गौप्यस्फोट

माझ लक्ष सारख सारख समोरच्या घराकडे जात होत. माझी पमा तिथे राहत होती. ३ महिने झाले तिला येथे येवून. जेव्हापासून आली तेव्हाच साला, आपल काळीज खलास झाल. काय गोड पोरगी आहे ती, कुणीही राजाचा राजकुमार येवून घेवून जाईल तिला. तिच्या घरात फक्त तीन माणसे ती नि तिचे आई वडील. ती कुर्ल्याला एका कंपनीत कामाला जाते आपल्या टिपरने आपल्याला सारी खबर पोहोचवलिय . साऱ्या एरियात माहित असते कि ह्या मन्याभाईचा तिच्यावर दिल आलाय. त्यामुळ कुणाची हिम्मत नाय तिच्या मागे लागायची.साला, आपली दहशतच अशी आहे. ह्या भागात दारूचे अड्डे, जुगाराचे अड्डे सारे आपल्या आशीर्वादाने चालतात.सगळ्या एरियात माहित आहे,हा मन्याभाई म्हणजे काय चीज आहे ते. आपुन असा तसा आंडू, पांडू नाय,उडत्या पाखराची पीस मोजणारा आहे हा मन्याभाई.

भाईच हल्ली कामात लक्ष नसत सारखा ह्या बिल्डींग समोरचा नाका पकडून बसतो हे आपल्या साऱ्या टोळीला माहित, सोबत दोन चार पंटर असतातच आपल्या.च्यायला तीन महिने झाले या पोरीला नुसता बघतोय पुढ जायचं कधी. पोरांमध्ये आपल्या इज्जतची आयझेड व्हायला नको म्हणून आज सकाळी सकाळी तिला विचारायचे ठरवले. ठेवणीतले कपडे घातले, गॉगल घातला नि तिच्या कामावर जायच्या टायमाला नाक्यावर जावून उभा राह्यलो.तेव्हड्यात ती येताना दिसली आपण तिच्या मागे मागे जावू लागलो सुनसान रस्ता पाहून तिला हाक मारली तिने झटकन वळून पहिले. मी तिला सरळ सरळ विचारले 'पमा, माझ्याशी लग्न करशील का? मी तुला ३ महिन्यापासून पाहतोय, मला तू खूप आवडतेस. तिचा चेहरा उग्र होत गेला. ती म्हणाली 'तू तो टपोरी ना जो आमच्या बिल्डींगच्या समोर सिगारेटी फुंकत बसतोस. तुझी लायकी तरी आहे का माझ्याशी बोलायची. लग्न तर दूरच राह्यले' . च्यायला अपमान ह्या मन्याभाईचा अपमान . डोक्यात कुणीतरी घणाचे घाव घालतंय अस वाटू लागल आपल्याला साला, च्यायला त्या पोरीला आपण लग्नाच विचारतोय तर ती आपली लायकी काढतेय. अरे कोणाची हिम्मत नाही.अरे कोणाची हिम्मत नाही ह्या एरीयात आपल्या नजरेला नजर भिडवायची नि हि पोरगी आपली लायकी काढतेय.तरातरा तेथून निघालो दारूच्या गुत्त्यावर गेलो. एक बाटली घशाखाली घातली.आपला रागरंग बघून सारा गुत्ता चिडीचूप झाला होता. त्यांना चांगला माहित आहे मन्याभाईचा मूड खराब असतो तेव्हा काय होते.

च्यायला त्या दिवसापासून स्वताला दारूत बुडवून घेतला. आपला पंटर पक्या आपल्यापाशी आला नि काय झाले म्हणून विचारू लागला. साला, हा पक्या म्हणजे आपला खास दोस्त आपण त्याच्या पासून काही बी लपवून ठेवत नाय. पक्याला सारा प्रकार सांगितला तो हि भडकला म्हणाला ‘भाई, हि पोरगी काय तुझ्याशी लग्न करत नाही हे पक्का.पण तिला चागला धडा शिकव,तुझी लायकी काढते म्हणजे काय’. च्यायला पक्याच आपल्याला पटले दुसऱ्या दिवशी त्या बिल्डींगखाली पक्याला घेवून उभा राहिलो. म्हातारा म्हातारी बाहेर गेले होते. पक्याला सांगितले तू इथे लक्ष ठेव. रात्रीचे आठ वाजले होते. तिच्या दाराबाहेर गेलो च्यायला लक पण जोरावर होते दार खुलेच होते.पक्याला मोबाईल केला तसा पक्याने बिल्डींगच्या मीटर बॉक्समधून फ्युजच काढून टाकला तसा तिच्या घरात शिरलो दार बंद केले .रुमालाचा बोळा तिच्या तोंडात कोंबला............ नंतर अर्ध्या तासाने आपण पक्याबरोबर गुत्त्यात होतो.'काय, भाई झाले काम पक्या बोलला. 'अरे, पक्या काम फत्ते माझी लायकी काढत होती. अरे मन्याभाई आहे मी कोणाला सोडत नाय'.

त्या दिवसानंतर पक्याला सांगितले कि त्या घरावर चांगली नजर ठेव काय लोचा होता कामा नये. परंतु नंतर हप्ताभर काहीच घडले नाही पमाने पोलिसात तक्रार दिली नव्हती. च्यायला आपल्याला वाटलेच होते मध्यमवर्गीय लोक हे. इज्जतीला जपणारे हे कसले पोलिसात तक्रार देणार. आणि देणार तरी कोणाविरुद्ध.कुणी रेप केला हे त्या पोरीलाच माहित नाही. साला आपण सगळी काळजी घेतली होती त्या दिवशी कपडेही काळे घातले होते त्यात अंधार साला डोळ्यात बोट घातले तरी दिसायचे नाही.साला आपल्याला ओळखणार कोण?. त्या गोष्टीला आज दोन महिने झाले होये नि अचानक पक्या आपल्याकडे आला नि म्हणाला भाई तुमच्याशी बोलायचय. पक्याला घेवून सुममधून बारमधून कल्टी मारली. पक्या म्हणाला, ‘भाई, काही तरी लोचा आहे’. ‘पक्या, जे झाले ते स्पष्ट सांग’. पक्या सांगू लागला, 'भाई, आपण त्या घरावर चांगली नजर ठेवली त्या घटनेनंतर पमाने तिच्या आईवडिलांना काही सांगितले नसावे असे वाटते, कारण दुसऱ्या दिवशी म्हातारा म्हातारी चांगली गप्पा मारत भेळ खात पार्कात बसली होती. पमा उदास दिसत होती पण तिने हे कुणाला सांगितले नसावे.परंतु महिन्यापासून मात्र ते लोक अस्वस्थ वाटू लागले. पमाने नोकरी सोडली रोज फिरायला जाणारे म्हातारा म्हातारी घराबाहेर पडेनासे झाले. म्हाताऱ्याला एकदा बाहेर बघितला पण टेन्शनमध्ये वाटत होता.भाई कालची गोष्ट जास्त महत्वाची आहे, कालच मी पमा नि तिच्या आईबापाला डॉक्टरकडे बघितले तिथला कंपाऊन्डर आपला खास आहे. त्याच्याकडून कळले किती प्रेग्नंट आहे भाई'.च्यायला आपल्याला धक्काच बसला, आपण अस काही होईल असा विचार केलाच नव्हता मी बाप बनणार होतो .रात्रभर खूप विचार केला नि आपला विचार पक्का झाला.

दुसऱ्या दिवशी मला पमा मेडिकलच्या दुकानात दिसली मी तिच्याकडे गेलो व परत तिला लग्नाची मागणी घातली. ह्यावेळी ती भडकली नाही पण उदासपणे म्हणाली हे शक्य नाही. पण आपण तिचा पिच्छा सोडला नाही शेवटी कंटाळून म्हणाली ह्याबाबत माझ्या घरच्यांशी बोला.
तिच्या घरी गेलो तर तिचा बाप म्हणाला, 'तुम्हाला, तिच्याशी लग्न करायचे ते ठीक आहे पण आम्ही सध्या अडचणीत आहोत. हे लग्न होवू शकत नाही. मी तिच्या बापाला म्हणालो, 'मामा, तुमचा प्रोब्लेम मला माहित आहे. तुम्ही ज्या डॉक्टरकडे पमाला घेवून गेला तेथून मला माहिती मिळालीय'. तिच्या बापाचा चेहरा उतरला डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.मी म्हणालो, 'मामा, माझे तुमच्या मुलीवर प्रेम आहे. मी तिच्याशी लग्न करेल तिला होणारे मुल हे मी माझे समजून वाढवेल. तुम्ही काही चिंता करू नका'. मी तेथे उभ्या असलेल्या पमाकडे पहिले तिच्या डोळ्यात कृतज्ञतेची भावना होती.

साध्या पद्धतीने आमचे लग्न झाले. लग्नानंतर ७ महिन्यांनी आमच्या संसारवेलीवर फुल उमलले मी एका गोंडस मुलाचा बाबा झालो. आता सारी गुंडगिरी मी सोडून दिली. जेथे आम्ही राहत होतो त्या विभागातून मी दुसऱ्या शहरात राहायला गेलो. ग्यारेज सुरु केले अफाट मेहनत केली. आता जवळपास ७ वर्षांनी मी पांढरपेशा मध्यमवर्गीय म्हणून गणला जावू लागलो. माझ्या ग्यारेज मध्ये जवळपास २५ जण कामाला होते . चांगला पैसा सुटत होता.पूर्वीचा गुंड मन्याभाई आता मनोजशेठ म्हणून ओळखला जावू लागला. आणि ह्या साऱ्याला कारणीभूत होती माझी पमा. तिच्या प्रेमाखातर मी वाईट मार्ग सोडले, मेहनत केली आणि आज मी ह्या शहरात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून जगतोय. आज माझ्या मुलाचा माझ्या प्रतीकचा एकविसावा वाढदिवस सारा बिझनेस तो सांभाळतोय. हल्ली माझी तब्बेत हि बरी राहत नाही. थकल्यासारखे वाटते डॉक्टर सुद्धा आराम करायला सांगतात .मी आता जवळपास साठी गाठलीय प्रतिकला त्याच्या वाढदिवशी भेट म्हणून मी माझी सारी इस्टेट त्याच्या नावावर केली हे मी पमालाही सांगितले तिनेही कबुली दिली. प्रतीकचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला इस्टेटीचे कागदपत्र मी त्याला दिले.

प्रतीकचा वाढदिवस झाल्यावर बरोबर चौथ्या दिवशी मला हृदयविकाराचा झटका आला. मी आयसीयुत होतो. डॉक्टरांनी सांगितले कि झटका सौम्य आहे पण काळजी घ्या. हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या डोळ्यासमोर सतत पमा दिसू लागली तिचा आपण विश्वासघात केलाय असे वाटू लागले. दुपारी जेवणाचा डबा घेवून पमा आली. पमाला म्हंटले 'पमा, बस. मला तुला काही सांगायचे आहे'. तिला आश्चर्य वाटल्यासारखे वाटले. मी तिला अत्यंत विषण्ण मनाने भूतकाळातील ती सारी घटना सांगितली नि माझ्या पापाची कबुली तिच्याकडे दिली नि अपराधी नजरेने तिच्याकडे पाहिले. पण तिची मुद्रा शांत होती इतका मोठा गौप्यस्फोट करूनही पमा शांत कशी याचे मला नवल वाटले. मी तिचा हात हातात घेवून विचारले, 'पमा, तुला माझा राग नाही ना आला . पमाने शांतपणे माझ्या हातातून तिचा हात काढून घेतला नि म्हणाली, 'मनोज, तुम्ही जे मला सांगितले ते मला आधीच माहित होते'. हा धक्का माझ्यासाठी मोठा होता .पमा शांतपणे सांगू लागली, 'ज्यावेळी लग्नानंतर पहिल्या रात्री तुम्ही माझ्याजवळ आलात, तेव्हाच मी ओळखले कि हि तीच व्यक्ती आहे जिने माझ्यावर बलात्कार केला. मला सारे ठावूक होते'.
मला भरून आले मी म्हणालो 'पमा, तू खरच मोठ्या मनाची आहेस. सारे माहित असूनही तू मला त्याची कधी जाणीव करून दिली नाही. मला माफ केलेस, मला वाटले कि मी आज मोठा गौप्यस्फोट करतोय पण तो फुसका बार निघाला, खरच स्त्रियांचं मन कुणीही ओळखू शकत नाही' नि मी समाधानाने हसलो.इतकी वर्ष मनावर जे ओझ होत ते हलक झाल्यासारखं वाटले.
इतक्यात पमाचा धीरगंभीर आवाज कानावर पडला, 'मलाही तुम्हाला काही सांगायचे आहे मनोज, इतक्या वर्षात मी तिचा असा आवाज एकला नव्हता पमा सांगू लागली, 'माझे कॉलेजात असल्यापासून एका उत्तरभारतीय युवकाबरोबर प्रेम प्रकरण चालू होते. माझ्या घरीही मी हे सांगितले होते. तो माझ्या घरी आला आमचे लग्न ठरल्यात जमा होते. त्यानंतर ती घटना घडली तू माझ्यावर रेप केलास. पण आईवडिलांना धक्का बसू नये म्हणून व ठरलेले लग्न मोडू नये म्हणून हि बातमी मी कोणालाही सांगितली नाही. आणि सांगून नाव तरी कुणाच घेणार. निराश मनाने गप्प बसले. मनातल्या मनात कुढत होते पण माझ्याकडे काही पर्यायही नव्हता.त्या घटनेनंतर जवळपास महिन्याभराने मी नि तो तरुण माथेरानला गेलो.तेथल्या आल्हाददाय हवेने रमणीय निसर्गाने माझ्या मनाला जराशी उभारी मिळाली. प्रफुल्लीत वाटू लागले. आमच्याकडून मर्यादेचे उल्लंघन झाले पण लग्न तर होणारच आहे ह्या विचाराने मला तेवढे अपराधी वाटले नाही. परंतु मुंबईला आल्यावर तो तरुण माझे फोन घेईनासा झाला. माझ्या एका मैत्रिणीकडून मला बातमी कळली कि त्याचे आधीच लग्न झालेले आहे नि तो त्याच्या गावीही निघून गेला. मी ह्या विश्वासघाताने कोसळून गेले. तेथेच चक्कर येवून कोसळले. नंतर डॉक्टरांकडे माझी ट्रीटमेंट सुरु झाली नि मला अजून एक धक्कादायक बातमी मिळाली मी गरोदर असल्याची. मी खचून गेले त्याचवेळेस तुम्ही आलात नि मला लग्नाची मागणी घातली मी आईवडिलांबरोबर विचार केला नि तुमच्याशी लग्न करायचे नक्की केले. अर्थात तेव्हा मला हे माहित नव्हते कि तुम्हीच ती व्यक्ती आहात ज्याने माझ्यावर रेप केला..
हे एकून मी सुन्न झालो म्हणालो, 'पमा, जे झाल ते झाल. आता आपण ते सार विसरूया.
'मनोज पण एक तुम्हाला सांगायचच राहील'. काय? मी प्रश्नार्थक मुद्रेने विचारले. कानात गरम शिसे ओतावे तसे तिचे शब्द आले 'प्रतिक, हा तुमचा मुलगा नाही माझ्या त्या प्रियकराचा मुलगा आहे' 'काय?.......... मी जवळजवळ किंचाळलोच, ‘नाही, पमा तू खोट बोलतेस पमा, तू खोट बोलतेस हे शक्य नाही. तू माझ्यावरच्या रागातून हे बोलत आहेस मी थरथरू लागलो. 'मनोज, मुलाचा बाप कोण आहे हे फक्त त्याची आईच सांगू शकते. नि तू त्याचा बाप नाही आहेस हे सत्य आहे.'
एवढे बोलून पमा रुमच्या बाहेर निघून गेली.

नि सारे शरीर सुन्न करणारी जीवघेणी कळ माझ्या छातीत जाणवू लागली.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

गौप्यस्फोट आणि सचीन.....
ईथे पण होऊन जाऊ दे एक हंगामा.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुहास

झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो

मस्त जमलीय कथा !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0