Skip to main content

अनश्व रथ, पुष्पक विमान आणि आपण सर्व - रवींद्र रु. पं. : लेखांक पहिला

'आजचा सुधारक' या मासिकात रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१४ या तीन अंकात 'अनश्व रथ, पुष्पक विमान व आपण सर्व' या शीर्षकाची एक लेखमाला लिहिली आहे. संघ ह्या विषयावर आतापर्यंत पुरोगाम्यांनी केलेले विश्लेषण अपुरे व सदोष आहे, त्यात आत्मटीकेचा अभाव आहे असे वाटल्याने रवींद्र यांनी हे लेखन केले आहे. हे लेख वाचल्यावर मला असं वाटलं की 'ऐसी अक्षरे'वर ते शेअर करावेत. 'ऐसी अक्षरे'च्या वाचकांना हे लेख आवडतील आणि त्यातून एक चांगलं विचारमंथन घडेल असं मला वाटतं. त्यामुळे रवींद्र रू. पं. यांच्या परवानगीने हे लेख इथे मी शेअर करतो आहे. सुरेश द्वादशीवार यांची 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकातील मुलाखत, रमताराम यांची समाजवादी राजकारणाच्या संदर्भातली लेखमाला याच्या पार्श्वभूमीवर हे लेखही वाचकांना मननीय वाटतील अशी आशा आहे.

- उत्पल

------------------------------------------------------------------------------------------------------------

नमोयुगाचे शंभर दिवस उलटून गेले आहेत. ह्या शंभर दिवसात कोणताही चमत्कार घडून आलेला नाही. स्विस बँकेत लपवलेला काळा पैसा भारतात येईल व त्यामुळे भारताची आर्थिक विवंचना संपेल असे मानणाऱ्यांची निराशा झाली आहे. सरकारी कचेऱ्या, बाजार – कोठेही परिवर्तनाच्या ख्नाणाखुणा दिसत नाहीत. परराष्ट्रधोरणाच्या बाबतीतही नमो सरकार (इस्रायलच्या निषेधास दिलेल्या नकाराचा अपवाद वगळता) पूर्वीचेच धोरण पुढेचा लवील अशी चिन्हे दिसत आहेत. निवडणुकीपूर्वी राणा भीमदेवी थाटात जगातील सर्व विषयांवर भाष्य करणारे नमो आता बोलण्याच्या बाबतीत मनमोहनसिंगांचा वारसा चालवीत असल्याचा भास होतो. त्यांची अलीकडील भाषणे ऐकून तर ते रोज सकाळी उठल्यावर ते ‘मथ्था टेकायला’ राजघाटावर जात असावेत, अशीही शंका येते. (आता नमो हेच गांधींचे खरे वारसदार असल्याचा साक्षात्कार होऊन कॉंग्रेसच्या बुडत्या जहाजातील आणखी काही उंदीर, तसेच काही काही भाबडे(?) सर्वोदयी भाजपच्या वळचणीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.) ह्या सर्व घडामोडींमुळे पुरोगामी मंडळीनी हुश्श केले आहे.

नाही म्हणायला टमाट्याच्या भावाने गाठलेली शंभरी, स्मृती इराणीबाईंची झटपट पदवी आणि परमगुरु दीनानाथ बात्रा ह्यांच्या सौजन्याने गुजराथेत सुरू असणारे मूल्यशिक्षणाचे प्रयोग ह्यांच्यामुळे पुरोगाम्यांना चघळायला नवे विषय मिळाले आहेत. त्यांच्यावरून नमो सरकारला उघडे पाडता येईल, जनमानसातील त्याची प्रतिमा मलिन होईल अशी स्वप्नेही त्यांना पडू लागली आहेत. पण ते तेवढे सोपे नाही. महागाईमुळे निर्माण होणारा क्षणिक असंतोष वगळता अश्या कोणत्याही गोष्टीमुळे जनमानस फारसे क्षुब्ध होत नाही. प्राचीन काळी भारतातील रस्त्यांवरून मोटारी (अनश्व रथ), तर आकाशातून पुष्पकादि विमाने फिरत असत ह्या गोष्टींचे हसू येण्याऐवजी त्यावर भाबडा विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या गेल्या काही दशकांत अमाप वाढली आहे. ताजमहालहे मुळात तेजोमहालय नावाचे शिवमंदिर होते, अश्या तद्दन खोट्या कहाण्या आता जनमानसात रुजल्या आहेत. पूर्वी सारे काही आलबेल होते, सोन्याचा धूर निघत होता, स्त्रियांना स्वतंत्र व समान दर्जाहोता, मुसलमानी आक्रमक आले आणि सर्व बरबादी झाली; असा इतिहासाचा सोपा (पण खोटा) अर्थ कोट्यवधींच्या मनातनमोराज्य येण्यापूर्वीच दृढमूल झाला आहे. ह्याचे श्रेय बात्रा-पुरंदरे-ओक ह्यासारख्यांच्या अथक परिश्रमाला जितके आहे, तितकेच ते भारतीय परंपरा नेमकी काय हे समजू न शकलेल्या पुरोगाम्यांच्या अविचारीपणाला व दुराग्रहालाही आहे.

एकीकडे भाजपचा मुकाबला राजकीय पातळीवर करू शकणारी कॉंग्रेस आजही पराभूत मनस्थितीत व अपंगावस्थेत आहे, दुसरीकडे केडरबेस असणारे, पण आपल्या राजकीय भूमिकेविषयी कायम संभ्रमावस्थेत असलेले डावे आता राजकीयदृष्ट्या कालबाह्य ठरले आहेत. कॉंग्रेसच्या भ्रष्ट व संधिसाधू राजकारणाला कंटाळलेली व एकूणच सांसदीय लोकशाहीबद्दल निराश झालेली जनता नमोंकडे तारणहार म्हणून बघते आहे. त्यासाठी त्यांनी ह्या देशातील लोकशाही परंपरा, निधर्मीवाद ह्यांना तिलांजली दिली तरी जनसामान्यांना फारसे दुःख होणार नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुता, निधर्मीवाद व मुख्य म्हणजे ह्या देशातील बहुविधता ह्या साऱ्यांचे महत्त्व जाणणारी, वंचित शोषितांच्या उत्थानासाठी आग्रही असणारी अशी जी मंडळी आहेत (ज्यांना स्थूलमानाने ‘पुरोगामी’ अशी संज्ञा आहे) ती आज व्यथित आहेत खरी; पण दुसरीकडे ती आजच्या परिस्थितीचे आकलन करून घेण्यात कमीही पडत आहेत. ह्याचे कारण त्यांची निष्क्रियता हेच आहे. गेली अनेक दशके संघ परिवाराने पद्धतशीरपणे केलेल्या कृतींना प्रतिक्रिया देणे हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम राहिला आहे. पुढाकार घेऊन कृती करणे, सातत्याने चालणारा कार्यक्रम राबविणे ह्यांचा त्यांना विसर पडला आहे. इ. स. १९७७ च्या जनता प्रयोगाचे अपयश व त्यानंतर बाबरीविध्वंस ह्या दोन तडाख्यांमधून ते अद्याप सावरलेलेच नाहीत. पूर्वी रा. स्व. संघाचे सामर्थ्य व मर्यादा ह्यांचे योग्य विशेषण करू शकणारे मधु लिमयांसारखे विचारवंत पुरोगामी प्रवाहात होते. पण बाबरीसंहारानंतरचा संघ परिवार व नमो ही दोन्ही रसायने अगदी वेगळी आहेत आणि त्यांचे यथायोग्य विश्लेषण करू शकणारी प्रयोगशाळा पुरोगाम्यांकडे नाही, ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे नमोंच्या १५ ऑगस्टच्या भाषणात दाटून येणारे सात्त्विक भाव, मोहन भागवतांचे ‘हिंदुस्तानात राहणारे ते सर्व हिंदू’ असे वक्तव्य, नमो सरकारने परदेशस्थ कंपन्यांना केलेले ‘भारतात येऊन कमवा’चे आवाहन व उत्तर प्रदेशात मध्यम पट्टीत सातत्याने केल्या जाणाऱ्या दंग्यांचे सुनियोजित व्यवस्थापन अश्या एकाच वेळी घडणाऱ्यासर्व ग्लोकल हालचालींचा अन्वयार्थ लावणे त्यांना शक्य होत नाही. शंकराचार्यांनी ‘साईबाबा हे देव नाहीत’ असे वक्तव्य का करावे आणि पंतप्रधानांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्याची औपचारिकता का निभावू नये हे जसे त्यांना कळत नाही, तसेच त्यांचे परस्परांशी असणारे नातेही समजून घेता येत नाही, कारण संघ परिवाराबद्दल एका विशिष्ट चौकटीतच विचार करण्याची त्यांना सवय झाली आहे.

अशा परिस्थितीत, संघ परिवार व नमो ह्यांच्या उक्ती-कृतीमागील खरा कार्यकारणभाव समजून घेणे केवळ पुरोगाम्यांसाठीच नव्हे, तर सर्व विचारी नागरिकांसाठी आवश्यक आहे, कारण आपली इच्छा असो वा नसो, देशाचे वर्तमान व भविष्य ह्या दोन घटकांवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इतकेच नव्हे, तर ह्या देशाच्या भूतकाळाविषयी भावी पिढ्यांना काय सांगितले जावे हे ठरविण्यातदेखील त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्या दृष्टीने प्रस्तुत लेखात हिंदुराष्ट्राचा विचार व त्याचा गांधीविचाराशी असणारा संघर्ष ह्यांचा परामर्श घेतला आहे.

‘हिंदू हा मुळात धर्मच नाही’:

ह्या सर्व गोष्टींचा अन्वयार्थ लावण्यासाठी आपण थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे. रा. स्व. संघाचा जन्म १९२५ सालचा. मुस्लीम लीग १९०६ साली स्थापन झाली. हिंदुहितासाठी वेगळ्या संघटनेची गरज १९२०च्या दशकापूर्वी भासली नव्हती, कारण तत्कालीन काँग्रेसमध्ये हिंदुहिताचे प्रतिनिधित्व करणारे बरेच लोक होते. मुळात हिंदू नावाच्या अस्मितेचा जन्मच इंग्रजांच्या आगमनानंतर झाला. त्यापूर्वी ह्या देशात मराठे, राजपूत, रोहिले, जाट इ. राहत असत. हिंदू धर्म नावाची एकजिनसी गोष्टच कधी अस्तित्वात नव्हती. इस्लाम, ख्रिश्चन धर्म ह्यांप्रमाणे एक देव, एक धर्मग्रंथ, एक उपसनागृह, उपासनेची एकच पद्धत - असे काहीही हिंदू ‘धर्मा’त नव्हते. तेह्तीस प्रकारच्या (कोटी म्हणजे प्रकार) देवदेवतांची, हजारो प्रकारच्या उपासनापद्धतींची, जातिव्यवस्थेच्या जन्मजात तुरुंगात बद्ध अशी ही (भालचंद्र नेमाडेंच्या शब्दात सांगायचे तर) ‘समृद्ध अडगळ’, तिच्या सर्वसमावेशकत्वामुळे हजारो वर्षे ह्या उपखंडात तगून होती. जातीआधारित स्वयंपूर्ण, विकेंद्रित कृषीकेंद्री ग्रामव्यवस्था हे तिचे व्यवच्छेदक लक्षण. शक, कुशाण हूणांपासून मुस्लिमांपर्यंत अनेक आक्रमक येथे आले व ह्या व्यवस्थेचा भाग होऊन गेले. मोगलांनीदेखील येथील उत्पादनव्यवस्था व उपासनापद्धती ह्यांना हात लावला नाही. ‘हिंदू’ हे नाव सिंधूपलीकडच्या लोकांनी अलीकडच्या लोकांना दिले होते, हे आपण जाणतोच. म्हणजे मुळात ही प्रादेशिक/ भौगोलिक स्थाननिदर्शक संज्ञा. स्वयंपूर्ण, आत्मलीन अशा ह्या गावगाड्याला बाह्य परिस्थितीशी काहीच घेणे देणे नव्हते. त्यामुळे राज्यकर्त्याचा धर्म कोणता, हा प्रश्न त्याला कधी पडला नाही. इथला शूद्र जातिव्यवस्थेला कंटाळून किंवा ब्राह्मण-क्षत्रिय पदाच्या लोभाने मुसलमान झाला, तरी उपासनापद्धती सोडल्यास त्याच्या आयुष्यक्रमात फारसा फरक पडत नसे. म्हणूनच हिंदू वा मुसलमान असणे ही ओळख ब्रिटीशपूर्व काळात महत्त्वाची नव्हती. ब्रिटिशांनी १८७१ मध्ये प्रथम जनगणना घेतली, तेव्हा मुसलमान, पारशी, ख्रिश्चन नसणाऱ्या समूहांना संबोधण्यासाठी ‘हिंदू’ हे नाम प्रथम वापरले गेले.

मात्रइंग्रजांच्या आगमनामुळे हे चित्र बदलले. येथील समाज पार ढवळला गेला. कारण आपल्या व्यापारी हितसंबंधांच्या रक्षणासाठी येथील स्वयंपूर्ण व विकसित उत्पादनतंत्र मोडकळीस आणणे इंग्रजांना आवश्यक होते. हे सारे करताना त्यांनी आव आणला तो मात्र एतद्देशीय जनतेच्या उद्धाराचा. इथल्या‘रानटी’ प्रजेला सुसंस्कृत करणे ही जणू त्यांच्यावर आकाशातील देवाने सोपवलेली जबाबदारी असावी, असे त्यांनी भासविले. त्यांच्यामुळे येथील व्यवस्थेला हादरा बसला व ती अंतर्मुख होऊन विचार करण्यास बाध्य झाली. ब्रिटीश हुकुमतीने उभ्या केलेल्या प्रश्नांना स्थानिक व्यवस्थेने दिलेला प्रतिसाद स्थूलमानानेतीन प्रकारचा होता:
१. सुधारणावादी- आपल्या समाजात अनेक अनिष्ट, कालबाह्य रूढी-परंपरा आहेत. वैज्ञानिक विचारांचा, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा स्पर्शही आपल्याला झालेला नाही. म्हणून आपण आपल्या समाजात सुधारणा करावी अशी प्रेरणा इंग्रजी विद्या शिकलेल्या काही जणांत जागली. बंगाल व महाराष्ट्र त्यात आघाडीवर होते. त्यामागे विविध समाजगटांच्या वेगवेगळ्या प्रेरणा होत्या. काहींच्या मनात आपल्या समाजातील सती, बालविवाह, केशवपन ह्यांसारख्या स्त्रीविरोधी रूढींविषयी चीड होती, कुणाला येथील समाजातील साचलेपणाबद्दल, जातिव्यवस्थेतील अन्यायाबद्दल संताप होता. त्याचप्रमाणे इंग्रज हे थोर, आदर्श; म्हणून आपणही ‘साहेबासारखे’ व्हावे, अशी मध्यमवर्गीय प्रेरणाही त्यामागे होती.

२. पुनरुज्जीवनवादी – हिंदू-मुस्लिम समाजातील उच्च वर्गाने एके काळी येथे राज्य केले होते. ते इंग्रजांनी हिरावून घेतले एव्हढेच नव्हे तर त्यांनी आपल्या थोर संस्कृतीची अवहेलना केली, म्हणून त्यांचा पाडाव करून ह्या भूमीला गतकाळाचे वैभव प्राप्त करून देणे आपले परमकर्तव्य आहे, असे काहींना वाटले. उत्तर भारतातील पूर्वीचे नवाब-सरदार व प. महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील काही वर्ग ह्या विचारांचा होता. ह्याच प्रेरणेची परिणती पुढे मुस्लिम राष्ट्रवाद व हिंदू राष्ट्रवाद ह्यांत झाली.
३. नवोन्मेषी परंपरावादी–गांधीजींनी ह्या दोन्ही प्रवाहातील उत्तम ते ग्रहण करीत वेगळाच मार्ग अनुसरला. ते स्वतःला ‘सनातनी हिंदू’ मानत होते. संस्कृती काय आहे हे आम्हाला लुटारू इंग्रजांकडून शिकण्याची गरज नाही, अशी त्यांची भूमिका होती. आपल्या परंपरांचे समर्थन करताना गांधींनी आपल्या बहुविध संचितातील नेमक्या उदारमतवादी, खुल्या परंपरा निवडल्या, किंवा जुन्या परंपरांचा अतिशय नाविन्यपूर्ण अर्थ लावला. त्यांनी वैष्णवाची, पर्यायाने हिंदू माणसाची व्याख्याच ‘वैष्णव जन तो तेणे कहिये जो पीड परायी जाणे रे’ अशी केल्यामुळे परधर्मीयांचा द्वेष करण्याचा हिंदू असण्याशी संबंधच उरला नाही. हिंदू परंपरेतील ‘ईश्वर हेच सत्य’ ही संकल्पना उलटी करून त्यांनी ‘सत्य हाच ईश्वर’ असे मांडल्यामुळे चिकित्सेचा, सत्यशोधाचा, अनेकविध पर्यायांचा मार्ग खुला झाला. आम्हाला आमच्या समाजात सुधारणा करायची आहे, पण ती इंग्रजांसारखे होण्यासाठी नाही, तर आत्मोद्धारासाठी, आमचा समाज उन्नत करण्यासाठी, अशी त्यांची धारणा होती. इंग्रज आमच्यावर राज्य करू शकतात, ह्याचे कारण त्यांचे शस्त्रबळ किंवा तंत्रज्ञान-विज्ञानावरील त्यांची पकड हे नसून आमची गुलाम मनोवृत्तीच आहे. ती त्यजली, तर त्यांना आमच्यावर राज्य करणे अशक्य होईल असे त्यांनी मांडले. तसे करताना त्यांनी कोणत्याही अंधश्रद्धेला थारा दिला नाही की देवळे, तीर्थस्थळे ह्यांचे महात्म्य वाढविले नाही. परंपरांचा अभिमान बाळगताना त्यांनी दाखविलेला मूल्यविवेक आणि जुन्या परंपरांना नवा अर्थ देण्याची त्यांची नवोन्मेषी (इनोव्हेटिव) वृत्ती ह्यामुळे ते पुनरुज्जीवनवाद्यांपासून वेगळे ठरतात.

टिळकयुगाच्या अस्तानंतर व गांधीयुगाच्या प्रारंभानंतर पुनरुज्जीवनवादी हिंदूंना येणाऱ्या बदलांची चाहूल लागली. वर उल्लेखिल्याप्रमाणे गांधीनी स्वतःला परंपराप्रिय सनातनी हिंदू घोषित केल्यामुळे पुनरुज्जीवनवादी हिंदूंचा सारा राजकीय अवकाश त्यांनी व्यापला. शिवाय ‘जात’ हा शब्दही न उच्चारता त्यांच्या ग्रामोद्योगाला चालना देण्याच्या, स्थानिक भाषेत कॉंग्रेसचा व्यवहार चालविण्याच्या आग्रहामुळे, पक्षाचे नेतृत्व उच्चवर्गीय – उच्चजातीय सुशिक्षितांकडून उत्पादक जातींकडे (आजच्या भाषेत ओबीसींकडे) सरकले. कॉंग्रेस खऱ्या अर्थाने ‘तेल्या-तांबोळ्यांची’ झाली. कॉंग्रेसमधील मदनमोहन मालवीयांसारख्या परंपरानिष्ठ नेत्यांनाही पक्षाचे बदलते रूप व गांधीचे नेतृत्व स्वीकारावे लागले. त्यामुळे टिळकांच्या मृत्यूनंतर लौकरच पुनरुज्जीवनवादी हिंदू नेतृत्वाला, ‘कॉंग्रेस आता आपल्या हितसंबंधांचे रक्षण करू शकणार नाही’ अशी जाणीव झाली. त्याचाच परिणाम म्हणून त्यानंतर अवघ्या पाच वर्षात रा. स्व. संघाची स्थापना झाली. तेव्हापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या २२ वर्षांत संघाने कधीही स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला नाही. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार एके काळी कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते, पण संघस्थापनेनंतर त्यांचा चळवळीशी संबंध संपला. हिंदुराष्ट्रवादाचे प्रणेते स्वा. सावरकरसशस्त्र क्रांतीच्या लढ्यात सक्रिय होते. त्यासाठी त्यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची सजा झाली व त्यात अपार कष्ट सहन करावे लागले. परंतु, त्यांच्या मुक्ततेची पूर्वअटच त्यांनी स्वातंत्र्य-चळवळीपासून दूर राहणे ही असल्यामुळे, सुटकेनंतर त्यांचाही त्याच्याशी संबंध संपला.

गांधींच्या उदयामुळे आंदोलनाचे सशस्त्रपर्व संपुष्टात आले व व्यापक प्रमाणावर अहिंसक चळवळ सुरू झाली. गांधींचा सर्वधर्मसमभाव, इतिहासाचा अन्वयार्थ व भविष्याचा वेध घेण्याची त्यांची दृष्टी सावरकरांच्या जीवनदृष्टीच्या पूर्णतया विरोधात होती. म्हणून सावरकर व हिंदू महासभा गांधीप्रणीत स्वातंत्र्यसंग्रामापासून केवळ दूरच राहून थांबले नाहीत, तर त्यांनी त्याचा विरोधच केला. असे करताना त्यांनी अन्य मार्गाने स्वातंत्र्यासाठी आंदोलन छेडलेही नाही. देशासाठी बलिदान करणारे किंवा अनन्वित छळ सहन करणारे अनेक क्रांतिकारक होऊन गेले. त्यातील बहुसंख्य लोक हे स्वातंत्र्यासोबतच समतेच्या राज्याचे स्वप्न पाहणारे, म्हणजेच साम्यवादी-समाजवादी विचारांचे होते, ज्यांचा हिंदू राष्ट्रवादाशी संबंध नव्हता. आज संघपरिवार ज्या भगतसिंग- सुखदेव-राजगुरू किंवा नेताजी सुभाषचंद्रांवर अन्याय झाल्याचे भासवीत आहेव त्यासाठी गांधी-नेहरू व काँग्रेसवर आगपाखड करीत आहे, त्या थोर क्रांतिकारकांच्या कार्याशी व विचारधारेशी संघ-परिवाराचा किंवा हिंदू राष्ट्रवादाचा काहीएक संबंध नव्हता; असलाच तर विरोध होता व तो जगजाहीर होता, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. संघाच्या, किंबहुना हिंदुराष्ट्रवाद्यांच्या गांधीविरोधाची व काँग्रेसविरोधाची पाळेमुळे अशा रीतीने इतिहासात दडली आहेत.

गोडसे व गांधी यांच्यामधील फरक

हा फरक समजून घेण्यापूर्वी आपल्याला एका महत्त्वाच्या मुद्द्याचा परामर्श घ्यायला हवा. तो म्हणजे गांधी व हिंदुराष्ट्रवादी ह्यांत नेमका फरक तो काय? तो लक्षात न घेतल्यामुळे अनेकदा संघीय मंडळी सर्वोदयाच्या व्यासपीठावर किंवा गांधीवादी संस्थांमध्ये मानाने मिरवताना दिसतात. अनेकदा तर अश्या संस्था संघाने गिळंकृत करेपर्यंत भाबड्या (!) गांधीवाद्यांना त्याची खबरबात लागत नाही. ह्या वैचारिक गोंधळामुळे समाजवादी-साम्यवादी-आंबेडकरवादी-स्त्रीमुक्तिवादी इ. सर्व पुरोगामी मंडळी गांधींचा प्रचंड राग करतात. एक वेळ (किंवा अनेकदा) ती संघाला जवळ करतील, पण गांधी त्यांच्यासाठी ‘अस्पृश्य’ असतात. कारण पुनरुज्जीवनवादी (हिंदूराष्ट्रवादी) व गांधी दोघेही परंपरांचा अभिमान बाळगताना आपल्याला दिसतात. अनेकदा त्यांची भाषाही सारखी असते. हिंदू धर्माची थोरवी दोघेही गातात, त्यामुळे ‘निधर्मी’ मंडळींचा व जनसामान्यांचा अनेकदा गोंधळ उडतो, किंवा त्यांना जाणीवपूर्वक संभ्रमात ठेवले जाते. म्हणूनच गांधी व गोडसे ह्यांतील नेमका फरक समजून घेणे आवश्यक आहे.

हिंदूराष्ट्रवादी व गांधी दोघेही परंपरेचे समर्थक होते; पण आपल्याला ललामभूत वाटणारी परंपरा कोणती, ह्याविषयीच्या त्यांच्या धारणा व त्यानुसार त्यांच्या विचार व कार्याच्या दिशा परस्परविरोधी होत्या. हिंदुधर्माचे आकारहीन, अघळपघळ रूप, त्यातील बहुविधता, नव्याचा स्वीकार करण्यातील सहजता, थोडक्यात त्यातील अनाग्रही, सहिष्णु वृत्ती हाच हिंदुधर्माचा गाभा आहे, त्याचे शक्तिस्थान आहे, अशी गांधींची श्रद्धा होती. ह्याउलट हिंदुराष्ट्रवाद्यांनाहा हिंदूंचा दुबळेपणा आहे असे वाटत आले आहे. गांधींसाठी हिंदू ही केवळ उपासनापद्धतीनसून ती एक जीवनप्रणाली होती. अशी जीवनप्रणाली जी पूर्णपणे खुली आहे; जीत आचारविचाराचे बंधन नाही. ते धर्माचा संबंध एकीकडे कर्तव्याशी लावतात, तर दुसरीकडे नीतिमूल्यांशी. ते राजकारणात धर्म आला पाहिजे असे सांगतात, तेव्हा त्यामागे भ्रष्ट राजकारणात मूल्यांची प्रतिष्ठापना केली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. ह्याउलट हिंदुराष्ट्रवाद्यांसाठी हिंदू धर्म ही एक उपासनापद्धतीच आहे. सावरकर जेव्हा ‘हिंदू’च्या व्याख्येत ‘हा देश ही ज्याची मातृभू, पितृभू व पुण्यभू आहे’ असा उल्लेख करतात, तेव्हा त्यांना येथील धर्मांतरित मुस्लिम व ख्रिश्चन हिंदू नाहीत, पण हिंदू धर्माविरुद्ध बंड करणारे जैन व बौद्ध मात्र हिंदू धर्माचाच एक भाग आहेत असे म्हणायचे असते. (त्याच वेळी हिंदू-बौद्ध संघर्ष हे त्यांच्या दृष्टीने भारतीय इतिहासातील एक सोनेरी पानही आहे.) सावरकर व संघपरिवार ह्यांना हिंदू धर्माचे राजकारण करायचे आहे. त्यांना गांधींच्या अर्थाने राजकारणात ‘धर्म’ आणायचा नाही. त्यांच्या दृष्टीने ‘शठंप्रति शाठयम्’, म्हणजे ‘खटाशी असावे महाखट’ हेच योग्य आहे.

मुख्य म्हणजे इंग्रज भारतावर राज्य का करू शकतात व ते उलथवून लावण्यासाठी आपण काय करायला हवे, ह्याविषयीचे गांधी व हिंदुराष्ट्रवादी ह्यांचे विचार परस्परविरोधी आहेत. देश दुबळा झाल्यामुळे तो गुलाम झाला असे दोघांनाही वाटते. पण सावरकर वगैरे मंडळींना वाटते की शक्ती म्हणजे शस्त्राची ताकद. आपल्या समाजातील क्षात्रवृत्तीलोप पावली, आपण स्त्रैण झालो. इंग्रज मात्र शारीरिक दृष्ट्या बळकट आहे. तो नवतंत्रज्ञानावर आधारलेल्या शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. म्हणूनच ते ‘भारताचे हिंदूकरण व हिंदूंचे सैनिकीकरण’ (अर्थात स्त्रैण हिंदूंचे पौरुषीकरण) ह्यावर भर देतात. हिंदुत्वाच्या विचारात शारीरिक शक्ती व मर्दानगी ह्या बाबी केंद्रस्थानी आहेत. (साध्वी ऋतंभरा, बाळासाहेब ठाकरे, प्रवीण तोगडिया इ. ची वक्तव्ये आठवावीत) म्हणूनच रा. स्व. संघ ह्या ‘वीरांच्या’ संघटनेत स्त्रियांना प्रवेश नाही. राष्ट्र सेविका समिती किंवा दुर्गा वाहिनी ह्यांची भूमिका दुय्यम व परिवार प्रमुख ठरवील त्याप्रमाणे असते. एरवी वीर पुरुषांभोवती पंचारती ओवाळणे व मुलांवर धार्मिक संस्कार करणे हेच स्त्रियांचे काम. बाबरी मशिदीच्या आंदोलनाच्या निमित्ताने संघ परिवाराने शांत, सौम्य आदर्श पुरुष असलेल्या रामाला ‘मेक ओव्हर’ करून त्याची ‘युयुत्सु, धनुर्धर’ प्रतिमा लोकप्रिय केली. त्यासोबतच रामासोबत असणारे त्याचे पंचायतन त्यांनी मोडीत काढले. बजरंगाला निदान वेगळी सेना (दल) तरी मिळाले, पण सीतामाईला मात्र पुन्हा भूमिगतच व्हावे लागले. पूर्वी उत्तर भारतात लोक एकमेकाला भेटल्यावर ‘जय सियाराम’ असे अभिवादन करीत. बाबरीप्रकरणाने त्यांना ‘सिया’ गाळून फक्त ‘जय श्रीराम’ म्हणायला शिकविले. . . . . . हिंदुराष्ट्रात स्त्रियांचे स्थान काय असेल ह्यावर आणखी बोलण्याची गरज नाही.

ह्याउलट गांधींचा भर आत्मशक्ती, मनाची शक्ती जागविण्यावर आहे. कारण त्यांच्या मते शक्ती म्हणजे मनाची शक्ती, मनोनिग्रह. भारतीय लोक आपली आत्मशक्ती विसरले. त्यांना मिळालेला सत्य, अहिंसेचा वारसा विसरले. त्यांनी स्वतःच गुलामगिरी स्वीकारली, म्हणून ते गुलाम झाले. त्यांनीजर आत्मभान, आत्मशक्ती जागवली, तर इंग्रज येथे राहूच शकणार नाहीत. केवळ शस्त्रांच्या आधारे, मूठभर इंग्रजांना हजारो मैल दूर असणाऱ्या खंडप्राय प्रदेशातील कोट्यवधी लोकांवर राज्य करता येणेअशक्य आहे, असे ते म्हणत. ही आत्मशक्ती केवळ इंग्रजांना हाकलण्यासाठीच नव्हे, तर स्वराज्यात रामराज्य स्थापण्यासाठीदेखील आवश्यक आहे, असेही त्यांचे सांगणे होते. स्त्रियांमध्ये मनाचा कणखरपणा अधिक असतो, म्हणूनच गांधींच्या अहिंसक लढ्यात स्त्रियांना मानाचे स्थान होते.

हिंदुराष्ट्रवादाचा मुख्य आधार ‘हिंदू’ विरुद्ध ‘इतर’ असे द्वंद्व उभे करणे हा आहे. परधर्मीयांनी हिंदूंवर सातत्याने अत्याचार केले, असे सांगून हिंदूंमधील द्वेषाग्नी सतत प्रज्वलित ठेवणे ही त्यांची रणनीती आहे. त्याचबरोबर गतेतिहासाचे सुरम्यचित्रण करून त्या गौरवशाली भूतकाळाकडे परत जाण्याची प्रेरणा तेवत ठेवणे हादेखील त्याच रणनीतीचा भाग आहे. भारतीय इतिहासातील भव्यता, उदात्तता ही फक्त हिंदूंमुळे, व त्यातील त्याज्य भाग परधर्मीयांमुळे आहे, असे सांगून इतिहासाची मोडतोड त्यामुळेच तर त्यांना करावी लागते! ताजमहाल सुंदर आहे ना, मग तो हिंदूंचाच असला पाहिजे व स्त्रीविरोधी रूढी असल्या तर त्या मुसलमानांमुळेच असल्या पाहिजेत, ही कसरतही त्यासाठीच. जगभरातील धर्माधारित राष्ट्रवाद्यांची हीच गोची आहे. पाकिस्तानात जो इतिहास शिकविला जातो, ती म्हणजे बात्राप्रणीत इतिहासाची ‘मुस्लिम’ आवृत्ती. गांधींच्या दृष्टीने ‘हिंदू’ हा संप्रदाय नसल्यामुळे, त्यांना इतिहासाची मोडतोड करण्याची गरज भासत नाही. त्यांचा राम रहीमसोबत व ईश्वर अल्लासोबत सुखाने नांदू शकतो.

ईमेल: ravindrarup@gmail. com

लेखांक दुसरा
लेखांक तिसरा

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

राही Thu, 20/11/2014 - 10:36

विवेचन थोडेसे अपुरे वाटते. क्रमशः आहे का?
आतापर्यंतची मांडणी आवडली. अर्थात मतभेद होतीलच. ते व्हावेतही. चांगल्या चर्चेला चालना मिळेल कदाचित.
'त्यांनीजर आत्मभान, आत्मशक्ती जागवली, तर इंग्रज येथे राहूच शकणार नाहीत. केवळ शस्त्रांच्या आधारे, मूठभर इंग्रजांना हजारो मैल दूर असणाऱ्या खंडप्राय प्रदेशातील कोट्यवधी लोकांवर राज्य करता येणेअशक्य आहे, असे ते म्हणत. ही आत्मशक्ती केवळ इंग्रजांना हाकलण्यासाठीच नव्हे, तर स्वराज्यात रामराज्य स्थापण्यासाठीदेखील आवश्यक आहे, असेही त्यांचे सांगणे होते.'
तेच तर!

राही Thu, 20/11/2014 - 10:38

In reply to by राही

माफ करा,लेखांक पहिला असे शीर्षकात म्हटले आहेच. त्यामुळे क्रमशः लिहायची जरूरी नव्हती, हे नंतर लक्ष्यात आले. असो.

रेड बुल Thu, 20/11/2014 - 12:16

म्हणून (चटकन आपल्या मुद्यावर येण्यासाठी) शेवटुन वाचायला सुरुवात केली. काही गोश्टी विचार करण्यासारख्या आहेत. मुळात हिंदु काय आहे ही व्याख्या आता आहे "एक लोकांचा समुह". आणी हा अर्थ सोडुन इतर सगळ्या व्याख्या जिवाच्या कालपव्ययाच्या द्रुश्टीने इरेलेवंट आहेत. तेच आता इतरांना (लोकांच्या समुहांना) लागु होते... तेंव्हा इतर लोकांचे समुह, हिंदु नामक लोकांच्या समुहाला भौतिक आयुष्य जगताना अडचणीत आणू नये यापलीकडे आणखी काहीही अपेक्षा नाही... कोणाकडुनच. हितं तेव्हड जपायचय. सियाराम च्या जागी श्रीराम आले म्हणून काही फरक पडत नाही आजही अनेक ठिकाणी राधे राधे सुधा म्हटले जाते. पण आपले मुद्दे विचार करण्याजोगे आहेत हे खरय.

घाटावरचे भट Thu, 20/11/2014 - 17:16

'पुरोगाम्यांना आकलन झालेलं नाही' असं म्हटल्यावर लेखकाला हिंदुत्ववादी राजकारणाचं काही वेगळं आकलन झालंय अशी अपेक्षा होती. पण वाचल्यावर तसं काही अजिबातच दिसलं नाही. ह्या गोष्टी वर्तमानपत्रातून, टीव्हीवरून, आंतरजालावर अनेक विचारवंत लोकं नित्यनेमाने बोलत असतातच की.

नितिन थत्ते Thu, 20/11/2014 - 17:56

In reply to by घाटावरचे भट

>>लेखकाला हिंदुत्ववादी राजकारणाचं काही वेगळं आकलन झालंय अशी अपेक्षा होती. पण वाचल्यावर तसं काही अजिबातच दिसलं नाही.

+१

नितिन थत्ते Thu, 20/11/2014 - 17:55

लेखाने निराशा झाली.

मुसलमान आले म्हणून हिंदूधर्माची दुरवस्था झाली या संघीय स्वीपिंग स्टॅटमेंटस सारखीच काही स्वीपिंग स्टेटमेंट्स दिसतात.

१. गांधींच्या उदयामुळे आंदोलनाचे सशस्त्रपर्व संपुष्टात आले व व्यापक प्रमाणावर अहिंसक चळवळ सुरू झाली. हे असेच एक स्टेटमेंट आहे.

आंदोलनाचे सशस्त्रपर्व नामक काहीही अस्तित्वात नव्हतं. कारण तसं काही अस्तित्वात असूच शकत नव्हतं. सशस्त्र चळवळीचा मुख्य भर कुणातरी अन्यायी इंग्रज अधिकार्‍याला ठार मारणे इतपतच होता. अशा मार्गाने स्वराज्य मिळत नाही हे त्या सशस्त्र लढा(?)वाद्यांना कळलं नव्हतं. (खरं सशस्त्र पर्व १८५८ मध्येच संपुष्टात आलं. आणि फार तर आझाद हिंद सेनेच्या वेळी पुन्हा निर्माण होऊ घातलं असं म्हणता येईल). शिवाय गांधींपूर्वी सशस्त्र चळवळ आणि गांधींपासून अहिंसक क्रांती ही दोनच टोकं कधीच नव्हती. लोकसहभागातून चळवळ हा प्रकार टिळकयुगातच सुरू झाला होता. आणि गांधी युगात भगतसिंग वगैरे निर्माण होतच होते.

२. संघ आणि हिंदु महासभा एक नव्हेत. (आणि गोडसे हा संघीय नव्हे) आणि आज संघ सावरकरांचा उदोउदो करत असला तरी 'थोर हिंदू परंपरावादी' संघ हा सावरकरांचा अ‍ॅनाथिमा आहे. सावरकर हिंदुत्ववादी होते पण परंपरावादी नव्हते. संघ मुळात परंपरावादी आहे. परंपरेतले हितसंबंध टिकून रहावेत म्हणून जुन्या काळाचे रोझी चित्रण करून त्या आधारे जुन्या रूढी/प्रथांचे समर्थन हा संघाचा अजेंडा आहे. सावरकरांचा तो अजेंडा कधीच नव्हता. म्हणून संघ त्यांच्या विवेचनातला हिंदू हा शब्द आणि मुस्लिमद्वेष फक्त उचलतो. तसाच त्यांनी विवेकानंदांचा हिंदू हा शब्द उचलला आहे. त्याच मार्गाने ते गांधींनाही पचवणार आहेत. त्याची सुरुवात स्वच्छता अभियानासाठी गांधींच्या प्रतिमेचा उपयोग करून झाली आहे. पुढे गांधींची संध्याकाळची प्रार्थना वापरली जाईल. आणि राजकारणी गांधी विस्मरणात जाईल आणि संत गांधी मनात ठसवला जाईल.

आणखी काही सुचलं तर नंतर लिहीन.

राही Thu, 20/11/2014 - 18:12

In reply to by नितिन थत्ते

अगदी सहमत. १८८५ साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तीच मुळी सनदशीर मार्गाने भारतीयांची गार्‍हाणी मांडण्यासाठी. त्याही आधी, विशेषतः मुंबईतून, ब्रिटिशांकडे मागण्या, तक्रारी यांसाठी प्रतिष्ठितांची निवेदने वगैरे जातच होती, सभा वगैरे भरतच होत्या. यातूनच राष्ट्रीय सभेच्या नावाखाली एकत्र येण्याची कल्पना पुढे आली.
सशस्त्रलढा नावाची फार मोठी चळवळबिळवळ असे काही नव्हते. ते सगळे फुटकळ प्रयत्न होते. त्यांना लोकचळवळीचे रूप कधीच मिळाले नाही, याविषयीही सहमत.
संघाने विवेकानंदांना हाय्जॅक केले, भगतसिंहप्रभृतीनासुद्धा हाय्जॅक केले आणि आता गांधींना हाय्जॅक करताहेत.
कदाचित पुढील लेखांत अधिक सखोल विवेचन असू शकेल.

नितिन थत्ते Thu, 20/11/2014 - 18:21

In reply to by नितिन थत्ते

संत गांधी मनात ठसवला जाईल.

या जागी "स्वतःला सनातनी हिंदू म्हणणारा संत गांधी" मनात ठसवला जाईल असे वाचावे.

अरविंद कोल्हटकर Thu, 20/11/2014 - 20:06

मला स्वतः हा लेख, विशेषतः ह्याचा उत्तर भाग फार पटला, ज्यात अलीकडच्या काळातील हिंदुत्वाची दोन रूपे - गांधींचे सहिष्णु, अनाक्रमक आणि 'आत्मबल ओळखा' ही शिकवण देणारे हिंदुत्व आणि सावरकर/संघ ह्यांचे दोन धाग्यांचे आक्रमक हिंदुत्व - ह्यातील विरोध फार चांगल्या पद्धतीने मांडला आहे. त्यापूर्वीच्या भागाविषयी - हिंदु म्हणजे कोण, प्राचीन हिंदु परंपरा गौरवाने बोलावे अशी होती की नव्हती, हिंदुत्वाची ओळख हिंदूंना केव्हा आणि का झाली इत्यादि सदाहरित विषय - फार चर्चा करण्यात अर्थ नाही कारण अशा चर्चा नेहमीच वितंडवादात परिवर्तित होतात. त्यावर निश्चित निर्णयावर न येतासुद्धा केवळ सहिष्णुतेच्या मार्गाने बरेच काही मिळवता येते आपल्या स्वातन्त्र्य चळवळीने दाखवून दिलेच आहे. आजहि जगाकडे दृष्टि टाकली तर आक्रमक विचार करणार्‍यांच्या पदरात काही पडत नाही हेच दिसत आहे

अस्वल Fri, 21/11/2014 - 00:35

सारांश आवडला. विशेषत: इतिहासाचा मुद्देसूद वेध नीटच मांडलाय.
वर प्रतिसादात थत्तेंनी म्हटल्याप्रमाणे संघ पुरातन आणि regressive विचारच चालू ठेवत आहे. विवेकानंद, सावरकार, गांधींचा "हिंदू" ह्या कमालीच्या ढोबळ शब्दाद्वारे असलेला संबंध आता संघ आपल्या चौकटीसाठी वापरणार आहे.
संघ काय आहे आणि काय नाही -> भविष्यात संघीय प्रभाव राजकारणावर कसा होत जाईल ह्यावर अजून माहिती मिळाली तर आवडेल.

नितिन थत्ते Fri, 21/11/2014 - 07:18

संघाच्या एकूण वाटचालीचा विचार केला तर १९५२ पर्यंत संघ राजकारणात नव्हता असे म्हटले जाते. त्या अर्थी संघाने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही ही बाब तितकीशी आक्षेपार्ह नसावी.

संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली असली तरी आजचा संघ तोच संघ आहे असे नव्हे. (हे अर्थातच काँग्रेस काय किंवा कुठल्याही संस्थेविषयी खरे आहे). पण गोळवलकरांचा पगडा संघावर खूप खोलवर आहे आणि तो आजही त्यातून बाहेर आलेला नाही असे दिसते.

yugantar Fri, 21/11/2014 - 20:57

ह्या वैचारिक गोंधळामुळे समाजवादी-साम्यवादी-आंबेडकरवादी-स्त्रीमुक्तिवादी इ. सर्व पुरोगामी मंडळी गांधींचा प्रचंड राग करतात>>> ह्याचा विस्तार कोणी सान्गेब काय?

धर्मराजमुटके Fri, 21/11/2014 - 21:38

'हिंदू हा मुळात धर्मच नाही' हे वाक्य वारंवार का उगाळले जाते ? ह्या वाक्याचे इतके hammering केले गेले आहे की मला वाटते आता शेंबडया पोरालाही ( किंवा अजून गर्भातच असलेल्यालाही) मी हिंदू नाही हे माहित झाले असेल. 'हिंदू हा मुळात धर्मच नाही' असे दररोज कानीकपाळी ओरडणार्‍या मंडळींना विनंती की आम्ही स्वतःला काय म्हणवून घ्यावे ते कोणी सांगेल काय ? प्लीज ?

अस्वल Fri, 21/11/2014 - 22:56

In reply to by धर्मराजमुटके

'भारतीय' हा पर्याय काय वाईट आहे?
बाकी धर्म असा हवाच असेल तर ईच्छुकांनी आपापली जात भरावी> वाला पर्याय ह्या महान धर्माने दिलेलाच आहे- त्यापलीकडे जायची गरजच काय?
कारण वैचारिक वगैरे पातळीवर तर आपण कधीच विचार करत नाही की मी नक्की कुठल्या विचारप्रणालीशी संबंधित आहे. तेव्हा एकसंध हिंदूत्व वगैरे मुद्दाम निर्माण करण्यापेक्षा भारतीय एकसंधता जी १९४७ नंतर मिळवलेली आहे, तिचा लाभ घेणं काय वाईट?

धर्मराजमुटके Sat, 22/11/2014 - 21:55

In reply to by अस्वल

म्हणजे 'हिंदू' या शब्दाऐवजी 'भारतीय' हा शब्द वापरावा असे म्हणायचे आहे काय ? तसे असेल तर या देशात 'भारतीय', 'मुसलमान' इ. इ. धर्माचे लोक राहतात अशी वाक्यरचना करावी काय ?

अस्वल Sun, 23/11/2014 - 01:08

In reply to by धर्मराजमुटके

जर(धर्माबद्दल विशेष ओढ नसेल तर, पण एक आयडेंटीटी हवी असेल तर)
भारतीय म्हणून घेणं चालून जावं. ती एक नवी आयडेंटीटी आहे, आणि जास्त एकछत्री/ उत्तमरित्या संघटीत आहे. त्यात गोंधळ नाही, सरकारने पासपोर्ट वगैरे बनवून त्याला योग्य प्रमाणं जोडलेली आहेत.
जर(धर्मच हवा असेल तर)
हिंदू पेक्षा आपापली जात वापरावी. नाहीतरी हिंदू म्हणून काय असं मोठं सध्या सगळ्या जातीतले लोक करतात? कुठल्यातरी (बहुतेक करून प्रत्येकाचा वेगळा) असा देव, त्याची पूजा वगैरे- पुन्हा प्रत्येक देव/देवीच्या वेगवेगळ्या अटी. मग त्यात एकसंध असं काय राहिलं? आजमितीला सगळे स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे लोक "क्षयज्ञ" गोष्टी करतात, असं काहीच नाहिये. मग जर असा एकत्र-धर्म हवा असेल तर शीख/मुस्लीम/ख्रिश्चन इ.इ. बनणं सोप्पा शॉर्ट्कट आहे..

असं काहीसं मांडायचं होतं.

नितिन थत्ते Sun, 23/11/2014 - 09:13

In reply to by अस्वल

>>आजमितीला सगळे स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे लोक "क्षयज्ञ" गोष्टी करतात, असं काहीच नाहिये.

धार्मिक व्यवहारात काही नसेल. पण विवाह-कुटुंब-वारसा याबाबतीत तरी हिंदू* म्हणवून घेणारे लोक समान व्यवहार करतात (आणि ते ब्रिटिशपूर्व कालातही समान व्यवहार करत होते). तितपत एकता-समानता होती.

राजकीय बाबतीत हिंदू अशी आयडेण्टिटी नव्हती हे तर उघडच आहे. हिंदू म्हणून विजयनगरच्या किंवा शिवाजीच्या मदतीस** कोणी गेल्याचे ऐकलेले नाही.

*यात आदिवासी (नव्या राज्यात- वनवासी) अंतर्भूत नाहीत. ते स्वतःला हिंदू म्हणवत नाहीत. तसेच मनुस्मृतीसुद्धा त्यांना त्रैवर्णिक किंवा शूद्र म्हणत नाही. आजही त्यांना हिंदू कायदा लागू आहे की नाही याबाबत साशंक आहे.

**कुरुंदकरांच्या व्याख्यानांवरून असेही दिसते की शिवाजीच्या राज्याभिषेकाधिकाराच्या वादात गागाभट्टाने शिवाजीस समर्थन दिले ते एक हिंदू राज्य स्थापन होतंय म्हणून नसावे- तर गागाभट्टाचे घराणे भोसल्यांचे परंपरागत उपाध्याय होते हे असावे.

बॅटमॅन Sun, 23/11/2014 - 03:20

In reply to by धर्मराजमुटके

याची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या वेस्टर्न चष्म्यातून पाहिल्यामुळे आपल्या भूतकाळाची लाज वाटण्याची फॅशन आलेली आहे. अशी फॅशन रुजवणार्‍यांचा विशिष्ट अजेंडा असतो. ती स्वीकारणार्‍यांना त्या फॅशनमुळे स्वतःचा दिमाग अधोरेखित जाहल्यासारखे वाटते खरे, परंतु त्याचे अनस्तित्वच अधोरेखित होते.
या वाक्याचा अजून एक अवतार- ब्रिटिश येण्यापूर्वी भारत अस्तित्वात नव्हता.

थोडक्यात, आम्हांला धर्म नव्हता, कसली ओळखही नव्हती. कुणीही यावे अन आमच्यावर पाहिजे तसे राज्य करून जावे असे आम्ही मूर्ख होतो, फक्त ब्रिटिशांमुळे शहाणे झालो हे ओरडून मॅसोचिस्टिक पद्धतीने सांगून कूल पॉइंट्स मिळवण्याची एक रोचक फॅशन आहे. डोके न वापरता आहे तश्शी ती फॅशन स्वीकारल्यामुळे अशी वाक्ये वारंवार दिसतात. 'तुमच्यासाठी कायपन' छाप पोस्टरे अन अशी फ्लॅशवली जाणारी वाक्ये यांत तसा काहीच फरक नाही. दोहो बाजूंचे लोकही बौद्धिकदृष्ट्या फार काही वेगळे आहेत असे नव्हे. फक्त एका बाजूचे लोक १=१ असे सरळ लिहितात तर दुसरीकडचे लोक

(साईन थिटा) + (कॉस थिटा) = एलएन [१+(१/२!)+(१/३!)+....]

असे अवघड करून लिहितात इतकाच काय तो फरक आहे.

त्यामुळे असे कानीकपाळी ओरडून सांगणार्‍या व्यक्तींना खरे तर विचारावेसे वाटते- डोक्यावर नक्की किती डीग्री अँगलने पडल्यावर अशी विचारमौक्तिके सुचतात?

अस्वल Sun, 23/11/2014 - 03:30

In reply to by बॅटमॅन

हे अगदीच टोकाचं झालं.
बाय द वे-

आम्हांला धर्म नव्हता, कसली ओळखही नव्हती. कुणीही यावे अन आमच्यावर पाहिजे तसे राज्य करून जावे असे आम्ही मूर्ख होतो,

ह्यात नक्की काय चूक आहे ? १२००-१३०० नंतर असंच झालंय ना?

बॅटमॅन Sun, 23/11/2014 - 03:37

In reply to by अस्वल

ह्यात नक्की काय चूक आहे ? १२००-१३०० नंतर असंच झालंय ना?

ह्या ह्या ह्या. सीरियसली? असो. जरा बघू बरं नक्की काय काय झालं ते.

१२०० नंतर उत्तर भारतात हळू हळू दिल्ली सल्तनत वाढीस लागली. दक्षिणेत एकदोनदा राडे केले पण ते अल्पजीवी ठरले. तेवढ्यात विजयनगर उदयास आले १३३६ ला. त्याचा अस्त होतो न होतो तोवर १६३० उजाडले. पुढचा इतिहास तर सर्वांनाच ठाऊक आहे. तेव्हा, १२००-१५०० या तीनशे वर्षांत मोस्टलि उत्तर भारतात जे झालं तेवढ्यासाठी अख्खा इतिहास अन अख्खा भारत वेठीला धरणार का?

अन कोणीही यावे इ. बद्दल जर बघायचं असेल तर हा पॅटर्न अख्ख्या जगभर आहे. पश्चिम रोमन साम्राज्याच्या विघटनानंतर अख्ख्या युरोपभर टोळ्या कशा बेशिस्तपणे धुमाकूळ घालत होत्या तो इतिहास जरा पहावा, म्हणजे भारतात तेवढी अ‍ॅनार्की अन बाकी ठिकाणी तेवढं आदर्श राज्य हे ओव्हरसिम्प्लिफिकेशन गळून पडायला वेळ लागणार नाही.

अख्ख्या जगात जे होत आलेले आहे तेच भारतात झाले तर भारतीय लोक मूर्ख अन बुळे ठरतात हे रोचक वाटते.

अस्वल Sun, 23/11/2014 - 03:51

In reply to by बॅटमॅन

नक्की कशाचा प्रतिवाद आहे ते समजलं नाही. "भारत नावाची काही एकसंध entity अस्तित्वात होती आणि त्यावर कुणीही येऊन हल्ले केले नाहीत", हे ह्यातून कसं समजतं? उलट इथल्याच लोकांनी आपल्या साम्राज्यासाठी आपसात भांडणं केली, त्याचा फायदा बरेचदा बाहेरच्यांनी घेतला" एवढं कळलं.
इथे अनार्की होती- ज्याला आज भारत म्हणतो तसं काही नव्हतं, हे तर खरं ना?
बाकी गोष्टी (बुळे भारतीय, भारतातच अनार्की बाकी आदर्श वगैरे)मुद्दे माझे नसल्यामुळे तो वेल लेफ्ट केलेला आहे.

बॅटमॅन Sun, 23/11/2014 - 04:01

In reply to by अस्वल

भारत नावाची काही एकसंध entity अस्तित्वात होती आणि त्यावर कुणीही येऊन हल्ले केले नाहीत

असा दावा मीही कधी केलेला नाही. किंबहुना भारतावर अनेकदा हल्ले इ. झाले अन त्यांत बाहेरच्यांची सरशी झाली हे मान्यच आहे. पण ही स्पेशल केस आहे, जगात असे अन्यत्र कुठे होत नाही, इ. सूर असतो कैकदा. आरूनफिरून पारतंत्र्य-डिझर्व्हिंग जन्ता म्हणजे भारतीय असे ठसवण्याचा सूर असतो त्याला आक्षेप आहे.

इथे अनार्की होती- ज्याला आज भारत म्हणतो तसं काही नव्हतं, हे तर खरं ना?

पोलिटिकल अ‍ॅथॉरिटी एकाच केंद्रात एकवटलेली नसणे म्हणजे अ‍ॅनार्की ही नवीन व्याख्या समजली.

अस्वल Sun, 23/11/2014 - 07:45

In reply to by बॅटमॅन

ओके. तर मग तुमच्या बर्याचशा विधानांचा सारांश सोपा आहे-
आपण मूर्ख होतो, पण केवळ आपण मूर्ख नव्हतो- सगळेच तेव्हा मूर्ख होते. सबब केवळ भारतीयांना दोष देण्यात अर्थ नाही.
आणि इंग्रजांनी वगैरे आपल्याला शहाणं बनवलं नाही.

@अनार्की- ते तुमच्याच प्रतिसादातून घेतलेलं आहे! :)
न'वी' बाजूंनी म्हटल्याप्रमाणे- आपण मूर्ख(पुन्हा तुमचाच शब्द) होतो हे मानण्यात काय कमीपणा आहे? मान्य करा की.
=======================================
संपूर्ण tangential मुद्दा - इतिहासात आपले पूर्वज महाsssन होते, किंवा 'ढ' नव्हते हे सिद्ध करून काय मि़ळतं लोकांना? समजा होते तुमचे पूर्वज महान- मग?
बहुधा सध्या आपण (सबब भारतीय) कशातच पुढे नाही ह्या न्यूनगंडापासून दूर पळण्यसाठी इतिहासातली कागदी पानं सोनेरी बनण्याचा प्रयत्न रोचक हास्यास्पद आहे.

बॅटमॅन Mon, 24/11/2014 - 00:03

In reply to by अस्वल

आपण मूर्ख होतो, पण केवळ आपणच मूर्ख नव्हतो- सगळेच तेव्हा मूर्ख होते. सबब केवळ भारतीयांना दोष देण्यात अर्थ नाही.
आणि इंग्रजांनी वगैरे आपल्याला शहाणं बनवलं नाही.

लोकांना इतके कळाले तरी बास झाले. पण आजच्या काळाचे निकष लावून जुन्या काळी जगाच्या बरोबर असणे म्हणजे मूर्ख असणे असे म्हणायचे असेल तर प्रश्नच मिटला.
बहुतेकदा लोकांना बाकी जगात काय होते हे जाणण्यात स्वारस्य नसते त्यामुळे अलम दुनियेत आपणच सर्वात ब्याकवर्ड (ड पूर्ण) असा समज होतो हे चूक नाही का?

आपण मूर्ख(पुन्हा तुमचाच शब्द) होतो हे मानण्यात काय कमीपणा आहे? मान्य करा की.

पुन्हा तेच. अ‍ॅनाक्रोनिस्टिक अपेक्षा करण्यात अर्थ नाही हे लोकांना का समजत नाही काय की.

संपूर्ण tangential मुद्दा - इतिहासात आपले पूर्वज महाsssन होते, किंवा 'ढ' नव्हते हे सिद्ध करून काय मि़ळतं लोकांना? समजा होते तुमचे पूर्वज महान- मग?
बहुधा सध्या आपण (सबब भारतीय) कशातच पुढे नाही ह्या न्यूनगंडापासून दूर पळण्यसाठी इतिहासातली कागदी पानं सोनेरी बनण्याचा प्रयत्न रोचक हास्यास्पद आहे.

हा तर मेन मुद्दा आहे. सध्या आपण जगात मागे आहोत याचा अर्थ, जुन्या इतिहासाकडे दुर्लक्ष करून कोणीही काहीही सांगावे आणि ते खरे मानावे- कारण कसेही असलो तरी आजमितीस उपयोग नाही - असेच ना?

आज आपण मागे आहोत आणि मागून पुढे जायला काय केले पाहिजे हा एक विषय झाला. जुन्या काळात आपण महान होतो की कसे होतो हा दुसरा विषय झाला. लोकांना उगीच फालतूची भीती असते. समजा जगात आम्ही भारी होतो आणि मध्ये कधीतरी गंडलो असे सांगितले तर लोक अभिमानापोटी पुन्हा झोपी जातील असे म्हणायचे आहे का? तसे असेल तर त्याच्यासारखी विनोदी धारणा दुसरी नाही.

युरोपियनांनी बर्‍याच मोठ्या भूभागावर राज्य केले तेव्हा तिथला इतिहास आपल्याला फायदेशीर होईल असा रंगवला. त्यामागे त्यांचा फायदा होता म्हणून. स्वातंत्र्यपूर्व काळात नॅशनॅलिस्ट इतिहास पुढे आला त्यामागे प्रेरणाही तीच होती, हे सध्याचे इंग्रज शासक उपरे अन वाईट आहेत आणि यांना हाकलून लावले पाहिजे ही जाणीव निर्माण करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता.इतिहास हे सामाजिक जाणिवा घडवायचे एक महत्त्वाचे टूल आहे. त्यामुळे त्याला असे डिसमिस करणे हास्यास्पद आहे.

आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे- दीनानाथ बात्रांसारख्या विचारजंतांमुळे भारतीय परंपरेतील खर्‍या महान योगदानांबद्दल काही चांगले बोलले तरीदेखील तुमच्यासारखे सिनिकल कमेंटी करून निकालात काढले जाते. (यातून काय मिळतं इ.इ.) भास्कराचार्यांबद्दल चार बरे शब्द बोलले की लोक टोचून बोलायला तयारच आहेत- बरं मग? जणू त्यांच्याबद्दल चार शब्द बरे बोलल्याने लोक गणित शिकायचं सोडूनच देणार आहेत. इतका पॅरानोइया का असावा ते कळत नाही. इतिहासाचा अभ्यासच निकालात काढल्यासारखे वाटते.

सुक्याबरोबर ओलेही जाळायला मागेपुढे न बघणार्‍यांचा आणि त्यासाठी लंगडी कारणे देणार्‍यांचा प्रतिवाद हा केलाच पाहिजे. भारतीय इतिहासाच्या मांडणीचा लंबक या नैतर त्या अशा अतिरेकाकडेच झुकतो कायम. पण किमान जे काही चांगले होते ते हडसूनखडसून सांगितले पाहिजे. ग्रीकोरोमन लेगसी मोठ्या आकांताने जगाच्या कानीकपाळी ओरडून सांगणार्‍या युरोपियनांना त्यातील गुलामगिरी दिसत नाही असे नाही. पण प्राचीन अथेन्समध्ये गुलामगिरी होती म्हणून त्यांची लोकशाही रद्दबातल ठरते का? मग भारताबद्दलच कुणी चांगले बोलले की त्याला असे डिसक्रेडिट का केले जाते कायम? ब्रिटिशांनी आमच्यावर राज्य केले म्हणून आमचा ५००० वर्षांचा इतिहास रद्दबातल ठरतो का? या यदोन गोष्टींचा अर्थाअर्थी संबंध काय? असे निकालात काढू पाहणार्‍यांना नक्की कसली भीती असते ते कळत नाही. कसले स्ट्रॉमॅन समोर उभे करतात त्यांचं त्यांनाच माहिती. वाईट बघायची सवय लागली की चांगलं काही दिसत नाही, आणि चांगलं कुणी दाखवल्यास त्याचे वाईटाकडे दुर्लक्ष होतेय अशी हाकाटी करतात. भारतीयांकडून अवास्तव अपेक्षा का ठेवाव्यात हे कळत नाही.

असो, चालूदे. पूर्वीचे अतिरेकी निगेटिव्ह फोकसचे बायनरी चित्र आता दिवसेंदिवस अधिकाधिक तपशिलांनी समृद्ध होते आहे. तुमचा वैयक्तिक दोष नाही. दोष आहे तो अपुर्‍या इतिहाससंशोधनाचा आणि संशोधक ते सामान्य वाचक यांमधील लिंकेच्या अभावाचा. इतिहासात पापिलवार परंतु समजूतदार लेखकांची गरज आहे. आणि लेखनापेक्षाही इतिहास म्हणजे काय याची जाण विकसित करण्याची गरज आहे. तुमच्यासारखा समज असणारे अनेक लोक असतील-नव्हे आहेत. त्यांची जाणीव नीट विकसित करणारा इतिहास अजून लिहिला गेलेला नाही. पुष्पक विमानांचा अभिमान असलेले किंवा भारतीय असण्याची लाज वाटणारे अशा दोन एक्स्ट्रीम क्याटेगरीचे लोकच जास्त आहेत, पण अजून समजूतदारपणे इतिहास लिहिला आणि शिकवला गेला तर हे हळू हळू बदलेल. शेवटी निगेटिव्ह गोष्टीसुद्धा सारख्या सारख्या सांगितल्यानेच लोकांच्या लक्षात आल्या, नैतर हे चालायचंच असंच मानायचे. तोच न्याय पॉझिटिव्ह गोष्टींनाही लागू होतो. यासाठी लोकांमध्ये जाणीव विकसित करण्याची गरज आहे. आपापल्या परीने खारीचा वाटा उचलणे चालू आहे, थोडातरी बदल घडेल अशी दृढ आशा वाटते. च्यारिटी जशी घरापासून तयार होते, तशीच ऐतिहासिक जाणीव, सांस्कृतिक आत्मभान इ. सुद्धा घरापासून, आपापल्या गावापासून विकसित केली गेली पाहिजे तेव्हा लोकांमध्ये योग्य त्या गोष्टींबद्दल आत्मीयता/अभिमान निर्माण होईल आणि तो डोळसही असेल.

अस्वल Mon, 24/11/2014 - 00:31

In reply to by बॅटमॅन

good discussion this!
मूर्ख वगैरे म्हणायचंच नाहिये, तेव्हा ते सोडून देऊया. इतिहास लंबकासारखा वापरला जातो हे मान्य- एकदम टोकाची भूमिकाच मांडली जाते.
भारताबद्दल चांगले बोलणार्यांना डिस्मिस केलं जाणं जेवढं चूक आहे तेवढंच भारतीयांच्या नसलेल्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगून ढोल बजावणं हे आहे, आणि आपण ह्यात दोन विरूद्ध बाजूंना आहोत असं दिसतंय :)

false positive and false negative - ह्या दोन्ही गोष्टींपासून वाचून रहायला हवं. पण ह्यातली एक जास्त धोकादायक आहे, असं मला वाटतं.
false negative - "आम्ही अजिबात महान नाही, सर्वसाधारण आहोत" हे जर स्वीकारलं तर आपण आत्मसंतुष्ट रहायचा धोका कमी आहे.
false positive - उलट "आम्ही सर्वात महान" ह्या पांघरूणाखाली लपलं, तर पुढे काही प्रगती व्हायची इच्छाच मरेल.

सध्या आपण जगात मागे आहोत याचा अर्थ, जुन्या इतिहासाकडे दुर्लक्ष करून कोणीही काहीही सांगावे आणि ते खरे मानावे- कारण कसेही असलो तरी आजमितीस उपयोग नाही - असेच ना?

नाही- मुद्दा हा आहे कि इतिहासात काय आहे हे आजमितीतील कामगिरीशी तुलना करण्याइतकं महत्त्वाचंच नाहीये. त्यावरून स्वतःच्या सद्यपरिस्थितीशी तुलना करण्यात तर काहीच अर्थ नाही- कारण ती तुलना irrelevant आहे. खरे/खोटे हे इतिहासतज्ञांकडे सोडून देऊ, कारण इतिहासाकडे objectively तेच पाहू शकतात, नाही का?
सामान्य लोकांनी इतिहासाच्या मर्यादित आकलनातून (कादंबर्या, बात्रांसारखे हास्यास्पद दावे करणारे लोक किंवा उलट टोकाचा विचार करणारे आणि भारतीयांना तुच्छ लेखणारे लोक) ह्यांचे विचार वाचून आपल्या कर्तृत्वाबद्दल शंका घेणे किंवा न्यूनगंड/अहंगंड बा़ळगणे ह्यात काहीच correlation नसायला हवे.
सध्या भारतीय लोक जे काही करू शकतील, जे काही करत आहेत त्याची इतिहासातील कामगिरीवर तुलना होऊ नये. त्याला सध्याचीच परिमाणं (तंत्रज्ञान, राजकारण, विज्ञान, कला) लावली जावीत - इतिहासातील (धर्म, विज्ञान, राजकारण, साम्राज्य इ.इ.) नव्हेत.
.
.
तेव्हा -
अ) आता भारत नावाचा देश होता का? त्यातील लोक कसे होते, त्यांचं कर्तृत्व किती होतं असे प्रश्न इतिहास ह्या चष्म्यातून पूर्ण objectively बघितले जावेत आणि त्यातून जे काही निष्कर्ष येतील, ते स्वीकारण्याची हिम्मत भारतीयांनी दाखवायला हवी.
ब) अ चा निष्कर्ष काहीही आला तरी सद्यस्थितीतील भारताच्या कर्तृत्वाशी त्याला जोडण्याची गरज नाही.

बॅटमॅन Mon, 24/11/2014 - 01:00

In reply to by अस्वल

येस, त्या बाबतीतला फोकस जरा वेगळा आहे हे दिसते आहेच.

मुद्दा हा आहे कि इतिहासात काय आहे हे आजमितीतील कामगिरीशी तुलना करण्याइतकं महत्त्वाचंच नाहीये. त्यावरून स्वतःच्या सद्यपरिस्थितीशी तुलना करण्यात तर काहीच अर्थ नाही- कारण ती तुलना irrelevant आहे. खरे/खोटे हे इतिहासतज्ञांकडे सोडून देऊ, कारण इतिहासाकडे objectively तेच पाहू शकतात, नाही का?

अगदीच इर्रिलेव्हंट नाहीये तुलना, पण तो विषय अंमळ वेगळा आहे सबब सोडून देतो. तदुपरि इतिहासतज्ञ हे सर्वांत बायस्ड लोकांपैकी एक असतात. ;) कैकदा असे होते की सामान्य माणूसही एखाद्या हट्टी इतिहासकारापेक्षा समजूतदारपणा दाखवतो. तो लै रोचक प्रकार आहे.

सामान्य लोकांनी इतिहासाच्या मर्यादित आकलनातून (कादंबर्या, बात्रांसारखे हास्यास्पद दावे करणारे लोक किंवा उलट टोकाचा विचार करणारे आणि भारतीयांना तुच्छ लेखणारे लोक) ह्यांचे विचार वाचून आपल्या कर्तृत्वाबद्दल शंका घेणे किंवा न्यूनगंड/अहंगंड बा़ळगणे ह्यात काहीच correlation नसायला हवे.सध्या भारतीय लोक जे काही करू शकतील, जे काही करत आहेत त्याची इतिहासातील कामगिरीवर तुलना होऊ नये. त्याला सध्याचीच परिमाणं (तंत्रज्ञान, राजकारण, विज्ञान, कला) लावली जावीत - इतिहासातील (धर्म, विज्ञान, राजकारण, साम्राज्य इ.इ.) नव्हेत.

होय, पण विचार हे व्हॅक्यूममध्ये नसतात. त्यांचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. सबब त्यांचा नेटाने प्रतिकार करणे गरजेचे आहे.

अ) आता भारत नावाचा देश होता का? त्यातील लोक कसे होते, त्यांचं कर्तृत्व किती होतं असे प्रश्न इतिहास ह्या चष्म्यातून पूर्ण objectively बघितले जावेत आणि त्यातून जे काही निष्कर्ष येतील, ते स्वीकारण्याची हिम्मत भारतीयांनी दाखवायला हवी.
ब) अ चा निष्कर्ष काहीही आला तरी सद्यस्थितीतील भारताच्या कर्तृत्वाशी त्याला जोडण्याची गरज नाही.

सहमत, फक्त एक शेवटचे निटपिकिंग- नेशन स्टेट या संकल्पनेप्रमाणे पाहिले तर भारत हे एक नेशन स्टेट नव्हते इतकाच याचा अर्थ आहे. देश नसणे यात अनेक इन्स्टिट्यूशन्सचा अभाव इम्प्लिसिटलि गृहीत धरला जातो जो ओव्हरआर्किंग जनरलायझेशनमुळे चूक आहे.

'न'वी बाजू Sun, 23/11/2014 - 07:55

In reply to by बॅटमॅन

या वाक्याचा अजून एक अवतार- ब्रिटिश येण्यापूर्वी भारत अस्तित्वात नव्हता.

थोडक्यात, आम्हांला धर्म नव्हता, कसली ओळखही नव्हती.

ब्रिटिश येण्यापूर्वी या भूखंडास बाह्य जगाच्या दृष्टीने जर काही समाईक ओळख असलीच, तर 'तो एक दूरवर तिकडे कोठेतरी असणारा भूखंड' अशी होती (म्हणजे, साधारणतः तिकडे कोठेतरी असलेल्या जेथे कृष्णवर्णीय लोक राहतात, अशा एका मोठ्या भूखंडास आपण ढोबळमानाने 'आफ्रिका' म्हणून ओळखतो, तद्वत); आणि अंतर्गतरीत्या एक समाईक एंटिटी, एक युनिट या दृष्टीने आम्हांस पाहण्याची आम्हांस सवय नव्हती, या दृष्टीने 'ब्रिटिश येण्यापूर्वी भारत अस्तित्वात नव्हता' या विधानात नेमके काय चूक आहे?

(बाह्य जगाच्या दृष्टीने 'आफ्रिकन' - किंवा फॉर द्याट म्याटर 'युरोपियन' - ही एक समाईक ओळख असेलही. पण म्हणून संपूर्ण आफ्रिका खंड एक राष्ट्र अथवा एक सामाजिक युनिट आहे काय? किंवा, युरोपियन युनियनोत्तर काळात त्याअंतर्गत असणार्‍या प्रदेशांत तुलनेने अधिक आंतरघटकीय कोऑर्डिनेशन आणि सामाजिक देवाणघेवाण असेलही, परंतु त्यापूर्वीच्या काळात - विशेषतः अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत नि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात - युरोप हा कोणत्याही भौगोलिकेतर दृष्टीने 'एक युनिट' होता काय?)

कुणीही यावे अन आमच्यावर पाहिजे तसे राज्य करून जावे असे आम्ही मूर्ख होतो,

'कुणीही यावे अन आमच्यावर पाहिजे तसे राज्य करून जावे' ही तत्कालीन वस्तुस्थिती होती, यात आमचा मूर्खपणा नेमका काय आहे? ही तर तत्कालीन जागतिक पद्धतच होती. राष्ट्रवादपूर्व युरोपात तरी याहून वेगळे काय होते? नेपोलियन एक वर्ष अगोदर (की नंतर? अगोदरच बहुधा.) जन्माला आला असता, तर जन्माने फ्रेंचऐवजी इतालियन झाला असता; मध्यंतरी कोठल्याशा लढाईत कॉर्सिका बेट या हातातून त्या हातात गेले, असे कायसेसे ऐकलेले आहे. लढाया होत, प्रदेश या हातातून त्या हातात जात, मग कधीकधी तहही होत, नि एकाच्या हातात असलेल्या एका टोकाच्या प्रदेशाच्या बदल्यात दुसर्‍याच्या हातात असलेल्या दुसर्‍याच कोठल्यातरी टोकाच्या प्रदेशाची देवाणघेवाण होई; पब्लिकला काय वाटते, विचारतो कोण?

हे तर सार्‍या जगभर चालायचे; मग ते आमच्याकडेसुद्धा चालत असे, हे मान्य करण्यात कमीपणा नेमका कसला आहे?

(अवांतर: भारत आणि बांग्लादेश यांच्यात जी हजारो आन्क्लेव्ज़ आहेत, त्यांच्यामागील ष्टोरी ऐकली / वाचली आहेत कधी? माहीत नसल्यास - किंवा तिचा या ठिकाणी रेलेवन्स लक्षात आला नसल्यास - पुन्हा कधीतरी टंकेन; तूर्तास टंकाळा आला आहे. मात्र, ती रोचक (इफ़ नॉट समव्हॉट ट्राजिक - अ‍ॅट द रिस्क ऑफ बीइंग लेबल्ड अ लिबरल, व्हिच, ऑफ कोर्स, बाय नाउ, आय अ‍ॅम यूज़्ड टू, अँड अ चार्ज व्हिच आय डू नॉट डिनाय) आहे, एवढेच सुचवू इच्छितो.)

फक्त ब्रिटिशांमुळे शहाणे झालो

'फक्त ब्रिटिशांमुळे शहाणे झालो' की नाही, ठाऊक नाही. पण ब्रिटिश आल्यामुळे एक वेगळे एक्स्पोझर मिळाले, हे तर खोटे नाही!

(साईन थिटा)२ + (कॉस थिटा)२ = एलएन [१+(१/२!)+(१/३!)+....]

हे मात्र आवडले!

असो.

नितिन थत्ते Sun, 23/11/2014 - 09:19

In reply to by 'न'वी बाजू

>>(म्हणजे, साधारणतः तिकडे कोठेतरी असलेल्या जेथे कृष्णवर्णीय लोक राहतात, अशा एका मोठ्या भूखंडास आपण ढोबळमानाने 'आफ्रिका' म्हणून ओळखतो, तद्वत)

इतके लांब कशाला? ते तिकडे महाराष्ट्राच्या दक्षिणेस राहणार्‍यांना आपण "मद्रासी" म्हणतो. पण मद्रासी म्हणून त्या सर्वांची एक एण्टिटी नाही. ते सगळे "आम्ही मद्रासी आहोत" असे समजत नाहीत.

बॅटमॅन Mon, 24/11/2014 - 00:11

In reply to by 'न'वी बाजू

'कुणीही यावे अन आमच्यावर पाहिजे तसे राज्य करून जावे' ही तत्कालीन वस्तुस्थिती होती, यात आमचा मूर्खपणा नेमका काय आहे? ही तर तत्कालीन जागतिक पद्धतच होती. राष्ट्रवादपूर्व युरोपात तरी याहून वेगळे काय होते? नेपोलियन एक वर्ष अगोदर (की नंतर? अगोदरच बहुधा.) जन्माला आला असता, तर जन्माने फ्रेंचऐवजी इतालियन झाला असता; मध्यंतरी कोठल्याशा लढाईत कॉर्सिका बेट या हातातून त्या हातात गेले, असे कायसेसे ऐकलेले आहे. लढाया होत, प्रदेश या हातातून त्या हातात जात, मग कधीकधी तहही होत, नि एकाच्या हातात असलेल्या एका टोकाच्या प्रदेशाच्या बदल्यात दुसर्‍याच्या हातात असलेल्या दुसर्‍याच कोठल्यातरी टोकाच्या प्रदेशाची देवाणघेवाण होई; पब्लिकला काय वाटते, विचारतो कोण?

हे तर सार्‍या जगभर चालायचे; मग ते आमच्याकडेसुद्धा चालत असे, हे मान्य करण्यात कमीपणा नेमका कसला आहे?

सरजी, मुळात असे काही जगभर चालायचे हेच लोकांच्या गावी नसते. म्हणून भारतीय कसे अख्ख्या जगात एक नंबरचे मूर्ख असे म्हणतात. जगाप्रमाणेच भारतातही हेच चालायचे, ते कबूल करायला कसली अडचण आलीये? पण मुळात भारतात जे चालायचे ती जणू स्पेशल केस आहे, एक्सेप्शनल आहे असा रोख असतो त्यावर आक्षेप आहे.

(अवांतर: भारत आणि बांग्लादेश यांच्यात जी हजारो आन्क्लेव्ज़ आहेत, त्यांच्यामागील ष्टोरी ऐकली / वाचली आहेत कधी? माहीत नसल्यास - किंवा तिचा या ठिकाणी रेलेवन्स लक्षात आला नसल्यास - पुन्हा कधीतरी टंकेन; तूर्तास टंकाळा आला आहे. मात्र, ती रोचक (इफ़ नॉट समव्हॉट ट्राजिक - अ‍ॅट द रिस्क ऑफ बीइंग लेबल्ड अ लिबरल, व्हिच, ऑफ कोर्स, बाय नाउ, आय अ‍ॅम यूज़्ड टू, अँड अ चार्ज व्हिच आय डू नॉट डिनाय) आहे, एवढेच सुचवू इच्छितो.)

माहितीये ष्टुरी. कैच्याकै प्रकार आहे तो! या ठिकाणी समजले काय म्हणायचे आहे ते, पण दॅट इज़ बिसाईड द पॉईंट.

'फक्त ब्रिटिशांमुळे शहाणे झालो' की नाही, ठाऊक नाही. पण ब्रिटिश आल्यामुळे एक वेगळे एक्स्पोझर मिळाले, हे तर खोटे नाही!

सवालच नाही! पण देन अगेन- ब्रिटिशपूर्व काळात भारत स्प्लेंडिड आयसोलेशनमध्ये मग्न होता असे चित्र उभे केले जाते ते अतिशय फसवे अन खोटे आहे. भारताबाहेरील अनेक कल्चरशी जवळचा संबंध ही फक्त ब्रिटिशांची देणगी नाही. हे तर हडप्पा काळापासून होत आलेले आहे. इतकेच, की युरोपप्रणीत व्यवस्था आजमितीस जगभर पसरलेल्या असल्याने त्या व्यवस्थांच्या पूर्वजांना क्रेडिट देताना सर्व प्रकारचे झुकते माप दिले जाते. त्यातही तितके काही चूक नाही, पण त्याच्या आधीचं सगळं रद्दीत काढण्याची प्रवृत्ती निषेधार्ह आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/11/2014 - 19:30

In reply to by धर्मराजमुटके

'हिंदू हा मुळात धर्मच नाही' असे दररोज कानीकपाळी ओरडणार्‍या मंडळींना विनंती की आम्ही स्वतःला काय म्हणवून घ्यावे ते कोणी सांगेल काय ?

मुळात हिंदू हा धर्म नाही, पण आता आम्ही हा धर्म आहे असं मानतो. म्हणून आम्ही हिंदू आहोत, असं म्हणण्यात काही अडचण येईल काय?

--

लेखन वाचत आहे.

बॅटमॅन Mon, 24/11/2014 - 20:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुळात हिंदू हा धर्म नाही

इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी यांच्यासारखे स्वरूप नसल्याने हिंदू धर्म नाही असे काहीजण म्हणतात, इतकेच काय ते.

धर्मराजमुटके Tue, 25/11/2014 - 21:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे तुम्हाला समजते पण विचारवंतांना समजत नाही काय ? असो. यावरुन तुम्ही विचारवंत नाहीत असा निष्कर्ष मी तरी काढलेला नाहिये. :)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 25/11/2014 - 23:59

In reply to by धर्मराजमुटके

सध्या तरी हिंदू धर्म कागदोपत्री लिहिण्यात कोणाला काही अडचण असल्याचं मला तरी माहीत नाही. या लेखातही असं दिसलं नाही.

"हम जहां खडे रहते है ‌वहां से लाईन शुरू होती है", छापाचे डायलॉक तुम्ही ऐकत नाही का? ऐकले असतील तर त्यातून तोरा उचलत नाही का? (मी उचलते.) तसाही भारत हा सेक्यूलर देश आहे. या देशात कोणीही आपापल्या सोयीनुसार आपापल्या धर्माचा अर्थ लावण्यासाठी स्वतंत्र आहे. मग एका शब्दामुळे काय मोठं आकाश कोसळणारे?

अनुप ढेरे Sat, 22/11/2014 - 22:48

गांधीजींच्या आधुनिक विचारांचा बराच उल्लेख दिसतो आहे. मी फार वाचलेले नाहीत त्यांचे विचार पण न'वी बाजूंनी शेअर केलेले त्यांचे लसीकरणाबाबतचे विचार आठवले.

कोठेही परिवर्तनाच्या ख्नाणाखुणा दिसत नाहीत.

माझ्यापुरतं एक निरीक्षण नोंदवतो. मी पुण्यात रोज चांदणी चौक ते हिंजवडी असा प्रवास करतो. या भागात किमान तीन ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. गेले ३.५ ते ४ वर्ष. आत्तापर्यंत झालेल्या कामापैकी साधारण निम्म काम गेल्या ४ महिन्यात झालेलं आहे. आता हा बाह्यवळणाचा भाग केंद्र सरकारच्या अख्त्यारीत येतो का ते नक्की माहीत नाही. पण बहुदा हो. असा एक बदल मला तरी दिसला.
दुसरा बदल शेअर बाजारात दिसला. हे मान्य की तो बदल फार थोड्या लोकांपुरता आहे. पण माझ्यासाठी तरी तो बदल, पॉसिटीव्ह बदल आहे.
असे बदल मला तरी जाणवले.
बाकी लेख आवडला नाही.

'न'वी बाजू Sun, 23/11/2014 - 03:25

In reply to by अनुप ढेरे

गांधीजींच्या आधुनिक विचारांचा बराच उल्लेख दिसतो आहे.

लेख बाकी कसाही असो, परंतु लेखात गांधीजींचे विचार 'आधुनिक' (अथवा 'पुरोगामी' अथवा तत्सम काही) असल्याचा दावा (निदान मला तरी) कोठेही आढळला नाही.

(उलट, ते स्वतःला 'सनातनी हिंदू' मानत होते किंवा 'परंपरावादी' होते, असेच वारंवार म्हटल्याचे आढळले.)

-----------------------------------

(उलटपक्षी, गांधींबद्दल पूर्ण आदर बाळगूनसुद्धा, त्यांचे काही विषयांतील विचार हे अत्यंत रेट्रोग्रेसिव होते, हे मान्य करण्यास काही प्रत्यवाय असण्याचेही काही कारण निदान मला तरी दिसत नाही.)

-----------------------------------

बाकी चालू द्या.

अनुप ढेरे Sun, 23/11/2014 - 10:09

In reply to by 'न'वी बाजू

तसे करताना त्यांनी कोणत्याही अंधश्रद्धेला थारा दिला नाही की देवळे, तीर्थस्थळे ह्यांचे महात्म्य वाढविले नाही. परंपरांचा अभिमान बाळगताना त्यांनी दाखविलेला मूल्यविवेक

हे ते वाक्य.

नितिन थत्ते Sun, 23/11/2014 - 10:34

In reply to by अनुप ढेरे

वेगळ्या प्रकारच्या कर्मकांडाचे* माहात्म्य वाढलेच.

*हे कदाचित भारतीयां**च्या प्रवृत्तीमुळे असेल.

** आज भारतात हिंदू म्हणवणार्‍या लोकांची ही सुद्धा एक कॉमनॅलिटी आहे. कोणत्याही गोष्टीचे लगेच कर्मकांड बनणे. अगदी अवलिया असणार्‍या बुवाच्या संस्थानांतसुद्धा पुढे सोवळे-ओवळे आणि काकडाअरत्या सुरू होतात.