नाटक - २

माझं एक पूर्वप्रकाशित पोस्ट इथे डकवते आहे. इथे तेच तेच तेच वाचायचा कंटाळा आला म्हणून, माझ्या बाजूनं काहीतरी सक्रिय विरोध नोंदवायचा म्हणून, ऐसीवर ललिताची चीरफाड होते हे गृहितक बाजूला ठेवून.

***

नाटकाला जाताना माझं जे काही होतं, त्याच्याकडे न पाहिल्याचा आव आणून, पण अनिमिष नजरेनं तू पाहत राहतेस माझ्याकडे, तेव्हा तुझ्यासारखंच चेहर्‍याआड दडून तुझ्याकडे बघायला बेहद्द आवडतं मला.

तयारीपासूनच सुरुवात होते आपल्या खेळाला. नाटकाला जाणं हा कार्यक्रम असतो माझ्याकरता. मग ते ’साठेचं काय करायचं?’ असो, वा ’सही रे सही’. त्या कार्यक्रमाचं ’नाटक’पण हाच मुळी एक साजरा करण्याचा सोहळा असतो, या माझ्या ठाशीव मताला किती वेळा छेडलं आहेस तू, गमतीगमतीत. मला ठाऊक नसतं असं थोडंच आहे? पण संध्याकाळी नाटकाला जायचंय म्हणताना आपण आपापल्या भूमिकांचं बेअरिंग घेऊन तय्यार असतो.

चापून-चोपून नेसलेली कलकत्ता साडी, अत्तर, नि अर्थात मोगर्‍याचा गजरा.
वा मऊ सुताचा विटकासा भासेलसा - पण अतीव सुखद स्मार्ट कुर्ता नि किमान चार लोकांची तरी नजर वळेलशी वारली पेंटिंग केलेली दिमाखदार शबनम.
वा माझा आवडता हिरवाशार कुर्ता नि त्यावर लाल-केशरी उधळण करणारी कलमकारी वर्कची ओढणी.

आपण कशात सुरेख दिसतो नि मजेत असतो, हे ठाऊक असतं नाही आपल्याला?

मला कुठल्याही परिस्थितीत वेळेआधी पोचायचं असतं नाटकासाठी. मग तू दुपारची झोप अंगावर आलीशी दाखवत मारे आल्याबिल्याचा चहा-बिहा करत काढलेला वेळ, उग्गाच ’अंघोळ करू का, फ्रेश वाटतं ब्वॉ’ची केलेली सराईत बतावणी, आरशासमोर फेर्‍या घालण्याचा आव आणत तीनतीनदा कपडे बदलणं - जसा काही तुला कपड्यांच्यात इंटरेस्टच असतो, नि मग अगदी निघता निघता दाराशी जाऊन ’अर्रे, अत्तर राहिलं बघ’ म्हणत कुलूप हातात घेऊन चपलांसकट घरभर फिरत अत्तर फवारून येणं... सगळं काही आपल्याला ठाऊक असलेलं. पण आपण दर वेळी नव्यानं रंग भरत, नव्या नव्या जागा नि बारकावे शोधत राहतोच.

तुला माहितीय, माझी भिवई पुरेशी वर चढली की डोळ्याच्या कोपर्‍यातून माझ्याकडे पाहत गुणगुणत तू जिना उतरायला घेतेस, तेव्हा तुझे डोळे चक्क लकाकत असतात.

एकदा खाली उतरलं, की मात्र तुझी स्ट्रॅटेजी बदलते. मग लगबगीनं रिक्षा वगैरे शोधून रंगायतनात पोचेपर्यंत आपण आपला आपल्यापाशी थोडा श्वास टाकतो.

तिथल्या आवारातल्या लफ्फेदार रंगीत गर्दीत मिसळत जाताना मात्र तिकिटं काढल्यापासून आपल्यात नि नाटकात जुळलेलं ’खास काहीतरी’ निमूटपणे जपानी पंख्यासारखं मिटून पर्समधे टाकावं लागतं नि आपण तथाकथित रसिकांच्या गर्दीचा केवळ एक अंश होऊन जातो, तेव्हा दर वेळी मी नव्यानं खट्टू होतेच. ते दडवायसाठी कित्ती सराईतपणाचा आव आणून आटोकाट प्रफुल्लित दिसत राहिले, तरी ते तुझ्या नजरेतून सुटत नाही नि गालातल्या गालात हसत चेव आल्यासारखी गर्दीतल्या ओळखीच्या मंडळींना शोधत हाय-हेल्लोचे संतापजनक सोपस्कार करतच राहतेस, तेव्हा मला आपल्यातल्या खेळाचा विसर पडल्यासारखा होतो नि माझं सामाजिक हसणं अधिकाधिक कृत्रिम-नाटकी होत जातं.

हा जणू क्यू असावा, तशी पहिली घंटा होते नि आत शिरायसाठी लोक मारे शिस्तीनं रांग-बिंग लावतात.

आता इतक्या सार्‍या प्रयोगांनंतर तरी या प्रसंगातली रंगत ओसरावी ना? पण नाही, आपल्यातलं नाटक अजून चांगलंच जिवंत आहे याचा पुरावा दिल्यासारखा तुझा रांग-बिंग लावायला ठाम, मूक आणि सातत्यपूर्ण नकार. मला कित्ती वाटलं तरी मी एकटीच काही मी रांगेत उभी राहायला जाणार नाही, हे तुला नीटच माहीत असतं. आजूबाजूची बेशिस्त गर्दी ओसरत, रांग हळूहळू मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाते, नि माझे तुझ्याकडे टाकलेले कटाक्ष अधिकाधिक तीव्र होत जातात. नाटक चालू होण्याआधी तिथल्या लालसर-सोनसळी प्रकाशात, जिवंत भासणार्‍या शांततेत, रंगायतनातल्या अद्वितीय पडद्याला ’य’व्यांदा प्रेमभरानं न्याहाळत स्वतःपाशी पोचायला तुलाही आवडतंच की. पण माझ्या चेहर्‍यावरची घायकुती पाहायसाठी तू तेही हसत हसत अव्हरतेस, तेव्हा आपल्यातलं हे नाटक तुझ्यासाठी किती नि कसं कसं जिवाजवळचं आहे ते जाणवण्याचा नि त्यामुळे माझ्या चेहर्‍यावरचा रागाचा मुखवटा सरकण्याचा धोका असतो, तो हाच क्षण.

तेवढा निसरडा क्षण पार करून आपण अखेर आत शिरतो, तेव्हा आजूबाजूचं नेपथ्य एकदम फिरत्या रंगमंचासारखं जादुईपणे बदलतं नि आपण अंधाराच्या प्रदेशात प्रवेश करतो. इथून पुढे आपल्यातल्या या खेळाची तंत्रं आणि तीव्रताही बदलणार - उंचावणार आहेत, अनिश्चित - धोकादायक असू शकणार आहेत याचा जणू गर्भित इशारा मिळतो नि आपण एक दीर्घ श्वास घेतो, तो काही फक्त एसीचा नि अत्तरांचा चिरपरिचित संमिश्र वास आल्यामुळे नव्हे.

इथून पुढे आपण आपापले असतो आणि नसतोही.
हळुवार मावळत जाणारा प्रकाश, जिवंत अंधार नि निवेदकाचे मंतरलेले शब्द. पडदा उघडताना आपण कुणाचे कुणी नसलेले.
आपल्यातल्या नाटकाची सूत्रं समोरच्या अदृश्य सूत्रधाराकडे देऊन जणू विंगेतून नाटकातलं नाटक पाहायला लागलेले...

मी तुझ्याआधीच पाहिलेलं नि मला आवडलेलं इत्यादी नाटक असेल, तर या सगळ्याला एक भीषण कडा असते. समोरच्या खेळाचा मालकीहक्क नि जबाबदारीही जणू माझ्याकडे असल्यासारखी असते. नटानं फम्बल केलं, आवाज लागावा तसा लागला नाही, प्रयोग म्हणावा तसा रंगला नाही... माझीच चारचौघांत फजिती होणार असल्यासारखा माझा जीव गोळा होतो नि तुझ्या चेहर्‍यावरच्या प्रशस्तिपत्रकाकडे न राहवून माझं वारंवार लक्ष जात असतं. हे तुला कळल्यापासून होता होईतो तुझी पसंती वा नापसंती तू बेशरमपणे स्वतःपाशीच राखून ठेवतेस, हे माझ्या अलीकडेच लक्षात आलं आहे...

पण प्रयोग देखणा, श्रीमंत आणि तालेवार निघाला की आपण नकळत सैलावतोच.

त्याच नशेत बाहेर पडताना कुणी गाठून एकदम नाटकाशी संबंध नसलेल्या हवापाण्याच्या अश्लील गप्पा मारायला लागू नयेत, म्हणून मी हट्टानं मागे रेंगाळते, तोवर आपल्यातल्या नाटकाच्या शेवटाचे वेध तुला लागलेले असतात नि सगळ्या मिश्किलीचे रंग नकळत उतरून तुझा खरा - विनामुखवट्याचा ओलसर चेहरा डोकावायला लागलेला असतो. पण मग पडदा पडेस्तोवर नाटक चालू ठेवायचंच अशा ईर्ष्येनं, अंधारातून उजेडात येताना मी तुझ्या खांद्याला हलकेच स्पर्श करते नि ’आवडलं?’ असा प्रश्न अल्लाद तुझ्या पुढ्यात टाकते.

आता निर्णय तुझा असतो...

आपल्या भूमिका पाहता पाहता बदललेल्या असतात.

***

field_vote: 
4.857145
Your rating: None Average: 4.9 (7 votes)

प्रतिक्रिया

जे ब्बात!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नाटक हे केवळ निमित्त; 'दोन स्त्रिया एकमेकांच्या खूप प्रेमात आहेत' हा मुख्य धागा वाटला. काही बारकावे स्त्री-पुरुष संबंधांतल्यासारखेच (थोडे स्टीरिओटिपिकल?) आहेत त्यामुळे काही काळ अंमळ कन्फ्यूजन झालं, की दोन्ही पात्रं स्त्रीलिंगी आहेत असं मला वाटणं हा लिखाणात अनवधानामुळे चुकलेला भाग आहे की काय; पण नंतर खात्री पटली.

जाता जाता : ही चीरफाड नव्हे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नाही, अनवधानाने नाही. एकमेकींशी जवळचे आणि नाव नसलेले नाते असलेल्या दोन स्त्रियांमधला धागा हाच या स्फुटाचा विषय आहे. नाटक हे आपले निमित्त... Wink

जाता जाता: असल्या चिरफाडीला आक्षेप नाही. 'रंगायतनात मुळात फिरत्या रंगमंचाचे नाटक होऊ शकते का? छे! हल्ली फार बदलले हो ठाणे!'छाप प्रतिक्रिया आल्यास त्याला अनावश्यक आणि नकोशी चीरफाड म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>> जवळचे आणि नाव नसलेले नाते <<

नाव नसलेले की 'the love that dare not speak its name'? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नाही. नाव नसलेलेच. नाव देण्यासारखे असते, तर स्फुटातून तसे तपशील नसते का आले? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सार्‍याच चांदण्यांची जगतास जाण नाही हो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन स्वतंत्र माणसे जाणवली नाहीत. एकाच माणसातली दोन व्यक्तीमत्वे वाटली.
बाकी, पुढील (नाटक- ३३३) लेखनांस शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन स्वतंत्र माणसे जाणवली नाहीत. एकाच माणसातली दोन व्यक्तीमत्वे वाटली
+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नाटक हे केवळ निमित्त; 'दोन स्त्रिया एकमेकांच्या खूप प्रेमात आहेत' हा मुख्य धागा वाटला. काही बारकावे स्त्री-पुरुष संबंधांतल्यासारखेच (थोडे स्टीरिओटिपिकल?) आहेत त्यामुळे काही काळ अंमळ कन्फ्यूजन झालं, की दोन्ही पात्रं स्त्रीलिंगी आहेत असं मला वाटणं हा लिखाणात अनवधानामुळे चुकलेला भाग आहे की काय; पण नंतर खात्री पटली.

अगदी हेच म्हणतो. दोन्ही पात्रे स्त्रीलिंगी असणं हे चुकून आहे की काय हे पहायला पुनरेकवार पूर्ण लेख वाचला तेव्हा खात्री झाली की हेतूपुरःसर आहे.

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा! मस्त!!
जंतूंशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसतं वा वा! नाही तर वाहव्वा!

त्याच नशेत बाहेर पडताना कुणी गाठून एकदम नाटकाशी संबंध नसलेल्या हवापाण्याच्या अश्लील गप्पा मारायला लागू नयेत, म्हणून मी हट्टानं मागे रेंगाळते

क्या बात है! माझंही असंच असतं फक्त माझी कृती उलट असते, मी प्रयोग संपताच तीरासारखा पार्किंग लॉटकडे / रिक्षा स्टँडकडे पळत सुटतो. छान रंगलेलं नाटक संपल्यावर थेट आपल्या वाहनात जाऊन बसलं की फक्त आपल्या आतलीच शांतता ऐकायला मला खूप आवडतं

बाकी, दोन मुलींमधील/स्त्रियांमधील/मैत्रीणींमधील तरल अनामिक भावबंधही चित्तवेधक आणि मनस्वी उतरलेत!

भले शाब्बास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाहा ऋ, खरय!! माझंही थोडफार असंच होत.. म्हणजे त्यावरच्या चर्चा नको असतात असे नाही, पण त्या क्षणी ते नाटक, त्यातली पात्र विषया सकट आपल्याबरोबरच असावीत असा अट्टहास मात्र असतो.

शिवाय चित्रपट मी कोणाबरोबरही पाहू शकते,, नाटकाच असं नाही.. कस माहित नाही पण काही नाटकं बघताना बरोबर नेमकं कोण हवंय हे कसं कोण जाणे आधीच माहित असतं.. त्यामुळे नाटक पाहायला जाणारी ही द्वयी एकदम आवडली मेघना!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ललित आवडलं, मस्तच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं, असं लिहणं अनुभवल्याशिवाय अवघड असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त, मस्त, खुप सुंदर अनुभव . वाचल्यावर जाणवलं की मी किती वर्षात नाटक पाहीलेलं नाही. काही ओळींनंतर परत वाचल्यावर दोन मैत्रिणी आहेत हे कळलं. मनाला भिडणारं काहीही अनुभवल्यानंतर एकटंच असावं असं वाटतं. तो अनुभव अगदी मुरून जुना झाल्यावरच एरवीच्या गप्पा.

जेव्हा चित्रीकरणाच्या सोयी नव्हत्या तेव्हा ठीक होते पण आता असताना पुर्वीच्या पद्धती चालू ठेवण्याचा अट्टाहास का?

ही पद्धत म्हणून नाही तर कला म्हणून चालू असतात. समोरचे कलावंत पुर्ण तीन तास दुसरं जगणं जगत असतात, त्यामुळे काहीही म्हटलं नाटकाचा ’जिवंतपणा‘ सिनेमात नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आधी वाचलं होतं, तरी पुन्हा आवडलं! मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई ग!!! कमाल हळूवार आहे, सुंदर!!!!! खूप आवडलं !!!
सध्या मला श्रेणीहक्क नाहीये पण माझं या स्फुटाला रेटींग ५/५.
______________

आपण कशात सुरेख दिसतो नि मजेत असतो, हे ठाऊक असतं नाही आपल्याला?

येस्स्स्स्स्स्स!!! येस्स्स्स्स्स्स्स!!! Smile किती सुंदर!!!
__________________

तू तेही हसत हसत अव्हरतेस, तेव्हा आपल्यातलं हे नाटक तुझ्यासाठी किती नि कसं कसं जिवाजवळचं आहे ते जाणवण्याचा नि त्यामुळे माझ्या चेहर्‍यावरचा रागाचा मुखवटा सरकण्याचा धोका असतो, तो हाच क्षण.

Smile Smile Smile
_________
कोण आहे मेघना इतकी भाग्यवान मैत्रिण तुझी?
हे स्फुट वाचताना तीनदा तरी माझ्या काळजाचा ठोका चुकला. किती जादूमय असते मुली-मुलींची मैत्री ..... अगदी परफेक्ट रंगवलयस!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई ग!!! कमाल हळूवार आहे, सुंदर!!!!! खूप आवडलं !!!

'ओह माय गॉड!!!!!!' राहिलं वाटतं. अजून दहा-बारा उद्गारचिन्हं चालतील की. होऊ द्या खर्च!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उद्गारचिन्हाने गमावले ते 'स्स्स्स्स्स्स' ने कमावले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बळच. उगाचच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यातही किमान दोन उद्गारचिन्हे राहिली असावीत.

निदान असं तरी लिहायचत :-

बळच! उगाचच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रकाटाआ.
<उगीच कडवट प्रतिक्रिया दिली होती. काढून टाकली आहे. ब्लेम इट ऑन माय लो गिल्ट थ्रेशोल्ड Wink असो.>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याआधी वाचलं होतंच, पुनर्वाचनातही आवडलं. 'प्ले विदिन प्ले'सारखंच हे भूमिकांचं नाट्य सुरेख रेखाटलंय.

अवांतर:

तुला माहितीय, माझी भिवई पुरेशी वर चढली की डोळ्याच्या कोपर्‍यातून माझ्याकडे पाहत गुणगुणत तू जिना उतरायला घेतेस, तेव्हा तुझे डोळे चक्क लकाकत असतात.

'फक्त तुझी जर दगडी भिवई...' आठवून गेलं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलय! आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आधी वाचलं आहे, पण पुन्हा वाचून मजा आली Smile

मी तुझ्याआधीच पाहिलेलं नि मला आवडलेलं इत्यादी नाटक असेल, तर या सगळ्याला एक भीषण कडा असते. समोरच्या खेळाचा मालकीहक्क नि जबाबदारीही जणू माझ्याकडे असल्यासारखी असते. नटानं फम्बल केलं, आवाज लागावा तसा लागला नाही, प्रयोग म्हणावा तसा रंगला नाही... माझीच चारचौघांत फजिती होणार असल्यासारखा माझा जीव गोळा होतो नि तुझ्या चेहर्‍यावरच्या प्रशस्तिपत्रकाकडे न राहवून माझं वारंवार लक्ष जात असतं. हे तुला कळल्यापासून होता होईतो तुझी पसंती वा नापसंती तू बेशरमपणे स्वतःपाशीच राखून ठेवतेस, हे माझ्या अलीकडेच लक्षात आलं आहे...

हे अ-ग-दी असंच होतं माझं देखील जर मी एखादं नाटक आधीच पाहीलं असेल आणि दुसर्‍यांदा मित्राला घेऊन गेलो की नाटक संपेपर्यंत माझा जीव असाच गोळा होतो/ मुठीत असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(खवचट, चीरफाडू, मार्मिक, रसिक आणि इतर ;-)) प्रतिसादांबद्दल आभार लोकहो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेख छान जमून आलेला आहे. दुसऱ्या व्यक्तीचं वर्णन न करता स्वतःच्याच विचारांत पडलेलं नात्याचं प्रतिबिंब दाखवलेलं आहे. या आरशात दुसऱ्या व्यक्तीचा केवळ वावर दिसतो; चेहरा, लकबी दिसत नाहीत. हेच या लेखाचं बलस्थान आहे. पार्श्वभूमीला नाटकाच्या सुरूवातीचा सोनसळी रंग, आणि अधूनमधून येणारा सेंटचा वास.

एक सूचना करावीशी वाटते. या स्फुटाचा जीव तसा छोटाच असला तरी यासारखेच, नात्यांवर फोकस करणारे वेगवेगळे लेख येऊ देत. गजलेत जसा एक शेरांचा गुच्छ असतो, तसा एखादा गुच्छ सादर करता आला तर आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे आयड्या. प्रयत्न करीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नाटकं, सिनेमे वगैरें बाबत एखादा असा खास मित्र वा मैत्रिण असावी असं मला तरी अनेकदा वाटतं. आपल्याला कळलेल्या गोष्टी कळलेलं अजून कोणीतरी आहे आणि त्याच्या/तिच्या बरोबर अशा गोष्टींचा लुत्फ उठवता येत असेल तर ते एक सुखच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile