पोलिटिंगल भाग ४ : तुच्छकटिक अर्थात तुट्शकटिक

पोलिटिंगल - भाग १, भाग २, भाग ३
(अतिशहाणा यांचा 'शपथविधी' हा धागा आल्यावर त्यांनी अशा लेखनाचं एक सदर ऐसीसाठी सुरू करावं अशी गळ मी घातली. मग त्यावरून झालेल्या चर्चेत एकमेकांना कल्पना देणं, लेखांमध्ये सुधारणा सुचवणं असं करत 'एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ' या तत्त्वावर दोघांनी मिळून हे सदर सुरू करावं असं ठरलं. आठवड्याला किमान एक लेख लिहायचा असल्यास एकावरच ताण येऊ नये म्हणूनही हे कोलॅबोरेशन सोयीचं ठरेल. या मालिकेतलं माझ्यातर्फे एक पुष्प.)

शहरात एकच जल्लोष माजला होता. दीपावली संपून दोन आठवडे झाले तरी राजमहाल असंख्य दिव्यांच्या रोषणाईने झळाळून उठला होता. सुमंगल भगव्या रंगाची वस्त्रे ल्यायलेले नागरिक एकमेकांना संत्रिका-बर्फी वाटण्यात मश्गुल झाले होते. त्यांच्या सोज्ज्वळ नागरिकपत्नींनी आपल्या दारासमोर पुनश्च सडासंमार्जन करून भगव्या, केशरी, शेंदरी व नारिंगी अशा विविध रंगांच्या रंगीबेरंगी छटांनी उत्तमोत्तम रांगोळ्या घालून घराला सजवीत होत्या. दीपावलीसाठी वापरून झालेले लालसर पिवळे आणि पिवळसर लाल कंदील पुन्हा एकदा घरोघरी प्रज्वलित झाले होते. गुढ्या, तोरणे, पताका यांनी शहरातील दारे खिडक्या सजल्या होत्या. वातावरणात सनई-चौघड्यांचा आवाज आणि धूप-अगरबत्त्यांचा वास भरून राहिला होता.

अशा मंगल प्रसंगी मात्र एक व्यक्ती अत्यंत विचित्र मनस्थितीत होती. राजमहालात राजाच्या शेजारी बसण्याचा तिचा मान पण ती आज विरोधागारात धुसफुसत बसलेली होती.

"वसंतसेने..." तिच्या प्रियतम सखीच्या आवाजाने ती भानावर आली. मात्र अजूनही काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही हे तिच्या सखीने ताडले.
"इतक्या उत्सवी वातावरणात तू अशी म्लान चेहऱ्याने का बसून आहेस?" सखी तिला बोलते करण्याच्या उद्देशाने म्हणाली.
"हे मी तुला सांगायला का हवे?" आपल्या हृदयाला असलेला सल तिच्या स्वरात न उमटता तरच नवल.
"पण दुःख तरी किती काळ करणार? राजाधिराज देवेंद्रांच्या..."
"त्यांचे नावही काढू नकोस माझ्यासमोर!" वसंतसेना त्वेषाने उच्चरवात वदती झाली. "महोद्यानात जेव्हा त्यांचा राज्यस्वीकार समारंभ झाला तेव्हा त्यांनी मला शेजारी बसू देण्याच्या विनंतीकडेही दुर्लक्ष केले. त्याआधीच्या राज्यस्पर्धेच्या वेळी जे वर्तन त्यांनी केले ते मी कदापिही विसरू शकत नाही. इतकी वर्षे चढ-उताराच्या काळात एकमेकांचा साथ सोडला नाही. मात्र आता माझे भाग्य फिरल्यावर मात्र मला असे कस्पटासमान वागवले जाते. माझी अस्मिता अशी दुखावल्यावर मी आनंदी राहीन अशी अपेक्षाच कशी करतेस तू?"
"पण झाले गेले होऊन गेले. आता त्याबाबत शोक करून फायदा काय?" सखीने तिला पुन्हा समजुतीचे दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न केला.
"झाले गेले? परवाचे महोद्यानातले वर्तन एकवेळ क्षम्य होते. पण आज सभागृहात काय घडले ते पाहिले नाहीस का? त्यांनी राजप्रतिनिधींना केवळ विचारल्यासारखे केले. त्यांच्याच गटातल्यांनी त्यांना आवाजी होकार दिला. आणि माझा आवाजही उमटण्याच्या आत त्यांच्या राजपदावर शिक्कामोर्तब झाले. माझ्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यासाठीच हा डाव रचलेला होता. आणि हे केवळ त्या शरच्चंद्रिकेपायी..."
"पण राजमहालाच्या राजकारणात कधी एकीचा हात धरणे, दुसरीचा सोडणे हे होतेच" सखीने पुन्हा सामोपचाराने घेऊ पाहिले.
"पण तिचा हात जन्मात कधी धरणार नाही असे कबुतरातर्फे जनतेला जाहीर निरोप पाठवून सांगणारे देवेंद्रराजे हेच का? आणि तीही अशी लोचट, की देवेंद्रांचा जय होतो आहे हे पाहताच आपले तनमन एकतर्फी अर्पण करते आहे असे भर सभेत सांगून बसली. त्यामुळे माझ्याकडे ६३ कला असूनही तिलाच ते हाताशी धरत आहेत."

वसंतसेनेचा क्रोध वाढतच जात आहे हे पाहून सखीने आपले बोलणे आवरते घेतले. काही काळाने पुन्हा एकदा वसंतसेनेची विचारपूस करावी म्हणून विरोधागारात डोकावून पाहते तो काय, वसंतसेना प्रफुल्लित दिसली. अनेक नोकर विरोधागारातले सामान बांधून ठेवत होते.
"काय गं, काय झाले?"
"माझ्या देवेंद्राने मला "तू माझीच आहेस, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तुला हवे ते देतो." असा निरोप पाठवला आहे! आता मी राजमहाली हक्काने राहायला जाणार." सखीला मिठी मारत ती हर्षोत्फुल्ल होत्साती म्हणाली. त्या मिठीतून ती सुटते तोच एक नोकर काहीशा गंभीर चेहऱ्याने आत आला आणि वसंतसेनेच्या कानात काहीतरी पुटपुटला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात मावळला, आणि त्याची जागा राग व दुःखातिशयाच्या मिश्रणाने घेतली.
"पुन्हा सामान जागच्याजागी ठेवा" तिने रागातच नोकरांना आज्ञा केली. देवेंद्रराजांकडून काहीतरी अप्रिय निरोप आला असावा हे सखीने मनोमन जाणले. आणि मगाचचा प्रसंग टाळण्यासाठी काही कामाची सबब सांगून ती निघून गेली.

वसंतसेनेची काळजी वाटणे मात्र कमी झाले नाही. म्हणून ती विरोधागाराच्या द्वारापाशी अनेक वेळा घुटमळली. निरोपे आतबाहेर करत होते. दरवेळी डोकावले असता वसंतसेना कधी आनंदाने नोकरांना सामान बांधायला सांगत असे, तर कधी निरोप्या काही सांगून गेल्यावर शोकाकुल होऊन पडत असे. सामान बांधणे व सामान जागेवर ठेवणे असे एकापाठोपाठ अनेक वेळा करावे लागणार आहे हे नोकरांनी नाईलाजाने स्वीकारले होते.

तिच्या सखीनेही एकंदरीत वातावरण पाहून काही दिवसांनी एकदा सोक्षमोक्ष लागला की मगच भेटू असे मनाशी ठरवले. वसंतसेनेचा विचार तिने मनातून काढून टाकला आणि ती शहराची रोषणाई पाहण्यात मग्न झाली.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

रामराज्यकालीन परंपरा ह्यापुढे नव्याने जागृत करण्यासाठी देशाची राजधानी इन्द्रप्रस्थ, तसे प्रान्तोप्रान्तीच्या मोहमयीसारख्या राजधान्यांमध्ये क्रोधागारांची निर्मिति केली जावी असे आदेश सार्वभौम सम्राट् नरेन्द्र ह्यांच्याकडून सामन्त देवेन्द्र इत्यादींना पाठविण्यात आले आहेत अशी आतली वार्ता आहे. राजवल्लभा होऊ इच्छिणार्‍या अनेक चन्द्रबिम्बानना प्रान्ताप्रान्तामध्ये विपुल संख्येने असल्याने त्यांची क्रोधदर्शनाची उत्तम व्यवस्था होईल, तसेच क्रोधतप्त कोण आहे आणि कोण नाही हेहि प्रजेला वेळोवेळी कळत राहील असे ह्यामागचे उद्दिष्ट असल्याचे बोलले जात आहे.

तसेच 'उद्धवा शान्तवन कर जा त्या गोकुळवासि जनांचे' असे सामन्त देवेन्द्रांचे सन्देश घेऊन अनेक सान्धिविग्रहिक वसन्तसेनेकडे गमनागमन करीत आहेत अशी वार्ताहि कर्णी येत आहे. असे न केल्यास अशाश्वत कालापर्यंत क्रोधागारातच ठेवले जाईल अशी गर्भित चेतावणीहि ह्यामागे असावी असा होरा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान अॅडिशन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सार्वभौम सम्राट् नरेन्द्र ह्यांच्याकडून सामन्त देवेन्द्र

हे मस्तच. आपल्या गल्लीत राजा असलेला माणूस दिल्लीत सरदार, सामन्त म्हणूनच ओळखला जातो. तेव्हा या सम्राट-सामंतांच्या संबंधांविषयीही काही लिहीन म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहा!

ROFL

तुफान मजा आली! ही लेखमाला येणारे त्याचाही आनंद झाला. शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लॉल :-D.
लेखमालेची कल्पना भारीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

सदरच चालू केलंत हे ब्येस केलंत. पण चित्राची उणीव जाणवते बा. उसनं तर उसनं, चित्र आणा... भगव्या वस्त्रांतली हाती मोडका बाण घेतलेली वसंतसेना बघायलाही मजा आली असती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन