व्हर्चुअल मयतरीची फेसाळ चळवळ

व्हर्चुअल मयतरीची फेसाळ चळवळ

लेखिका - उसंत सखू

मानव हा समाजप्रिय प्राणी आहे असं थोर ग्रीक तत्त्ववेत्ते अॅरिस्टॉटल विकिपीडियात म्हणतात. भारतीय समाजात एकूणच आपुलकीयुक्त सामाजिक संबंधांची रेलचेल असूनही या २१ व्या शतकात कोट्यवधी पुरुष मैत्रिणींअभावी अस्वस्थ आहेत. पुरुष धाडसी असो किंवा मुखदुर्बळ, जाचक पारंपरिक बंधनं आणि संकोच यांमुळे त्याला समाजात सर्रास मैत्रिणी मिळणं एकंदरीत दुरापास्त आहे.

पण आंतरजालावर फेस्बुकाचं आगमन झालं आणि एका फटक्यात लाखो भारतीय पुरुषांना मैत्रिणी मिळाल्या असं एका साहित्यिकाने आमच्या नजरेस आणून दिल्याने, आमच्या मागे-पुढे ज्ञानाचा उजेड दाटून आमच्या अंगणात थेट कैवल्याचं झाडच लागलं! बायकांनी फेसबुकात खातं उघडताच मैत्रीसाठी अर्ज-विनंत्या (म्हणजे ‘मज्यशी मयतरी कर्नर कं?’) करून फेसाळ पुरुषांनी धडाधड मैत्रिणी प्राप्त करून घेतल्या नि या जन्मी तरी त्यांच्या नर देहाचं सार्थक झालं. फेस्बुकी स्त्रियाही, बिचकत का होईना, नवीनच भेटलेल्या अनोळखी पुरुषांना मित्र म्हणून ‘लायकू’ लागल्या. व्हर्चुअल मयतरीची ही फेसाळ चळवळ लवकरच अतोनात फोफावली. इथे सगळी नाती फक्त मित्रत्वाची असतात. जेव्हा आमच्या मैत्रिणीने तिच्या नवऱ्याची मयतरीची विनंती स्वीकारली, तेव्हा आम्हांला अपार खिन्नता आली. (‘दोस्त दोस्त ना रहा...प्यार प्यार ना रहा...जिंदगी हमें तेरा ऐतबार ना रहा...ऐतबार ना रहा…’)

लाडिक घरगुती फोटो शेअर करून नातेसंबंधांचं जाहीर प्रदर्शन करणे, सांस्कृतिक देवाणघेवाण, विविध आंतरराष्ट्रीय घडामोडींवरच्या गृपीय चर्चा वाचून दिपून जाणे आणि मनोरंजक व्हिडिओ, संगीत वगैरे एन्जॉय करणे हीच आजपर्यंत आमच्या फेस्बुकीय जीवनाची मर्यादा होती. पण आमचा खाजगी गुप्तहेर असलेल्या करमचंदाने नुकताच इथल्या बऱ्याच रंजक घटनांचा शोध लावल्याने अकस्मात गॉसिपचा खजिना सापडून मनोरंजनाचा कडेलोट झाला आहे. त्यातील काही निवडक निरीक्षणं सादर आहेत.

***

झुकरबर्गाने आंदण दिलेल्या भिंतीवर मराठी समाजाने वैचारिक, महत्त्वाचा किंवा बिनमहत्त्वाचा, मोकाट, शाब्दिक चिखल तुडवायला घेतला. शब्दप्रभूंची मांदियाळी तिथे अहोरात्र भडभुंजागत लाह्या फुटवू आणि फुलवू लागली. इथली न्यारीच भाषा अनेकांना मोहवू लागली…

इ्थे रोमन मराठी लिहिणारे ‘रोमन राघव’ म्हणून टिंगलीचा विषय झाले. बिलंदर आणि तज्ज्ञ प्राणी ‘फेक आयड्या’ घेऊन बुरख्याआडून सोकावून लिबर्टी घेताहेत अशी खंत सरळमार्गी फेसबुक्याला सुखाने जगू देईना. ‘इथे काही मूळपुरुष आहेत आणि त्यांचे सुभे आहेत’ अशी हॅल्युसिनेशन्स संशयात्म्यांना शाब्दिक उष्माघाताने सतत होऊ लागली. फेस्बुकावर येऊन आपण कालापव्यय करतो आहोत हा अपराधबोध अधूनमधून बहुसंख्य सदस्यांचं काळीज कुरतडत त्यांना अपार दुःखात लोटू लागला...

अर्थात - फेस्बुकावर बागडण्याचा मासिक पश्चाताप व्यक्त केला की बऱ्याच स्टेटसवंतांना तात्पुरतं समाधान मिळतं. वैराग्याचे झटके आल्यावर क्षणिक संन्यास घेणारे शब्दप्रभू मनोरंजनाला ‘चार चॉंद’ लावतात.

जसे: क्षणिक वैराग्य हा साथीचा रोग लागून अचानक फेस्बुकावरची काही साहित्यिक मोत्ये गळाली. ही लोकप्रिय मोत्ये फटकन आणि बहुदा तात्पुरती गळाल्याने किंचित कुजबुज झाली. ती कशी, ते सुप्रसिद्ध साहित्यिक कन्हैया जोशींच्या भिंतीवरच्या पोस्टमध्ये आणि कमेंटींमध्ये पाहू या -

माझ्या अल्पसंख्य मित्रांनो आणि बहुसंख्य प्रिय मैत्रिणींनो,
आता मी तुमची रजा घेतो. कारण फेसबुकवर काळ अनंत असतो. आपणां सर्वांच्या संगतीत वेळ फार छान गेला. तसंच काही महत्त्वाचं कळवायचं असेल तर माझा ईमेल अॅड्रेस : कन्हैया जोशी कन्हैया@हॉटमेल.कॉम असा आहे .

49994 persons like this.

सखी सावंत

अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नही.............
डार्लिंग कान्हा जाऊ नको न रे अस काय करतोस ??
ये हं आज आपल्या नेहेमीच्याच वेळेला...........
नेहेमीच्याच जागी, तुझं नेहेमीचंच instrument घेऊन....
म्हणजे बासरी हं तुला काय वाटलं चावट कुठचा.
मी वाट बघतेय.......

शेवंती खुळे

आदर्नीय सर, आता मला मार्गदर्शण कोन करल
प्लीज तुमी पुन्ना याणा फेस्बुकात !!
सोडून जाऊ नका हो ss

संकेत डुंबरे

अबे जोश्या, नवी गाडी घेतलीस ते कळले, गाडीला लगटून काढलेले फोटू आम्ही किती दिवस बघायचे? गाडी स्टार्ट तरी केलीस की ओसामाने पेट्रोल भरून दिले तरच गाडी चालवणार आहेस अं? आता फेबु संन्यास? धिस इज मात्र टू मच!!!!!

उषा भांडूप

आता मला अल्टीमेट रोमेंटिक गाणी कोण सांगेल .....
न जाओ कन्हैया छोडके फेसबुक
कसम तुम्हारी मै रो पडूंगी ........... रो पडूंगी

छाया विचित्रे

आता माझे थातुरमातुर फोटोज कोण चुकून लाईक करेल कान्हू? हं?
आजच मी माझ्या नव्या गुलाबी नेलकटर आणि पोपटी टूथपिकचा फोटो
अपलोड केलाय, बघ न रे प्लीज .................
तू लाईक केल्याशिवाय मी नवे फोटू कसे काढणार??
मी फोटू काढायचे अन तू लाईक करायचे याची इतकी सवय झाली
आहे न कि काय सांगू?
माझ्या उंच सखल गुणांना आता उत्तेजन कोण देणार सांग ना गडे?

दवणे गुरुजी

सर अनेक महत्त्वाच्या लिंकाबद्दल तुमचे मार्गदर्शन हवे
असताना तुम्ही अचानक हा निर्णय का घेतलात?? तुम्ही आणि दवणे गुरुजी माझे आवडते लेखक आहात. एखाद्या दीपस्तंभासारखे तुम्ही आमचे पथप्रदर्शक होतात.

या हृदयद्रावक कमेंटी वाचून आपल्या 'अगं अगं म्हशी, मला फेस्बुकीच नेशी' साहित्यिकांचे हृदयपरिवर्तन होण्याची खात्री असलेले त्यांचे पन्नास हजार व्हर्चुअल फ्रेंड्स!

***

फेस्बुकात काव्याचं बारमाही उदंड पीक येतं. कवडे पृथ्वीच्या पाठीवरच्या कुठल्याही विषयावर २४*७ कविता पाडत असतात. गोग्गोड, गुलाबी कविता पाडणारी एकेक कवडी आपल्या ताफ्यात दीड-दोन हजार कुरवाळक बाळगून असते.

जर एका कवडीने -

माझी सखी आहे जगावेगळी
बोलायला एकदम मनमोकळी
ती आली जेव्हा माझ्या जवळी
भरून काढली जीवनातील पोकळी !

असं लिहिलं किंवा -

ही दुपार भिजलेली... प्रीत चान्दन्यात
मिटूनी पन्ख खग निवान्त शान्त तरुलतात
आज तुजह्या सहवासी जीव धन्य झाला..........
तल्व्यावर मेहन्दीचा अजून रंग ओला
माज्या मनी प्रीत तूझी घेते हीनडोला..................

असं पोष्टलं, की लोणीलेपनाची चढाओढ तत्काळ सुरू होते. समजा कवडीला काही अपरिहार्य कारणाने कविता प्रसवणं शक्य नाहीच झालं, तर एखादा प्राचीन फोटू डकवूनही हाच परिणाम साधता येतो.

***

मैत्रिणीशी खास ’तशी’ चाट करायला मिळावी म्हणून आबालवृद्ध पुरुष किती व्याकूळ असतात याचा इनबॉक्सी रहस्यभेद अधून मधून जाहीर करून काही लबाड स्त्रिया माफक सूड उगवत असतात. असाच एक दिलखेचक चाट संवाद नुकताच हाती आलेला आहे.

शोनालिनी ही एक लहरी, उदयोन्मुख कवयित्री आणि प्रस्थापित साहित्यिक दिगंबर महाडिक यांची एक प्रेमवर्क चाट. तिला फक्त मनात येईल ते बोलायचं आहे. महाडिक काय म्हणतोय, याने तिला काही फरक पडत नाहीय. संधिसाधू महाडिक चौखूर उधळला आहे -

शोनालिनी: हेलो बिझी आहात का ?
महाडिक: छे छे! मी तुझ्यासाठीच ऑनलाईनलोय >>>
शोनालिनी: मी आज पुन्हा संतापले
महाडिक: अरे वा! दुर्वास ऋषींचे जीन्स आलेले दिसतायत थेट तुझ्यात!
शोनालिनी: पुणेकरांना सरळ नाही बोलता येत का?
महाडिक: पुणेकरांच्या जीन्स मध्ये सरळ बोल नाहीत ग.
ते जाउदे माझ्या निळ्या जिन्स मध्ये काय गम्मत आहे दाखवू का तुला?
..
पुणेकर कधीचेच वाम मार्गाला लागलेत त्यामुळे तु पण....
....
.....
......
शोनालिनी: काय हो???? बिझी आहात का?
महाडिक: छे छे मी कधीचाच कपडे काढून बसलोय ग, चल लव्हकर.
शोनालिनी: नाही, कधी कधी hurt होतो तिरसटपणा
महाडिक: बर बाई मी सरळ आत शिरतो >>>>.....
काही हर्ट होणार नाही आय प्रॉमिस....
शोनालिनी: बाकी नवीन काही नाही आज माझ्याकडे
महाडिक: कधी कधी असतो गैरसमज माणसाचा स्वतः बद्दल......
उगाच वाटत रहात आपल्याकडे काही नवीन आहे म्हणून...

(स्वगत: मग पुरे कर की बकवास च्यायला उगा पिरपिर लावलीये… मूळ मुद्द्यावर ये मूर्ख मुली, माझ्या वेळेचा फालुदा नको करूस.)

शोनालिनी: आज मी रेकी treatment घेणारेय
महाडिक: अतिरेकी आहेस कि काय शोने? चाट, कविता, लेख लादेन पुरे नाही झाले का?
चल मी तुला आता पु रेकी ट्रीटमेंट देतो...
शोनालिनी: मला आज जाम बोर झालेय
महाडिक: गुड गर्ल! असे क्षणोक्षणी बदलातेस न तु म्हणून मला आवडतेस
तो बिकिनी बदलून बर्थडे सूट घाल बघू लगेच....
शोनालिनी: आज खरेतर कविता करण्याचा मूड होता गेला निघून
महाडिक: Thank God!! जान बची और लाखो पाये...
शोनालिनी: depression...मला अनेकदा येते
महाडिक: हाऊ वंडरफुल!! हे वाचताना मलाही येऊ लागलेय
शोनालिनी: पहिले मीही एन्जॉय करायचे bt nw m scared
महाडिक: & बिलीव्ह मी नाऊ आय एम scared टू...
चल न दोघेही मिळून एन्जॉय करूनच scared होऊ या नागडे!
शोनालिनी: मी तशी आज खुश आहे स्वतावरच
महाडिक: येक पे रहना या तो गोडा बोलो या चतुर...
नक्की ठरव तु संतापली आहेस, कविता प्रसवणार आहेस
डिप्रेस्ड आहेस, जाम बोर झालीये कि खुश आहेस??
शोनालिनी: छान framewrk होत होते मनात
महाडिक: माझ्या मनात तुझी आकृती अन पुढचे फ्रेम उप्स प्रेमवर्क तयार आहे
शोना
कमॉन नाव हरी अप....
उ sssला ला ......

(स्वगत: अरेच्या ऑफलाईन झाली वाटते….)

... तर अश्या या आभासी ’मयतरी’च्या चित्तरकथा!

***

मैत्रीच्या अर्ज-विनंत्या करताना ’व्हर्चुअल इगो’ नामक भावना उदयास आल्यामुळे “मी कधीही कुणालाही ‘मयतरी कर्नर कं?’ विचारत नाही.” वगैरे गोड भ्रम सगळ्या फेस्बुक्यांना होतात. प्रत्येक महत्त्वाकांक्षी फेस्बुक्या आभासी मित्रयादी ५००० पर्यंत वाढवण्याचं व्हर्चुअल ध्येय बाळगून असतो. दीड-दोन हजार मैतर बाळगूनसुद्धा कॉमेंट आणि लाईकचे तुरळक प्रतिसाद पाहून फेस्बुक्याला कधीकधी स्मशान वैराग्य येतं आणि ’अँग्री यंग’ किंवा ’ओल्ड’ फेस्बुक्या मित्रयादी साफ करायला घेतो. काही निष्क्रिय, निरुपद्रवी सदस्य हाकलल्याचं अभिमानाने मिरवतो आणि त्यामुळे काही भाबडे मित्र / मैत्रिणी प्रभावित होतातही. आभासी मित्राशी मतभेद होताच त्याला अनफ्रेंड करता येतं. किंवा हिंदी सिनेमात ’मरेपर्यंत फाशी’ दिल्यावर न्यायाधीश पेनाची नीब मोडतात, तसं फेस्बुकीय मित्राला ब्लॉक करून आभासी मैत्रीला फाशीही देतात येतं. विविध विषयांना वाहिलेले ग्रुप्स, त्यांच्या नियमावल्या, नियमभंगोत्सुक चर्चील सदस्य, ’त्यांना नारळ द्यायचा की नाही’ यावरून होणारं रणकंदन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सापेक्ष वापर... अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक घडामोडींनी फेस्बुकक फेसाळून ओसंडत असतं.

’हो भी नहीं, और हरजा हो…’ असा हा मयतरीचा गोरख धंदा आहे.

गालिब म्हणतो:

दोस्तोंसे बिछडकर ये हकीकत खुल गयी गालिब
बेशक कमीने थे मगर रौनक उन्हीसे थी...

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.714285
Your rating: None Average: 3.7 (7 votes)

प्रतिक्रिया

जबरी आहे हे. धमाल! Smile

मैत्रीच्या अर्ज-विनंत्या करताना ’व्हर्चुअल इगो’ नामक भावना उदयास आल्यामुळे “मी कधीही कुणालाही ‘मयतरी कर्नर कं?’ विचारत नाही.” वगैरे गोड भ्रम सगळ्या फेस्बुक्यांना होतात.

ही बाई फारच खरं बोलते... बंद करा हिचं तोंड.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओ तै! आवरा कुणीतरी! नुसता हसतोय!
ROFLROFL

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

______/\______

आणखी काय लिहू ? शब्द संपले.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मानव हा समाजप्रिय प्राणी आहे असं थोर ग्रीक तत्त्ववेत्ते अॅरिस्टॉटल विकिपीडियात म्हणतात.

हे वाक्य वाचूनच फुटलो. त्यानंतर कैवल्याचं झाड काय, आकस्मिक वैराग्याने गळलेली मोत्ये काय... धमालच आहे. तुमचं औषध तुम्हाला चांगलंच मानवलेलं दिसतंय...

फेसबुक ग्रुपांवर चाललेल्या ग्रूप डायनॅमिक्सबद्दलही लिहा. ग्रुप्स कसे क्षणार्धात जळून खाक होतात आणि त्या राखेतून नव्या नावाने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे कसे उभे राहतात याच्या कथा तुमच्या तोंडून वाचायला आवडतील.

तुम्हाला कसा काय हा लेख आवडला मला समजत नाही. एकतर ही बाई फार खरं बोलते. त्यात आमच्या इगोच्या पंच्याला हात घालते. झालंच तर "... थोर ग्रीक तत्त्ववेत्ते अॅरिस्टॉटल विकिपीडियात म्हणतात," असं काहीतरी लिहून आमच्या विक्कीविदूषीपणाची टिंगल करते. आणि हे कमी का काय म्हणून शोनालिका वगैरे नावांनी आमच्यासारख्या होतकरू फेस्बुकीय कवयित्रींच्या इमेजचा चक्काचूर करते ...

या बाईंना बॅन करा इथून. समाजविघातक काहीतरी लिहितात या.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्हर्चुअल कोडगे असल्याने असल्या पांचट धमक्यांना आम्ही एरवी अनुल्लेखाने ठार करतो . या गुणविशेषाची झ्यायरात करायला हे टंकनश्रम घेतले आहेत याची नोंद घ्यावी .

हे पहा, तुम्हाला आमच्या धमक्या पांचट वाटत असल्या तरी त्या व्हर्चुअली दणदणीत आहेत. हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला त्यासाठी व्हर्चुअल चळवळ करून तुमच्या तोंडास फेस आणावा लागला तरी बेहत्तर.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्हेरी व्हेरी नाईस म्हणजे खूपच नाइस बर का!

अगागा ROFL

===
Amazing Amy (◣_◢)

ROFL खी: खी:
तूफान लेख आहे. क-ह-र!

ROFL खी: खी:
तूफान लेख आहे. क-ह-र!

नक्की ठरव तु संतापली आहेस, कविता प्रसवणार आहेस
डिप्रेस्ड आहेस, जाम बोर झालीये कि खुश आहेस?? ROFLROFLROFL

आमचे इथे एकीने, फेसबुकवर “Done” अशी पोस्त टाकली तर तिला शंभरावर लाईक मिळाल्या आणि दहातरी कॉमेंट्स. याला व्हर्च्युअल पॉप्युलेरीटी म्हणायची नाही तर काय?
खत्रा लेख!

या वर्चुअल जगामदी एक बर असतयं सोताच्याच प्रतिमेशी मयतरि कर्ता येति. लेख लई अवड्ला मयतरि कर्न्रर क

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

फेस्बुकी मयतरी करण्यासाठी रितसर गळेपडू अर्ज पाठवन्र कं ? Wink

ROFL
आणि हा गालीबचा शेर

दोस्तोंसे बिछडकर ये हकीकत खुल गयी गालिब
बेशक कमीने थे मगर रौनक उन्हीसे थी...

लाजवाब च !!!

हा गालिबचा शेर नाही आणि त्याच्या नावाने तो खपवलेला आहे असे एका मित्राने सांगितले आहे .
शेर खासच आहे त्यामुळे जसा आहे तसा वापरला .

आमच्या बालपणी हा शेर आमच्यापेक्षा चार वर्षं लहान बहिणीने गालिबचा म्हणून ऐकवला होता.

अपनीही कब्र खोद रहा हूं ऐ गालिब ..
अपनीही कब्र खोद रहा हूं ऐ गालिब ..
(इथे आम्ही म्हण्टलं च्यायला कार्टी ज्यास्तीच आवाज करायला लागलीए असं म्हणून नीट ऐकायला लागलो.)
....
....
जरा फावडा तो दे !

असो. असो.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.