बंडू नि दिगू चोर पकडतात

"काय, बंडू कसा आहेस"? आपला मित्र दिगू घरी आलेला पाहून बंडूला आनंद झाला. बंडूची बायको गीता हि माहेरी गेली होती. बंडू घरी एकटाच होता. हल्लीच्या दिवसात बंडू नि दिगू राहत असलेल्या विभागात चोऱ्यांचे प्रमाण फारच वाढले होते. चोर हे भुरटे होते जे हाती मिळेल ते घेवून ते पोबारा करत. ह्या चोरांचा बंदोबस्त कसा करावा ह्या विचारात सारे पडले होते. आज रविवारचा दिवस ह्या चोरांना कसे पकडायचे ह्याबद्दल बंडूच्या चाळीत मिटिंग होती. बंडू मिटींगला निघायच्या तयारीत असतानाच दिगू आला होता. बंडूने दिगुलाही बरोबर घेतले नि ते मिटिंगस्थळी पोहचले.

मिटिंगचे स्थळ म्हणजे एक पालिकेचे मैदान होते त्यात असलेल्या भल्या मोठ्या पिंपळा खाली मिटिंग भरली होती. सारेजण तावातावाने आपले म्हणणे मांडत होते. पोलीस कम्प्लेंट झाल्या होत्या पण चोर काही कुणाला सापडत नव्हते. कचर्याचा डब्बा, चपला, लहान सहान वस्तू अश्या बारीक सारीक चोऱ्या होत होत्या.

साठेकाका रविवारी मटण आणायला गेले मटणाची पिशवी सायकलला लटकावून ते लिंबू घ्यायला गेले. चांगलीच घासाघीस करून दहा मिनिटे वितंडवाद घालून साठेकाकानी पाच रुपयात चार लिंबू खरेदी केले नि खुशीने सायकलकडे वळले तर सायकलला लावलेली मटणाची पिशवी गायब. साठेकाकांचा डोळ्यावर विश्वास बसेना त्यांनी डोळे चोळून पाहिले पण मटणाची पिशवी गायब झाली होती. एकदा आपल्या हातातील लिंबाकडे नि एकदा सायकलच्या दांड्याकडे पाहत साठे काका म्हणाले, 'हे तर गड आला पण सिंह गेल्यासारखेच झाले. लिंबू आले, 'पण मटन गेले'. चारशे रुपये किलोवाले एक किलो मटन गेल्याने साठेकाकांना चांगलाच धक्का बसला. आज मटणाच्या जागी घरी आपलाच खिमा होणार अशी त्यांची खात्री झाली. त्या रविवारी सर्वत्र झणझणीत मटणाचा खमंग वास येत असताना वरण भात नि बायकोच्या पोटभर शिव्या साठेकाकांना खाव्या लागल्या. स्वस्त मिळालेला लिंबू मटणाच्या रस्स्यात पिळण्याएवजी त्याचे सरबत पिवून त्यांना झोपावे लागले.

सर्वात मोठा फटका बसला होता तो घारूअण्णांना. घारूअण्णा ब्रम्हचारी शनिवारी ते सारे कपडे धुवून टाकत नंतर तेच ते आठवडाभर वापरात. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे घारूअण्णांनी सगळे कपडे धुवून टाकले. त्यांनी एक नवी बंडी नि नि पायजमा घेतला होता तो हि त्यांनी धुवून टाकला. सारे कपडे सार्वजनिक ग्यालरीत वाळत टाकून नेहमीप्रमाणे बनियन नि बर्मुडा ह्या वेशात ते झोपायला गेले. सकाळी घारूअण्णांच्या शिव्यांनी चाळीला जाग आली. बंडूने उठून पाहिले तर बनियन नि बर्मुडा ह्या वेशातले शिव्या गाळ करणारे घारूअण्णा त्याला दिसले.बंडूचे नि घारूअण्णाचे चांगले जमायचे, काय झाले त्याची बंडूला कल्पना नव्हती घारूअण्णा नि त्यांच्या भोवती जमलेले चाळकरी बनियन नि बर्मुडा ह्या वेशात त्यांची चाललेली शिवीगाळ हे पाहून बंडूला वाटले कि त्यांचा कुणाशीतरी झगडा सुरु असेल बंडू तसाच आला नि घारूअण्णांना म्हणाला, 'अण्णा, ते बाकीचे जावू द्या आधी घरात जावून कपडे घालून या. कसा वाटतोय तुमचा अवतार.' ह्यावर घारूअण्णा बंडूकडे खावू कि गिळू नजरेने बघू लागले. नंतर बंडूला कळाले कि घारूअण्णांचे सारे कपडे चोरीला गेलेय नि आता अंगावर असलेला बर्मुडा नि बनियन इतकेच कपडे त्यांच्याकडे उरलेय.अशा प्रकारे चोराने अनेकांना उपद्रव दिला होता.

बऱ्याच जणांचे कचऱ्याचे डब्बेही चोराने पळवले होते. बंडू हि हल्ली ह्या चोराच्या उपद्रवामुळे सावध राहू लागला होता. त्याचा कचऱ्याचा डब्बाही दारातच ठेवी डब्बा चोरीला जावू नये म्हणून बंडूने त्या डब्ब्याला एक होल पाडून त्यात साखळी घालून ठेवली नि साखळीला खिडकीला बांधून कुलूप लावून टाकले. ज्याप्रमाणे एखाद्या घराबाहेर बांधलेला कुत्रा असतो तसा आपला कचऱ्याचा डब्बा बंडू बांधून ठेवू लागला. आपल्या ह्या कल्पनेवर तो बराच खुश होता. आजूबाजूला दोन तीन डब्बे पळवण्यात आले पण बंडूचा डब्बा तसाच होता.बंडूने घारूअण्णांच्या प्रकरणापासून धडा घेवून बाहेर कपडे वळत घालणे, चपला बाहेर काढणे असले प्रकारही बंद केले होते.

चोरांशी मुकाबला कसा करावा ह्या विषयी चाळकरयाची चर्चा सुरु झाली. बनियन नि बर्मुडावर बसलेले घारूअण्णा सार्यांचे लक्ष वेधून घेत होते.बंडूला वकृत्वाची आवड अगदी लहानपणापासून होती मोठा झाल्यापासून तर ती विलक्षण रीतीने वाढली होती. त्याची वकृत्वाची आवड इतकी होती कि कुणी त्याला गप्प करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो गप्प होत नसे. आज जी संधी आली होती त्यात आपल्याला वकृत्वगुण दाखवायला चांगलाच वाव आहे हे बंडूने हेरले. बंडू सुरु झाला त्याने घारूअण्णांना उभे केले नि म्हणाला, 'बघा, चोरामुळे कशी अवस्था झालीय घारूअण्णांची. चोर मजेत त्यांनी विकत घेतलेले, धुतलेले कपडे घालून फिरत असेल नि इकडे घारूअण्णा मात्र बनियन नि बर्मुडा घालून बसलेत. मधुकाकांच्या सायकलची सीट चोराने चोरून नेली, ते त्यांना उशिरा कळले म्हणून आज त्यांच्या सारख्या हेल्दी माणसाला सारख्या डॉक्टरकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत'.साऱ्यांच्या नजरा मधुकाकांकडे वळल्या झक मारली नि मिटींगला आलो असे मधुकाकांना झाले.'ते, काही नाही ह्या चोराचा बंदोबस्त झालाच पाहिजे. पोलिस काही ह्या चोरांकडे लक्ष देत नाहित त्यामुळे आपल्याला स्वतालाच काहीतरी करायला हवे. आपण स्वताच पहारा द्यायला हवा'. साऱ्यांनी बंडूची कल्पना उचलून धरली. चाळकरयांचे एक रक्षा पथक तयार करण्यात आले बंडूकडे त्याचे नेतृत्व सोपवण्यात आले.

बंडूने चाळीतली सहाजणांची टीम तयार केली. तीन जागी दोन दोन पहारेकरी बसवले नि मध्यावर तो नि दिगू पहाऱ्याला राहिले. ह्याचा चांगला परिणाम झाला दोन तीन दिवस काही चोऱ्या झाल्या नाहीत. परंतु चोर येत नाही म्हंटल्यावर हळूहळू पथकाचा उत्साह कमी होवू लागला. चौथ्या दिवशी तर पहाऱ्याला फक्त बंडू नि दिगूच आले बाकीच्यांनी निरनिराळी कारणे सांगून पहाऱ्याला येण्यापासून सुटका करून घेतली. बंडू नि दिगू सिगारेट ओढत एका झाडाखाली ल कट्ट्यावर बसून होते दोघांच्या हातात काठ्या होत्या. थंडी असल्याने बंडूने कानटोपी घातली होती. दोघांचा पहारा चालू होता.इतक्यात बाहेर काही गडबड सुरु असल्यासारखे वाटले दोघे बाहेर पाळले तेव्हा तेथे एक म्हातारा पडला होता नि त्याच्या बाजूला बसून एक लहान मुलगा रडत होता. बंडू नि दिगूने त्यांची चौकशी केली. त्या पोराने सांगितले तो नि त्याचे वडील गावाहून आलेत पण ज्या नातेवाईकाकडे जायचे त्याचा पत्ता विसरले. वडिलांना चक्कर आलीय सकाळपासून पोटात अन्नाचा दाना नाहीय. बंडूला नि दिगुला त्यांची दया आली थंडी कडाक्याची होती. त्यांनी म्हाताऱ्याला आधार दिला ह्या कडाक्याच्या रात्रीत त्यांना बाहेर बसवण्यापेक्षा बंडू नि दिगू त्यांना बंडूच्या घरी घेवून गेले. बंडूने गरमा गरम चहा बनवून बापलेकाला दिला सोबत खारी दिली नि पांघरून देवून त्यांना सांगितले तुम्ही झोपा आरामात मी नि माझा मित्र पहारा देवून येतो.

'काहीही म्हण दिगू, अशा गरिबांना मदत केलीना कि पुण्य लागत नि आपल्या मनालाही कुणाच्या तरी उपयोगी पडलो ह्याचे समाधान वाटते'.बंडूतला तत्ववेत्ता आता जागा झालाय नि त्याला रोखणे कठीण आहे हे जाणून दिगूने श्रोत्याची भूमिका स्वीकारली. .' आणि पहिल्यापासून मला समाजसेवेची आवड आणि माझ्यात भूतदयाही खूप. आम्ही शाळेत असताना तेथे एक कुत्रा होता मोत्या, चांगलाच गलेलट्ठ कुत्रा. त्याला मी नेहमी एक भाकर टाकायचो माझ्याकडे नसली कि मित्रांची घेवून टाकायचो. नियम म्हणजे नियम मित्र झगडा करायचे प्रसंगी हाथापाई व्हायची पण नियम म्हणजे नियम, कुत्र्याला भाकर मिळालीच पाहिजे भले ती आपल्या डब्यातली असो वा दुसऱ्याच्या . मित्रांना भूतदयेचे महत्व समजावून सांगायचो. अशा दोघांच्या गप्पा रंगात आल्या.

इतक्यात चाळीच्या मागून फेरफटका मारून येण्याचे दोघांनी ठरवले. दोघेही चाळीच्या मागे जावून तेथील परिस्तिथी पाहत असतानाच दोघांच्या कॉलर पकडल्या गेल्या नि कानफडात फटके बसू लागले. चारपाच कानाखाली खाल्ल्यावर बंडूच्या लक्षात परिस्तिथी आली दोन पोलिस त्यांना चोर समजून धोपटत होते. अखेर कळवळून दिगू त्यांना म्हणाला, 'अहो, एका तेरी आमच, आम्ही ह्या चाळीचे पहारेकरी आहोत'. ते ऐकून त्या पोलिसांनी मारहाण करणे थांबवले. बंडू गाल चोळत म्हणाला, 'अहो, साहेब आम्ही ह्या चाळीमध्ये चोर येवू नये म्हणून पहारा करतोय नि तुम्ही आम्हालाच कुटत सुटलात'. बंडूला कुटणारा पोलिस म्हणाला, 'अरे, अरे, माफ करा नेहमीची सवय नडली. काय विचारायच्या आधीच दोनचार फटके द्यायची सवय'. 'बर, ते जावू द्या, त्यातला दिगुला कुटणारा पोलिस म्हणाला, 'तुम्ही, एक म्हातारा नि एक लहान मुलाला जवळपास फिरताना पाहिले काय'? दिगूने विचारले का ? "अहो तेच तर चोर आहेत. आम्हाला पक्की खबर आहे कि ह्या चोऱ्या ते दोघेच करतायत. हे ऐकून भर थंडीत बंडूला घाम फुटला त्याने त्या अवस्थेत दिगुकडे पाहिले दिगुची ही तीच अवस्था होती.

दिगू पोलिसाला म्हणाला,'साहेब, चला लवकर. बंडू नि दिगू विजेच्या वेगाने घराकडे धावत सुटले पोलीसही त्यांच्यापाठी पळाले. घराजवळ येताना बंडूला दिसले कि म्हातारा नि त्याचा मुलगा घरातून बाहेर पोबारा करत आहेत बंडू जोरात ओरडला पोलिसांनी जावून झटापट करून चोरांना पकडले. बंडूने जावून चोराच्या हातून आपल्या चीजवस्तू असलेली पिशवी काढून घेतली . खाली जो गोंगाट सुरु होता तो एकूण साऱ्या चाळीला जाग आली. बंडू नि दिगूने चोर पकडले हे साऱ्यांना कळले.बंडू नि दिगू साऱ्या चाळीत एका रात्रीत हिरो झाले. चाळीतर्फे बंडू नि दिगुचा सत्कार केला जाणार होता.

दोन दिवसांनी दिगू बंडूकडे गेला तेव्हा सत्काराच्या वेळेस वाचण्याचे भाषण लिहून काढण्यात व्यस्त होता. 'काय, बंडू भाषण लिहितोस? 'अरे, मग आपण दोघांनी त्या चोरांना पकडले भाषण जोरदार व्हायलाच हवे ना'. 'पण आपण त्यांना कसे पकडले हे तुला ठावूक आठवतेय ना? दिगू गालातल्या गालात हसत म्हणाला. 'अरे ते सोड' बंडू म्हणाला, 'चोर, पकडले गेले हे महत्वाचे. हा आता त्यांचा पाहुणचार करण्यात चूक झाली हे मान्य. पण पकडलेना चोर हे महत्वाचे .

'हो हे मात्र खरे' दिगू पुटपुटला नि बंडूने लिहिलेले विररसपूर्ण भाषण वाचू लागला.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

प्रतिक्रिया

हाहाहा मस्त हो!!! विशेषतः साठेकाकांची लिंबासाठी हुज्जत अन मटन चोरीला जाणे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या छान मांडणीला ऐसीवर इतक्या कमी प्रतिक्रिया का - कोडच आहे ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पष्ट मत देतो.
कथा ठिक. शैली शाळकरी/'टिपिकल' मासिकातील कथांसारखी वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१
पण लेखक किशोरवयीन असल्यास, वा त्यांनी नवीनच लेखन करावयास घेतले असल्यास त्यांना लेखन चालू ठेवण्यास प्रोत्साहन.
लेखणी-टंकनाचा बाऊ जर गेला असेल, तर पुढील लेखनात शैलीकडे अधिक लक्ष द्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लॉल Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0