Mr. & Mrs – एका नाटकाचा रियालीटी शो


(चित्र: आंतरजालावरून साभार)

काल बर्‍याच दिवसांनी मराठी नाटक बघण्याचा योग आला. नाटक बघण्यातली मजा, नशा काही औरच असते. पण ज्या प्रमाणात सिनेमे बघतो त्या प्रमाणात नाटके मी बघत नाही. त्याला कारण काही प्रमाणात नाटकेच कारणीभूत आहेत. विनोदाचा सरळधोपट फॉर्मुला वापरून आलेली बरीच नाटके बघून हिरमोड झाला असल्या कारणाने जेव्हा अर्धांगाचा फतवा निघाला, “बर्‍याच दिवसात नाटक बघितले नाही, ह्या आठवड्यात नाटकाला जाऊया.” आता ही विनंती नसून आज्ञा आहे हे इतक्या वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर कळून चुकल्याने निमूटपणे, बघण्यासारखी काय काय नाटके चालू आहेत, ते बघायला बसलो (https://www.ticketees.com/). शक्यतो विनोदी नाटकांच्या वाट्याला जायचे नाही हे ठरवले होते. पण काही वेळ घालवावाच लागला नाही. ‘मिस्टर अॅन्ड मिसेस’ ह्या नाटकाचे पोस्टर बघितले आणि पोस्टर बघूनच नाटक फिक्स केले. मुख्य कारण म्हणजे मधुरा वेलणकर, माझा वीक पॉइंट. दुसरे कारण वेगळे आणि गूढतेचे वलय असलेले पोस्टर उत्सुकता चाळवून गेले. लगेच ऑनलाईन बुकिंग करून टाकले आणि बायकोला आश्चर्याचा धक्का देऊनच टाकला.

नाटकगृहात गेलो तर स्टेजवर दोन LCD मॉनिटर्सवर (डाव्या आणि उजव्या बाजूला एक एक) नाटकांच्या जाहिराती चालू होत्या. मनात म्हटले, “च्यामारी, काळ बदलला! बालगंधर्वच्या प्रेक्षागृहात सर्वत्र कुबट वास पसरला आहे पण जाहिरातबाजीच्या शो साठी चक्क LCD मॉनिटर्स व्वा!” बायकोशी गप्पा मारता मारता सहज मागे बघितले तर अजून दोन दोन LCD मॉनिटर्स. जरा बुचकळ्यातच पडलो पण मनाशी म्हटले, “सोड LCD मॉनिटर्स, मधुरा वेलणकरला प्रत्यक्षात बघणार आहेस, कशी दिसेल प्रत्यक्षात ती?”

तिसरी घंटा झाली आणि पडदा वर गेला आणि एका 2 BHK फ्लॅटचा सेट समोर आला. अतिशय सुंदर नेपथ्याचे दर्शन झाले आणि मी नाटकात ओढला गेलो. दोन अंकी नाटकाच्या पहिल्या प्रवेशात पात्रांची ओळख होते. अमित जयंत (चिन्मय मांडलेकर) हा एक टेलिव्हिजनवरील एकेकाळचा स्टार आणि आता सध्या बेकार असून त्याची बायको मीरा (मधुरा वेलणकर) हीच्या बँकेतल्या नोकरीतल्या पैशावर जगतो आहे ही आणि सध्या त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे ही ओळख थोडी विनोदी, थोडी खटकेबाज संवादांनी होते. ही ओळख करून देताना, अमित आणि मीरा यांचा स्टेजवरचा वावर, 2 BHK फ्लॅट आणि त्याची रचना समजावून देण्यासाठी, अतिशय कल्पकतेने रचला आहे. दिग्दर्शकाला फुल्ल मार्क्स!

नवरा-बायकोच्या नात्यातल्या तणावावरचं नाटक आहे की काय ह्या विचाराने हैराण होत असतानाच नाटकात आश्विन (प्रियदर्शन जाधव) नावाच्या पात्राची एन्ट्री होते, एकदम हटके! आणि नाटकाला एक वेगळेच वळण लागून, एका धमाल नाट्याची सुरुवात होणार ह्याची झलक मिळते. हा आश्विन अमितच्या पहिल्या हिट दूरदर्शन मालिकेचा डायरेक्टर असतो. त्या मालिकेतून भरपूर पैसा मिळवून थायलंडला सेटल होऊन स्वतःचा व्यवसाय त्याने सुरू केलेला असतो. पण आता त्याला कंटाळून तो पुन्हा टीव्ही विश्वात दणकेबाज पुनरागमन करण्याचा विचारत असतो. अमित सध्या बेकार असल्याने, आश्विन पुन्हा लॉन्च करणार ह्या कल्पनेने त्याला अत्यानंद होतो आणि त्याच्या नवीन प्रोजेक्टमध्ये तो काम करायची तयारी दर्शवतो.

आश्विन त्याचा गृहपाठ व्यवस्थित करून आलेला असतो. अमित आणि मीरा यांच्यातला तणाव त्याला पुरेपूर ठाऊक असतो. त्यांच्या भांडणातला वाद घटस्फोटाच्या निर्णयाला स्पर्शून आलेला आहे हे ही त्याला ठाऊक असते. तो अमितला एका अट घालतो की मीराला पुढचे काही महिने घटस्फोट द्यायचा नाही. ही अट मान्य असेल तर रोज दोन लाख रुपये ह्या दराने त्याला मालिकेत काम मिळणार असते. दोन महिने काम, 60 दिवसांचे रोज दोन लाख रुपये ही लालूच बेकार असलेल्या अमितला सगळ्या अटी मान्य करून घेण्यास भाग पाडतात कारण त्याच्या डोळ्यांपुढे हिरव्या नोटा नाचत असतात. आश्विन त्याची मालिकेची कल्पना मग त्याला समजावून सांगतो. तो एका रियालिटी शोचे प्लॅनिंग करत असतो. त्या शोची थीम असते ‘लाइव्ह घटस्फोट’. अमित नाहीतरी मीराला घटस्फोट देणारच असतो त्यामुळे तो लाइव्ह घेऊन, अमाप पैसा आणि हरवलेली प्रसिद्धी परत मिळवण्याची संधी ह्याची त्याला इतकी भुरळ पडली असते की तो सगळ्या अटी मान्य करतो आणि आश्विनच्या प्रोजेक्टला, अमितच्या घरात रियालीटी शोचे शुटींग करण्यास आणि मीराला रियालीटी शोमध्ये घटस्फोट देण्याला, मान्यता देतो. ‘लाइव्ह घटस्फोट’ ह्यावर विचार करायला भाग पाडून पहिला प्रवेश संपतो.

दुसरा प्रवेश चालू होतो तो बदललेल्या 2 BHK फ्लॅटच्या सेटवर. रियालिटी शोला साजेसे इंटीरियर केले गेलेले असते. सगळ्या घरात कॅमेरे बसवलेले असतात. अमितच्या कानात स्पीकर बसवलेला असतो ज्याच्यावरून त्याला शो चा डायरेक्टर आश्विन सूचना देणार असतो. कॅमेर्‍याचे टेस्टिंग सुरू होते आणि प्रेक्षागृहातल्या LCD मॉनिटर्सचे गुपित कळते. सेट वरच्या घरात वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले कॅमेरे खरेखुरे असतात आणि त्यांचे प्रक्षेपण LCD मॉनिटर्सवर होत असते. नाटकात प्रेक्षकांना रियालिटी शोमधल्या कॅमेर्‍याच्या लाइव्ह फीडची अनुभूती देण्याचा अभिनव प्रकार नक्कीच कौतुकास्पद! त्या कॅमेर्‍याचा परिणामकारक वापर आणि LCD मॉनिटर्सवर वेगवेगळ्या अ‍ॅन्गल्समधली लाइव्ह फीड नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेतात.

दुसर्‍या प्रवेशापासून नाटक वेग आणि प्रेक्षकांची पकड घेत जाते ते थेट शेवटापर्यंत. नाटकाच्या रियालिटी शोमध्ये अमित आणि मीरा यांची कहाणी प्रेक्षकांना समजण्यासाठी, रियालिटी शोचे स्क्रिप्ट लेखक, अमित आणि मीरा यांच्यात त्यांच्या पहिल्या भेटीपासूनच्या प्रसंग लिहून त्यांना शूट करण्याच्या आयडियाज अमलात आणत असतात. पुढे त्यांच्यात घटस्फोट होण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्यासाठी रियालिटी शोचे स्क्रिप्ट अमितच्या आयुष्याचा ताबा घेते. पुढे तर त्यांच्या बेडरूममधल्या प्रायव्हसीचेही शूटिंग होतेय हे अमितच्या लक्षात येते आणि त्यातून अमितला त्याच्या चुका कळून येतात. तो पर्यंत तो पुन्हा मीराच्या प्रेमात पडलेला असतो.

पुढे नेमके काय होते? घटस्फोट होतो का आणि तो नेमका कसा होतो? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी नाटक पाहणे मस्ट! हे नाटक त्यातल्या अभिनव प्रयोगामुळे ‘मस्ट वॉच’ कॅटेगरीत मोडते.

अभिनयात चिन्मय बाजी मारून जातो. 2 – 3 स्वगताचे मोठे मोठे सीन त्याला मिळाले आहेत, तो ते ताकदीने पेलवत त्यात कमाल करतो आणि अमितच्या पात्राला न्याय देतो. त्याने अमितच्या वेगवेगळ्या प्रसंगातल्या वेगवेगळ्या छटा अगदी व्यवस्थित दाखवल्या आहेत. मधुरा वेलणकर तिची भूमिका योग्य तर्‍हेने पार पाडते. तिला दिलेल्या वेषभूषा सुंदर, खास करून एक लाल ड्रेस, त्यात ती अतिशय सुंदर आणि मोहक दिसते. एकंदरीत ‘मिसेस अमित’ ह्या पात्राला चोख न्याय देते. प्रियदर्शन जाधव बहुतेकवेळा डायरेक्टरच्या बॅकग्राऊंड आवाजातून ऐकू येतो पण ज्या मोजक्या प्रसंगांत तो स्टेजवर येतो त्यात भाव खाऊनं जातो. त्याचा प्रभाव संपूर्ण नाटकभर जाणवत राहतो. बाकीच्या कलाकारांना फारच थोड्या वेळाकरिता भूमिका आहेत आणि ते त्या योग्य पार पाडतात.

नाटकाचे नेपथ्य आणि प्रकाशयोजना हा नाटकाचा हायलाइट. स्टेजचे स्पेस मॅनेजमेंट भन्नाट. किचन, डायनिंग, हॉल, बेडरूम, स्टोअर रूम आणि मुख्य एंट्रन्स हे सगळे मस्त आणि मुख्य म्हणजे एकदम ‘कंटेम्पररी’ लुक मध्ये बसवले आहे. नाटकातील पात्र घराच्या वेगवेगळ्या भागात असताना त्या त्या भागाला उठाव देणारी प्रकाश योजना नाटकाला एक ‘ग्लॉसी’ लुक देते.

प्रियदर्शन जाधव हा एक लेखक (टाईमपास सिनेमाचा संवाद लेखक) आणि मराठी कॉमेडी मालिकांमध्ये काम करणार एका विनोदी कलाकार एवढीच माझ्यासाठी होती. पण एक दिग्दर्शक आणि तोही ताकदीचा दिग्दर्शक ही ओळख ह्या नाटकातून माझ्यासाठी झाली. कमालीचे दिग्दर्शन केले आहे त्याने.

अस्लम परवेझ यांचे लेखन आणि नाटकाचा उभा केलेला प्लॉट एकदम अभिनव. पण शेवट जरा घाईत उरकल्यासारखा आणि पूर्ण नाटकाइतका परिणामकारक वाटत नाही. केलेला शेवट योग्यच पण काहीतरी कमी असल्याची जाणीव करून देत राहणारा.

एकंदरीत, नवीन अभिनव प्रयोग असलेले, एकदम चकाचक आणि ग्लॉसी, कंटेम्पररी लुक असलेले, मराठी नाटकात आधुनिक वारे आणणारे आणि रियालीटी शोजच्या समाजावर पडणार्‍या प्रभावाचे दर्शन घडवणारे हे नाटक एकदाच नव्हे तर दोनदा बघण्यासारखे आहे!

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

प्रतिक्रिया

आवडला. बदललेल्या मूल्यव्यवस्थेचं चित्रण आणि मराठी नाटकाची श्रीमंत निर्मितीमूल्यं (पोस्टर, नेपथ्य, मॉनिटर्स) हे दोन बदल स्वागतार्हच आहेत. क्रयशक्ती वाढलेल्या प्रेक्षकवर्गाची आणि उत्तम सादरीकरणाची चुणूक Herbarium च्या प्रयोगांतून येत होतीच - हे त्याच वाटेवरचे पुढचे पाऊल ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान परिचय!
पण का कुणास ठाऊक इंग्रजी चित्रपट 'हंगर गेम्स' सारखं कथानक वाटुन गेलं. अगदी १००% जसंच्या तसं नाही पण साधारण..ढोबळ्पणे. काहीतरी दबाव्,किंवा कुठलं तरी जबरदस्त आमिष दाखवुन रियालिटी शो मध्ये भाग घ्यायला लावुन त्याचं चित्रिकरण लोकांना दाखवायचं. अर्थात इथे चित्रपटाचं माध्यम न वापरता.. थ्री डी/ फोर डी ..म्ह्णजे खरीखुरी माणसं आपल्या समोर वावरतायत, पुढे तीच माणसं LCD च्या दृकश्राव्य माध्यमातुन प्रेक्षकांना फिरवुन आणतात.

मराठी रंगभुमी कात टाकतेय त्याचे हेच का ते चित्रण?

-मयुरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला परिचय.
आभार.

त्याला कारण काही प्रमाणात नाटकेच कारणीभूत आहेत. विनोदाचा सरळधोपट फॉर्मुला वापरून आलेली बरीच नाटके बघून हिरमोड झाला असल्या कारणाने
शूsss कुठं बोलायचं नाही; एका लग्नाची गोष्ट, पती सगळे उचापती तत्सम प्रकारांकडे निर्देश असावा.
ही नाटके मीही थेट्रात जाउन बघत नाही.
ही कमर्शिअल म्हणावीत अशी आहेत. बॉलीवूडच्या भाषेत सांगायचं तर करण जोहर किंवा सलमान वगैरेंच्या चित्रपटासारखं.
त्यात विशेष वाईट असं काही नाही; आपली टेस्ट वेगळी इतकच.
बॉलीवूडातही खोसला का घोसला, अंग्रेज, सोचा न था, मनोरमा सिक्स फीट अंडर , भेजा फ्राय असे प्रयोग होत असतातच.
तसच नाट्यक्षेत्रातही "हमखास यशस्वी" अशा विनोदी धाटणीशिवाय वेगळं काही आहे का ?.......

सोकाजी, काही नाटके तुम्हीही पहावीत असे सुचवतो :-

१.माकडाच्या हाती शॅम्पेन
२."कळा ह्या लागल्या जीवा " व "चाहूल" .
३. साठेचं काय करायचं
४.फ़ायनल ड्राफ़्ट
५.काटकोन् त्रिकोण
६. व्हाइट लिली आणि नाइट रायडर
७. छापा काटा
८. पुरुषोत्तम करंडक विजेत्या पहिल्या तीनेक एकांकिकांचे प्रयोग दरवर्षी अल्प तिकीट लावून भरत नाट्य मंदिरात होतातच.
तेही पहावेत. मग उळ्ळागड्डी, दळण ,दोन शूर अशा प्रकारची विविध सादरीकरणं हाताला लागतात.

वरच्या यादीतल्या सर्वांचेच प्रयोग सध्या सुरु आहेत असं नाही; पण आपलं लक्ष ठेवत चला; जेव्हा केव्हा प्रयोग असतो; तेव्हा सोडू नका.
व्हाइट लिली आणि नाइट रायडरसाठी मला वर्षभराहून अधिक काळ थांबावं लागलं होतं.कारण ते अगदिच अडनिड्या वेळेस असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नमस्कार.
वरील यादीपैकी तीन प्रयोग येत्या आठवडाभरात पुण्यात होताहेत असे दिसते.

काटकोन् त्रिकोण
व्हाइट लिली आणि नाइट रायडर
छापा काटा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

परीचय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप रंजक परिचय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आता ही विनंती नसून आज्ञा आहे हे इतक्या वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर कळून चुकल्याने निमूटपणे, बघण्यासारखी काय काय नाटके चालू आहेत, ते बघायला बसलो

हाण्ण तेजायला.... सुरवातच इतकी जबरदस्त झालीये.
परिचय आवडला.
सोत्रि तुमच्या चावडीवरच्या गप्पा येऊ द्यात हो, लै दिवसात नाही आल्या Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाटक मागेच पाहिलं होतं
पूर्वार्ध जितका खिळवून ठेवतो, तितकाच उत्तरार्धात लेखक किंवा दिग्दर्शक (खरंतर दोघेही ;)) गोंधळतात नी नाटक निसटत जाते असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  • उत्तरार्धात लेखक किंवा दिग्दर्शक (खरंतर दोघेही ) गोंधळतात

+१ अगदी सहमत!

  • नी नाटक निसटत जाते असे वाटते.

ह्म्म्म, पण पूर्ण उत्तरार्धात तसे वाटत नाही. फक्त एकदम शेवटी निसटल्यासारखे वाटते.

- (न गोंधळलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिन्मय 'बेचकी' मधलाच ना?
उत्तम उभी केलि होति भुमिका, निर्माता पण तोच होता ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0