तेलणीशी रुसला वेडा - मानवी स्वभावाची सामुहीक असहकार चळवळ

'अहं' बद्दल पुढेचर्चा करण्यापुर्वी या विषयावर बरच मंथन चिंतन करूनही मला स्वतःला याबाबत खुपसे सुधारता आलेले नाही ही माझी स्वतःची मर्यादा सुरवातीसच स्विकारून, समुहाचा घटक म्हणून मानवी समुह ते समुह सहसंबंधातील रुसवा फुगवा अभ्यासण्याच्या दृष्टीने काही लिहावे हा मनात विचार असतानाच संत तुकाराम महाराजांची खालील गाथा वाचनात आली.

तेलणीशी रुसला वेडा | रागेँ कोरडें खातो भिडा || 1 ||
आपुले चित्त आपण पाही | संकोच तो न धरी कांही || 2 ||
-संत तुकाराम (गाथा क्र. ५६)

एका व्यक्तीचे तेल विकणार्‍या तेलिणीशी भांडण झाले, तो तिच्यावर रुसला आणि तिच्याकडचे तेल विकत घ्यायचे नाही या अट्टाहासापोटी बिनतेलाचे कोरडे खाऊ लागला, हे उदाहरण अभंगात देऊन संत तुकाराम संकोच सोडून स्वहीत पाहण्याचा सल्ला देतात. राग आणि अंह यांचे नाते सुंभ आणि पिळ या सारखे असावे बर्‍याचदा रागही गळून जातो पण अहं सुटता सुटत नाही, अभिमान आणि अहंकार यातला फरक बर्‍याचदा कळत नाही अथवा कळूनही वळत नाही असेही होते. खेळप्रेमी किंवा खेळात सहभागी होणारेही एखादे अपयश खिलाडूवृत्तीने स्विकारूशकतीलच याचीही खात्री देता येत नाही, मग कमेंट करताना आधीच विनोद आहे हे आधीच सांगून 'ह. घ्या.' हे वेगळ नमुद करण्याची पाळी अनेकदा येताना दिसते. शब्द शब्द जपून फेक, दुखविशील कधी अनेक या ओळी आळवत स्वतःच्या अभिव्यक्तीवर केव्हा आणि कशी बंधने येऊन पडतात, किंवा आपणच ती आपली लादून घेतो ते कळेनासेच होते.

जेवढा इतिहास संघर्षांचा असेल तो दुखावलेल्या कोपर्‍यात नोंदवला आणि जागवला जात राहतो. सौहार्द विसरल जात. विश्वासाची जागा अविश्वास आणि कटूतेने केव्हा घेतली जाते ते आपले आपल्यालाच कळत नाही. खरेतर काळ्याकुट्ट ढगालाही चंदेरी किनार असते असे म्हणतात, परंतु एखादी व्यक्ती किंवा समुहाची एखाद्या किंवा काही गोष्टीत काही वावगे वाटले तर तेवढ्यापुरते ते नाकारून चांगले स्विकारावयास हवे हे कळले तरीही वळतेच असे नाही. बर्‍याचदा अमुक समुह, तमूक गोष्ट करतो किंवा करत नाही त्यावरून मी तमूक गोष्ट करावयाची कि नाही याचा निर्णय करत असतो, आपल्या गटातील इतरांना भाग पाडत असतो अथवा भाग पाडून घेत असतो. कपाळावर गंध (आजच्या काळात टिकली) न रेखाटलेल्या एका मुलीला तीची मैत्रिण कपाळावर गंध नाही लावलस, तू काय तमूक धर्माची आहेस ? असे विचारतानाचा संवाद किस्सा जरा जुना असला तरी अद्यापही चांगलाच आठवतो. तुम्ही अमूक धर्माचे आहात का तमूक धर्माचे आहात यावर शृंगार पोषाख आणि सांस्कृतीक निर्णय करणे, खास करून निष्ठांबद्दल विश्वास/अविश्वास तयार करणे, खरेच किती अत्यावश्यक असते?

प्रत्येक समुहाला वेगळी सांस्कृतीक ओळख असू नये असे नव्हे. पण दुसर्‍या समुहातील चांगल घेण्यासाठीच्या सांस्कृतीक देवाण घेवाणीवर टाकले जाणारे निर्बंध घालण्याचे समष्टीचे टोकाचे प्रयत्न अनेकदा अनाकलनीय असतात. धर्म आणि संस्कृतीची केली जाणारी गल्लत हा व्यक्तीशः मला कधीच न उमगलेला प्रकार आहे. उदाहरणार्थ रांगोळी, रंगपंचमी, राखी या वस्तुतः सांस्कृतीक गोष्टी आहेत विशीष्ट धर्माचे अथवा प्रदेशातील लोकच या गोष्टी करतात म्हणून इतर धर्मांतील लोकांनी ते टाळणे अथवा अमूक धर्मातले लोक केक खातात म्हणून तो आपण खाऊ नये हे असे स्वसमुहाच्या चांगल्या आनंदाला पारखे करून घेणे का होत असावे ? सांस्कृतीक देवाण घेवाण होतच नाहीत असे नाही पण ज्या दोन समुहात परस्पर अविश्वास असेल तेथे सांस्कृतीक ओळखी तटबंदीचेच काम करतात असे नव्हे तर दोन गटातील संघर्षात प्राणघातक सिद्ध होण्यासही कारणीभूत होत असतात.

या मानवी स्वभावाचा उपहासाचा प्रयत्न, मागे एका धागा लेखाच्या निमीत्ताने मी केला होता. काही अबकड भाषा वापरणार्‍या किंवा ग्रंथ लिहिणार्‍या हळक्षज्ञंनी मागच्या पिढ्यांवर अन्याय केला म्हणून अबकड भाषा अथवा त्याची लिपी किंवा अबकडच्या ग्रंथातील तमूक गोष्ट चांगली नव्हती म्हणून मी त्या ग्रंथकाराचे अथवा त्या भाषेतील सर्वच ज्ञान नाकारू इच्छितो असे आग्रह आणि अट्टाहासही पुर्वग्रहांवर आधारीत होताना आढळतात. किंवा अमुक समूहाच्या तमूक पुर्वजांनी ठमूक केले म्हणुन त्या समुहाच्या आजच्या वंशजांशी परकेपणा ते जीवघेणेपणा या विवीध स्तरीय भावनांवर काने फुंकत रहा दुष्वासाचे गाणे गात रहा ! हे म्हणजे बाळाच्या स्नानाच गढूळलेल पाणि फेकताना बाळालाही नाकारण्या सारखे नसते का ?

पुन्हा तेच, कळते पण वळत नाही, वर दिलेलाच संत तुकारामांचा अभंग चिंतनासाठी पुन्हा एकदा.

तेलणीशी रुसला वेडा | रागेँ कोरडें खातो भिडा || 1 ||
आपुले चित्त आपण पाही | संकोच तो न धरी कांही || 2 ||
-संत तुकाराम (गाथा क्र. ५६)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख मननीय वाटला. आवडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादासाठी धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.