एकसुरी

'एकसुरी' किंवा univocalic हा प्रकार सर्वपरिचित नाही. यातली थोडक्यात कल्पना अशी की एकच सूर (किंवा स्वर) वापरून लेखन करायचं. उदाहरणार्थ, दान्ते अलिगिएरीच्या 'Inferno' या महाकाव्याची सुरुवात अशी अाहे, की कवी (म्हणजे दान्ते) अस्वस्थपणे भटकत असताना त्याला (प्राचीन लॅटिन कवी) व्हर्जिल भेटला अाणि नरक दाखवायला घेऊन गेला. एका लेखकानं या प्रसंगाचं univocalic वर्णन असं केलेलं अाहे:

Virgil finds Pilgrim, drifting in midnight, 
Bids Pilgrim visit sin's finishing pit.

क्रिस्तियन ब्योक या लेखकाने Eunoia या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं अाहे. यात पाच chapters अाहेत, त्यातल्या पहिल्यात फक्त a, दुसऱ्यात फक्त e, असा प्रत्येक chapter मध्ये एकुलता एक स्वर वापरलेला अाहे. उदाहरणार्थ, दुसऱ्या chapter ची सुरुवात अशी:

Enfettered, these sentences repress free speech. The text deletes selected letters. We see the revered exegete reject metred verse…

(एकच सूर वापरणं अाणि एकच स्वर वापरणं या फरकाबद्दल बरंच लिहिण्यासारखं अाहे, पण विस्तारभयामुळे अात्ता इथे त्यात शिरत नाही.) मी रचलेली एक 'एकसुरी' खाली देतो अाहे:

घाला

हा बाटाकाका. काऱ्या काकाचा हा साधासा माळा. हा त्याच्या श्वानाचा, 'राजा' चा गाळा. काळा राजा काकाचा प्यारा. म्हातारा काका साऱ्या गावाचा प्यारा.

काकाला डांग्या झाला. अाजाराचा गाजावाजा झाला. साऱ्या बाया भ्याल्या. काकाच्या दाराला अाल्या. काकाचा त्रागा थांबावा हा त्यांचा चाळा झाला. त्यांच्या ज्या वार्ता झाल्या त्याचा हा अाढावा:

राधा: द्राक्षाचा काढा प्या.
श्यामा: काका, माझ्या बापाचा सांगावा माना. पारा जाळा, त्याचा साका चाटा.
अाशा: वांग्याच्या काड्या चावा.
अाकांक्षा: गालाला अांब्याच्या झाडाच्या पानांचा पाला थापा.
वामा: हा घ्या काशाचा तांब्या. गारांच्या पाण्याचा साठा घ्या. ताज्या लाह्या टाका. हा सारा काला खा.
तारा: हाडाच्या काड्यांचा मांडा खा. मासा भाजा, त्याचा वाफारा घ्या. वाघाचा पापा घ्या. हा, हा, हा!

काका: थांबा, थांबा. हा मारा जादा झाला! जा अाता कामाला. अात्ताच्या अात्ता पांगा!

काकाचा डांग्या जावा हा ज्याचा त्याचा धावा. काटा बाराला अाला. काकाला श्वासाचा वांधा झाला. प्राणांना काळाचा हाकारा अाला. बाटाकाकाला साऱ्या गावाचा टाटा. काकाला खांदा द्या. राजाला सांभाळा. बाराव्याला या. काकाला भाताचा वाटा द्या.

✳ ✳

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

एकसुरी व एकस्वरी यातला फरक नक्की काय?

संस्कृतमध्येदेखील अशा रचना आहेत असं ऐकून आहे. कोणाला यांविषयी काही माहित आहे का?

माझा एक वेगळा प्रयत्न

काकांच्या काळ्या कात्र्या (का काळ्याच्या काकांच्या कात्र्या?)

काळ्या - काढा, काढा, कात्र्या काढा!
काका - का? का? का?
काळया - का? काका, काजाच्या काड्या कापायाला कात्र्या!
काका - काण्या, कान्ह्या, काळ्या कात्र्या काढा...
काळ्या - का? कान्ह्या, काण्या कात्र्या काढा
काका - काण्या? काळ्या, काळ्या कात्र्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकसुरी व एकस्वरी यातला फरक नक्की काय?

माझ्या मते या विषयात गुंतागुंत बरीच अाहे; इतकी की नेमकी काय गुंतागुंत अाहे हे नीट सांगणंही गुंतागुंतीचं अाहे. पण तरीही प्रयत्न करतो:
१. 'स्वर' या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ होऊ शकतो. उदा. मराठीत अापण 'अ' हा स्वर अाहे असं मानतो, पण 'चक्क' या शब्दात 'च' ला जोडून येणारा 'अ', अाणि 'क' ला जोडून येणारा 'अ' हे कानाला वेगळे लागतात. तेव्हा हे वेगळे स्वर (अावाज या अर्थाने) अाहेत असं एखादा म्हणू शकेल.
२. 'अाज' या शब्दात दोन स्वर अाहेत असं सर्वसाधारण मराठी शाळामास्तर म्हणेल. पण हा शब्द एकच syllable चा अाहे, त्यामुळे त्यात एकच vowel nucleus (स्वरकेन्द्र) अाहे.
३. अापण 'य' हे व्यंजन मानतो, पण 'साऱ्या' या शब्दातला 'य' हा semivowel (अर्धस्वर) अाहे.

त्यामानाने 'सूर' या शब्दाला तितकी काटेकोर व्याख्या नाही (किंवा निदान मला तरी माहित नाही), त्यामुळे मला 'एकसुरी' हा शब्द कमी भानगडीचा अाणि कमी वादग्रस्त वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

म्हणजे स्वर हा शब्द तुम्ही उच्चाराप्रमाणे वापरत आहात, तर सूर हा अ, आ, इ इत्यादी अक्षरांसाठी वापरत आहात. हे मला उलटं वाटतं. सूर हा कानांना लागणारा, आणि स्वर हा स्वर आणि व्यंजन मधल्या लिखित स्वरांप्रमाणे वाटतो. म्हणजे चक्क या लिखित शब्दाची फोड केली तर च् अ क् क् अ असं फोड करून लिहिता येतं. यातले लिहिण्यासाठीचे दोन्ही अ समान आहेत. उच्चारताना जो लागेल त्याला सूर म्हणण्याकडे माझा कल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारविच्या किरातार्जुनीयामध्ये एक एकाक्षर श्लोक आहे. तो असा -

ननोन नुन्नो नुन्नो नो नाना नाना ननाननु
नुन्नो नुन्नो ननुन्नेनो नानेना नुन्ननुन्ननुत्

अर्थ माहित नाही. आम्हाला किरातार्जुनीय शिकविणा-या सराना पण तो सांगता आला नव्हता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'एकसुरी' शब्दाची समज बदलवून टाकणारा 'घाला' आहे तुमचा. पण असं एकसुरी लिहिणं जास्त अवघड - त्यात शब्दांच्या आशयापेक्षा शब्द मापात बसतो का नाही याकडे ध्यान द्याव लागणार जास्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0