नु शुऽऽऽ कुठं बोलायचं नाही!

वर्ग चालू असेल आणि बाईंना कळू न देता आपल्या शेजारच्या मैत्रिणीशी बोलायचं असेल, तर आपण काय करतो? आपण बाईंची नजर चुकवून हळूच तिच्या कानात पुटपुटतो. नाहीतर, आपल्या वहीवर लिहून तिला ’वाच’ असं खुणेनं सांगतो. तीच गोष्ट चार बाकं पलिकडे बसलेल्या मित्राला सांगायची असेल तर आपण काय करतो? बाईंची पाठ वळली, की हातवारे करून नाहीतर डोळ्यांनी खाणाखुणा करून त्याला सांगतो. पण सगळ्याच गोष्टी काही खाणाखुणांनी सांगता येत नाहीत. उदाहरणार्थ, ’मला भूक लागली’ हे खूण करून सांगता येईल. पण ‘काल बाबांनी रविवारच्या आयपीएल मॅचची तिकिटं आणली’ हे खूण करून कसं सांगणार? मग चिठ्ठीवर लिहून ती पास करण्याला पर्याय उरत नाही. पण इथे एक प्रॉब्लेम असतो. ती चिठ्ठी बाईंच्या हातात सापडली, तर त्या ती वाचणार आणि आपण काय लिहिलंय ते त्यांना कळणार आणि आपल्याला ओरडा मिळणार. यावर एक-दोन उपाय आहेत, पण ते उपाय मी तुम्हाला सांगितले हे तुम्ही कुणाला सांगणार नसाल तरच मी सांगेन. बघा हं! नंतर तुमच्या बाईंनी मला पत्रातून ओरडा दिला, तर मी पुन्हा असे उपाय सांगणार नाही!

काय करायचं, की एकतर ’च’च्या भाषेसारखी इतरांना कळणार नाही आणि फक्त आपल्या मित्रमैत्रिणींना कळेल अशी एक सिक्रेट भाषा बनवायची. आणि त्या भाषेत चिठ्ठी लिहायची. म्हणजे काय होईल, की बाईंच्या हातात चिठ्ठी पडली, तर त्यांना काय लिहिलंय ते वाचता आलं तरी त्याचा अर्थ मात्र कळणार नाही. पण अशी भाषा बनवण्याचं काम वाटतं तितकं सोपं नाही, बरं का! पण थांबा, आपल्याकडे दुसरा उपाय आहे. शब्द तेच ठेवायचे, पण लिहिताना ते आपल्या सिक्रेट अक्षरांत लिहायचे. ती अक्षरं ’क’, ’ख’, 'a', 'b' पेक्षा वेगळी, तुम्ही स्वत: बनवलेली असायला हवीत. म्हणजे काय होईल, की बाईंना त्या शब्दांचा अर्थ कळणं तर सोडाच, पण ते शब्द वाचताही येणार नाहीत. आहे की नाही छान उपाय!

पण हा उपाय काही माझ्या सुपीक डोक्यातून उगवलेला नाही. आधी बऱ्याच गुप्तहेरांनी आणि इतरही अनेकांनी हा उपाय वापरलेला आहे. पण आज मी गोष्ट सांगणार आहे, ती चीनमधल्या एका छोट्याशा भागात बनवलेल्या सिक्रेट अक्षरांची. कोणे एके काळी चीनमधल्या हुनान प्रांतातल्या एका छोट्याशा भागात एक लिपी (म्हणजे एखादी भाषा लिहून काढण्यासाठीची अक्षरं. उदाहरणार्थ, आपली वर्णमाला किंवा इंग्रजीमधली ’alphabet') जन्माला आली. काय झालं, त्या काळात तिथे बायकांना बऱ्याच गोष्टी करायला मनाई होती. पण त्याच गोष्टी करायचं स्वातंत्र्य पुरुषांना मात्र होतं. आपल्याकडे कसं, आपले दादालोक रात्री उशिरापर्यंत मित्रांबरोबर घराबाहेर भंकस करू शकतात आणि आपल्या तायांना मात्र संध्याकाळी सातच्या आत घरात यावंच लागतं. तसेच आणि त्याहून कडक नियम होते तेव्हा चीनमध्ये.

त्या काळात चीनमधल्या पुरुषांना लिहाय-वाचायला शिकण्याचं स्वातंत्र्य होतं, आणि बायकांवर मात्र ते शिकायची बंदी होती. पण तिथल्या बायकांना तर लिहाय-वाचायचं होतं. त्यांना मुळात एकत्र जमून गाणी गायला खूप आवडायचं. त्यामुळे त्या सतत नवनवीन गाणी रचायच्या. पण त्यांना लिहिता येत नसल्याने ती गाणी जपून ठेवता यायची नाहीत. किंवा दुसऱ्या एखाद्या गावातल्या आपल्या मैत्रिणीला पाठवताही यायची नाहीत. म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी सरळ आपली एक सिक्रेट लिपीच तयार केली. तिचं नाव ’नु शु’. ’नु शु’ याचा त्यांच्या भाषेतला अर्थ म्हणजे ’बायकांचं लिखाण’. नु शुमधली अक्षरं बनवली ती पुरुष जी अक्षरं वापरायचे त्यांच्यात थोडे-फार फेरफार करून, जेणेकरून पुरुषांना नु शु वाचता येणार नाही. दोन्हींतला एक महत्त्वाचा फरक म्हणजे, पुरुषांची अक्षरं थोडी रुंद असायची आणि नु शुमधली अक्षरं मात्र उभट, चिंचोळी आणि तिरकी असायची. पण दिसायची मात्र फारच सुरेख!

लहान मुलींना नु शु शिकवायच्या त्या त्यांच्या आया किंवा गावातल्या इतर मोठ्या बायका. ती शिकवायची त्यांची तऱ्हाही वेगळीच होती. त्या अक्षराभोवती गुंफलेलं एक गाणं त्या गायच्या. गाताना त्या लहान मुलीचा हात हातात घेऊन तिच्या तळहातावर आपल्या बोटाने ते अक्षर रेखाटायच्या. मग ती छोटुकली ते अक्षर कागदावर लिहायचा सराव करायची आणि अशा पद्धतीने नु शु शिकायची.

नु शुमध्ये लिहिलेली गाणी ही कधी कागदावर लिहिलेली असत तर कधी कापडावर भरतकाम करून काढलेली असत. त्यामुळे त्यांचं हे लिखाण कागदाच्या पंख्यांवर आणि भरतकाम केलेल्या रुमालांवर सहज लपवता येत असे. भरतकाम करून अक्षरं काढणे हा प्रकार बहुधा फक्त याच लिपीत केला गेला आहे. तुम्हाला तर माहीत आहेच, की आपण कशाने लिहितो यानुसार आपल्या अक्षरांच्या आकारात बारीक बारीक फरक पडतात. बॉलपेनने काढलेलं अक्षर आणि शाईपेनाने काढलेलं अक्षर यांत रेषांच्या जाडीत थोडा फरक असतो. त्यातही, वेगवेगळ्या निबांची शाईपेनं वापरली तर आपल्याला एकाच अक्षराचे वेगवेगळे आकार मिळू शकतात. त्याचप्रमाणे, भरतकामाच्या या पद्धतीची छाप नु शुमधील अक्षरांवरही पडली होती. यातल्या बऱ्याचशा अक्षरांचा आकार हा भरतकामाच्या टाक्यांवर आधारित आहे.

हा एवढा खटाटोप कशासाठी, तर दोन कारणांसाठी. एक म्हणजे बायकांना लिहाय-वाचायला येतं हे पुरुषांना कळू द्यायचं नव्हतं. कारण तसं झालं असतं तर बायकांना त्याची शिक्षा भोगायला लागली असती आणि लिहिण्या-वाचण्याचा हा मार्ग त्यांना बंदही झाला असता. आणि दुसरी, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बायकांच्या या लिखाणात बऱ्याचदा त्या पुरुषांबद्दल केलेल्या तक्रारी असायच्या. त्या तक्रारी पुरुषांनी वाचल्या असत्या तर...?

अशाप्रकारे, चीनमधल्या बायकांनी आपली स्वत:ची खास लिपी तयार केली. त्यातून लिहिण्यासाठी भरतकामासारख्या पद्धतींचा अभिनव वापर केला. एवढंच नव्हे, तर ही लिपी त्यांनी शतकानुतकं पुरुषांपासून लपवूनही ठेवली. आहे की नाही भारी!

हे एवढं सगळं सांगितलं पण चिनी पुरुष वापरायचे ती लिपी आणि नु शु यांच्यातला एक महत्त्वाचा फरक मी सांगितलेलाच नाही. पुरुष वापरायचे ती चित्रलिपी. म्हणजे एखादा शब्द लिहिण्यासाठी ते त्या शब्दातली अक्षरं एकापुढे एक मांडून त्यांची मालगाडी बनवत नसत, तर अख्ख्या शब्दासाठी मिळून एकच चिह्न वापरत असत. नु शुमध्ये काही शब्द एका चिन्ह्नाने लिहिले जात, तर काही शब्द अक्षरांची मालगाडी बनवून लिहीत. अख्ख्या शब्दासाठी एक चिह्न वापरणं आणि अक्षरांची मालगाडी करणं यांत काय फरक आहे, ते आपण पुढील लेखात पाहू.

-----------------------------------

कलावृत्त या वृत्तपत्रात पूर्वप्रकाशित

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (6 votes)

प्रतिक्रिया

चुकून दोनदा प्रकाशित॑ झाला आहे लेख.

संपादकांना विनंती : एक धागा उडवून टाका.

राधिका

लेख आवडला. मी शाळेत नेहमी शिक्षकांच्या टेबलच्या समोरच्या पहिल्या डेस्क वर बसत असे. फायदा, डब्बा उघडून खाल्ला तरी शिक्षकाला कळत नसे. प्रश्न ही खूप कमी विचारल्या जात. कुजबुजले तरी शिक्षक मागे बसलेल्या मुलांवर शंका घेणार. सर्वात सुरक्षित बसण्याची जागा.

हा एवढा खटाटोप कशासाठी, तर दोन कारणांसाठी. एक म्हणजे बायकांना लिहाय-वाचायला येतं हे पुरुषांना कळू द्यायचं नव्हतं. कारण तसं झालं असतं तर बायकांना त्याची शिक्षा भोगायला लागली असती आणि लिहिण्या-वाचण्याचा हा मार्ग त्यांना बंदही झाला असता. आणि दुसरी, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बायकांच्या या लिखाणात बऱ्याचदा त्या पुरुषांबद्दल केलेल्या तक्रारी असायच्या. त्या तक्रारी पुरुषांनी वाचल्या असत्या तर...?

पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव्ह नाही पण पॅसिव्ह प्रोअ‍ॅक्टिव्ह.
ही अशा जातीची हुषारी आसपासच्या बायकांत पाहीली आहे अन कधीच जमलेली नाही. अर्थात खंत नाही.

लहानग्यांना गोष्ट सांगण्याच्या शैलीत लिहिलेला लेख आवडला.

ऐला भारीच की!
मस्त आहे लेख आणि लेखनशैली!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

===
Amazing Amy (◣_◢)

छान लेख, अतिशय आवडला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

ऐला जबरीच! लय आवडला लेख.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

उत्तम लेख!

===
यत्ता पाचवीत आम्हा मुलांमध्ये दोन तट होते. एक दांडगट - शरीराने थोराड व त्यामुळे दादागिरी सहज करू शकणार्‍या मुलांचा गट व दुसरा आमचा. दुसर्‍या गटातील मुले मस्ती करतात म्हणून त्यांना बहुतांश महिन्यात मॉनिटर नेमलेले असे. मॉनिटरच्या अनेक कामांपैकी एक काम वर्गात कोणी बोलत असल्यास बाईंना चुगली करण्याचे होते. त्यामुळे आम्ही लिहून गप्पा हाकु लागलो व काही वेळा पकडले गेलो. पकडल्यावर बाईंचा ओरडा पचवण्याइतके कोडगे झालो होतो मात्र दुसर्‍या गटाला आमचे मधल्या सुट्टीतले बेत कळत जे त्यांना कळणे धोकादायक होते. (का ते विचारू नये - जाहिर सांगितले जाणार नाही Smile )
त्यावेळी नुकतेच इंग्रजीचे पाठ सुरू झाले होते. रोमन अक्षरांना बाकदार वळणे व त्याची मिरर इमेज असे करून स्वतःची लिपी बनवली होती. दिसायला एखाद्या चित्रासारखी दिसे व चिठ्ठी पकडली तरी त्या गटाला शष्प कळत नसे. त्यांना आमची शिक्रेट लिपी आहे हेच कळायला पाचवीचा शेवट उजाडावा लागला. ती लिपी आमच्यातल्या एकाला फितवून शिकेपर्यंत सहावी संपत आली होती. सातवीत बरेच काही बदल्याने बदलत्या जाणींवांनी जुने गट-तट उद्ध्वस्त केले (आवडत्या मुलींवरून होणारे वाद सोडल्यास) वर्गात एकोपा निर्माण झाला होता व लिपी मृत झाली. Smile

तुमचा लेख वाचून हे सारे आठवले.

=========

भरतकाम करून अक्षरं काढणे हा प्रकार बहुधा फक्त याच लिपीत केला गेला आहे.

बहुदा नस्तालिक व नस्ख वापरून असे प्रकार झाले आहेत. अफगाणिस्तानमधून निर्यात होणार्‍या गालिचांवर भरतकामाचा वापर करून मदतीचा पुकार करणारे विविध संदेश युरोपात गेले होते.
यावर्षीच्या महिल्या तिमाहीचा हिमाल साउदेशियनच्या लेखात या गालिचांवर एक मोठा रोचक लेख आला होता.

बाकी, पुढील लेखाच्या प्रतिक्षेत

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओह, मस्त आहे लेख. आवडला. सुरुवातीचा लहान मुलांसाठी लिहिलेला भाग इथे लिहिताना थोडा बदलला असता, तर मात्र अधिक आवडलं असतं.

अवांतरः बाकी मजा म्हणजे जपानी भाषा शिकायचा प्रयत्न करताना हिरागाना ही बायकांची मानली जाणारी खास मृदू लिपी त्या भाषेत आहे, हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझा एकदम हिरमोडच झाला होता. केवळ या असल्या आचरट भेदापायी ती भाषा शिकण्याची माझी इच्छा काही अंशी तरी ओसरली. पुढे त्या लिपीच्या कडबोळ्याला (हिरागाना, काताकाना आणि कांजीज) कंटाळून मी तो उपक्रम तसाच अर्ध्यात सोडून दिला हे निराळं.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जपानीतल्या तीन लिप्यांचे वर्गीकरण मूळ जपानी, युरोपियन भाषांतले आणि मँडारिन व क्लासिकल जपानीमधले शब्द लिहिण्यासाठी असे काहीसे झाल्यागत वाचल्याचे आठवते- तपशिलात चूक असू शकेलही पण रफली तसे इ.इ. हिरागाना मुद्दाम स्त्रियांसाठी आहे इ. कधीच वाचनात आले नाही. दुवा इ. देऊ शकाल काय?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

जाउ दे रे.
एखाद्या स्त्रीकडून योग्य तपशीलांची वगैरे कसली अपेक्षा करतोस?
ती स्त्री आहे म्हणून ती चूकच आहे.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ठीके मनोविजय सिंग.

तुमच्यासाठी कायपण!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

ROFL
ROFL
ROFL

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

न्हाई बा, विद्याचे दुवेबिवे हुडिकन्यात आमी येळ घालवत न्हाई, तुमास्नी ठाव न्हाय काय? शिकिवनार्‍या बाईनं तसं शिकिवलं व्हतं!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असेल. भारताच्या पूर्वेकडील भाषांबद्दल लॉग(१) इतके ज्ञान असल्याने माहिती नाही.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

विकीवरून (http://en.wikipedia.org/wiki/Japanese_language#Writing_system), परंतु असेच पूर्वी ऐकले-वाचलेसुद्धा होते.

कांजी लिपीमधील चिन्हे सर्व चिनी लिपीमधील चिन्हे आहेत. शैलीमुळे काही बारीकसारीक फरक प्रचलित झाले असतील तेवढेच. परंतु त्यांचे उच्चार चिनी मंत्रीभाषेतील नव्हेत (योगायोग, वा व्युत्पत्तिसाम्य सोडल्यास). चिन्हे ध्वनीकरिता नसून अर्थांकरिता आहेत. त्या-त्या अर्थाचे जे कुठले जपानी शब्द असतील, त्यांच्याकरिता चिन्हे वापरली जातात. मात्र काही जपानी शब्द आणि विभक्ति/प्रत्यय यांच्याकरिता चिनी प्रतिशब्दही नाहीत, त्यांचे लेखन होऊ शकत नाही. पूर्वी बहुधा अध्याहृत मानून काम भागवले जात असावे.

हिरागाना ही सुरुवातीला दरबारी स्त्रियांची लिपी सोयीस्कर असल्यामुळे अन्य लोकही वापरू लागले. ही ध्वन्यश्रित लिपी आहे. ज्या जपानी शब्दांकरिता चिनी प्रतिशब्द नाही, म्हणून चिन्हही नाही, शिवाय प्रत्यय-अव्यये-वगैरे यांच्याकरिता आज ही लिपी वापरली जाते.

काताकाना लिपी बौद्ध भिक्खूंनी विकसित केली. ही ध्वन्यश्रित लिपी आहे. ही लिपी "ध्वनि-अनुकरण-शब्द" आणि नवागत-बिगर-जपानी शब्द यांच्याकरिता वापरली जाते.

लेखनात या लिप्या मिसळून वापरल्या जातात. (उदाहरण, विकी दुवा)

कांजी लिपीमधील चिन्हे सर्व चिनी लिपीमधील चिन्हे आहेत. शैलीमुळे काही बारीकसारीक फरक प्रचलित झाले असतील तेवढेच. परंतु त्यांचे उच्चार चिनी मंत्रीभाषेतील नव्हेत (योगायोग, वा व्युत्पत्तिसाम्य सोडल्यास).

यातील ठळक/अधोरेखित केलेला भाग तितकासा बरोबर वाटत नाही.

अधिक माहितीकरिता/तपशिलांकरिता इच्छुकांनी 'ओनयोमी' आणि 'कुनयोमी' असे गुगलून काही हाती लागल्यास पाहावे.

हिरागाना ही सुरुवातीला दरबारी स्त्रियांची लिपी सोयीस्कर असल्यामुळे अन्य लोकही वापरू लागले. ही ध्वन्यश्रित लिपी आहे. ज्या जपानी शब्दांकरिता चिनी प्रतिशब्द नाही, म्हणून चिन्हही नाही, शिवाय प्रत्यय-अव्यये-वगैरे यांच्याकरिता आज ही लिपी वापरली जाते.

यातील अधोरेखित भागाबद्दल: हे बरोबरच आहे. परंतु याउपर, एखाद्या जपानी शब्दाकरिता कांजी चिन्ह उपलब्ध आहे, परंतु (नवशिक्या किंवा प्रसंगी अनुभवीसुद्धा) लेखकास ते चिन्ह ठाऊक नाही, अशा प्रसंगी हिरागाना वापरली जाऊ शकते.

थोडक्यात, ढोबळमानाने:

- परकीय (चिनी सोडून) भाषांतून आयात झालेल्या शब्दांकरिता नेहमी काताकाना वापरावी.
- परकीय (पुन्हा, बहुधा चिनी वगळून) विशेषनामांकरिता नेहमी काताकाना वापरावी.
- ध्वन्यनुकारी (ओनॉमोटोपोइक) शब्दांकरिता काताकाना वापरावी.
- प्रत्यये, अव्यये वगैरेंकरिता नेहमी हिरागाना वापरावी.

अन्यथा:

- जेथे जेथे म्हणून उपलब्ध आहे नि माहीत आहे, तेथेतेथे कांजी वापरावी, अन्यथा हिरागाना वापरावी.

(चिनी विशेषनामे जपानीत लिहिताना नेमकी काय पद्धत आहे, याबद्दल थोडा संभ्रम आहे. बहुधा अशी विशेषनामे कांजीतच लिहिण्याचा प्रघात असावा, असे वाटते, परंतु खात्री नाही. शिवाय, अशा विशेषनामांकरिता कांजी ठाऊक नसल्यास ती हिरागानात लिहिली जावी, की काताकानात, याबद्दलही ठाऊक नाही / संभ्रम आहे. चूभूद्याघ्या.)

लेखनात या लिप्या मिसळून वापरल्या जातात.

याचे अतिशय प्राथमिक उदाहरण:

'मी डोसा खातो' हे वाक्य.

(मराठीत प्रथमेकरिता विभक्तिप्रत्यय नाही. येथे, जपानी वाक्यात तो आहे, असे कल्पावे आणि 'मी'पुढे लावावा. तसेच, 'डोसा'पुढचा द्वितीयेचा प्रत्यय या मराठी वाक्यात अध्याहृत आहे. तो जपानी वाक्यात उघड आहे, असे कल्पून तेथे लावावा.)

'मी' - जपानी शब्द. शक्य तोवर कांजी. कांजी चिन्ह ठाऊक नसल्यास हिरागाना.
'मी'नंतरचा प्रथमेचा प्रत्यय - हिरागाना.
'डोसा' - परभाषीय आयात शब्द. काताकाना. (डोशाऐवजी सुशी खाल्ली असती, तर शक्य तोवर कांजीत, नाहीतर हिरागानात.)
'डोसा'नंतरचा द्वितीयेचा प्रत्यय - हिरागाना.
'खा' - शक्य तोवर कांजी. कांजी चिन्ह ठाऊक नसल्यास हिरागाना.
'तो' - हिरागाना.

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

माहितीपूर्ण.

अवांतर - जपानीभाषेबद्दल एवढी माहिती असूनही इथे इतकेदिवस 'च'कार जपानी शब्द न काढणार्‍या न'वी बाजू ह्यांचा निषेध करावा काय? आणि जपानी भाषेबद्दल एकही शब्द जपानीत न लिहिता प्रतिसाद दिल्याने नारायण पेठेचे नाव काढल्याचा अभिमान बाळगावा काय?

...मात्र काताकानातच काढावे लागेल. (बहुधा 'नारायान् पेत्तो' असे. चूभूद्याघ्या.)

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

व्युत्पत्तिसाम्य -> ओन्योमी, म्हणून चिनी उच्चारांसारखा उच्चार
समान अर्थ असलेला वेगळाच ध्वनी, त्याच अर्थाचा जपानी शब्द -> कुन्'योमी

ईषत् शोधावरून असे दिसते की कुन्'योमी प्रयोग अधिक सरळसोट/साधे वगैरे असावेत. ("जपानीमोळे" म्हणावे तर द्विरुक्ती होईल.)

अर्थान चिनी-व्युत्पत्त उच्चार सुद्धा अगदी मंत्री-भाषेसारखे नसतात. उदाहरणार्थ राजधानीचे नाव चिनी-उद्भव 東京 "पूर्व[दिशा] राजधानी" आहे.
चिनी मंत्री भाषेत : दोङ्-जिङ्
जपानीमध्ये व्युत्पत्त : तोक्यो
(माझा अभ्यास नाही, पण दोङ्तो यांची जितपत जवळीक जाणवते, त्या मानाने जिङ् क्यो/केइ जोडीत अपभ्रंश पुष्कळ झालेला दिसतो.)

कांजी चिन्हांचा जपानीकरिता वापर करताना अशा बहुतांश चिन्हांचे जपानीत सहसा दोन प्रकारे वाचन होऊ शकते. एक ओनयोमी, दुसरे कुनयोमी. (कोणते वाचन कधी करायचे, हे पूर्वज्ञानाने.)

ओनयोमी (शब्दशः अर्थः ध्वनिनुसार वाचन): चिन्ह जपानीकरिता जेव्हा आयात झाले, त्यावेळी त्याबरोबर जडलेल्या शब्दाचा चिनी भाषेतील उच्चार जपानी कानांना जसा ऐकू आला, त्यानुसार वाचन.
कुनयोमी ('कुन'चा अर्थ विसरलो; 'योमी' म्हणजे वाचन): चिन्ह ज्या संकल्पनेकरता आहे, त्याकरिताच्या जपानमोळ्या शब्दाच्या उच्चाराप्रमाणे वाचन.

उदाहरणार्थ:

- 'सूर्य' किवा 'दिवस' या संकल्पनांकरिता जे चिन्ह आहे, त्याकरिता ओनयोमी: 'ही' किंवा 'बी'. कुनयोमी: 'निचि'.

आता 'रविवार'करिताचा जपानी शब्द 'निचियोऽबी': यातला सुरुवातीचा 'निचि' आणि शेवटचा 'बी', दोहोंकरिता हेच चिन्ह वापरले जाते.

- डोंगराकरिताचे चिन्ह 'सान्' (ओनयोमी) आणि 'यामा' (कुनयोमी) अशा दोन्ही प्रकारे वाचले जाऊ शकते.

- पाण्याकरिताच्या चिन्हाचे वाचन: 'सुइ' (ओनयोमी) किंवा 'मिझु' (कुनयोमी). 'मी पाणी पितो' हे वाक्य वाचताना हे चिन्ह 'मिझु' असे वाचायचे. मात्र, 'बुधवार'(जपानीत 'पाणीवार') करिताचा जपानी शब्द वाचताना मात्र 'सुइयोऽबी' असा वाचायचा.

वगैरे वगैरे.

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

माझ्या ओळखीची एक (लेखी) 虹 नावाची चिनी व्यक्ती आहे, तिने आपले नाव उच्चारी "होङ्" म्हणून सांगितले.
तिने काही काळ जपानमध्ये प्रशिक्षण घेतले होते, तिथे तिला "कोको" म्हणत, असे तिने सांगितले.
स्पष्टीकरण म्हणून हे सांगितले की 虹चा अर्थ इंद्रधनुष्य, आणि त्याचा जपानी उच्चार "कोको" असा होतो.
(हा संवाद आणि ओळख १०-१२ वर्षांपूर्वी)

आताच विक्शनरी कोश बघितला, तर 虹चा "को" असा उच्चार चिनी->जपानी व्युत्पत्त आहे, म्हणजे जपानी पद्धतीने "होङ्"च्या जवळ जाणारा उच्चार. (माझ्या परिचितेने सांगितलेले "कोको" असे प्रेमळ द्विर्वचन असावे का?)
मात्र जपानी भाषेत/कवितांमध्ये हे चिन्ह (विशेषनाव म्हणून नव्हे, तर आकाशातील इंद्रधनुष्य अर्थाने येते) तेव्हा त्याचा उच्चार "निजि" असा ओन्योमी करायचा असतो.

इन्टरेस्टिंग प्रकार आहे, सगळा.

माहितीकरिता धन्यवाद.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

वाचनखूण.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ंआस्टा, सूर्‍आसा ळॅ़।आ, आटीस्।आञ आआवादाळाआ. पॉद्।अ‍ॅअ‍ॅळ ब्।आआङाआच्।ञाआ पृआटी़स्।अ‍ॅट.

हे काय सांडलंय ओ रुचीम्याडम वरती? काञ्ञ्ङ्ङाट् सारखी मलयाळम नावे आणि पाणिनीची अइउण्ऋलृक् वगैरे सूत्रे एकसमयावच्छेदेकरून लिहिल्यागत वाटायलंय.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

तिनं लेखाच्या आशयाशी अनुरुप असा कल्पक प्रतिसाद दिलाय!
कॅप्स लॉक ऑन ठेवून पुढील मजकूर टंकला आहे. (किरकोळ बदल सोडून दे.)

मस्त, सुरस लेख अतिशय आवडला.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

!!!

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वाह!

याला खरेतर 'कापिताल' अशी दाद दिली पाहिजे. Smile

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

खरे आहे.

तो प्रतिसाद वाचून त्याचा अर्थ लावणे ही एका अर्थाने क्यापिटल पनिशमेंट आहे खरी.

एक्ष्ट्रीमली क्रुएल अ‍ॅण्ड अनयूज्वल!

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

अगदी अगदी!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

यानिमित्ताने धनंजय आणि नवीबाजू यांचे जपानी भाषेचे ज्ञान उघडे पडले. या दोघांना अज्जीच ठाऊक नसलेले इशय कोणते आहेत, एतत्संबंधी शेप्रेट धागा/धागामाळका काढणे अवश्यमेव आहे असे वाटते.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मी वयाने एवढ्या लहान वाचकवर्गासाठी प्रथमच लिहिते आहे. भाषाविज्ञानाच्या विषयांवर लिहून शालेय वयापासूनच मुलांमध्ये भाषिक संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे खास लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून लिहिताना काय गोष्टी कराव्यात, कोणत्या करू नयेत यावर तुम्हा सर्वांचे प्रतिसाद मिळाल्यास खूप मदत होईल. शिवाय, त्या दृष्टीने वरील लेखातला कोणता भाग चांगला झालाय, आणि कोणता भाग अधिक चांगला करता येईल तेही ऐकायला आवडेल. तसेच, ऐसीकरांपैकी कोणाची मुले चौथी ते दहावी इयत्तेत शिकत असतील, तर त्यांना हा लेख वाचायला देऊन त्यांचा प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचवल्यास फार मदत होईल. या लेखमालेतील पुढचे लेख लिहिण्यास मला मार्गदर्शन मिळेल.

पुन्हा एकदा धन्यवाद.

राधिका