ऐसी मिष्टान्ने रसिके ...

ऐसी मिष्टान्ने रसिके ...

लेखक - अस्वल

‘आत शिरू की नको’ ह्या प्रश्नाचा निकाल लावत मी शेवटी त्या हाटेलात गेलोच.

खरंतर गेले २ महिने येताजाता मी त्या रेस्टॉरंटची पाटी वाचत होतो. बाहेरून दिसणारं त्याचं एकंदर रुपडं भलतंच सुरेख होतं. पण आपल्याला एक सवय असते - फुकटंफाकट वाट वाकडी करून आपण कुठेही जात नाही. आपण बरं, आपलं जग बरं! शेवटी अगदीच राहवेना, तेव्हा मी तिथे एक चक्कर मारून यायचा निर्णय घेतला.

मी आतमध्ये शिरणार तोच एका छोट्याशा यंत्रानं मला अडवलं.

"इथले सदस्य आहात का तुम्ही?", मराठी बोलणारं यंत्र पाहून मला भरून आलं. हा प्रकार नवीन होता. इथे म्हणजे कुत्र्या-मांजरींशी इंग्लिशमध्ये बोलणारे लोक बघायची सवय आपल्याला. तिथे अचानक यंत्रातून मराठी आवाज फुटला की नवल वाटणारच!

"कोण आहेस तू? आणि कसली मेंबरशिप ?", मी.

"नुसतंच बघायला आला असाल, तर चालेल. पण खायचं असेल, तर आत जायला इथे सदस्य व्हावे लागते." माझ्या पहिल्या प्रश्नाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून त्या छोट्या यंत्राने उत्तर दिलं.

म्हटलं, आता आलोच आहोत, तर खाऊनच जाऊ. नाहीतरी घरी म्हणजे एकच प्रश्न, ‘खाना बनाना है या बनानाही खाना है?’ त्यापेक्षा इथे चालेल. निदान काहीतरी चविष्ट तरी पोटात जाईल.

"बरं, मेंबरशिप चालेल. पण किती पैसे लागतील?" कुठल्याही मध्यमवर्गीय मनातला पहिला प्रश्न मी टाकला.
ह्यावर यंत्रातून हसण्याचा एक आवाज आला आणि यंत्रानं एक कागद-पेन माझ्यापुढे केलं. “ती फुकट आहे. इथे नोंदणी करा, मग तुम्हांला मी पुढे घेऊन जाईन.”

"आगाऊ दिसतंय हे यंत्र!", माझ्या मनात विचार आलेच. यंत्रानं ते विचार ओळखले असावेत, कारण त्यानं आपली एक यांत्रिक भुवई त्रासदायकरीत्या उंचावली. मी निमूटपणे माझं नाव नोंदवलं.

"स्वाक्षरी केलीत तर बरं होईल." मी पुन्हा एकदा निमूटपणे सही केली.

"कुठं बसणार तुम्ही? बोला."

मी आजूबाजूला चक्कर टाकली. बरीच मो़कळी जागा होती. एखाद-दुसरं कुणीतरी जेवत बसलं होतं. बाकीचे लोक तर गप्पा मारत होते. एका खिडकीपाशी एक सुरेख खुर्ची आणि तिच्या बाजूला एक-दोन पुस्तकं पडली होती.

मी बोटानं खुणावून यंत्राला ती जागा दाखवली.

"अरे वा! इथली सगळ्यात लोकप्रिय जागा आहे ती. तिथून बाहरचं सगळं छान दिसतं!" यंत्रानं समाधानकारक आवाज काढला आणि ते मला खुर्चीपाशी घेऊन गेलं. "बसा, मी येतोच."

खुर्ची पुढे ओढून स्थानापन्न झाल्यावर मी आजूबाजूला नजर टाकली. भिंतींवर वेगवेगळी चित्रं लावली होती. त्यांतली बरीचशी रोजच्या आयुष्यातलीच, पण वेधकरीत्या टिपलेली, होती. मागेच एका छोटेखानी बुक-शेल्फमध्ये नीट मांडून ठेवलेली पुस्तकं होती. तिथे पाच-सहा जण घुटमळत होते. प्रत्येकाच्या हातात एक ग्लास होता. बहुतेक त्यात वाईन असावी. आणखी पलीकडे नजर टाकली, तर तिकडे दोघे जण तावातावानं हुज्जत घालताना दिसले. कानी काही आलं नाही, तरी त्यांचा आवेश मात्र स्पष्ट जाणवत होता. खिडकीबाहेर काही लोकांचा घोळका उभा होता. त्यांचीदेखील कसल्यातरी अगम्य विषयावर चर्चा चालली होती. एक जण काहीतरी सांगत होता आणि बाकीचे लोक त्याला बहुतेक विरोध करत होते. त्यांचं भांडण चाललंय असं वाटून मी तो प्रकार जरा लक्षपूर्वक ऐकायला लागलो.

“महाराष्ट्रात आज पुरोगाम्यांचा आदर...”, “स्त्री शिक्षण आणि भ्रूणहत्या ह्यांचा संबंध..”, “सरसकटीकरण करणाऱ्यांना विदा..”, “भांडवलाशाहीचा रोचक दृष्टीकोन...”

‘विदा’, ‘पुरोगामी’, ‘रोचक’, ‘भांडवलशाही' असले भीषण शब्द ऐकून मी इस्त्रीचा चटका लागल्यासारखा खिडकीपासून लांब झालो.

"बोला, काय घेणार तुम्ही?" यंत्र परत आलं होतं.

मी टेबलाकडे नजर वळवली. एक मोठा जाडजूड मेन्यू होता आणि बाजूला एक बारीकसा मेन्यू ठेवला होता.

"बरीच व्हरायटी दिसतेय इथे. एवढा मोठा मेन्यू म्हणजे क्या बात है!"

"धन्यवाद! आमच्या इथे सगळे पदार्थ मिळतात. चायनीजपासून ते रशियन, ब्राझिलिअन, मोरक्कन आणि इजिप्शियनसुद्धा! आमची खासियतच आहे ना, वेगवेगळे पदार्थ ठेवायची!"

"दिसतंच आहे ते!" भल्या थोरल्या मेन्यूकडे नजर वळवत मी त्याला म्हटलं. ‘वा! अस्सल खवय्यांना अशाच जागा आवडतात. नाहीतर उडप्यांसारखे तेच तेच मेन्यू ठेवण्यात काय गंमत आहे?’ असे विचार माझ्या मनात मिसळीतल्या शेवेप्रमाणे तरंगून गेले. मिसळीचं नाव काढताच पोटात भुकेचा आगडोंब मि(उ)सळला आहे हेसुद्धा लक्षात आलं.

“मग काय घेणार आपण?”

“जरा बघतो. एवढ्या पदार्थांतून निवड करायची म्हणजे खायचं काम नाही! ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ:!” माझा विनोदनिर्मितीचा प्रयत्न यंत्रावर अगदीच वाया गेला. एकही यांत्रिक सुरकुती न हलवता ते निघून गेलं.

ते न पाहिल्यासारखं करून मी मेन्यू उघडला आणि सहज ओझरता चाळला. त्यात चित्रं तर अप्रतिम होती. मात्र बरेच ठिकाणी पदार्थांबरोबर एका बाटलीचं आणि ग्लासाचं चित्र होतं. ‘बहुतेक इथे ड्रिंक्स कॉम्प्लिमेंटरी आहेत असं दिसतंय…’ माझ्या मध्यमवर्गीय मनाने एक नोंद केली. खिशातला चश्मा लावून मी एक पान उलटलं आणि यादी वाचायला सुरुवात केली.

ब्लू मंडे
ब्लू गोवन हेवन
माइ-ताइ
बुलफ्रॉग...

अरेच्चा, ही बहुधा पेयांची यादी दिसतेय. मी आणखी काही पानं चाळली, तर तिथे ‘मँगो मार्गारिटा’ वगैरे मंडळी दिसली. मग माझा संशय बळावला. अचानक शेवटच्या पानावर झेप घेतली, तर तिथे मला ‘अ डे अ‍ॅट बीच’ दिसलं. मी थक्क झालो! यंत्र बहुतेक मला खाद्यपदार्थांचा मेन्यू द्यायला विसरलं होतं आणि त्याने पेयांचाच मेन्यू ठेवला होता.

‘इथली पेयांची यादीच एवढी भली थोरली असेल, तर खाद्यपदार्थ किती असतील…’ असा विचार मी करतोय-न-करतोय तोच यंत्र कमालीच्या चपळाईने हजर झालं!

"काही हवंय का आपल्याला?"

"अं... हो. इथे पेयांची चिकार रेलचेल दिसतेय!"

"हो तर, आमचा कॉकटेल मेन्यू जगप्रसिद्ध आहे!" यंत्राने यंत्राला झेपेल एवढंच एक स्मित केलं.

"होऽ, ते असेल. पण खायचा मेन्यु कुठे दिसला नाही तो?" मी यंत्राला विचारलं.

"नाही, इथेच आहे की. हा घ्या." असं म्हणून एका बारीकशा कागदाकडे त्यानं माझं लक्ष वेधलं. त्यावर एका बाजूला बरंचसं काही खरडलं होतं आणि दुसरी बाजू जेमतेम भरलेली होती.

"हा? हा मेन्यू आहे?" मला शंका आली की, यंत्र माझी फिरकी घेतंय की काय!

"हो." यंत्राच्या चेहेर्‍यावर मगाचचाच निरागस यांत्रिक भाव होता.

"एव- एवढाच?" माझ्या तोंडून नीट शब्द फुटत नव्हता.

"हो, पण त्यात बरीच व्हरायटी आहे!". यंत्राने विजयी मुद्रेनं सांगितलं.

मी त्या कागदाकडे नजर टाकली. तिथे ब्रेडचे २० प्रकार लिहिले होते. आणखीही काही अपरिचित मंडळी होती. पण खायचा असा काही पदार्थ दिसेना!


चित्रसंकल्पना : मेघना भुस्कुटे/अमुक, रेखाटन : अमुक (मोठ्या चित्रासाठी चित्रावर क्लिक करा.)

"आहे ना व्हरायटी. पण ब्रेडची. त्याबरोबर काय खाऊ मी? की तो ब्रेड त्या कॉकटेलमध्ये बुचकळून खाऊ म्हणतोस?" माझा राग आता पोटातून बोलत होता.

"कसं बोललात! आयडिया वाईट नाही. हे बघा, ह्या फ्रेंच बगेटबरोबर जर तुम्ही मँगो मार्गारिटा घेतलीत ना, तर डिस्काउंट आहे इथे." यंत्राने निमिषार्धात जवाब दिला.

मला काय बोलावं ते सुचेना. भुकेल्या पोटी त्या यंत्राशी वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता. समोर असलेल्या कॉकटेलच्या शंभर आणि ब्रेडच्या वीस प्रकारांतून वाट काढून पोट भरता येईल असं काहीतरी शोधायचं होतं.
निकराचा प्रयत्न करावा, म्हणून मी तो कागद जिवाच्या करारानं बघायला लागलो. त्यात मला पुन्हा गोड पदार्थांचे ७ प्रकार, सॅलड्सचे ३-४ प्रकार, पास्त्याचे २-४ प्रकार... असले विदेशी भिडू दिसलेच. माझ्या देशी पोटाला काहीतरी चमचमीत आणि चविष्ट असं हवं होतं. पालापाचोळा खायचा तर इथे का येईन मी?

सॅलड, पास्ता इत्यादी झाडाझुडपांना बाजूला सारून मी शेवटी अस्सल भारतीय पदार्थ शोधला. "असं कर, हा एक चमचमीत ढोकळा आण."

यंत्राने पुन्हा ते झेपेल इतकंच स्मित केलं. "तो प्रतीकात्मक आहे. मागे देशात नवे पंतप्रधान आले नाहीत का? त्या निमित्तानं आणलेली खाद्ययोजना होती ती. आता नाही मिळणार तो. कधीच संपला. लिहायचं राहिलं वाटतं!"

त्यातले "लिहायचं राहिलं वाटतं !” हे शेवटले तीन शब्द हुबेहूब लक्ष्मीकांत बेर्डे स्टायलीत उच्चारलेले ऐकताच माझा पारा आणखी चढला.

पुन्हा मी त्या कागदात डोळे खुपसले. त्या मेन्यूशी फुली-गोळा खेळता खेळता मला अजून एक पदार्थ सापडला. पराठा! चला, काहीतरी आहे इथे!

"बरं हा पराठा आण."

"तुम्हांला चपात्या आवडतात का?"

"हो, आवडतात की. पण आता मला पराठा हवाय."

"सॉरी, चपात्या आवडत असतील, तर नाही घेऊ शकत तुम्ही हा पराठा." यंत्राला बहुतेक वेड लागलं होतं. आता चपात्यांचा काय संबंध?

"काय? का पण?" मी आता भुकेला निव्वळ शरण गेलो होतो.

"कारण तो पराठा म्हणजे ‘चपात्यांचा कंटाळा आल्यावर खायचा पदार्थ’ आहे." यंत्राच्या डोळ्यांत काही वेडसरपणा वगैरे दिसतो का, ते एकदा चेक केलं मी. त्याची काही सर्किट्स नक्की उडलेली होती.

काय बोलणार? निरुपायाने मग मी कागदाच्या मागच्या बाजूला नजर वळवली आणि अहो आश्चर्यम्! तिथे ‘बटाटेवडा’, ‘भरलं पापलेट’ वगैरे ओळखीची मंडळी दिसली. मला गहिवरून आलं आणि माझे डोळे लकाकले!

पण यंत्राने माझी बुभुक्षित नजर हेरली असावी. ते विजेच्या चपळाईनं उत्तरलं- "तो आमचा जुना मेन्यू आहे, रेस्टोरंट चालू झालं तेव्हाचा. त्यातलं काही सध्या उपलब्ध नाही इथे. सॉरी!"

"मग इथे काय मिळतं? नक्की काही मिळतं तरी का?" माझा संताप अनाठायी नव्हता, हे तुम्हांलाही पटेल.

"लिहिलंय की ते मेन्यूत.” यंत्र कमालीच्या सरळ आवाजात बोललं.

मला अचानक उलगडा झाला, की ह्या हाटेलात वेटर का नाहीय. आता बघा, कुठला शहाणा माणूस अशा ठिकाणी वेटरचं काम करील? एक तर मुदलात काही खायलाच मि़ळत नाही. त्यात जे मि़ळतंय, त्यांतलेही चांगलेचुंगले पदार्थ उपलब्ध नाहीत, असं सांगितल्यावर वेटरचा जीव धोक्यात नाही जाणार? आणि जिवाला धोका असेल अशा परिस्थितीत कुठला मनुष्य तयार होईल काम करायला? म्हणून मग त्यांनी हे काम यंत्राला दिलं असणार. कारण असला मेन्यू ग्राहकांच्या गळी उतरवणं हे माणसांच्या आवाक्याबाहेरचंच होतं.

पुन्हा हाटेलातच नोकरी दिली म्हण़जे त्या वेटरला तिथेच खायला घालावं लागलं असतं. त्याला कोण शहाणा माणूस तयार होणार? कारण खायला काही नव्हतंच! लुच्चे लोक!

"तुमच्या मॅनेजरला बोलवा." मी टेबलावर हात आपटला. बाजूची जाडजूड पुस्तकं त्या आवाजानं थरथरली. चर्चोत्सुक भांडणद्वयीसुद्धा माना वर करून बघायला लागली.

"तुमची खात्री आहे का तुम्हांला त्यांच्याशी बोलायचंय अशी? म्यानेजरबाई थोड्या वि़क्षिप्त आहेत म्हणून म्हटलं." यंत्राच्या आवाजात थोडी सहानुभूती होती. म्यानेजर त्यालाही ओरडली असावी. बिच्चारं.

“विक्षिप्त म्हणजे? त्यांची जबाबदारी आहे हाटेल नीट चालवायची.”

“आता काय सांगू तुम्हांला? बरीच मोठी कहाणी आहे. २०११ साली जेव्हा -”

"बरं बरं, असू दे. मग तुमच्या आचाऱ्यालाच बोलवा. मला बोलायचंय त्याच्याशी." मी शेवटला उपाय म्हणून फर्मान सोडलं.

"आचारी नाहीय आमच्याकडे." यंत्र.

“आचारी नाही?”

“नाही.”

"मग जेवण बनवतं कोण?" नाही म्हटलं तरी मला धक्का बसला होता. जेवायला पदार्थ नाहीत, बनवायला आचारी नाही, असं हाटेल असतं?

"त्याचं काय आहे, आम्ही पाककृती ऑनलाईन वाचतो आणि मीच बनवतो त्या. जे काही ऑनलाईन मिळतं, त्यातूनच निवडतो आम्ही आमचे पदार्थ. आता तिथेच काही मिळत नाही, तर आम्ही तरी काय करणार सांगा." यंत्राच्या डोळयांत मला खिन्नता दिसली की काय? न पिताच मला चढली होती बहुतेक.

"अस्सं होय! कुठे बघता तुम्ही हे पदार्थ?" आता मलाही कुतूहल आवरेना.

सखेद चेहर्‍यानं यंत्रानं उत्तर दिलं, "ऐसी अ़क्षरे पाककृती विभाग."

[१] = हाच तो पराठा

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.42857
Your rating: None Average: 4.4 (7 votes)

प्रतिक्रिया

हायबरनेशनमधून बाहेर आलेलं गरीब, बिचारं अस्वल सायबरनेशनमध्ये पोहोचलं ... आणि हसवून हसवून माणसांची शिकार करायला लागलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL
ए वेडा! Wink आम्हालाही हसवून वेडा करणार तू!

ROFLROFL
याला म्हणतात सुप्रभात! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुटलंय अस्वल! आवरा त्याला. अशानं 'ऐसी'वरच्या एकाही विभागाची टवाळकी उरायची नाही.

आणि जर अस्वल चुकूनमाकून 'ललित' विभागाच्या वाटेला गेलं, तर विचार करा - काय आफत ओढवेल...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ब्याक्कार हानलाय....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

ROFLROFLROFL
अस्वला, तू आमच्या उच्चभ्रू हाटेलातून ढीस! "सगळं खायचं" असं लहानपणी कोणी शिकवलं नाही वाटतं तुला? आणि काय रे मेन्यूकार्डावर खास तुझ्यासाठी मधापासून बनलेली दारू होती तीपण पाहिली नाहीस होय? म्हणतात ना, अस्वलाला पावाची चव काय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाण तेजायला ROFL

अस्वल रॉक्स!!! अमुकचे रेखाचित्रही एक नंबर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अर्रे!! काय हे! कसली रेवडी उडवलीय ROFL भन्नाट _/\_
चित्रदेखील क्लास आहे! बिच्चारं अस्वल. चेहर्यावरचा भाव बघा त्याच्या Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

अरेच्चा , खरचं की. त्या निमित्याने मी ऐसीचा पाव(क)कृती विभाग पाहिला. मस्त लेख. रेखाटनही अप्रतिम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस्वलभाऊ(की बहीण?), मान गये. उच्च प्रतीचा विनोद फक्त हुच्च लोकांनाच आवडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच लता
बाकी साऱ्या लापता|

हसून हसून पुरेवाट

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सविता