अँटवर्पमधील रुबेन्सची चित्रे

गेल्या महिन्यामध्ये अर्धा दिवस मी अँटवर्पला एक छोटी भेट दिली. हिर्‍यांच्या व्यापारासाठी आणि एक मोठे बंदराचे शहर म्हणून ते विख्यात आहे पण हिरेबाजारात डोकावयाला लागणारा पैसा आणि बंदर नीट पाहायला लागणारा वेळ दोन्ही मजजवळ नसल्याने अजिबात रु. न लागणारे उद्योग करण्याचे मी ठरविले होते. तेथील Cathedral of Our Lady हे जुने चर्च तेथे असलेल्या पीटर पॉल रूबेन्सच्या चार चित्रांसाठीहि प्रसिद्ध आहे. रूबेन्स १५७७-१६४० हा विख्यात फ्लेमिश चित्रकार अँटवर्पचा राहणारा होता आणि त्याचे राहते घर आणि स्टुडिओ, तसेच त्याचे स्वत:चा मोठा कलावस्तूंचा संग्रह हे सर्व अँटवर्पमध्ये आहेत. माझ्याजवळच्या थोडया वेळात मी कॅथीड्रलला भेट दिली आणि ही चित्रे पाहिली त्याचा हा वृत्तान्त.

अगदी प्रारंभाच्या दिवसांपासून ख्राइस्ट, त्याचा काळ, त्याचे चरित्र, अन्य ख्रिश्चन संतांची आयुष्ये, तसेच जुन्या आणि नव्या करारातील गोष्टी चित्र, शिल्प, मूर्ति अशा कलाकृतींच्या मार्गांनी दाखवायची प्रथा ख्रिश्चन धर्मामध्ये दिसून येते. प्रॉटेस्टंट चळवळीतील अतिसाधेपणाला विरोध म्हणून कॅथलिक पंथामध्ये बरोक आणि रोकोको अशा शैली, चित्रांमध्ये ठळक रंगांचा वापर तसेच वास्तववादी चित्रण ह्यांना महत्त्व आले. रूबेन्स जरी प्रॉटेस्टंट कुटुंबामध्ये जन्मला होता तरी नंतर कॅथलिक पंथाकडे ओढला गेला आणि त्या परंपरेतील एक महत्त्वाचा चित्रकार म्हणून त्याला मान्यता मिळाली.

कॅथीड्रलपासून जवळच आमची टूरिस्ट बस थांबली आणि पाच मिनिटांच्या चालण्यानंतर आम्ही शहरातील मुख्य चौक Grote Markt - Great Market येथे आलो. चौकाच्या एका बाजूस अँटवर्पचा City Hall उभा आहे. १६व्या शतकाच्या मध्यात ही देखणी इमारत बांधली गेली. इमारतीपुढील चौकामध्ये ’ब्राबोचे कारंजे’ आणि रुबेन्सचा पुतळा उभा आहे आणि दुसर्‍या बाजूस कॅथीड्रल.


अँटवर्पचा टाउन हॉल आणि त्यापुढील चौक



चौकातील कॅथीड्रल आणि ब्राबो कारंजे, ब्राबो कारंज्याचा जवळून देखावा आणि जवळचा एक रस्ता



राक्षसाचा तोडलेला हात दूर फेकण्याच्या पवित्र्यात ब्राबो, तसेच चौकातील रूबेन्सचा पुतळा


कारंजे जेफ लॅंबो नावाच्या शिल्पकाराने १८८७ मध्ये बनविले पण त्यामागची ब्राबोची दंतकथा खूपच जुनी आहे. अशी कथा सांगितली जाते की अँटिगून नावाचा एक दुष्ट राक्षस अँटवर्पच्या शेल्ट (Scheldt) नदीमधून येजा करणार्‍या प्रवाशांकडून सक्तीने पैसे उकळत असे आणि पैसे द्यायला नकार देणार्‍यांचे हात तोडून ते दूरवर भिरकावून देत असे. ब्राबो नावाच्या सैनिकाने त्याचा युद्धामध्ये पराभव केला आणि शिक्षा म्हणून त्याचा हात तोडला आणि तो तसाच दूर भिरकावला. ही गोष्ट ह्या कारंज्याच्या शिल्पामधून सांगितली आहे.


कॅथीड्रलची प्रतिकृति



कॅथीड्रलचा मुख्य प्रवेशद्वार नाना कोरीव आकृति आणि चित्रांनी भरलेले आहे. दरवाज्याचा वरच्या भागावर कोरलेले ’शेवटच्या न्याया’चे चित्र लक्षवेधी आहे. ख्रिश्चन धर्माच्या विश्वासानुसार विश्वाच्या अंतसमयी सर्व मानवांचे मृतात्मे येशूपुढे न्यायासाठी आणले जातात, सेंट मायकेल प्रत्येकाचे पाप आणि पुण्य तराजूच्या दोन पारडयामध्ये घालून तोलतो. मेरी आणि अन्य ख्रिश्चन संत येशूच्या जवळ उभे राहून न्यायदानाला मदत करतात. ज्यांचे पुण्य अधिक ते येशूच्या उजव्या बाजूस स्वर्गाकडे पाठविले जातात. ज्यांचे पाप अधिक ते येशूच्या डाव्या बाजूस स्टिक्स (Styx) नदीच्या पलीकडे नरकात ढकलले जातात. ह्या समजुतीनुसार ह्या चित्रात पाठीवर पंख असलेल्या संतांच्या मधोमध उच्च स्थानावर येशू बसला आहे. त्याच्या खाली संत मायकेल तराजूने पापपुण्ये तोलत आहे. त्याच्या उजव्या बाजूचे पुण्याचे पारडे खाली गेलेले असून पुण्यात्मे त्याच दिशेला जात आहेत. ह्या उलट पापी लोक नागडेउघडे डाव्या बाजूस नरकाकडे रवाना होत आहेत. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येणार्‍या सर्वांच्या लक्षात हे यावे की ’शेवटचा न्याय’ अटळ आहे ह्यासाठी हे चित्र चर्चच्या प्रवेशातच महत्त्वाच्या स्थानी दाखविले जाते आणि तदनुसार ते येथे प्रवेशद्वारावरच आहे, जेणेकरून सर्व भक्त येताजाता ते पाहतील.


कॅथीड्रलचे प्रवेशद्वार आणि त्यातील 'अखेरचा न्याय'



मायकेलअँजेलोने सिस्टीन चॅपेलच्या भिंतीवर काढलेला हाच देखावा



कॅथीड्रलमध्ये प्रवेश करताच हे जाणवते की त्याचा अंतर्भाग नाना चित्रे, शिल्पे, पुतळे ह्यांनी खच्चून भरलेला आहे. धार्मिक वृत्तीचे सधन लोक प्रख्यात कलाकारांना अशी कामे देऊन कलाकृति चर्चला अर्पण करीत असत. परिणामत: पुष्कळ चर्चेस अशा कलाकृतींनी समृद्ध बनली आहेत कोटयवधींनी मूल्यमापन केली जाणार्‍या ह्या कलाकृति सांभाळणे ही एक मोठी जोखीम त्यांच्यावर पडलेली आहे. (दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या आज्ञेवरून ताब्यातील प्रदेशातील धनाढय लोक, तसेच चर्चेस, म्यूझिअम्समधी चित्रे आणि अन्य कलाकृति लुटून जर्मनीकडे पाठविण्याचा पद्धतशीर कार्यक्रम चालविला गेला होता. ती परत मिळविण्याच्या प्रयत्नांच्या युद्धाच्या अखेरीच्या दिवसांमधील कथेवरील झालेला Monuments Men हा अलीकडचा चित्रपट ह्या संदर्भामध्ये पाहण्याजोगा आहे.) येथील कलाकृतींपैकी रूबेन्सच्या चार चित्रांवर आपण लक्ष केन्द्रित करू.

कॅथीड्रलमध्ये रूबेन्सची चार चित्रे - तीन ट्रिपटिक (triptych) प्रकारची आणि एक मुख्यस्थानी असलेले (altarpiece) - आहेत. ट्रिपटिक म्हणजे एकमेकांशी संबंधित आणि घडी करण्यासारखी एकमेकांना जोडलेली तीन चित्रे, त्यांपैकी मधील मोठे आणि बाजूची दोन अर्ध्या रुंदीची, असे चित्र. (अशीच दोन, चार, पाच वा अधिक चित्रेहि एकमेकांना जोडलेली आढळतात. त्यांना diptych, tetraptych, pentaptych, polyptych असे म्हटले जाते.)

पहिले ट्रिपटिक क्रूसावर खिळवलेल्या येशूचा क्रूस उभा करण्याचे काम पूर्ण शक्ति लावून नऊजण करीत आहेत ह्यावरून ’क्रूस उभा करणे - The Raising of the Cross' अशा नावाचे आहे. हे काम करणार्‍यांच्या स्नायूंवरून ते किती शक्ति वापरून हा जड क्रूस उभा करत आहेत ते जाणवते. येशूची दृष्टि आकाशातील ईश्वराकडे आहे आणि त्याच्या अपराधांचे वर्णन त्याच्या डोक्यावर लावले आहे. हे झाले मधले चित्र. डाव्या बाजूस मेरी आणि जोसेफ (वर) तसेच शोकाकुल स्त्रिया (खाली) दिसत आहेत. उजव्या बाजूस अश्वारूढ रोमन अधिकारी ह्या मृत्युदंडाच्या कारवाईवर देखरेख करतांना दिसतो.


कॅथीड्रलमधील पीटर पॉल रूबेन्सचे ट्रिपटिक - The Raising of the Cross



ह्यापुढील ट्रिपटिक ’क्रूसावरून खाली उतरवतांना - The Descent from the Cross' अशा नावाचे आहे. मृत्यु पावलेल्या येशूला आठ व्यक्ति काळजीपूर्वक क्रूसावरून खाली काढत आहेत आणि त्याचे शरीर वस्त्रामध्ये लपेटत आहेत असा हा देखावा आहे. त्यामध्ये सर्वात वर दोन अनाम साहाय्यक हातामध्ये आणि दातांत वस्त्र धरून आहेत. त्यांच्याखाली डावीकडे अरिमाथियाचा जोसेफ आणि उजवीकडे निकोडेमस हे ज्यू समाजातील प्रतिष्ठित आणि तरीहि येशूवर श्रद्धा असलेले असे ह्या कार्याला मदत करीत आहेत. पुढच्या बाजूस तांबडया वस्त्रामध्ये येशूचा बाप जोसेफ हेच काम करीत आहे. डाव्या बाजूस शोकाकुल मेरी आपल्या मुलाच्या शरीराला स्पर्श करीत आहे आणि पायाशी शोकाकुल मेरी मॅग्डेलन आणि क्लिओपासची पत्नी मेरी ह्या दु:खात बसल्या आहेत. डाव्या बाजूच्या चित्रामध्ये मेरी आणि आणि तिची बहीण एलिझाबेथ ह्या दोघी गर्भवती (अनुक्रमे येशू आणि जॉन ह्यांच्या आया ) दिसत आहेत. उजव्या बाजूस जेरूसलेमच्या नवजात येशूला मंदिराचा धर्माधिकारी सिमेऑन ह्याच्या हातात त्याचा बाप जोसेफ देतांना दिसत आहे.


कॅथीड्रलमधील पीटर पॉल रूबेन्सचे दुसरे ट्रिपटिक - The Descent from the Cross



ह्यापुढील ट्रिपटिक ’येशूचे पुनरुत्थान - Resurrection of Christ' ह्याविषयी आहे. दफन केला गेलेला येशू ईश्वराच्या इच्छेने कबरीतून बाहेर पडत आहे आणि त्याच्या भोवतीच्या तेजाने डोळे दिपलेले लोक, तसेच त्याचे मारेकरी आणि आता भीतिग्रस्त झालेले रोमन सैनिक येथे दिसत आहेत. बाजूला डावीकडे जॉन दि बॅप्टिस्ट आणि उजवीकडे सेंट मार्टिना दिसत आहेत. तिसर्‍या शतकाच्या प्रारंभी मार्टिनाने ह्या रोमन स्त्रीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. तो सोडून पुनं जुन्या धर्मात येण्याला तिने नकार दिल्यामुळे तिला रोमन सम्राटाने मृत्युदंड सुनावला.


कॅथीड्रलमधील पीटर पॉल रूबेन्सचे तिसरे ट्रिपटिक - The Resurrection of Christ



चौथे चित्र स्वर्गारोहण करणार्‍या मेरीचे आहे. कॅथीड्रलमधील प्रमुख स्थानी हे चित्र असून पिसासारखी हलकी मेरी आणि तिच्यासह देवदूत (cherubs) स्वर्गाकडे जात आहेत आणि अन्य दोन देवदूत तिला गुलाबाची माळ घालत आहेत, खाली तिच्या कबरीभोवती उभे असलेले बारा गुरु (apostles) हा प्रसंग आश्चर्य आणि आनंद अशा संमिश्र भावनेने पाहात आहेत असे हे आनंददर्शक चित्र आहे.


कॅथीड्रलमधील पीटर पॉल रूबेन्सचे चित्र The Assumption of the Virgin



कॅथीड्रलमधून बाहेर पडल्यावर रस्त्यावर हे पुढील शिल्प कॅथीड्रल बांधणारा कारागीर पिएटर अपलमान्स आणि त्याचा पिता जान ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारले आहे.


कॅथीड्रल बांधणारे कारागीर. कॅथीड्रल आणि त्याचा दुरून देखावा.



अँटवर्प बंदराचा काही भाग आणि शेल्ट नदीचा दुरून देखावा



शेल्ट (Scheldt) नदीच्या दुसर्‍या काठावरून अँटवर्प आणि तेथील Cathedral of Our Lady
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्तं ओळख. तीनही चित्र आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मस्त ओळख. येशूला क्रूसावरून काढतानाचे चित्र विशेष आवडले.

अवांतरः पाप जास्त असलेले लोक स्टिक्स नदीत पाठवतात ती नदी प्राचीन ग्रीक पुराणांमधलीच असावी काय? तसे असेल तर पापी लोकांना तिकडे पाठवायचे कारण काय? जुन्या पेगन धर्मावरचा द्वेष इ. म्हणून? जहां तक मला आठवते त्याप्रमाणे पेगन धर्मात इट वॉज जस्ट अ प्यासेज आफ्टर डेथ.

अपि चः सिटी स्क्वेअरमध्ये लै मोठा भाग 'पेव्हिंग ब्लॉक' सदृश भरावाने बांधून टाकला आहे. युरोपात असे बर्‍याच ठिकाणी केले जास्त असावेसे वाटते, फटू बघून तरी. तरी याचे कारण काय? भारतात असे इतके कधी जुन्या काळी दिसत नाही. इमारतींबाहेर रस्ते दगडांत बंद करायची कन्सेप्ट आपल्याकडे नव्हतीच की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्टिक्स ही नदी ग्रीक नरकातील आहे हे तुमचे म्हणणे योग्यच आहे. पण ख्रिश्चन नरकाच्या कल्पनांमधून घेतलेली ही आणि अन्य अशा ग्रीक कल्पना मोकळेपणाने वापरत असावेत. उदा. पापी लोकांना नरकात ढकलणारा ग्रीक देव खारॉन (Charon) मायकेलअँजेलोच्या सिस्टीन चॅपेलमधील भित्तिचित्रामध्ये भेटतो. पहा:


(श्रेय)


ग्रीक अगोरा, रोमन फोरम, टाउन स्क्वेअर, पिआझ्झा, प्लाझा अशा देशपरत्वे वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या जागा बहुतेक जुन्या युरोपीय शहरामध्ये असतात. (अमेरिका-कॅनडामध्ये तशाच जागा आता सिटी सेंटर, सिटी स्क्वेअर अशा नावांनी ओळखल्या जातात.)

युरोपातील ह्या जागा मुळात त्या त्या गावांच्या बाजाराच्या जागा असत. ह्या बाबीची आठवण अजूनहि बर्‍याच शहरांतील अशा चौकांच्या नावामध्ये शिल्लक आहे. (उदा. ब्रुसेल्सचा Great Square ज्याला आजहि Great Market (Grote Markt)असे ओळखले जाते.) बाजाराच्या जागेच्या सभोवती कालान्तराने चोहो बाजूंनी एखादा राजवाडा, मोठे चर्च, न्यायालय अशा प्रकारच्या सार्वजनिक महत्त्वाच्या इमारती बांधल्या जाऊन मधली मोकळी जागा टाउन स्क्वेअर\पिआझ्झा अशी बदलून जाई. तेथे आत यायला मार्ग म्हणजे इमारतींमधील अरुंद रस्ते. हे रस्ते आणि मधली सर्व मोकळी जागा cobbled stones मध्ये बांधली जाई. (युरोपातील शहरातील बहुतेक जुने अरुंद रस्ते आजहि cobbled stones मध्ये बांधलेलेच असतात.) हिंदुस्थानामध्ये असा काही प्रघात असल्याचे दिसत नाही.

युरोपातील काही चौकांची मी घेतलेली छायाचित्रे पहा.


वेनिसमधील सान मार्को पिआझ्झाचे सान मार्को बसिलिकाच्या छतावरून घेतलेले चित्र, शेजारी पाँपेच्या अवशेषामधील 'फोरम', डाव्या बाजूला गावाचे प्रमुख कार्यालय आणि समोर ज्यूपिटरचे मंदिर. (मागे वेसुविअस ज्वालामुखी.)



ब्रुसेल्समधील एक चौक. त्याची cobbled stones मधील दगडी बांधणी पहा. (पुतळा कारेल बुल्स नावाच्या ब्रुसेल्सच्या १९ व्या शतकाच्या अखेरीच्या काळातील मेयरचा आहे. बरोबर त्याचा कुत्रा. चित्रामधील व्यक्ति असाच कोणी टूरिस्ट आहे.) शेजारच्या चित्रामध्ये वेनिसच्या 'मुरानो' ह्या काचकामासाठी प्रख्यात बेटावरील एक छोटा चौक 'पिआझ्झा कोलोन्ना'.

(ग्रीक नरकाबाबत अजून जाणावयाचे असेल तर हे मजेदार संस्थळ पहा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीकरिता बहुत धन्यवाद! चित्रे मस्त रोचक आहेत.

कॉबल्ड स्टोन्समधील बांधणी मस्त आहे. त्यामुळे ओव्हरऑल परिसराला वेगळाच लुक येतो, ते सर्व बघायला फार छान वाटते,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुंदर!!! "मेरीच्या स्वर्गारोहणाचे" चित्र आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार!
तुमची भटकंती अतिशय "डोळस" असते याचा पुनःप्रत्यय आला.

आता वी वॉन्ट घेंट... वी वाँन्ट ब्रूज! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खुपच छान माहिती. "कॅथीड्रलचे प्रवेशद्वार आणि त्यातील 'अखेरचा न्याय'" हे चित्र खुपच रोचक वाटले आणि फार सोप्या पद्धतीने चित्रातून संदेश दिलेले आवडले. चित्रे थोडी छोटी वाटली आणि इथे ती मोठी करुन पाहाण्याची व्यवस्था नसल्याने तुमच्या अनुदिनी वर जाऊन पाहिली Smile
एकेका चित्राची (ट्रिपटिक) सविस्तर दिलेली माहिती बेहद्द आवडली.

एक प्रश्न : मेरी तिच्या देवदुतांसह स्वर्गात जात असतानाच्या चित्रात तिच्या आ़जूबाजूला असलेले लहान बाळं म्हणजे 'एंजेल्स' का? एंजेल्स नसतील, तर ते कोण? (ह्या बाबतीत फार माहिती नसल्याने हा प्रश्न पडला).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'चेरब - Cherub' ही ख्रिश्चन धार्मिक चित्रणांमधील प्रथा आहे. ही गुटगुटीत बालके संत, धार्मिक महत्त्वाच्या व्यक्ति, सुंदर स्त्रिया इत्यादींच्या सभोवती आढळतात. मेरिअम वेब्स्टरमधील ह्या शब्दाचा अर्थ पहा "a type of angel that is usually shown in art as a beautiful young child with small wings and a round face and body."

गुटगुटीत बालकासारखा चेहर्‍याचा आकार मोठया वयात येणे ही एक medical disorder आहे आणि तिला cherubism असे म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद माहिती बद्दल. बर्‍याच चर्च किंवा विदेशी धार्मिक चित्रांमध्ये ही बालके पाहत आलोय, आज खरी माहिती मिळाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर आणि माहितीपूर्ण.

दगडी इमारती पाहूनच डोळे निवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.