अश्वत्थामा, व्यासांचा आणि जीएंचा!

जीएंना महाभारताचे खुप आकर्षण होते हे आता सर्वश्रुत आहे. प्रतिभावंताचा विषय निघाला की जीए हटकुन व्यासांचे नाव घेत. जीएंच्या कथांमध्ये काही ठिकाणी महाभारताचे संदर्भ आलेले आढळतात. त्या उपमांनी, संदर्भांनी जीएंच्या कथांना एक वेगळीच श्रीमंती बहाल केलेली दिसते. त्यादृष्टीने जीएंची पत्रे महत्वाची आहेत. विशेषतः सुनिताबाईंना लिहिलेल्या जीएंच्या पत्रांत त्यांनी महाभारतावर, त्यातील व्यक्तीरेखांवर चर्चा केली आहे. ज्या तर्‍हेने जीए या विषयावर लिहितात त्यावरुन हे जाणवते की महाभारत हा त्यांच्या सततच्या चिंतनाचा विषय असावा. त्यांनी त्यावर स्वतंत्रपणे लिहिले असते तर आमच्यासारख्या जीएप्रेमींना आणखि एक खजिना कायमस्वरुपी प्राप्त झाला असता. आणि तो ही अक्षय असा. कारण जीएंचे लिखाण कितीही काळानंतर पुन्हा पुन्हा वाचले तरी त्यात नवीन काहीतरी मिळतेच. मात्र बारकाईने पाहिले असता हे जाणवते कि जीए त्यातील सर्व व्यक्तीरेखांबद्दल भरभरुन बोलत नाहीत. कर्णाच्या दु:खाने जीए विचलित झाले नाहीत. वेदनेचे वरदान मागणार्‍या कुंतीचे दु:ख जीएंना फारसे आकर्षित करु शकले नाही. फार काय, महाभारतातील तत्वज्ञांचा मेरुमणी जो कृष्ण, त्याच्याबद्दलही जीए फारसे बोलताना आढळत नाहीत. जीए बोलतात ते अश्वत्थाम्याबद्दल. आणि ते बोलत असताना त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेने त्यावर ते स्वतःचे असे वेगळे भाष्य करतात. ते वाचताना पुनःपुनः हे म्हणावेसे वाटते कि यावर जीएंनी स्वतंत्र लिहायला हवे होते. जीएंना महाभरतात हे व्यक्तीरेखा का भावली? त्या व्यक्तीरेखेला व्यासाने जसे रंगवले आहे त्याहुन वेगळे असे जीएंनी त्यात काय शोधले? जीएंच्या स्वतःच्या तत्वज्ञानाशी जुळणारी अशी ही व्यक्तीरेखा त्यांना वाटली असावी काय? या प्रश्नांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

व्यासांनी जो अश्वत्थामा रंगविला आहे त्याला फारसे कंगोरे नाहीत अशी माझी समजुत आहे. मात्र त्याच्याशी निगडीत जनमानसातील पाण्यात पीठ मिसळुन ते दुध म्हणुन अश्वत्थाम्याला प्यावे लागत असे ही कथा प्रसिद्ध आहे. तेथपासुन अश्वत्थाम्याच्या उल्लेखाला प्रामुख्याने सुरुवात होते. या कथेने अर्थातच द्रोणाचे दारिद्र्य अधोरेखित केले जाते. त्यानंतर पुढे इतर कौरव पांडव यांच्याबरोबर त्याचा पिता द्रोण त्याला शिक्षण देतो. त्यातदेखिल त्याने फारशी चमक दाखवल्याचे दिसत नाही. कपटाने वागुन पोटच्या मुलाला जास्त शिक्षण देण्याचा द्रोणाचा डाव अर्जुन हाणुन पाडतो. मात्र पुढे स्वतः द्रोणाला देखिल आपल्या मुलाच्या पराक्रमावर भरवसा वाटत नसावा, कारण द्रुपदाच्या पराभवासाठी द्रोण सर्वस्वी आपल्या इतर शिष्यांवर, विशेषतः अर्जुनावर अवलंबुन असतो. यानंतर व्यासप्रणित महाभारतात अश्वत्थाम्याचा प्रामुख्याने उल्लेख येतो तो युद्धप्रसंगीच. तेथेही या महाक्रमी चिरंजीव द्रोणपुत्राकडुन डोळे दिपुन जातील असे काहीही घडत नाही. अजुनपर्यंतचा त्याचा प्रवास हा वडीलांसोबत असावे, दुर्योधनाचे मीठ खाल्ले आहे त्यानुसार खाल्ल्या मीठाला जागावे असाच झालेला दिसतो. त्यानंतर अश्वत्थामा प्रामुख्याने दिसतो ते युद्धाच्या शेवटी, रात्री कपटाने धृष्टद्युम्न आणि द्रौपदीच्या पाच पुत्रांना मारताना. तोपर्यंत त्याचा प्रवास सामान्य असाच झाला आहे. त्याच्या नावावर नजरेत भरेल असा पराक्रम नाही आणि त्याच्याबद्दल शिसारी वाटेल असे कृष्णकृत्यही नाही.

पुढे त्याच्या हातुन द्रौपदीचे पुत्र आणि भाऊ धृष्टद्युम्न मारले जातात. त्याच्या मस्तकावरील मण्यासाठी द्रौपदी अडुन बसते. अर्जुन समोर येताच अश्वत्थामा ब्रम्हास्त्र सोडतो. त्याला तोड म्हणुन अर्जुनही ब्रह्मास्त्राचाच प्रयोग करतो आणि जगाच्या अंताची वेळ येते. त्यावेळी व्यास मध्ये पडुन उभयतांना ती शस्त्रे परत घ्यायला सांगतात. अस्त्रांमध्ये निपुण अर्जुनाला ते परत घेण्याचीही विद्या माहीत असते. मात्र अश्वत्थाम्याला ते परत घेता येत नाही. तो ते अस्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडतो. कृष्ण उत्तरेच्या गर्भाला वाचवतो आणि अनंत काळ पर्यंत ही ओली जखम बाळगत हिंडत राहशील अशा तर्‍हेचा शाप कृष्ण अश्वत्थाम्याला देतो.त्यानंतर कृष्णाला मस्तकावरील मणी देऊन तो तेथुन निघुन जातो. जनमानसात आजदेखिल अश्वत्थामा नर्मदातीरावर फिरत असल्याचा समज आहे. तो जखमेवर लावण्यासाठी तेल मागत हिंडतो. नर्मदा परिक्रमेत अश्वत्थामा दिसल्याच्या कथादेखिल प्रसिद्ध आहेत. खुद्द जीएंनी सुनिताबाईंना लिहिलेल्या पत्रात आपला अश्वत्थाम्याबद्दलचा अनुभव वर्णिलेला आहे. अशा या अश्वत्थाम्याच्या या आयुष्यावर वेगळा प्रकाशझोत पाडला तो सर्वप्रथम “युगान्त” मध्ये इरावती कर्वे यांनी. “परधर्मो भयावहः” या लेखात ईरावती बाईंनी द्रोण-अश्वत्थामा हे पितापुत्र विस्मृतीचे उत्तम उदाहरण असल्याचे म्ह्टले आहे. ब्राह्मण असुन क्षत्रियांचा धर्म पाळणारी आणि तो पाळताना स्वधर्म विसरुन गेलेली ही पराक्रमी माणसे. द्रोणाने क्षत्रिय धर्म पाळताना कुणालाही दयामाया दाखवली नाही. पुत्राने तर रात्री कपटाने माणसे ठार करुन पुढची पायरी गाठली.

जीएंचा अश्वत्थामा मात्र व्यास आणि ईरावतीबाईंच्या अश्वत्थाम्याहुन सर्वस्वी वेगळा आहे. जीएंना सर्वप्रथम या व्यक्तीरेखेतले कारुण्य जाणवले आहे ते पीठ मिसळलेले पाणी दुध म्हणुन आनंदाने पिणार्‍या लहान अश्वत्थाम्याकडे पाहुन. आयुष्यात बराच काळ दारिद्र्य भोगणार्‍या आणि त्याच्या वेदना आपल्या कथेत मांडणार्‍या जीएंना यातील कारुण्य जास्त भेदक वाटल्यास नवल नाही. मात्र वेदनेचा हा प्रवास येथेच संपत नाही. जीए सुनिताबाईंशी चर्चा करताना म्हणतात कि त्यांना कथा या नुसत्या माणसांच्या नको असतात. नुसती माणसे नव्हे तर काही एक विशिष्ठ सिच्युएशनमध्ये सापडलेली माणसे. कुणीतरी काहीतरी बोलतो आणि आमच्यासारख्या सामान्यांच्या मनात आयुष्यभर अंगार धुमसत राहतो असेही एका ठिकाणी जीए म्हणुन जातात. जीएंचे कथानायक घेतले तरी आपल्याला हेच आढळुन येते. “वीज” मधला बळवंत मास्तर हा सर्कशीतल्या मग्रुर सुंदरीकडुन अपमानीत झालेला आहे. “पुरुष” मधील प्राध्यापक निकम तर त्यांच्या अपमानास्पद भुतकाळापासुन सुटण्यासाठी धडपडत आहेत आणि नेमक्या विश्वनाथच्या रुपाने तो भुतकाळ पुन्हा त्यांच्या समोर उभा राहतो. आता त्यातुन त्यांची सुटका नाही. “तळपट” मधील दानय्या आपल्याला देशोधडीला लावणार्‍या रुक्मीणीला शोधत हिंडतो. त्याला ती शेवटपर्यंत मिळतच नाही, ती आग पोटात घेऊनच त्याचा शेवट होतो. सारी विशिष्ठ सिच्युएशनमध्ये सापडलेली माणसे. लेखकाच्या खाजगी जिवनात डोकावण्याचा अगोचरपणा करावासा वाटत नाही त्यामुळे इतकेच म्हणुन थांबतो की जीएंनी स्वतः आपल्या आयुष्यात खुप खुप भोगले आणि त्या दु:खातुन ते शेवटपर्यंत कधीही बाहेर पडु शकले नाहीत. विशिष्ठ सिच्युएशनमध्ये सापडलेला एक माणुस खुद्द जीएंच्यातच होता.

या माणसांची दु:खे शाश्वत आहेत. त्यांची सुटका नाही. मृत्युनंतरच कदाचित सुटका असल्यास असेल. मृत्युनंतर उरणारा सांगाडा, शेवटी तोही विरुन जाईल आणि शेवटी उरणारे शुन्य असा उल्लेख जीएंनी केला आहे. जीएंना मृत्युनंतरच कदाचित या दु:खाची समाप्ती होते असे वाटत असावे त्यामुळे त्यांना मृत्यु आणि आत्महत्या या विषयांचे आकर्षण होते. त्यांची नियती शरणता ही त्यांनी भोगलेल्या आणि कधीही न संपणार्‍या वेदनेतुन आली असावी. या कधीही न संपणार्‍या वेदनेचा दाह सोसणारा चिरंजीव अश्वत्थामा जीएंना महाभरतात भेटला. तो त्यांना जवळचा वाटला. अश्वत्थाम्याच्या वेदनेला क्षमेचे वरदान नाही. कसल्याही सावलीची शीतलता नाही. तात्पुरता विसावा नाही. त्याच्या कपाळी आहे ते सतत हिंडणे. ओली वाहाती, कधीही बरी न होणारी जखम कपाळावर बाळगत फिरत राहणे. जखमेचा दाह असह्य झाल्यास त्यासाठी लोकांकडे तेलाची भीक मागणे. ती झाकण्यासाठी त्यावर कापड गुंडाळणे. पण त्याहीपेक्षा एक महाभयानक शिक्षा त्याच्या कपाळी आहे. ती म्ह्णजे पश्चात्तापाची शिक्षा. “इस्कीलार” मध्ये जीए “प्रत्यक्ष आघातापेक्षाही असह्य अशी पश्चात्तापाची शिक्षा त्याने मागे ठेवली” असे लिहितात. अश्वत्थामा चिरंजीव आहे म्हणुन त्याची वेदनाही चिरंजीव आहे. अशा या अश्वत्थाम्याची व्यक्तीरेखा ही जीएंना महाभारतातील intriguing personality वाटत होती.

मात्र जीए तेथेच थांबले नाहीत. त्यांनी कथेत त्यांच्या अश्वत्थाम्याला राजपुत्र गौतमाजवळ आणले. राजपुत्र आपल्या राज्यातील वृद्ध माणसे, त्यांच्या जरा व्याधी आणि मृत्यु पाहुन उदास, विषण्ण झाला होता. त्यावर उपाय शोधण्याच्या मर्गावर असतानाच त्याला जीएंचा अश्वत्थामा भेटतो. मृत्युवर उपाय शोधणार्‍या गौतमाला चिरंजीव असण्याची वेदना माहीत असण्याचे कारणच नसते. अश्वत्थामा त्याला मृत्युमुळे जिवन किती सुखावह होते ते समजवतो. आणि विस्मयात पडलेल्या गौतमाला “मी अश्वत्थामा आहे” अशी ओळख देऊन निघुन जातो. मानवी जिवनात चिरंतन स्थान असलेली वेदना जिवंतपणी संपली नाही तर दयाळु मृत्यु त्यातुन मानवाची सुटका करतो. मात्र जीएंच्या अश्वत्थाम्याला हाही मार्ग मोकळा नाही. त्याला अनंत काळ जंगलात हिंडतच राहावे लागणार आहे. अशा या अश्वत्थाम्याच्या वेदनेला जीएच सर्वार्थाने जाणु शकले. म्हणुन तर त्यांनी “पिंगळावेळ” मध्ये सुरुवातीलाच Shallow people demand variety — but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. – Strindberg हे वाक्य टाकले आहे. जीएंच्या आयुष्यात ही दुखरी नस सतत मनस्ताप देत राहीली. त्या दु:खाला जाणुन घेण्यासाठी त्यांनी त्याच्या मुळाशी, अगदी गाभ्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला, त्यातुन अजरामर साहित्य निर्माण झाले मात्र जीएंच्या वेदनेचा अंत झाला नाही. जीएंचे अश्वत्थाम्याशी वेदनेचे नाते होते असे मला वाटते.

अतुल ठाकुर

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

जीएंची हि कथा नववी किंवा दहावीला धडा म्हणून होती ते आठवले, हि कथा भावल्याचे नक्की आठवते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वीही आवडलं होतं.
आता वाचलं; आताही आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेखन आवडलं. जीएंच्या कथांमधून एका जळत्या शब्दाच्या दाहाने जळत राहणारी माणसं सतत भेटतात. तसंच आयुष्यात एक चूक केली तिने स्वतःला डिफाइन करणारी तीभोवतीच आयुष्याची रुंजी घालणारी व्यक्तिमत्वंही. एका कथेत कुठच्यातरी कॅशियर सहा हजार रुपये पाहून डोळे दिपवून घेतो, मुंबईला जाऊन नवीन बूट घालून टाक टाक करत मरीन ड्राइव्हवर फिरतो आणि मग तुरुंगात जातो. त्याच्या पुढच्या सर्व आयुष्याची फरपट या घटनेभोवती होते.

दारिद्र्य आणि स्वाभिमान यांच्या अजब रसायनातून अश्वत्थामा तयार झालेला आहे. जे इतरांकडे आहे ते आपल्याकडे नाही, या न्यूनगंडातून घडलेलं व्यक्तिमत्व. या न्यूनगंडामुळेच त्याचा पराक्रम नाही. पण जेव्हा त्याच्या हातात रिकामं का होईना पण सेनापतीपद आलं तेव्हा काहीतरी करून दाखवण्याची, या जगाचा सूड घेण्याची इच्छा पांडवांचा निर्वंश करण्याच्या प्रयत्नातून व्यक्त झाली. त्यातही पूर्णपणे यशस्वी न झाल्याने आपल्या दुष्कृत्याच्या टोचणीची भळभळती जखम त्याच्या कपाळी आली. (हा मणीदेखील त्याच्या कपाळावर होता हे काव्यमय न्याय पूर्ण करण्यासाठी असलेली रचना वाटते)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेशजी, सुरेख प्रतिसाद Smile धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

लेखन आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दहावीपर्यंत 'आपण एकेदिवशी मरणार' ही कल्पनाच मला अतिभयंकर वाटे. आमच्या मराठीच्या सरांनी ती अश्वत्थाम्याची कथा इतक्या समर्पकपणे सांगीतली कि मला खरोखरच मरण जीवनाचा किती आवश्यक भाग आहे हे कळाले कि काय वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धाव्वीपर्यंत? मला अजूनही ही कल्पना भयंकर वाट्टे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एन डी ई (http://www.near-death.com() वाच भीती तर जातेच उलट आकर्षण वाटू लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एन डी ई बद्दल ऐकलय. एपिसोड्स पाहिलेत.
अज्याबात आकर्षण वगैरे वाटलं नाही.
काहीतरी गूढ आहे इतकच जाणवलं. प्रश्नचिन्ह थेवून गेलं.
गूढाचं आकर्षन सगळ्यांनाच असेल असं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ओके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतुल ठाकुर जी !
सर्वप्रथम आपल्या अप्रतिम लेखनासाठी धन्यवाद ! आणि आपण माझ्यासारखेच जी.ए. प्रेमी आहात म्हणुन थोड मोकळेपणाने लिहीतो कृपया राग मानु नका.
जी.ए. जस आपल्या पत्रांमधुन म्हणायचे की मी एक पॅटर्न जसा बुद्धा ला मिळालाय तसा मिळतो का हे शोधत असतो तसाच त्यांच्या कथां मध्ये त्यांचा पॅटर्न मात्र निश्चीत च सापडतो. त्यांचा मुलभुत विचार-व्युह जसा अनाकलनीय नियती तीचे मानव भाव-भावना निरपेक्ष अगम्य चलन, त्याने निर्माण होणारी प्युअर ह्युमन ट्रॅजीडी, त्यातुन भरडत जाणारी माणसं आणी अल्टीमेटली निरर्थक होत जाणारे एकंदरीत काफ़्काइश लाइफ़ आणि त्या अर्थहीनतेने निर्माण केलेली आणि प्रश्नांकीत केलेली सर्वच मानवी धडपड.
एकदा हा पॅटर्न गवसल्यावर मग मात्र जी.ए. च्या प्रत्येक च कथेत तो रीपीट होतो. त्यांचा केवळ एकच कुठलाही कथासंग्रह वाचला तरी त्यानंतर वाचलेल्या कुठल्याही कथेत फ़क्त त्याच पॅटर्न ची पुनरावृत्ती केवळ आढळते.म्हणजे थोड दाभोळकर नावाचे एक गणपती चे च फ़क्त चित्र काढणारे चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रांत मग फ़क्त इतकच बघायच असत की आता हा गणपती ते आता कुठल्या नविन रंगात, आकारांत आणि बॅकग्राउंड मध्ये काढतील.मात्र जी.ए. च्या तपशीलां च्या रंगाची पेटी ही इतकी समृध्द आहे आणि कुंचल्याचे स्ट्रोक्स ही असे आहेत की गणपती तो च असला तरी आता कसा चितारलाय ते बघण्याची उत्सुकता प्रत्येक नवी कथा वाचतांना होतेच.
तसेच त्यांच्या च पत्रांत त्यांनी स्वत:च्या प्रिज्युडायसेस आणि प्रेफ़रन्सेस विषयी म्हटल्याप्रमाणे त्यांचे काही प्रिज्युडायसेस मजेदार होते जसे रुट्स या अभिजात कलाकृतीला प्रोटेस्ट लिटरेचर च्या वर्गीकरणात टाकणे, स्ट्रीम ऑफ़ कॉन्शसनेस बेस्ड कथांविषयीचा द्रुष्टीकोण, आणि सर्वात खटकणारा म्हणजे गालिब आदिं नी एनरीच केलेल्या उर्दु पोएट्री विषयीचा कमालीचा पुरेशा वाचनाअभावी तयार झालेला आउटलुक. मला एक गंमत वाटते त्यांचा सक्खा मित्र ग्रेस यांनी एकदा तरी त्यांना गालिब आदिंची अभिजात पोएट्री त्यांच्या सुंदर शैलीत क्लास घेउन शिकवायला हवी होती ( ते उत्तम शिक्षक-वक्ता होते म्हणुन) म्हणजे जी.ए. जे ग्रेट वाचक होते ते एका आनंदाला असे पारखे राहीले नसते. अर्थात हे काही फ़ार महत्वाचे नाही.
जी.ए. पत्रलेखक म्हणुन वाचक म्हणुन मला अधिक भावतात. त्यांचे पत्रसंग्रह त्यांच्या कथासंग्रहा पेक्षा अधिक मोलाचा दस्तएवज आहे. त्यातही त्यांचे सुनिता बाईंना लिहीलेली पत्रे विशेष. व्हाइल ट्राइंग टु इम्प्रेस अ वुमन मॅन्स जीनीयस ब्लुम्स लाइक नथिंग एल्स म्हणतात त्या प्रमाणे या पत्रांमध्ये त्यांची प्रतिभा अशी काही फ़ुलुन येते की ज्याचे नाव ते. या पत्रांमधुन व्यक्त होणार त्यांच अभिजात चिंतन आणि त्यामागुन डोकावणारा एका अफ़ाट संवेदनशील माणसाचा चेहरा. हा पत्रलेखक जी ए इतका रीयल लाइफ़ ट्रॅजीक हिरो त्यांच्या कुठल्याही कथेतील कॅरेक्टर/ प्रोटॅगनिस्ट पेक्षा अधिक जवळचा मला वाटतो/ भावतो. त्यांची तडफ़ड थेट मनाला भिडुन व्याकुळ करुन टाकते. जशा त्यांच्या उत्तरकालीन रुपककथां तील पात्रांपेक्षा पुर्वकालीन राधी सारखी पात्रे अधिक जवळची वाटतात तसेच.
आपल्या मराठीत वर्ल्ड लिटरेचर ला उत्तर देण्यासाठी जी.ए. एक बेस्ट पर्याय होते. यात काहीच शंका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...आणि सर्वात खटकणारा म्हणजे गालिब आदिं नी एनरीच केलेल्या उर्दु पोएट्री विषयीचा कमालीचा पुरेशा वाचनाअभावी तयार झालेला आउटलुक. मला एक गंमत वाटते त्यांचा सक्खा मित्र ग्रेस यांनी एकदा तरी त्यांना गालिब आदिंची अभिजात पोएट्री त्यांच्या सुंदर शैलीत क्लास घेउन शिकवायला हवी होती
ग्रेस आणि जी ए ह्यांची मैत्री म्हणजे पत्रमैत्रीच होती. प्रत्यक्ष भेट नाहिच. पण एकमेकांबद्दल विशेष आस्था असलेली दिसते.
"तुम्ही एकमेकांना का भेटला नाहित?(किम्वा जी एं ना भेटला नाहित ह्याबद्दल वाईट वाटते का?)" असे विचारले गेल्यावर ग्रेस उत्तरले:-
"ती भेट होणे नव्हतेच. आमच्या भेटीचा तेजलोळ सहनच झाला नसता. धरणी थरारली असती." हे ते अतिशय गंभीरतेने म्हटल्याचे स्मरते.
त्यांच्या कविता समजत नाहित हे ठाउक होते; त्यांच्या मुलाखतीही समजू शकत नाही हे तेव्हाव कळाले.
.
.
जी ए सुद्धा पूर्ण समजले नाहितच. पण आवडले जरुर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

त्यांचा केवळ एकच कुठलाही कथासंग्रह वाचला तरी त्यानंतर वाचलेल्या कुठल्याही कथेत फ़क्त त्याच पॅटर्न ची पुनरावृत्ती केवळ आढळते.
........तसे तुम्हांला आढळल्यास नवल नाही. 'पिंगळावेळ' कथासंग्रहाच्या सुरुवातीस August Strindberg चे उद्धरण आहेच -
"Shallow people demand variety – but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक जी !
अगदी खर हा कोट तर जी.एं. चा हॉट फेव्हरीट होता पण तीच तर विलक्षण विसंगती आहे जी.ए. त्याच विचार-व्युहाच्या अभिव्यक्तीत व्हरायटी डिमांड करीत होते.पण त्यांच्या च पत्रात स्वतःवीषयी म्हणतांना अर्थातच त्यांना आय अ‍ॅम बंडल ऑफ कॉन्ट्रॅडिक्श्न्स आहे यात काहीच गैर वाटत नसे आणि त्यात काय चुकही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगवेगळ्या काळांतल्या , प्रसंगी वास्तवातल्या व्यक्ती आणि कथांमधल्या व्यक्तीरेखा यांना समोरासमोर आणून उभं करणं, त्यांच्यात संवाद घडवणं हा जीएंच्या कथांमधला एक पॅटर्न आहे असं दिसतं. "भेट" या कथेमधे अश्वत्थामा गौतमाला (तो बुद्ध बनायच्या आधी) भेटतो. बुद्धाच्या तत्वज्ञानामागे करुणेचं जे तत्त्व आहे त्याचा उगम हा चिरंतन वेदनेच्या दर्शनामुळे असावा, असं जीए सूचित करतात. हा पॅटर्न "यात्रिक" या कथेमधेही येतो. डॉन क्विक्झोट् (की किओटे ?) , सँको पान्झा यांना बायबलमधलं ज्युडास हे पात्र भेटतं. अशी इतर काही उदाहरणं देता येतील. "प्रॉमिथ्यूस" या ग्रीक मिथकाची पुनर्रचना जीए करतात. मृत समुद्रासारख्या भौगोलिक घटनेतून "अस्तिस्तोत्र" लिहितात - थोडक्यात अस्तित्वाच्या टोकावर असलेलं काहीतरी ते त्यात शोधताना दिसतात.

थोडक्यांत, त्यांच्या नंतरच्या कथांमधे माणसाच्या स्वभावाबद्दल, माणसाच्या एकंदर संचिताबद्दल भाष्य करणं, त्याकरता कथा हे माध्यम वापरणं हे करताना जीए दिसतात. मिथकांची पुनर्रचना करू पाहणं, व्यक्तीरेखांना कालावकाशाच्या किंवा वास्तव-अवास्तवाच्या सीमारेषांच्या अलिकडे पलिकडे नेणं या सर्वांमागे उपरोक्त मनुष्यजातीबद्दलचं भाष्य हे उद्दीष्ट दिसतं. सामाजिक/राजकीय/तात्कालिक जीवनचित्रण यांपासून ते फारकत घेताना दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.