दिल्या घेतल्या वचनांची...
काही दिवसांपूर्वी बसमध्ये ‘आजचा दिवस शून्य अपघातांचा’ हे वाक्य लिहिलेलं वाचलं आणि अचानक लक्षात आलं, की ‘शून्य’ हे संख्यावाचक विशेषण वापरलं की त्याचे विशेष्य अनेकवचनात वापरले जाते.
हे नेहमीच होते असे नाही. जसे, काही बसेसमध्ये ‘आजचा दिवस शून्य अपघाताचा’ हे वाक्य मी वाचले आहे. परंतु जास्त करून शून्यचे विशेष्य
एकवचनात वापरले तर खटकते, असे माझ्या लक्षात आले.
उदा.
* आज शून्य मूल आले होते. (* चा अर्थ- हे वाक्य व्याकरणदृष्ट्या चुकीचे आहे)
आज शून्य मुले आली होती.
* मी आज शून्य पोळी खाल्ली.
मी आज शून्य पोळया खाल्ल्या.
सर्वसाधारणपणे, आपल्या डोक्यात अशी संकल्पना असते, की ‘अनेकवचन’ म्हणजे एकाहून अधिक संख्येच्या वस्तूंसाठी वापरले जाणारे वचन. परंतु, नीट विचार केला, तर ‘अनेक’ या शब्दाचा अर्थ ‘जे एक नाही ते’ असा होतो. त्यामुळे, त्यात ‘एकहून अधिक’ आणि ‘एकहून कमी’ हे दोन्ही भाग आले.
आता ‘अनेकवचन’ या पारिभाषिक शब्दाची व्याप्ती खरेच इतकी आहे का, ते पहायला हवे. यासाठी आपण शून्य ते एक यांच्यामधल्या संख्यावाचक विशेषणांचा विचार करू.
उदा.
आम्ही सर्वांनी मिळून पाव केक संपवला.
आम्ही सर्वांनी मिळून पाऊण केक संपवला.
याचा अर्थ असा, की शून्य आणि एक यांच्यामधले संख्यावाचक विशेषण असल्यास ते एकवचनी मानले जाते. पण ‘अर्धा’ ची गोष्टच वेगळी आहे.
आम्ही सर्वांनी मिळून अर्धा केक संपवला.
आम्ही सर्वांनी मिळून अर्धे केक संपवले.
आता इथे एक वेगळीच मजा समोर येते आहे. अर्धा या संख्यावाचक विशेषणाची विशेष्ये एकवचन आणि अनेकवचन दोन्हींत वापरता येत आहेत. परंतु, तसे करताना अर्थात फरक पडत आहे. या विशेषणाचे विशेष्य एकवचनी असल्यास, त्याचा अर्थ ‘एका वस्तूचा काही भाग’ असा होतो; तर तेच विशेष्य अनेकवचनी असल्यास, त्याचा अर्थ ‘अनेक नगांपैकी काही नग’ असा होतो. त्याचप्रमाणे, विशेष्याच्या वचनाबरोबर या विशेषणाचे वचनही बदलते, म्हणजेच ‘अर्धे’ चे ‘अर्धी’ होते. म्हणजे, अर्धे हे विशेषण एकाच वेळी ‘एक’ आणि ‘अनेक’ या दोन्हींत मोडते. परंतु तरीही इथे एक नियमितता आहे. ती अशी, की विशेष्याने बोधित होणारी वस्तू जर संख्येने एक (किंवा एका नगाचा काही भाग) असेल, तर ते विशेष्य एकवचनी असेल आणि जर त्याच वस्तुची संख्या एकाहून अधिक असेल, तर ते विशेष्य अनेकवचनी असेल. याचाच अर्थ असा, की ‘अर्धे’ हे विशेषण ‘एकवचनी’ आणि ‘अनेकवचनी’ असे दोन्ही असले, तरी त्याचे वचन हे ‘एक’ आणि ‘जे एक नाही ते’ या व्याख्यांनुसारच ठरते.
आता आपण ‘एक’ आणि ‘दोन’ यांच्यामधील संख्यावाचक विशेषणे घेऊया.
उदा.
दीड वाजला.
* दीड वाजले.
दीड पोळी खाल्ली.
* दीड पोळ्या खाल्ल्या.
* पावणेदोन वाजला.
पावणेदोन वाजले.
* पावणेदोन पोळी खाल्ली.
पावणेदोन पोळ्या खाल्ल्या.
म्हणजेच, दीड’ या विशेषणाचे विशेष्य केवळ एकवचनीच असू शकते; तर ‘पावणेदोन’ या विशेषणाचे विशेष्य मात्र केवळ अनेकवचनीच असते.
याचा अर्थ असा, की एकवचनाची व्याप्ती केवळ ‘एक’ पुरती मर्यादित नसून, ‘पाव’ ते ‘दीड’ इतकी आहे.
ह्म्म्म्म्म, इंटरेस्टिंग!
यातून निर्माण होणारे प्रश्नः
१- ०.००१ यांसारख्या संख्यावाचक विशेषणांच्या विशेष्यांचे काय?
२- ऋण संख्यावाचक विशेषणांच्या विशेष्यांचे काय?
३- आपण ‘दीड’ ला एकाहून अधिक का मानत नाही?
ता. क. हा विषय खरे म्हणजे बराच अभ्यासपूर्वक हाताळण्याचा विषय आहे. शिवाय, विविध लोकांचे ‘वचना’चे प्रयोग वेगवेगळेही असू शकतात. परंतु सध्या या लेखाकडे केवळ लाऊड थिंकिंग स्वरुपाचे लेखन म्हणून पहावे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारच्या लेखनासाठी ऐसी....वर उपलब्ध असलेल्या लेखनप्रकारांपैकी कोणता योग्य? 'माहिती' आणि 'ललित' यांपैकी कोणताही योग्य वाटत नाही.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
ऐला! हे लक्षातच आलं - घेतलं -
ऐला!
हे लक्षातच आलं - घेतलं - नव्हतं
बाकी पावणेदोन म्हणताना त्यात 'दोन' चा उच्चार होत असल्याने अनेकवचन होत असावे काय? जसे साडेसात म्हटले की संध्याकाळच असल्याचे वाटते, नी पावणेआठ म्हटले की रात्र झाल्याचा फील येतो. तसेच सकाळी साडेतीन म्हटले की दुपार वाटते, पावणेचार म्हटले की उन्हे उतरू लागल्याचा फील येऊ लागतो :ड
शून्य मिन्टात येतो - फॅन्ड्री (अवांतर)
'देऊळ' पाहिलेला नाही त्यामुळे नाना नक्की काय म्हणतो त्याची कल्पना नाही. पण 'फॅन्ड्री'मध्ये एका प्रसंगात अगदी हेच वाक्य आहे.
जब्या हा चंक्या(नागराज मंजुळे)कडे जत्रेतील मिरवणूकीत वाजविण्यासाठी 'हलगी देणार का?', म्हणून विचारायला येतो. चंक्या त्याला 'एक नंबरी वाजवायचं, बरं का !'च्या अटीवर देण्याचे कबूल करतो. मग ते तिघे, जब्या, पिर्या आणि चंक्या, बोलत बोलत जात असताना एका दारूच्या दुकानासमोर येताच चंक्या जब्याला 'तू हो पुडं, आलोच शून्य मिन्टात' म्हणतो. तो ते एकवचनात म्हणतो, हे मला चांगले स्मरते आहे.
पाढे?
एक अजून (कदाचित ढिसाळ) तर्क
याचा संबंध पुर्वीच्या पाढ्यांशी असेल का? म्हणजे पावकी, निमकी, दिडकी वगैरे असे, त्यामुळे "एक दीडं दीड" करून दीड हा एक मान्यता पावलेला गट झाला आहे
पावणेदोनकी ऐकलेली नाही. पुन्हा अडिचकी आहे आणि "अडिच तुकडा" पुन्हा एकवचनात वापरलेला अनेकदा ऐकला आहे.
सर्वप्रथम लेखनधुळीकरिता
सर्वप्रथम लेखनधुळीकरिता आभार.
तदुपरि-अर्धे प्रमाणेच पाऊण हा शब्दही 'पाऊण ऑफ गिव्हन क्वांटिटी' म्हणून वापरला तर चालून जावासे वाटते-यद्यपि त्याचा यूज़ कमी आहे.
अर्धा ते एक यामधील संख्यावाचक विशेषण हे एकवचनी तर दीड ते दोन मधील संख्यावाचक विशेषण हे अनेकवचनी मानले जावे कारण दोन पूर्णांक संख्यांमधील मध्यबिंदूच्या 'अलीकडील' संख्या या लहान संख्येच्या 'जवळ' असल्याने जणू लहान संख्याच & व्हाईस व्हर्सा असे काहीसे लॉजिक दिसतेय- अन पटणीय आहे खास.
Nearest integer function नामक प्रकार बेसिकली हाच आहे- तस्मात दीड हा भाषादृष्ट्या जणू एकच आहे-यद्यपि दीड'शहाण्यां'ना हा नियम लागू नसावासे वाटते.
तदुपरि: ऋण संख्यावाचक विशेषणे ही आपल्या भाषेला पचनी पडलीत कुठे? तसे पचनी पडलेली गणित ही एकच भाषा तूर्तास अस्तित्वात आहे.
अन ०.०००१ वैग्रेंसाठी % आहेच की. नसेल तर परत निअरेस्ट इंटिजर फंक्षनही आहेच.
रोचक
आपण ‘दीड’ ला एकाहून अधिक का मानत नाही?
नग पूर्ण असेल तरच तो गणला जात असावा काय? उदा. पोळी एक असल्यास एक पोळी, दोन असल्यास पोळ्या पण दिड असल्यास परत पोळी कारण अधिकची अर्धी पोळी 'पोळ्या' होण्यासाठी पुर्ण नग नाही, पण 'दिड वाजला' असे म्हणताना ऐकले आहे. त्याचबरोबर काही नगांना बहूवचनी आणि एकवचनी संख्यावाचक विशेषणांमुळे फरक पडत नसावा उदा. एक ब्रेड, दोन ब्रेड किंवा १ केस, २ केस, अनेक केस इत्यादी.
पु-नपुं
एक ब्रेड, दोन ब्रेड किंवा १ केस, २ केस, अनेक केस इत्यादी.
माझ्या माहितीप्रमाणे अकारान्त पुल्लिंगी शब्दाचे अनेकवचन तसेच राहते. उदा. वास, हात, पाय इ.
अकारान्त नपुंसकलिंगी शब्दाचे अनेकवचन होताना ते एकारान्त किंवा अऽकारान्त होते. उदा. घर-घरे(घरं), दार-दारे(दारं) इ.
पण बॅटमॅनने म्हटल्याप्रमाणे मराठीच्या काही बोलींत काही शब्दांचे एकवचनी रूप पुल्लिंगाप्रमाणे, तर अनेकवचनी रूप नपुंसकलिंगाप्रमाणे होते. उदा. एक केस - अनेक केसं. अनेकवचनी रूप नपुंसकलिंगीच असल्याचे क्रियापदावरून कळते - केसं गळाली-केसं गळाले नव्हे! माझे काही मित्र (दक्षिण महाराष्ट्रातील नसलेलेही) ढग-ढगं, गाल-गालं (आई ग!) अशी रूपे करतात. अशा प्रकारची अजून उदाहरणे कोणती? इतर भाषांमध्ये असला प्रकार आढळतो का?
तसेच मुलगा ह्या पुल्लिंगी शब्दाचे अनेकवचन म्हणून मूल ह्या नपुंसकलिंगी शब्दाचे अनेकवचन 'मुले' हे बर्याचदा वापरले जाते. 'मुलगे' असा शब्दप्रयोग लेखनात मी प्रामुख्याने ऋच्याच लेखनात पाहिलेला आठवतोय. :)
गालं-->खरंच आई गं! ढगं-->
गालं-->खरंच आई गं!
ढगं--> आमच्या एका नाशिककर मित्राच्या तोंडून असा प्रयोग ऐकला आहे.
तदुपरि ग्रीक भाषेत पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी शब्दांचे अनेकवचनी रूप काही केसेसमध्ये तरी सारखे होते१. अन क्रियापदात लिंगभेद नसल्याने तेही अद्वैत साधले जातेच आपोआप. पण क्रियापदांत अगोदरच लिंगभेद आहे अन इथे मात्र लोप पावतो असे उदा. ठाऊक नाही.
१ह्रस्व 'इ' हा स्वर मॉडर्न ग्रीकमध्ये 5-6 प्रकारे लिहिला जातो त्यामुळे लेखनातला भेद वगळला तर सेमच.
अर्धाबाबत - मी अर्धा लाडू
अर्धाबाबत -
मी अर्धा लाडू खाल्ला.
मी अर्धे पोहे खाल्ले.
किंवा
मी अर्धं फळ खाल्लं.
मी अर्धी फळं खाल्ली.
(आत्ता मला भूक लागलेली आहे म्हणून खाण्याचीच उदाहरणं सुचताहेत.)
मला वाटतं जिथे संख्यावाचक (एका फळाचा अर्धा भाग या अर्थाने) तो शब्द येतो तेव्हा एकवचनी होतो. मात्र जेव्हा राशीमापक (एखाद्या ढिगाचा अर्धा ढीग) तेव्हा तो शब्द अनेकवचनी होतो. कारण अर्थातच अर्ध्यामध्ये 'बरेच' सामावलेले असतात.
इतर लहान संख्यासाठीही एकवचनच लागू होतं.
मी एक-सप्तमांश फळ खाल्लं.
(अनंदनी आणि अनामुक हे फारच आवडलं) लेखासाठी इतर नावं...
वचने किं अनेकता?
एका वचनाच्या अनेक तऱ्हा
तसेच म्हणायचे होते
मला वाटतं जिथे संख्यावाचक (एका फळाचा अर्धा भाग या अर्थाने) तो शब्द येतो तेव्हा एकवचनी होतो. मात्र जेव्हा राशीमापक (एखाद्या ढिगाचा अर्धा ढीग) तेव्हा तो शब्द अनेकवचनी होतो. कारण अर्थातच अर्ध्यामध्ये 'बरेच' सामावलेले असतात.
मूळ लेखातला हा भाग पहा-
या विशेषणाचे विशेष्य एकवचनी असल्यास, त्याचा अर्थ ‘एका वस्तूचा काही भाग’ असा होतो; तर तेच विशेष्य अनेकवचनी असल्यास, त्याचा अर्थ ‘अनेक नगांपैकी काही नग’ असा होतो. त्याचप्रमाणे, विशेष्याच्या वचनाबरोबर या विशेषणाचे वचनही बदलते, म्हणजेच ‘अर्धे’ चे ‘अर्धी’ होते. म्हणजे, अर्धे हे विशेषण एकाच वेळी ‘एक’ आणि ‘अनेक’ या दोन्हींत मोडते.
बाकी 'वचने किं अनेकता' फारच आवडले.
ह्यावर थोडा विचार...
ह्यावर थोडा विचार करूनच लिहिता येईल. मधल्या काळात मला अशी शंका भेडसावते आहे की लेखाच्या शीर्षकाचा (दिल्या घेतल्या वचनांची...) आणि लेखातील विचाराचा काय संबंध आहे?
लेखातीलच विचार पुढे न्यायचा असला तर ही वाक्ये पहा:
मी त्याला एक पंचमांश रुपया दिला.
मी त्याला दोन पंचमांश रुपये दिले. (दोन पंचमांश रुपया दिला हे कानाला बरोबर वाटत नाही, जरी दोन पंचमांश पूर्ण एका रुपयाहून कमी आहे.)
परंतु
मी त्याला एक पंचमांश घर दिले.
मी त्याला दोन पंचमांश घर दिले. (येथे मात्र रुपयाच्या चालीवर दोन पंचमांश घरे दिली हे कानाला बरोबर वाटत नाही.)
असे का?
अध्याहृत प्यारान्थिसीज़ची जागा?
मी त्याला दोन (पंचमांश रुपये) दिले.
मी त्याला (दोन पंचमांश) घर दिले.
असे काही होत असावे का? (अर्थात, असे तरी का व्हावे ते कोणी सांगावे?)
---------------------------------------------------------------------------------------------------------------
अतिअवांतर:
यावरून एक जुने कोडे आठवले.
Which one is correct: "Seven plus seven is fifteen", or "Seven plus seven are fifteen"?
उत्तर: Neither. Seven plus seven is fourteen.
आणि यावरून मला अजून एक आठवलं
नमन> एकदम सगळ्या ओळी select नका करू कंसातली उत्तरं वाचायला, मजा जाईल त्यातली. /नमन>
ब्रूस लीच्या आईला काय म्हणतात? ....................... (माउली!)
ब्रूस लीच्या मांजराला काय म्हणतात? ......................(माउ ली!)
ब्रूस ली मेल्यावर त्याला काय म्हणतात? ....................(डेड ली)
आणि तो जर परत जिवंत झाला तर त्याला काय म्हणाल? ........................(शंभरातले नव्व्य्याण्णव याचं उत्तर - विजयी मुद्रेने :-) - देतात की 'लाईव्ह ली'. पण आपण त्याला परत 'ब्रूस ली'च म्हणू नाहि का? !! )
वचने किं दरिद्रता?
लेख आवडला.
आणि अचानक लक्षात आलं, की ‘शून्य’ हे संख्यावाचक विशेषण वापरलं की त्याचे विशेष्य अनेकवचनात वापरले जाते.
बहुतेक यामागे शून्याचे अस्तित्व असण्यापेक्षाही 'अनेक गोष्टींचा अभाव' दर्शवणे, ही भावना प्रबळ असू शकेल. (किंवा शीर्षक पहावे - तस्मात् तदेव वक्तव्यं इ. इ. :))
* दीड पोळ्या खाल्ल्या.
'दीड'चे उदाहरण रोचक आहे. दीड + अनेकवचनी विशेष्य असा प्रयोग खटकत असला तरीही तो पूर्णतः अप्रचलित आहे, असं म्हणता येणार नाही. भाषेच्या अनेक लकबींपैकी ही एक एवढेच याचे कदाचित स्पष्टीकरण असू शकेल.
अवांतर - 'वचने का दरिद्रता' हे अधिक योग्य आहे का किं?१
१. फादर स्टीव्हन्स
वचने किं दरिद्रता? अवान्तर
'वचने किं दरिद्रता' आणि 'वचने का दरिद्रता' हे दोन्ही प्रयोग चालू शकतात. हे पाठभेद कोणी केले आता ठाऊक नाही. मूळ श्लोक असा आहे:
प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः । तस्मात्तदेव वक्तव्यं वचने का/किं दरिद्रता ॥
गोड बोलल्याने सर्वच लोक सन्तुष्ट होतात म्हणून गोडच बोलावे. बोलण्याच्या बाबतीत दारिद्र्य कशाला/काय कामाचे?
..........
........... 'विचारप्रवर्तक' असा शेरा मारून या लेखाची मजा घालवायची नाहिये! पण "अरेच्चा, खरंच की" असं वाटायला लावणारं मस्त लिखाण आहे. खरं सांगायचं तर मला उदाहरणं वाचून मुद्दा नेमका लक्षात आला. ते "...विशेष्याच्या वचनाबरोबर या विशेषणाचे वचनही ..." वगैरेबद्दल बॅट्या आणि इतर मंडळी आहेत !
पण लेखाचं शीर्षक मात्र उलगडलं नाहि..