भोजनकुतूहल - ३

भाग १, भाग २.

अन्य शिजवलेली धान्ये, भाज्या, मांस इत्यादींना स्वाद आणण्यासाठी वापरण्याच्या वस्तूंना ’संभार’ असे नाव देण्यात आले आहे. ह्यांमध्ये मोहरी-सर्षप, ओवा-यवनी, जिरे-जीरक, हिंग-हिङ्गु, शेपू-शतपुष्पा-शताह्वा, सुंठ-शुण्ठी, मिरी-मरीच, पिंपळी-पिप्पली, वेलदोडा-एला, लवंग, त्वक्-त्वच-तज-दालचिनी (Laurus cassia मोल्सवर्थ, ह्या झाडाची साल), पत्रक-तमालपत्र (leaf of Laurus cassia मोनिअर-विल्यम्स), जातीपत्री-जायपत्री, जातीफल-जायफळ, कापूरचिनी-कङ्कोल (allspice), नागकेसर, अळता-अलक्तक, केशर-कुङ्कुम, कापूर-कर्पूर, जवादि - एक प्रकारचा सुवासिक पदार्थ, उदी मांजरापासून मिळणारा (मोल्सवर्थ), असे पदार्थ दर्शविले आहेत. ह्यामधील केशर-कुङ्कुम हे लक्षणीय आहे. ’कुङ्कुम’ ह्याचा मूळ अर्थ ’केशर’ असाच आहे. पूर्वकालीन भारतात राजा, राजसभेत बसण्याच्या योग्यतेचे पुरुष इत्यादि कपाळावर केशराचा टिळा लावत असत, स्त्रियाहि सौभाग्यलक्षण म्हणून टिळा लावत. मात्र असा केशराचा नित्य वापर सर्वसामान्यांच्या शक्तीपलीकडील असल्यामुळे हळदीच्या चूर्णावर लिंबाचा रस, तुरटी अशा आम्ल गोष्टींचा प्रयोग करून निर्माण होणार्‍या लाल रंगाच्या कुंकवाचा वापर करण्यास सुरू झाला. कालान्तराने ’कुङ्कुम’ ह्याचा मूळचा ’केसर’ हा अर्थ लुप्तप्राय होऊन हळदीकुंकवातले ’कुंकू’ हा अर्थ अधिक रूढ झाला.

’संभारां’मध्ये ’लवण’ म्हणजे ’मीठ’ ह्याचीहि गणना आहे. ग्रन्थकाराने त्याचे सैंधव, सामुद्र, गाढ-गढ(?) देशातील, द्रोणेय-डोणीचे, औखर-आटुक, रोमक-वाफे-सुकले असे प्रकार दर्शविले आहेत. अन्य ग्रन्थकार अन्य प्रकारची मिठे दाखवतात. Materia Medica of the Hindus ह्या उदय चंद्र दत्तलिखित पुस्तकात सुश्रुताने दिलेले मिठाचे पुढील प्रकार दर्शविले आहेत: सैन्धव-सिंधु नदीच्या परिसरातील खाणीतून निघालेले-शेंदेलोण, सामुद्र-समुद्राच्या पाण्यातून काढलेले, विट् लवण-बिडलोण-पादेलोण म्हणजे सैधवावर आवळ्याची प्रक्रिया करून केलेले काळ्या रंगाचे, सौवर्चल-सुवर्चल (?) देशातील खाणींचे-सोंचल-काला नमक (हिंदी), रोमक-शाकम्बरी-सांभर तलावाचे-रुमा नदीकाठचे, औद्भिद-खारवट (हिंदी-रेह) जमिनीवरचे, गुटिका(?) आणि पांशुज-खार्‍या पाण्याने संपृक्त अशा जमिनीपासून मिळवलेले.

मिठाकडून आता ऊस-साखरेकडे वळू. उसाचे काठया, काळा, तांबडा, पुण्ड्रक-पुंडया ऊस असे प्रकार ग्रन्थकाराने दर्शविले आहेत. उसाचा रस काहिलीमध्ये तापवून एक-चतुर्थांश उरला म्हणजे त्याला फाणित असे नाव आहे. अजून दाट होईपर्यंत उकळला म्हणजे गुड-गूळ, त्यापलीकडे मत्स्यण्डिका, मत्स्यण्डिका सुकविली की तिचे पांढरट स्फटिक बनतात ती खण्ड (हिंदी खांड, ह्यापासून इंग्रजी candy,) खण्ड पासून शर्करा आणि सितोपला म्हणजे खडीसाखर अशी प्रक्रिया दर्शविली आहे. उसापासून साखर बनविण्याची ही कृति प्राचीन भारतीयांनी विकसित केली होती आणि ७व्या शतकापर्यंत हे रह्स्य भारताबाहेर कोणास माहीत नव्हते. ७व्या शतकात अरबांनी हे ज्ञान बाहेर नेले आणि पर्शियनांनी तसेच अन्य संस्कृतींनी ते त्यांच्याकडून घेतले. ’शर्करा’वरून फारसीमध्ये ’शकर’ तयार झाला आणि तेथून लॅटिन succarum आणि इंग्रजी sugar. (अलीकडच्या काळात हे चक्र थोडे उलटे फिरले. इंग्रजी अखत्यारात चीनहून आणि मॉरिशसहून पांढरीशुभ्र साखर आयात होऊ लागली आणि ’चीनी’, तसेच ’मोरस’ ही दोन नवी नावे साखरेला मिळाली.) उसाशिवाय ’यावनाल’ म्हणजे ज्वारी आणि अन्य धान्यांच्या ताटांपासूनहि पूर्वकालीन भारतात साखर करत असत असे दिसते.

साखरेच्या पाठोपाठ साखरेच्या वापरातून करण्याची ’प्रपानके’ म्हणजे पन्ह्याचे प्रकार दर्शविले आहेत. थंड पाण्यात साखर विरघळवून तिला वेलदोडा, लवंग, मिरी आणि कापूर ह्यांनी सुवासित केले की होते ’शर्करोदक’ म्हणजे साखरपाणी. आंबट आंबा पाण्यात शिजवून त्याच्या गरापासून करावयाचे पन्हे हे भीमसेनाने निर्मिले असे सांगितले आहे. तसेच चिंचेचे, लिंबाचे इत्यादि सरबते दाखविली आहेत. ’तक्रपानक’ नावाच्या प्रकाराचे वर्णन पहा.

तुर्यांशेन जलेन संयुतमतिस्थूलं सदम्लं दधि
प्रायो माहिषमंशुकेन विमले मृद्भाजने चालयेत्।
भृष्टं हिङ्गु च जीरकं च लवणं राजीं च किचिन्मितां
पिष्ट्वा तत्र विमिश्रयेद्भवति तत्तक्रं न कस्य प्रियम्?
तक्रं रुचिकरं वह्निदीपनं पाचनं परम्।
उदरे ये गदास्तेषां नाशनं तृप्तिकारकम्॥

म्हशीच्या दुधापासून केलेले आंबट आणि घट्ट दही त्याचा १/४ भाग इतके पाणी मिसळून फडक्यामधून चाळून मातीच्या भांडयात धरावे. त्याला हिंग, जिरे-मोहरीची फोडणी देऊन त्यात थोडे मीठ टाकून ढवळावे. असे ताक कोणास प्रिय नाही? ते चविष्ट, क्षुधाग्नि प्रदीप्त करणारे, पचनाला मदत करणारे, उदरातील विकारांचा नाश करणारे आणि तृप्तिकारक असते.

दूध आणि त्याच्यावर प्रक्रिया करून पुढे होणार्‍या गोष्टी ह्यावर काही लिखाण आहे. गाय इत्यादि व्यायल्यापासून ७ दिवसांपर्यंतचे दूध (चीक) विस्तवावर ठेवले की फाटते. त्याला पीयूष (खरोस-खरवस) म्हणतात. ८ दिवसांपासून १ महिन्यापर्यंतच्या दुधाला ’प्रमोरट’ म्हणतात. दही, ताक, लिंबाचा रस इत्यादि वापरून कच्चे दूध फाटविल्यास किंवा नासविल्यास - अशा दुधाला ’नष्टदुग्ध’ म्हणतात - त्यापासून निघणार्‍या पाण्यास ’मोरट’ आणि घट्ट भागास ’तक्रपिण्ड’ म्हणतात. तेच नष्टदुग्ध विस्तवावर उकळल्यास मिळालेल्या घट्ट भागास ’किलाट’ म्हणतात. दह्यामधील पाण्यास ’मस्तु’ असे नाव आहे.

दूध देणारे प्राणी - गाय, म्हैस. शेळी, मेंढी, गाढव, घोडा, उंट, हत्ती ह्यांच्या दुधाचे आयुर्वेदिक गुण वर्णिले आहेत. आयुर्वेदामध्ये मानवी दुधाकडेहि औषधि अशा नजरेने पाहिले आहे असे दिसते कारण स्त्रीदुग्धाचेहि गुण ग्रन्थामध्ये वर्णिले आहेत. ह्याच प्रकारे दुग्धजन्य पदार्थ, दही, लोणी, साय, तूप ह्यांचेहि आयुर्वेदिक गुण वर्णिले आहेत.

तक्रावर ग्रन्थकाराचे विशेष प्रेम आहे. त्याची महती अशी सांगितली आहे:

कैलासे यदि तक्रमस्ति गिरिश: किं नीलकण्ठो भवे-
द्वैकुण्ठे यदि कृष्णतामनुभवेदद्यापि किं केशव:।
इन्द्रो दुर्भगतां क्षयं द्विजपतिर्लम्बोदरत्वं गणा:
कुष्ठित्वं च कुबेरको दहनतामग्निश्च किं विन्दति॥

कैलास पर्वतावर ताक असते तर गिरीश ’नीलकण्ठ’ झाला असता काय? वैकुण्ठात ताक असते तर विष्णु अद्यापि काळा राहिला असता काय? इन्द्राला क्षते, चन्द्राला क्षय, गणपतीला ढेरपोट, कुबेराला कुष्ठरोग आणि अग्नीला दहनता सहन करायला लागली असती काय?

शिखरिणी ह्या दुग्धजन्य पदार्थाचे वर्णन पहा:

आदौ माहिषमम्लमम्बुरहितं दध्याढकं शर्करां
शुभ्रां प्रस्थयुगोन्मितां शुचिपटे किञ्चिच्च किञ्चित् क्षिपेत्।
दुग्धेनार्धघटेन मृण्मयनवस्थाल्यां दृढं स्रावये-
देलाबीजलवङ्गचन्द्रमरिचैर्योग्यैश्च तद्योजयेत्॥
ग्रीष्मे तथा शरदि ये रविशोषिताङ्गा
ये च प्रमत्तवनितासुरतातिखिन्ना:।
ये चापि मार्गपरिसर्पणशीर्णगात्रा-
स्तेषामियं वपुषि पोषणमाशु कुर्यात्॥

म्हशीच्या दुधापासून केलेल्या आणि पाणी काढून टाकलेल्या दह्याच्या - चक्का - एका आढकामध्ये दोन प्रस्थ (दह्याच्या निम्मी) शुभ्र साखर आणि अर्धे भांडे दूध घालून स्वच्छ फडक्यामधून मातीच्या नव्या भांडयामध्ये गाळावे. त्यामध्ये वेलदोडा, लवंग आणि मिरी घालावी.
ग्रीष्म अथवा शरद् ऋतूमध्ये कडक उन्हामधून तापून आलेले, प्रमत्त यौवनेसह रतिक्रीडा केल्यामुळे दमलेले, बराच काळ प्रवास केल्याने शीर्णगात्र झालेले अशा सर्वांच्या शरीराला ही शिखरिणी पोषदायक आहे.

अर्धाढकं सुचिरपर्युषितस्य दध्न:
खण्डस्य षोडशपलानि शशिप्रभस्य।
सर्पि: पलं मधु पलं मरिचं द्विकर्षं
शुण्ठया पलार्धमपि वार्धपलं चतुर्णाम्॥
श्लक्ष्णे पटे ललनया मृदुपाणिघृष्टे
कर्पूरचूर्णसुरभीकृतचारुसंस्था।
एषा वृकोदरकृता सरसा रसाला
ह्यास्वादिता भगवता मधुसूदनेन॥

बराच काळ पाणी काढून टाकलेल्या दह्याच्या अर्ध्या आढकामध्ये १६ पल (२ शराव अथवा १ प्रस्थ) इतकी शुभ्र साखर, त्यामध्ये १ पल तूप, १ पल मध, अर्धा पल मिरी आणि अर्धा पल सुंठ, अथवा हे चारी प्रत्येकी अर्धा पल असे घालून ते मऊ वस्त्रामधून सुंदर स्त्रीने नाजूक हाताने गाळावे आणि त्याला कापराचा सुवास द्यावा. भीमाने बनविलेल्या ह्या रसाल शिखरिणीचा स्वाद भगवान् श्रीकृष्णाने घेतला होता. (२ तोळे = १ कर्ष, ४ कर्ष = १ पल, ८ पल = १ शराव (शेर), २ शराव = १ प्रस्थ, ४ प्रस्थ = १ आढक, हे वैद्यकशास्त्रसंमत कोष्टक भाग २ मध्ये दाखविलेले होते.)

शिखरिणीच्या ह्या दोन्ही कृतींमध्ये दह्याच्या अर्धी साखर असे प्रमाण दाखविले आहे. सध्या घरी श्रीखंड केलेच तर ते बहुधा तयार चक्क्याचे करतात आणि त्यामध्ये चक्क्याइतकी साखर असे प्रमाण असते. दह्य़ापासून प्रारंभ केल्यास त्यातील पाणी काढल्यावर चक्का मूळ दह्याच्या निम्माच होईल तेव्हा जु्ने प्रमाण आजच्याहून वेगळे नाही असे दिसते. आजच्यापैकी केशर त्यात नाही आणि लवंग-मिरी आहेत हा भेद दिसतो.

’शिखरिणी’ ह्या शब्दावरून ’श्रीखंड’ शब्द निर्माण झाला असे वाटू शकेल कारण दोहोंच्या कृतींमधे साम्य आहे. पण तसे नसावे असे वाटते. जुन्या ’शिखरिणी’चा संबंध आजच्या ’शिखरण-शिकरण’ ह्याच्याशी लागतो. (पहा - मोल्सवर्थ.) ’श्रीखण्ड’ ह्याचा संस्कृतातील अर्थ ’चन्दन’ असा आहे. उगाळलेल्या चंदनाच्या लेपासारखे दिसणारे म्हणून ’श्रीखंड’ असा आजचा ’श्रीखंड’ शब्द निर्माण झाला असावा असा तर्क अधिक सुसंगत वाटतो.

पाकक्रियेमध्ये उपयुक्त असा दुसरा गोड प्रकार म्हणजे मधु किंवा मध. ह्याचे आठ प्रकार दर्शविले आहेत - माक्षिक (मधुमक्षिका अथवा मधमाश्या ह्यांनी गोळा केलेला), भ्रामर (भुंग्यांनी गोळा केलेला), क्षौद्र (’क्षुद्रा’ ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या पिंगट रंगाच्या छोटया माश्यांचा), पौतिक (’पुत्तिका’ ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या काळ्या रंगाच्या छोटया माश्यांचा), छात्रक (छत्रीसारखी गोल पोवळी रचणार्‍या माश्यांचा), आर्घ्य (पिवळ्या रंगाच्या छोटया माश्यांचा), औद्दालक (वाळवीच्या वारुळात मिळणारा कडवट-तुरट पदार्थ) आणि दाल (’दल’ म्हणजे फुलांच्या पाकळ्यांमधील मध).

मजसमोरील ’भोजनकुतूहला’च्या प्रतीमध्ये मद्याचा विषय सुरू होताच पुढची चार पाने गळली आहेत त्यामुळे ह्या विषयात ग्रन्थकाराने काय सांगितले आहे हे कळत नाही. उपलब्ध भागामध्ये मद्याकडे ग्रन्थकार थोडया उपेक्षेने पाहतो हे ध्यानी येते. तो म्हणतो:

मद्यं न पेयं पेयं वा स्वल्पं सुबहुवारि वा।
अन्यथा शोथशैथिल्यदाहमोहान् करोति च॥
द्राक्षेक्षव: सखर्जूरा: शालिपिष्टं यवस्य वा।
पञ्च मद्यकरा: श्रेष्ठा द्राक्षा तत्र विशेष्यते॥

मद्य एकतर पिऊ नये अथवा अगदी थोडे किंवा पुष्कळ पाण्यामधून प्यावे. द्राक्षे, ऊस, खजूर, तांदुळाचे पीठ आणि यवाचे - बार्ली - पीठ ह्या पाचांचे मद्य सर्वात चांगले, त्यामध्येहि विशेषत्वाने द्राक्षे.

अन्येऽपि मद्यभेदास्तत्प्रकाराश्च सर्वानुपयोगित्वात् ग्रन्थगौरवभयाच्चेह नोक्ता:। यत उक्तम्
मद्यप्रयोगं कुर्वीत शूद्रादिषु महार्तिषु।

मद्याचे अन्य प्रकार सर्वांच्या उपयोगाचे नसल्याने आणि ग्रन्थ उगीच वाढेल म्हणून येथे दाखवीत नाही. असे म्हटलेच आहे: ’शूद्र इत्यादि (कनिष्ठ) जातींनी, तसेच फार आजारी असल्यास, मद्य वापरावे.’ मद्य ह्या गोष्टीला शिष्टसमाजामध्ये वरचे स्थान नव्हते हे ह्यावरून दिसते.

Materia Medica of the Hindus आणि अन्य काही आयुर्वेदग्रंथांमधून मिळणारी काही माहिती संकलित करीत आहे.

मद्याचे प्रकार: माद्धिक - द्राक्षांपासून, खार्जूर - खजुरापासून, गौडी - साखरेच्या घट्ट पाकापासून (treacle), शीधु - उसाच्या रसापासून, सुरा - भातापासून, कोहल - यवापासून, मधुलिका - गव्हापासून, पैष्टी - वेगवेगळ्या धान्यांपासून, मधूकपुष्पोत्थ - मधूक पुष्पापासून (मोहाचे फूल), जाम्बव - जांभळापासून, कादम्बरी - कदंबाच्या फुलापासून, वल्कलि - बेहडयाच्या फुलापासून ( ह्यावरून ’बेवडा’ देशी दारू हा शब्द निर्माण झाला असेल काय?), वारुणी - ताडाच्या अथवा माडाच्या झाडाच्या स्रावापासून. ह्याशिवाय अन्य ग्रन्थांमध्ये मैरेयक, कापिशायन असेहि मद्यविशेष आढळतात.

पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत ’दिव्य’ म्हणजे आकाशातून पडणारे आणि ’भौम’ म्हणजे भूमीवर उपलब्ध असलेले असे प्रमुख प्रकार केले आहेत. त्यांमधून अनेक उपप्रकार निर्माण होतात. ’दिव्य’ पाणी हे ’धाराज’ - पावसाचे, ’करकाभव’ - गारांचे, ’तौषार’ - दवाचे आणि ’हैम’ - हिमवर्षाव वितळून झालेले असे चार प्रकारचे असते. ’धाराज’ पाणी दोन प्रकारचे - ’गाङ्ग’ आणि ’सामुद्र’. अश्विन महिन्यामध्ये पडणारे पाणी हे अष्टदिङ्नाग (आठ दिशा आपल्या पाठीवर तोलून असलेले आठ हत्ती) आकाशगंगेतून गोळा करून पृथ्वीवर पाडतात म्हणून ते ’गाङ्ग’ आणि त्यापूर्वीच्या महिन्यातील पावसाचे पाणी हे समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनाचे निर्माण झालेले म्हणून ’सामुद्र’. ह्या दोहोंमध्ये गाङ्गजल अधिक श्रेष्ठ. ’भौम’ जलाचे ’जाङ्गल’, ’आनूप’ आणि ’साधारण’ असे तीन प्रकार आहेत. ’जङ्गल’ म्हणजे नद्या-तलाव-वृक्ष फार नसलेला प्रदेश आणि ते पुष्कळ असलेला प्रदेश हा ’अनूप’. ’साधारण’ प्रदेश ह्या दोहोंच्या मधला. ’भौम’ पाण्याचे त्याच्या स्रोतावरून उपप्रकार पडतात ते असे - नादेय - नदीचे, औद्भिद - खणलेल्या जमिनीतून झिरपून आलेले, नैर्झर - झर्‍याचे, सारस - सरोवराचे, ताटाक तडाग - तलावाचे, वाप्य - वापीचे, कौप्य - कूपाचे, चौडय म्हणजे खडकामधली भेग (chasm मोनिअर-विल्यम्स), त्यातील पाणी तेहि चौडय, पाल्वल - पल्वल-डबक्यातले, विकिर - नदीकाठच्या वाळूतील खडडयात साठणारे, कैदार - केदार-शेतामधले, ह्राद - ह्रदामधील (’ह्रद’ खोल पाण्याचा डोह). हे प्रत्येक प्रकारचे पाणी केव्हा आणि कसे प्यावे ह्याचे आयुर्वेदिक विश्लेषण ग्रन्थामध्ये आहे. ’नादेय’ जलाच्या बाबतीत भारतातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाण्याचे गुणदोष वर्णन केले आहेत.

(’कूप’ आणि ’वापी’ ह्यांच्यामधील फरक असा:

भूमौ खातोऽल्पविस्तारो गम्भीरो मण्डलाकृति:।
बद्धोऽबद्ध: स कूप: स्यात्तदम्भ: कौपमुच्यते॥

जमिनीत खोदलेला, फार विस्तार नसलेला, खोल, वर्तुळाच्या आकाराचा, बांधलेला किंवा न बांधलेला, तो कूप आणि त्याचे पाणी कौप.

पाषाणैरिष्टिकाभिर्वा बद्धा कूपाद्बृहत्तरा।
ससोपाना भवेद्वापी तज्जलं वाप्यमुच्यते॥

कूपाहून मोठी, दगडी चिरे अथवा विटांनी बांधलेली आणि आतमध्ये जिना असलेली ती वापी आणि तिचे पाणी वाप्य. मराठीमधील ’आड’ आणि ’बारव’ असा हा भेद दिसतो.)

ग्रन्थकाराने ग्रन्थामध्ये ठिकठिकाणी उपदेशकारक वचने लिहून ठेवली आहेत. त्यांपैकी कांहींकडे नजर टाकून लेखनसीमा करतो.

किती आणि कसे जेवावे?

पूरयेद्भागयुगलं कुक्षेरन्नेन सुस्थित:।
जलेनैकं चतुर्थं च वायुसञ्चरणाय वै॥

चांगले स्वास्थ्य असलेल्याने दोनचतुर्थांश पोट अन्नाने आणि एकचतुर्थांश पाण्याने भरावे. उरलेला चौथा भाग वायूच्या हालचालीसाठी सोडावा.

य: क्षुधालौल्यभावेन कुर्यादाकण्ठभोजनम्।
सुप्तव्यालानिव व्याधीन् सोऽनर्थाय प्रबोधयेत्॥

भूक आणि जिह्वालौल्यामुळे जो आकण्ठ भोजन करतो तो निद्रिस्त पशूंप्रमाणे असलेल्या रोगांना जागे करतो.

आहारं तु रह: कुर्यात् निर्हारमपि सर्वदा।
उभाभ्यां लक्ष्म्युपेत: स्यात्प्रकाशे ह्रियते श्रिया॥

आहार आणि निर्हार (मलमूत्रविसर्जन) एकान्तात करणार्‍याची सोबत लक्ष्मी करते, उघडयावर ते करणार्‍याला ती सोडून जाते.

अश्नीयात्तन्मना भूत्वा पूर्वं तु मधुरं रसम्।
मध्येऽम्ललवणौ पश्चात् कटुतिक्तकषायकान्॥

लक्ष देऊन जेवावे, प्रथम मधुर आहार घ्यावा, मध्यावर आंबट आणि खारट आणि तदनंतर कडू, तिखट आणि तुरट पदार्थ खावेत.

अतिद्रुताशिताहारो गुणान् दोषान्न विन्दति।
भोज्यं शीतमहृद्यं च स्याद्विलम्बितमश्नत:॥

फार घाईने खाणार्‍यास त्यातील गुणदोष जाणवत नाहीत. फार हळू जेवणार्‍याचे अन्न थंड आणि अरुचिकर होते.

पाणी कधी आणि कसे प्यावे?

पिबेद्घटसहस्राणि यावन्नास्तमितो रवि:।
अस्तं गते दिवानाथे बिन्दुरेको घटायते॥

सूर्य मावळण्यापूर्वी हवे तितके पाणी प्यावे (शब्दश: घटसहस्राणि - हजारो घडे), सूर्य मावळल्यानंतर एक थेंबसुद्धा घडयासारखा आहे.

अजीर्णे चौषधं वारि जीर्णे वारि बलप्रदम्।
भोजने चामृतं वारि रात्रौ वारि विषोपमम्॥

अजीर्ण झाले असता पाणी हे औषधासारखे असते, दमल्याभागलेल्याला पाणी शक्ति देते, जेवतांना पाणी अमृतासमान आहे पण रात्री पाणी विषासमान मानावे.

वासितं नूतनै: पुष्पै: पाटलीचम्पकादिभि:।
पथ्यं सुगन्धि हृद्यं च शीतलाम्बु सदा पिबेत्॥

पाटल, चांफा अशा ताज्या फुलांनी सुवासित केलेले पथ्यकर आणि आनन्ददायक असे थंड पाणी प्यावे.

अत्यम्बुपानान्न विपच्यतेऽन्नमनम्बुपानाच्च स एव दोष:।
तस्मान्नरो वह्निविवर्धनाय पुन: पुनर्वारि पिबेदभूरि॥

अति पाणी प्यायल्याने अन्नपचन होत नाही, अजिबात न प्यायल्याने तोच दोष निर्माण होतो. म्हणून भूक वाढविण्यासाठी थोडे थोडे पाणी वारंवार प्यावे.

तांबूल, शतपावली आणि वामकुक्षी गुणवर्णन.

रते सुप्तोत्थिते स्नाते भुक्ते वाऽन्ते च सङ्गरे।
सभायां विदुषां राज्ञां कुर्यात्ताम्बूलचर्वणम्॥

सुरतक्रीडेमध्ये, झोपून उठल्यानंतर, स्नानानंतर, भोजनानंतर अथवा युद्धानंतर, विद्वत्सभेमध्ये अगर राजसभेमध्ये तांबूल खावा.

ताम्बूलं कटुतिक्तमुष्णमधुरं क्षारं कषायान्वितम्।
वातघ्नं कृमिनाशनं कफहरं कामाग्निसंदीपनम्॥
स्त्रीणां भाषणभूषणं रतिकरं शोकस्य विच्छेदनम्।
ताम्बूले विदितास्त्रयोदश गुणा: स्वप्नेऽपि ते दुर्लभा:॥

तांबूल कटु, तिखट, उष्ण, मधुर, खारट आणि तुरट असून तो वात, जन्तु आणि कफ ह्यांचा नाश करतो. तो कामाग्नि वाढवितो आणि रतिकर असतो, तो स्त्रियांच्या बोलण्याला शोभा देतो आणि शोकनाशक असतो. तांबूलाचे हे तेरा गुण ज्ञात आहेत, जे स्वप्नामध्येहि दुर्लभ आहेत.

पूगकर्पूरकस्तूरीलवङ्गसुमन:फलै:।
फलै: कटुकषायैर्वा मुखवैशद्यकारिभि:॥
ताम्बूलपत्रसहितै: सुगन्धैर्वा विचक्षण:।

भुक्त्वा शतं पदां गच्छेच्छनै: स्वस्थोपजायते॥
मुखशुद्धि करणार्‍या सुपारी, कापूर, कस्तूरी, लवंग, वेलची, तिखट-तुरट फळे अथवा सुगन्धसहित तांबूलाचे सेवन करून शंभर पावले चालणार्‍या सुजाण पुरुषाचे स्वास्थ्य चांगले राहाते.

वामदिशायामनलो नाभेरूर्ध्वेऽस्ति जन्तूनाम्।
तस्मात्तु वामपार्श्वे शयीत भुक्तस्य पाकार्थम्॥

मनुष्यांच्या नाभीच्या वर डाव्या बाजूला वायूचे स्थान असते. अतएव जेवलेल्या अन्नाच्या पचनासाठी डाव्या कुशीवर झोपावे.

सद्योमांसं नवं चान्नं बाला स्त्री क्षीरभोजनम्।
घृतमुष्णोदकस्नानं सद्य: प्राणकराणि षट्॥

ताजे मांस, ताजे अन्न, बालयुवति, दुग्ध आणि घृतसेवन, तसेच उष्ण पाण्याने स्नान ह्या सहा गोष्टी प्राणवर्धक आहेत.

पूतिमांसं स्त्रियो वृद्धा: बालार्कस्तरुणं दधि।
प्रभाते मैथुनं निद्रा सद्य: प्राणहराणि षट्॥

शिळे मांस, गलितयौवना स्त्रिया, कन्याराशिस्थित सूर्य, पूर्ण न लागलेले दही, सकाळच्या वेळी मैथुन आणि निद्रा ही प्राणहारक आहेत.

असाच एक आठवणीतील शोक लिहून लेखमालिकेची समाप्ति करतो.

माहिषं दधि सशर्करं पय: कालिदासकविता नवं वय:।
एणिमांसमबला च कोमला स्वर्गशेषमुपभुञ्जते नर:॥

म्हशीच्या दुधाचे दही, साखरेसकट दूध, कालिदासाची कविता, तरुण वय, हरिणीचे मांस आणि कोमल तरुणी हे सर्व मिळणे म्हणजे माणसाने उर्वरित स्वर्गाचा उपभोग घेण्यासारखे आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

पुन्हा वाचण्यासारखे लेख.

अनेकानेक धन्यवाद.

*"बेवडा" शब्द पोर्तुगीज->कोंकणी बेबदो (पोर्तुगिजात प्यालेला, कोंकणीत दारुडा या अर्थी) पासून आला असू शकेल.*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी असेच म्हणतो.

त्यात परत ताकाबद्दलचा श्लोक पाहून तर दिल तक्रं तक्रं हो गया.

बाकी बेबिदा-म्ह. पोर्तुगीज भाषेत पेय असा अर्थ आहे बहुधा, चूभूदेघे. उदा. Cerveja e` uma bebida etc. etc. एनीवे त्याचे असे कनेक्षण पाहून लैच मजा वाटली.

अवांतरः मराठीतील अरबी-फारसी-तुर्की, इंग्रजी-पोर्तुगीज-फ्रेंच, झालंच तर द्राविडी अशा शब्दांचा मिळून एक कोश काढला पाहिजे असं खूप दिवसांपासून वाटतंय. कधी असा कोश येईल, देव जाणे. इंग्रजीतील 'हॉब्सन-जॉब्सन' च्या धर्तीवर असा कोश केला तर ते लै महत्त्वाचे काम होईल.

अतिअवांतरः 'मुसलमानी' मुळाचा शब्द यादवकालीन मराठीत एकही सापडत नाही काय? कधीकाळी तसे एखादे उदा. पाहिल्याचे अंधुक स्मरतेय, पण पाहिले पाहिजे. आञ मीन, सर्व 'मुसलमानी' शब्द आपल्याकडे देवगिरीच्या पाडावानंतरच घुसले असंच म्हणता येईल की तुरळक का होईना, अपवादही आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा(ह)वा! माहितीपूर्ण लेखन.

हल्ली बाजारात मिळणारा मध कोणता असतो?

बाकी शिखरीणीत असे वेगळे काय आहे की 'प्रमत्त यौवनेसह रतिक्रीडा केल्यामुळे दमलेल्या'ना खायला सांगितली आहे? का फक्त अ‍ॅडव्हर्टायझिंग/मार्केटिंग स्टॅटेजी? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जबरदस्त लेखमाला होती. संगणकी साठवून ठेवली आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

क्या बात है!!!! काय सुंदर लेखमाला आहे वा!!! उद्याच (आत्ता भारतात रात्रीचे १० वाजलेत, उशीर झालाय) आईला फोन करुन सांगणार आहे वाच वाच वाच, खूप आवडेल तुला!!!!
तक्रं शक्रस्य दुर्लभम श्लोक तिनेच लहानपणी दर वेळी सांगीतलेला Smile आता हा श्लोक वाचून ती इतकी खूष होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम लेखमाला, धन्यवाद.

एक अवांतर प्रश्न विचारतो, कन्याराशिस्थित सूर्याला प्राणहारक का म्हटले आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हळदीच्या चूर्णावर लिंबाचा रस, तुरटी अशा आम्ल गोष्टींचा प्रयोग करून निर्माण होणार्‍या लाल रंगाच्या कुंकवाचा
<<
हळद + अल्कली = कुंकू.
आम्ल मिसळल्याने लाल रंग येणार नाही. तुरटी अल्कलीधर्मीय आहे. पण बहुदा सोड्याच्या/चुन्याच्या पाण्यात हळद भिजवून कुंकू बनवतात. आजकाल संपूर्ण कृत्रीम रंगच कुंकू म्हणून मिळतो ती बाब वेगळी
(अगदी खंडोबाला उधळतात ती हळदही नकली रंगच असतो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-