आली दिवाळी

समस्त मित्रांनो,
महाराष्ट्राचे नवे सरकार दिवाळीआधी बनेल असे वाटत नाहीये. राजकारणापासून थोडा वेळ काढा. आता दिपावली आली आहे. तेव्हा खालील विषयांवर काथ्या कुटावा ही नम्र विनंती. फटाकेबाज विषयांची यादी खालीलप्रमाणे. आपणही या यादीत भर टाकू शकता.
१. प्रदुषणमुक्त दिवाळी - दिवाळीचे फटाके कसे प्रदुषण करतात, त्यामुळे पर्यावरणाचे कसे नुकसान होते, माणसांना कशा कशा प्रकारे ईजा होतात याचे दाखले द्यावे.
२. त्यातून जमल्यास शिवकाशी किंवा तत्सम ठिकाणी बालकामगारांचे कशा प्रकारे शोषण होते यावर प्रकाश टाकावा.
३. जमल्यास भर दिवाळीत संस्कृतीच्या नावे शिमगा करावा.
४. प्रदुषणमुक्त दिवाळी कशी साजरी करावी याचे ज्ञानामृत पाजून आमच्यासारख्या अडाण्यांचा उद्धार करावा.
५. जमल्यास प्रदुषणमुक्त दिवाळी ते दिवाळीमुक्त भारत इतपर्यंतही हा धागा खेचावा.
६. नरकासुराचा वध कसा अयोग्य होता ?
६. भाऊबीज हा महिलांचे शोषण करणारा सण कसा आहे त्यावर तावातावाने चर्चा करा. ( आठवा रक्षाबंधनवरील चर्चा)
८. नवरा या प्राण्याचा खिसा पाकीट रिकामा करणारा हा सण आहे यावर प्रकाश टाका.
९. दिवाळीनिमित्ताने सोने खरेदी केले जाते. सोने खरेदी हा गुंतवणू़कीचा अयोग्य पर्याय कसा आहे याचे मिपावरील अनुभवी मंडळींनी विश्लेषण करावे. अमुक तमुक सालात सोन्याचा भाव इतका होता आणि आता इतका आहे. हेच पैसे जर तुम्ही शेअर बाजारात गुंतविले असते तर तुम्हाला कित्ती कित्ती फायदा झाला असता असे सांगून सोने खरेदी करणार्‍यांना कानकोंडे करण्याचा प्रयत्न करावा.
१०. दिवाळीच्या निमित्ताने कामगार असलेल्यांनी बोनस न दिलेल्या मालकांचा उद्धार करावा. जमल्यास हा दुवा त्यांना इमेल करावा.
११. जे ऐसीकर एखाद्या आस्थापनेचे मालक असतील त्यांनी कामगार कसे माजले आहेत याचे तपशीलवार वर्णन करुन बोनस पद्धत कशी चुकीची आहे याचे समर्थन करावे.
१२. वयोवृद्ध ऐसीकरांनी आपल्या वेळची दिवाळी कशी सुंदर होती नाहीतर आजचे सण साजरे करणे म्हणजे कशी थेरं आहेत अशा प्रकारचे प्रतिसाद द्यावेत. महिलां सभासदांनी आमच्या माहेरी यंव असतं आणि त्यंवं असतं अशाप्रकारे गळे काढावेत आणि चकल्या करंजा हसल्या का ? टाईपचे प्रतिसाद द्यावेत. विकत आणल्या असतील तर गोखल्यांकडे चांगला फराळ मिळतो की चितळ्यांकडे यावर चर्चा करावी.

टीप : वरील विषय चर्चिल्यानंतर हमखास व्हर्च्युअल फटाके फुटतील याची खात्री बाळगा आणि खर्‍या फटाकयांवर एकही रुपया खर्च न करता फटाके फोडल्याचा आनंद घ्या.
समस्त ऐसीकरांना दिपावलीच्या आगलावू ( स्वारी आगावू) शुभेच्छा !

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

हा हा हा. काही विषय विशिष्ट वेळीच सुचतात हे खरं आहे. दुर्दैवाने लोक ऐसीचा दिवाळी अंक वाचण्यात इतके मग्न झाले आहेत की त्यांना अशा सकारात्मक चर्चा करायला वेळच नाहीये. त्या घडून यावा म्हणून केलेला प्रयत्न स्तुत्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या निमित्ताने आगाऊ (दक्षिण महाराष्ट्रीय रूप 'आगाव') आणि आगलावू हे दोन्ही एकच आहेत हे एक नवीन ज्ञान जाहले. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं