पॉलिटिंगल भाग ६ - "चांगला भूतकाळ येणार आहे" - स्वामी ये. प्रदर्शन लाव यांची मुलाखत

पॉलिटिंगल - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५
स्वामी श्री. श्री. ये. प्रदर्शन लाव, यांची नुकतीच कांदा संस्थानच्या भूतकाळ विकास केंद्राच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. त्यांची मुलाखत घेण्यासाठी पॉलिटिंगलतर्फे मी त्यांच्या आश्रमात जाऊन पोचलो. आश्रमात आधुनिक पण मंगलमय आणि सात्त्विक वातावरण भरून राहिलेलं होतं. प्रवेशद्वारावर असलेल्या रिसेप्शनिस्टने सोज्ज्वळ साडीचा सोज्ज्वळ पदर डोक्यावरून घेतलेला होता. 'माझी स्वामींबरोबर अपॉइंटमेंट आहे' असं सांगितल्यावर सोज्ज्वळपणेच हसून माझी इंग्लिश शब्द वापरण्याची चूक दाखवत ती म्हणाली, 'अहं, अपॉइंटमेंट नाही, तुमची स्वामींबरोबर तीन वाजताची नियुक्ती आहे. दुर्दैवाने त्यांची रोजची एक ते तीन वाजताची संस्थानिक दंडधारी संघ-प्रतिनिधींबरोबरची भेट आजही लांबेलसं दिसतं आहे. पण तुम्ही कृपया आरामस्थानावर विश्रम करा.' पदर ठीकठाक करत ती पुन्हा एकदा सोज्ज्वळसं हसली.

नियुक्ती शब्दावर क्षणभर विचार करत मी आरामस्थान ऊर्फ सोफ्यावर बसलो. बाजूला टीपॉयवर वाचनासाठी 'धर्मबासकर','चैनीत सटाक्कन कपात' अशी काही छान छान प्रकाशनं ठेवली होती. मी त्यांचा मोह टाळून माझ्या मेधावीदूरभाषावर वदनपुस्तिका बघण्याचं ठरवलं. सुमारे अर्धाएक तास वेळ घालवल्यावर आतून चार दणकट, दण्डधारी, समान गणवेशातले, मिशाळ आणि विशाळ पुरुष बाहेर पडले, आणि मला सोज्ज्वळ पदराआडून बोलावणं आलं.

आत गेल्यावर स्वामींच्या दर्शनाने एकदम भारावूनच गेलो. भगवी वस्त्रं घालून स्वामी मृगाजीन पसरून बसले होते. बाजूला एक कमंडलू होता. उजवा हात एका कुबडीवर तरंगत होता. आणि त्या हातात एक जपमाळ तरंगत होती. मला वाटत होतं की आत गेल्यावर एकतर इतिहासाच्या चोपड्या इतस्ततः विखुरल्या असतील, किंवा सरकारी कामकाजाच्या फायली पसरलेल्या असतील. पण इथे एक सुंदर रिकामेपणा भरून राहिलेला होता. तो उजळण्यासाठी वीसेक समया मंदपणे तेवत होत्या. त्या समयांना लाजवणारं एक मंद स्मित त्यांनी माझ्याकडे पाहून केलं आणि मला बाजूच्या बैठकीवर बसण्याची खूण केली.

मी - एक सांगा, की भूतकाळ विकास केंद्र का? इतिहास संशोधन केंद्र का नाही?

स्वामी ये. प्रदर्शन लाव - (प्रसन्न हास्य करत धीरगंभीर स्वरात) संशोधनातून नक्की काय साधतं? काहीच नाही. जनतेला सर्वांगीण विकास देणं हा सरकारचा मुख्य हेतू आहे. आणि सर्वांगीण विकास करायचा तर भूतकाळाकडे लक्ष न देऊन कसं चालेल? म्हणूनच इतिहास संशोधन मंडळ ही संस्था बंद करून तिच्या जागी भूतकाळ विकास केंद्र तयार केलेलं आहे. पण मला एक सांगा, तुम्ही ते यंत्र घेऊन काय करताहात? (इतका वेळ सतत चालू असलेली जपमाळ हलायची थांबली आणि त्यांच्या कपाळावर एक सूक्ष्मशी आठी आली)

मी - काही नाही, मी आपलं संभाषण रेकॉर्ड करतो आहे. म्हणजे मी मुलाखत छापेन तेव्हा मला आपल्यात काय बोलणं झालं ते नीट तपासून पाहता येईल. मी तुम्हालाही या रेकॉर्डिंगची एक प्रत देईन.

स्वामी ये. प्रदर्शन लाव - कृपया ते थांबवा. (त्यांचा आवाज अजूनही मृदूच होता.)

स्वामी ये. प्रदर्शन लाव - (मी रेकॉर्डिंग थांबवलं आणि आत्तापर्यंतचं पुसून टाकलं याची खात्री करून) तुम्ही शब्द नोंदण्याचा प्रयत्न करत आहात यावरूनच तुमचा भूतकाळाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे पाश्चात्य झालेला आहे हे दिसून येतं. शिवाजीमहाराजांनी कधी त्यांच्या स्वाऱ्यांचं रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं? रामाने आपले पराक्रम किंवा कृष्णाने आपल्या लीला कधी फेसबुकवर टाकल्या होत्या? हे निव्वळ पाश्चात्यांचं अंधानुकरण आहे. भूतकाळ विकास केंद्राचं काम करताना अशा भौतिक पद्धती वापरणं आम्ही सोडून देणार आहोत.

मी - पण जर काहीच नोंदी नसतील तर अमुक एखादी गोष्ट घडली हे कसं समजणार?

स्वामी ये. प्रदर्शन लाव - इतिहास नोंदला जात नाही, तर तो घडवला जातो. जनमानसांत तो टिकून राहातो. तो खरा इतिहास. आत्ता तुमचं माझं काय बोलणं झालं हे तुम्ही त्या क्षुद्र रेकॉर्डिंगवरून ठरवणार होतात! त्यापेक्षा तुम्ही जर चुकीचं लिखाण छापलं, त्यामुळे काही लोक खवळले आणि तुम्हाला जाहीर माफी मागण्याची पाळी आली, तर चुकीचं काय आणि बरोबर काय हे आपोआपच सिद्ध होईल ना!
(त्यांच्या चेहऱ्यावर मंदस्मित तरंगतच होतं. त्यामुळे यात काही धमकी आहे की काय हे कळायला मार्ग नव्हता.)

स्वामी ये. प्रदर्शन लाव - (परत अत्यंत प्रसन्न भाव चेहऱ्यावर आणत) लोकशाहीत सत्य असंच ठरतं. गेल्या काही दशकांत निरपेक्ष सत्य वगैरेचं खूळ शिरलं होतं इतिहास संशोधनात. डावे, पाश्चिमात्य वगैरेंच्या प्रभावामुळे. पण आता चांगले दिवस येणार आहेत. आपणा सर्वांनाच हवा असलेला चांगला भूतकाळ येणार आहे. लोकशाही मार्गाने तो लोकांनी मागितलेला आहे, आणि तो देणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे यापुढे भूतकाळात काय घडलं हे जनमतानुसारच ठरेल.

मी - याचं उदाहरण द्याल का?

स्वामी ये. प्रदर्शन लाव - जरूर देता येतील. आता काही लोकं विचारतात 'राम नावाची व्यक्ती खरोखर घडून गेली का?' आणि त्याच्यावर म्हणे अभ्यास वगैरे करून तो खरा नव्हताच असं काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. पण राम होता की नाही याचा पुरावा कुठल्यातरी पुस्तकांत, ऐतिहासिक साधनांत शोधून काय फायदा? आत्ता जनमत घ्या, ९९ टक्के कांदावासीय म्हणतील की रामावर आमचा विश्वास आहे. जनमत कशाला, आवाजी मतदानावर हा विश्वासदर्शक प्रस्ताव कुठच्याही ग्रामसभेत पास करता येईल.

मी - म्हणजे विश्वास आणि सत्य घटना यात तुम्ही फरक करत नाही?

स्वामी ये. प्रदर्शन लाव - भूतकाळाचा घटनांशी किंवा त्या काळच्या परिस्थितीशी खरं तर काहीही संबंध नाही. कारण जे घडतं त्याचे पडसाद फक्त शिल्लक राहातात. आता तुम्ही माझ्याकडे बघता. म्हणजे माझ्याकडून येणारा प्रकाश तुम्हाला जाणवतो. मी आहे की नाही, मी कोण आहे याला काहीच अर्थ नाही. तुमच्यापर्यंत पोचणारा प्रकाश, तुमच्या मेंदूत निर्माण झालेली माझी प्रतिमा म्हणजे मी. तसाच भूतकाळही जनमानसात शिल्लक राहिलेल्या प्रतिमांनी बनतो. या प्रतिमा बदलल्या की भूतकाळ बदलतो. दुसरं उदाहरण देतो. माझ्यावर काही इंटुक लोकं आक्षेप घेतात की मी कुठच्याच जर्नलमध्ये माझे पेपर पब्लिश केले नाहीत, म्हणजे मी या पदासाठी लायक नाही. मी म्हणेन की माझी या पदासाठी निवड झाली हेच पुरेसं कारण आहे. कारण मी जर लायक नसतो तर या पदासाठी निवड झाली असती का? पदासाठी निवड झाल्यावर डिग्र्या, पेपर्स हे नंतर आपोआपच येतात. शिक्षणमंत्र्यांवरदेखील अशीच अशिक्षित असण्याबद्दल टीका झाली. त्यांना नाही का महिन्याभरात डॉक्टरेट मिळाल्या? भूतकाळ बदलता येतो.

मी - भूतकाळाचा विकास म्हणजे नक्की काय? आणि तो कसा करणार?

स्वामी ये. प्रदर्शन लाव - तुमच्या पाठीमागे ती भिंत दिसते आहे? ती पडायला आली आहे, पोपडे उडले आहेत, विटा दिसताहेत... आता 'भिंत घाणेरडी आहे' असं तुम्ही सहज म्हणू शकता. त्यासाठी उत्तम कॅमेरे वापरता येतील, तज्ञांची मतं घेता येतील. पण त्याचा भिंतीला काय फायदा? त्या भिंतीच्या आधाराने राहणाऱ्यांना काय फायदा? त्यापेक्षा त्या भिंतीवर रंगरंगोटी केली, तिच्यावर पवित्र विभूतींची चित्रं काढली की लोकं तिच्याकडे आदराने बघतात. तसंच भूतकाळाचंही आहे.

मी - पण भूतकाळ बदलण्याऐवजी वर्तमान किंवा भविष्यकाळ सुधारण्याचा प्रयत्न नको का करायला?

स्वामी ये. प्रदर्शन लाव - इथेच आपली विचारसरणी आणि पाश्चिमात्य विचारसरणी यात फरक आहे. आपल्या कर्मविपाक सिद्धान्तानुसार आपली सद्यस्थिती ही आपल्या भूतकाळानुसार ठरते. तर सतत वर्तमान सुधारत राहाणं, आणि त्यातून भविष्य सुधारण्याचा प्रयत्न करणं ही पाश्चिमात्य विचारसरणी. आपण जर सतत भूतकाळ सुधारत गेलो, तर आजची परिस्थिती कितीही हलाखीची असो, भविष्यात ती सुधारणार कारण वर्तमान हा भविष्याचा भूतकाळ आहे.

मी - (थोडा चक्रावून जात) म्हणजे नक्की काय ते उदाहरणाने समजावून द्याल का?

स्वामी ये. प्रदर्शन लाव - जरूर. आज शेत नांगरून बिया पेरणं हे कष्टाचं काम आहे. त्यातून तुम्हाला धान्य मिळेलही कदाचित. पण त्याचा फायदा काय? पाच वर्षांनी तुम्ही नोंदी तपासून पाहाल, लोकांना विचाराल तेव्हा 'पाच वर्षांपूर्वी प्रचंड पीक आलं' एवढंच लोक म्हणणार. त्याऐवजी दुसरी पद्धत म्हणजे दरवर्षी जर पाच वर्षांपूर्वीच्या नोंदी नष्ट करायच्या किंवा सुधारायच्या आणि लोकांना पटवून द्यायचं की 'पाच वर्षांपूर्वी प्रचंड पीक आलं'. दोन्ही पद्धतींचा परिणाम तोच! दरवर्षी भूतकाळातलं पीक वाढवलं, तर एकंदरीत सुबत्ता वाढणार नाही का? आता उदाहरणच द्यायचं झालं तर महाभारतकालात विमानं होती, क्षेपणास्त्रं होती असं सिद्ध झालं की मग त्याच गोष्टी आत्ता तयार करून वेळ वाया कशाला घालवायचा? त्यापेक्षा तो पैसा अनेक उद्योगपतींना उपलब्ध करून देऊन जास्त विकास साधता येईल.

मी - तुम्ही 'महाभारतकालात विमानं होती, क्षेपणास्त्रं होती असं सिद्ध झालं की' असं म्हणालात. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आत्ता लोकांचा त्यावर विश्वास नाही. म्हणजे तुमच्याच व्याख्येप्रमाणे ते सत्य नाही असं होत नाही का?
(हे म्हटल्यावर मात्र स्वामींची शांतता काहीशी ढळल्यासारखी वाटली. त्यांच्या हातातली जपमाळ क्षणभर थरथरली. पण त्यांनी लगेच किंचित स्मितहास्य चेहऱ्यावर प्रयत्नपूर्वक आणलं)

स्वामी ये. प्रदर्शन लाव - अशा सकारात्मक सत्यांची व्याप्ती वाढवणं हेच भूतकाळ विकास केंद्राचं ध्येय आहे.

मी - पण डाव्या विचारसरणीच्या स्टालिननेही हेच केलेलं होतं. जनमानसात जे शिल्लक राहील तेच सत्य हे मानून त्याने प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेलं सत्यच बदलण्याचा प्रयत्न केला. माध्यमांवर असलेल्या संपूर्ण अधिपत्यामुळे त्याचे प्रयत्न यशस्वी झालेही. मला असं विचारायचं आहे की डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांनी जे इतिहासलेखन केलं ते मोडून काढून तुम्ही डाव्या विचारसरणीच्या राज्यकर्त्यांनी जे केलं ते करण्याचा प्रयत्न करत आहात का?

या प्रश्नाचं उत्तर मला नक्की आठवत नाही. खरं तर हा प्रश्न मी विचारला का नाही हेही मला निश्चितपणे आठवत नाही. पण स्वामींच्या चेहऱ्यावरचं स्मित नाहीसं झाल्याचं निश्चित आठवतं. ते काहीतरी मोठ्याने बोलत होते, आणि आसपासच्या समयाही थरथरत होत्या एवढंच आठवतं आहे. आणि त्यानंतर ते चार दंडधारी विशाळ पुरुष आले की नाही हे तर बिलकुलच आठवत नाही. माझा डावा डोळा सुजलेला आहे, चष्मा मोडलेला आहे आणि शर्ट जागोजागी फाटून अंगभर कुठेकुठे दुखतं आहे हे खरं आहे. पण त्यासाठी मीच जबाबदार असल्यामुळे मी अकारणच स्वामी ये. प्रदर्शन लाव यांची जाहीरपणे माफी मागतो आहे.

संपादक, बाकी काही छापलं नाही तरी ही जाहीर माफी नक्की छापा.

(चित्र जालावरून साभार)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

बाजूला टीपॉयवर वाचनासाठी 'धर्मबासकर','चैनीत सटाक्कन कपात' अशी काही छान छान प्रकाशनं ठेवली होती

'धर्मबासकर'नंतर पुढचे आपोआप 'चेन्नैत सटाक्कन कपात' असे वाचले गेले. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त खुसखुशीत फार्स जमला आहे.

पदासाठी निवड झाल्यावर डिग्र्या, पेपर्स हे नंतर आपोआपच येतात. शिक्षणमंत्र्यांवरदेखील अशीच अशिक्षित असण्याबद्दल टीका झाली. त्यांना नाही का महिन्याभरात डॉक्टरेट मिळाल्या? भूतकाळ बदलता येतो.

हे वाचून इतकी हसले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी विश्रम करून मुलाखत वाचायला घेतली होती. 'वदनपुस्तिका' शब्दानंतर आरम (का कायसंसं) झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धर्म बासकर, सटाक्कन कपात, मेधावीदूरभाष, ये प्रदर्शन लाव वगैरे खासच.
शेवटी लेखकाला काही न आठवणं हेही साजेसंच. नको असलेला भूतकाळ कधी घडलेलाच नसतो, (आणि जो घडला तो अच्छाच असतो) हे सप्रमाण सिद्ध झालं.
कल्पना अफलातून आणि ती फुलवलीसुद्धा आहे सुंदर.
बर्‍याच दिवसांनी असे खुमासदार लेखन वाचायला मिळाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. लेख छानच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा!
थोर लेखन! __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL

कायच्या काय हाणलेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्त Smile

हेगेलचं 'फिलॉसॉफी ऑफ हिस्टरी' आठवलं. हा लेख त्यावरुनच कॉपी केला असावा अशी शंका आली.
पण मग लक्षात आलं की हा प्रकार हेगेलच्या आधीचा, म्हणजे त्यानीच कॉपी केलं असणार.
हे पाश्चात्य म्हणजे ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोलतीच बंद :-x.
पाचपैकी दहा गुण! _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0