Skip to main content

तत्र श्लोकचतुष्टयम्|

"काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला।
तत्रापि च चतुर्थोऽङ्कस्तत्र श्लोकचतुष्टयम्॥"

(काव्यप्रकारांमध्ये ’नाटक’ हा प्रकार रमणीय, नाटकांमध्ये ’शाकुन्तल’, शाकुन्तलामध्ये त्याचा चौथा अंक आणि त्या अंकामध्ये ’चार श्लोक’.)

हा श्लोक ऐकून पुष्कळांना माहीत असतो.  ह्यामध्ये उल्लेखिलेले चार श्लोक म्हणजे निश्चित कोणते असा प्रश्न मला जाणवला.  तो मी तज्ज्ञांना विचारला असता चार निरनिराळी मते समोर आली.  त्यांचे हे संकलन.

पहिले मत असे सांगते की दाक्षिणात्य विचारानुसार हे श्लोक क्र. ६,९,१७,१८ असे आहेत.  ते खालीलप्रमाणे:

क्र. ६
यास्यत्यद्य शकुन्तलेति हृदयं संस्पृष्टमुत्कण्ठया
कण्ठस्तम्भितबाष्पवृत्तिकलुषश्चिन्ताजडं दर्शनम्।
वैक्लव्यं मम तावदीदृशमहो स्नेहादरण्यौकसः
पीडयन्ते गृहिणः कथं नु तनयाविश्लेषदुःखैर्नवैः॥

(पिता काश्यपमुनि म्हणतात) आज शकुन्तला जाणार ह्या विचाराने माझे हृदय सैरभैर झाले आहे, अश्रु थांबवलेला माझा गळा भरून आला आहे, अरण्यात निवास करणार्‍या माझी जर प्रेमामुळे अशी विक्लव स्थिति झाली आहे तर सामान्य गृहस्थ कन्याविरहाच्या दु:खाने किती व्यथित होत असतील?

क्र. ९
पातुं न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मास्वपीतेषु या
नादत्ते प्रियमण्डनापि भवतां स्नेहेन या पल्लवम्।
आद्ये वः कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः
सेयं याति शकुन्तला पतिगृहं सर्वैरनुज्ञायताम्॥

(काश्यपमुनि अरण्यातील वृक्षांना उद्देशून) तुम्हाला पाणी दिल्याशिवाय जी स्वत: पाणी पिऊ शकत नाही, आभूषणे धारण करण्याची हौस असतांनाहि तुमच्यावरील स्नेहामुळे जी तुमचे पान तोडत नाही, तुम्ही फुलांनी फुलण्याच्या प्रसंगाआधीच जिचा उत्सव सुरू होतो, अशी ही शकुन्तला पतिगृही जायला निघते आहे.  तिला सर्वांनी त्यासाठी सम्मति द्यावी.

क्र. १७
अस्मान् साधु विचिन्त्य संयमधनानुच्चैः कुलं चात्मन
स्त्वय्यस्याः कथमप्यबान्धवकृतां स्नेहप्रवृत्तिं च ताम्।
सामान्यप्रतिपत्तिपूर्वकमियं दारेषु दृश्या त्वया
भाग्यायत्तमतःपरं न खलु तद्वाच्यं वधूबन्धुभिः॥

(काश्यपमुनि शकुन्तलेच्या सोबतीला निघालेल्या आपल्या शार्ङ्गरवनामक शिष्याबरोबर दुष्यन्ताला संदेश देतात) संयम हेच धन मानणार्‍या आमचा आणि स्वत:च्या उच्च कुलाचा विचार मनात ठेवून, तसेच आम्हा बान्धवांच्या साहाय्याशिवाय तुझ्या मनात हिच्याविषयी जी प्रेमभावना निर्माण झाली ती ध्यानात ठेवून आपल्या अन्य पत्नींसारख्याच समान स्थानाची ही एक असे तू हिच्याकडे पहावेस.  ह्या पलीकडील सर्व भविष्याच्या आधीन आहे, वधूच्या संबंधितांनी ते बोलावयाचे नसते.

क्र. १८
शुश्रूषस्व गुरून् कुरु प्रियसखीवृत्तिं सपत्नीजने
भर्तुर्विप्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीपं गमः।
भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भाग्येष्वनुत्सेकिनी
यान्त्येवं गृहिणीपदं युवतयो वामाः कुलस्याधयः॥

(काश्यपमुनि शकुन्तलेस उद्देशून) मोठयांची सेवा कर, अन्य सवतींशी मैत्रिणींप्रमाणे वाग, पतीने राग केला तरी रुष्ट होऊ नकोस, सेवकांशी आदरपूर्वक वर्तणूक ठेव आणि स्वभाग्यामुळे गर्व बाळगू नकोस.  असे करणार्‍या स्त्रिया गृहिणी म्हणून आदरास पात्र होतात, ह्याउलट वागणार्‍या कुटुंबाला खाली नेतात.

दुसर्‍या मतानुसार भाषान्तरकार एम. आर. काळे हेच श्लोक क्र. ६, १८, १९, २० असे सांगतात. पैकी क्र. ६ आणि १८ वर दिले आहेत.  उरलेले दोन असे:

क्र. १९
अभिजनवतो भर्तुः श्लाघ्ये स्थिता गृहिणीपदे
विभवगुरुभिः कृत्यैस्तस्य प्रतिक्षणमाकुला ।
तनयमचिरात् प्राचीवार्कं प्रसूय च पावनं
मम विरहजां न त्वम् वत्से शुचं गणयिष्यसि ॥

बाळे, उच्चकुलीन पतीच्या श्लाघ्य अशा गृहिणीपदी पोहोचलेली आणि त्याच्या स्थानाला साजेशा अशा त्याच्या कार्यांमध्ये सदैव गुंतलेली अशी तू पूर्व दिशेने सूर्याला जन्म द्यावा तसा लवकरच पुत्राला जन्म दिल्यानंतर मजपासून दूर गेल्याच्या दु:खाला मागे टाकशील.

क्र. २०
भूत्वा चिराय चतुरन्तमहीसपत्नी
दौष्यन्तिमप्रतिरथं तनयं निवेश्य।
भर्त्रा तदर्पितकुटुंबभरेण साकं
शान्ते करिष्यसि पदं पुनराश्रमेऽस्मिन्॥

(मी पुन: ह्या तपोवनात केव्हा येईन असे शकुन्तलेने विचारल्यावर काश्यपमुनि उत्तर देतात) दिगन्तापर्यंतच्या पृथ्वीची सपत्नी म्हणून दीर्घ काळ गेल्यावर, ज्याच्यासमोर दुसरा रथी उभा राहू शकत नाही अशा दुष्यन्तपुत्राचा विवाह करून दिल्यानंतर आणि सर्व कुलभार त्याच्यावर सोपविल्यानंतर ह्या शान्त अशा आश्रमात पतीसह तू पुन: परतशील.

तिसरे मत ’शतावधान’ नावाच्या टीकाकाराच्या हवाल्याने असे सांगते की हे श्लोक क्र. १७, १८, १९, २० असे आहेत.  ह्यांची भाषान्तरे वर दिलीच आहेत.

शेवटच्या मतानुसार हे श्लोक क्र. ६,९,१०,११ असे आहेत.  त्यापैकी क्र. ६ आणि ९ वर दिलेच आहेत.  उरलेले दोन श्लोक असे:

क्र. १०
अनुमतगमना शकुन्तला तरुभिरियं वनवासबन्धुभि:।
परभृतविरुतं कलं यथा प्रतिवचनीकृतमेभिरीदृशम्॥

(वरील श्लोकापाठोपाठ कानी पडलेला कोकिळेचा सूर ऐकून काश्यपमुनि अरण्यानिवासातील बंधु असे जे वृक्ष त्यांनी शकुन्तलेच्या गमनाला मधुर कोकिलगानाच्या प्रतिवचनाने अनुमति दर्शविली आहे.

क्र. ११
रम्यान्तर: कमलिनीहरितै: सरोभि-
श्छायाद्रुमैर्नियमितार्कमयूखताप:।
भूयात्कुशेशयरजोमृदुरेणुरस्या:
शान्तानुकूलपवनश्च शिवश्च पन्था:॥

(आकाशवाणी)  कमलवेलींमुळे हिरव्या दिसणार्‍या सरोवरांनी रमणीय केलेला, दाट सावल्यांच्या वृक्षांमुळे सूर्यकिरणांचा ताव नियंत्रित झालेला, ज्यातील धूळ कमळाच्या केसरांप्रमाणे मृदु आहे असा, जेथील वारा शान्त आणि अनुकूल आहे असा हिचा मार्ग मंगल होवो.

(रणरागिण्यांसाठी वैधानिक चेतावणी - कालिदासाने जेव्हा हे लिहिले तेव्हा ’मिळून सार्‍याजणी’चे अंक त्याच्या वाचनात आले नव्हते म्हणून त्याच्याकडून असे पुरुषप्रधान विचारांचा उदोउदो करणारे लेखन झाले. त्याच्या वतीने मीच क्षमायाचना करतो.)

धाग्याचा प्रकार निवडा:

धनंजय Fri, 14/03/2014 - 04:39

सर्व मतांत ६चे ग्रहण केलेले दिसते.
त्यातील दुसर्‍या चरणाचा अनुवाद जरा सारांशवत् केलेला आहे श्री. कोल्हटकरांनी!

मन Fri, 14/03/2014 - 09:15

वैधानिक चेतावणी भारिच ;)

अवांतर :-

बाकी दुष्यंत - शकुंतला कथा कैकदा मोठ्यांच्या वगैरे बोलण्यात येते. शालेय वयात ऐकली होती ; "हरवलेली अंगठी" वगैरे.
पण आमच्या ऐकण्यात आधी आलेली कथा भाल्तीच सोज्ज्वळीकरण केलेली होती.
कथेत शकुंतलेला दुष्यंत ओळखण्यास नकार देतो तेव्हा ती भयानक संतापते; लै गचाळ शिव्या देते; आजच्या आधुनिक वगिअरे स्त्रियांना
उच्चारायलाही खराब वाटेल अशा शब्दात त्याचा समाचार घेते हे नंतर समजलं.
म्हणजे कुठे ते थोर स्त्री स्वातंत्र्याचे सांस्कृतिक युग अन नंतर अवतरलेला घोर स्त्री पारतंत्र्याचा अंधःकार असे राहून राहून वाटले.
.
.
कुणाकडे त्या प्राचीन वगैरे शिव्यांचे तपशील आहेत काय ?
(वृषल ही एकच शिवी प्राचीन संदर्भातल्या संवादात ऐकू येते; बाकीच्या शिव्या ? )

धनंजय Sat, 15/03/2014 - 03:11

In reply to by मन

सभ्य वाङ्मयात क्वचितच दिसतात, पण...
पुष्कळदा शिव्यांचा उच्चार (तेच शब्द बिगरशिवी म्हणून वापरले त्या उच्चारापेक्षा) वेगळा असतो. अशा काही शिव्यांचा उल्लेख पाणिनीने व्याकरणाच्या नियमांत केला आहे.
दास्या:पुत्रः (शिवी म्हणून अर्थ "रांडेचा", बिगर-शिवी म्हणून अर्थ "दासीचा पुत्र", शिवी म्हणून वापरात फक्त एका "त्र"च्या स्वरावर आघात; सामान्य शब्दार्थ असल्यास "स्या" आणि "त्र" यांतील दोहो स्वरांवर आघात)
पुत्रादिनी (मला समांतर मराठी शिवी माहीत नाही, पण "मुले खाणारी" असा अर्थ. एखाद्या जनावराच्या बाबतीत हाच शब्द बिगर-शिवी सरळसोट अर्थाने वापरता येतो. शिवी असल्यास "त्र"च्या व्यंजनावर आघात नाही, सामान्य बिगर-शिवी अर्थ असल्यास "त्र"च्या व्यंजनाचे द्वित्त - पुत्त्रादिनी असा उच्चार.)

---
पैकी दास्या:पुत्र शब्द शिवी म्हणून मृच्छकटिकात वापरलेला वाचला आहे, पण शौरसेनी प्राकृतात परिवर्तित झालेला.

एके ठिकाणी सूत्रधार रागावून म्हणतो :
आ: दासीएउत्ता जिण्णवुड्ढा, कदा णु हु तुमं कुविदेन रण्णा पालएण णववहूकेसहत्थं विअ ससुअंधं कप्पिजंतं पेक्खिस्सं ।
(मराठी अर्थ : ) एऽ रांडेच्या जिण्णवुड्ढा, रागावलेला "पालक"राजा तुला नववधूच्या सुगंधित केशसंभारासारखा फाडेल, ते मला कधी बघायला मिळेल?

येथे "नववधूला केशसंभार" म्हणजे बहुधा डोक्यावरचे केस नव्हेत, अशी शंका येते. लिङ्गानुशासन नावाच्या वेगळ्याच एका ग्रंथात/टीकेत "स्तनकेशवती नारी लोमशः पुरुषः स्मृतः..." कारिकेचे स्पष्टीकरण वाचले आहे, की "केश"चा अनुरोध योनीकडे आहे, आणि लोमचा अनुरोध शिश्नाकडे आहे. सूत्रधाराच्या "केश"चा अर्थही तसाच असावा अशी शंका मला का येते? नववधूच्या डोक्यावरचे केस फाडण्याबाबत आपण फारसे ऐकत नाही, पण व्रात्य बोलण्यात लैंगिक फाडाफाडीबाबत बोलले जाते.

असो. "दासीएउत्ता" हा शब्द एक-आघात-असलेल्या "दास्या:पुत्रः" संस्कृत शब्दावरून शौरसेनी प्राकृतात आला आहे खास. दोन आघात असलेला दास्या:पुत्रः शौरसेनी प्राकृतात "दासीएपुत्ता" असा आला असता, असे मला वाटते.

बहुधा कालिदासाच्या विदूषक पात्रांच्या तोंडूनही शिव्या आहेत, पण त्याही प्राकृतातच.

-------
इंग्रजीमधले थोडेसे समांतर उदाहरण आठवते. व्यक्तीचे विशेषण म्हणून वापरले तर "नुवबिच्" मध्ये सर्वाधिक आघात पहिल्या अक्षरावर येतो, तर दुय्यम आघात शेवटच्या अक्षरावर. पण सुटा उद्गार म्हणून वापरले तर "नुवबिच्" मध्ये सर्वाधिक आघात शेवटच्या अक्षरावर येतो, आणि दुय्यम आघात पहिल्या अक्षरावर.
दास्या:पुत्र पेक्षा वेगळी बाब अशी की दोन्ही शिव्याच आहेत. समांतर बाब ही, की संदर्भ वेगवेगळा असला तर शब्दातील आघातांचे बलमान बदलते.

बॅटमॅन Sat, 15/03/2014 - 03:41

In reply to by धनंजय

जिण्णवुड्ढा म्ह. जीर्णवृद्धा चे प्राकृतीकरण आहे काय?

आघाताचे विवेचन आवडले. पुत्र आणि सन ऑफ बिच यांतील आघाताच्या सामंतर्याबद्दल एक _/\_
हे तुम्हीच करू जाणे.

धनंजय Sat, 15/03/2014 - 04:28

In reply to by बॅटमॅन

"जिण्णवुड्ढा" असा माझा टंकनदोष आहे. (तुमच्या मनात आला तोच विचार माझ्या मनात आला असावा, आणि वाचन-लेखनात घसरण झाली असावी.) मुळात "जुण्णवुड्ढा" असे आहे. त्याची पारंपरिक संस्कृतच्छाया "जूर्णवृद्ध" अशी आहे. जूर्णचा अर्थ थोडाफार जीर्णसारखाच (मोनिएर विल्यम्सच्या शब्दकोशात "decayed" असा दिलेला आहे.)

राही Sat, 15/03/2014 - 07:45

In reply to by बॅटमॅन

'हे तुम्हीच करू जाणे'
पूर्ण सहमति. श्री धनंजय यांच्या ज्ञानवृद्धतेच्या आविष्काराने नेहमीच दिपून जायला होते.
जाता जाता : मराठीतले जून, जुना, जुनेरे, जुनकट हे शब्द या 'जूर्ण' वरूनच आले असावेत का? गुजरातीमध्ये 'जूना अने जाणीता' असा शब्दप्रयोग आहे तर कोंकणीमध्ये 'म्हातारा' साठी 'जाण्टो' (जाणता) शब्द आहे. अर्थात हे दोन्ही शब्द 'ज्ञानी, ज्ञान' वरून आले असावेत. माणूस जितका म्हातारा तितका तो ज्ञानी अशी समजूत असावी.

मन Fri, 14/03/2014 - 09:15

वैधानिक चेतावणी भारिच ;)

अवांतर :-

बाकी दुष्यंत - शकुंतला कथा कैकदा मोठ्यांच्या वगैरे बोलण्यात येते. शालेय वयात ऐकली होती ; "हरवलेली अंगठी" वगैरे.
पण आमच्या ऐकण्यात आधी आलेली कथा भाल्तीच सोज्ज्वळीकरण केलेली होती.
कथेत शकुंतलेला दुष्यंत ओळखण्यास नकार देतो तेव्हा ती भयानक संतापते; लै गचाळ शिव्या देते; आजच्या आधुनिक वगिअरे स्त्रियांना
उच्चारायलाही खराब वाटेल अशा शब्दात त्याचा समाचार घेते हे नंतर समजलं.
म्हणजे कुठे ते थोर स्त्री स्वातंत्र्याचे सांस्कृतिक युग अन नंतर अवतरलेला घोर स्त्री पारतंत्र्याचा अंधःकार असे राहून राहून वाटले.
.
.
कुणाकडे त्या प्राचीन वगैरे शिव्यांचे तपशील आहेत काय ?
(वृषल ही एकच शिवी प्राचीन संदर्भातल्या संवादात ऐकू येते; बाकीच्या शिव्या ? )

राही Fri, 14/03/2014 - 10:31

आम्हांला शाळेत सांगितलेल्याप्रमाणे ते श्लोकचतुष्टयम् म्हणजे संच क्रमांक १ मधले ६-९-१६-१८ हे चार श्लोक. बाकी फारशी माहिती नाही.

जयदीप चिपलकट्टी Fri, 14/03/2014 - 18:57

"काव्येषु नाटकं रम्यं…. " हा श्लोक ऐकून पुष्कळांना माहीत असतो.  

मलाही माहित होताच, पण या चतुष्टयाबद्दल एकवाक्यता नाही हे मात्र माहित नव्हतं. पण तो कुणी रचलेला आहे, किंवा निदान कोणत्या काळातला आहे याबद्दल काही तर्क आहेत का?

वरची भाषांतरं वाचल्यानंतर माझी स्वत:ची पसंती सांगायची तर ती ६, ९, १०, ११ यांना आहे.

बॅटमॅन Fri, 14/03/2014 - 19:06

श्लोकचतुष्टयम् नक्की कुठले होते हे पहायची उत्सुकता लै म्हंजे लैच दिवसांपासून होती. ती पुरी केल्याबद्दल कोल्हटकर सरांना बहुत बहुत धन्यवाद!!!!

अरविंद कोल्हटकर Fri, 14/03/2014 - 19:23

@राही - ६-९-१६-१९ ह्या क्रमातील क्र.१६ श्लोकचतुष्टयामध्ये गणला जाण्यायोग्य त्यात काही दिसत नाही. माझ्यासमोरील तो श्लोक प्राकृतात आहे आणि अन्य श्लोकांमधे दिसणारा अर्थगौरवहि त्यामध्ये नाही. शकुन्तलेची सखी अनसूया हिच्या तोंडी असलेल्या ह्या श्लोकाची संस्कृत छाया अशी आहे:

एषापि प्रियेण विना गमयति रजनीं विषाददीर्घतराम्।
गुर्वपि विरहदु:खमाशाबन्ध: साहयति॥
(प्रियकरापासून विलग असलेली अशी ही देखील विरहशोकामुळे लांब भासणारी रात्र काढत आहे. (तरीहि) आशाबन्ध हे तीव्र दु:ख तिच्याकडून सहन करवतो.)

(पाठभेदामुळे श्लोकांची क्रमसंख्या बदलून दुसरा कोठला श्लोक क्र.१६ म्हणून मोजला जाणे ही शक्यता विसरता येत नाही.

@मन - शिव शिव, संस्कृत विदग्ध लेखनात शिव्या सापडणे म्हणजे अग्निहोत्र धारण करणार्‍या ब्राह्मणाच्या घरी भोजनात सूकरमद्दव अथवा छागमांस वाढण्यासारखे आहे. शाकुन्तलातील ५ व्या अंकात राजसभेमध्ये शकुन्तलेचा स्वीकार करण्याचे दुष्यन्ताने नाकारल्यावर ती त्याच्याशी धिटाईने जी दोनचार वाक्ये बोलते त्यात तिने त्याला दिलेले सर्वात मोठे दूषण 'अनार्य' असे आहे.

वेणीसंहार नाटकामध्ये कर्ण आणि अश्वत्थामा ह्यांचा कलहप्रसंग तिसर्‍या अंकात आहे. त्यात ते एकमेकांना भरपूर लागट बोलतात. त्यातील शिव्या म्हणजे 'मूढ, भीरु, राधागर्भभारभूत, सूतापसद, वाचाट, वृथाशस्त्रग्रहणदुर्विदग्ध, आयुधानभिज्ञ, दुरात्मन्' इत्यादि. ह्या 'शिव्या' समजण्यासाठी शब्दकोष घेऊनच बसायला हवे!

शहराजाद Fri, 14/03/2014 - 23:08

In reply to by अरविंद कोल्हटकर

अवांतरः
अनार्य वरून आठवले- मागे आम्ही हौशी 'संगीत शाकुंतल' केले होते. त्यात शकुंतला दुष्यंताला दुष्ट, अनार्य अशा शिव्या देते. जुन्या संस्कृत नाटकांत स्त्री पार्ताच्या तोंडी शिवी असल्याचे हे एकच उदाहरण असल्याचे आमच्या नाटकाच्या मास्तरांनी सांगितले होते. मला हे दोन्ही शब्द शिव्या म्हणून , तेही आपल्याला गरोदर असताना टाकणार्‍या माणसासाठी, खूपच सपक वाटले होते. तेव्हा, अनार्य = आर्यपुत्र नाही असा = दुसर्‍या बापाचा असा (ओढून ताणून) गूढार्थ त्यांनी सांगितला होता.

नंदन Sat, 15/03/2014 - 05:35

In reply to by शहराजाद

अनार्यवरून 'मानापमना'तल्या पदातली ही व्याख्या आठवली :) -
अनार्या खास ती समजा ॥ न गणित जी स्वपतिमनपूजित नरवरवरित देवकार्या ॥

(संदर्भ - पाळीव प्राणी)

'न'वी बाजू Sun, 16/03/2014 - 08:29

In reply to by शहराजाद

अनार्य = आर्यपुत्र नाही असा = दुसर्‍या बापाचा

अच्छा! म्हणून 'अनार्य' ही शिवी होते तर! रोचक आहे.

पण मग एक शंका: दुसरा बाप आर्य असल्यास ते कोशर मानले जात असावे काय?

(मला स्वतःला तर 'आर्यपुत्र' हेच संबोधन 'ज्याचा नेमका बाप कोण हे गुलदस्तात आहे (पण आर्यांपैकीच असावा, असा बेनेफिट ऑफ डौट द्यावयास सहसा प्रत्यवाय नसावा) (आणि म्हणूनच जेनेरिक संबोधनाचे प्रयोजन असावे)' अशा प्रकारे प्रतीत होतो - फॉर व्हॉटेवर द टॅबू इन्हरण्ट देअरइन मे बी वर्थ. असो.)

शहराजाद Sun, 16/03/2014 - 15:05

In reply to by 'न'वी बाजू

पण मग एक शंका: दुसरा बाप आर्य असल्यास ते कोशर मानले जात असावे काय?

आपला प्रश्न एकदम रास्त आहे. त्याला उत्तर हे की, आम्हाला ते माहित नाही.

'न'वी बाजू Mon, 17/03/2014 - 08:11

In reply to by शहराजाद

'आर्य' आणि 'कोशर' या दोहों शब्दांचे प्रस्तुत एकाच वाक्यातील सहअस्तित्व / जक्ष्टापोझिशन हा निव्वळ योगायोग समजावा.

राही Fri, 14/03/2014 - 23:33

In reply to by अरविंद कोल्हटकर

टंकनचूक झाली. पहिल्या मताप्रमाणे ते चार श्लोक ६-९-१७-१८ असे आहेत ना? मला संच क्र. १ मधले हे चार श्लोकच अभिप्रेत होते.

राही Sat, 15/03/2014 - 07:53

या चार श्लोकांतल्या 'शुश्रूषस्व गुरून्' या श्लोकावर आधारित किंवा तसाच अर्थ असलेले एक जुने मराठी गीत आठवले. माणिक वर्मांनी गायलेले 'जा मुली, शकुंतले सासरी' हे ते गाणे.

अजो१२३ Sun, 16/03/2014 - 18:26

हा धागा खोलण्यापूर्वी, कालच मी मुलाला इंग्रजीत दुष्यंत शकुंतला यांची कथा 365 Indian Mythology Stories(अ) मधून वाचून दाखवली. मलाच अगोदर कथा नीट माहीत नसल्याने एक एक वाक्य भाषांतर करताना ती खूलवून सांगू शकलो नाही. आजच हा धागा पाहिला आणि यातले कंटेंट कळले. आता -
१. दुर्वास ऋषिने तिला तू ज्याची आठवण करत आहेस तो (म्हणजे दुष्यंत) तूला विसरेल असा स्पष्ट शाप दिला असताना (आणि ती अंगठी प्रड्यऊस करू शकली नसताना, दुर्वास म्हणाला होता कि अंगठी दाखवली तर याददाश वापस आएगी) दुष्यंताला शिव्या, दुषणे का दिल्या? कि तिचा शापावर विश्वास नव्हता असे लिहिले आहे? नाटकात बेसिक लॉजिक पाहिजे ना?
२. बाकी कालिदासाचे जाऊ द्या. पण "रणरागीणींना वैधानिक चेतावणी" असे ज्याने स्वतः लिहिले आहे त्याने (म्हणजे धागालेखकाने) ही चूक फ्रेज निवडली आहे. कालिदासाने काही अनुचित लिहिलेच असेल तर रागीणी आणि राग दोहोंना राग यायला हवा. पैकी केवळ हा (कालिदास कृत अन्याय चव्हाट्यावर आणणे) स्त्रीयांचाच मुद्दा आहे असे अभिप्रेत असणे देखिल आरोपी के कटघरे मे खडा करने के लिए काफी है.
३. बाकी कालीदास पुरुषप्रधानवादी होता अशी सुचवणारी किती वाक्ये या धाग्यात (भाषांतरांत) आहेत? मला असे एकही वाइट वाटायसारखे वाक्य दिसले नाही म्हणून लिहितोय.
४. कालिदास बिचारा स्त्रीपिडित होता असे ऐकून आहे, याची झलक त्याच्या साहित्यावर पाहायला मिळते का?

घाटावरचे भट Mon, 17/03/2014 - 13:42

श्लोक क्र. १७ वरही आधारित एक गाणे संगीत शाकुंतल नाटकात असावे असे वाटते. 'निग्रहानुग्रही दक्ष आम्ही जाण हे' असे त्याचे शब्द आहेत आणि हे गाणे कोणा ब्राह्मण कुमाराच्या तोंडी आहे. वसंतराव देशपांड्यांच्या 'मराठी नाट्यसंगीताची वाटचाल' या रेकॉर्ड मधे हे गाणे ऐकता येईल. मला सगळी अक्षरं आठवत नाहीत, कोणाला माहिती असल्यास इथे द्यावी. म्हणजे गाण्यात काही इतर श्लोकांचही भाषांतर केलंय की काय ते कळेल. बाकी गाणे झकासपैकी दरबारी कानड्यात बांधलेले आहे.