कूपमंडुक

कूपमंडूक

लेखक - झंपुराव तंबुवाले

मी मनु. नाही, तो पहिला मानव - पाश्चिमात्यांच्या अॅडम समान - नाही. त्यानंतरच्या अनेक मनुंपैकीही नाही. ज्ञात/लिखित इतिहासात पृथ्वीवरुन सोडलेल्या यानांमध्ये जन्मलेला मी पहिला मानव. त्यामुळे माझं नाव मनु ठेवलं यात काही आश्चर्य नाही. इतरांना वाटो न वाटो, पण त्यामुळे माझ्या शिरावर एक मोठी जबाबदारी आहे. ती निभावण्याकरता मला काही असाधारण पावलं उचलावी लागू शकतात. पण थांबा - तुम्हाला सगळी कथा सुरुवातीपासून सांगायला हवी. माझ्या जन्माच्या कितीतरी आधी ती सुरु होते.

त्या दिवसाची वाट कितीतरी वर्षांपासून पाहणं सुरु होतं. समुद्रतळाची कुशस्थली सापडून ११७ वर्ष झाली होती. पाच पिढ्या सरल्या होत्या पण उत्साह तितकाच होता. इलेक्ट्रॉनिक तसंच इतरही मिडियामध्ये त्याबद्दलचीच चर्चा होती.

अमुक: तु पाहणार आहेस लाइव्ह?
तमुक: अर्थातच. आयुष्यात एखादवेळीच मिळणारी संधी कोण सोडेल?

किंवा

ही: ए, काय-काय सापडेल तिथे?
ती: कळेलच काही दिवसात. पण असं म्हंटल्या जातं की तिथे अमाप संपत्ती आहे.

आजचा मुहूर्तच तसा होता. कुशस्थलीच्या शोधानंतर थोडी चाचपणी झाली होती, पण मुख्य उत्खनन मात्र आज सुरू होणार होतं. इतके दिवस थांबावं लागलं होतं कारण या आधी गुरु आणि शनि योग्य ठिकाणी नव्हते. गुरुला प्रत्येक राशीत एकएक वर्ष घालवत सूर्याची प्रदक्षिणा करायला १२ वर्षं लागतात. शनि अडीच-अडीच वर्ष लावत २७ वर्ष घेतो. त्यामुळे ते दोघंही एखाद्या विशिष्ट ठिकाणी हवे असल्यास वाट पहावी लागणारच. आणि त्या गोष्टीचं तितकं महत्व असेल तर लोक थांबणारच. त्या ११७ वर्षात सूर्याभोवती गुरुच्या जवळजवळ दहा प्रदक्षिणा झाल्या होत्या, आणि शनिमहाराजांच्या जवळजवळ चार. पण इतक्या वर्षात पहिल्यांदाच ते दोघंही हवे तिथे होते. जग मात्र या साठी थांबलं नव्हतं. नशीबाने पाण्याखालील उत्खननाच्या पद्धतींमध्ये बरीच प्रगती झाली होती.

किनाऱ्यावर अनेक मंडपांमधून प्रार्थना, श्लोक, होम-हवन वगैरे सुरु होतं. एक बोट सुशोभित केली होती. त्यात अॉक्सिजन सिलेंडर आणि हेल्मेट घालून खास तयार केले गेलेले दोन पाणबुडे विराजमान होते. योग्य वेळ येताच त्यांचं गंगेच्या पाण्याने शुचिर्भूतीकरण केलं गेलं आणि त्यांनी त्या महत्वाच्या मिशन करत पाण्यात उड्या टाकल्या. मीडियामध्ये सगळीकडे जणू याव्यतिरिक्त विषयच नव्हता. कुशस्थलीचा पौराणिक इतिहास, रैवतकानी ती कशी वसवली, खुद्द विश्वकर्म्याने त्याचं केलेलं डिझाईन, त्यावरच नंतर द्वारका कशी वसली, काळाच्या ओघात तीही कशी जलमय झाली वगैरे. त्याचप्रमाणे गुरु-शनिच्या सद्यस्थितीचं महत्व, शोध लागल्याबरोबर त्यामुळे उत्खनन का नाही केलं वगैरे. नेहमी मंगळ-शनि करणाऱ्यांच्या मनातही पहिल्यांदाच गुरुला थोडं उच्चीचं स्थान मिळालं.

सर्व उत्खननांप्रमाणे इथेही वेळ लागणार होता. नेहमीप्रमाणे लोकांचा उत्साह थोडा कमी झाला पण नियमित अहवाल मिळत होते. पुराणांमधील वर्णनांपेक्षाही ती नगरी भव्य होती. अपेक्षित असलेले अनेक अवशेष सापडले. खुद्द कुबेराचा असावा असा एक खजिनाही सापडला. मूख्य महालात मात्र कुणीच कल्पना सुद्धा केली नव्हती अशी एक गोष्ट सापडली. एक भलीमोठी सोनेरी पेटी. अतिशय जड. आत एक सोन्याचीच पानं असलेलं पुस्तक होतं. हा खरा खजिना होता कारण त्यात रैवतकाचा संपूर्ण इतिहास होता. थेट ब्रह्मापासून, कश्यप, मनु वगैरे करत रैवतकापर्यंत. यातील तपशीलामुळे वेगवेगळ्या पुराणांमध्ये यासंबंधीच्या ज्या विसंगती होत्या त्या ही सुधारता येणार होत्या. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला त्या प्रकरणाला साजेशी अशी ऋग्वेदातील एक ऋचा होती. शेवटचं प्रकरण मात्र जरा विचित्र होतं. कुशस्थली नेमकी कधी आणि कशी पाण्याखाली गेली याबद्दल एकमत नव्हतं. या शेवटच्या प्रकरणाची सुरुवात संपूर्ण नासदीय सुक्त उधृत करुन झाली होती. ऋग्वेदातील त्या सशक्त शंका - ‘या सर्वाचं ज्ञान केवळ त्या सातव्या स्वर्गात असलेल्या देवालाच असेल. किंवा कदाचित त्यालाही नाही कारण तो ही तर विश्वनिर्मीतीनंतरच आला’ - आणि त्यानंतरच्या मजकुरावरून असं वाटत होतं की समृद्ध कुशस्थलीही कस्पटासमान वाटावी अशा नगरीची जाण रैवतकाला झाली होती - एका परग्रहाच्या रूपात. आणि तो त्या सातव्या स्वर्गाकरता बहुदा रवाना झाला होता. त्या सोनेरी पुस्तकात आपली सूर्यमाला बारकाव्यांसहित दर्शवली होती आणि त्या ग्रहाचं वर्णन. हे मात्र थोडंफार सांकेतिक स्वरूपात होतं. सामान्यांना सहजी कळणार नाही असं. हरप्पन स्क्रिप्ट बद्दल ज्याप्रमाणे तज्ञांचं एकमत सुरुवातीला नव्हतं असं म्हणतात तसंच थोडंसं इथेही झालं.

आम जनतेत मात्र एक वेगळंच चैतन्य पसरलं.

हा: हायला, कुशस्थली पेक्षाही मस्त म्हणजे काय असेल नं!
तो: आपल्याला जाता आलं तर …
हा: आपल्याला की नाही ते माहीत नाही पण मिळालेल्या नकाशांवरून योजना सुरू झाल्या आहेत असं मी ऐकलं आहे.

किंवा

अमका: त्या आकाशशास्त्राच्या लोकांना या ग्रहाबद्दल काही माहीत नव्हतं म्हणे. दूरदूरचे ग्रह शोधतात हातातलंच काकण दिसत नाही.
तमका: त्यांना जास्त नावं नको ठेऊ. त्यांनीच तर आता त्या ग्रहाचं स्पेक्ट्रम मिळवून तो वस्तीयोग्य असल्याचं दाखवलं आहे.

खगोलशास्त्रीय रडारवर तो तारा नव्हता तरी पण नशीब बलवत्तर म्हणून त्यांनी मोठ्या दुर्बिणींवर लागलेल्या स्पेक्ट्रोस्कोप्सच्या मदतीने तो केवळ 40 प्रकाशवर्ष दूर आहे, आणि सूर्यासारखाच आहे हे दाखवून दिलं. त्या नवस्वर्गात पोचायला सगळे उत्सुक होते. त्याच्या मंत्रवत गुणांमुळे त्याचं नामकरण ‘फु’ असं करण्यात आलं. खगोलशास्त्रज्ञांना सापडलेले इतर ग्रह एकतर दूर होते, किंवा वस्तीयोग्य तरी नव्हते.

प्रत्यक्ष निघायचं म्हंटलं तेंव्हा मात्र थोडी पंचाईत झाली. फु-लोकी जाणारं यान - फुग - तयार होतं. यान दूरवर पाठवायचं म्हणजे खूप इंधन लागतं. इंधनाची बचत करत बराच वेग पटकन घ्यायचा असेल तर चंद्र, सूर्य आणि ग्रहांची गुरुत्वाकर्षणीय बूस्ट वापरली जाते. म्हणजे यानाला एखाद्या जवळच्या ग्रहाकडे अशा पद्धतीने भिरकवायचं की ते यान त्यावर आपटणार नाही, पण पुरेसं ओढलं जाईल आणि सूर्य ज्याप्रमाणे धुमकेतूंना दूर फेकतो तसं ते फेकल्या जाईल. गणित नीट केलं असल्यास आपल्याला हवं त्या दिशेने यान पाठवता येतं. खगोलतंत्रज्ञ यात पारंगत होते. मात्र त्यासाठी लागणारी ग्रह परिस्थिती आणि ज्योति:शास्त्रानुसार फुग(च्छ)ण्यासाठी लागणारी ग्रहपरिस्थिती ही एकदम मिळेनात. साडे-तीन मुहुर्त तसे हुकमी असतात. तेंव्हा काहीही केलेलं चालतं. पण अनेक वर्षात त्यांच्या आसपासही योग्य गुरुत्वग्रहस्थिती सापडेना. मग कुणाच्यातरी लक्षात आलं की क्षयमासाआधीच्या अख्या शुद्धमासात साडे-तीन मुहुर्तांप्रमाणेच काही पहावं लागत नाही. सौर आणि चांद्रमास यांच्यातील तफावतीमुळे साधारण दर तीन वर्षांनी एक अधिकमास येतो. तेंव्हा लादलेले फरक साठत जाऊन काही दशकांनी एका चांद्रमासाचा क्षय होतो. ७० वर्षांनंतरचा दोन्ही शास्त्रांना पटेल असा क्षयमासात एक मुहूर्त एकदाचा मिळाला. लगोलग त्या संबंधित सर्व तयारी जोशात सुरु झाली.

काही लोकांनी शंका उपस्थित केल्या की ते सोनेरी पुस्तक ट्रॉयच्या घोड्यासारखं असावं. सबब कुशस्थली बनवणाऱ्या रैवतकाच्या काळी सूर्यमालेची रचना आपल्याला माहीत नव्हती वगैरे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ग्रीक जसे ट्रॉयच्या बाहेर लाकडी घोडा सोडून निघून गेले होते तसंच कोणीतरी हे पुस्तक सोडलं आहे. आपण पुस्तकातील सूचना-बर-हुकूम काही केलं तर पृथ्वीला धोका होईल. पण अर्थातच अशा पाखंडी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ फक्त तुरुंगातील अधिकाऱ्यांकडेच होता.
आणखी तीन पिढ्या उलटल्या. फुग उडण्याचा दिवस जवळ आला होता. आता तर उत्कंठा अधिकच वाढली होती. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ४० प्रकाशवर्षांचं अंतर केवळ ३० वर्षात सर होणार होतं. पृथ्वीवर संदेश परत यायला जास्त काळ लोटणार होता, पण यानावरील टीमची तयारी जय्यत होती. इतका मोठा प्रवास पहिल्यांदाच होत होता. यानावर तंत्रज्ञ, ज्योतिष्यी त्याचप्रमाणे मानसशास्त्रज्ञ पण होते. यानावरच पुढची पिढी तयार होणार होती आणि तीच फुवर फोफावणार होती. मागून पृथ्वीवरुन येणाऱ्या टीम्सचे हेच नेते असणार होते. आणि याच पिढीचा मी आदिमानव, मनु.

आमच्या नव्या पिढीला नियमांच्या चौकटी आत्मसात करायला वेळ लागला नाही. पृथ्वी जरी आम्ही पाह्यली नव्हती तरी त्याबद्दलचा सगळा अभ्यास करून झाला होता. म्हणुनच तुम्हाला सगळं तपशीलवार सांगू शकतो आहे. आम्ही सगळे खूपच उत्साहात होतो. रैवतकाबद्दल काय नवं कळेल याकडे तर सर्वच डोळे लावून बसले होते. शनी - गुरुच्या कृपेने सगळं व्यवस्थीत होणार होतंच. हं, नव्या ठिकाणी मंगळ, गुरु, शनी ऐवजी आम्हाला नवा पाया बसवावा लागणार होता, पण त्यासाठी ज्योतिष्यांनी आम्हाला तयार केलंच होतं.

आधी तो तारा दिसू लागला आणि त्यानंतर लवकरच फु. यानाच्या दिशेत थोडासाच बदल करून आम्ही थेट फु पाशी पोचलो. लॅंडींग व्यवस्थित झालं. बरोब्बर सोनेरी पुस्तकात सांगितल्याप्रमाणे तो ग्रह होता. तो तारा पण सूर्यासारखा G प्रकाराचाच होता. त्यामुळे आधी जे पृथ्वीवर होते त्यांना फार काही फरक जाणवला नाही. सुरुवातीला तंबूंमध्ये राहून घरांची उभारणी केली जाणार होती. एक टीम काय अवशेष सापडतात हे पाहणार होती. दुसरी पृथ्वीबरोबरच्या दळणवळणाचं पाहणार होती, तर तिसरी आकाशदर्शनाद्वारे पंचाग स्थापणार होती.

अनेक दिवस शोधूनही काहीच अवशेष सापडले नाही. आणि मग अचानक आमच्या लक्षात आलं की गुरुविना सर्व अधूरं आहे, आपण अक्षम आहोत. आपल्या मधील काही लोक सिनीयर आहेत. ते आपले गुरु, गाईड, फिलॉसॉफर बनू शकतात. पण इथे आपल्याला गाईड करायला गुरुच काय, कोणताच ग्रह नाही. आतापर्यंतच्या अवकाशीय निरिक्षणांनुसार या सुर्याला फु हे एकुलतं एक बाळ आहे. आपली पूर्ण फिलॉसॉफीच कोलमडली. नियमांची चौकटच नाहिशी झाली. आपण फ्रेम केले गेलो आहोत. चौकटीशिवाय फ्रेम. नवा सूर्य असूनही भविष्य केवळ अंधकारमय आहे.

यातून मार्ग काढायचा असेल तर वेगळं काही करायला हवं. गरज पडल्यास जुनं झुगारून. गरज पडल्यास बंड करुन. या मनुवर ती जबाबदारी आहे आणि ती निभावण्यास तो तयार आहे. नवं विश्व उभारूया, स्वहस्ते, स्वकर्तृत्वावर.

---

चित्राचं श्रेय - शीतल वागळे

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
2.8
Your rating: None Average: 2.8 (5 votes)

प्रतिक्रिया

कळ्लं नाही.

+१

काहीच.

*********
आलं का आलं आलं?

कथा वेगळीच आहे.
मला चित्र अतिशय आवडलं

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परग्रहावर पोहोचण्याएवढं तंत्रज्ञान शोधलं तरीही मुहूर्त, ग्रहस्थिती मांडणारे, कुंडली पाहणारे यांची ही टिंगल आहे. ती आवडलीच.

चित्र आवडलं. सबगोलंकारी, किंवा गोल फिरत केंद्रात जाऊन धडकणारे असे वेगवेगळे अर्थ लावता आले. फुग्यातली हवा जाणं हे नव्या ग्रहमालेत गुरु न सापडण्यासारखं वाटून आणखी मजा आली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परग्रहावर पोहोचण्याएवढं तंत्रज्ञान शोधलं तरीही मुहूर्त, ग्रहस्थिती मांडणारे, कुंडली पाहणारे यांची ही टिंगल आहे. ती आवडलीच.

मला वाटते ही कथा रोरशाश चाचणीप्रमाणे असावी. बोले तो, ज्यालातिला आपापल्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे नि मानसिकतेप्रमाणे कथेतून काय वाट्टेल तो अर्थ प्रतीत होत असावा; कथेला मात्र स्वतःचा असा काहीच अर्थ नसावा. (किंवा, वुड्डहौससाहेबाच्या कोण्याशा पात्राच्या शब्दांत: "It's like Shakespeare: Sounds great, but does not mean a thing.")

असो. या कथेतून आम्हांस काहीच अर्थबोध झाला नाही, एवढेच नमूद करून (तूर्तास, तूर्तापुरती) रजा घेतो. (काढा आता काय काढायचे ते आमच्या व्यक्त्तिमत्त्वाबद्दल नि मानसिकतेबद्दल निष्कर्ष!)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

'न'वी बाजू यांच्याशी सहमत.
चित्र खूप आवडले. छान आहे.

मला वाटते ही कथा रोरशाश चाचणीप्रमाणे असावी. बोले तो, ज्यालातिला आपापल्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे नि मानसिकतेप्रमाणे कथेतून काय वाट्टेल तो अर्थ प्रतीत होत असावा; कथेला मात्र स्वतःचा असा काहीच अर्थ नसावा.

हा हा हा. नेमके!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ४० प्रकाशवर्षांचं अंतर केवळ ३० वर्षात सर होणार होतं.

ये कुछ जमा नही.
वर अदितीने म्हटल्याप्रमाणेच तंत्रज्ञानाचा वापर करतानाही ज्योतिषाचा वापर वगैरे करण्यावर टिप्पणी असावी असं वाटलं..
पण फारच थोडक्यात आटोपतं घेतलं आहे- आणि "फु" + G म्हणजे ज्योतिषाचा फुगा फुटणे असे काही अर्थ मनात चमकून गेले..
नक्कीच एक वेगळ्या प्रकारची कथा Smile

अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ४० प्रकाशवर्षांचं अंतर केवळ ३० वर्षात सर होणार होतं.

ये कुछ जमा नही.

आइन्ष्टाइनसाहेबाच्या शवपेटिकेत वलयाकृती गती सुरू झाली असेल, नै? Wink

पण बाकी कथा पार डोक्यावरून गेली. स्पेक्युलेशनपलीकडेसुद्धा.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

ही गोष्ट, गोष्टीच्या शीर्षकातली विहीर आणि त्या विहिरीतला बेडूक यांचा परस्परसंबंध काही केल्या समजला नाही.

(अर्थात, गोष्टीच्या अर्थाप्रमाणेच, असा काही संबंधही नसावा, अशी शंका आहेच.)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

आवडली. चित्रदेखील छान.

===
Amazing Amy (◣_◢)

स्वारी, मला काहीच नाही कळलंय. Sad

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या निमित्ताने, बर्‍याचशा ऐसीकरांना आपल्यापेक्षा हुशारही कोणी आहे, हे कळलं असावं.

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !