मॅटरहॉर्न

आल्प्स !

सुमारे १२०० किलोमीटर पसरलेल्या आल्प्स पर्वतराजीला युरोपात अनन्यसाधारण महत्व आहे. युरोपातील अनेक देशांतील नैसर्गीक सौंदर्याला ब-याच अंशी कारणीभूत असलेला आल्प्स हा गिर्यारोहकांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय नसला तरच नवल. पूर्वेला ऑस्ट्रीया आणि स्लोवानिया, पश्चिमेला फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि लिचेन्स्टाईन आणि दक्षिणेला इटली आणि मोनॅको या देशांमध्ये पसरलेला आल्प्स पर्वतात अनेक मनोहर सौंदर्यस्थळं आहेत तशीच आव्हानात्मक गिरीशिखरंही. आशिया खंडात जे हिमालयाचं स्थान तेच युरोपात आल्प्सचं !

आल्प्सच्या पश्चिम भागातील पर्वतरांग पेनीन आल्प्स म्हणून ओळखली जाते. स्वित्झर्लंडचा वॅलीस प्रांत आणि इटलीतील पिडमाँट आणि ऑस्टा व्हॅलीत पेनीन आल्प्स पसरलेला आहे. माँटेरोसा हे स्वित्झर्लंडमधील सर्वात उंच आणि युरोपातील दुस-या क्रमांकाचं शिखर या पेनीन आल्प्समध्येच आहे. हा संपूर्ण प्रदेश अनेक वेगवेगळ्या ग्लेशीअर्सने भरलेला आहे. मार्टीग्नी या वॅलीस प्रांतातील शहराला ऑस्टा व्हॅलीशी जोडणारं सेंट बर्नार्ड टनेल याच प्रदेशात आहे.

पेनीन आल्प्सच्या स्विस प्रदेशात र्होन नदीच्या खो-याच्या दक्षिणेला मॅटर व्हॅली आहे. या मॅटर व्हॅलीच्या सर्वात उत्तरेकडील टोक म्हणजे झरमॅट हे लहानसं गाव. चारही बाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेल्या झरमॅटची अर्थव्यवस्था मुखतः स्कीईंग करण्यास येणारे पर्यटक आणि आजूबाजूच्या पर्वतांवर चढाईसाठी येणारे गिर्यारोहक यावर अवलंबून आहे. या संपूर्ण प्रदेशाचं वैशीष्ट्य म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने इथे पेट्रोल अथवा डिझेलवर चालणा-या वाहनांना पूर्ण बंदी आहे ! काही सरकारी वाहनांचे अपवाद वगळता इथली सर्व वाहने इलेक्ट्रीक किंवा बॅटरीवर चालतात ! स्कीईंगसाठी प्रसिध्द असलेल्या या भागात रोपवेचं जाळं आहे.

झरमॅट हून पेनीन आल्प्समार्गे स्वित्झर्लंड आणि इटलीच्या प्रदेशांत जाण्यासाठी सुमारे पंधरा बर्फाच्छादीत खिंडी ( पास ) आहेत. यापैकीच एक म्हणजे थिओडल पास.

सुमारे ३२९५ मी ( १०८१० फूट ) उंचीवरील थिओडल पास झरमॅट आणि ऑस्टा व्हॅलीतील ब्रुईल-सर्व्हीनिया यांना जोडणारा हा मार्ग थिओडलहॉर्न ( ३४६९ मी ) आणि टेस्टा ग्रिज्या ( ३४७९ मी ) यांच्या शेजारून जातो. पेनीन आल्प्समधील दुस-या सर्वात कमी उंचीच्या थिओडल पासच्या पूर्वेला ब्रेटहॉर्न ( ४१६४ मी ) हे गिरीशिखर आहे. झरमॅटहून येणारा रोपवे चा मार्ग हा ३८२० मी पर्यंत येत असल्याने ब्रेटहॉर्नची चढाई ही ४००० मी वरील गिरीशिखरांतील सर्वात सोपी चढाई आहे. थिओडल पास ओलांडून जाण्यासाठी झरमॅट इथे गाईड्स उपलब्ध असतात.

थिओडल पासच्या पश्चिमेला आहे चारही बाजूंनी तीव्र उतार असलेलं पेनीन आल्प्स आणि एकूणच युरोपातील एक बेजोड आव्हान !

मॅटरहॉर्न !


मॅटरहॉर्न

मॅटरहॉर्न हे ४४७८ मी ( १४६९० फूट ) उंचीचं आल्प्समधील ६ व्या क्रमांकाचं गिरीशिखर आहे. स्वित्झर्लंडच्या वॅलीस आणि इटलीतील ऑस्टा व्हॅलीच्या सीमारेषेवर असलेलं हे शिखर झरमॅट मधून कुठूनही पाहीलं तरीही सहजपणे दिसून येतं. पिरॅमीडच्या आकाराच्या आणि चारही बाजूंनी तीव्र उताराच्या मॅटरहॉर्नच्या पूर्वेला गॉर्नर ग्लेशीयरच्या वरची गॉर्नर पर्वतधार, उत्तरेला स्वित्झर्लंडमधील झ्म्ट व्हॅली, दक्षिणेला स्विस-इटालीयन सीमारेषेवरील इटलीतील ब्रुईल-सर्व्हीनिया आणि पश्चिमेला डेंट डी'हेरेन्स हे पर्वतशिखर आहे.

झरमॅटमधून शिखराचा पूर्व आणि उत्तरेचा उतार दिसून येतो. सुमारे १००० मी ( ३३३० फूट ) उंचीचा पूर्वेचा उतार हा धडकी भरवणारा आहे. शिखरावरून सतत दगडांचा वर्षाव होत असल्याने या उतारावर चढाई करणं अत्यंत धोकादायक असतं. १२०० मी ( ४००० फूट ) उंचीचा पूर्वेचा उतार हा वादळं आणि दरडी कोसळत असल्याने आल्प्समधील सर्वात धोकादायक भागांपैकी एक ! १३५० मी ( ४५०० फूट ) उंचीच्या दक्षिण उतारावर तुलनेने अनेक तांत्रीक चढाईचे मार्ग आहेत. सर्वात उंच असलेल्या १४०० मी ( ४६६७ फूट ) उंचीच्या पश्चिम उतारावर चढाईसाठी जेमतेम दोन-तीन मार्ग आहेत.

मॅटरहॉर्नच्या माथ्यावर चढाईचे मार्ग या उतारांना जोडणा-या शिखराच्या धारेवर ( रिज ) आहेत. पूर्व आणि उत्तरेच्या उतारांना जोडणारी हॉर्नली रिज हा चढाईचा सर्वात सोपा मार्ग. झरमॅटहून सहजपणे ही वाट गाठता येत असल्याने चढाईचा हा सर्वात लोकप्रीय मार्ग आहे. उत्तर-पश्चिम उतारांना जोडणारी झ्मट रिज ही माथ्यावर जाणारी लांबलचक वाट आहे. दक्षिण-पश्चिमेच्या मधील लायन रिज हा इटलीतून माथ्यावर येणारा मार्ग आहे. हॉर्नली रिजपेक्षा ही वाट जास्त कठीण आणि तांत्रीक चढाईची आहे. पूर्व आणि दक्षिण उतारांना जोडणारी फर्जन रिज हा चढाईचा सर्वात कठीण मार्ग.

चारही बाजूला असलेल्या तीव्र उतारांमुळे आणि सतत होणा-या हिमप्रपातामुळे ( अ‍ॅव्हलॉन्च ) मॅटरहॉर्नच्या उतारांवर बर्फचं आवरण हे तुलनेने कमी आहे.

१८५७ साली इटालियन गिर्यारोहक आणि गाईड जीन अ‍ॅन्टनी कॅरेल याने मॅटरहॉर्नवर चढाईचा सर्वात प्रथम प्रयत्न केला. कॅरेल ऑस्टा व्हॅलीतील वॉल्टरमेन्चचा होता. ब्रुईल इथून लायन रिजमार्गे कॅरेलचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. १८५८ मध्ये कॅरेलने पुन्हा चढाईचा प्रयत्न केला. तो ३८०० मी पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला, मात्र खराब हवामानामुळे त्याला माघार घ्यावी लागली.

१८६० साली झरमॅट इथून चार्ल्स, आल्फ्रेड आणि सँडबॅच या पार्कर त्रयीने हॉर्नली रिजमार्गे चढाईचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आलं. जॉन टिन्डेल, व्हिक्टर हॉकीन्स यांची लायन रिजमार्गे चढाईची मोहीमही ३९६० मी पर्यंतच पोहोचण्यात यशस्वी झाली.

१८६० सालच्या उन्हाळ्यात एक इंग्लीश चित्रकार आल्प्समध्ये आला. स्विस-इटालियन सरहद्दीवरील पर्वतरांगेची रेखाचित्र काढण्याचं काम लंडनच्या एका प्रकाशन संस्थेने त्याच्यावर सोपवलं होतं. गिरीशिखरांची चित्रं रेखाटताना तो स्वतःच गिरीशिखरांच्या प्रेमात पडला आणि नियमीत गिर्यारोहण करू लागला ! अद्यापही कोणीही चढाई न केलेल्या मॅटरहॉर्नवर त्याची नजर गेली. अवघ्या वीस वर्षांचा हा तरूण गिर्यारोहक होता एडवर्ड व्हिम्पर !

१८६१ साली व्हिम्पर एका स्विस गाईडसह ब्रुईल इथे आला. मॅटरहॉर्नच्या पायथ्याशीच व्हिम्परची गाठ एका इटालियन गाईड्शी आणि त्याच्या काकाशी पडली. हा इटालियन गाईड दुसरातिसरा कोणी नसून जीन अ‍ॅन्टनी कॅरेल होता. चार वर्षांत त्याने चढाईचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले होते. २९ ऑगस्टच्या सकाळी कॅरेल आणि त्याच्या काकाने व्हिम्पर आणि त्याचा गाईड झोपेतून उठण्यापूर्वीच चढाईला सुरवात केली. व्हिम्परच्या हे ध्यानात येताच आपल्या स्विस गाईडसह त्याने घाईघाईतच दोघांना गाठण्यास चढाईला सुरवात केली. परंतु व्हिम्पर आणि कॅरेल दोघांनाही शिखराचा माथा गाठता आला नाही.

१८६२ साली व्हिम्परने चढाईचे एकूण पाच प्रयत्न केले. १८-१९ जुलैच्या एकट्याने केलेल्या प्रयत्नात त्याने ४०८४ मी उंची गाठली. २३-२४ जुलैच्या चढाईत व्हिम्परने कॅरेलची गाईड म्हणून नेमणूक केली परंतु ४००८ मी वरून दोघांना परत फिरावं लागलं. लगेच २५-२६ जुलैला व्हिम्परने लुक मेनेटच्या साथीने ४१०२ मी उंची गाठली, परंतु याही वेळेस त्याला हार पत्करावी लागली. २७-२८ जुलैला जॉन टिन्डेल, व्हिक्टर हॉकीन्स आणि जेफ कॅरेल ( जीनचा काका ) हे शिखराच्या शेवटच्या चढावाखाली पोहोचले. परंतु त्यांच्या पुढ्यात उभ्या ठाकलेल्या उभ्या चढणीच्या कड्यापुढे त्यांचे सर्व प्रयत्न विफल ठरले. मॅटरहॉर्न अद्यापही अजिंक्य होतं !

१८६३ साली व्हिम्परने १०-११ ऑगस्टला कॅरेलच्या साथीने पुन्हा चढाई केली. लुक मॅनेटही त्यांच्या जोडीला होता. पण ४००० मी वर त्यांना माघार घ्यावी लागाली.

१८६३ मध्ये आघाडीचे इटालियन गिर्यारोहक क्विंटीनो सेला. बार्थोलोमु गॅस्टाल्डी आणि फेलीस गिओर्डानो यांची तुरीन प्रांतातील व्हॅलेंटाईन किल्ल्यात भेट झाली. तीनही प्रतिशयश गिर्यारोहकांची इटालियन अल्पाईन सोसायटीची स्थापना करण्याबद्दल सविस्तर चर्चा झाली. ब्रिटीश गिर्यारोहकांनी मॉन्टेव्हिसोच्या चढाईत इटालियनांना मागे टाकत यशस्वी चढाई पूर्ण केली होती. त्यामुळे इटालियन गिर्यारोहकांनी मॅटरहॉर्नच्या चढाईवर लक्षं केंद्रीत केलं. त्यांच्या दृष्टीने मॅटरहॉर्नची यशस्वी चढाई हा इटालियन राष्ट्रीयत्वाचा मानबिंदू ठरणार होता.

चढाईच्या पूर्वतयारीची जबाबदारी फेलीस गिओर्डीनोवर सोपवण्यात आली. त्याने झरमॅट गाठून मॅटरहॉर्नच्या परिसराची बारकाईने पाहणी केली. आपल्या वहीत त्याने शिखराची आणि आजूबाजूच्या परिसराची अनेक रेखाचित्रं काढून घेतली. काही गणन केल्यावर इटालियन बाजूने शिखरापासून फक्त ५०० फूट खालपर्यंत वाट तयार झालेली असल्याचं त्याला आढळून आलं. मोहीमेसाठी त्याने उत्तम दोर, तंबू, बॅरोमीटर असं सर्व साहीत्य जमवलं होतं. वॉल्टरमेन्चला जाऊन त्याने जीन कॅरेलचीही भेट घेतली. कॅरेलने त्यांच्या मोहीमेत सामील होण्यास अर्थातच होकार दिला.

१८६५ मध्ये व्हिम्पर पुन्हा ब्रुईलला परतला. आतपर्यंत आलेल्या अपयशामुळे त्याने एक नवाच मार्ग शोधून काढला. मॅटरहॉर्नच्या पूर्वेच्या उतारावरील खडक चढाईसाठी फारसे कठीन नसल्याचं त्याच्या सराईत नजरेने हेरलं होतं. शिखराच्या इटालियन बाजूला असलेल्या मॅटरहॉर्न ग्लेशीयरवर चढाई करून फर्जन रिजवरून आडव्या असलेला दगडी कॉरीडॉर गाठायचा आणि तिथून पूर्वेच्या उताराला पूर्ण वळसा घालून हॉर्नली रिज गाठायची आणि शिखरावर चढाई करायची असा त्याचा बेत होता. पण या मार्गावरून पूर्वेच्या उताराला वळसा घालत असतानाच शिखरावरून दगड-धोंड्यांची रास कोसळून खाली आली. त्यामुळे व्हिम्परचे कोणीही गाईड या मार्गावर पाय ठेवण्यास तयार होईनात.

दरम्यान व्हिम्परने कॅरेलशी संपर्क साधला होता. व्हिम्परने कॅरेलची गाईड म्हणून नेमणूक करून स्विस भागातून चढाईचा बेत आखला. कॅरेलने त्याला मान्यता दिली, पण तो प्रयत्न फसल्यास पुन्हा इटालियन भागातून चढाईचा विचार मांडला. व्हिम्पर-कॅरेलने ८ जुलैला झरमॅट गाठलं, पण ९-१० जुलैला खराब हवामानामुळे त्यांना चढाई करणं अशक्य झालं. ते ब्रुईलला परतले. कॅरेलने व्हिम्परला आपण ११ जुलै नंतर त्याच्याबरोबर चढाई करू शकणार नसल्याचं सांगितलं. व्हिम्परला आश्चर्य वाटलं. कॅरेल उत्तरला,

" हा बेत आधीच ठरला होता. मला एका फार मोठ्या व्यक्तीने आधीच एका मोहीमेसाठी बोलावलं आहे. फक्त मला नक्की तारीख माहीत नव्हती !"

ही मोठी व्यक्ती नक्की कोण होती ?

इटालियन अल्पाईन क्लबची स्थापना झाल्यावर क्विंटीनो सेला. बार्थोलोमु गॅस्टाल्डी आणि फेलीस गिओर्डानो यांनी मॅटरहॉर्न मोहीमेची जुळवाजुळव सुरू केली होती. कॅरेलन अर्थातच त्यांच्यात सामील झाला होता. इटालियन गिर्यारोहकांनीच मॅटरहॉर्नवर पहिली यशस्वी चढाई करावी असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांना मुख्य स्पर्धा आणि भीती होती ती व्हिम्परचीच.

गिओर्डानोशी गाठ पडताच कॅरेलने व्हिम्परची साथ सोडली होती. कॅरेलने ब्रुईलच्या परिसरातील सहा सर्वोत्त्म गाईडना या मोहीमेत सामील करून घेतलं. एका खेचरावर आवश्यक ते सर्व साहीत्य लादून त्यांनी शिखराच्या पायथ्याची लहानशी वस्ती गाठली आणि चढाईच्या दृष्टीने तयारीस सुरवात केली. गिओर्डानोने ब्रुईलमधील हॉटेलमध्ये मुक्कामास होता. कॅरेलने चढाईच्या दृष्टीने मॅटरहॉर्नच्या वरच्या रिजवर तंबू ठोकला. अद्यापही हवामान अनुकूल नव्हतं. त्यातच बर्फ पड्ण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे वाट पाहण्याखेरीज कॅरेलच्याही हाती काही उरलं नव्हतं.

सेलाला लिहिलेल्या पत्रात गिओर्डानो म्हणतो,

" व्हिम्पर आला असून त्याने गेल्या वेळेप्रमाणेच कॅरेलची मदत घेण्याचा बेत केला होता. कॅरेलला आपल्या बेताची काही कल्पना नसल्याने त्याने व्हिम्परची योजना स्वीकारली होती. नशीबानेच हवामान बिघडल्याने व्हिम्पर चढाई करू शकलेला नाही. कॅरेलची भेट झाल्यावर आम्ही व्हिम्परला मदत करू शकेल असा प्रत्येक माणूस आमच्या मोहीमेत घेतला आहे. पण त्याचा काही भरवसा नाही ! मॅटरहॉर्नच्या वेडापायी तो एकटाही चढाईचा प्रयत्न करेल. माझी तार मिळताच तू ताबडतोब ब्रुईल गाठ !"

११ जुलैला व्हिम्परला या बेताचा पत्ता लागला. गिओर्डानो आणि कॅरेलने ब्रुईलमध्ये व्हिम्परला एकही गाईड अथवा सामान वाहून नेण्यासाठीही माणूस मिळणार नाही याची व्यवस्था केली होती. इटालियनांनी आपल्याला चकवल्याचं ध्यानात येताच त्याने झरमॅट गाठून स्वित्झर्लंडमधून चढाई करण्याचा निश्चय केला. परंतु आपलं सामान घेऊन थिओडल पास ओलांडण्यासही त्याला कोणी माणूस मिळेना.

व्हिम्परच्या सामानात सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्याजवळ असलेले सुरक्षा दोर होते. २०० फूट लांबीचा मनीला दोर, १५० फूट लांबीचा दुसरा मजबूत दोर आणि सुमारे २५० फूट लांबीचा परंतु काहीसा जुना आणि कमी वजन पेलू शकेल असा तिसरा दोर होता. चढाईच्या दृष्टीने या दोरांचं महत्वं अनन्यसाधारण असंच होतं.

व्हिम्परच्या सुदैवाने त्याची झरमॅटहून येणा-या एका तुकडीशी पडली. या तुकडीचा प्रमुख होता लॉर्ड फ्रान्सिस डग्लस. डग्लस एक उत्कृष्ट गिर्यारोहक होता. व्हिम्परने सगळी कथा डग्लसला सांगितली. डग्लस स्व्तःही मॅटरहॉर्नच्या चढाईच्या हेतूनेच आला होता ! झरमॅटचा गाईड असलेल्या पीटर टगवाल्डरचा मुलगा त्याच्याबरोबर होता. पीटर टगवाल्डरने हॉर्नली रिजवर चढाई केली होती. त्याच्या मते हॉर्नली रिजवरुन शिखराचा माथा गाठणं शक्यं होतं. व्हिम्पर-डग्लसने थिओडल पास ओलांडून झरमॅट गाठून हॉर्नली रिजमार्गे चढाईचा बेत केला.

व्हिम्पर-डग्लस यांनी झरमॅट गाठलं आणि पीटर टगवाल्डरची गाठ घेतली. त्यांच्याबरोबर आणखी एका गाईडची आवश्यकता होती. टगवाल्डरवर ते काम सोपवून ते माँटेरोसा हॉटेलमध्ये परतले.

माँटेरोसा हॉटेलमध्ये व्हिम्पर-डग्लसची रेव्हरंड चार्ल्स हडसन आणि त्याचा जोडीदार डग्लस हॅडो यांच्याशी पडली. ते देखील मॅटरहॉर्नच्या चढाईच्या उद्देशानेच आलेले होते ! त्यांच्याबरोबर मायकेल क्रॉझ हा गाईड होता. व्हिम्पर आणि क्रॉझची पूर्वीपासून ओळख होती. चर्चेअंती व्हिम्पर-डग्लस आणि हडसन-हॅडो यांनी एकत्र चढाईची योजना आखली.

१३ जुलैच्या सकाळी ५ वाजता व्हिम्पर, डग्लस, हडसन, हॅडो, क्रॉझ आणि आपल्या दोन मुलांसह पीटर टगवाल्डर मॅटरहॉर्नच्या मार्गाला लागले. घाई न करता आरामत वाटचाल करत सकाळी ११.३० च्या सुमाराला ते शिखराच्या पायथ्याशी पोहोचले. हॉर्नली रिज सोडून त्यांनी पूर्वेचा उतार गाठला आणि ११००० फूट उंचीवर त्यांना तंबू ठो़कण्यास सोईस्कर जागा आढळली. इतर सर्वजण तंबू उभारण्याच्या तयारीला लागले आणि क्रॉझ आणि टगवाल्डरचा मुलगा ज्याचं नावही पीटरचं होतं, हे पुढचा मार्ग शोधण्यास चढाईला लागले.

दुपारी ३ च्या सुमारा क्रॉझ आणि धाकटा पीटर टगवाल्डर कँपवर परतले. शिखराच्या माथ्यावर जाणारी वाट अपेक्षेपेक्षा बरीच सोपी असल्याचं त्यांना आढळलं होतं. दुस-या दिवसाच्या चढाईचा बेत करतच सर्वांनी ती रात्र शिखराच्या कुशीत उभारलेल्या तंबूत घालवली.

१४ जुलैच्य पहाटे व्हिम्पर, डग्लस, हडसन, हॅडो, क्रॉझ आणि दोन्ही पीटर टगवाल्डर चढाईच्या तयारीला लागले. टगवाल्डरचा मोठा मुलगा झरमॅटला परतला.

आतापर्यंत आठ वेळा एडवर्ड व्हिम्पर अयशस्वी ठरला होता ! या वेळी काय होणार होतं ? व्हिम्पर का इटालियन बाजूने चढाई करणारा जीन अँटनी कॅरेल बाजी मारणार होता ?

मॅटरहॉर्नची अंतीम चढाई सुरू झाली !

सुमारे ६.३० च्या सुमाराला व्हिम्परची तुकडी १२८०० फूट उंचीवर पोहोचली. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर त्यांनी पुन्हा चढाईला सुरवात केली. १० च्या सुमाराला त्यांनी १४००० फूट उंची गाठली. आतापर्यंतच्या चढाईत त्यांना एकाही ठिकाणी त्रास झालेला नव्हता. परंतु खरी कसोटी आताच होती.

झरमॅटच्या दिशेला उतरणारी हॉर्नली रिज आता निमुळती होत गेली होती. बर्फातून चढाई करत त्यांनी उत्तरेचा उतार गाठला. आधारासाठी हाताला जेमतेम एखादी कपार अधेमधे दिसत होती. बर्फावरून घसरण्याची भीती होतीच. इथे सुमारे ४० डिग्रीचा उतार होता. काही अंतर चढाई केल्यावर उतार आणखीन तीव्र झाला. अनुभवी गिर्यारोहक असलेल्या क्रॉझ, व्हिम्पर आणि हडसनला काही अडचण येत नव्हती. परंतु नवख्या हॅडोला मात्र सतत आधाराची गरज भासत होती.

हा भाग पार केल्यावर उजव्या हाताला वळून क्रॉझने ४०० फूट अंतर गाठलं आणि पुन्हा ६० फूट वर गेल्यावर डावीकडे वळून हॉर्नली रिज गाठली. एका वळण पार केल्यावर पुन्हा त्यांना बर्फाच्छादीत उताराने गाठलं. शिखरापासून ते आता केवळ २०० फूट खाली होते ! व्हिम्पर म्हणतो,

" ११ तारखेलाच चढाईसाठी ब्रुईल सोडलेल्या कॅरेलच्या माणसांचा विचार सतत आमच्या मनात येत होता. शिखरावर माणसं दिसल्याची दर वेळेस आवई उठली की सतत आमचा जीव वरखाली होत होता ! या शेवटच्या क्षणी आमचा पराभव होणार का ? उताराची तीव्रता कमी झाली आणि मी आणि क्रॉझ यांची एकमेकाशी शिखरावर पोहोचण्याची शर्यत लागली. धावतच आम्ही शिखरावर पोहोचलो ! दुपारचे १.४० झाले होते ! मॅटरहॉर्न वर अखेर आम्ही विजय मिळवला होता !"

१४ जुलै १८६५ दुपारी १.४० मिनीटांनी एडवर्ड व्हिंपर आणि मायकेल क्रॉझ मॅटरहॉर्नच्या शिखरावर पोहोचले !

व्हिम्पर आणि क्रॉझने इटालियन गिर्यारोहक शिखरावर पोहोचल्याच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना काहीही आढळलं नाही ! त्यांच्या पूर्वी कोणीही वर न पोहोचल्याची त्यांची पक्की खात्री झाली !

नेमक्या या क्षणी जीन अँटनी कॅरेल आणि इतर सर्वजण शिखरापासून खाली सुमारे ४०० मीटर अंतरावर लायन रिजवर एका कठीण कड्यावर चढाईच्या तयारीत होते. व्हिम्परला ते दिसताच तो क्रॉझला म्हणाला,

" काहीही झालं तरी आपण त्यांचं लक्षं वेधून घेऊ !"

व्हिम्पर आणि क्रॉझ दोघांनीही जोरात ओरडून कॅरेलच्या नावाने हाका मारण्यास सुरवात केली. मात्र त्याचा उपयोग होत नाही असं दिसताच त्यांनी लहान लहान दगडांचा खाली वर्षाव केला. यावेळी मात्र कॅरेल आणि इतरांचं त्यांच्याकडे लक्षं गेलं ! व्हिम्परने आपल्याला मात दिलेली पाहताच कॅरेलने मोहीम आवरती घेतली आणि निराश मनाने तो ब्रुईलला परतला.

गिओर्डानोने आपल्या डायरीत नोंद केली,

" १४ तारखेला दुपारी आपल्या तुकडीसह कॅरेल लायन रिजवर चढाई करत असताना त्याला व्हिम्पर आणि इतर सर्वजण शिखरावर पोहोचलेले आढळले ! अत्यंत उद्विग्न मनाने ते सर्वजण ब्रुईलला परतले !"

क्विंटीनो सेलाला लिहिलेल्या पत्रात गिओर्डानो म्हणतो,

" कालचा दिवस आपल्या दृष्टीने फारच दुर्दैवी ठरला. आपले सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले ! अखेरीस व्हिम्परने आपल्यावर मात केली ! झरमॅटच्या बाजूने चढाई करणं निव्वळ अशक्य आहे याबद्दल कॅरेलसकट सर्वांची खात्री असल्याने व्हिम्पर तिकडे गेल्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. ११-१२ तारखेला हवामान खूप खराब होतं आणि सतत बर्फ पडत होता, पण १३ तारखेला ते थोडंसं सुधारलं. १४ तारखेला कॅरेलने चढाईला सुरवात केली. तो वर पोहोचलही असता, पण दुपारी २ च्या सुमाराला त्याला व्हिम्पर आणि इतरजण शिखरावर पोहोचल्याचं दृष्टीस पडलं !"

व्हिम्परने कॅरेलवर मात केली असली तरी त्याच्या मनात कॅरेलबद्दल आदर होता. तो म्हणतो,

" आमच्या बरोबर जीन कॅरेल मॅटरहॉर्नच्या शिखरावर नव्हता हे केवळ दुर्दैव होतं. मॅटरहॉर्नवर चढाई करणं हे त्याचं सर्वात मोठं ध्येय होतं. शिखरावर चढाई शक्य आहे हा त्याचा ठाम विश्वास होता. आतापर्यंत त्यानेच सर्वात जास्त वेळा शिखरावर चढाईचा प्रयत्न केला होता. सर्वात प्रथम शिखरावर पाऊल ठेवण्याची त्याची योग्यताही होती. पण झरमॅट मधून हॉर्नली रिजवर चढाई अशक्य आहे या आपल्या मताला तो ठाम चिकटून राहीला आणि त्याला पराभव पत्करावा लागला !"

व्हिम्परच्या तुकडीतील सर्वजण एव्हाना शिखरावर पोहोचले होते. क्रॉझने आपला शर्ट काढून तंबूच्या खुंटीला बांधला आणि झेंड्यासारखा एका मोठ्या हिमखंडावर ठो़कला !

चित्रकार असलेल्या व्हिम्परने शिखराची रेखाचित्रं काढून घेतली. सर्वांची नावं लिहीलेला कागद बाटलीत घालून पुरण्यासही तो विसरला नाही ! सुमारे तासभर शिखरावर घालवल्यावर सर्वांनी खाली उतरण्यास सुरवात केली.

सर्वात पुढे क्रॉझ होता. त्याच्यापाठोपाठ नवखा हॅडो होता. त्याच्यापाठी हडसन, डग्लस, पीटर टगवाल्डर (बाप), व्हिम्पर आणि पीटर टगवाल्डर (मुलगा) अशा क्रमाने उतरण्याचं सर्वानुमते निश्चीत करण्यात आलं. उतरताना सुरक्षेसाठी दगडाला मोठा दोर बांधण्याची व्हिम्परने सूचना केली. हडसनला त्याची सूचना पटली, परंतु ती अमलांत मात्र आणली गेली नाही.

ह्याचा परिणाम काय होणार होता ?

व्हिम्पर आणि इतर आता त्या दगडाच्या कठीण उताराजवळ आले होते. मात्र दगडाला दोर बांधण्याच्या व्हिम्परच्या सूचनेचा सर्वांनाच विसर पडला होता. एकमेकांना सुरक्षा दोराने बांधून घेण्याची खबरदारी मात्र त्यांनी घेतली होती. एका वेळेस एकच गिर्यारोहक सावधपणे पुढे सरकत होता. अननुभवी डग्लस हॅडो उतरताना विलक्षण घाबरला होता. त्याला आधाराची सतत गरज भासत होती.

क्रॉझने आपल्या हातातील आईस एक्स बाजूला ठेवली होती. थरथरणा-या हॅडोचं पाऊल अक्षरशः उचलून तो योग्य जागी ठेवत होता. क्रॉझ हॅडोचं पाऊल योग्य जागी ठेवून वळला आणि नेमका त्याचवेळी हॅडोचा तोल गेला आणि तो क्रॉझवर आदळला ! हॅडो अंगावर आदळताच क्रॉझ भयाने चित्कारला. दुस-याच क्षणी क्रॉझ आणि हॅडो खाली घसरत दिसेनासे झाले. या अनपेक्षीत धक्क्याने हडसन आणि त्याच्यापाठोपाठ डग्लसही ओढले गेले ! क्रॉझ आणि हॅडो प्रमाणेच ते देखील उतारावर घसरत दिसेनासे झाले ! पीटर टगवाल्डर (बाप) आणि व्हिम्परने दगडांवर आधार घेऊन बसणा-या धक्क्यापासून स्वतःला सावरलं, पण टगवाल्डर आणि हडसन यांच्यामधे असलेला दोर तुटला ! आपल्या सहका-यांना वाचवणं दोर तुटल्यामुळे त्यांना अशक्य झालं ! एकापाठोपाठ एक चौघजण घसरत ४००० फूट खोल असणा-या मॅटरहॉर्न ग्लेसीयरच्या दिशेने अदृष्य झाले !


मॅटरहॉर्न वरील अपघात - चित्रकार गुस्ताव डोर

सुमारे अर्धा तास व्हिम्पर आणि दोघं टगवाल्डर आपल्या जागेवरुन हलले नाहीत. दोन्ही टगवाल्डर जाम हादरलेले असल्याने एक पाऊलही उचलण्यास तयार नव्हते ! बाप मुलाच्या जीवाला घाबरत होता आणि मुलगा स्वतःच्या. दोघांच्या मध्ये अडकल्याने व्हिम्परची अवस्था मात्र ना घर का ना घाट का अशी झाली होती. अखेर बापाने खाली पाऊल टाकल्यावर त्याच्यापाठोपाठ व्हिम्पर सुरक्षीत ठिकाणी पोहोचला आणि दोराच्या सहाय्याने त्याने मुलाला खाली उतरवलं !

सुरक्षीत जागी येताच व्हिम्परने दोराची तपासणी केली आणि त्याला जबरदस्त हादरा बसला. त्याच्याजवळ असलेला सर्वात जुना आणि कमी ताकदीचा बारीक दोर होता तो ! हादरलेल्या व्हिम्परला काय बोलावं ते कळेना ! तो दोर राखीव म्हणून त्याने बरोबर घेतला होता आणि चढताना त्याचा उपयोग करणं त्याने कटाक्षाने टाळलं होतं. नेमका तोच दोर गाईड असलेल्या टगवाल्डरनं सुरक्षा दोर म्हणून वापरला होता आणि घात झाला होता ! हवेत दोर तुटल्याचं व्हिम्परला आढळून आलं होतं.

सुमारे ६ वाजण्याच्या सुमाराला दोन्ही टगवाल्डरना सांभाळूत उतरवत व्हिम्पर त्यांच्यासह झरमॅटकडे जाणा-या शेवटच्या उतारांवर आला. तिथे पोहोचताच त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. तो म्हणतो,

" दोन्ही टगवाल्डर इतके घाबरलेले होते, की दगडाला सुरक्षा दोर बांधलेला असूनही खाली उतरताना त्यांचे पाय लटलटत होते. कोणत्याही क्षणी त्या दोघांपैकी एखादा पाय घसरून पडेल आणि उरलेल्या दोघांना खाली खेचेल अशी मला सतत भीती वाटत होती !"

व्हिम्पर आणि टगवाल्डरनी आपल्या सहका-यांची कुठे खूण दिसते का ते पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांना काहीही आढळून आलं नाही. मोठ्याने हाका मारुनही त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. निरुपायानेच त्यांनी खाली उतरण्याची तयारी केली.

रात्री नऊच्या सुमाराला ते एका निमुळत्या जागी पोहोचले. अंधारात खाली उतरण्याचा धोका पत्करण्याऐवजी तिथेच रात्र काढण्याचा त्यांनी निश्चय केला. पहाटेपर्यंत ते तिथे घडलेल्या घटनांचा विचार करत बसून राहीले होते. खाली उतरण्याइतपत उजेड पडताच त्यांनी हॉर्नली रिजचा उरलेला उतार उतरून झरमॅट गाठलं.

अपघाताची बातमी कळताच झरमॅटच्या काही तरूणांनी मॅटरहॉर्नचा पायथा गाठला. त्यांना तीन मृतदेह आढळून आले होते. व्हिम्पर इतर गाईड आणि गिर्यारोहकांसह १६ जुलैच्या पहाटे पुन्हा मॅटरहॉर्नकडे निघाला. आपल्या सहका-यांचा शोध घेऊन त्यांचा अंत्यसंस्कार करणं त्याला आपलं कर्तव्य वाटत होतं.

मॅटरहॉर्नच्या पायथ्याशी ग्लेशीअरवर त्यांना क्रॉझ, हॅडो आणि हडसन एकमेकांपासून काही अंतरावर पडलेले आढळून आले. मात्र लॉर्ड फ्रान्सिस डग्लसचा मात्र पत्ता नव्हता ! खूप शोधाशोध करूनही डग्लसचा मृतदेह त्यांना आढळला नाही. क्रॉझ, हॅडो आणि हडसन यांना बर्फात दफन करून ते परत फिरले.

फ्रान्सिस डग्लसचा मृतदेह आजतागायत कोणाला दिसलेला नाही !

वॅलीस प्रांतातील सरकारच्या आदेशावरून झरमॅट परिसरातील २१ गिर्यारोहकांनी क्रॉझ, हॅडो आणि हडसन यांचे मृतदेह झरमॅटमध्ये आणले. झरमॅटच्या चर्चजवळ त्यांचं रीतसर दफन करण्यात आलं.

वॅलीस सरकारच्या आदेशाने जोसेफ क्लेमेन्झने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली. व्हिम्परवर आपल्या सहका-यांना वाचवू न शकल्याबद्दल बरीच टीका झाली. पीटर टगवाल्डरवर सर्वांचा संशय होता. आपला आणि आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याने स्वतःला डग्लसशी बांधणारा दोर चाकूने कापल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आल, पण पुराव्याआभावी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र झरमॅट आणि इतरत्रही कोणाचाही त्याच्या कथनावर विश्वास बसला नाही. त्याला पुन्हा गिर्यारोहणाचं काम मिळणं मुष्कील झालं.

दरम्यान १७ जुलैला जीन अँटनी कॅरेलने अखेर लायन रिजमार्गे इटालियन बाजूने मॅटरहॉर्नचा माथा गाठण्यात यश मिळवलं !

१८६५ पासून १९९५ पर्यंत मॅटरहॉर्नच्या चढाईत ५०० जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत !

******************************************************************************************************************

संदर्भ :

Scrambles Amongst the Alps : एडवर्ड व्हिम्पर
विकीपिडीया

(मायबोली आणि मिसळपाव इथे पूर्वप्रकाशीत)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चांगलय संकलन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गिर्यारोहण विषयात विशेष रुची नसल्याने पास! पण आपण मेहनत घेतली आहे हे नोट केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचायची इच्छा आहे. पण चित्रे दिसत नाहीत म्हणून बाजूला ठेवला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उत्तम संकलन!
या लेखातील तथ्यांना विकीवरही चढवा असे सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!