गणितज्ञांच्या अद्भुत कथा – 9: काळाच्याही फार फार पुढे...

प्रत्येक कालखंडात अलौकिक प्रतिभाशाली असे म्हणवून घेणार्‍या काही व्यक्तींचा जन्म होतो व इतरांपेक्षा अत्यंत वेगळेच - व तेही बालवयापासून - ही प्रतिभा व्यक्त होत असते. अशा व्यक्तींना चाइल्ड प्रॉडिजी असे म्हटले जाते. अलिकडचेच उदाहरण घेतल्यास कुमार गंधर्वाचे गायकीतील प्राविण्य ते 8-10 वर्ष वयाचे असतानासुद्धा लक्षात येण्यासारखे होते. शकुंतलादेवीचे बालपणापासूनचे अंकगणितातील अनेक आकड्यांचा तोंडी गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ इत्यादींना काही क्षणातच काढून दाखवण्याचे कौशल्य आश्चर्यकारक वाटण्यासारखी गोष्ट होती. काही जण चित्रकलेतसुद्धा अशाच प्रकारची प्रतिभा दाखवलेला उदाहरणं इतिहासाच्या पानात सापडतील. विज्ञानातही अनेक चाइल्ड प्रॉडिजी होऊन गेले आहेत. अगदी 13 व्या वर्षी शोधनिबंध लिहून डॉक्टरेट मिळवलेली उदाहरणंसुद्धा आहेत.

गणिताचेच उदाहरण घ्यायचे ठरवल्यास 1811 साली फ्रान्समध्ये जन्मलेल्या एव्हरिस्ट गाल्व्हा (Everiste Galois) याचे मॅथेमॅटिकल प्रॉडिजी म्हणून सर्वात वरचा क्रमांक असू शकेल. याच्या संदर्भातील अत्यंत दुखद घटना म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी अगदीच क्षुल्लक कारणासाठी त्याचा झालेला मृत्यु. पिस्तूल शूटिंगच्या द्वंद्वयुद्धात कोवळ्या वयातील त्याच्या मृत्युमुळे गणित विषयातील कॉम्प्लेक्स संख्या व इतर अनेक गणितीय सिद्धांत जगापुढे येऊ शकल्या नाहीत, असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. त्याचा अकाली मृत्यु होईपर्यंत त्याच्यातील बुद्धीमत्तेची कदर केली नाही. वेडसर मुलगा म्हणून त्याची हेटाळणी झाली व तो जे काही सांगत आहे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा मृत्यु टाळता आला असता. परंतु तथाकथित अभिजनांनी डोळेझाक केल्यामुळे गणितविश्वाचे फार मोठे नुकसान झाले, हे नाकारण्यात हशील नाही. गणिताच्या इतिहासाच्या पानी ही एक हृदयद्रावक घटना म्हणूनच त्याच्या मृत्युच्या संदर्भाचा उल्लेख असेल. त्याचीच ही एक काल्पनिक कथा.

"रात्रीचे 10 वाजून गेले आहेत. सकाळ व्हायच्या आत मी मरून जाईन" गाल्व्हा,
"कदाचित तू मरणारही नाही", त्याचा सांत्वन करणारा मित्र.
अवघ्या वीस वर्षे वयाच्या गाल्व्हाला मित्राच्या शब्दावर विश्वास बसत नव्हता. उद्याचा मृत्यु अटळ आहे याची त्याला पूर्ण खात्री होती. पॅरिस शहराच्या उपनगरातील दुसर्‍या मजल्यावरील भाड्याच्या एका छोट्या खोलीत तो राहत होता. काय करावे ते सुचत नव्हते. नुसते येरझारा घालत होता. लाकडी फळ्यांची जमीन असल्यामुळे आवाज येत होता. गाल्व्हा एकदम हडकुळा, पाप्याचे पितर दिसत होता. मात्र डोळ्यात चमक होती. चेहरा अगदीच लहान मुलासारखा दिसत होता. डोळ्यात स्वप्नं होती. "मला नेम धरता येत नाही. मी काही शूटर नाही. मी गणितज्ञ आहे. आणि मला द्वंद्वयुद्धाला आव्हान देणारा सैन्यातील प्रशिक्षित शूटर आहे. मी कसा काय या युद्धात जिंकून जिवंत राहू शकतो?"
"काही वेळा नशीब साथ देत असते. नेम धरून मार. व होप फॉर द बेस्ट. “
28 वर्षे वयाचा ऑगस्ट शुव्हालिये (August Chevalier) हा गाल्व्हाचा जवळचा मित्र. या कठिण प्रसंगात मदत करण्यासाठी धावून आलेला. मित्राला शांत करण्यासाठी व शेवटच्या क्षणापर्यंत आशा सोडू नकोस हे सांगण्यासाठी तो त्याच्याबरोबर त्या शेवटच्या रात्री खोलीत होता.
"कदाचित तुझ्या प्रतिद्वंद्वीचा नेम चुकेल!"
गाल्व्हा मित्राकडे वळून,” हे आव्हान कुठल्याही प्रतिष्ठेसाठी नाही. येथे प्रतिष्ठा पणाला लावलेली नाही. किंवा एखाद्या प्रेमिकेचे मन जिंकण्यासाठीसुद्धा नाही. मुळात येथे कुठलीही तरुणी नाही. फक्त माझ्यावर दोषारोप केले जात आहेत. मला ठार मारण्यासाठी कट रचला आहे. विनाकारण मला गोवण्यात येत आहे. यामागे राजाची माणसं आहेत. त्यांना मला संपवून टाकायचं आहे."
"मग द्वंद्वयुद्धाला तू जावू नको."
"मला जायलाच हवे. कारण त्यांनी मला उघड आव्हान दिलेले आहे. "
"कुठे तरी दूर जाऊन लपून बस. पळून जा"
"ती राजाची माणसं आहेत. पाताळातून हुडकून काढतील."
1832 सालचा मे 29 तारखेचा तो दिवस होता. गाल्व्हा राहत असलेल्या त्या उपनगरात दुपारी पाऊस पडला होता. रस्त्यात चिखल भरला होता. रस्त्यावरून जात असलेल्या घोड्यांचा आवाज, गाड्यांचा आवाज, जमलेल्या गर्दीचा आवाज एकमेकात मिसळल्या होत्या. गाल्व्हाचे डोके भणभणत होते. रस्त्यावर गॅस लँप्स मंद प्रकाश ओकत होत्या. गाल्व्हाच्या येरझारा थांबल्या. खिडकीतून आकाशाकडे बघत
"मी मेलो तर माझ्याबरोबरच माझे विचार व नवीन कल्पना मरून जातील. गणिताविषयीच्या अनेक कल्पना माझ्या डोक्यात आहेत. वयाच्या चौदाव्या वर्षीच बीजगणित हा विषय शास्त्रीय संगीतासारखा आनंद देणारा, रोमांचित करणारा विषय आहे, हे मला जाणवले. त्याचा अभ्यास करताना मला एक वेगळीच अनुभूती येत होती. ते नेमके काय, हे मी शब्दात पकडू शकत नव्हतो."
"मित्रा, आज आपल्या समोरचा प्रश्न गणिताचा नसून तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. उद्याच्या शूटिंगमध्ये कोण जिकणार व कोण मरणार हा प्रश्न आहे." ऑगस्टची टिप्पणी.
"तस काही नाही! कल्पना फार महत्वाच्या असतात. आणि या कल्पना कुणी तरी आपले ऐकावे म्हणून धडपडत असतात."
गाल्व्हाचा चालण्याचा वेग वाढला. खोलीतच जॉगिंग करत असल्यासारखा तो धापा टाकत होता.
"मी बसत असलेल्या या खुर्चीप्रमाणे वा भोवती जे काही दिसते त्या प्रमाणे समीकरणं, त्यांचे फॅक्टर्स, समीकरणांची उत्तरं, समीकरणांचे गट माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसत असतात. हे गट मला मूळ समीकरणापर्यंत नेतात. हे गट नेमके काय आहेत ते मी शब्दाने वर्णन करू शकत नाही. या गटांचे पर्म्युटेशन्स व कॉम्बिनेशन्स मला सहजपणे करता येतात. माझ्या डोक्यातील कल्पनांना वाट करून द्यायलाच हवे. एखाद्या बंदिस्त तुरुंगात असल्यासारखे या कल्पना माझ्या डोक्यात बंदिस्त आहेत."
ऑगस्ट ताडकन कॉटवरून उठून उभी राहिला.
"गाल्व्हा, तू उगीच काही तरी बरळत आहेस.” गाल्व्हाला धरून खुर्चीवर बसवत, “तुझ्या कल्पना तू लिहून काढलेले आहेस ना मग काळजी कसली. त्या सुरक्षित आहेत. तूच म्हणत होतास की हे सर्व लिहून काढल्या आहेत म्हणून... इतर गणितज्ञांशीही तू बोलला असशीलच."
गाल्व्हा, "ओह, त्यांना मी पटवून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला. खरोखरच केला. परंतु काही उपयोग झाला नाही." त्याच्या चेहऱ्यावरून तो वैतागलेला आहे, हे स्पष्ट दिसत होते. "मी त्यांच्याशी वाद घातला, चर्चा केली, ओरडलो, विनवणी केली, चार शिव्याही दिल्या... एखाद्या लहान मुलाला कळेल या शब्दात मी माझ्या कल्पना कागदावर लिहून पाठवले. परंतु या फ्रेंच अकॅडेमी ऑफ सायन्स व विद्यापीठातील मूर्खांना कसे समजून सांगणार?"
"परंतु तुझ्या कल्पना लिहून ठेवलेला आहेस ना?", ऑगस्टचा प्रतिप्रश्न.
गाल्व्हा एका ठिकाणी स्वस्थ बसू शकत नव्हता. ऐकून न ऐकल्यासारखे करत तो झपाझप खोलीत चालू लागला. "ती सर्व मूर्खमंडळी मला पुढे जाण्यापासून अडवत आहेत. माझा सर्वनाश करण्याच्या प्रयत्नात आहेत. एकजात सर्वजण.... परंतु माझ्यासाठी नसले तरी कल्पना काय आहेत हे तरी ऐकून घ्या म्हणाव...”
“गेली कित्येक वर्षे या कल्पना माझ्या मागे लागल्या आहेत. माझ्या डोक्यात येऊन आरडाओरडा करत आहेत. त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाहीत म्हणून तक्रार करत आहेत . कुणी ऐकत नाही म्हणून वैतागलेले आहेत. बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. मला झोपू देत नाहीत. मला स्वस्थ बसू देत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे माझे ऐकूनच घ्यायला कुणीही तयार नाहीत."
मित्राचे समाधान कसे करावे हेच ऑगस्टला कळेनासे झाले. त्याच्या मनातील भीती व राग कसे घालवायचे, हे त्याच्या लक्षात येत नव्हते. काही तरी बोलायचे म्हणून, "कुठल्या कल्पनांच्याबद्दल तू बोलत आहेस?" हा प्रश्न त्यानी विचारला.
गाल्व्हाच्या डोळयातून अक्षरशः पाणी येत होते. मित्राच्या या प्रश्नामुळे त्याला मन मोकळे करावेसे वाटू लागले. चेहऱ्यावरचे भाव बदलले. उत्साह संचारला. "म्हणूनच मी तुला आग्रह करून बोलवले. कुणीतरी माझे ऐकून घेतील हा उद्देश त्यामागे होता. मी तुला सर्व सांगणार आहे.”
"एव्हरिस्ट, मला गणितातले काही कळत नाही, याची कल्पना तुला आहे ना?"
गाल्व्हा मित्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत, "या कल्पना स्वतःच आपणहून स्पष्टीकरण देत असतात. अगदी लहान मुलांनासुद्धा त्या कळू शकतील."
"मी प्रयत्न करतो...."
"आपल्यातील बहुतेक जण बीजगणितातील समीकरणातील form व orderमध्ये बदल झाल्यास त्या सोडवता येतील की नाही याचा शोध घेत असतात. माझ्या मते हा निव्वळ मूर्खपणा आहे. माझी पद्धत वापरल्यास त्यांना त्यांचे हे संशोधन थांबवावे लागेल, याची त्यांना भीती आहे. याचे साधे सरळ उत्तर गट सिद्धांतात (Group Theory) आहे. समीकरणांचे अवयव (factors) गटांची बांधणी करतात. या लोकांनी समीकरणाऐवजी गटांचा अभ्यास करावा.”
“गट म्हणजे काय, अवयव म्हणजे काय, हे काही मला समजत नाही.”
गाल्व्हा टेबलावर मूठ आपटत, “मित्रा, जरा डोके चालव! मी काय सांगत आहे ते नीट ऐकून घे! हे सगळे फारच साधं, सरळं आहे. पर्म्युटेसन्स, कॉम्बिनेशन्स वा वेगळी रीत वापरून एखाद्या गटाची व्याख्या करता येईल, समीकरण सोडवता येईल की नाही हेही सांगता येईल. …. इतरांना हे का कळत नाही? अगदी साधी गोष्ट आहे. लहान मुलालासुद्धा कळू शकेल. … "
ऑगस्ट डोळे चोळू लागला. " एव्हरिस्ट, पुन्हा एकदा समजाऊन सांग. मला कळेल. "
घड्याळाचे ठोके पडू लागले. रात्रीचे बारा वाजत होते. "बारा वाजत आहेत. अजून पाच तासानंतर मला त्या वैऱ्याशी झुंजावे लागेल. हे कशासाठी हेच मला कळेनासे झाले आहे. एका तरुणीच्या तक्रारीमुळे, असे मला सांगितले जात आहे. परंतु ते एक निमित्त मात्र. मुळात त्यांना मला संपवायचे आहे. माझ्या कल्पनांना मारून टाकायचे आहे. माझ्या कल्पनांची त्यांना फार भीती वाटत असावी." तो रडकुंडीला आला होता. "फक्त आजचीच ही रात्र…. "
ऑगस्ट गाल्व्हाला हळूच खुर्चीवर बसवला. "हे सर्व मला सांगण्याऐवजी तू लिहून का काढत नाहीस? तू लिहिलेले मी नंतर ज्यांच्याकडे पोचवावेसे वाटते, त्यांच्यापर्यंत पोहोचवितो."
"मित्रा, खरे आहे. हे मी अगोदरच करायला हवे होते. आता मला लिहून काढायलाच हवे. डोक्यातले विचार व कल्पना बाहेर पडायला हव्यात. आज रात्री बसून लिहून काढतो." गाल्व्हा तेथेच असलेले एक क्विल पेन व कोऱ्या कागदाचा गठ्ठा पुढ्यात घेऊन बसला. "परंतु आता हे सर्वच्या सर्व लिहून काढायला वेळ नाही. हे सर्व प्रमेय व सिद्धांत शिस्तबद्धपणे लिहून काढायला कित्येक महिने लागतील. त्यांचे प्रूफ काय आहेत, त्यांचे डेरिव्हेटिव्ह्स काय आहेत हे लिहिणे एवढ्या थोड्या वेळात शक्य होणार नाही. हे दोन – चार तासाचे काम नाही. तू त्यांना सांग की माझ्याकडे या सगळ्यांचे प्रूफ होते. कुणीही माझं ऐकणार नाहीत. मला आता लिहू दे."
"तुझं ऐकणारा एकही जण तुला भेटला नाही? कधीच भेटला नाही?"
"विश्वास ठेव अगर ठेऊ नको. फ्रेंच अकॅडेमी, विद्यापीठ, माझे टीचर्स, या सर्वांना – ऐक तरी -सांगण्याचा प्रयत्न केला. एक जात सर्व जण माझ्या विरोधात होते. त्यांना मुळात ऐकून घ्याचेच नव्हते.”
"जावू दे, एव्हरिस्ट. एवढ मनाला लावून घेऊ नकोस. हे द्वंद्वयुद्ध तुझ्यावर कोसळलेला एक दुर्दैवी प्रसंग आहे. त्याचा फार बाऊ करू नकोस. तुला वाटते तसे त्यात काही कट कारस्थान नाही."
गाल्व्हाचे डोळे विस्फारले. हातातील पेन जोराने आपटत, "तुझा विश्वास बसत नाही? तूच मला सांग. मी, 17व्या वर्षी फ्रेंच विद्यापीठाच्या एकोले पॉलिटेक्निकच्या प्रवेश परीक्षेतील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं लिहिली होती. परंतु तोंडी परीक्षेत मी ते नीटपणे मांडू शकलो नाही म्हणून मला नापास करण्यात आले. प्रश्न एकदम फालतू होते. पेपरवर रीत मांडून गणित सोडवण्याऐवजी मी डोक्यातच सोडवून फक्त उत्तरं मांडत होतो. त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. व त्यांना त्याचा राग आला."
"त्याच वर्षी मी फ्रेंच अकॅडेमी ऑफ सायन्सेसला एक शोधनिबंध पाठवून दिला होता. कॉशी (Cauchy) हा महान गणितज्ञ निबंध वाचून निर्णय देणार होता. मी फार खुश होतो. जेव्हा मी काही दिवसांनी त्याबद्दल विचारपूस करू लागलो तेव्हा त्यांनी निबंध वाचायचा आहे हे विसरून गेला म्हणे. दुसर्‍यांदा चौकशी केली, तेव्हा ते निबंध हरवले म्हणून मला सांगण्यात आले. मला ही गोष्ट कळवलीसुद्धा नाही. परंतु हे कसे शक्य आहे?"
"मोठा गणितज्ञ, कामाच्या व्यापात विसरला असेल…." ऑगस्ट अडखळत म्हणाला.
"ते जाऊ दे. हे कसे काय झाले? 18व्या वर्षी मी एकोले पॉलिटेक्निकच्या प्रवेश परीक्षेत दुसर्‍यांदा नापास झालो यावेळी मला माझे समर्थन करण्यासाठीसुद्धा संधी दिली नाही. तेथील परीक्षक मला चिडवत होते. माझी टवाळी करत होते. टिंगल करत होते. मी रडतच बाहेर पडलो."
"तू त्यांच्यावर बकेट फेकून मारला होतास म्हणे."
"बकेट नव्हे, फळा पुसायचा डस्टर. आणि त्यांना ती शिक्षा द्यायलाच हवी होती."
“19व्या वर्षी गट सिद्धांतावर एक अभ्यासपूर्ण शोधनिबंध लिहून फ्रेंच अकॅडेमी ऑफ सायन्सला पाठवला होता. अकॅडेमीच्या वरिष्ठ सचिवाच्या हातातच ते पोहोचण्याची व्यवस्था केली होती. याचा पुरावा माझ्याकडे आहे. परंतु पाकीट उघडून पाहत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला व दवाखान्यात त्याचा मृत्यु झाला. त्याचे प्रेत हलवायच्या आतच माझा शोधनिबंध गायब झाला होता. शोधनिबंध कुणीच वाचले नव्हते. हे कारस्थान नसेल तर दुसरे काय असू शकते?”
“परंतु हे कसे शक्य आहे...?” ऑगस्ट ततपप करू लागला.
गाल्व्हा त्याला मध्येच तोडत, “याच वर्षी मी अजून एक निबंध लिहून अकॅडेमीला पाठवून दिले. या वेळी प्रसिद्ध शास्त्रज्ञ पॉइस्सन (Poisson)हा त्या निबंधाचा review करणार होता. परंतु निबंध वाचून काढायलाच त्यानी नकार दिला. त्यानंतर खोदून विचारल्यावर मी निबंध वाचून काढलो, परंतु मला त्यातले काही कळले ऩाही, असे सांगितले. माझ्या मते तो चक्क खोटे बोलत होता. मला माहित आहे की त्यानी त्या निबंधाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. मला माहित आहे की त्यांना काही तरी करून मला संपवायचे आहे. माझ्या कल्पना गाडून टाकायच्या आहेत. परंतु कल्पनांना मरण नसते. विचार मरत नाहीत!”
ऑगस्ट सांत्वन करण्याच्या उद्देशाने “द्वंद्वयुद्धात फार फार तर तुला जखम होईल. मी तुला हॉस्पिटलमध्ये ताबडतोब घेऊन जाईन. पूर्ण बरा झाल्यानंतर तू पुन्हा एकदा हे सर्व लिहून काढ. तुला ज्याप्रकारे मांडणी करायचे आहे त्या प्रकारे कर. हवे तसे लिहून काढ. “
मित्राच्या खांद्यावर हात ठेवत, “कल्पनांना वाट करून द्यायलाच हवे. मी जिवंत राहीन की नाही याची मला खात्री नाही. या रात्रीच हे काम पूर्ण ह्वायला हवे.”
“परंतु प्रगत गणितातील रो की ठो मला कळत नाही. तू अंकगणितातील आकड्यांचा वापर करून सांगू शकशील का?” ऑगस्टचा बाळबोध प्रश्न.
गाल्व्हा हातात पेन घेऊन बसला. घड्याळाचे तीन ठोके पडले. “इतक्या लवकर तीन वाजलेसुद्धा! इतर रात्रीपेक्षा आजची रात्र इतकी भराभर का जात आहे?” मुठी आवळत त्रासिक चेहऱ्याने गाल्व्हा बडबडू लागला. “डोक्यातील कल्पना भुणभुण करत आहेत. आरडा ओरडा करत आहेत. हे सर्व लिहून काढले पाहिजे व तेही आत्ताच! आणि मी ते लिहिणार... परंतु वेळ फार कमी आहे. प्रूफ, डेरिव्हेटिव्ह्ज त्यांचे स्पष्टीकरण लिहून काढायला वेळ पुरणार नाही. मी फक्त आता प्रमेयांची मांडणी करेन. त्याचे प्रूफ इतरांनी लिहू दे. प्रूफ मला स्पष्ट दिसत आहेत. परंतु मी जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते ऐकूनच घ्यायला तयार नसतील तर मी काय करू शकतो? त्यांच्यावर मी कसा काय विश्वास ठेऊ?”
“एव्हरिस्ट, ते जाऊ दे. तू आता तरी लिहून काढ.”
एव्हरिस्ट भराभर लिहू लागला. लिहिलेल्या कागदांचा ढीग साचू लागला. “मला वेळ पुरत नाही. मी काय करू....”
खिडकीतून तो बाहेर बघू लागला. अंधार हळू हळू अदृश्य होऊ लागले. अंधुकसा प्रकाश चोर पावलानी शिरू लागला. अरुणोदयाची चाहूल लागत होती. “हाच सूर्येदय मला मृत्युकडे नेणार. यानंतरचा सूर्योदय मी कधीच पाहू शकणार नाही.” त्याचा आवाज क्षीण झाला होता. पुन्हा एकदा घड्याळाचे ठोके पडू लागले. दोघेही ताडकन उठून उभे राहिले. “वेळ झाली आहे. व माझे लिहिणे पूर्ण झाले नाही. अजूनही मला भरपूर काही सांगायचे आहे. परंतु वेळ नाही, जास्त वेळ हवा होता. .... वेळ हवा होता. ....”
तितक्यात दारावर टकटक आवाज आला. पहारेकरी ओरडून सांगत होता, “वेळ झाली आहे, एव्हरिस्ट, तयार हो. वेळ झाली आहे....”

***

अंधार सरकत होता. सगळीकडे धुके पसरले होते. थंडी बर्‍यापैकी होती. 1832, मे 30ची सकाळ. 21 वर्षाचा एव्हरिस्ट गाल्व्हा पॅरिस शहराच्या बाहेरील एका छोट्या मैदानात रक्तबंबाळ होऊन पडला होता. ऑगस्ट शुव्हालियेच्या मांडीवर त्याचे डोके होते. निस्तेज डोळे आकाशात काही तरी शोधत होत्या. गाल्व्हा द्वंद्वयुद्धात हरला होता. काळपुरुषाबरोबरच्या युद्धातही तो हरला होता. दुसर्‍या दिवशी, 31 तारखेला दवाखान्यातील उपचाराच्या वेळी तो मेला. त्याला वेळ हवा होता. व तेच त्याला मिळू शकले नाही.

***

गोष्ट येथेच संपली नाही. 1870 साली, म्हणजे गाल्व्हाच्या मृत्युनंतरच्या 40 वर्षानंतर कॅमिले जोर्डन यानी त्या शेवटच्या कराळ रात्री गाल्व्हाने लिहिलेल्या सर्व प्रमेयांना प्रसिद्धी दिली. तोपर्‍यंत गणितातही भरपूर प्रगती झाली होती. गाल्व्हाला काय सांगायचे होते ते आता गणितज्ञांना कळू लागले. एका क्षुल्लक कारणामुळे अलौकिक प्रतिभाशाली असलेल्या व अकाली अंत झालेल्या या थोर गणितज्ञाच्या विधानांचा अभ्यास करत असताना युरोपियन गणितज्ञ आश्चर्यचकित होत होते. हेटाळणी केलेल्या देशच आता त्याची वाहवा करू लागली. गाल्व्हाच्या प्रमेयामुळे शतकानुशतके आहे त्याच स्थितीत खितपत पडलेल्या बीजगणिताचे स्वरूप बदलले. त्याचा कायापालट झाला. 20व्या शतकातील भौतिकी व रसायनशास्त्र यातील नवीन शोधांना गाल्व्हाच्याच सिद्धांताचा आधार मिळाला.

फक्त त्याचा अकाली मृत्यु झाला नसता तर....
हा जर तर चा प्रश्न असल्यामुळे य़ेथेच थांबणे इष्ट ठरेल.

संदर्भ: मार्व्हेल्स ऑफ मॅथ: फॅसिनेटिंग रीड्स अँड ऑसम ऍक्टिव्हिटीज, ले: केंडाल हॅवन
या पूर्वीचे लेखः भाग 1 । भाग 2 । भाग 3 । भाग 4 । भाग 5 । भाग 6 । भाग 7 । भाग 8 ।

........क्रमशः

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ही लेखमालिका आवडत आहे. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गणिताचाही रक्तरंजित इतिहास ... लेखमाला आवडत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गॅल्व्हाची गोष्ट थोडीफार ऐकून माहीत होती. माझ्या गणित शिकणार्‍या मित्रांना गॅल्व्हा थिअरीवरती आख्खा कोर्स होता. ह्या माणसाने जेमतेम आपल्याच वयाचे असताना काय काय करून ठेवले आहे, ते केवळ समजून घ्यायलाही कष्ट पडताहेत अशी त्यांची भावना होती. गॅल्व्हाच्या ओळखीबद्दल अनेक आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेन ऑफ मॅथेमॅटिक्स वाचताना याच्याशी परिचय झाला होता. जबराट प्रकार. पुनः आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं