रोड मूव्ही - एक सशक्त, अभिजात विधा (भाग २)

भाग पहिला: http://www.aisiakshare.com/node/256

पहिल्या भागात ‘रोड मूव्ही’ या विधेची वैशिष्ट्यं आणि काही चित्रपटांचा धावता परिचय करून दिला होता. ती मांडणी करताना अमेरिका आणि १९६८च्या आसपासचं वातावरण यांच्यावर मुख्य भर दिला होता. तरीही इतर माध्यमांतल्या पूर्वसुरी, एक ऑस्ट्रेलियन चित्रपट (‘प्रिसिला’) आणि दोन भारतीय चित्रपट यांचा समावेश करून विधेची व्यापकता लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला होता . बॉनी अँड क्लाईड (१९६७) आणि इझी रायडरच्या (१९६९) अलीकडे पलीकडे काही इतर देशांतले चित्रपट या विधेचा वेगवेगळ्या दिशेत कसा विस्तार करत गेले हे या भागात पाहू. (अमेरिका आणि १९६८ अधूनमधून डोकावत राहतीलच.)

La Strada - Federico Fellini

ला स्ट्राडा (१९५४) - फेदेरिको फेलिनी याच्या दिग्दर्शनाखाली अँथनी क्विननं साकारलेला, डोंबार्‍याचे खेळ करत फिरणारा रासवट झाम्पानो आणि त्याच्या प्रेमात पडलेली मतिमंद जेल्सोमिना (ज्यूलिएत्ता मासीना) यांची ही हृदय पिळवटून टाकणारी प्रेमकथा आहे. भटक्या व्यवसायामुळे सतत करावा लागणारा प्रवास आणि तरीही दुसऱ्या माणसावर जीव लावण्याची आणि विस्तीर्ण जगात मूळ रुजवू पाहण्याची माणसाची मूलभूत प्रेरणा यात दिसते. प्रवासात भेटणारी माणसं पाहून आपलं काहीतरी हुकतंय याची नायिकेला जाणीव होते. मतिमंद, व्यवहारशून्य, जगरहाटीत टिकायला नालायक वाटणारी पण संवेदनशील अशी ही नायिका चॅप्लिनची आठवण करून देते. प्रेमाची प्रत्येकाची तऱ्हा वेगवेगळी असू शकते हे दाखवणारा एक मासला पाहा:

The Fool: Maybe he loves you?
Gelsomina: Me?
The Fool: Why not? He is like dogs. A dog looks at you, wants to talk, and only barks.

तिचं आयुष्य फोल नाही याचा मतिमंद जेल्सोमिनाला दाखला मिळतो तो संवाद पाहा:

The Fool: I am ignorant, but I read books. You won't believe it, everything is useful... this pebble for instance.
Gelsomina: Which one?
The Fool: Anyone. It is useful.
Gelsomina: What for?
The Fool: For... I don't know. If I knew I'd be the Almighty, who knows all. When you are born and when you die... Who knows? I don't know for what this pebble is useful but it must be useful. For if it’s useless, everything is useless. So are the stars!

(‘ला स्ट्राडा’ म्हणजे रस्ता. चित्रपट मूळ इटालियन नावानंच प्रसिद्ध आहे म्हणून मूळ नाव दिलं आहे.)

Knife in the Water - Roman Polanski

नाइफ इन द वॉटर (१९६२) – होडीतून फेरफटका मारावा अशा हेतूनं नवरा बायको घरून निघालेले असतात. मोटारीनं किनाऱ्यावर जात असताना एक अनोळखी तरुण वाटेत लिफ्ट मागतो. त्याच्या सहवासात नवरा-बायकोचं नातं सोलून निघतं आणि वरवर सुखी वाटणाऱ्या जोडप्याच्या आतला अस्वस्थ, अतृप्त आणि असुरक्षित गाभा उघडा पडतो. वरवर पाहता सभ्य वाटणारे स्त्रीपुरुष लैंगिक स्पर्धेसारख्या आदिम गोष्टीसाठी पाशवी पातळीवर उतरताना यात दिसतात. विख्यात पोलिश दिग्दर्शक रोमान पोलान्स्कीचा हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट होता.

‘रोड मूव्ही’च्या माध्यमातून स्त्री-पुरुष नातेसंबंधातल्या वैश्विक तणावांवर टिप्पणी करणारे हे दोन्ही चित्रपट होते. मानवजातीविषयी वेगळ्या प्रकारे टिप्पणीही या विधेतून झाली आहे. उदा: ‘डिलिव्हरन्स’मध्ये (१९७२) निसर्गाविषयी रम्य कल्पना असणारे शहरी मित्र नदीत होडी टाकून सहलीला निघतात. निसर्ग रुद्र असतो आणि माणसंही भयावह असू शकतात याचा साक्षात्कार त्यांना होतो. श्रेष्ठत्वाच्या गैरवाजवी कल्पनेतून मनुष्य निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याच मर्यादा कशा उघड पडतात हे ‘डिलिव्हरन्स’ दाखवतो. पाण्यावरच्या प्रवासाच्या मिषानं वसाहतवादाच्या विरोधात टिप्पणी करणारे आणि मनुष्याच्या वेगळ्या मर्यादा दाखवणारे काही वेगवेगळ्या कालखंडात घडणारे चित्रपट:

Aguirre - Werner Herzog

अगिरे, द रॉथ ऑफ गॉड (१९७२) हा वेर्नर हर्त्झॉग दिग्दर्शित चित्रपट नव्या जगात (दक्षिण अमेरिकेत) सोन्याच्या शोधात स्पॅनिश सैन्य दाखवतो. खडतर परिस्थितीत तराफ्यावरून प्रवास करत ते एल डोराडोचा शोध घेतात. पोट ढवळून काढणारी खास जर्मन अशी उग्र शैली यात आहे. याच हर्त्झॉगनं पुढे 'फित्झ्काराल्डो'मध्ये (१९८२) दक्षिण अमेरिका आणि नदीतला प्रवास हीच पार्श्वभूमी कायम ठेवली आणि एक अख्खं जहाज पर्वतावर चढवून नेणाऱ्या वेड्या व्यापाऱ्याची गोष्ट सांगितली. तिलाही वसाहतवादाची पार्श्वभूमी होती. कष्टमय कामांसाठी हाताखालच्या गोऱ्या किंवा नेटिव्ह लोकांना गुरासारखं वागवणारी आणि आपल्या ध्येयापलीकडे काही न दिसणाऱ्या राक्षसी महत्त्वाकांक्षेची ही उग्र माणसं पाहून नाझी विचारसरणीची आठवण होते. ‘डिलिव्हरन्स’प्रमाणे या दोन चित्रपटांतही निसर्गावर मात करण्याची मनुष्याची आकांक्षा दिसते आणि त्या धडपडीत मनुष्यस्वभावाचं मनोज्ञ पण खेदजनक दर्शन घडतं. क्लाउस किन्स्की हा प्रख्यात जर्मन नट दोनही चित्रपटांत अविश्वसनीय अभिनय करतो.

Apocalypse Now - Francis Ford Coppola

'गॉडफादर' फ्रान्सिस फोर्ड कोपोलाचा 'अ‍ॅपोकॅलिप्स नाऊ' (१९७९) – बेल्जिअन काँगोमध्ये घडणार्‍या जोसेफ कॉनरॅडच्या 'हार्ट ऑफ डार्कनेस' या कादंबरिकेचं हे आधुनिक रूप आहे. व्हिएतनाम युद्ध आणि अमेरिकन सैनिक या पार्श्वभूमीवर केलेलं एक प्रभावी माध्यमांतर म्हणून याला गणलं जातं. वसाहतवाद संपला नसून तो वेगळ्या स्वरूपात आला आहे हे दाखवायला 'हार्ट ऑफ डार्कनेस'च्या गाभ्याशी असणारा नदीतला प्रवास उपयोगी पडतो. डोकं भंजाळून टाकणाऱ्या युद्धाचा परिणाम झालेल्या माणसांच्या तोंडचे हे संवाद पाहा:

I love the smell of napalm in the morning. You know, one time we had a hill bombed, for 12 hours. When it was all over, I walked up. We didn't find one of 'em, not one stinkin' dink body. The smell, you know that gasoline smell, the whole hill.

We train young men to drop fire on people, but their commanders won't allow them to write "fuck" on their airplanes because it's obscene!

I watched a snail crawl along the edge of a straight razor. That's my dream; that's my nightmare. Crawling, slithering, along the edge of a straight razor... and surviving.

निसर्गावर स्वार होऊ पाहणारा पण त्यात हेलपाटे खाणारा माणूस आणि आपल्याहून निम्न दर्जाच्या माणसांवर सहज वर्चस्व गाजवू असं मानणारा पण त्यातही भ्रमनिरास पत्करणारा माणूस यांच्या मिश्रणामुळे या चित्रपटांचा प्रभाव अधिक पडतो.

आता आणखी काही वेगळे चित्रपट पाहू:

Wild Strawberries - Ingmar bergman

वाईल्ड स्ट्रॉबेरीज (१९५७) - आयुष्याच्या अखेरीला एक सन्मान स्वीकारायला निघालेला प्राध्यापक प्रवासात एकीकडे आपल्याच पूर्वायुष्यातले प्रसंग जणू इतरांच्या आयुष्यात घडताना पाहतो आणि त्यामुळे जाग्या झालेल्या आठवणींतून हळूहळू आपल्या पूर्वायुष्याला सामोरा जातो. मानवी नातेसंबंधांच्या प्रभावी आणि नाट्यमय चित्रणासाठी प्रख्यात असणारा स्वीडिश दिग्दर्शक इंगमार बर्गमन यानं यात एकाच वेळी दोन प्रवास दाखवले आहेत. प्रत्यक्षातल्या प्रवासात भेटत जाणाऱ्या माणसांत प्रोफेसरला मूलभूत मानवी प्रवृती दिसतात. उदा: कटू पण अपरिहार्य विवाहसंबंधांत आयुष्य वाया घालवणाऱ्या एका नवऱ्याचे हे उद्गार पाहा:

Me and my wife are dependent on each other. It is out of selfish reasons we haven't beaten each other to death a long time ago.

समोर घडणाऱ्या मानवी स्वभावाच्या दर्शनामुळे वृद्ध प्राध्यापकाच्या मनात उसळलेल्या आठवणींच्या माध्यमातून आपल्या आयुष्याचं सिंहावलोकन तो करतो. हा त्याच्या मनातला, स्मृतींद्वारे केलेला प्रवास असतो. इतकं आयुष्य जगून अखेर आपल्याला काही गवसलं का? अन् आपण काय गमावलं? असे प्रश्न स्वत:च्या मनात पडत प्रोफेसर अंतर्मुख होतो. गंभीरपणे सिनेमाकडे पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक न चुकवण्यासारखा अनुभव आहे.

Pierrot le Fou - Jean-Luc Godard

पिएरो ल फू (१९६५) - जाँ-ल्यूक गोदार या 'फ्रेंच न्यू वेव्ह'च्या बिनीच्या शिलेदाराचा हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. एक मध्यमवर्गीय विवाहित माणूस अचानक सर्वस्व सोडून आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीबरोबर निघतो. साहित्य, तत्त्वज्ञान आणि अभिजात चित्रकलेपासून ते कॉमिक्सचे झगझगीत रंग असे अनेक दृश्यघटक गोदार वापरतो. त्यात व्हिएतनाम युद्धाचे राजकीय संदर्भ येतात आणि पोलीस-गुंड-पाठलाग असे लोकप्रिय रोड मूव्हीचे घटकसुद्धा आहेत. अशा अनेक गोष्टींनी संपृक्त अशी शैली आणि खास फ्रेंच म्हणता येईल अशी रोमँटिक संवेदना यांतून आयुष्याच्या निरर्थकतेविषयीचं काव्यात्म भाष्य गोदार इथे करतो. रोड मूव्हीत अनेकदा पोलिसांपासून पळणारे लोक दाखवतात, पण गोदार त्यांना तत्त्वचिंतन करायला लावतो. उदा: हा संवाद पाहा:

Ferdinard: I wonder what's keeping the cops. We should be in jail by now.
Marianne: They're smart... They let people destroy themselves.

यानंतर वीकेंड (१९६७) या चित्रपटात गोदारनं पुन्हा एकदा रोड मूव्हीची विधा वापरली. एका मध्यमवर्गीय जोडप्याचा वीकेंडसाठी शहराबाहेर जाण्याचा प्रवास वापरून त्यानं १९६८च्या चळवळीत प्रकर्षानं पुढे आलेली मध्यमवर्गीय समाजावरची टीका कानफटात मारल्यासारख्या तीव्रतेनं त्यात दाखवली आहे. यातलं एक उद्धृत:

From French Revolutions to Gaullist weekends, freedom is violence.

Taste of Cherry - Abbas Kiarostami

टेस्ट ऑफ चेरी (१९९७) – इराणी चित्रपटांना जागतिक प्रतिष्ठा देणाऱ्या अब्बास किआरोस्तामी या दिग्दर्शकाचा हा चित्रपट आहे. यात एक माणूस फिरतो आहे. त्याला आत्महत्या करायची आहे, पण आपण मेल्यावर कुणीतरी आपल्याला विधीवत पुरावं एवढीच त्याची अखेरची इच्छा आहे. अशा माणसाच्या शोधातली ही भटकंती आहे. मध्यवर्ती व्यक्तिरेखेला नक्की मरावंसं का वाटतंय, किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे यात अजिबात न पडता निव्वळ त्याला भेटणाऱ्या माणसांमधून मानवी अस्तित्वाचा, माणसानं का जगावं याचा शोध घेणारा अतिशय वेगळा रोड मूव्ही.

Stalker - Andrei Tarkovsky

स्टॉकर (१९७९) – इच्छापूर्ती करणारी कामधेनू किंवा कल्पवृक्ष अशा कल्पनांचं माणसाला आकर्षण असतं. अशी कल्पना केंद्रस्थानी ठेवून रशियन दिग्दर्शक आंद्रे तारकॉव्स्की एक अनोखा अनुभव यात देतो.

तारकॉव्स्कीनं यापूर्वी आंद्रे रुबल्येव (१९६६) या चित्रपटामध्ये मध्ययुगीन काळातल्या एका चित्रकाराचा प्रवास आणि त्यातून घडत जाणारी त्याची सर्जनशीलता आणि जाणीव यांचं विलक्षण परिणामकारक चित्रण केलं होतं. एकाच विधेचा एकाच दिग्दर्शकानं इतक्या वेगळ्या पद्धतीनं वापर केला आहे की स्टॉकर पाहून अचंबा वाटतो.

जिथे माणसाच्या अंतर्मनातल्या इच्छा पूर्ण होतात अशी एक जागा आहे आणि त्या जागेच्या शोधात एक लेखक आणि एक प्राध्यापक चालले आहेत. त्यांच्या सोबतीला एक वाटाड्या आहे. गंमत अशी आहे की नक्की कोणती इच्छा पूर्ण होईल यावर कुणाचं नियंत्रण नसतं. त्यामुळे इच्छापूर्ती ही आपल्याला हवी तशीच होईल असं नाही; किंबहुना आपल्या गैरसोयीची पण आपल्या अंतर्मनात असणारी इच्छा पूर्ण होईल अशी भीती वाटाड्या घालत असतो. गूढवादी, धूसर पण काव्यात्म असं वातावरण आणि तिघा पात्रांची तत्त्वचिंतनात्मक चर्चा यामुळे अनेकांना कोड्यात पाडणारा पण भुरळ घालणारा असा हा विलक्षण चित्रपट आहे.

Stalker - Andrei Tarkovsky

मासल्यादाखल त्यातली दोन उद्धृतं:

A man writes because he is tormented, because he doubts. He needs to constantly prove to himself and the others that he's worth something. And if I know for sure that I'm a genius? Why write then? What the hell for?

(काव्यांश):

I love your eyes, my darling friend,
Their play so passionate and brightening,
When a sudden stare up you send,
And like a heaven-blown lightning,
It'd take in all from end to end
But there's more that I admire:
Your eyes when they're downcast
In bursts of love-inspired fire
And through the eyelash goes fast
A sombre, dull call of desire...

कधी एखाद्या ध्येयाच्या ध्यासानं झपाटून, कधी दिशाहीन तर कधी प्रसंगोपात अशा वेगवेगळ्या प्रकारचा प्रवास करणारी माणसं दाखवणाऱ्या आणि त्या मिषानं जीवनदर्शन घडवणाऱ्या काही चित्रपटांचा धावता आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न होता. एकाच विधेच्या माध्यमातून जगभरातल्या अनेक दिग्दर्शकांच्या सर्जनशीलतेचे विविध पैलू त्यातून ओझरते का होईना पण दिसले असतील अशी आशा आहे. इतक्या वर्षांनंतर आणि इतक्या प्रकारे वापरून झाल्यावर अजूनही अवीट अशा या विधेकडे जुन्यानव्या दिग्दर्शकांना पुन्हापुन्हा वळावंसं वाटत राहतं. या सातत्यातून तिची ताकद आणि तिची अभिजातता दिसत राहते.
(समाप्त)

टीपः पहिल्या भागात केलेलं आवाहन अजूनही लागू आहे: इतरांनी आपल्या आवडीनुसार यात भर घातली आणि त्या चित्रपटात आपल्याला काय भावलं हे सांगितलं तर आवडेल. धन्यवाद.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

फारसे गम्य नसलेला विषय, तरीही लेखकाने दोनदा केलेले आवाहन पाहून आणि मला आवडलेल्या एका चित्रपटाबद्दल अजून कुणीच लिहिले नाही म्हणून हा प्रपंच.

प्रथमतः, रोड मूव्ही हा genre एवढा व्यापक आहे का, याबद्दल साशंक आहे. 'प्रवासविषयक चित्रपट' या अनाम पण अस्तित्वात असलेल्या एका genre चे वर्णन करण्यासाठी 'रोड मूव्ही' या चिमुकल्या चित्रपटप्रकाराला आहे त्यापेक्षा व्यापक स्वरूप देण्यात येत आहे असे वाटते. माझ्या माहितीप्रमाणे रोड मूव्ही हे विशेषण शब्दशः वापरले जाते. म्हणजे प्रामुख्याने 'रोड' च्या प्रवासात घडणारा चित्रपट, तोही 'सडक' या अर्थाने. नाहीतर 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' सिरिज, आईस एज सिरीज इत्यादिंनाही रोड मूव्हीज म्हटले जाऊ शकते. (नेटफ्लिक्स इ. वर 'रोड मूव्ही' असे काही genre नसावे!)

असो. या प्रतिसादाचे मुख्य कारण म्हणजे 'रेन मॅन' बद्दल काही खरडणे. टॉम क्रुझ आणि डस्टिन हॉफमन यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट बहुतेकांना माहित असावा. नसल्यास जरूर पहावा. आपल्या श्रीमंत पण कठोर बापाशी खटका उडाल्यामुळे किशोरवयातच घरातून पळून गेलेला चार्ल्स बॅबिट सध्या धंद्यात चांगलाच गोत्यात आला आहे. तशात त्याला आपले वडिल गेल्याची बातमी मिळते आणि तो त्यांच्या संपत्तीवर हक्क सांगण्यासाठी परततो. जेव्हा मृत्यूपत्राचे वाचन केले जाते तेव्हा त्याला चांगलाच धक्का बसतो. स्वतःला वडिलांचा एकुलता एक मुलगा समजणार्‍या चार्ल्सला, आपल्याला एक मतिमंद थोरला भाऊ आहे आणि आपल्या वडिलांनी सर्व संपत्ती त्याच्या विश्वस्तांकडे देऊन आपल्यासाठी फक्त एक 'क्लासिक कार' (जिच्यावरूनच त्यांच्यात खटका उडाला असतो) ठेवली आहे, असे कळते. कायदेशीर लढा देऊन आपला वाटा मिळवण्यासाठी तो आपल्या भावाचे अपहरण करून आपल्या गावी परतायला निघतो. पण विमानप्रवासाला घाबरणारा रेमंड (डस्टिन हॉफमन) त्याला रस्त्यावरून, तेही हायवेचा वापर न करता सिनसिनॅटी ते लॉस एंजेलिस हे अंतर कापण्याला भाग पाडतो, आणि दोघे अनोळखी भाऊ (आणि 'ती' गाडी) या प्रवासाला निघतात.

या तीनचार दिवसांच्या प्रवासात दोघांचे (खरे तर चार्ल्सचे) आयुष्य कसे बदलून निघते, ते निव्वळ पाहण्यालायक. आपला भाऊ नुसताच मतिमंद नसून अतिमानवी स्मरणशक्ती असलेला आहे (autistic savant) हे चार्ल्सच्या लक्षात येते. या गोष्टीचा आर्थिक फायदा करून घ्यायचा तो प्रयत्न करतो. त्यात त्याला आपल्या भावाची आणि स्वत:चीही नवी ओळख होते.

डस्टिन हॉफमनला यात अभिनयाचे ऑस्कर मिळाल्याचे स्मरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या माहितीप्रमाणे रोड मूव्ही हे विशेषण शब्दशः वापरले जाते. म्हणजे प्रामुख्याने 'रोड' च्या प्रवासात घडणारा चित्रपट, तोही 'सडक' या अर्थाने.

मला हे पटत नाही. विकिपीडियावर रोड मूव्ही शोधलं तर खालील माहिती मिळते.
A road movie is a film genre in which the main character or characters leave home to travel from place to place. They usually leave home to escape their current lives.
---------------
The genre has its roots in spoken and written tales of epic journeys, such as the Odyssey and the Aeneid. The road film is a standard plot employed by screenwriters. It is a type of bildungsroman, a story in which the hero changes, grows or improves over the course of the story.

माझ्या पहाण्यातला एक अतिशय सुंदर सिनेमा हा रोड मूव्ही आहे. हा सिनेमा मी जवळपास रोज बघतो त्यामुळे थोडी अतिपरिचयादवज्ञा झाली आहे. सिनेमाचं नाव आहे फाइंडिंग निमो. मर्लिनचा मुलगा, निमो हरवतो. त्याला शोधण्यासाठी तो आपलं कोतं आयुष्य सोडून बाहेर पडतो. त्याच्या जीवनाला आसपासच्या विषयीच्या भीतीच्या मर्यादा असतात. पण मुलाला शोधण्याच्या जिद्दीपायी तो अनेक संकटांना सामोरं जातो. या प्रवासात त्याला डोरीची साथ मिळते. शेवटी या प्रवासामुळे तो स्वतः तर बदलतोच, पण त्याचं त्याच्या मुलाशी असलेलं नातंही सुदृढ होतं.

त्याचा हा प्रवास मात्र सडकेवर होत नाही. जमिनीवरही होत नाही. कारण तो एक मासा असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्या भागापेक्षा ह्या भागातिल सिनेमे जास्त आवडतिल असे वाटते. 'अ‍ॅपोकॅलिप्स नाऊ' तर उत्तमच, वर नमुद केलेले संवाद झकास. मार्लन ब्रँडो उत्कृष्ठ. बाकिचे सिनेमे पाहिन म्हणतोय, नविन सांगण्यासारखे माझ्याकडे काही नाही.

माहितीबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आढावा. यातले बरेचसे चित्रपट पाहिलेले नाहित बघायला सुरवात केली पाहिजे

टेस्ट ऑफ चेरी हा इराणी चित्रपट.. अतिशय सुंदर मात्र केवळ तो प्रवास करत असतो म्हणून 'रोड मुव्ही' या सदरात टाकला जाऊ नये असं वाटतं. मृत्यू-आत्महत्या या कल्पनांभोवती फिरणारा हा चित्रपट अतिशय परिणामकारक आहे. मागे मिपावर या चित्रपटाबद्दल लिहिले होते. आता अचानक हापिसातून मिपा अ‍ॅक्सेसस होणे बंद झाले आहे Sad त्यामुळे दुवा देऊ शकत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>रोड मूव्ही हा genre एवढा व्यापक आहे का, याबद्दल साशंक आहे. 'प्रवासविषयक चित्रपट' या अनाम पण अस्तित्वात असलेल्या एका genre चे वर्णन करण्यासाठी 'रोड मूव्ही' या चिमुकल्या चित्रपटप्रकाराला आहे त्यापेक्षा व्यापक स्वरूप देण्यात येत आहे असे वाटते. माझ्या माहितीप्रमाणे रोड मूव्ही हे विशेषण शब्दशः वापरले जाते. म्हणजे प्रामुख्याने 'रोड' च्या प्रवासात घडणारा चित्रपट, तोही 'सडक' या अर्थाने.

>>टेस्ट ऑफ चेरी हा इराणी चित्रपट.. अतिशय सुंदर मात्र केवळ तो प्रवास करत असतो म्हणून 'रोड मुव्ही' या सदरात टाकला जाऊ नये असं वाटतं.

'रोड मूव्ही' या विधेचा फक्त रस्त्यावरचा प्रवास असा शब्दशः अर्थ चित्रपट अभ्यासक घेत नाहीत. उदा: बर्कले विद्यापीठातल्या 'मीडिआ रिसोर्स सेंटर'ची ही यादी पाहा. यात आणि माझ्याही यादीत असलेला 'डिलिव्हरन्स' हा प्रामुख्यानं नदीवरचा प्रवास आहे. फ्रेंच विकीपिडिआच्या 'रोड मूव्ही' पानावर 'टेस्ट ऑफ चेरी' आहे. ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटच्या 'वाइल्ड स्ट्रॉबेरीज'विषयीच्या पानावरून घेतलेलं हे उद्धृत पाहा:

Bergman [...] strikes out for a new form of intellectual cinema characterised by probing into the nature of existence. Wild Strawberries also became a model for the road movie.

>>नेटफ्लिक्स इ. वर 'रोड मूव्ही' असे काही genre नसावे!

'नेटफ्लिक्स'चं माहीत नाही, पण 'आलोसिने' या सिनेमाविषयक लोकप्रिय फ्रेंच संकेतस्थळावर अशी जाँर आहे: http://www.allocine.fr/tags/tag-24/films

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ते जाउ द्या. हे इतके सगळे बघायचे कसे व कुठे याबाबत मार्गदर्शन करा जेणेकरुन लोक योग्य त्या चित्रपट महोत्सव, फिल्मक्लब इ. ठिकाणी हजेरी लावू शकतील.

माझा सिनेप्रवास असा रोड मुव्ही आपलं लेख असेल तर खरच वाचायला आवडेल. असल्यास दुवा द्या. नसल्यास कृपया खरच यावर एक लेख लिहा राव. लोक खरी प्रवासयात्रा ते खाद्यप्रवास/यात्रा, वगैरे लिहतात तुम्ही तुमचा सिनेप्रवास लिहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.

'स्टॉकर' बघायला घेतला होता. पहिला एक तासाचा चित्रपट दोनदा पाहिला, मग दमले आणि ठेवला. बाकीचे चित्रपटही पाहिलेले नाहीत. पण एक-ना-एक दिवस न दमता नक्की बघेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पहिल्या भागाइतकाच हाही भाग प्रभावी झाला आहे तो खास करून "डिलिव्हरन्स" मुळे. मी पाहिला आहे आणि ज्या काळात जॉन व्हाईट, बर्ट रेनॉल्ड्स, नेड बेट्टी या नावांना कसलेही वलय नव्हते त्या काळातील हा 'ट्रेंड सेटर रोड मूव्ही' मानला गेला. आजही ज्या ज्या वेळी '१०० बेस्ट मूव्हीज' च्या याद्या जाहीर होत असतात त्या त्या ठिकाणी "डिलिव्हरन्स" ला स्थान मिळतेच मिळते. फार अंगावर येणारा हा रोड मूव्ही (जरी प्रवास नदीच्या पात्रातून असला तरी) आहे. ~ चार मित्रांपैकी एकावर जंगलात दोन रानटी रक्षकांकडून आळीपाळीने झालेला बलात्कार पाहताना प्रेक्षक सुन्न होऊन जातात.

तिच गोष्ट क्लॉऊस क्लिन्सी अभिनीत दोन्ही चित्रपटांची. [क्लॉऊसला मी ज्यावेळी "डॉ.झिव्हागो" मध्ये एका छोट्याशा रोलमध्ये - रेल्वेतील प्रवासीकैदी - पाहिले होते त्यावेळीही तो मला भावला होतो. नंतर त्याला 'फित्झ्काराल्डो'मध्ये पाहिल्यावरही 'झिव्हागो'चीच प्रथम आठवण आली.]

या लेखात उल्लेख नसलेल्या एका फ्रेन्च 'रोड मूव्ही' या चित्रपटाची तीव्रतेने आठवण होत आहे. "वेजेस ऑफ फीअर". १९५३ (जवळपास ६० वर्षे होत आली) चा हा जबरदस्त ब्लॅक अँड व्हाईट थ्रिलर फ्रेन्च चित्रपट. रोड मूव्हीजच्या यादीत अग्रक्रमाने घ्यावा असाच. "एम्पायर" या प्रसिद्ध सिनेमॅगेझिनच्या शतकातील "टॉप १००" मध्ये थेट ९ व्या क्रमांकावर स्थान मिळालेला हा चित्रपट त्यातील चित्रीकरणाने आजही अंगावर शहारे आणतो. दक्षिण अमेरिकेतील एका ओसाड वाळवंटी अशा गावात कामाच्या शोधार्थ भटकणारी माणसे. अमेरिकेने त्या भागात तेल उत्थखनन सुरू केले आहे आणि त्या तेलविहिरींना एके दिवशी अपघाताने आग लागते. ती आग स्फोटाने दडपून टाकणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे नायट्रोग्लिसरीन या अत्यंत घातकारी रसायनाच्या बुधल्या त्या पेटत्या विहिरीकडे घेऊन जाण्यासाठी जीवाच्या भीतीने कुणी तयार होत नाही. त्यामुळे कंपनी जादा दराचे आमीष दाखवून दोन ट्रक्ससाठी चार जिगरबाज युवकांना तयार करते. ते चौघे ते एक आव्हान म्हणूनही काम स्वीकारतात. त्या कामाच्या भीतीपोटी मिळणारा मोबदलाही त्याना आकर्षित करीत असतोच - हेच ते "Wages of Fear". पहिल्या भागात प्लॉटची उभारणी आणि दुसर्‍या भागात गाव ते वाळवंतातील आग लागलेली तेलविहिर इथपर्यंतचा दोन ट्रक्समधील प्रवास आणि त्या दरम्यान चौघांना येणारे अनुभव हा या रोड मूव्हीचा कथापटल, जो चित्रपट पाहूनच अनुभावयाला हवा. फ्रान्सच्या चित्रपट इतिहासातील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटापैकी हा एक मानला जातो.

'वेजेस ऑफ फीअर' चित्रपटातील खालील दोन दृश्ये या संदर्भात पुरेशी बोलकी आहेत :
W1

W2

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला.

एक असे लक्षात आले, की "प्रवास-चित्रपट" मध्ये चित्रपट या माध्यमाचे काय वैशिष्ट्य आहे, याबाबत फारशी चर्चा झालेली नाही. उदाहरणे सर्व चित्रपटांतलीच आहेत, पण चर्चा प्रवास आणि पात्राचा स्वभाव याबाबत आहे.

त्यामुळे "प्रवास-कथानक, एक अभिजात विधा, उपशीर्षक : चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट उदाहरणे" असाही लेख वाचता येतो. अर्थातच सुरुवातीला दिलेला होमरचा दाखला मग पुरता सुसंबद्ध होतो.

त्याच प्रमाणे "तीसरी कसम" चित्रपटाचा आधार असलेली फणीश्वरनाथ रेणूंची दीर्घकथा, दण्डीचे दशकुमारचरित, सिंदबादच्या सफरी, पिल्ग्रिम्स प्रोग्रेस, ... हे सर्वच या विधेत येतात. सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवास आहे - घटनाक्रमाला कार्यकारणभाव नसतो, पण त्यामुळे पात्राच्या स्वभावात होणार्‍या बदलाला कार्यकारणभाव असतो. पात्राचा स्वभाव बदलतोच असे नाही - पण पात्राच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू रसिकाला दिसू लागतात, ते पैलू एकसंध असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'वेजेस ऑफ फीअर' आणि त्याचा दिग्दर्शक क्लूझो हे दोन्ही मला प्रिय आहेत. 'फ्रेंच हिचकॉक' अशी क्लूझोची ओळख आहे. उत्कंठावर्धक आणि तरीही गंभीर चित्रपट कसे बनवावेत त्याचा उत्तम धडा 'वेजेस ऑफ फीअर'मध्ये मिळतो. त्यातही वसाहतवादावर टिप्पणी आहे आणि कुठल्यातरी कॉर्पोरेट/कॉन्ग्लॉमरेटसाठी जीव धोक्यात घालणारे सर्वसामान्य कामगार आहेत. क्लूझोचाच 'डायबोलिक' चित्रपट पाहावा अशीही शिफारस करेन. गंमत म्हणजे हिचकॉकनं अनेकदा क्लूझोकडून कल्पना चोरल्या. तुम्ही दिलेला तेलात माखलेल्या नायकाचा फोटो आणि नंतर आलेल्या 'अ‍ॅपोकॅलिप्स नाऊ' मधला चार्ली शीन यांच्यातही साम्य आहे:

Apocalypse Now

>>"प्रवास-चित्रपट" मध्ये चित्रपट या माध्यमाचे काय वैशिष्ट्य आहे, याबाबत फारशी चर्चा झालेली नाही. उदाहरणे सर्व चित्रपटांतलीच आहेत, पण चर्चा प्रवास आणि पात्राचा स्वभाव याबाबत आहे.

आक्षेप अगदीच मान्य. यांतले बरेचसे चित्रपट वाचकांनी पाहिलेले आहेत असं गृहित धरता येत नाही. त्यामुळे त्यातले दृश्य घटक तपशीलात जाऊन मांडणं जरा अवघड वाटतंय. जमलं तर कधीतरी यातला एकेक चित्रपट सुटा घेऊन त्याबद्दल तपशीलवार मांडणी करण्याचा प्रयत्न करेन. मार्मिक प्रतिसादाबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अलीकडेच ऐकलेल्या एका रेडिओ कार्यक्रमावरून ही लेखमाला आठवली, म्हणून हे किंचित उत्खनन -

'इल सोर्पासो' या जुन्या चित्रपटाविषयी:

Yet Risi wasn't making an Italian buddy comedy. Like all the best road movies, Il Sorpasso uses its journey to reveal a whole culture. Risi offers a brilliant snapshot of the boom years when poor, war-ravaged Italy suddenly became a go-go nation where the economy boomed, people bought cars and took beach holidays, and everyone wanted to have fun — everywhere you look in this movie somebody's doing the Twist. Where Roberto's dutifulness smacks of Italy's joyless '50s, Bruno embodies the '60s' new prosperity and recklessness. We watch him blow by earlier forms of Italian transportation: bicycles; Vespas, sidecars; cheap, sensible Fiats.

संपूर्ण लेख येथे - http://www.npr.org/2014/05/08/310718214/two-italys-take-a-road-trip-in-i...

थोडे अवांतर - La grande bellezza या चित्रपटात केलेला 'Costa Concordia' बोटीच्या अपघाताचा एक सूचक रूपक म्हणून वापर या संदर्भात आठवून गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0