वना-मनात

मूळ जापानी लेखक : र्‌यूनोसुके आकुतागावा
इंग्रजी अनुवाद ("इन अ ग्रोव्ह"): ताकाशी कोजिमा
मराठी अनुवाद इंग्रजीवरून

[अकिरा कुरोसावा ह्यांनी आपला जगप्रसिद्ध चित्रपट राशोमॉन आकुतागावा ह्यांची ही कथा व त्यांचीच 'राशोमॉन' ही कथा ह्यांना जोडून १९५० साली काढला होता. यूट्यूबवर इथे पहा.]

लाकूडतोड्याने वरिष्ठ पोलीस आयुक्तांना दिलेली जबानी

होय, साहेब. ते प्रेत मलाच सापडलं. रोजच्यासारखा आज सकाळी मी लाकडं तोडायला जंगलात गेलो तेव्हा ते मला डोंगरावर सापडलं. नेमकं कुठे? यामाशिनाकडे जाणार्‍या रस्त्यापासून साधारण १५० मिटर अंतरावर, मळलेल्या वाटेपासून दूर, बांबू व देवदारांची एक राई आहे तिथे.

प्रेत उताणं होतं. अंगात निळसर रेशमी किमोनो होता, आणि डोक्यावर क्योटो पद्धतीची पगडी. छातीवर तलवारीचा वार झाला होता. आजूबाजूच्या बांबूंची पाती रक्तानं माखलेली होती. नाही, रक्त वाहत नव्हतं, सुकलं होतं. माझ्या पावलांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत एक गोमाशी जखमेला चिकटली होती.

काय म्हणता? मला तलवार वगैरे काही दिसलं का? नाही, साहेब. मला फक्त जवळच्या एका देवदाराच्या झाड्याच्या बुंध्याशी एक दोरी सापडली. आणि....एक कंगवा. एवढंच. खून होण्याआधी झटापट झाली असावी, कारण अवतीभवती गवत व बांबूची पाती तुडवलेली दिसत होती.

“जवळपास घोडा होता?”

नाही, साहेब. अहो, घोड्याचं सोडा, तिथं माणसाला जाणंही अवघड आहे.

बौद्ध भिक्षूने वरिष्ठ पोलीस आयुक्तांना दिलेली जबानी

वेळ? काल मध्यान्हीची होती , साहेब. तो बिचारा यामाशिनाहून सेकियामाला जात होता. सोबत घोड्यावर बसलेली एक बाई होती. मला नंतर कळलं की ती त्याची बायको होती. तिचा चेहरा ओढपट्ट्यानं झाकलेला होता. तिच्या कपड्यांचा फिकट जांभळा रंग तेवढा दिसत होता. घोडा बदामी रंगाचा होता. भरघोस आयाळ होती त्याला. बाईची उंची? साधारण साडेचार फूट असावी. काय आहे, मी बौद्ध भिक्षू आहे ना, त्यामुळे तिच्याकडं बारकाईनं पाहिलं नाही. पुरुषाकडे तलवार होती, धनुष्य-बाण होते. मला आठवतय, त्याच्या भात्यात वीस-एक बाण होते.

त्याचं असं काहीतरी होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मानवी जीवन पहाटेच्या दवासारखं, विजेच्या लोळासारखं क्षणभंगुर असतं हेच खरं. सहानुभूती व्यक्त करायला माझे शब्द तोकडे पडताहेत.

पोलीस हवालदाराने वरिष्ठ पोलीस आयुक्तांना दिलेली जबानी

मी ज्याला अटक केली तो माणूस? तो ताजोमारू नावाचा कुख्यात गुंड आहे. मी त्याला अटक केली तेव्हा तो घोड्यावरून खाली पडलेला होता. अवातागुचीच्या पुलावर विव्हळत पडला होता. वेळ? काल रात्रीच्या पहिल्या प्रहरी. साहेब, ह्याचीही नोंद करा की काही दिवसांपूर्वी मी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने तो निसटला. त्याने गडद निळा रेशमी किमोनो घातला होता. त्याच्याकडे एक साधी, मोठी तलवार होती. कुठून तरी धनुष्य-बाणही मिळवले होते हे दिसतंच आहे. तुम्ही म्हणता हे धनुष्य व बाण मयताचे होते? मग ताजोमारूच खूनी असणार. चामड्याच्या पट्ट्य़ांनी लपेटलेलं धनुष्य, काळा, लाखरोगणयुक्त भाता, ससाण्याची पिसं लावलेले सतरा बाण—हे सारं त्याच्याकडं सापडलं. होय, साहेब, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे घोडा उत्तम आयाळ असलेला व बदामी रंगाचा आहे. दगडी पुलाच्या थोडं पलीकडे मला तो रस्त्याच्या कडेला चरताना सापडला. त्याचा लगाम लोंबकळत होता. हा घोड्यावरून पडला त्यात नक्कीच नियतीचा हात असणार.

क्योटोच्या भोवती सावजाच्या शोधार्थ फिरणार्‍या चोर-दरोडेखोरांपैकी ह्या ताजोमारूने शहरातील स्त्रियांना सर्वात जास्त त्रास दिलेला आहे. गेल्या शरदात डोंगरावर टोरिबे देवळात दर्शनाला आलेल्या एका विवाहित महिलेचा व तिच्यासोबत असलेल्या मुलीचा खून झाला होता. ते खून ह्यानेच केल्याचा वहीम आहे. ह्या गुन्हेगाराने जर मयताचा खून केला असेल तर त्याच्या पत्नीचं काय केलं असेल सांगता येत नाही. साहेब, तुम्ही ह्यातही लक्ष घालावं ही विनंती आहे.

एका म्हातारीनं वरिष्ठ पोलीस आयुक्तांना दिलेली जबानी

होय, साहेब. मयत माझा जावई होता. तो क्योटोचा रहिवासी नाही. तो वाकासा प्रांतातील कोकुफू गावी सामुराई होता. त्याचं नाव कानाझावा नो टाकेहिको. वय सव्वीस. शांत स्वभावाचा होता, त्यामुळे कोणाला राग यावा असं काही त्यानं केलं नसावं.
माझी मुलगी? तिचं नाव मासागो. वय एकोणीस. लंबगोल, छोट्या चेहर्‍याची, किंचित सावळी आहे. डाव्या डोळ्याच्या कोपर्‍याशी तिला एक तीळ आहे. उत्साही, मौज-मजा करणारी मुलगी आहे. पण मी खात्रीनं सांगते की टाकेहिकोशिवाय इतर कोणत्याही पुरुषाचा विचारही तिच्या मनाला शिवलेला नाही.

काल टाकेहिको माझ्या मुलीला घेऊन वाकासाला जाण्यासाठी निघाला. त्याचा असा दु:खद अंत झाला हे केवढं दुर्भाग्य. माझ्या मुलीचं काय झालं असेल? जावई गेला हे मी स्वीकारलय पण माझ्या मुलीची खूप काळजी वाटते हो. काहीही करा पण तिला शोधून काढा. तो दरोडेखोर ताजोमारू का कोण, वाटोळं होईल मेल्याचं! नरकात पडेल तो! माझ्या जावयालाच नाही तर माझ्या मुलीलाही....(तिचे पुढील शब्द आसवांत वाहून गेले.)

ताजोमारूने वरिष्ठ पोलीस आयुक्तांना दिलेली जबानी

मी त्याला मारलं पण तिला नाही. ती कुठे आहे हे मला ठाऊक नाही. एक मिनिट थांबा. माझा कितीही छळ केलात तरी जे मला ठाऊकच नाही ते तुम्ही माझ्याकडून वदवून घेऊ शकणार नाही. आता गोष्टी एवढ्या थराला गेल्या आहेत की मी तुमच्यापासून काही लपवून ठेवणार नाही.

काल दुपारनंतर थोड्या वेळानं मला ते जोडपं भेटलं. तेवढ्यात वार्‍याची एक झोत आली व तिच्या चेहर्‍यावरील वस्त्र जरासं दूर झालं. मला क्षणभर तिचा चेहरा दिसला. ताबडतोब झाकला गेला. ती बोधीसत्त्वासारखी दिसत होती; ते एक कारण असावं. त्याच वेळी मी ठरवलं की तिचं अपहरण करायचं, मग त्यासाठी मला तिच्या नवर्‍याचा खून करावा लागला तरी बेहत्तर.

का? माझ्यासाठी खून करणं ही तुम्ही समजता तितकी महत्त्वाची गोष्ट नाही. बाईला पळवायची तर तिच्या नवर्‍याचा खून करावाच लागतो. त्यासाठी मी माझ्या कमरेला लटकणारी तलवार वापरतो. माणसांना मारणारा मी एकटा का आहे? तुम्ही.... तुम्ही तलवारी वापरीत नाही. तुमचा पैसा, तुमची सत्ता वापरून मारता. कधी कधी त्यांच्याच भल्यासाठी मारल्याचा बहाणा करता. हे खरं आहे की ती माणसं रक्तबंबाळ होत नाहीत. त्यांची तब्येत उत्तम राहते, पण तरी तुम्ही त्यांचा खून केलेला असतो. जास्त मोठा पापी कोण, मी की तुम्ही, हे सांगणं अवघड आहे. (चेहर्‍यावर औपरोधिक स्मित.)

पण नवर्‍याला ठार मारल्याशिवाय एखाद्या बाईला पळवून नेता आलं तर बरं. म्हणून मी ठरवलं की तिचं अपहरण करायचं, पण शक्यतो त्याला मारून टाकायचं नाही. हे यामाशिनाकडे जाणार्‍या रस्त्यावर शक्य नव्हतं. त्यामुळे मी त्या जोडप्याला डोंगरांमध्ये घेऊन गेलो.

सोपं होतं ते. मी त्यांचा सहप्रवासी झालो, आणि त्यांना सांगितलं की त्या डोंगरात एक उंचवटा होता. मी तो खोदला तर मला त्यात अनेक तलवारी व आरसे सापडले. पुढे मी त्यांना असंही सांगितलं की मी त्या वस्तू डोंगरापलीकडे राईत पुरून ठेवल्या आहेत. कोणाला त्या विकत घेण्याची इच्छा असल्यास मी अल्प किमतीत विकायला तयार आहे. मग....असं पहा, हाव फार वाईट, नाही का? त्याच्या नकळत तो माझ्या बोलण्याला भुलू लागला होता. अर्ध्या तासाच्या आत ते घोड्यासकट माझ्याबरोबर डोंगराकडे येऊ लागले.

तो राईपर्यंत आल्यावर मी म्हणालो की खजिना राईत पुरलेला आहे, येऊन पहा. त्याने कसलाच आक्षेप घेतला नाही—हावेनं आंधळा झाला होता ना तो. बाई म्हणाली की ती बाहेरच घोड्यावर थांबेल. झाडी दाट होती, तेव्हा तिचं असं म्हणणं स्वाभाविक होतं. खरं म्हणजे, हे सर्व माझ्या योजनेनुसारच घडत होतं. तिला एकटी सोडून मी त्याच्यासोबत राईत गेलो. काही अंतरापर्यंत राईत फक्त बांबूची झाडं आहेत. साधारण पन्नास वार पुढं गेलं की देवदाराची झाडं लागतात. झाडीतून पुढं जाता जाता मी त्याला थाप मारली की खजिना देवदाराच्या झाडाखाली पुरलेला आहे. असं सांगितल्यावर तो झाडीतून कष्टपूर्वक देवदारांच्या दिशेनं चालू लागला. थोड्या वेळानं बांबू कमी झाले, व आम्ही जिथे देवदाराची झाडं उभी होती तिथं पोहोचलो. तिथे पोहोचल्याबरोबर मी त्याला मागून धरलं. तरबेज, तलवारधारी लढवैय्या असल्यामुळे तो शक्तिमान होता. पण सगळं अचानक घडल्यामुळं त्याला काही करता आलं नाही. मी त्याला एका देवदाराच्या बुंध्याला बांधून ठेवलं. दोरी कुठं सापडली? अहो, मी चोर आहे, कधीही एखादी भिंत चढावी लागू शकते, त्यमुळे दोरी होती माझ्याकडं. त्याने आरडाओरडा करू नये म्हणून त्याच्या तोंडात बांबूची पानं कोंबली.

मग मी त्याच्या बायकोकडं गेलो व तिला सांगितलं की त्याची तब्येत अचानक बिघडली आहे, लवकर चल. अर्थात, ही योजनाही सफल झाली. बाई आपली टोपी काढून, माझा हात धरून राईत आली. आपल्या नवर्‍याला अशा अवस्थेत बघताक्षणी तिने एक खंजीर उपसला. इतकी शीघ्रकोपी स्त्री मी दुसरी पाहिली नाही. बेसावध असतो तर तिनं भोसकलंच असतं मला. मी शिताफीनं वार चुकवला पण ती वार करीत राहिली. मला खोल जखमा केल्या असत्या, कदाचित मारूनही टाकलं असतं तिनं. पण मी ताजोमारू आहे. स्वत:ची तलवार म्यानातून न काढता तिला नि:शस्त्र केलं. बाई कितीही जोशात असली तर शस्त्राविना आपला बचाव करू शकत नाही. त्यामुळे मी तिच्या नवर्‍याचा जीव न घेता तिचा उपभोग घेऊ शकलो.

हो....त्याचा जीव न घेता. मला त्याचा खून करण्याची इच्छा नव्हती. मी राईतून पळ काढणार तेवढ्यात बाईनं रडत रडत माझा दंड घट्ट धरला, व तुटक शब्दांत, कशीबशी म्हणाली की तिचा नवरा व मी ह्यापैकी कोणा एकानं मरणं भाग आहे. तिची झालेली बेअब्रू ही दोन जिवंत पुरुषांना माहीत असणं हे तिच्यासाठी मरणाहून भयंकर होतं. जो जिवंत राहील त्याची मी बायको होईन, असं ती धापा टाकत बोलली. हे ऐकून त्याचा खून करण्याची तीव्र इच्छा माझ्यात जागृत झाली. (विषण्ण औत्सुक्य.)

हे सारं अशा प्रकारे सांगितल्यानं तुम्हाला मी अत्यंत निष्ठुर वाटत असेन. पण तुम्ही तिचा चेहरा पाहिलेला नाहीत. विशेषत: त्या क्षणी तिच्या डोळ्यात असलेलं तेज. आमची नजरानजर झाली, आणि मी ठरवलं की माझ्यावर वीज कोसळली तरी मी तिला माझी पत्नी बनवणार. तिला पत्नी बनवण्याच्या इच्छेनं मी भारून गेलो होतो. तुम्ही समजताहात तशी ही केवळ वासना नव्हे. वासनाच असती तर तिला ढकलून देऊन पळून नसतो गेलो? माझी तलवार त्याच्या रक्तानं कशाला रंगवली असती? पण ज्या क्षणी त्या अंधार्‍या राईत मी तिचा चेहरा पाहिला तेव्हाच ठरवलं की त्याला मारल्याशिवाय तेथून जायचं नाही.

परंतु मला गैरमार्गानं, बांधलेल्या अवस्थेत त्याला मारायचं नव्हतं. मी त्याला सोडलं आणि तलवारीनं माझ्याशी लढायला सांगितलं. (देवदाराच्या बुंध्याशी सापडलेली दोरी त्या वेळी मीच तिथे टाकली होती.) संतापून त्याने त्याची जाडजूड तलवार उपसली व एक शब्दही न बोलता माझ्यावर तुटून पडला. आमच्या लढाईचा शेवट काय झाला हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. तेवीसावा वार....लक्षात ठेवा....तेवीसावा. ह्या गोष्टीनं मी अजून प्रभावित आहे. तोवर तलवारबाजीत कोणी माझ्याशी वीस वारही टिकला नव्हता.(चेहर्‍यावर प्रसन्न स्मित.)

तो घायाळ होऊन पडल्यावर रक्तानं माखलेली तलवार खाली करून मी तिच्याकडे वळलो. पाहतो तर काय, ती गायब झाली होती. ती कुठे पळून गेली काही समजत नव्हतं. मी तिला देवदारांमध्ये शोधलं. कानोसा घेतला, पण त्या मरणोन्मुख माणसाचं कण्हणं तेवढं ऐकू येत होतं.

आम्ही लढू लागल्याबरोबर ती मदत मिळवण्याकरता पळून गेली असावी. हा माझ्या जीवन-मरणाचा प्रश्न होता. त्याची तलवार व धनुष्य-बाण चोरून मी धावत डोंगरी रस्ता गाठला. तिथे तिचा घोडा अद्याप शांतपणे चरत होता. पुढचा तपशील सांगण्यात मी शब्द वाया घालवत नाही, पण शहरात शिरण्याआधीच मी तलवारीची विल्हेवाट लावली होती. एवढंच सांगायचं आहे मला. नाहीतरी तुम्ही मला फासावर लटकवणार ह्याची मला खात्री आहे. (उद्धटपणे.)

शिमिझू मंदिरात आलेल्या एका बाईची कबुली

माझ्यावर बलात्कार केल्यानंतर तो निळ्या रेशमी किमोनोतील माणूस माझ्या बांधून ठेवलेल्या नवर्‍याकडे बघत छद्मीपणे हसला. काय अवस्था झाली असेल माझ्या नवर्‍याची? पण त्यानं कितीही जोर लावला तरी दोरी काही सैल होईना. मी कशीबशी धडपडत त्याच्याकडं गेले. म्हणजे, जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या माणसानं मला ताबडतोब खाली पाडलं. त्या क्षणाला मला माझ्या पतीच्या नजरेत अवर्णनीय, शब्दांपलीकडचं काहीतरी दिसलं....अजूनही त्याचे ते डोळे आठवून मी थरथर कापू लागते. त्याच्या तोंडून शब्द फूटत नव्हता, पण त्याचे डोळे त्यच्या मनातलं सारं काही सांगत होते. त्याच्या डोळ्यात संताप नव्हता, दु:ख नव्हतं.... होती केवळ थंड घृणा. दरोडेखोराच्या मारापेक्षा मी त्या नजरेनं घायाळ झाले; किंचाळले व बेशुद्ध झाले.

थोड्या वेळानं मी शुद्धीत आले तेव्हा तो निळ्या किमोनोतला माणूस तिथं नव्हता. माझा नवरा तसाच देवदाराच्या बुंध्याला बांधलेला होता. मी मोठ्या मुष्किलीनं उठून बसले, आणि त्याच्याकडे पाहिलं; पण त्याच्या नजरेत तोच भाव होता.

त्याच्या डोळ्यातील तुच्छतेआड तिरस्कार होता. लाज, दु:ख, राग.... माझ्या मनात त्या वेळी काय काय होतं ते सांगता येणार नाही. मी चाचरीत नवर्‍याकडं गेले.

"टाकेहिको, झाल्या प्रकारानंतर मला तुझ्यासोबत राहणं शक्य नाही. मी जीव द्यायचं ठरवलं आहे....पण तुलाही मरायला हवं. तू माझी विटंबना होताना पाहिलीस. मी तुला जिवंत ठेवू शकत नाही", मी म्हणाले.

पुढे मी काही बोलू शकले नाही. तो अजूनही माझ्याकडे घृणेनं, तिरस्कारानं पाहत होता. आतडं तुटत होतं माझं. मी त्याची तलवार शोधली. दरोडेखोरानं नेली असावी ती. राईत त्याची तलवार, धनुष्य-बाण, काही सापडेना. सुदैवानं माझा खंजीर माझ्या पायाशी पडला होता. तो उगारून मी म्हणाले, “मला तुझे प्राण दे. मी तुझ्या मागोमाग येतेच.”

हे ऐकून त्याने कसेबसे आपले ओठ हलवले. त्याच्या तोंडात पाने कोंबलेली असल्यामुळे आवाज फुटत नव्हता. पण त्याला काय म्हणायचं होतं ते मी समजले. त्याच्या नजरेतील तिरस्कार म्हणत होता, “मारून टाक मला.” शुद्धीत होतेही आणि नव्हतेही अशा अवस्थेत मी खंजीर त्याच्या जांभळ्या किमोनोतून याच्या छातीत खुपसला.

मी पुन्हा बेशुद्ध पडले असावे. भानावर आले तोवर तो मरण पावला होता—त्याच बद्ध स्थितीत. उतरत्या उन्हाची किरणं देवदार व बांबूंमधून त्याच्या निस्तेज चेहर्‍यावर पडत होती. हुंदके आवरून मी त्याला बांधणारी दोरी सोडली. त्यानंतर माझं काय झालं ते तुम्हाला सांगण्याची आता माझ्यात शक्ती नाही. आत्महत्या करण्याची ताकद उरली नव्हती माझ्यात. मी खंजीर माझ्या गळ्यात खुपसला, व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तळ्यात स्वत:स झोकून दिलं. आणखीही कितीतरी प्रकारे जीव देण्याचा प्रयत्न केला, पण देऊ शकले नाही. अजूनही हे अवमानित जिणं जगते आहे. (एकाकी स्मित.) त्या दयाळू परमेश्वरानंही माझ्याकडे पाठ फिरवली आहे. मी माझ्या पतीचा खून केला. एका दरोडेखोरानं माझी अब्रू लुटली. काय करू मी? काय करू शकते.....(स्फुंदून स्फुंदून रडू लागते.)

खून झालेल्या माणसाच्या भुताचे मांत्रिकामार्फत निवेदन

माझ्या पत्नीवर बळजबरी केल्यानंतर तो दरोडेखोर तिच्याजवळ बसून तिची समजूत काढू लागला. मी, अर्थातच, काहीच बोलू शकत नव्हतो. एका देवदाराच्या बुंध्याला मला बांधून ठेवलं होतं. परंतु त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस असं सांगण्यासाठी मी अनेकदा तिला डोळ्यांनी खुणावलं. मला तिला हेच सांगायचं होतं. पण माझी बायको बांबूच्या पानांवर हताशपणे खालमानेनं बसली होती. तो जे सांगत होता ते ऐकत होती असं वाटतं. मी मत्सरानं जळफळत होतो. दरोडेखोराचं ह्या ना त्या विषयावर चतुर बोलणं सुरूच होतं. शेवटी त्यानं त्याचा धीट आणि निर्लज्ज प्रस्ताव मांडला. “तुझ्या चारित्र्याला डाग लागलाच आहे, त्यामुळे नाहीतरी तुझा नवरा तुला यापुढे नीट वागवणार नाही. त्यापेक्षा तू माझ्याशी का नाही पाट लावत? मी तुझ्या प्रेमात पडल्यामुळेच तुझ्यावर जबरदस्ती केली.”

तो गुन्हेगार बोलत असताना संमोहित झाल्याप्रमाणं माझ्या पत्नीनं वर पाहिलं. इतकी सुंदर ती त्यापूर्वी कधीही दिसली नव्हती. मी असा बांधलेला असताना माझ्या सुंदर बायकोनं त्याला काय उत्तर दिलं असावं? मी आता मृत्यूलोकी नसलो तरी जेव्हा जेव्हा तिचं उत्तर मला आठवतं तेव्हा तेव्हा संतापानं व मत्सरानं पेटून उठतो. खरं सांगतो तुम्हाला, ती म्हणाली, “मग जिथे जाशील तिथे मला तुझ्या बरोबर ने.”

तिचं पाप जर एवढंच असतं तर ह्या अंधारात मला इतक्या यातना होत नसत्या. त्याच्या हातात आपला हात देऊन, स्वप्नात असल्यागत राईच्या बाहेर जाताना अचानक तिच्या चेहर्‍याचा रंग उडाला. देवदाराला बांधलेल्या माझ्याकडे बोट दाखवून म्हणाली, “मारून टाक त्याला! तो जिवंत असेपर्यंत मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.” वेड लागल्याप्रमाणं, "मारून टाक त्याला!” असं पुन्हा पुन्हा ओरडू लागली. अजूनही ते शब्द मला अंधाराच्या अथांग खाईत लोटू पाहताहेत. असे घृणास्पद शब्द कोणत्याही माणसानं कधी उच्चारलेत? असे शापित शब्द माणसाच्या कानांवर एकदा तरी पडलेत? एकदा तरी ....(अचानक तिरस्कारयुक्त आकांत.) तिचे बोलणे ऐकून दरोडेखोरसुद्धा पांढरा पडला. “मारून टाक त्याला,” त्याच्या दंडाला धरत ती म्हणाली. तो तिच्याकडे टक लावून पाहत होता. काहीच बोलला नाही. त्याचं उत्तर काय असेल ह्याचा मी विचार करण्याआधी त्यानं तिला खाली पाडलं. (पुन्हा स्वरात तुच्छता.) हाताची घडी घालत माझ्याकडं बघून म्हणाला, “काय करशील तू हिचं? मारशील की सोडून देशील? तुला फक्त मान हलवून सांगायचं आहे. मारशील?” केवळ त्याच्या ह्या शब्दांसाठी मी त्याला क्षमा करायला तयार आहे.

मी उत्तर द्यायला चाचरत असताना ती किंचाळली व राईत पळून गेली. दरोडेखोरानं तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो तिची बाहीदेखील धरू शकला नाही.

ती पळून गेल्यानंतर त्यानं माझी तलवार व धनुष्य-बाण उचलले. एका फटक्यात माझे बंद कापले. मला आठवतय, तो “आता मी आणि माझं नशीब" असं पुटपुटला. मग तो राईतून निघून गेला. त्यानंतर सगळं शांत होतं. नाही, मला कोणीतरी रडताना ऐकू आलं. उरलेल्या गाठी सोडून मी नीट ऐकलं तेव्हा लक्षात आलं की ते माझंच रडणं होतं. (बराच वेळ शांतता.)

देवदाराच्या बुंध्यापासून मी माझं थकलं-भागलं शरीर विलग केलं. माझ्या समोर माझ्या बायकोच्या हातून पडलेला तिचा खंजीर होता. मी तो उचलला व माझ्या छातीत खुपसला. माझ्या तोंडातून रक्त येऊ लागलं पण मला वेदना जाणवली नाही. माझी छाती गार पडल्यावर सगळीकडे स्मशानशांतता पसरली. केवढी नीरव शांतता! डोंगरात, आकाशात एकाही पक्ष्याची किलबिल नव्हती. त्या देवदारांमध्ये, त्या डोंगरांवर फक्त एकाकी प्रकाश रेंगाळत होता. हळूहळू तोही अंधूक होत गेला. देवदार व बांबूची झाडं दिसेनाशी झाली. मी जमिनीवर पडलो होतो. चहुबाजूला नि:स्तब्ध शांतता.

कोणीतरी दबक्या पावलांनी माझ्याजवळ आलं. कोण आहे ते पाहण्याचा मी प्रयत्न केला. पण मला काळोखानं वेढलं होतं. कोणीतरी अदृश्य हातानं माझ्या छातीत रुतलेला खंजीर काढला. पुन्हा माझ्या तोंडावाटे रक्त वाहू लागलं, व मी आकाशाच्या अंधारात कायमचा बुडालो.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

पुन्हा वाचायला आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्त!
एवढीच आहे का कथा? कारण चित्रपटात अजून बरंच काही होतं ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. राशोमॉन हा चित्रपट कुरोसावा ह्यांनी आकुतागावा ह्यांच्या दोन कथा एकत्र करून बनवला. एक होती ही, म्हणाजे, 'इन अ ग्रोव्ह' व दुसरी 'राशोमॉन'. खरं तर ह्या दोन कथांचा तसा एकमेकांशी काही संबंध नाही. पण कुरोसावांनी त्यांना जोडून एक अजर कलाकृती निर्माण केली.
इतर कोणालाही ही (रास्त) शंका येऊ नये म्हणून अनुवादाचं शीर्षक बदललं आहे व चित्रपटाविषयी खुलासाही केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

अच्छा असंय होय!
दुसर्या कथेच भाषांतरपण येऊदेत वेळ मिळेल तेव्हा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0