बॉम्बस्फोट आणि शहर

तरतरीत सकाळ
चकचकीत शहराची
नेहमीची गजबज
सरावल्या गर्दीची

लख्ख उजेडात
दिपला गोळा
अनुभवला दुर्मिळ
स्फोटाचा सोहळा

रूपेरी ढगांना
किनार अंधारी
कोंदू पाहते
जमीन सारी

कायापालट तिथे
झालेला असा
मघाचा रस्ताही
दिसेना कसा?

भोवताली कोण?
बोलेना कोण!
बोलले कोण?
ऐकेना कोण!

कामाचे हात
कायमचे निवांत
कोवळ्या स्वप्नांची
नजर नभात

रूग्णवाहिकांचे
ध्वनिक्षेपकांचे
मिसळले आवाज
जिवंत शरीरांचे

आकांत आक्रोश
बडवून छाती
अनवाणी मनाची
क्षणात माती

सरकारी गणवेश
सांडले मागून
शांतीचे सर्वांना
करती आवाहन

दुपार होता
स्थिरावले सारे
संध्याकाळी नेहमीचे
झोंबले वारे!

field_vote: 
0
No votes yet