मतदानाचा कौल घेताना ....

लोकसभेच्या निवडणुका ही भारतीय लोकशाहीची लिटमस टेस्ट असते. म्हणूनच निवडणुकांच्या या अग्निदिव्यातून जाताना लोकशाहीच्या अस्तित्वाचीच विचारपूस करणे, तिच्या संक्रमण अवस्था टिपणे गरजेचे असते. यासाठी एक तर्कशुध्द अभ्यास करणारी शाखा म्हणून सेफॉलॉजी ही ज्ञानशाखा आकाराला आली. सेफॉलॉजीला मराठीत निवडणुकशास्त्र असे म्हटले जाते. मतदानाचा शास्त्रशुध्द अभ्यास हा या शाखेचा मध्यवर्ती विषय आहे. सेफॉलॉजीला शास्त्र म्हणावे की म्हणू नये यावर अनेक तज्ञांमध्ये मतभेद असले तरी मतदानाचा केवळ सांख्यिकीय नव्हे तर गुणवत्तापूर्ण अभ्यास व्हावा यासाठी अशा पध्दतीच्या अभ्यासाची आणि विश्लेषणाची नितांत गरज आहे हे वादातीत.
सेफॉलॉजी (Psephology) हा शब्द ग्रीक शब्दावरुन आला. ग्रीक भाषेत त्याचा अर्थ खडा/ गोटी (pebble) असा होतो. अथेन्समध्ये मात्र या ग्रीक शब्दाचा उल्लेख मतदानाच्या संदर्भाने येतो असे अरिस्टॉटलने द अथेनियन कॉन्स्टीट्युशनमध्ये म्हटले आहे.
अमेरिकेत सेफॉलॉजीचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे दिसून येते. निवडणुकांचा सर्व्हे करणा-या संस्थांचे अंदाज बहुतांश वेळा बरोबर ठरतात असे दिसते. व्दिपक्षीय पध्दतीमुळे निवडणुकांच्या अभ्यासकांचे काम सोपे आहे;भारतात मात्र निवडणुकांचे अंदाज मोठ्या प्रमाणावर चुकतात कारण भारतीय मतदारामध्ये असणारी विविधता. भारतीय निवडणूक आयोगाने १० मार्च २०१४ रोजी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे ६ राष्ट्रीय पक्ष ( बसपा, भाजप,कॉन्ग्रेस,माकप,भाकप,राष्ट्रवादी कॉन्ग्रेस ) आहेत तर १५९३ प्रादेशिक पक्ष ( नोंदणी झालेले पण अजून निवडणूक आयोगाची मान्यता न मिळालेले) आहेत तसेच ८७ निवडणूक चिन्हं आहेत. या आकडेवारीवरुन देखील भारतीय मतदाराबाबतचा अंदाज व्यक्त करणे किती कठीण आहे याची कल्पना केलेली बरी. त्याचप्रमाणे जात,धर्म,वंश..इ घटकांनुसार असणारी राजकीय गणितं ध्यानात घेता कोणत्याही विशिष्ट मतदाराला प्रातिनिधीक मानणे अवघड होते. २००४ साली शायनिंग इंडियाचे कॅम्पेन मोठ्या प्रमाणावर सुरु होते आणि काही निवडणूकांचा अभ्यास करणा-या संस्थांनी भारतीय जनता पक्षाला दोनशेहून अधिक जागा दर्शवत भाजपचे सरकार येईल असे भाकीत केले होते पण भारतीय मतदारांनी मात्र त्यांना साफ खोटं ठरवलं.अलिकडच्या काळात मात्र मतदान पोल सर्व्हे यांचे अंदाज ब-यापैकी बरोबर ठरताना दिसत आहेत. निवडणुकांचा शास्त्रीय अभ्यास अधिक चांगल्या पध्दतीने होतो आहे. सेफॉलॉजीच्या या विकसनामध्ये सेंटर फॉर स्टडीज ऑफ डेवलपिंग सोसायटीज आणि लोकनीती यांचा मोठा वाटा आहे. या सर्वेक्षणामध्ये मतदारांचा अचूक कौल जाणून घेण्यासाठी या संस्थांनी केलेले सॅम्पलिंग तसेच त्यांच्या राज्यनिहाय प्रश्नावल्या अभ्यासनीय आहेत. या प्रश्नावल्या अभ्यासल्या तर आपल्या असे ध्यानात येईल की त्यांची विभागणी तीन भागात आहे- १) राष्ट्रीय पातळीवरील राजकारणासंबंधी प्रश्न- यामध्ये सध्याच्या सरकारबाबतच्या जनतेचे समाधान, त्यांना वाटणारे कळीचे मुद्दे तसेच राष्ट्रीय नेतृत्व म्हणून प्रोजेक्ट केले जात असलेले नेते..इ बाबतचे प्रश्न २) राज्यांनुसार विशिष्ट प्रश्न – त्या त्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षांनुसार बदलणारी राजकीय समीकरणं याला अनुसरुन पडणारे प्रश्न उदा. महाराष्ट्रात केल्या गेलेल्या सर्व्हेमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीत सामील न होता नरेंद्र मोदी यांना दिलेला पाठिंबा यासंदर्भात प्रश्न विचारला आहे. ३) वैयक्तिक माहिती- ज्या मतदाराचे सर्वेक्षण केले जात आहे त्याची/ तिची आर्थिक स्थिती, सोशल लोकेशन यासंदर्भातील माहिती विचारली गेली आहे. २००९ साली या संस्थांनी निवडणुकांबाबत केलेला अंदाज बव्हंशी यशस्वी ठरला होता.
२०१४ च्या निवडणुकांबाबत मात्र निवडणुकशास्त्राचा अभ्यास करणा-यांपुढे मोठे आव्हान आहे कारण पहिल्यांदा मतदान करत असलेल्या नव्या मतदाराची संख्या बारा कोटीच्या घरात आहे. २००९ मध्ये कॉन्ग्रेसला देशभरातून झालेले मतदान ११ कोटी होते या पार्श्वभूमीवर यावेळेसचा युवा मतदार निर्णायक ठरणार आहे पण निवडणूकशास्त्राच्या अभ्यासकांना या युवा मतदाराला समजून घेण्यासाठी नवे मॉडेल निर्माण करावे लागणार आहे. तसेच आम आदमी पक्षासारख्या नव्या पक्षाला समजून घेण्यातही वेगवेगळे पोल्स,सर्व्हे यांना अपयश आल्याचे दिल्ली विधानसभांच्या निकालांवरुन लक्षात आले. मतदारांचा कौल जाणून घेण्याचा सर्वेक्षण करणा-या संस्थांनी तटस्थ राहून काम करणे महत्वाचे आहे हेही यातून लक्षात आले.
वेगवान संक्रमण अवस्थेत असणा-या या भारतीय मतदाराची नस पकडणे कठीण असले तरी सदृढ लोकशाहीसाठी निवडणूकशास्त्राच्या पूर्वगर्हविरहित अभ्यासाची नितांत गरज आहे.
-श्रीरंजन आवटे.

( सदर लेखन ललित प्रकारातील नसून देखील त्या कॅटेगिरीत टाकावा लागत आहे. अ‍ॅडमिनने नोंद घ्यावी ही विनंती )

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)