अथातो प्राकृत जिज्ञासा। - २

अथातो प्राकृत जिज्ञासा - १

उपरोल्लेखित प्राकृत भाषामण्डलांमध्ये समाविष्ट असलेल्या भाषा आधी म्हण्टल्याप्रमाणे वेगवेगळ्या भूप्रदेशांशी संबंधित होत्या. प्राचीन काळी हल्लीच्या मथुरा आणि आसपासच्या प्रदेशाला 'शूरसेन' प्रदेश म्हणत असत. महाभारत काळातील श्रीकृष्णाचे पितामह जे 'शूरसेन', पुढे कंसवधानंतर ज्यांना श्रीकृष्णाने मथुरेचं राज्यपद दिलं, त्यांच्या नावानेच हा प्रदेश ओळखला जाई. या प्रदेशातील बोली 'शौरसेनी' म्हणून ओळखली जात असे. संस्कृत नाटकांमध्ये निम्न कोटींतील स्त्रिया, विदूषक वगैरे शौरसेनी बोली वापरताना दिसतात. या शौरसेनीमधूनच सांप्रत हिन्दी भाषा बनलेली आहे.

प्राचीन मगध प्रांतामध्ये वापरल्या जाणार्‍या बोलीला मागधी म्हणतात. आजचा बिहार म्हणजेच प्राचीन मगधदेश होय. संस्कृत नाटकांतल्या निम्न स्तरावरील पात्रांचे संवाद मागधीत असल्याचे आढळते.

महाराष्ट्री ही अर्थात गोदावरीकाठच्या प्रदेशात वापरण्यात येणारी बोली होती. आजच्या महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य भागात म्हणजे सह्याद्रि पासून दख्खनच्या पठारी प्रदेशात ही बोली बोलली जात होती असं म्हणता येईल.

व्याकरणाचा अभ्यास करणार्‍यांनी म्हणजेच वैयाकरणांनी महाराष्ट्री प्राकृताला सर्वोत्तम मानलं आहे आणि बहुतांशी महाराष्ट्रीचेच नियम दिलेले आहेत. जिथे जिथे इतर प्राकृतांमध्ये फरक आढळतो, तिथे तिथेच इतरांचा निर्देश केलेला आढळतो. 'दण्डी' या कविने आपल्या 'काव्यादर्श' नावाच्या ग्रंथामध्ये (१-३५) म्हण्टलं आहे - "महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदु:।" याचा अर्थ असाही घेता येतो की महाराष्ट्र प्रदेशातील भाषेलाच प्रकर्षाने 'प्राकृत' ही संज्ञा दिली जाते. पण मग ही महाराष्ट्री, आजची मराठी भाषा आहे का? असा प्रश्न कुणालाही पडावा. त्याबद्दल असं म्हणता येतं की पूर्वीची महाराष्ट्री म्हणजेच आजची मराठी नाही पण आजच्या मराठीत पूर्वीच्या महाराष्ट्रीची बहुतांशी वैशिष्ठ्ये सापडतात. म्हणजेच ती महाराष्ट्री ही आजच्या मराठीपूर्वी इथे बोलली जाणारी बोली होती आणि तिच्यातूनच मराठीचा उद्गम झाला असल्याचं मानलं जातं.

या महाराष्ट्रीचं संस्कृत नाटकांमधलं आणखी एक वैशिष्ट्य जाता जाता समजून घेण्यात काही अडचण नाही. संस्कृत नाटकांतील 'स्त्री'पात्रे बोलताना खूपदा शौरसेनीचा वापर करतात पण त्यांच्या पद्य रचनामात्र महाराष्ट्रीमध्येच करतात. अनेकदा असंही दिसून येतं की राजघराण्यातील स्त्री पात्रे पद्य रचना करताना तसंच एरवी बोलतानाही महाराष्ट्री प्राकृताचाच वापर करत. 'गउडवहो'सारखी उपलब्ध प्राकृत काव्येही महाराष्ट्रीमध्येच आहेत.

प्राकृतभाषामण्डलाची ओळख झाल्यावरही मूळ मुद्दा शिल्लक उरतोच आणि तो म्हणजे यातील 'प्राकृत' या शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यावा? संस्कृतज्ञांनी आणि भाषा कोविदांनी याचा अनेक प्रकारे उहापोह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणही या मुद्द्याकडे थोडे लक्ष देऊ.

प्राकृत शब्दाची निरुक्ति, 'प्रकृते: आगतम् प्राकृतम्।' अशी आहे आणि ती बर्‍यापैकी सर्वमान्य आहे. वादाचा मुद्दा येतो तो 'प्रकृति' या शब्दाच्या अर्थ करण्याच्या वेळीच! 'प्रकृति' म्हणजे मूळ पण अशा ध्वन्यार्थाने घेतानाही या शब्दाचे प्रामुख्याने दोन प्रकारचे शब्दार्थ करण्यात येतात. ते पुढील प्रमाणे –

१. प्रकृति म्हणजे अर्थातच मूळ भाषा संस्कृत. सर्वात प्राचीन म्हणून मानलं जाणारं वेद-वाङ्मयाची भाषा ती वैदिक संस्कृत असल्यामुळे हा अर्थ सर्वाधिक योग्य आणि शुद्ध मानला जातो; आणि म्हणूनच असंही मानलं जातं की या संस्कृतरूपी प्रकृतिपासून उत्पन्न झाली ती प्राकृत होय.

२. 'प्रकृति' या शब्दाचा अर्थ आहे प्रजा किंवा जनता. सामान्य जनांमध्ये प्रयुक्त होणारी, बोलली जाणारी भाषा ती प्राकृत भाषा होय.

आता यातील कोणता अर्थ ग्राह्य व्हावा या वाद-प्रसंगामध्ये पहिल्या मताचे पुरस्कर्ते म्हणतात की जनसामान्यांच्या भाषेचा आधार शिष्ट-जनांची भाषा असते. समाजातील बौद्धिक संपदेचा स्वामी शिष्ट जनांचा वर्ग जी प्रमाण भाषा बोलतो त्याच भाषेच्या आधारे जनसामान्यांची व्यवहार भाषा बनते. मात्र असं होत असताना प्रयत्नलाघवादि कारणांमुळे सदर प्रमाण भाषा विकृत बनून तिचं शुद्ध रूप संस्कृत हे बदलून प्राकृतात परिवर्तित होतं. ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने शुद्ध अशा संस्कृत भाषेपासून अशुद्ध अशा प्राकृताची प्रवृत्ती निर्माण होणं सहाजिकच आहे आणि त्याच वेळेला अशुद्ध अशा प्राकृतापासून शुद्ध भाषा संस्कृताची उत्पत्ती अनैसर्गिकत्वामुळे मानता येत नाही तेव्हा अशी उपपत्ती मानणं अयोग्य होतं.

अर्थातच ही प्रक्रियाच प्राकृताचे पुरस्कर्ते अमान्य करतात कारण त्यांच्या दृष्टीने मूळ प्रकृति मानलेल्या संस्कृत भाषेचा नामदर्शक 'संस्कृत' हा शब्दच त्यांच्या समर्थनार्थ येतो. प्राकृत-पुरस्कर्त्यांचं म्हणणं असं असतं की संस्कृत या शब्दाचा अर्थच, 'संपूर्णेन कृतम्' असा आहे, म्हणजेच मूळ प्रकृतिपासून वेगळी अशी खास 'बनवलेली' अशी जी भाषा आहे ती 'संस्कृत', तेव्हा अशी 'खास' बनवलेली भाषाच मूळ मानणं केव्हाही अयोग्यच प्रतीत होतं तेव्हा प्रकृति म्हणजे 'संस्कृत' भाषा घेताच येत नाही आणि प्राकृत भाषा हेच मूळ म्हणजे प्रकृति असं मानावं लागतं.

असं असताना 'प्राकृत' म्हणजे प्रकृतिपासून बनलेली या अर्थाने पुन्हा तिलाच मूळ 'प्रकृति' भाषाही मानणे चुकीचेच ठरते. वरती संस्कृत भाषेला जो न्याय लावला आहे तोच प्राकृताला लावल्यास प्राकृतालाही या भाषांचं मूळ मानता येणार नाही.

या वादाचा सर्वमान्य तोडगा अजून तरी कुठे मिळालेला मला माहिती नाही. पण ही वस्तुस्थिती समजून घेतल्यावर यावर काही उपाय निघतोय का याचा आपण पुढील लेखामध्ये जरूर विचार करूया!

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

वरील भाग आवडला पण काही विस्कळीत विचार, प्रश्न वगैरे समोर आहेत. धनंजयादी सदस्य त्याची उत्तरे देतील अशी अपेक्षा करते.

भाषेवर सतत संस्कार होत असतात. कोणतीही भाषा मूळ रुपात असते तशीच ती शतकानुशतके राहते असे वाटत नाही. यावर विश्वास ठेवला तर आदिम मनुष्याच्या तोंडून बाहेर पडलेले आणि कळपाने मान्य केलेले आणि त्यांना समजणारे सूचक ध्वनी ही मूळ भाषा मानावी लागेल.

वैदिक संस्कृत ही आद्य मानली तरी अवेस्ता आणि संस्कृतातील फरक लक्षात घेता भाषांवर संस्करण झाले असावे. भाषांवर संस्कार हे बहुधा एतद्देशीयांच्या भाषेत परकीय भाषेच्या सरमिसळीने होतात. (येथे संस्कृत (किंवा तत्कालीन अवेस्तन-संस्कृताशी नाळ असणारी भाषा) भाषक भारतात स्थायिक झाल्यावर एकमेकांच्या भाषेची सरमिसळ होत गेली असावी.) जेत्याची भाषा स्वीकारावी लागते किंवा जेत्यांच्या भाषेतील राजकारभारविषयक शब्द अधिक स्वीकारले जातात या धर्तीवर प्राकृत भाषांनी संस्कृतातील शब्द घेतले असावे. (असे होण्यास आर्य बाहेरून येथे येऊन स्थायिक झाले हे गृहितक आहे. आर्य येथे येऊन स्थायिक झाल्याचे मान्य नसल्यास किंवा आर्यसिद्धांत मान्य नसल्यास वरील परिच्छेदाचे प्रयोजन नाही. तेथे कदाचित प्राकृतांना पॉलिश करून संस्कृत ही थिअरी मांडता येईल.)

संस्कृत किंवा प्राकृताचा विचार करता आपण नेमके किती मागे जात आहोत हे कळत नाही. वेदांतील मुखोद्गत संस्कृत आणि पाणिनीच्या संस्कारांनंतरची संस्कृत आणि त्यानंतरच्याही काळात अनेक संस्कारांनंतर बदलत गेलेली संस्कृत आणि आजची संस्कृत या सर्व विचारात घ्याव्या लागतील.

संस्कृत आणि प्राकृतात एकामधून एक असा सरळ व्युत्पत्ती नियम नसावा असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणत्याही निष्कर्शाप्रत येण्यासाठी अनावश्यक घाई झाल्यासारखे वाटतेय.

लेखाचा उद्देश, संस्कृत-प्राकृत भाषांच्या अनुशंगाने जो मुख्य पौर्वापर्वाचा वाद आहे, तो इथे अधिक स्पष्ट करण्याचा आहे. अजूनपर्यंत कोणत्याही निष्कर्शाकडे आपण (लेखामध्ये) आलेलो नाही. तेव्हा तिथपर्यंत यायला थोडा वेळ दिला तर बर्‍याच गोष्टी चांगल्या लक्षात येतील असं वाटतंय. पुढल्या भागांमध्ये हे नक्की समजेल.

वेद आणि अवेस्ता यांच्यातील भाषिक भेद हा एखाद्या निराळ्या लेखाचाच विषय होईल तसाच भाषिक उत्क्रांती हा देखिल वेगळ्या लेखामध्येच लिहावा लागेल. इथे तो भाग येण्याचे काही कारण दिसत नाही.

संस्कृत आणि प्राकृतात एकामधून एक असा सरळ व्युत्पत्ती नियम नसावा असे वाटते.

अगदी बरोबर. तसा कोणताही सरळ नियम नाहीच आहे पण खूपदा या संबंधीचा निर्णय अनुशंगाने घ्यावा लागतो. त्याबाबतीतही काही विवेचन करण्याचा प्रयत्न राहील.

प्रतिसादांबद्दल मनापासून आभारी आहे.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-----------------------------------------------------------------------------------------------------
'प्रास'ची
१) सांगीतिक आवड
२) लेखन मुसाफिरी

लेख आवडला. काही महत्त्वाच्या मुद्यांना स्पर्श केलेला आहे.
- आधी संस्कृत की आधी प्राकृत.
- संस्कृत ही शिष्टमान्य, उच्चवर्गीयांच्या तोंडी तर विविध प्राकृत भाषा निम्नस्तरीय लोकांच्या तोंडी दाखवण्याची प्रथा आहे.
- प्राकृत भाषांतही थोडीफार वर्गवारी होती.
- महाराष्ट्री व मराठी यांचा संबंध काय.

पुढच्या लेखांमध्ये या विषयांवर अधिक सखोल ऊहापोह वाचायला मिळेल अशी आशा आहे. शब्दांची, वाक्यांची उदाहरणं आली तर समजायला सोपं जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शौरसेनी : माहाराष्ट्री :: हिंदी : मराठी हा त्रैराशिक संबंध माझ्यासाठी अजून अस्पष्ट आहे.
मागधी <-> बंगाली या दोघांतही (स, श, ष) -> "श" हे उच्चारसाम्य दिसते.

माहाराष्ट्री आणि शौरसेनी मधला मोठा फरक असा की माहाराष्ट्री मध्ये शौरसेनीपेक्षा अधिक व्यंजने लोप पावतात. परंतु हिंदी-मराठी जोडीत असा काही फरक दिसत नाही. इतकेच काय माहाराष्ट्रीमध्ये लोप पावलेली व्यंजने मराठीमध्ये शाबूत आहेत : माहाराष्ट्री "गउडवहो" (ग-र्-उ-ड-व-धोहो); मराठीत गरुडवध.

माहाराष्ट्री आणि मराठी यांच्यामधील काही ठळक समांतर गोष्टींचा तक्ता कोणी केला असेल, तर मला हवा आहे.

(महाराष्ट्राशी संबंधित प्राकृताचे नाव "माहाराष्ट्री" आहे, असे वाटते. मी पुष्कळदा "महाराष्ट्री" असा उच्चार चुकून करतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली सुरवात. वाचतोय.
वेगवेगळ्या तक्त्यांनी, उदाहरणांनी लेखन अधिक सुस्पष्ट करता आलं तर बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असाच चालू द्यावा कृपया.. वाचतेय.. वाचणार.. प्रास तुमचे खूप आभार! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

आमच्यामते प्राकृत ही मूळ प्रादेशिक भाषा (एक किंवा अनेक) असून संस्कृत ही संस्करीत पण कृत्रिम भाषा आहे.
प्राकृत भाषा बर्‍याच लवचिक असतात तर संस्कृत बर्‍यापैकी गणिती.
असो.आम्ही पुढची चर्चा वाचण्यास उत्सुक आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0