दोन चित्रपट

काही घटना आणि त्यांना चिकटलेले चित्रपट. कधीतरी चित्त लावून पाहिलेली चित्रे घटनांना समांतर हलकीच मनावर उतरतात कधी ​आपणच सगळं कोरं मन घेऊन त्यांच्याकडे जातो. तिथं आठवणी, विचार आणि त्यातून डोळ्यापुढच्या दृश्यात एकाग्र व्हायला मागणारे मन, सरत असणारा काळ यांच्यात कसलेसे ताण निर्माण होतात, आंखोमें नमी येते. उमटणाऱ्या हरेक तरंगांना शब्दांच्या चिमटीत धरता येत नाही, पण काहीतरी विलक्षण असते ते मांडावेसे वाटते.

सडा :​ Tree of life

गुंडाळलेली पाईप उलगडत, नळाला तिचे टोक बसवण्याची धडपड करून अंगण ​भिजवून मुमर झालेल्या मातीला शांतवत असता मनातला फुफाटासुद्धा गार होतो.
​त्यावेळी आत्ममग्न क्षणांच्या पसाऱ्यात शहारा विरून ​जातो​. शब्दांनी अडवणूक करण्याला त्याला अवसर नाही. स्मरणाची धार उडवून गेलेला एखादा प्रसंग आठवणार चुकार. पायाची बोटं मातकट झालेली, वाळत आहेत असं जाणवून देणारी. नाकात मृद्गंध, ओठात थेंब.पापण्या गच्च. कपडे भिजताना थंडीने आत शिरण्याचा चोरटा प्रयत्न. ​तो ​पाईप हातात धरून पाणी उडवतोय . पाईपिच्या तोंडाशी धरलेलं बोट त्याला प्रवाहाची जाणीव करून देते. समोर जाणारं पाणी त्यांच्या अंगावर उडतंय आणि आणि काही पाणी चुकून आपला दाब विसरून बोटांतून ओघळत कोपरयापाशी येऊन अवकाशात स्वतंत्र झेप घेतंय. ते थेट माझ्या पावलांशी, कधी गुडघ्याशी. खालची माती नरम झालीय कळतंय टाचांना.थेंब न थेंब दिसतोय, वाघाच्या डोळ्यासारखा. प्रवाह. क्षणांचा प्रवाह. फेस्टीवलच्या पिक्चरमध्ये हमखास असतं तसं स्लो मोशन. तुझ्या खिदळण्याच्या संगीताला मागे बांधून वाहवत सोडलं आहे. इथे तिथे ते उदबत्तीच्या प्रकाशरेषेपरीस तुझ्या माघारी येतेय. लहान हो अजून. कॅल्विनच्या स्ट्रीप मधल्या, मधल्या कॅल्विन सारखा. हसणारा, हसवणारा. कौतुक साठवणारा. प्रवाहाची जाण असणारा.ही जाण आपोआप गायब करवत नेणारा.उड्या मारणारा. निसटून जाणारच आहेस तर हे घे म्हणणारा. प्रवाहीपण खळाळत ठेवताना.
वाळलेल्या पानांचा ढिगारा त्याला monstrous वाटतो. तुझ्याही कल्पनांची काही आड-स्थाने असतील. woods मधून तुझ्या नेहमीच्या वाटा जातातच. त्यांच्या पाठी तुझ्या चप्पल विसरण्याच्या खुणा असतील. tractorच्या चाकांचा माग काढत उतरत आलेला दिवस त्या चाकांच्या पुंगळीतून काडीने पाणी काढून काढून संपला आहे.
तुझ्यात दोघेही वाढत आहेत.तुझे imaginary friends समंजस, आणि तू.
Tree of life बघताना बंदुकीच्या नळीवर बोट ठेवणारा तू आठवलास.मग आपलं पाण्याशी खेळणंही आठवलं. तिथून आतापर्यंत अंतरंग उष्ण होईस्तोवर बरंच आठवलं.फोन वर बोलणं होत नाही असं कधीच. आताही तुला समजलंय सर्व हे ही नाही. पण मला ते परत समजतंय, नको असणाऱ्या, आणि मी सहज फेकू शकणाऱ्या समर्थनांसहित. संवेदनांना रक्ताच्या ओढीची गरज नाही, नाती त्यांची ती राजदार आहेत. आणि तुला मला जोडणाऱ्या थेट रेण्वीय नात्यांना खूप काही सांगितलं आहे त्याच संवेदनांनी.

​बिल्ड :​ Monsieur Lazhar

​काळ्या कन्सोल वर भरभर अक्षरे उमटत जातात. पद्धतशीर, एकाखाली एक शुभ्र लाईन्स. दीड-दोन तासांची गुंतवणूक मोकळी होते. एखादा फालतू चोरटा एरर सगळं पुन्हा नव्याने करायला सांगतो. त्याची फाईल कम्पाईल झाली की काम फत्ते. शेवटच्या इमेजची वाट पहायची.
रात्री साडेतीन वाजता हा उद्योग करण्यात काय मजा आहे ते मलाच ठाऊक आहे.
दीड-दोन तासांचा प्रतीक्षा-काळ कुतूहल, अधीरता यांनी शिगो-शीग भरलेला. त्या संमिश्र भावना ह्या कालावधीला वाढवून ठेवतात. तोवर मग नव्या दुनियेत प्रवेश करावासा वाटतो.
काल सकाळी monsieur lazhar डाउनलोड होऊन कुठल्या वेड्यांसाठी सीडिंग करत बसला होता.
दीड-दोन तासांकरिता म्हणता म्हणता तो पिक्चर त्रिकाळ व्यापून राहणार होता.
दीड-दोन तासांकरिता म्हणता म्हणता आपण त्यासोबत चालू लागतोय, प्रवासभर त्याची सोबत असावी अशी इच्छा घेऊन.
मेमरी,भूतकाळ,इमेजेस,पुरावे,सिंथेसिस, निष्कर्ष.
एरर्स,पश्चाताप,लिंकर्स, समजूत,पॅचेस, रिलीज.
निश्वास, उत्सुकता, कल्पकता, सृजन.
अपेक्षा, इश्युज, घासाघीस, गैरसमज, अज्ञान.
गरज, सखोलता, नांदी, नामुष्की.
कॉन्क्रीट कोड, भय, अपडेट्स, विरह.
मिठी.
सायकल्स.
छातीवर हात ठेवून अभिवादन सहज मनापासून, डोळ्यांत चमक, आश्वासने, डोळ्यांत अपार कुतूहल, डोळ्यांतून पाझरत खोलीभर पसरणारी समतोल सहानभूती.
निर्वासिताला काय देता येणार आहे?
बशीर. परीघांचे बंधन समजून घेता घेता त्याची दमछाक झाली आहे. इतरांच्या परिघांत ती बेलालूम मिसळत असतात त्याच्या चालीतून, बोलण्यातून,
जीव लावण्यातून . काहींचे आकार अजून लहान आहेत, तीव्र आहेत,लवचिक आहेत. काही रिजिड आहेत, सर्वमान्य आहेत. संवाद साधायचाय, थेट, टँजेन्ट, अदृश्य, कसाही. मोकळं व्हायचं आहे रूढ आकारांतून, साचलेपणांतून. जवळचे केंद्रबिंदू मात्र आपल्या मोकळे होण्याच्या प्रयत्नांनी दुरावायचे नाहीत . प्रश्न सार्वकालिक असतात.
निर्वासिताला ते पडण्याची कारणं शोधायची नाहीत. आपल्या त्रिज्या ताडून पहाय्च्यात. साध्या साध्या करण्यांतून जमतील तितके प्रश्न पचवता येण्याचे धैर्य गोळा करायचे आहे.
आणि ते जवळ आलेल्या परिघांना वाटून द्यायचं आहे.
निर्वासिताला काय देता येणार आहे, हे कवच पुढे करायचे नाही. तो शेवटी आपले बाहू पुढे करतो.
हे सगळं मी समजून घेतो. हे सगळंच दीड-दोन तासांत समजत नाही हे माहित असूनही.
हे सगळंच जसं च्या तसं तो समजून देतो असं नाही.
मी पाहत असतो मला नव्याने. स्वप्ने, स्मरणे, कल्पना स्वैर धावत असतात, मनातून असंख्य थ्रेड्स सुटत असतात, समांतर पणे पळत असतात. कडा ओलावून एखादी थ्रेड भूत होऊन बसलेली. वेळेची काळजी घेणारी थ्रेड अचानक आक्रमक बनते. तिला घाई असते. तिला झोपवणाऱ्या थ्रेड्स यादृच्छिक असतात. त्यांचा नेम नसतो. असंख्य थ्रेड्स. अस्ताव्यस्त पसरणाऱ्या या थ्रेड्स एक बिल्ड पूर्ण करायला धडपडत आहेत. माझं बिल्ड. ते मात्र पूर्ण झालेले मला कधीच कळणार नाही. अनंताच्या टोकावर मला त्याचे भानही राहणार नाही कदाचित.
दीड-दोन तास म्हणजे भरपूर मोठा काल आहे.बशीरच्या मिठीएवढा, अलीसच्या डोळ्यांएवढा, सायमनच्या कॅमेराएवढा, आणि मार्टिनच्या आयुष्याएवढा. स्वत:मध्ये अनंत. ​

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

अनोखी ओळखशैली!
प्रयोग आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars