बयो !!!!

(हि कथा संपूर्ण काल्पनिक आहे. काळ - १९९८-९९)

बयो !!!!

बऱ्याच तात्पुरत्या नोकऱ्या झाल्या होत्या. कोणत्याच नोकरीत राम वाटत नव्हता. आणि पगारातपण म्हणावी तशी वाढ होत नव्हती. काय करावे काळत नव्हते. स्वतः चा व्यवसाय करायचे डोक्यात होते पण आपल्याला जमेल का ?, भांडवल कुठून आणायचे?, तोटा झाला तर काय ?, असे असंख्य प्रश्न भंडावत होते.
घरी सर्वांना माझी अस्वस्थता जाणवत होती. आईला माहित होते कि याचे काही ठीक चालले नाहीये. तिने सरळच विचारले,
"काय रे काही प्रोब्लेम आहे का?"
"नाही, काही नाही".
"मग असा का घुम्यासारखा बसून असतोस? कसला विचार करतोस एवढा?"
"काही नाही, हे असंच चालू राहिलं तर कठीण आहे. काहीतरी स्वतःच हवं."
"म्हणजे"
"जाऊ दे ना"
आईला माझी घालमेल बघवेना
"किती पैसे लागणार आहेत?"
"माहित नाही" मी

तेव्हा माहित नाही म्हणालो पण मनात जुळवाजुळव सुरु झाली. करून करून करणार काय. छोटंसं कॉम्पुटर शॉप सुरु करायचा विचार होता. भाड्याचा गाळा., सामानसुमान, कमीतकमी दोन माणसांचा पहिल्या ६ महिन्याचा पगार असे सर्व मिळून ६०/८० हजार तरी लागणार होते.
एक दिवस घाबरत घाबरत आईला आकडा सांगितला. वर हेही सांगितले कि पैसे परत मिळतील याची खात्री नाही. तिने शांतपणे ऐकून घेतले आणि सांगते म्हणाली.

अचानक एके सकाळी आईने पैसे हातावर ठेवले आणे म्हणाली "काय करतोयस ते मन लावून कर"
मला काय बोलावे कळेना. माझे डोळे पाणावले. मग म्हणाली "जास्त विचार करू नकोस"

मी कामाला लागलो, मस्त मोक्यावरचा गाळा बघितला, शोसाठी कि बोर्ड, माउस, कॅबिनेट असे सामन उधारीवर आणून लावले. सामान संपले नाहीतर परत देणार हे सुद्धा सांगून ठेवले. आधीचे फर्निचर होतेच. मनासारखा सेटअप झाल्यावर चांगला दिवस बघून नारळ फोडून सुरवात केली. एक डेस्कटोप इंजिनिअर विलास आणि स्वागतिका कोमल असे आम्ही तिघे दुकान कम ऑफिस मध्ये बसू लागलो. सुरवातीला अतिशय थंड प्रतिसाद होता. घाबरगुंडी उडाली होती. पण स्थानिक पेपरविक्रेत्याकडे हैण्ड्बिले वाटायला दिल्यावर चांगला प्रतिसाद मिळू लागला.

कोमल - दिसायला सुंदर, स्वत:ला टापटीप ठेवणारी व मला हवी होती तशीच मुलगी होती. थोड्याच दिवसात तिला व्यवसायातील खाचाखोचा समजल्या. कोण कशासाठी फोन करतंय, पेमेंटसाठी येणारा फोन कोणता, क्लायण्ट चा फोन कोणता आणि त्यांना कसे प्रतिसाद द्यायचे वगैरे. कोमलला एक लहान बहिण होती,जी कोलेजला होती. या दोघीच होत्या.

पहिल्या सहा महिन्यामध्ये दोघांचा पगार आणि भाडे जाउन आईचे पैसे परत करू शकलो. आणि डोक्यावरचा भार बराच कमी झाला.

कोमल जवळच रहायची व तिच्या घरची लोक निच्यावर नजर ठेवून असायचे. वडिलांच्या सहज म्हणून समोरच्या रस्त्यावरून एक दोन फेऱ्या असायच्या.(बहुतेक लक्ष ठेवण्यासाठी) कारण दिवसाचा बहुतांश वेळ मी आणि कोमल दोघच दुकानात असायचो. आमच्या दुकानाला काचेचे पार्टिशन असल्यामुळे जाता येता दुकानात काय चालू आहे हे रस्त्यावरून सहज दिसायचे.
कोमलची कामाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ७. साडेसात नंतरसुद्धा ती घरी पोहोचली नसल्यास तिचे बाबा दुकानात हजर होत असत. कधी कधी कोमल उशिरा थांबून आम्हाला असेम्ब्लीसाठी मदत करत असे. बाबा येवून बघायचे कितीजण आहेत. Smileमला कळायचे कि ते का येतात पण मी दुर्लक्ष करीत असे. तरण्या मुलीचे वडील काळजी करणारच.

एकदा एका क्लायण्ट ने घरी बोलाऊन घेतले. ते एका सोफ़्ट्वेअर कंपनी मध्ये मोठ्या पदावर होते. त्यांच्या घरातील पीसीचे काम आम्हिच केल्यामुळे ते मला व्यक्तिश: ओळखत होते. मला म्हणाले
"२०० डेस्कटोप हवेत, १५ दिवसात देऊ शकशील?
"का नाही सर?"
"ऐड्वान्स मिळणार नाही आणि पेमेंट ३ महिन्याने मिळेल, वर तुमचा एक माणूस आमच्याकडे एक वर्ष ठेवावा लागेल"
"चालेल सर"
मी आल्यावर कोमलला हि बातमी सांगितली, तिने तर आनंदाने उडीच मारली. खरं तर तिला एवढे आनंदित होण्यासारखे काहीच नव्हते. पण खूप खुश होती.
मी म्हणालो "कोमल, काही दिवस तुला उशिरापर्यंत थांबावे लागेल"
"चालेल"
"घरी विचारून घे बाबांना"
"ते मी बघते रे"
"ठीक आहे उद्या दुपारी सर्व समान येईल, उद्यापासून सुरवात करू"
"पण मी काय म्हणते विवेक"
"काय?"
"त्या गृहस्थांवर आपण नको तेव्हढा विश्वास तर टाकत नाही ना"
"आपण?"
ती ओशाळली, हा सर्व व्यवसाय ती स्वत:चा समजत होती. एका अर्थाने ते चांगलंच होतं
"आपण म्हणजे तू रे"
"हम्म, बघू, काय होईल फार तर? पैसे उशिरा मिळतील. आपण मार्जिन पण तशीच ठेवू ना.
"हम्म"
"या डील चे पैसे आल्यावर मी तुझे पेमेंट वाढवणार आहे."
"मी माझ्या पेमेंट बद्दल तुला कधी बोललेय का?"
"ठीक आहे, उद्यापासून सुरवात करू त्याआधी एक कोटेशन टाइप कर, त्यांना आजच नेउन द्यावे लागेल."
"ओके"

काम चालू झाले. पहिल्याच दिवशी हिचे बाबा साडेसातला हजर. हलायचे नाव घेइनात. बहुतेक कोमल ला सोबतच घेऊन जाणार.
मी म्हणालो, "काय काका?"
"नाही सहजच आलो, म्हटले काय चाललय बघून जावे, कोमल म्हणाली कि खूप मोठी ओर्डर आली आहे."
"बघूया कसं जमतंय ते. चहा घेणार?"
"नको"
"घ्या हो, कोमल, आपल्या सर्वांना चहा सांगतेस प्लीज?"
"चांगलाच जम बसलाय तुमचा"
"हो सद्यातरी चांगलं चालू आहे. पण धंदा बेभरवशाचा आहे."

बाबा चहा पिउन निघून गेले.

दुसऱ्या दिवशी साडेसातला बाबा परत हजर.
मी म्हणालो, "काय काका?"
"नाही सहजच. तरी किती दिवस काम चालेल?"
"माहित नाही. अजून कमीतकमी १५ दिवस तरी लागतील" (आयला म्हणजे हे रोज येणार कि काय? एवढाही विश्वास नाही? आमच्या दोघांबरोबर संध्याकाळी विलासहि असायचा दुकानात)
"ओके निघतो मी" इति बाबा
"अहो चहा घेऊन जा ना"
"नको"
"ठीक आहे, येत जा कधी कधी" (कधी कधीच येत जा,)

ती ओर्डर व्यवस्थित पार पडली. पैसेही वेळेवर मिळाले. ठरल्याप्रमाणे मी कोमलचे पेमेंट वाढवले. तीसुद्धा खुश होती. एकदा दुकानात दोघेच असताना मी म्हणालो, "कोमल, तुला एक विचारायचे आहे"
तिने चमकून माझ्याकडे पहिले आणि विचारले "काय?"
"एवढे दचकायला काय झाले?"
"नाही विचार ना"
"मी विचार करत होतो कि आपण आपला स्वतःचा ब्रांड काढला तर?"
"ओह, हे विचारायचे होते?"
"मग, तुला काय वाटले?"
"काही नाही जाउदे" (आयला हिपण तोच विचार करतेय का जो मी करतोय?)

हल्ली कोमलचे माझ्यावर बारीक लक्ष असायचे. मला कोणते फोन येतात, त्यात मुलींचे फोन कोणते, कधी कधी तर सरळ विचारायची,
"अरे सोनल म्हणून फोन आला होता तुझ्यासाठी, कोण आहेत ती?"
"हा ती मार्केटिंग डिपार्ट्मेण्ट ला आहे त्या साहेबांच्या कंपनी मध्ये"
"ओके"
"का ग?"
"नाही सहजच"

नेहमीप्रमाणे एकदा बाबा साडेसातला हजर. मी म्हणालो, "काका कोमल तर आत्ताच निघाली"
"हो मी पाहिली, मला तुमच्याशी बोलायचे आहे."
"बोलाना"
"तुम्ही पाटील म्हणजे नक्की कोण?"
"………. ?" (काय विचारायचे आहे नक्की यांना? जात?) मी गप्प
"म्हणजे कुठले पाटील?"
"आम्ही सौन्दळ चे पाटील. का हो?"
"नाही सहजच"
"चहा घेणार?"
"नको पुन्हा कधीतरी"

मी विचार करत होतो, यांचा विचार तरी काय आहे? मला कोमलच्या वागण्याबोलण्यातून संकेत मिळत होते. एखाद्या महिलेचा फोन असले तर तर तिचे कान टवकारलेले असत. मी जरा जास्त वेळ फोन वर बोलतोय असे वाटले कि ती अस्वस्थ होत असे. आजकाल तिचा टापटीपपणा कमालीचा वाढला होता. एक वेगळेच अत्तर वापरू लागली होती. अगदी धुंद करणारे.
एकदा विचारले, "काय ग, कोणता सेंट वापरतेस?"
"कारे तुला आवडला?"
"हम्म"
"देईन तुला आणून"
"माझ्यासाठी नको आणूस पण तू मात्र रोज हाच सेंट मारून येत जा"
यावर ती गोड गालातल्या गालात हसली

एकदा नेहमीप्रमाणे कोमल ऑफिस मध्ये नसताना तिचे बाबा आले.
मी म्हणालो, "काय काका?"
"काही नाही सहजच. मी काय म्हणत होतो…"
"काय?"
"आमची बयो ग्रजुएट झालेली आहे" (बहुतेक कोमलला घरी बयो म्हणत असावेत)
"हो माहित आहे मला"
"दिसायला हि सुंदर आहे"
"…………" (आता हे नवीन काहीतरी सान्गीतल्यासारखे काय सान्गताय? काय ते विचारा)
"तर मी म्हणत होतो कि…… "
"काय?" (मला आता धडकी भरली. एखाद्या गोष्ट बऱ्याच दिवसापासून मनात असेल आणि आता ती मिळण्याची वेळ जवळ आल्यावर जसा माणूस नर्वस होतो तसे झाले. अजून किती वेळ घेणार आहेत हे?)
"आम्ही परब, कणकवलीजवळ आमचे गाव आहे"
"ओके(????)"
"मी बयोसाठी स्थळ शोधत होतो"
"ओके" (अहो विचारा काय ते लवकर)
"तुम्ही एकदा बयोला घरी येउन बघून गेलात तर बरे होईल."
"अहो रोजच तर बघतो मी तिला इथे"
"अहो बयो, कोमलची धाकटी बहिण"

"काय??????"

(क्रमशः)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

छान! पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा! मस्त कलाटणी

ऐसीवर स्वागत! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!