ट्रंक, संदूक इत्यादी..

एकंदरीतच, स्मृती म्हणजे बत्तीस मोगरी*. कुठे कसे काय गुपित कुठे दडले असेल याचा नेम नाही. परवा पिझ्झा एक्सप्रेसच्या रेस्तरां मध्ये सजावटीसाठी वापरलेल्या ट्रंका पाहून मेंदूतल्या सुरकुत्यांची बरीचशी उलथापालथ झाली. स्मरणरंजनाचा दोष मान्य आहे. पण आठवणींवरती खरंच ताबा नसतो, त्या कधीही-कुठेही येऊ शकतात.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आजोळी आमचं आणि माझ्या सहा चुलताअजोबांची सहा अशी सगळी घरं पाठीला पाठ लावून आजही तश्शीच आहेत. गोठा, त्यानंतर अंगणवजा रस्ता, कमरभर उंचीचे जोते, ऐसपैस सोपा, स्वयंपाकाची खोली आणि मग आत आणखी एक अंधारी खोली. तिला माजघर म्हणतात हे शाळेत गेल्यानंतर पुढे कधीतरी कळालं. मागे परसात जास्वंदीखाली थंडगार पाण्याचा रांजण आणि मग शेवगा, रामफळ, सीताफळ, पेरू या झाडांसोबत सुखात नांदत असलेली विलायती चिंचांची कैक झाडं.

इतकं असलं तरी त्या काळात आम्हा सगळ्यांनाच माजघरातल्या एका कोपर्‍याचं गूढ आकर्षण होतं. तिथे एक भली मोठी संदूक होती. लहान मुलीच्याने एकटीला उचलणार नाही इतक्या जडशीळ झाकणाची. हळूहळू सवयीनं आणि मोठ्या भावंडांनी शिकवलेल्या क्लृप्त्यांमुळे ते झाकण उघडण्याची कला लीलया जमू लागली. निगुतीनं ठेवायच्या सगळ्या गोष्टी इथंच ठेवलेल्या असत. आजीचं मंगळसूत्र वेगळंच होतं. खूप सार्‍या काळ्या मण्यांमध्ये पेटी, चंद्र-तारे आणि फुले गुंफलेलं. ती त्याला डोरलं म्हणे. आंघोळीला जाताना हे डोरलं या संदुकीतच ठेवलेलं असे. हातावरच्या भाकरीइतकी जाड साय असलेलं दूध, ताकाची घट्ट झाकण लावलेली बरणी, गाडग्यातलं दही. तिथेच बाजूला सोललेल्या चिंचांमध्ये खडे मीठ घालून ठेवलेलं. आम्ही कधीही आलो तरी पटकन खायला काहीतरी असावं म्हणून आजीने मोठ्या आकड्याने काढलेल्या विलायती चिंचा, झाडं पुष्कळ असली तरी बाळगोपाळांच्यामुळे क्वचितच हाती येणारी परसातली फळं, एक ना दोन. झालंच तर अत्यंत नाजूक नक्षीकाम असलेले काचेचे वाडगे आणि भली मोठी काचेचीच फुले ल्यायलेली तसराळी. यापूर्वी अशी भांडी फक्त एके ठिकाणी ईदला गेल्यावरच पाहिलेली. त्यामुळे असल्या भांड्यांचा आमच्या घरात काय उपयोग हे तेव्हाचं मोठं कोडं होतं. संदुकीचं झाकण उघडलं की या सगळ्यांचा छान संमिश्र वास यायचा. कधीकधी हळूच काही घेताना सांडलवंड होणं आणि मग आजीचं लटकं रागावणं हे तर अगदी ठरलेलं. आजोळ म्हणजे ती संदूक आणि संदूक म्हणजेच आजोळ वाटावं इतकी ती पेटी जवळची वाटे. पुढे सुरतेची लूट वाचताना मिठाईंचे पेटारे म्हणून आपल्या घरातल्या संदूकेसारख्याच पेट्या मावळ्यांनी वापरल्या असल्या पाहिजेत अशी माझी पक्की खात्री होती. माझ्या आई-मामाच्या तरूणपणी फोटो काढायाची तितकीशी पद्धत आणि ऐपत नसावी. घरी संदुकीच्यावरच्या बाजूला खिळ्याला मामाचा एक फोटो होता. साखरकारखान्याच्या कुठल्याशा समारंभाला यशवंतराव चव्हाण आले होते तेव्हाच्या गर्दीत मामा एका कोपर्‍यात उभा असलेला. माझा मामा मला कळत्या वयात फक्त तिथेच भेटला. नाही म्हणायला थोडं थोडं अंधुकसं आठवतं. धोतर, काळी गोल टोपी आणि कोट घातलेला, हातात छत्री असलेला मामा. मला खांद्यावर फिरवून आणणारा मामा आणि नंतर त्या फोटो मान तिरकी करून ऐटीत उभा असलेला मामा. मामा गेला आणि आजीने तो फोटोही नंतर त्या संदुकीत पार आत ठेवून दिला.

लहानपणी घरातल्या ट्रंका नेहमी मला अलीबाबांच्या गुहा वाटत. त्यांच्या पोटात लपलेली कुतूहलं पाहायला मी सतत मध्येमध्ये लूडबूड करी. वरचे गल्लीला (आजोळ आणि घर त्याच गावात असल्याने वरचे गल्ली म्हणजे आजोळ आणि पागा गल्ली म्हणजे आमचे घर) संदुकीनंतर नंबर यायचा तो एका ट्रंकेचा. ती ट्रंक म्हणजे माझ्या आईच्या शाळेच्या आठवणींचं भांडार होतं. जुनाट पिवळ्या पडलेल्या पानांच्या वह्या, आईच्या मोत्यासारख्या अक्षरांत लिहिलेली शालागीतं आणि प्रार्थना. या वह्यांसाठी कसे पैसे जमवले आणि बारा आण्यांना तेव्हा कसं बरंच काही मिळायचं हे सगळं सांगत ती हरवून जायची. तिला शाळेत असताना शिवण आणि विणकाम होतं. अत्यंत तलम आणि नाजूक क्रोशांचे तीन रूमाल आणि एक मफलर त्या ट्रंकेत होता. त्या धाग्यांच्या लडी विकत आणणं ही तिच्यासाठी भलेमोठी चैन होती. तिची असोशी पाहून मी ते सगळं विणकाम आणि तिची एकेकाळची होमगार्डची टोपी आपण आपल्या घरी नेऊयात म्हणून हट्ट करायचे. आपल्या कष्टाचं चीज नसलेल्या सासरी नेऊन त्यांचा काहीच उपयोग नाही हे तिला आताशा पुरतं माहित झालं होतं. मग ती खिन्नपणे हसून उदासवाणा नकार देई. एक ना एक दिवस ती हो म्हणेल म्हणून मी प्रत्येक वेळेस ते रूमाल मागत राहिले पण आजीने आणि आईने, दोघींनीही कधीच त्याला होकार दिला नाही.

सकाळी सहा ते संध्याकाळी सहा असं दिवसभरात दीड-दिवसाच्या (दीडीच्या) कामाला दुसर्‍यांच्या शेतात आईला राबवणार्‍या आणि आम्हालाही कुठे भुईमूगाच्या शेंगा तोडायला ने, बेदाणे निवडायला ने असं करणार्‍या आजीला आत्याने लग्नानंतर दुसर्‍यांच्या शेतात असं काम करणं आवडलं नाही. ती आत्या-मामा दोघांनाही आमच्या गावी घेऊन आली. मामांना कारखान्यावर ओळखीने शेतकी मदतनीसाची नोकरी मिळाली. आमचं घर तेव्हा पटवर्धनांकडून पागेची जागा भुईभाड्याने घेऊन आजीने स्वत: वरती बांधकाम केलेलं असं होतं. आत्याचा संसार तसा मोठा. ती दोघं आणि तीन मुलं. कूळकायद्याचा बडगा कडक झाला आणि लोकांना भाड्याने घरे मिळायला अडचण पडू लागली. दर अकरा महिन्यांनी विंचवाचं बिर्‍हाड घेऊन फिरण्याला आत्या कंटाळली. अशातच एकदा ओढ्याकाठाचं घर भाड्याने मिळालं होतं. काही कामानिमित्त मामा परगावी गेलेले. आणि बाहेरून चोरांनी कडीशेजारची जागा पोखरली. सावध झोपेमुळे आत्याला जाग आली आणि तिने आतून कुलूप लावलं आणि मदतीसाठी हाका मारायला सुरूवात केली. माझी आतेभावंडं खूप लहान असावीत, ती भेदरली. आजूबाजूला वस्ती नसल्यानं कुणीच आलं नाही. चोर घाबरून पळून गेले. पण ते दबा धरून बसले असतील म्हणून आत्या रात्रभर हाका मारत राहिली. दुसरे दिवशी तिचा घसा पार कामातून गेला होता. खूप झालं, जसं असेल तसं एका घरात राहू म्हणून आजी आत्याला घरी राहायला घेऊन आली. एका छोट्या दहा बाय दहाच्या खोलीत तिने संसार मांडला. ती खोली फक्त त्यांचं सामान ठेवायला होती, नाहीतर सगळं घर त्यांचंच होतं. आधी एकाच चुलीवर स्वयंपाक चाले. आत्याच्या लहरीवर आईने आधी किंवा नंतर स्वयंपाक करायचा. आत्या घरातच असे, आई तेव्हा डी एड. शिकत होती पण तरीही आईच्या वेळेची कुणाला किंमत नव्हती. नंतर मग काही वर्षांनी आत्याच्या खोलीत स्टोव्ह आला आणि आईची सुटका झाली. आत्याच्या घरी सकाळी पोह्यांचा दरवळ घमघमे. आजी आणि आणि तिचा मुलगा खोलीत जाऊन खाऊन येत. आई गप्प बसे, तिची मुलं तडफड्त. घरात आईच एकटी कमावती असली तरी तिच्या मुलांना काही खाऊ घालण्याचं स्वातंत्र्य तिला नव्हतं. मोठ्या बहिणीला नोकरी लागेपर्यंत पुढे कितीतरी वर्षं कांदेपोहे ही आम्हा मुलांसाठी अप्राप्य गोष्ट होती. आम्हाला त्या खोलीत जायची परवानगी नव्हती. आता आमच्यात खूप प्रेम आहे पण तेव्हा तीच आतेभावंडं आम्ही त्यांच्या घरी पाऊल टाकलं तरी मारहाण करत, चहाड्या करून आणखी मार-ओरडा मिळेल याची व्यवस्था करत. दुपारी आम्ही साधे हरभरे जरी खारवून खाल्ले तरी रात्री तितकाच मग चोप मार मिळे.

आत्याकडे दोन बॅगा होत्या. आकाशी रंगाच्या. आतून गुलबक्षी रंगाचं साटीनीचं अस्तर, अस्तराचे छानशे कप्पे आणि त्या कप्प्यांत काय दडलं असेल याचं आम्हा भावंडांना नेहमी कुतूहल. त्यांनी बॅग उघडली, की आम्ही हळूच जाऊन मागे उभे राहात असू. आत्याकडे एक सोनीचा टेपरेकॉर्डर होता. त्याच्या कॅसेट्स एका बॅगेत छान लावून ठेवलेल्या असत. नेहमीच्या ऐकायच्या वेगळ्या आणि बाकिच्या घरी कुणी खास आलं, त्यांनी फर्माईश केली की लावायच्या होत्या. सुगमसंगीत, ओल्ड इज गोल्ड, HMV च्या बर्‍याचशा, राज कपूर, एक तोहफा पिक्चरची पण होती. या बॅगेला साधारण कधीच कुलूप नसे आणि क्वचित आत्याच्या मुलांचे मित्र मागायला आले तर त्यातून कॅसेटस काढून देणे हे माझे काम असे. मी बरेचदा ती गुळगुळीत कव्हर्स पाहात असे. कधी ती कव्हर्स काढून प्लास्टिकचं आवरण आतूनबाहेरून छान पुसून पुन्हा ती कॅसेट्स लावून ठेवणं हा माझा छंद होता. दुसरी आकाशी बॅग आत्याच्या खोलीत असे. त्यात सगळ्यात वरती पारदर्शक पिशवीत निगुतीने ठेवेलेले गौरींचे हार हा अजूनही त्यांच्या घरातला अभिमानाचा विषय आहे. चार पदरी टपोर्‍या मोत्यांचे सर, उभ्या गौरींच्या कमरेच्याही खाली येतील इतक्या लांबीचे, छान कलाबतू लावलेले, मोहक पदकांचे ते हार अजूनही अगदी तस्सेस आहेत. त्यासोबत मामांचे सिल्कचे गुरूशर्ट, आत्याच्या एकदोन ठेवणीतल्या साड्या, आतेबहिणीला नहाण आलं तेव्हा बाबांनी घेतलेली आजोळची लालचुटूक साडी, तेव्हाही बाबा आदमच्या जमान्यातला वाटेल असा कॅमेरा, असंच काहीबाही ठेवलेलं असायचं. मूड ठीक असेल तर सगळं बरं असायचं, पण नसेल तर तिथे ऊभं राहिल्याबद्दल जाम ओरडा मिळायचा. आत्याने नवीन घर घेतलं तेव्हा दोन्ही बॅगा स्वयंपाकघरातल्या जईवर गेल्या. खूप खोल्यांच्या घरात बरीच कपाटं झाली आणि त्या बॅगांचं महत्व गेलं.

नाही म्हणायला आमच्या घरात दोन ट्रंका होत्या. एक पारच मोडलेली, झाकण न लागणारी अशी दरिद्री ट्रंक होती. तिच्यात कुणाकडून आलेले आणि असेच फिरवायचे आहेराचे खण इत्यादी असं बिनमहत्वाचंच ठेवलेलं असे. दुसरी ट्रंक अजूनही मजबूत आहे. तिला कधीच कुलूप असलेलं आम्ही पाहिलं नव्हतं. त्यामुळं तिच्यात कुणाला रसही नसे. त्यात सांगली हा दक्षिण सातारा जिल्हा की प्रांत असा कायसासा असल्यापासूनच्या घराच्या भुईभाड्याच्या पावत्या होत्या, अजूनही असाव्यात. अगदी आण्यांपासून एक-दोन बंद्या रूपयांपर्यंतचे व्यवहार त्या पावत्यांवर वाचलेले लख्ख आठवतात. कधीतरी अशीच उचकापाचक करताना तीमध्ये नोटांची चित्रं असलेले तीनचार कागद असलेलं लक्षात आलं. आता त्या नोटा एकाच रंगाच्या असल्या आणि अस्सल नोटेसारख्या दिसत नसल्या तरी फुकट ते पौष्टिक म्हणून आम्ही ते गोड मानून घेतलं. मोठ्या कागदांमुळे होणारी अडचण एकदा साग्रसंगीत कार्यक्रमात मी आणि लहान भावाने अतिरिक्त कागद कापून फक्त नोटांचे तुकडे कापून घेऊन सोडवली. दोनचार दिवसांत आमचे उद्योग कळाल्यावर पाठी बर्‍याच शेकल्या होत्या. ते राहत्या घराचं खरेदीखत होतं. सध्या ती ट्रंक आजीच्या खोलीत असते. आमची वडिलोपार्जित जमीन विकून आलेली रक्कम तिने बर्‍याचशा बॅंकांत गुंतवलीय, तिचे कागदपत्र आणि हिशोब तिथे असतात. पहिली अनामत दामदुप्पट होण्याच्या वेळेस तिने माझ्याकडून सगळं व्यवस्थित लिहून घेतलं होतं. आता तिच्या खात्यांमध्ये किती पैसे आहेत ते खुद्द तिलाही माहित नसेल. त्या ट्रंकेत दोन दागिने सुद्धा आहेत. एक आईचं स्त्रीधन-बोरमाळ. आईच्या आईनं तिला लग्नात घातलेली ती बोरमाळ आईचं लग्न झाल्यानंतर वर्षभरातच काहीतरी खुसपट काढून आजीने ती काढून घेतली ती आजतागायत आईच्या अंगास लागलेली नाही. आता आईकडे खूप दागिने आहेत, पण एकेकाळी ती लंकेची पार्वती असताना आजी समारंभात दोन दोन बोरमाळा घालून हिंडे तेव्हा तिला अतीव दु:ख होई. आजीकडे एक जोंधळपोत आहे. पूर्वी चारपदरी होती. आत्याच्या मुलाने दुकानासाठी म्हणून दोनवेळा गहाण टाकायला घेतली होती. दुसर्‍या खेपेस एका बाजूचे चारपदर काढून परत दिली. माझ्या आईचा लेकीवारसाने आलेला हिस्सा काढून घेतला म्हणून. आमच्यावर गुरगुरणारी आजी तेव्हा मूग गिळून गप्प बसली. त्या जोंधळपोतीला एक नाजूकशा मोत्यांचा घोस आहे. गांधीवधाच्या काळात हुपरीकरांचा वाडा पंधरा दिवस जळत होता म्हणे. त्यानंतर तिथे खेळायला गेलेल्या बाबांना तो सापडला. कधी कुठल्या सोनाराच्या नजरेस जोंधळपोत पडली की तो मागून घेऊन मोती पाहिल्याशिवाय राहात नाही. मला नोकरी लागेपर्यंत आमच्या घरी कसला दागिना म्हणून नव्हता. अगदी बहिणींना पाहायला आल्यावरही आजीने कधी ती जोंधळपोत आम्हाला दिली नाही. अजूनदेखील ’मी मेल्यावरच तुम्हाला काय ते मिळेल’ म्हणून करवादते. आता कुणाला त्या जोंधळपोतीची असोशी वाटण्याऐवजी तिच्यासोबत कटू आठवणीच जोडल्या आहेत.

औरंगाबादला एक पेटी आहे. गौरींच्या कपड्या-दागिन्यांची. इकडे सगळ्या पद्धतीच वेगळ्या. गौरींची महालक्ष्मी झाली, सोबत पोरेबाळेही आली. आमच्याकडे आधी डब्यावर डबे ठेवून वरच्या डब्यात मोठ्या तांब्यामध्ये गौरीचा मुखवटा ठेवत, आताशा थेट सांगाडेच बनवून घेतलेयत. खांदा म्हणून दोन हॅंगर्स आडवे बांधले आणि मानेसाठी आधार देऊन मध्ये कापड गुंडाळले की गौरी तीन दिवस हलत नाहीत. औरंगाबादला मोठ्या मापट्याच्या आकाराचे लोखंडी धड आणि कमरेपासून वरती कापडी सांगाडे आहेत. त्या मापट्याला कोठ्या म्हणतात. या पेटीत एक काळसर सुती कपडा आहे. कपडा कसला, अगदी चिंधीच. सोन्याचं कारण नसतानाही जतन झालेली. तो खरातर कोठीत आधाराला घालायचा कपडा आहे, निखिलच्या आजीपासूनच्या वेळचा. हे सांगतानाही आईंच्या चेहर्‍यावर कौतुक असतं. त्यांच्या चेहर्‍यावर मला कितीतरी महलक्ष्म्यांच्या आठवणी सहज वाचता येतात. मग गौरींचे एक एक करून जमवलेले दागिने, अगदी साड्यांना लावायच्या पिनांसह सगळं निगुतीनं ठेवलेलं. बाळगोपाळांसाठी कधीकाळी शिवलेल्या कपड्यांचा एक जोड. मुलीसाठी अनुष्काचं बाळलेणं. चारदोन वर्षांपूर्वी नवीन शिवलेले काही कपडे. ते बाहेर काढताना तिच्या लहानपणी ती कशी द्वाड होती याच्या कौतुकमिश्रित आठवणी. सामान बाहेर काढायचं सोडून गप्पांना रंग चढतो.

परवा त्या ट्रंका पाहिल्या आणि या सार्‍या ट्रंका नजरेसमोरून झरझरत गेल्या. सध्या ट्रंका राहिल्या नाहीत, त्या ठिकाणी ट्रॉली बॅग्ज आहेत. त्यात कधीतरी बारीक झाले तर घालेन म्हणून ठेवलेले माझे आवडते काही कपडे, शाली-स्वेटर्स ठेवली आहेत. अधिक काळाच्या प्रवासाठी बॅगा काढताना मला नेहमीच वेळ लागतो. व्यवस्थित असलेल्या वस्तू सरळ ठेवण्याच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा माझाच खजिना नजरेखालून घालते.

*- श्रेयअव्हेर- वि. स. खांडेकर

field_vote: 
4.857145
Your rating: None Average: 4.9 (7 votes)

प्रतिक्रिया

वा! काय सहज ओघ आहे या लिखाणाला. कसलाही अभिनिवेश नाही. कडवटपणा नाही. स्थळाचं, वस्तूंचं, वातावरणाचं रसाळ वर्णन करावं आणि त्यामागून नात्यांमधले ताणेबाणे अलगद उलगडत जावेत, असं फार कमी वेळा होतं. ते किती कठीण, हे अनेकवार चरफडून अनुभवलं आहे. म्हणून या तालेवार सहज लेखाचं विशेष कौतुक.

अजून लिहा ओ ताई...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मकी (पुन्हा) लिहु लागली.. आमी नाही पाहिली
मकी (पुन्हा)लिहु लागली.. आमी नाही पाहिली
Wink

जाता जाता: का कोण जाणे शांता शेळक्यांची "पैठणी" आठवली!

मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकांनों आजीला माझे कुशल सांगा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

व्वा! मस्तं. आजीच्या घरी असलेल्या जुन्या कपाटांच्या/ ट्रंकांच्या आठवणी जाग्या झाल्या. गौरी मुखवटे आणि हँगरचं वर्णन पण माझ्याघरातल्या सारखच. लिखाण खूप आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

वा खुप सुंदर शैली. वेगळ्याच, हलवून जाणार्‍या आठवणी. मौनराग मधला एलकुंचवारांनी शब्दातून तर सचिन खेडेकरांनी आवाजातून उभा केलेला वाडा आठवला. अजून लिहा ना .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बादवे, जोंधळपोताचा फटु मिळेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आहाहा.. मस्त लेख.

ती लहानपणची हिरवी, आकाराने मोठ्ठी आणि व्यस्त प्रमाणात बारीक हँडल असल्याने बोटांना काचणारी ट्रंक आठवली.. आणि त्यातला खजिनाही.

त्या ट्रंकांना एक विशिष्ट वास असायचा. त्याचं वर्णन करता येणार नाही.

बाकी:

मोठ्या कागदांमुळे होणारी अडचण एकदा साग्रसंगीत कार्यक्रमात मी आणि लहान भावाने अतिरिक्त कागद कापून फक्त नोटांचे तुकडे कापून घेऊन सोडवली.

आयायायाया... :Sp :Sp

जाता जाता : हे पिझ्झा एक्प्रेस कुठेशी आलं म्हणायचं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हिवियाना मॉल, ठाणे.
पुन्हा जायची इच्छा आहे इतकं भारी आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

वाह! मस्त लिहीलयं जोँधळपोतसोबत जोते, तरसाळेचापण फोटो बघायला मिळेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मकी फार सुंद॑र लिहिलंएस! पणजोबांचा जुना वाडा होता नगरमधे, त्यात एक अंधारात कुणाला दिसेल, न दिसेल अशी एक छोटी खोली होती, आमची पणजी त्यात साखर, विरजण वगैरे महत्त्वाच्या वस्तू ठेवायची आणि कुलुप घालून किल्ली गळ्यात अडकवायची, त्याची आठवण झाली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तय मावशे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काय जबरदस्त लिहिलंय!!

नात्यांचे पीळ पन्नास पन्नास वर्षांनंतरही उलगडता उलगडत नाहीत... आणि तुम्ही अशी एका फटक्यात खपली उडवून टाकलीत.

छानच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नात्यांचे पीळ पन्नास पन्नास वर्षांनंतरही उलगडता उलगडत नाहीत... आणि तुम्ही अशी एका फटक्यात खपली उडवून टाकलीत.

वा! छान प्रतिसाद.

लेखही अतिशय आवडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख लिहिताना आवेशात लिहिला, पण नंतर प्रकाशित करण्यासाठी साशंक होते. थोडी गृहछिद्रं, जी सगळीकडे थोडीफार असतातच. पण मग हालाखीचं बालपण, आईला अद्यापही होत असलेला त्रास हे ही आता जीवनाचा भाग असल्यासारखं झालंय आणि आता परिस्थिती बरीच बदललीय. तरीपण मग हे लिहिण्यानं काय होईल? माझं मन शांत होईल हे होतं, पण त्यापलिकडे जुन्या दु:खद आठवणी उगाळणं असं तर होणार नाही ना, असं थोडंसं वाटलं होतं.

जोंधळपोतीच्या फोटोसाठी आता तासगांवला जावं लागेल. जाईन तेव्हा अवश्य काढेन तिचा फोटो. जोंधळ्यासारख्या टप्पोर्‍या मोत्यांचे सर असतात नुसतेच. आमच्याकडे तिला मधोमध मोत्यांचे घस लावले आहेत. दागिन्यांच्या दुकानाबाहेर बसलेले लोक (आमच्याकडे त्यांना आत्तार/अत्तार म्हणतात) हवं तसं गाठवून देतात.
मोठ्या मामेभावाच्या लग्नाच्या वेळी जोता आणि सोपा पाडून घर मोठं करण्यात आलंय. तसराळ्यांचा फोटो मिळेल, मामेभावांच्या मुलांच्या तावडीतून राहिली असतील तर नक्की.

ऋ, मला देखील लिहितानाच 'पैठणी' आठवली होती. Smile

अवांतरः ऋ. जोते, जोंधळपोत यावरून मला तुझा हरवत जाणार्‍या/जुन्या गोष्टींचा उपक्रमावरचा उपक्रम आठवला. तुझ्याकडे त्याचा बॅकप असल्यास पुन्हा सुरू करायचा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

माझ्याकडे बॅकप आहे, उपक्रमावरही ती लेखमाला इथे वाचता येईल.

पुढिल भाग नव्याने सुरूवात करायला हरकत इल्ले. मिड-मे नंतर सुरू करुयात Smile

बाकी यावरून नुकतीचे मेव्हणीच्या लग्नाच्या निमित्ताने अत्तारांकडे दिलेली भेट आठवली. बायकोने मागे हार घेण्याऐवजी एक सुंदरसे मोठे पेंडन्ट घेतले आहे. आता लग्नाकार्याला ते पेंडन्ट साजेशा रंगाच्या माळेत गुंफून वापरता येते. ते काम करायला गेलो असता "अत्तार" नावाच्या प्रकरणाचा मला शोध लागला! काय कसब असते लेकांच्या हातात, ५-१० मिनिटांत एक माळ इतक्या निगुतीने नी सुंदर घडवली की नंतर ती मोडायला जीव होत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय तरल आणि दमदार लेखन. स्मरणरंजनात 'अहाहा, काय त्या पूर्वीच्या सुंदर ट्रंका आणि त्यांच्या त्या सुंदर आठवणी' असं वाहवत जाण्याचा धोका असतो. या लेखात कडू आणि गोड दोन्ही आलेलं आहे. आणि तेही अगदी सहजगत्या आलेलं आहे.

अजून असंच कसदार लिखाण येेऊ द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून असंच कसदार लिखाण येेऊ द्या.

असेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेच दिवस वाचूनही काय बोलायचं हे समजत नव्हतं. पोत असलेल्या गोष्टी, त्यांची वर्णनं, फोटो बघायला, वाचायला आवडतात. पण आपल्या कोणाला त्या खरबरीत पोताचा त्रासही होतो तेव्हा तेच सौंदर्य त्रास द्यायला लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख अतिशय आवडला. 'पैठणी' आणि 'काटेकोरांटीची फुलं' अशा दोन विभिन्न आठवणींची वाचताना सय यावी, असं लेखन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय आवडला. याला 'ट्रंका, एक समृद्ध अडगळ' म्हणावे काय? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्मरणरंजक न होता केलेलं मस्त स्मरण.

स्वगत : आता मोडक असते तर 'मकीच्या मागे लागून तिला एक आख्खं आत्मचरित्रच लिहायला लावा' अशी गळ त्यांना घातली असती असा विचार पुन्हा एकदा मनात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'मोडक असते तर....' हे कितींदा मनात आलंय हे सांगता येणार नाही. लेख लिहितानाच वाटलं होतं की ते असते तर सगळ्यात आधी त्यांना वाचायला दिला असता. ते म्हणायचे, "माझ्या हाताखाली शिकणं अवघड आहे". आणि ते खरंही होतं. मी स्मृतीचित्रेवरती लिहिलेला पहिला खर्डा आणि दुसरा लेख यात बरंचसं अंतर होतं. श्रेय त्यांनाच. आता सुद्धा पुन्हा एकदा लिहितं व्हायचं ठरवलंय, पण अंगातला आळस जायला हवा. बरेचसे लेख अर्धवट लिहून आहेत, तेच आधी पूर्ण करायला घेते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

लेख अतिशय आवडला.

काही प्रतिसादांमधून आलेला पैठणी या कवितेचा उल्लेख सूचक आहे. शांता शेळके यांच्या लिखाणाचा प्रभाव इथे नक्की जाणवतो. त्यांच्या लिखाणातही लेखनविषयातल्या काल-अवकाशामधले सांस्कृतिक संदर्भ येत असत.

लेख लहान मुलीच्या पर्स्पेक्टिव्हने आलेला आहे हा त्यातला सर्वाधिक मोहक घटक आहे. " त्यांच्या चेहर्‍यावर मला कितीतरी महलक्ष्म्यांच्या आठवणी सहज वाचता येतात." यांसारखी अनेक वाक्यं लिखाणातल्या प्रगल्भ सौंदर्याची साक्ष देतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

मस्तच जमलाय.
काळ, वातावरण, माणसं, वृत्ती सगळंच या निमित्तानं डोळ्यांपुढे उभं ठाकलं. साधी 'सुती' भाषाही अनुकूलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

संदुकाट्रंकांच्या निमित्तानं मनाच्या ट्रंकेत बंद असलेल्या आठवणी आवडल्या.
लेख उत्तम झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून लिखाण येेऊ दे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पण मुझे आजोळ आठवले... छान लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय सुरेख ओघ आहे तुमच्या लिखाणाला!
जुन्या काळी ठेवणीतल्या कपड्यांना कसर लागू नये म्हणून त्यात वाळा ( क्वचित तंबाखूही )घालून ठेवत असत. कधी उन्हे दाखवायला वगैरे बासन उघडले की एकदम तो वास दरवळे. तुमचा लेख वाचताना, तुम्ही समोरच ट्रंक उघडून बसला आहात आणि ट्ंकेत भरलेला वास मस्तकात कोंदून राहिला आहे असे वाटले.

आणखी लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच उत्तम लेख ... अजुन येउद्या ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

वाचताना मजा आली. लेख हृदयाला भिडला. पण दुख एकच आज घरात एक ही ट्रंक किंवा संदूक नाही. बालपणी घरात चार-पाच ट्रंका होत्या. त्यातली एखादी जर जपून ठेवली असती तर आज निश्चित उघडून बघितली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहज आठवण झाली म्हणून लेख पुन्हा वाचला. पुन्हा लेख आवडलाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फार आवडला लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय सुन्दर लिखाण आहे !!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0