अथातो प्राकृत जिज्ञासा। - ४

अथातो प्राकृत जिज्ञासा। - १
अथातो प्राकृत जिज्ञासा। - २
अथातो प्राकृत जिज्ञासा। - ३

आत्तापर्यंतच्या विवेचनाचा गोषवारा घेतला तर एक गोष्ट स्पष्ट होतेय, ती ही की, यजुर्वेदही ज्याला प्राचीन म्हणतो, त्या (अति)प्राचीन काळात असलेली अव्यक्त, अव्याकृत, अखण्डित अशी भाषा, वायुच्या साहाय्याने मध्ये धरून व्यक्त, व्याकृत, खण्डित केली आणि त्यामुळे त्या भाषेतून अर्थनिश्चिती होणं सुलभ झालं. इंद्राच्या या कृतीमुळेच त्याला प्रथम व्याकरणकर्ता गणलं गेलं. आता ही, इंद्राने निश्चित केलेली भाषा, हीच भारतीय भाषांची जननी अशी मूळ भाषा मानावी लागते.

आता शंकाच घ्यायची झाली तर कुणी यालाही असहमत होईल. सहाजिकच आहे, कारण इंद्राने निश्चित केलेल्या भाषेपूर्वीची व्याकृत भाषा हीच मूळ मानावी, असा त्यांचा आग्रह होईल. पण वैयक्तिक दृष्ट्या मला ते पटत नाही. कारण सांगतो. शेवटी भाषा म्हणजे काय? हा मूलभूत प्रश्न इथे उपस्थित करावा लागतो. सामान्यतः म्हण्टलं तर भाषा हे संवादाचं माध्यम आहे. तेच भाषेचं प्रमुख कर्म आहे. यजुर्वेदातील पुराकथा आहे तशी मान्य करण्याची खरंच काही गरज नाही. आपल्याला त्यावर विचार करून काही गोष्टी समजावून घेणं आवश्यक ठरतं. पुराकथेनुसार देव एकमेकांशी संवाद साधत होते, पण त्यांच्यात संवाद होत होता का? इथे देव म्हणजे गॉड या अर्थी देव घेण्याचीही आवश्यकता नाही. तत्कालीन देव म्हणून जे कोणी होते, त्यांच्या संवादाचं माध्यम असलेली जी भाषा होती, ती त्यांच्यात मूलभूत संवाद घडवण्यास अपर्याप्त होती अर्थात पुरेशी नव्हती. का? तर तिच्या अव्याकृतत्वामुळे दोन किंवा अधिक देव एकमेकांशी संवाद साधण्यात अयशस्वी व्हायचे. एखादा जे म्हणतोय तेच समोरचा समजून घेईल याची कोणतीही शाश्वती नसल्याने संवादच होऊ शकत नसायचा, असाच या ठिकाणी भाव दिसतो आहे. एखादी भाषा, तिचं मूळ कार्य करण्यात अपयशी ठरत असेल तर तिला मूळ भाषेचं स्थान देणं अगदी चुकीचं होईल असं मला वाटतं आणि म्हणूनच तिच्यापेक्षा इंद्राने व्याकृत बनवलेल्या आणि त्यामुळे 'संवादासाठी' पुरेशा बनलेल्या त्या वाणीला किंवा भाषेलाच मूळ भारतीय भाषेचा दर्जा देणं आवश्यक ठरतं. तेव्हा ही जी मूळ भाषा आहे तिला नाव कोणतं होतं तर त्याबद्दल कुठे काहीच माहिती मिळत नाही. म्हणून या ठिकाणी, मी असं नमूद करू इच्छितो की या मूळ भाषेलाच 'प्रकृति' या नावाने संबोधलं जावं.

या मूळ भाषेला 'प्रकृति' हे नामाभिधान मिळालं की बर्‍याच गोष्टींचा तिढा सुटण्यास मदत होते. ती कशी ते पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो.

प्राकृत आधी की संस्कृत आधी हा वाद हजारो वर्षांपासून भारतात लोकं घालत आलेली आहेत. आधी म्हण्टल्या प्रमाणे "प्रकृति: संस्कृतम्। तत्र भवं ततः आगतं वा प्राकृतम्। (हेमचंद्र) अर्थात संस्कृत ही प्रकृति आणि तिच्यापासून उद्भवणारी ती प्राकृत आणि "प्राकृतस्य तु सर्वमेव संस्कृतं योनि:। (प्राकृतसंजीवनी) अर्थात सर्व प्राकृत शब्दांचे संस्कृत (शब्द) मूळ आहेत, अशा प्रकारची वचनं दिसतात तेव्हाच -

नमिसाधु सारखे प्राकृत भाषेची तळी उचलणारे, "सकलजगजन्तुनां व्याकरणादिभि: अनाहितसंस्कारः सहजो वचन्व्यापारः प्रकृति:, तत्र भवं सैव वा प्राकृतम्।" असं म्हणतात. याचा अर्थ हा - सर्वसामान्यांच्या भाषेवर व्याकरणाचे संस्कार झालेले नसतात. ती व्यवहारात सहजगत्या प्रचलित झालेली बोली भाषा असते. नमिसाधु पुढे असंही म्हणतो की प्राकृत म्हणजे 'प्राक् कृतं' अर्थात आधी तयार केलेली भाषा. या भाषेवर व्याकरणाचे संस्कार होऊन संस्कृत तयार झाली. (पाणिन्यादिव्याकरणोदितशब्दलक्षणेन संस्करणात् संस्कृतमुच्यते।")

वाक्पतिराजदेखिल म्हणतो, प्राकृत ही सर्व भाषांची जननी. तिच्यापासूनच संस्कृतादि भाषा तयार झाल्या. प्राकृत अकृत्रिम आणि संस्कृत कृत्रिम. सम्+कृ धातु = परिशुद्ध करणे (To refine) असाच अर्थ आहे. या विवेचनावरून असं सांगतात की पाणिनी - पतंजलि या वैयकरणांनी मूळ प्राकृत भाषेला व्याकरणाच्या चौकटीमध्ये बसवून ग्रांथिक (अभिजात) केलं त्यामुळे ती शिष्ट लोकांची भाषा म्हणून मान्यता पावली. समाजातील शिक्षित वर्ग या भाषेत वाङ्मय-व्यवहार करू लागला.

या दोन्ही मतांचा उहापोह करता कोणत्याही एका मतावर ठाम राहणे कठीण होते मग हा तिढा सोडवावा कसा हा महत्त्वाचा प्रश्न पडतो आणि या प्रश्नाची उकल करण्यासाठी मी मगाशी जो विचार मांडला त्याचा काही तरी उपयोग होईल अशी माझी धारणा आहे.

आता इंद्राने निश्चित केलेली भाषा हीच प्रकृति मानावी या माझ्या मताकडे पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतो. माझ्या या म्हणण्याला आधार देण्याच्या दृष्टीने काही विवेचन करण्याचा प्रयत्न करतो.

भाषिक दृष्टीने संस्कृत आणि प्राकृत यांचं पौर्वापर्य हा नेहमीच वादाचा विषय झालेला आहे. कोणत्याही भाषेमध्ये जेव्हा तुलनात्मक अभ्यास केला जातो तेव्हा त्यातील शब्दांचं वर्गीकरण तीन प्रकारे केलं जातं. हे तीन प्रकार आहेत

१. तत्सम
२. तद्भव आणि
३. देश्य

१. तत्सम शब्द म्हणजे सामान्यतः जे दोन्ही भाषांमध्ये सारखेच असतात.

२. तद्भव म्हणजे सामान्यतः एका भाषेतून दुसर्‍या भाषेत गेलेले आणि त्या दरम्यान त्यांच्यात काही बदल झालेले. यामध्ये बहुदा एका भाषेतल्या त्या शब्दाचा मूळ दुसर्‍या भाषेतला शब्द ओळखणं सहज शक्य होतं.

३. देश्य म्हणजे सामान्यतः एकाच भाषेत असलेले पण दुसर्‍या भाषेत न सापडणारे.

तत्सम आणि तद्भव हे दोन्ही शब्द प्रकार सहज समजू शकतात. अडचण होते ती या देश्य शब्दांच्या बाबतीत. हे शब्द (नामे आणि धातु) यांना आदेश होऊन (नवं अक्षर वा शब्द जोडला जाऊन) तयार झालेले असतात असं साधारणपणे लक्षात येतं. प्राकृताच्या बाबतीत हे देश्य शब्द मूळ संस्कृत नाम आणि धातुंना आदेश लागून तयार झालेले आहेत असं सांगतात. या मतानुसार कोणत्याही भाषेचे या मार्गाने सुलभीकरण करून भाषा सोपी करण्याकडे मानवांची प्रवृत्ती असते असं प्रतिपादन केलं जातं. म्हणूनच संस्कृतचं सुलभीकरण होऊन प्राकृत झाल्याचं सांगितलं जातं. पण हे पूर्णसत्य नाही कारण देश्य शब्दांच्या बाबतीत हे समाधानकारक स्पष्टीकरण होत नाही.

प्राकृत भाषेतील देश्य शब्दांची विपुल संख्या हे प्राकृताच्या अबंदिस्तपणाचे लक्षण आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येतं हे माझं वैयक्तिक मत आहे. देश्य हा शब्दच जो अर्थ दाखवतो त्याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागतं. देश्य म्हणजे देशविशिष्ट. ज्या देशामध्ये म्हणजे परिसरामधल्या मानव-समूहामध्ये एखादी भाषा बोलली जाते, त्या स्थानाशी आणि तिथल्या परिस्थितीशी निगडीत नवीन शब्दांची भर त्या भाषेत नेहमीच पडत असते. बोली भाषा स्वरूपामध्ये असे अनेक शब्द भाषांमध्ये दाखल होत जातात तसेच अनेक शब्द भाषेतून न वापरण्याने बाहेर काढले जात असतात. देश्य शब्दांचं आवागमन भाषेच्या प्रवाहीपणाचं लक्षण आहे. असं असल्यामुळे देश्य शब्द संस्कृत नाम-धातुंना आदेश होऊन बनण्याने ते संस्कृतोद्भव होत नाहीत आणि प्रत्येक देश्य शब्दाचं संस्कृतोद्भव शब्द म्हणून स्पष्टीकरण मिळत नसल्याने तो त्या प्राकृतातला मूळ शब्द बनत नाही जो संस्कृत भाषेच्या उद्भवापूर्वीही असेलच कारण तो तितका प्राचीन आहेच असं आपल्याला नेहमीच म्हणता येत नाही. देश्य शब्दांची निर्मिती ही एक सतत विकसित होणारी प्रक्रिया असल्यामुळे तिचा पौर्वापर्याशी संबंध लावणं अनावश्यक होईल असंच मला वाटतं.

या विवेचनानंतर संस्कृत-प्राकृत संबंधाचा तिढा कसा सोडवायचा हा प्रश्न अनुत्तरितंच राहतो. त्यामुळे याचं उत्तर शोधण्यासाठी अपल्याला पुन्हा एकदा अतिप्राचीन अशा वेद वाङ्मयाकडेच जावं लागतं. वैदिक वाङ्मयाच्या अभ्यासकांचं असं मत आहे की मूळ वेदातल्या ऋचांमध्ये जी भाषा वापरलेली आहे, तिच्यात आणि प्राकृतात बरेच साम्य आहे. या साम्याच्या अनुषंगानेही प्राकृत भाषा अभिजात संस्कृत भाषेच्या पूर्वीची मानली जाते. परंतु हे म्हणनं किती योग्य आहे त्याचा उहापोह करण्यापूर्वी ही साम्यस्थळे पहाण्याचा प्रयत्न करू या.

१. वैदिक संस्कृत भाषेमध्ये प्राकृताप्रमाणेच संयुक्त व्यंजनांमध्ये स्वर घुसवलेला आढळतो.
जसं स्वर्ग => सुवर्ग, तन्व => तनुव, त्र्यंबक => त्रियंबक

२. तृतिया बहुवचनाची रुपं - देवेभि: ऐवजी देवेहि, ज्येष्ठेभि: ऐवजी जेट्ठेहि

३. चतुर्थी वापरण्याऐवजी षष्ठी विभक्ति वापरणं

४. विभक्तिप्रत्ययाचा लोप करणं - उच्चात् => उच्चा, नीचात् => नीचा आश्विनौ => आश्विना

५. 'ळ' चा उपयोग प्राकृताप्रमाणेच वैदिक भाषेत केलेला आढळतो - दुर्दभ => दूळभ, ईडे => ईळे

त्याचप्रमाणे अनेक प्राकृत रुपांचा वापर वैदिक भाषेमध्ये दिसतो.

अशाप्रकारे अतिप्राचीन अशा वैदिक संस्कृताशी प्राकृताचं जे साम्य दिसतं आणि त्याच वेळेला अभिजात संस्कृताशी जे वेगळेपण दिसतं हेदेखिल समजून घेणं गरजेचं आहे.

या संदर्भात वैदिक संस्कृत हे यजुर्वेदोक्त इंद्राने व्याकृत केलेल्या भाषेच्या, ज्याला यापूर्वी आपण 'प्रकृति' या नावाने संबोधलेलं आहे, तिच्या सर्वात जवळचं आहे. ही भाषा अभिजात संस्कृत, जी सध्या पाणिनीच्या व्याकरणाने बांधली आहे, ती नाहीच आहे. यामुळेच वैदिक संस्कृतचे व्याकरण निराळे शिकावे लागते. या व्याकरणाचा वापर केवळ वेदांमधलं संस्कृत समजून घेण्याकरिता होतो. त्यावरून कोणतेही नवे साहित्य निर्माण होत नाही कारण त्यासाठी पाणिनीय संस्कृत उपलब्ध आहेच की! एकदा का सद्य कालीन अभिजात संस्कृत आणि वैदिक संस्कृत निराळं झालं की प्राकृताचं वैदिक भाषेशी असलेलं साम्य, आपण आधी उल्लेखलेल्या 'प्रकृति' भाषेवरून सहजच स्पष्ट होतं.

अभिजातत्वाच्या कारणाने पाणिनी-पतंजलि आदिंच्या व्याकरणाद्वारे संस्कृत अधिकाधिक बंदिस्त झाली आणि त्यातही संस्कृत भाषेला जे धार्मिक महत्त्व मिळालं त्यामुळे ती पवित्र भाषा बनली. यामुळेच ती जशी आहे तशी जतन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. परिणामी तिच्यामधलं प्रवाहीपण संपुष्टात आलं. या उलट प्रकृति भाषा प्रवाही राहिली. त्यामुळे तिच्यामध्ये देश भेदाने नव्या शब्दांची भर होत राहिली आणि भारतातील वेगवेगळ्या स्थानानुसार महाराष्ट्री, शौरसेनि आणि मागधी अशा भाषांचा विकास झाला. पुढे याच भाषांपासून अर्वाचीन मराठी, हिन्दी, कन्नड अशा भाषा निर्माण झाल्या.

म्हणूनच आपल्याला असं म्हणता येतं की मूळ प्रकृति भाषेपासून वैदिक भाषा, वैदिक भाषेचे दोन विभाग, एक सद्य अभिजात संस्कृत आणि दुसरा जनसामान्यांच्या प्रकृति भाषेतून उद्भवणार्‍या प्राकृत भाषा. अभिजात संस्कृत व्याकरणबद्ध होऊन बंदिस्त भाषा बनली तर प्राकृत भाषा प्रवाहीपणामुळे सतत विकसित होत राहिल्या आणि म्हणूनच त्यांच्यातून पुढे आजच्या भारतीय भाषा उत्पन्न होऊ शकल्या.

या एकंदर विवेचनावरून आपण निश्चितपणे म्हणू शकतो की संस्कृत आणि प्राकृत या दोघी प्रकृति भाषेपासून उत्पन्न झालेल्या सख्ख्या बहिणी आहेत आणि त्यांच्यापैकी प्राकृत भाषेचा प्रवाहीपणा टिकल्यामुळे वंशविस्तार होऊन आजच्या भारतीय भाषांची निर्मिती झाली तर संस्कृत अधिकाधिक बंदिस्तपणामुळे आपली सृजनशीलता वठवून बसली.

प्राकृत भाषेबद्दल जाणून घेण्यापूर्वी वरील प्रकारे प्रकृती भाषेचं निश्चितीकरण केल्यावर कोणत्याही उच्च-नीच अभिनिवेशाशिवाय आपण विविध प्राकृत भाषांचा आस्वाद घेण्यास मोकळे होतो.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

चर्चा चांगल्या प्रकारे पुढे चालत आहे.

- - -

त्रिमुनींनी "बंदिस्त" केलेली संस्कृत भाषा ही एका काळातला "स्नॅपशॉट" होती. ज्याला प्राकृत म्हणतात, त्या वेगवेगळ्या काळातल्या वेगवेगळ्या बोली होत्या. एककालिक "स्नॅपशॉट" असलेली भाषा एका अर्थाने बंदिस्त आहे, पण त्यांच्या स्वतःच्या सांगण्याप्रमाणे बंदिस्त नाही.

पाणिनीने खुद्द स्वतःच्या व्याकरणाला काही बाबतीत प्रमाण मानलेले नाही. तो म्हणतो "अर्थस्य अन्यप्रमाणत्वात्" : म्हणजे अर्थाचे प्रमाण त्याचे शास्त्र नसून अन्य काही आहे. पतंजली/कात्यायन तर थेटच सांगतात, की व्याकरण न शिकलेले अभिजन हे आपोआप साधुप्रयोग करतात. (पतंजली आणि कात्यायनाचे मत, दुवा.) पण पाणिनि-कात्यायन-पतंजली यांच्या मते त्यांचे वर्णन कुठल्याही प्रकारे बंदिस्त करणारे नव्हते : अभिजनांना योग्य प्रकारे बोलण्यासाठी व्याकरणाचे कुठलेही शास्त्र शिकण्याची गरज नव्हती. पाणिनी-ते-पतंजली ही जी काय २००-३०० वर्षे होती त्या काळातली पंजाबापासून मध्यभारताकडे सरकणारी अभिजनांची बोली ही पुढच्या पिढ्यांसाठी मात्र "बंदिस्त" संस्कृत.

त्यामुळे पुढील वाक्यात मी बदल सुचवतो :

या विवेचनावरून असं सांगतात की पाणिनी - पतंजलि या वैयकरणांनी मूळ प्राकृत भाषेला व्याकरणाच्या चौकटीमध्ये बसवून ग्रांथिक (अभिजात) केलं त्यामुळे ती शिष्ट लोकांची भाषा म्हणून मान्यता पावली.

वेद-ते-पाणिनि-ते-पतंजली काळात अनेक बोली-प्रवाहांपैकी कुठलातरी एक बोलीप्रवाह प्रतिष्ठित होता, त्याचे सूक्ष्म वर्णन पाणिनि-कात्यायन-पतंजली या तिघांनी केले. त्यातल्या त्यात आपल्या काळातल्या अभिजनांच्या बोलीचे अधिक स्पष्ट वर्णन केले.

"अभिजन आपोआप नियम माहिती असल्यासारखेच योग्य बोलतात, भले त्यांना नियम सांगता येत नाहीत" या अर्थाने लेखमालेच्या आदल्या पुष्पात म्हटले होते "सर्व भाषा नैसर्गिकरीत्या व्याकृतच असतात".

मात्र एककालिक संस्कृत ही बंदिस्त आणि अप्रवाही आहे, आणि सार्वकालिक प्राकृत ही प्रवाही आहे, हे थोडेसे खरे असले, तरी थोडेसे न-खरे सुद्धा आहे. तुल्यास-तुल्य म्हणून कुठल्याही एका काळातल्या अभिजनांची प्राकृत (पाली किंवा अर्धमागधी) बोली घेतली, तर ती पाणिनिकालीन संस्कृताइतकीच बंदिस्त आणि अप्रवाही मानावी लागेल. उलटपक्षी (वैदिक भाषा ही पाणिनीने मानल्याप्रमाणे साधु-भाषा [आपल्या शब्दांत "संस्कृत"] मानली, तर) हजारो वर्षांतली संस्कृतही प्रवाही मानावी लागेल.

- - -
वेदांतील स्वरभक्तीचे उदाहरण सुयोग्य आहे.
माहाराष्ट्री प्राकृतात जशी व्यंजने लोप पावतात एकापाठोपाठ एक स्वर येतात, तशी उदाहरणेसुद्धा वेदांत कधीमधी दिसतात. चाळणी या अर्थाने "तितउ" शब्द आहे. आणखी एक असा शब्द लक्षात येईल तेव्हा देईन. ("पउ..." असा काहीतरी शब्द आहे.)

मात्र वेदांतील भाषा ही पुढल्या कुठल्याही प्राकृतापेक्षा पाणिनीय संस्कृताच्या अधिक जवळ जाते. मूळ मंत्रांत प्राकृताशी साम्य असलेले शब्द शोधून-शोधून सापडतात. पाणिनीय संस्कृताशी साम्य मात्र अर्ध्याहून अधिक शब्दांत दिसते.

- - -
अर्थातच पाणिनिप्रोक्त वेद+संस्कृत यांच्या काळात आणि आदल्या काळात वेगवेगळे अभिजन-समूह होते, आणि त्यांच्या वेगवेगळ्या बोली होत्या. त्या सर्व बोलींना प्राकृत म्हटले, तर प्राकृत ही संस्कृताच्या आदली किंवा समांतर भाषा होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमाला वाचतो आहे. पण हळूहळू समजायला थोडं जड जात चाललं आहे. म्हणजे युक्तिवादाचा साधारण गाभा कळतो पण संदर्भ नीट कळत नाहीत. काही ठिकाणी विशेष ज्ञान गृहित धरल्यासारखं वाटतं. उदाहरणार्थ वेदांचा कालखंड, पाणिनीचा कालखंड नक्की कुठचा याबद्दल साधारण अंदाज दिला तरी उपयुक्त ठरेल.

या एकंदर विवेचनावरून आपण निश्चितपणे म्हणू शकतो की संस्कृत आणि प्राकृत या दोघी प्रकृति भाषेपासून उत्पन्न झालेल्या सख्ख्या बहिणी आहेत आणि त्यांच्यापैकी प्राकृत भाषेचा प्रवाहीपणा टिकल्यामुळे वंशविस्तार होऊन आजच्या भारतीय भाषांची निर्मिती झाली तर संस्कृत अधिकाधिक बंदिस्तपणामुळे आपली सृजनशीलता वठवून बसली.

सृजनशीलता आणि वठणेपण याऐवजी वेगळे शब्दही वापरता येतील. असं म्हणता येईल की बंदिस्तपणामुळे किंवा प्रमाणीकरणामुळे संस्कृत आपलं स्वत्व जपू शकली तर इतर भाषा ते स्वत्व हरवून बसल्या आणि विखुरल्या. इतक्या की त्यांच्यापासून नवीन तयार झालेल्या भाषा बोलणाऱ्यांना मूळ भाषा ओळखीची राहिली नाही. एकाच गावात एक कुटुंब वर्षानुवर्षं रहाणं आणि आपल्या पूर्वीच्या पिढ्यांशी ओळख सांगणं एकीकडे तर भटक्या समाजात इतकं स्थलांतर होतं की आपल्या आजीला न ओळखणारी मुलं सापडतात.

कुठलं वर्णन योग्य? आणि वर्णनांवर असा गुणमूल्यांकन करणं योग्य का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमाला रोचक होत चालली आहे. 'प्रकृति'ला भाषा म्हणण्यासाठी ती भाषा असण्याचे 'प्रत्यक्ष-पुरावे' आहेत का? संस्कृत प्राकृतातील तिचे वर्णन नव्हे! 'प्रकृति' ही भाषा न वाटत केवळ कल्पना आहे असे का म्हणू नये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!