कंपोस्टबद्दल
बागकामाच्या धाग्यात कंपोस्टबद्दल हा एक प्रतिसाद दिला, पण त्याबद्दल चर्चा शोधायला सोपं पडावं म्हणून हा नवा धागाच सुरू करत आहे.
रोचनाने डोक्यात खूळ भरवून दिल्यापासून घरात झाडं लावली आहेतच, शिवाय कंपोस्टही सुरू केलं आहे. सुरूवातीला काहीच होत नव्हतं, म्हणून लगेचच - म्हणजे चार दिवसात - होम डीपो या साखळी दुकानातून कंपोस्ट स्टार्टर आणलं. त्याच्या पॅकिंगवर लिहीलेलं आहे त्यानुसार त्या पदार्थामुळे कंपोस्टाचं तापमान १६० अंश फॅ (७१ अंश से) राहतं. तापमान जास्त असल्यामुळे त्यातल्या तणाच्या बिया मरतात, कंपोस्ट पटकन होतं. तरीही पुढचे बरेच दिवस - तीनेक आठवडे - काही फरक दिसत नव्हता. अधूनमधून कंपोस्टला किंचित वाईट वास येत होता. शिवाय बरेच किडे दिसत होते. सुरूवातीला कंपोस्टाच्या डब्यातल्या अळ्या, बहुपाद जीव, किडे पाहून बरीच घाण वाटली, वर पुन्हा वाईट वास होताच. म्हणून गूगल करून काय काय किडे कंपोस्टात दिसतात वगैरे शोधलं. तरी कंपोस्टाच्या निमित्ताने बाल्कनीत खार दिसून करमणूक होत होती म्हणून ती आरास उचलून केरात टाकली नाही.

दहा-बारा दिवसांपूर्वी आमच्याकडे फार वॉर्निंग न देता पाऊस आला. दीड तासात पाच इंचावर पाऊस पडला. कुंड्यांमध्ये पूर आला तसाच कंपोस्ट बिनमध्येही आला असता, पण नशीबाने त्यावर पॅकिंगचा खोका आडवा करून टाकला होता. त्यावर पावसाचं पाणी साठून तो थोडा वाकला. आणि दोन दिवसांनी पाहिलं तर पांढुरक्या अळ्यांनी खोक्याचा आत गेलेला भागही गिळायला सुरूवात केली होती. हे प्रकरण फारच पांचट होतंय असं वाटून परवाच्या शनिवारी दुपारभर (एकीकडे टीव्ही पाहताना) घरात असलेले फेकून द्यायचे सगळे कागद, खोके, पुठ्ठे टरकावले आणि त्या कंपोस्टात टाकून दिले.
खालच्या बाजूला मातीसारखं दिसणारं, पण चिखलच म्हणावा अशा कंसिस्टन्सीची गोष्ट दिसत होती. कंपोस्ट ढवळायला बाजूला झाडाच्या खोडाचा वाळका तुकडा आणला होता. आज त्यानेही कंपोस्टाच्या बादलीतच राम म्हटला. त्याच झाडाचं आणखी जाडजूड खोड शोधून आणलं आणि कंपोस्ट हलवलं. गेले चार दिवस होत असलेला भास पुन्हा झाला. कंपोस्टाला किंचित गोडुस वास येतो आहे. अजूनही त्यात हात घालायची तयारी नाहीये. पण परवा, शनिवारी संध्याकाळी टाकलेल्या शेंगांची काही टरफलं आता अशी, कुरतडलेली दिसत आहेत.

या कुरतडलेल्या टरफलाच्या डाव्या, उजव्या बाजूला खाली (हाताने काढलेली लाल वर्तुळं दिसत असतील तर) अळ्या आहेत. या अळ्या कंपोस्टासाठी आणि पुढे झाडांसाठी बऱ्या असतात का? या अळ्यांची प्रचंड पैदास त्या टबात सध्या झालेली आहे. सगळ्या टाकलेल्या पदार्थांची पूर्ण माती झाल्यावर त्या अळ्यांचं काय होईल?
दुसरा प्रश्न - कंपोस्ट बिनच्या जवळ असणाऱ्या चेरी टमेटोची अवस्था सुरूवातीलाच बिकट झाली होती. त्यावर काळे डाग दिसले, ते फंगस आहे असं गूगलल्यावर समजलं. (त्यासाठी फंगसनाशक फवारा घेऊन आले. कडुनिंबाच्या रसाने किती परिणाम होईल याची कल्पना नव्हती त्यामुळे आणलेला फवारा जैविक आहे का नाही याची फार पर्वा केली नाही.) आता झाड बरं दिसत आहे, गेल्या चार दिवसात जरा वाढलंय असंही वाटतंय. (या हिशोबात दुसऱ्या टोकाला, म्हणजे अडीच फूट लांब असणारं दुसऱ्या जातीच्या टोमॅटोचं झाड सुरुवातीपासूनच टुणटुणीत आहे.) प्रश्न असा की आता हे कंपोस्ट वासाला बरं आहे म्हणजे आजूबाजूच्या झाडांना कमी उपद्रव देईल का?
तुम्हाला तुमच्या कंपोस्टांचे काय अनुभव आहेत?
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
आमच्याकडे घरात कंपोस्ट
आमच्या शहरात घरात कंपोस्ट करण्यासाठी कंपोस्टर विकत घ्यायला थोडं अनुदान मिळतं, असं गूगल करताना समजलं. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांना त्याचा फायदा नाही, पण घर घेऊन राहणाऱ्यांना होतो. तुमच्याकडेही असं काही आहे का पहा.
सुरूवातीला मी ते कंपोस्ट फिरवणं पाहिलं होतं. पण एवढे पैसे खर्च करायचं जीवावर आलं. बाल्कनीतून खाली डोकावल्यावर लगेचच लाठ्या काठ्या दिसत होत्या, त्या उचलून आणायलाही फार त्रास नाही.
शिजवलेलं अन्न टाकायची वेळ फार वेळा येत नाही. पण त्या खारीची गंमत बघायला मजा आली. पुढे आठ-दहा दिवस ती रोज येऊन डोकावत होती. मग टरबुजाच्या साली घेऊन जातानाही तिची तारांबळ पाहिली. बहुतेकशा गोष्टींचं खत होताना दिसतंय किंवा काय होतं हे ओळखता येत नाहीये. अपवाद फक्त अव्होकाडोच्या सालींचा. त्यांचा रंग काळवंडलाय वगळता फारसा बदल दिसत नाहीये. (आतलं अव्होकाडो मात्र चटकन संपवावं लागतं. सरासर नाईन्साफी है।)
हे बघा बरं.
या दुव्यावर जाऊन बघा बरं तुम्हाला तुमच्या नवीन मित्रांची ओळख पटते का.
http://forums2.gardenweb.com/forums/load/soil/msg092251148429.html?14
सानिया - भगवंतास्टिक. हेच ते.
सानिया - भगवंतास्टिक. हेच ते.
या दुव्यावर हे लोक मित्र असल्याचं म्हटलं आहे. शिवाय विकीपीडीयावर पाहिलं तर हे म्हणजे "आखूडशिंगी, बहुदुधी" जीवजंतू आहेत, असं दिसतंय. यांचं नाव, त्यामुळे अधिक माहिती, मिळत नव्हती तोपर्यंत अंमळ भीती वाटत होती. पण आता या लोकांना चिक्कार खाणं देण्याचा उत्साह आलेला आहे. आता पुन्हा कलिंगड, टरबूज वगैरे भरपूर 'कचरा' करणारी फळं आणायला हरकत नाही. या जीवांना जास्त ओल आवडते हे ही समजलं. (लगेच कंपोस्टलाही पाणी घालून आले.)
विकीपानानुसार - Significant reductions of E. coli 0157:H7 and Salmonella enterica were measured in hen manure. कदाचित कंपोस्टातलं बुरशीचं प्रमाणही कमी झालेलं असेल, त्यामुळेही कदाचित चेरी टोमॅटोची तब्येत बरी दिसत असावी.
राजेश - स्टारबक्सच्या संस्थळावर वाचलं होतं तर त्यांची वापरलेली कॉफी कंपोस्टसाठी देण्याची कंपनी पॉलिसी आहे. (आत्ता नेमकं ते पान उघडत नाहीये.) आमच्या घराजवळच्या स्टारबक्समध्ये ते अशा पिशव्या बाहेरच ठेवून देतात, आपण बाहेरच्या बाहेरच घेऊन जाऊ शकतो, असं समजलं. वेगवेगळ्या संस्थळांवर म्हटल्यानुसार वापरलेल्या कॉफीचं pH ६.२ ते ६.९ असं आहे. बहुतांश संस्थळं ६.२ असतं - ६.९ पेक्षा जास्त आम्ल असणारी - म्हणत आहेत. (पाणी न्यूट्रल असतं, pH - ७.०)
आमच्या या काळ्या शिपाई माश्यांच्या अळ्यांना किंचित आम्ल असणारं खाद्य आवडतं असंही बऱ्याच ठिकाणी दिसलं. त्यामुळे कंपोस्टसाठी जास्त कॉफी प्यायची गरज नाही. स्टारबक्समध्ये फेरी मारली तरी पुरेल. (चहा पिणारे, वापरलेल्या चहातली साखर आणि दूध असल्यास ते धुवून काढून मग, चहासुद्धा कंपोस्टात टाकू शकतात.)
रुची म्हणाली तसं मोठे तुकडे
रुची म्हणाली तसं मोठे तुकडे घालण्याचे टाळलं तर जिरायची प्रक्रिया वेग घेते. मी वडाच्या झाडाची सुकलेली मोठी पानं घालताना सुद्धा चिरडून घालते. आणि कचरा खूप घट्ट पॅक केला नाही तर फिरवायला सोपं जातं. आठवड्यातनं एकदा तरी एका लाकडी उलतन्याने खालपासून ढवळलं, म्हणजे खाली ओला कचरा कुजून जात नाही. ह्याचाच सहसा कोडसू वास येतो. तसाच कुजत ठेवला तर तेवढा गोडसू राहात नाही.
सोल्जर फ्लाय मॅगॉट्स आर यॉर फ्रेंड्स! मी परवा जिरलेला कंपोस्ट चाळून घेताना त्यांचे रिकामे काळे कवच भरपूर पाहिले.
एक जुन्या माठात कंपोस्ट तयार
एक जुन्या माठात कंपोस्ट तयार करायचा प्रयत्न चालू आहे, घरातला ओला कचरा आणि झाडाच्या पानांचा सुका कचरा एकत्र मिसळलं आहे, इथल्याच एका संस्थेकडून बायोकल्चर विकत आणलं आहे, ते चिमूटभर घातलं आहे, ह्यालाही दिडमहिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे, तळाशी अपेक्षेप्रमाणे काळपट कंपोस्ट दिसायला सुरुवात झाली आहे. आता पावसाळ्यात कोरड्या कचर्याची थोडी कमतरता भासते आहे, जमल्यास आज/उद्यामधे फोटो डकवेन.
परवाच चाळलेले खत. हा बॅच जून
परवाच चाळलेले खत. हा बॅच जून महिन्यात सुरू केला. सुरुवातीला ओला कचरा जास्त झाल्यामुळे गल्लीभर लोक नाक दाबून ओरडायला लागले. मग पानं घातली, आणि दीड महिना तसेच ठेवले, फक्त आधुनमधुन ढवळलं. चाळल्यावर एक महिना तसेच ठेवून मगच वापरावा असा सल्ला मिळाला होता, म्हणून आता मातीच्या कुंडीत ठेवले आहे.
अवांतर
ते दृष्य मलाही फार आवडलं. (म्हणूनच कलिंगड, टरबूजाच्या साली त्या टबात टाकायला हव्यात असं वाटतं.)
बाल्कनीला असणारे गज तिच्या मागे दिसत आहेत. मी आणि ती गजांच्या एकाच बाजूला आहोत. पण ती करत्ये ती चोरी आहे याची थोडीबहुत कल्पना खारीलाही आहे. कारण तिची शेपटी चांगली फुलली आहे. पण ती गजांआड होण्याऐवजी कॅमेऱ्यात बंद झाली.
तुझ्या अळ्या..माझ्या अळ्या...
माझं कंपोस्ट एका खोल पिंपात आहे त्यामुळे ढवळायला जरा त्रासच होतो, पण तरी काही दिवसांपूर्वीपर्यंत त्यात अळ्या दिसल्या नाहीत म्हणून जरा चिंतीत होते. आता मात्र भरपूर अळ्या दिसत आहेत. या बघा.
यशिवाय माझ्या वाफ्यात घातलेल्या कॉफीमधे अशा बर्याच माशा चिकटल्यासारख्या दिसत आहेत. या लहानग्या माश्यांना पंख आहेत, पण त्या फारशा उडत नाहीत्/उडू शकत नाहीत. त्या चालतानाच दिसतात. यांचा शोध घेतला पाहीजे. या माझ्या कांपोस्टात दिसणार्या ब्लॅक सोल्जर फ्लाईजच आहेत का ते कळत नाही.
ब्लॅक सोल्जर फ्लाईज अशा दिसतात.
http://aggie-horticulture.tamu.edu/galveston/beneficials/beneficial-51_…
कॉफी कांपोस्टात किंवा मल्च म्हणून वापरण्याकरता काय प्रमाण असावे इ. प्रश्नांना उत्तरं देणारा हा लेख नुकताच वाचनात आला.
http://puyallup.wsu.edu/~linda%20chalker-scott/Horticultural%20Myths_fi…
कंपोस्ट स्टरर
हात न घालता कंपोस्ट हलविण्यासाठी स्टरर मिळतं ते घेऊन ये. कंपोस्टात एवढी मोठे पिझ्झाचे तुकडे वगैरे टाकल्याने खारी खुष होत असतील पण खत बनायला खूप वेळ लागेल, शक्यतो शिजवलेले अन्न त्यात घालणे टाळच असे म्हणेन. भाज्यांच्या साली, देठे वगैरे वारीच चिरून टाकल्या आणि त्यात मधेमधे वर्तमानपत्राचे कागद, सुका कचरा वगैरे टाकले तर खत लवकर बनेल आणि वाईट वास येणार नाही असा सल्ला. मी आज-उद्यात हा गोल फिरणारा कंपोस्टर विकत घेतेय, त्याचे फायदेतोटे लवकरच कळतील.