कणकवली - कसाल - कुडाळ - सावंतवाडी करत बांद्याला सीमा ओलांडली आणि पत्रादेवीला गोव्यात शिरलो. सूर्य डोक्यावर आला होता. माझ्यासोबत राहणारी मंडळी आदल्या रात्रीच्या बसने निघून पणजीला उतरणार होती. त्या हॉटेलचा पत्ता घेऊन ठेवला होता. जेवणवेळेस तिथे बरोबर पोहोचलो.
गोव्यातले शूटिंग सगळे गोवा विद्यापीठात करायचे होते. गोवा विद्यापीठ तसे एका पठारावर आहे. खाली समुद्राची गाज ऐकू येते. काही ठिकाणांवरून दिसतोही.
गोवा विद्यापीठाचे वास्तूरचनाकार सतीश गुजराल. त्यांच्यावर लघुपट चालला होता त्यामुळे गोवा विद्यापीठाचे शूटिंग. नंतर गोवा विद्यापीठात शिकलेल्या मंडळींकडून कळले की गोव्याची भौगोलिक परिस्थिती (धो धो पाऊस) लक्षात न घेता केलेल्या त्या अगाध वास्तुरचनेला विद्यार्थी आणि शिक्षक दर पावसाळ्यात शेलक्या कोंकणी शिव्यांनी सलाम करत.
आठवड्याच्या आतच ते काम संपले नि मंडळी पुण्याला रवाना झाली. आता मी उंडारायला मोकळा होतो.
लघुपट हे क्षेत्र सोडल्यावर काय करायचे याचा विचार पक्का ठरलेला नव्हता. लग्न तोवर सुदैवाने झालेले नव्हते आणि कुटुंबीय तीर्थरूपांच्या बँकेतल्या नोकरीवर सुखरूप होते. थोडक्यात, पैसे कमवायला हवेत आणि किमान इतके कमवायलाच हवेत असले पाश नव्हते.
पुढच्या एका वर्षासाठी एक गणित जुळू घातले होते. ऍनची एक मैत्रीण शार्लट न्यूयॉर्क विद्यापीठात मानववंशशास्त्रात डॉक्टरेट करीत होती. तिला तिच्या संशोधनासाठी एक वर्ष पुण्यात रहायचे होते. त्या प्रकल्पाचा समन्वयक म्हणून मी काम करावे असा विचार करण्यात आला होता. माझी हरकत नव्हती. त्यानिमित्ताने एका नव्या विषयाची ओळख झाली असती.
त्या शार्लटला गोवा पाहायचा होता. स्कूटरवर लांबचा प्रवास करण्याची तिची हिंमत नव्हती. पण बसने गोव्याला येऊन इथल्याइथे स्कूटरने हिंडायला तिची तयारी होती. शार्लट दुसऱ्या दिवशी सकाळी पणजीला पोहोचणार होती.
मी पर्वरीला प्रभूदेसाई कुटुंबाकडे मोर्चा रात्रीच्या मुक्कामासाठी वळवला. हे देसाई कोल्हापूरला असताना आमचे शेजारी. नंतर गावे बदलली तरी पत्रव्यवहार चालू होता. देसाईबाई (काकू वा मावशी यापेक्षा हे 'बाई' बिरूद त्यांना चिकटले कारण त्या शाळा शिक्षक होत्या) वागायला नि वाचायला खणखणीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मुक्कामाला गेले की काहीतरी छान वाचायला (आणि "आतातरी काहीतरी एक दिशा धरून वाटचाल कर. लग्न कधी करणारेस? " असे खणखणीत आवाजात ऐकायला) मिळे.
जाताना रायबंदरच्या बेकरीत संध्याकाळी चारच्या सुमारास मिळणारे गरमगरम उंडे घेऊन गेलो. बाई खूष झाल्या. उपदेशाचा डोस जरा उसंत घेऊन मग मिळाला.
सकाळी सहालाच पणजीतला 'कदंब'चा स्टँड गाठला. शार्लट हरवल्यासारखे भाव चेहऱ्यावर थापून उभी होती. ही बया चमत्कारिक होती. वडील जर्मन. आई बंगाली. जन्म कॅनडातला त्यामुळे जर्मन नि कॅनेडियन असे दोन पासपोर्ट. बॉयफ्रेंड पाकिस्तानी. तिच्या घरी यूनोचे संमेलनच भरत असेल. वडील तसेही यूनोतच होते तिचे.
तर ही बाई, कशामुळे कुणास ठाऊक, फारच निराशावादी होती. तिला काहीही सांगितल्यावर काही समजायच्या आत तिची पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया "ओह नो! " अशी असे. मग मुद्दा उमजला की ठीकठाक प्रतिक्रिया येई.
तर ही दहा देशांत राहून आलेली बया पणजीच्या कदंबाच्या सरळसाध्या स्टँडवर हरवल्यासारखी का बावरून उभी होती?
उलगडा झाला तो असा, की तिला कोणीतरी "पणजीला काही नाही, खरे तर तू मडगांवलाच जायला पाहिजे होतेस. आता कशी जाणार तू? " असे (यथायोग्य निराशाजनक उसासा टाकून) म्हटले होते. तिलाच असली खेकटी बरी चिकटत. मी जेव्हा किरकोळीत "हो जाऊ की मडगांवला" असे म्हटले तेव्हा तिचा विश्वासच बसेना. तिच्या पद्धतीने तिने मडगांव हे पणजीहून अजून बाराएक तासांच्या प्रवासाइतके दूर आहे असे ठरवून टाकले होते. तरी बरे, तिच्याकडे गोव्याचा नकाशा होता. त्यात दाखवून तिची समजूत काढली आणि स्कूटरवर घालून तिला दीडेक तासांत मडगांवच्या रेल्वे स्टेशनसमोर दाखल केली. एका तासातही गेलो असतो, पण तिचे बॅकसीट ड्रायव्हिंग फारच खणखणीत होते, त्यामुळे अर्धा तास दचकण्यात गेला.
रहायचे कुठे, याचा काही विचार केला नव्हता. पण मडगांवला राहण्यात काही अर्थ नाही एवढे माहीत होते. कोलवा ते काणकोण एवढा समुद्रकिनारा इतक्या नजिक असताना मडगांवला कशाला रहायचे? मडगांव स्टेशनला आंबोळी-सांबार खाऊन स्कूटर कोलव्याच्या दिशेने वळवली. जाताना एका ठिकाणी पाटी दिसली 'बाणवली' (Beanulim). कोलव्यापेक्षा कमी गर्दी असेल म्हणून त्या दिशेला स्कूटर वळवली. बाणवली किनाऱ्याचा एखाद किलोमीटर आधी उजव्या हाताला एक हॉटेलसदृश काही दिसले. काय आहे बघू म्हणून स्कूटर तिथे घातली. तर हॉटेल आहे, चालू आहे, पण त्याची पाटी रंगवून यायची असल्याने लावलेली नाही असे कळले. प्रकार झकास होता. दीडेक एकराच्या तुकड्यात हॉटेलची एक लांबोळकी दोनमजली इमारत सोडता इतर आवार अगदी कोंकणातल्या कुठल्याही घरासारखे होते. आंब्याची झाडे, माड, केळी आणि बरीचसे मोकळे आवार. आवारात आतल्या बाजूला मालकाचे घर. 'आपल्या घरचे हॉटेल आहे ते आपल्यालाच पहायला हवे' असा गंभीर भाव चेहऱ्यावर थापून दोन दहाबारा वर्षांच्या फ्रॉकमधल्या मुली इकडून तिकडे पळत होत्या. आम्ही पहिलेच गिऱ्हाईक होतो बहुधा. कारण आम्ही तिथे राहण्याचा विचार जाहीर केल्यावर त्या "हॉटेलात कष्टमर आला" असे ओरडत घराकडे पळाल्या.
नव्या रंगाचा वास जिकडेतिकडे भरला होता. तो जाण्यासाठी दारेखिडक्या उघडल्या, पंखा सोडला आणि पुढचा बेत आखायला सुरुवात केली. त्या बाबतीत मात्र शार्लट खंबीर होती. सकाळ ते संध्याकाळ समुद्रकिनाऱ्यावर गेले नाही तर इथे येण्याचा उपयोग काय असे तिने मला सुनावले. म्हणजे माझा काही दुसरीकडे जाण्याचा विचार होता असे नव्हे, पण 'अतिपरिचयात अवज्ञा' असे असेल, समुद्रकिनाऱ्यावर दिवसभर जाऊन बसायची कल्पना मला सुचली नाही हे खरे.
पैशांचे पाकीट, वाचायला दोनतीन पुस्तके, टॉवेल, बदलायला कपडे आदी घेतले नि बाणवलीचा किनारा गाठला. सकाळचे जेमतेम साडेनऊ वाजत होते. किनाऱ्यावरच्या एका टावराणात जाऊन 'बेलोज' बिअर मागवली आणि सॉमरसेट मॉमचे 'साऊथ सी स्टोरीज' उघडले. शार्लट समुद्रात पळाली होती त्यामुळे एकंदरीत शांतता होती. या दोनतीन दिवसांत आम्ही पुढच्या वर्षभराचा तिच्या प्रकल्पाचा आराखडा ठरवावा असा एक बेत होता. पण तो पार पडणे अवघड दिसत होते.
तो दिवस बिअर, मॉम, सॉसेजेस, खेकडे आणि सिगरेट यावर गेला.
पुढचे दोन दिवसही असेच गेले आणि परतण्याचा दिवस उजाडला. शार्लट संध्याकाळच्या बसने पुण्याला जाणार होती. स्कूटरवरून पुण्यापर्यंत यायची तिची मानसिक तयारी अजून झालेली नव्हती. आणि तेच बरे होते. तिने जी भलीथोरली बॅग आणली होती ती पाचपंचवीस किलोमीटर अंतरासाठी स्कूटरवर सांभाळत नेणे ठीक होते. लांबच्या प्रवासाला शक्य नव्हते.
तो दिवस पणजी, ओल्ड सेक्रेटरीएट, ओल्ड गोवा, रायबंदर करीत काढला आणि संध्याकाळी तिला बसमध्ये बसवून दिले. माझा बेत होता की रात्र परत पर्वरीला देसाई कुटुंबासमवेत काढावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघावे. त्याप्रमाणे तिला सोडल्यावर मांडवीच्या पुलावर एका कोपऱ्यात उभा राहून निवांत सिगरेट ओढत उभा राहिलो. अचानक काही शंका आली म्हणून बॅगेत हात घातला तर शंका खरी निघाली. शार्लटचा पासपोर्ट आणि यूएसडी असलेली कातड्याची छोटी पिशवी माझ्या सॅकमध्येच राहिली होती. मी तसा दोनेक दिवसांत पुण्याला परतणारच होतो आणि शार्लट काही दोनेक महिने पुण्यातून बाहेर जाणार नव्हती. पण तिचा एकंदरीत घायकुता स्वभाव पाहता ती पोलिसांत जाईल, कॅनेडियन राजदूतावासात जाईल, ऍनला अमेरिकेत फोन लावेल की नुसतीच नखे खात बसेल हे सांगणे अवघड होते. माझे पुढल्या वर्षीचे उत्पन्न बरेचसे (म्हणजे सगळेच) तिच्या प्रकल्पावर अवलंबून असल्याने तिला फार उचकवण्यात अर्थ नव्हता.
तिची बस 'शांतादुर्गा ट्रॅव्हल्स'ची होती. परतून त्यांचा काउंटर गाठला आणि जेवणासाठी त्या बसेस कुठे थांबतात याची चौकशी केली. 'कुडाळ नायतर कणकवली' असे उत्तर आले. 'तिथे कुठे' या प्रश्नाला 'ते माहीत नाही' असे उत्तर मिळाले. अखेर त्या महापुरुषाने मोठ्या मनाने पुण्याला गेलेल्या बसचा नंबर मला दिला.
बस पुढे जाऊन तासभर झाला होता. पण दहा मिनिटे तरी बस म्हापशाला थांबते हा थोडासा दिलासा होता. मी स्कूटर पळवली. पत्रादेवीच्या नाक्यावर गर्दी असेल तर बस तिथेही सापडेल या आशेने गेलो तर नाका रिकामा होता. तिथल्या रजिस्टरात पाहिले तर बस आता अर्धाच तास पुढे होती. स्कूटर हाकीत राहिलो. सुदैवाने त्यावेळी रस्त्याकडेला धाब्यांचा सुळसुळाट नव्हता. कुडाळला दहापंधरा बसेस उभ्या दिसल्या. त्यात शांतादुर्गाची एक होती, पण ती मुंबईला जाणारी. त्या ड्रायव्हरने पुण्याची बस जेवणासाठी आज ओरोसला थांबेल, कारण ते हॉटेल त्या पुण्याच्या बसवर असलेल्या ड्रायव्हरच्या भावाचे आहे ही मौलीक माहीती पुरवली. आणि "ही काय, आत्ता अशी दोन मिनिटांमागे गेली ती बस" अशी आशाही दाखवली.
ओरोसला बस गावली. मँगोला पीत बसलेली शार्लटही गावली. तिला पाहिल्यावर तिने "हे, यू आर हिअर ऑल्सो" असे किरकोळीत काढले. मी जेव्हा कातडी पिशवी तिच्या स्वाधीन केली तेव्हा "आय न्यू आय हॅड लेफ्ट इट विद यू. वॉज जस्ट वंडरिंग व्हेन यू वुड बी बॅक इन पुने" असे शांतपणे वदती झाली. बायकांचा स्वभाव....
तिची बस सुटली तेव्हा दहा वाजायला आलेले होते. मी तसा उपाशीच होतो. कुठे जावे हा प्रश्न आता खऱ्या अर्थाने उभा राहिला. लांज्यात बापू असेलशी खात्री नव्हती. भिडे एका आठवड्यासाठी मुंबईला जाणार होते. म्हणजे रत्नागिरी. पण मधूकाकांनी नुकतेच घर बदलले होते. म्हणजे ते नाचण्याला स्वतःच्या घरात रहायला गेले होते. माझ्याकडे तो पत्ता नव्हता.
पण त्यांचा फोन क्रमांक पाठ होता. एका एसटीडी बूथमधून आधी त्यांना फोन लावला. सुदैवाने ते घरी होते. त्यांनी पत्ता समजावून सांगितला. फारसा कळला नाही, पण वेळ येईल तेव्हा पाहू म्हणून आधी पोटपूजा करायला गेलो.
सुरमई रस्सा नि तळलेली तुकडी फर्मास होते. भरल्या पोटाने परत स्कूटरवर आरूढ झालो. एव्हाना बसेसचा काफिला निघून गेला होता. त्यामुळे हमरस्ता सुनसान होता. काळ्याशार रस्त्यावर प्रकाशाचा झोत फेकीत स्कूटर हाकत राहिलो. राजापूर गेले. ओणी, वाटूळ करत लांजाही ओलांडले. लांज्यानंतर लगेचच एक रस्ता पावसकडे डाव्या हाताला जातो. त्या रस्त्यावर पुनस तिठ्याहून उजवीकडे गेले की हरचेरी मार्गे थेट रत्नागिरी गाठता येते. अंतर तसे फारसे वाचत नाही. फक्त पाली नि हातखंबा टाळल्याचे मानसिक समाधान.
काय सुचले कोण जाणे, मी तो रस्ता घेतला.
आतापर्यंतचा हमरस्ता सुनसान होता, पण मधूनच एखादा तरी ट्रक भेटत असे. इथे शुद्ध काजळी अंधार होता. घरेही रस्त्यापासून बरीच आत होती. रस्त्यालगत बरीच झाडी होती.
हळूहळू मनावर भीतीचा पगडा बसू लागला. आधी बेत होता की पुनस तिठ्यावर एक निवांत सिगरेट ओढावी. तो विचार आता अजिबात स्वागतार्ह वाटेना. उलट स्कूटरचे चाक जर पंक्चर झाले तर काय होईल या विचाराने काळजात लकलक होऊ लागले. पुनस तिठ्याच्या जरा अलिकडे डावीकडच्या झाडीत काहीतरी पांढरे खसपसले. मला घाम सुटला. तो ससा असेल हा साधा विचारही मनात शिरेना.
जिम कॉर्बेट सारख्या माणसाने त्याला भीती वाटून कानांमागून घामाच्या धारा लागल्याचे स्वच्छ लिहिले आहे. मी काही महामानव नव्हतो. पण शहरी वातावरणाला चटावलेल्या मनाला हा भीतीचा थेट, 'ऑन द रॉक्स' अनुभव मोहरी फेसून केलेल्या लोणच्यासारखा थेट मस्तकात गेला.
शांततेने कानठळ्या बसू लागल्या. अंतर मात्र खूपच हळूहळू कमी होत होते. शेवटी मी स्वतःच गायला सुरुवात केली. माझा आवाज कसा आहे यापेक्षा काहीतरी मानवी अस्तित्वाची चाहूल गरजेची वाटत होती.
नंतर त्या रस्त्याकाठच्या घरांमध्ये 'स्कूटरवरून हिंडत गाणारे भूत' जन्माला आले असण्याची दाट शक्यता आहे.
अखेर टेंबेपूल आला, पोमेंडी पार आला आणि नाचणेही आले. मग माझे मलाच हसू आले. पण त्यामुळे 'भय' या संकल्पनेशी इतकी जवळून झालेली गाठभेट अजूनच दृढ झाली. नंतर तसा अनुभव फारसा आला नाही. पण जेव्हा आला तेव्हा कुठेतरी मी नम्र झालो.
मधूकाकांनी सांगितलेला पत्ता सापडायला थोडे अवघड गेले. पण शेवटी एक गुरखा भेटला. त्याने पत्ता सांगितला.
वीस वर्षे होऊन गेली या गोष्टीला. पण तेव्हाच रत्नागिरीत कोंकण रेल्वेच्या बांधकामाच्या निमित्ताने बरीच अमराठी मंडळी स्थायिक झालेली दिसली. नाचण्यासारख्या रत्नांगिरीच्या उपनगरातला पानवाला बंगाली निघाला.
रत्नांगिरीहून परतताना हेदवीमार्गे जावे असा बूट निघाला. म्हणजे झाले असे, की अप्पांचे एक घनिष्ट मित्र नाना ओक हे मुंबईतील नोकरी सोडून हेदवीला कायमस्वरूपी रहायला आले असल्याची बातमी ऐकली होती. मधूकाकांकडून नानांची जी माहिती मिळाली त्यावरून या वल्लीला एकदा भेटावेच असे मनाने घेतले. चिपळूणपर्यंतचा रस्ता तर माहीत होताच. पुढच्या गावांची नावेच झकनाट होती. मार्गताम्हाने, शृंगारतळी, मोडके आगर, अडूर, साखरी इ.
चिपळूणपासून सगळे मिळून अंतर पन्नासपंचावन किलोमीटर. चिपळूणच्या काण्यांच्या हाटेलात बटाटवडा खाऊन निवांत रमतगमत दोन तासांत हेदवी गाठली. नानासाहेब गणपतीच्या देवळात गेलेतसे कळले. मी पाठोपाठ तिकडे पोहोचलो. मंगेशीइतके नाही, पण हे देऊळही शांत, स्वच्छ आणि बिनभपक्याचे होते.
नाना फायझर या कंपनीत बऱ्याच वरिष्ठ पदापर्यंत पोहोचले होते. आणि अचानक त्यांना साक्षात्कार झाला होता की आता निवृत्त झाले तरी सगळे भागेल. एक मुलगा एनडीएमधून लष्करात भरती झाला होता. मुलगी इंजिनिअर होऊन मुंबईतच स्थायिक झाली होती. दुसरा मुलगा नुकताच सीए झाला होता. आता पार्ल्याच्या चारखोल्यांच्या घरात राहण्यापेक्षा इथल्या दहा एकर जमिनीत राहावे असा त्यांनी विचार केला. पुष्पाकाकूंना हा विचार फारसा भावेना, तेव्हा "तू राहा तिथेच, अधूनमधून येतजात राहू" असे म्हणून त्यांनी तोही मुद्दा सोडवला. आणि हेदवी साखरी रस्त्यावर आपल्या जमिनीत अननस, मिरवेल, मश्रूम्स असे स्वतःला सुचेल आणि पटेल ते उगवत राहिले. पोटासाठी करत नसल्याने फार बंधने नव्हती.
नाना चांगलेच सडसडीत होते. गणपतीचे देऊळ त्यांच्या घरापासून पाचेक किलोमीटर तरी होते. मध्ये एक दोन घाट्या. आणि नाना रोज चालत देवळापर्यंत फेरा काढीत. मी देवळापर्यंत पोहोचलोच आहे म्हणताना ते माझ्यामागे बसून आले, पण मग संध्याकाळी मला समुद्रावर न्यायच्या निमित्ताने परत त्यांनी त्यांचा हिशेब पूर्ण करून घेतला. सवय नसल्याने माझ्या पायांचे मात्र तुकडे पडले.
दोन दिवस तिथे राहून आणि दोन डझन फर्मास हापूसचे आंबे घेऊन मी कोयनानगरमार्गे पुणे गाठले. कोयनानगर ते उंब्रज हा रस्ताही भिकार आहे याची माहिती झाली. उंब्रजला आल्यावर एका वळवाच्या पावसाने मला झोडपून काढले. पण तोवर इतके गदमदायला लागले होते की तो गारांचा वर्षाव अगदी हवाहवासा वाटला.
यानंतर स्मरणात रुतून राहील असा एकच दुचाकीवरचा प्रवास झाला. तोही गोव्याचा. त्या प्रवासाकडे वस्तुनिष्ठ नजरेने पाहता येईलसा भरंवसा वाटला की त्याबद्दल लिहीनच.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

प्रवासवर्णन आवडले. शार्लट्चे व्यक्तिचित्रण छान जमले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Bharich. Ithe lihilet te best zale. Manogatawarchi feri wachli. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सध्या वरवर चाळलाय.
फुरसतीत तपशीलवार वाचून अधिक प्रतिक्रिया द्यावी म्हणतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझेही तसेच. आधीचे भाग मिळवून वाचतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आवडले!! प्रवासाचे वर्णन विशेष आवडले. शार्लट आणि स्कूटरस्वार गायक भूत हे मस्त जमले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१९५९ च्या मे महिन्यामध्ये मी आणि चार मित्र पुण्याहून रत्नागिरीला दुचाकी - म्हणजे सायकलच, त्या काळात स्कूटर कोणी पाहिलेलीहि नव्हती - असा प्रवास केला होता. त्या पैकी दोन काळे-पांढरे फोटो आणि भयंकर उन्हाच्या आणि कपाळावरचा घाम वाहून डोळ्यात जाण्याच्या आठवणी ह्या प्रामुख्याने ध्यानात राहिलेल्या गोष्टी आहेत.

प्रवासाचा कार्यक्रम असा होता. दिवस एक - पुणे ते सातारा आणि आमच्याच घरी मुक्काम. दिवस दोन - सज्जनगड आणि यवतेश्वर, दिवस तीन - सातारा ते कोयनानगर, मल्हारघाट-पाटण मार्गे, दिवस चार कोयनानगर ते चिपळूण कुंभार्ली घाटाने, परशुरामक्षेत्र, मित्राच्या आजोबांचे गाव लवेल आणि चिपळुणास मुक्काम. दिवस पाच - चिपळूण ते रत्नागिरी, भगवती, मिर्‍या बंदर, थिबा पॅलेस. दिवस सहा रत्नागिरी ते चिपळूण, दिवस सात चिपळूण ते सातारा आलेल्याच मार्गाने, वाटेत चाफळच्या राममंदिराचे दर्शन. एक दिवस सातार्‍यात आमच्या घरी विश्रान्ति घेऊन नवव्या दिवशी मित्र पुण्यास परतले. मी उरलेल्या मे महिन्याच्या सुटीसाठी घरीच राहिलो

प्रवासाचे वर्णन लिहीत बसत नाही पण त्या प्रवासाच्या काही थोडक्या ध्यानात राहिलेल्या आठवणी देतो.

त्या वेळेस कोयना धरण बांधणे चालू होते. आमचेच एक नातेवाईक धरणाच्या कामावर एक्झिक्यूटिव एंजिनीअर होते. त्यांनी स्वतःच्या जीपमधून आम्हास फिरवून धरणाची भिंत, हेडरेस आणि टेलरेस टनेल्स, पॉवरहाऊस इत्यादि चालू बांधकाम दाखविले. लवेलला कोकणी अगत्याचा नमुना मिळाला. दिवसभर सायकली हाणलेले आम्ही रात्रीच्या अंधारात लवेल गावी पोहोचलो. चावडीवर काही लोक गप्पाटप्पा करत बसलेले होते. मित्राने आजोबांचे नाव सांगून त्यांचे गाव पाहण्यास आलो असेहि सांगितले. चावडीवरच्या लोकांवर त्याचा काहीहि परिणाम झाला नाही आणि आमची काही चौकशी करून आम्ही रात्री कोठे राहणार वा झोपणार असे विचारावे असेहि त्यांना वाटले नाही. अर्ध्यापाऊण तासातच आम्ही मिट्ट अंधारातून चिपळूणच्या मुक्कामाची वाट पकडली!

शेवटच्या दिवसाच्या (चिपळूण - सातारा) प्रवासाची चांगली आठवण आहे. चिपळूणपासूनच कुंभार्ली घाटाकडे चढ सुरू होतो. ते २०-२२ मैल करतांनाच मे महिन्याच्या उन्हात आमची चांगली दमछाक झाली होती. बरोबर फक्त थोडा चिवडा उरला होता. घाटाच्या पायथ्याशी बसून तो खाल्ला आणि कुंभार्ली घाट चढू लागलो. अर्धा-पाऊण मैल कसाबसा सायकलवरून चढलो आणि उरलेले ७ मैल पायी. घाटमाथावर पोहोचलो तरी चढापासून मुक्ति नाही. पुढचे २०-२२ मैल एक टेकाड चढायचे आणि दुसरे उतरायचे असे करत मल्हारपेठच्या घाटापाशी पोहोचलो. रस्ता कच्चा आणि घाटात अजिबात सावली नाही. तोहि पायी चढलो आणि दुपारी चारच्या सुमारास उंब्रजला पोहोचलो. तेथे बाजारात एक कलिंगड घेऊन त्यावरच जेवण भागविले. (विद्यार्थीदिवसात आम्हांपैकी कोणाकडेच खिशात पैसे खुळखुळत नसत.) तेथून मरतमरत चाफळमार्गे दिवेलागणी झाल्यानंतर सातार्‍यात पोहोचलो.

इतक्या सर्व दिवसात आमच्यापैकी कोणाच्याहि आईवडिलांना आपली बाळे कोठे गेली आहेत आणि काय करत आहेत ह्याची कसलीहि चिंता वाटली नाही. अलीकडच्या helicopter parenting दिवसात असे होऊ शकेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त! खूप आवडले _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम लिखाण. प्रवासवर्णन म्हटल्यावर जागांची नावं आणि फोटो पहायला मिळतात. इथे स्वतःचा प्रवासही सांगितलेला आहे. त्यामुळे हे निव्वळ वर्णन न होता कथा झालेली आहे. वाचकाला स्वतःबरोबर नेणारी.

पण शहरी वातावरणाला चटावलेल्या मनाला हा भीतीचा थेट, 'ऑन द रॉक्स' अनुभव मोहरी फेसून केलेल्या लोणच्यासारखा थेट मस्तकात गेला.

असल्या भारी उपमा असल्यावर लेखन वाचनीय झालं नाही तरच नवल. अधूनमधून केलेली नर्मविनोदाची पेरणीही छान झालेली आहे. रांगा आखून काहीतरी पेरण्याऐवजी आपोआप उगवल्याप्रमाणे नैसर्गिक वाटतात.

नंतर त्या रस्त्याकाठच्या घरांमध्ये 'स्कूटरवरून हिंडत गाणारे भूत' जन्माला आले असण्याची दाट शक्यता आहे.

असंच सकस लिहीत जा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे लिखाण प्रतिसादाची पन्नाशी गाठेल अशी माझी अपेक्षा होती. कदाचित वाचकांनी मनोगताच्या पोलिंग बूथवर मते टाकली असावीत असे म्हणावे तर तसेही नाही. स्वांतसुखाय वगैरे असले काही नसते. लिहून झाल्यावर मी माझ्या लिखाणाशी नाळनिराळा होतो असे खाजगीत सांगणारे मराठीतले एक श्रेष्ठ कथालेखक त्यांच्या कथांचा लोकांना अर्थ कळाला नाही, किंवा काही लोक त्यांनी आता कथालेखन थांबवावे असे म्हणाले म्हणून हळवेहुळवे झालेले दिसतात. लेखकांकडून सकस लिखाण हवे असेल तर त्याच्या लिखाणाला यथायोग्य उत्तेजन देणे ही वाचकाची जबाबदारी असते. श्री.पु.भागवतांचे मोठेपण इथेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मराठी जालवरील तुमचा बराच वावर असतानाही अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.
लोक प्रतिसाद कधी देतात? जेव्हा त्यांना आवेशाने, तावातावाने काहीतरी सांगायचे असते.
थोडक्यात, त्यांना अप्रत्यक्षपणे लिहायला/ प्रतिसाद द्यायला उचकवायला लागते.
विषय जितका थिल्लर तितकी त्याची हुकमी प्रतिसाद मिळवण्याची शक्यता वाढते.
(आता मनोबांच्या काही धाग्यांना अधिक प्रतिसाद आलेत हे दाखवून क्षीण ज्योक मारु नये.
)
रमतारामानं लेखमालिकातून "जंगलवाटावरील कवडसे " लिहिलं; "रोश विरुद्ध अ‍ॅडम्स " लिहिलं.
रराच्या आख्ख्या त्या सिरिजची टोटल मारली तर आठ्-दहा प्रतिसाद आले.
बरं ते लिखाण समजण्यासआथी फार काही मोठ्ठी वैचारिक बैठक, अतिप्रचंड आवाका असण्याची वगैरे गरज नव्हती.
जे आहे ते सरळ होतं. डोके असलेल्या कुणालाही समजेल असं ते होतं.
(धनंजय चांगले लिहित असले, तरी त्यांचा ऑडियन्स कमी असणार हे स्पष्ट आहे. त्यांचे लेखन पौष्टिक पण पचण्यास जड असतात चिकनसारखे.
बौद्धिक पैलवानांनीच ते पेलावेत.बहुसंख्य मंडळी "धनंजयाचे लेख समजायला एक पात्रता लागते त्या त्या क्षेत्रातील. ती कमवत बसण्यापेक्षा इतर
काही आवडीचं किंवा प्रॉडक्टिव्ह करु" असा माझ्यासारखाच विचार करत असावीत.)
रमतारामासारखी इतर कैक उदाहरणं आहेत.
बरं, हे काही नवीन आहे, असंही नाही. ऐसीवर चांगल्या लिखाणाला अधिक प्रतिसाद येतात ही वस्तुस्थिती आहे.
पण अधिक म्हणजे किती? बाहेर दोन्-तीन प्रतिसाद येत असले. तर इथे पाच्-सात येतील.
घासकडवी स्कूल ऑफ थॉट्स स्टाइल मोजमाप करायचं तर "तब्बल तीनशे टक्के अधिक" वगैरे वगैरे ते आहेत.
इथं चांगलं लिहायला इन्सेन्टिव्ह/प्रलोभन काय ठेवता येइल ? त्यास प्रतिसाद देणयस काय इन्सेन्टिव्ह/प्रलोभन ठेवता येइल? असा विचार झाल्यास उत्तम
.
.
आणि हो, हे फक्त जालावर आहे असं नाही. एकुणातच एखादी गोष्ट एखाद्या अभ्यासकाला दर्जेदार वाटते म्हणजे तिला "मास अपील" असेलच असं नाही.
डेव्हिड धवनचे दुल्हेराजा, बडेमियां छोटॅ मियां व शेकडो इतर चित्रपट हे इतर आमिर टिंग्या ह्यांच्यापेक्षा अधिक गल्ला जमवणार हे स्पष्ट आहे.
.
.
थोडक्यात तुमचा आक्षेप मला "दर्जेदार कामास मास अपील का नाही ?" ह्यासारखा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फारच सरसकट विधाने. आक्षेप म्हणून आक्षेप या धर्तीची. अशा बाबतीत जनरलायझेशन शक्य नसते (हेही एक जनरलायझेशनच!) 'भावनाओंको समझो' हा एक चालू प्रतिसाद द्यावासा वाटतो, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हे लिखाण प्रतिसादाची पन्नाशी गाठेल अशी माझी अपेक्षा होती....लेखकांकडून सकस लिखाण हवे असेल तर त्याच्या लिखाणाला यथायोग्य उत्तेजन देणे ही वाचकाची जबाबदारी असते. श्री.पु.भागवतांचे मोठेपण इथेच आहे.

तुमच्या म्हणण्यात थोडंफार तथ्य आहे. एखाद्या विस्कळित चर्चाप्रस्तावावर (कदाचित त्या प्रस्तावाच्या अपुरेपणामुळेच) जितके प्रतिसाद येतात तितके कसदार लिखाणाला येत नाही हे खरं आहे. प्रभावी लिखाणाला 'वा, आवडलं' एवढाच प्रतिसाद देता येतो, त्यापलिकडे जाणं म्हणजे त्यातल्या काही चांगल्या जागा सांगणं, पण त्यानंतर काय?

मात्र श्री.पु.भागवतांची तुलना इथल्या वाचकांशी करणं तितकं न्याय्य वाटत नाही. कारण मोजकेच शब्द वापण्याबाबत तेही प्रसिद्धच होते. त्यांना आवडलेल्या लेखनाला सत्यकथेत जागा मिळत असे, आणि तीच लेखनाच्या शक्तीची एक मोठी पावती ठरत असे. इथे ही पावती प्रसिद्धीनंतर मिळते हा मोठा फरक आहे.

असो, उत्तम लेखनाला मंदशी वावा, आणि चर्चांवर उड्या पडणं हे होतं खरं. नगरीनिरंजन यांनी लिहिलेला उत्तम नर्मविनोदी लेखही मोजक्या प्रतिसादांनंतर काहीसा मागे पडला. प्रतिसादसंख्या हा निकष न वापरणं यापलिकडे नक्की काय करावं कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संजोपरावांचं म्हणणं खरं आहे. पण अश्या लेखनावर "वा आवडलं" "छान" याहून अधिक काय निहावं हे नेहमी समजतचं असं नाही. आणि निव्वळ छान/आवडलं वगैरे लिहून फक्त पोच दिल्यासारखं होतं असं वाटतं रहातं Sad

असो. हा लेख/वर्णन अतिशय आवडलं हे नमूद करतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ब्लॉग आणि फोरम या दोन माध्यमांतला फरक तपासतानाही हेच लक्षात आलं होतं.
एकदा मांडणी करून समोर ठेवलेला एखादा लेख (कथा, अनुभव, स्फुट, कविता) आणि एखादा विस्कळीत, खुला, फटी ठेवणारा चर्चाप्रस्ताव या दोन निराळ्या गोष्टी आहेत. प्रतिसाद हे त्यांच्या यशाचं सामाईक मापक असू शकत नाही. कारण पहिल्यावर 'वा, छान, अप्रतिम, अगदी-अगदी, लिहीत राहा' यांखेरीज दुसरं काय म्हणणार? दुसर्‍यावर मात्र मतमतांतरं, खंडनमंडन, उलटीसुलटी चर्चा संभवते. त्यातून चर्चाप्रस्ताव / मांडणी अधिक व्यापक, बहुआयामी होत जाते.
त्यामुळे ब्लॉग्स ललित आणि तत्सम लेखनाला मानवणारे, तर संस्थळांवर चर्चा मस्त आणि भरीव होतात.

मग ललित लिहिणार्‍यानं काय करावं? त्यालाही वाचकाची पोच गरजेची आहेच की. याचं काही म्हणण्याजोगं उत्तर सुचत नाही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ललित लेखातही वाचकाला समाविष्ट करुन घेण्याचं एक तंत्र् , टेक्निक आहे; ते ज्यानी त्यानी वापरलं तर लेखास प्रतिसाद नक्कीच येतील.
जाहिर आवाहन :- इथे ज्या कुणाकडे ललित लिखाण उपलब्ध असेल त्यानं मला व्यनि करावं. मी त्यास ह्याकामी नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेन.
लेखन प्रकाशित झालं, आणि काही फरक पडला आहे असं वाटलं; तर मग मी काय बदल केलेत ते जाहिर केलं जावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पण प्रतिसाद हा एकच मापदंड आहे का यशस्वी लिखाणाचा, असं मी विचारते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नो कमेंट्स

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पण प्रतिसाद हा एकच मापदंड आहे का यशस्वी लिखाणाचा, असं मी विचारते आहे.

अर्थातच नाही. म्हणजे माझ्या मते नाही (हल्ली हेही एक लिहावे लागते!). प्रतिसादांची संख्या हा जर निकष धरला तर 'बघीतलंस साते, मनात आणलं तर या तात्याला पन्नास प्रतिसाद काही अवघड नाहीत' या छापाचे सगळे लेखन उत्कृष्ट मानावे लागेल. पण उत्तम लेखनाला तितकेच मार्मिक प्रतिसाद मिळाले की लेखकाचा हुरुप दुणावतो याबाबतही दुमत असू नये. ('एअ' वर आलेल्या नव्या पुराच्या पाण्यामुळे आता अशी यशवंतराव चव्हाणांसारखी काँग्रेसी भाषा वापरणे अपरिहार्य झाले आहे)
भागवतांचे उदाहरण त्यांनी लेखकांना दिलेल्या उत्तेजनाबाबत होते. कोठावळे, अनंतराव कुलकर्णी अशी इतरही उदाहरणे आहेत.
'वा, छान, आवडले' यापलीकडे काय लिहिणार हा प्रश्न प्रस्तुत मंचावर अप्रस्तुत वाटतो. विरोध किंवा टीका करताना ज्यांच्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेला हिरवे-पोपटी धुमारे फुटतात त्यांची लेखणी चांगल्या लिखाणाचे तितकेच चांगले रसग्रहण करताना हिरमुसते काय असे वाटून गेले. थोड्या विचारानंतर खरोखर तसे असावे असेही वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा