अनश्व रथ, पुष्पक विमान व आपण सर्व - रवींद्र रु. पं. : लेखांक तिसरा (अंतिम)

लेखांक पहिला
लेखांक दुसरा

(मागील दोन लेखांत आपण पाहिले की गेल्या शंभर वर्षात देशातील सर्व पुरोगामी संस्था-संघटना ह्यांची शकले झाली, पण संघ परिवार मात्र चिरेबंद राहिला. पुरोगामी आपल्या चुकांतून काहीच शिकले नाहीत, पण ‘हिंदूंचा हिंदुस्तान’ ह्या कालबाह्य व अनैसर्गिक संकल्पनेशी निष्ठा कायम ठेवूनही संघ झपाट्याने बदलला. त्याने शेटजी-भटजींचा पक्ष ही आपली प्रतिमा जाणीवपूर्वक बदलली. आजच्या घडीला सुस्पष्ट कार्यक्रम व प्राधान्यक्रम असणारी देशातील एकमेव राजकीय शक्ती रा. स्व. सं. हीच आहे. संघाचा हा अश्वमेधाचा घोडा रोखणे हे देशाच्या बहुविधतेसाठी, तसेच समता-स्वातंत्र्य-बंधुतेवर निष्ठा असणाऱ्या सर्वांसाठी आवश्यक आहे. हिंदुत्वाचा खरा धोका पुरोगाम्यांना किंवा अल्पसंख्याकांना नसून हिंदू धर्म मानणाऱ्याना आहे. कारण हिंदू धर्म व हिंदुत्व ह्या परस्परविरोधी संकल्पना आहेत. सर्वसमावेशकत्व, कशालाही न नाकारणारे अघळपघळ मोकळेपण हे हिंदुधर्माचे स्वभाववैशिष्ट्य आहे, तर हिंदुत्वाला त्याचे वावडे आहे. मुळात एकाच देवाला पुजणारा, ठरलेल्या दिवशी देवळात जाऊन ठराविक पद्धतीने उपासना करणारा एकेश्वरी पंथ हा हिंदुत्ववाद्यांचा आदर्श आहे. मुस्लिमांचे कडवेपण व चर्चची चिरेबंदी रचना ह्यांचे त्यांना अतीव आकर्षण आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा उदय म्हणजे हिंदू धर्माच्या प्राणतत्वाचा नाश.)

भारत हे मुळात एक राष्ट्र नसून अनेकविध राष्ट्रांचा समूह आहे. शेकडो भाषा, हजारो जाती, विविध धर्म, आचार-विचार-विहार-अर्चना ह्यांविषयी कमालीचे विविधत्व असणारा हा खंडप्राय प्रदेश. पण हे केवळ विसंगतीचे गाठोडे नाही. बंदुकीच्या धाकाने किंवा बाजारपेठेच्या आमिषाने एकत्र राहू शकतील असे हे घटक नाहीत. ह्या सर्वांना शेकडो वर्षे बांधून ठेवणारे चिवट-जीवट असे काही सूत्र आहे. हा खंडप्राय देश हा जगाच्या इतिहासातील सहजीवनाचा एक अभूतपूर्व असा प्रयोग आहे. इतकी विविधता अबाधित ठेवून जर हा देश गुण्यागोविंदाने नांदू शकला, तर जगात शांततामय सहजीवनाला भवितव्य आहे.

ह्या देशाला स्वातंत्र्याची स्वप्ने पडू लागली तेव्हा इथल्या द्रष्ट्या नेत्यांना ही जाणीव झाली होती की येथील जात-धर्म-स्त्री-पुरुष भेद व वर्गभेद ह्यांचे ताणेबाणे परस्परांत गुंफलेले आहेत. त्यामुळे ह्यातील कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक सुट्या पद्धतीने करता येणार नाही. ह्या भेदातील विषमता व शोषण नष्ट करायचे, पण बहुविधता टिकवायची, जगण्याच्या प्रश्नांना हात घालायचा, पण अस्मितांकडे दुर्लक्ष करायचे नाही, असा हा अवघड मामला आहे. धर्म-जात-भाषा ह्यांच्या अस्मितांनी उग्र रूप धारण केले तर माणसे सारे काही विसरून मरण्या-मारण्याला तयार होतात, हे त्यांनी अनुभवाने जाणले होते. म्हणून बहुसंख्यांकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गांधींसारख्या नेत्याने जगाच्या इतिहासात एक वेगळाच मार्ग चोखाळला. त्यांचा मार्ग विग्रहाचा नसून समन्वयाचा होता. शोषितांच्या दुःखाशी नाते जोडत शोषकांनी स्वतःला बदलावे, अधिक समंजस, संवेदनशील बनावे हा तो मार्ग होता. त्यासाठी शोषक वर्गातील शहाण्या मंडळींना त्यांनी प्रायश्चित्ताच्या भूमिकेत नेले. मानवी विष्ठेच्या नरकात आयुष्य घालविणे किंवा कातडी कमावून इतरांना चामड्याच्या वस्तू वापरता याव्या म्हणून त्या चामड्याच्या वासासोबत जीवन कंठणे काय असते, हे समजण्यासाठी उच्चवर्णीयांनी भंग्याचे किंवा चांभाराचे आयुष्य जगावे अशी प्रेरणा त्यांनी दिली. जातियुद्धाचा नारा न देता शांतपणे देशातील सर्व स्तरांतील नेतृत्व त्यांनी ब्राह्मणांकडून बहुजन समाजाकडे, आजच्या शब्दात दलितबहुजनांच्याकडे - हस्तांतरित केले. पुरुषसत्तेविरुद्ध एल्गार न पुकारता त्यांनी देशातील लाखो स्त्रियांना स्वातंत्र्यलढ्याच्या संग्रामात माजघरातून थेट रस्त्यावर उतरविले. ‘हिंदी-हिंदू–हिंदुस्तान’चा आग्रह न धरता मूठभरांच्या संस्कृतनिष्ठ हिंदीऐवजी त्यांनी सर्वाना समजेल, आपलीशी वाटेल अशी ‘हिंदुस्तानी’ घडविण्याचा, वापरण्याचा आग्रह धरला. ही भाषादेखील दाक्षिणात्यांवर न लादता ती त्यांना आपलीशी वाटावी म्हणून हिंदीएतर राज्यात राष्ट्रभाषाप्रचाराचे व्रत घेवून हिंदीच्या स्वयंसेवकांना पाठविले. हा देश केवळ हिंदूंचा नाही, येथील संस्कृती केवळ त्यांची नाही, हे हिंदूंनी समजून घ्यावे ह्याचा आग्रह धरला व अखेरीस त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. कामगार संघटना बांधत असतानाही भांडवलदार वर्गाला ‘शहाणे’ करण्यावर त्यांनी भर दिला. येथील बहुविधता टिकावी, नव्हे, भारतरूपी सहस्रदलकमळाची एकूण एक पाकळी विकसित व्हावी, म्हणून त्यांनी स्वतंत्र भारताच्या रचनेत दोन गोष्टींचा आग्रह धरला – एक, केंद्रीय सत्ता बलिष्ठ करण्यावर भर न देता मजबूत राज्यांचा समूह – संघराज्य – म्हणून हा देश विकसित व्हावा आणि दोन, प्रत्येक राज्याचा आधार (धर्म वा जाति नसून) भाषा हा असावा.

भारतातील गंगा-जमनी संस्कृती

स्वतःला जहाल क्रांतिकारी समजणाऱ्या प्रत्येक विचारधारेचे पाईक एक तर गांधी काय करतात हे समजू शकले नाहीत, किंवा गांधींचा मार्ग हा क्रांतीची धार बोथट करण्याचा मार्ग आहे असे त्यांनी मानले. गांधी हे कार्ल मार्क्स किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारखे धारदार मांडणी करणारे विचारक नव्हते. त्यांचा भर सर्वांना समजून घेत, समजावून सांगत एकत्र आणण्याचा होता. केवळ परकीय सत्तेविरुद्ध लढण्यासाठी नव्हे, तर नंतर एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून नव्या आव्हानांना सामोरे जाताना सर्वांना एकत्र कसे राखता येईल व जात-धर्म-भाषा इ. विविध अस्मिता एकमेकांच्या उरावर न बसता परस्परपूरक कशा ठरतील ह्याचा विचार करूनच त्यांनी आपली ही रणनीती ठरवली होती. बारकाईने विचार केला तर ती ह्या देशाच्या ‘स्व’भावाशी सुसंगत होती; आपण ज्याला आज हिंदू धर्म म्हणतो, त्याच्या ‘सर्वसमावेशकते’च्या ‘निजधर्मा’शीही तिचे जवळचे नाते होते. कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे गेली कित्येक शतके ह्या देशातील विविध अंतर्विरोध व विविधता ह्यांना सामावून घेणे येथील समाजव्यवस्थेला शक्य झाले, ह्याचे कारण येथील जनमानसाच्या नसांतून वाहत असणारी, येथील ग्रामकेंद्रित व्यवस्थेतून स्फुरलेली, सातत्याने नव्या-जुन्याची सांगड घालणारी, बहुपेडी, गंगा-जमनी संस्कृती. इथल्या काशी-विश्वेश्वराला रोज जाग येते ती कुणा बिस्मिल्ला खाँच्या शहनाई वादनाने. स्वतःला हिंदुहृदयसम्राट् म्हणविणाऱ्यांच्या नावातील ‘साहेब’चे मूळ पर्शियन ह्या म्लेंच्छ भाषेत असते व ज्या भाषेच्या अस्मितेच्या नावाने ते मतांचा जोगवा मागतात त्यातील निम्म्याहून जास्त शब्द अरबी, तुर्की, पर्शियन सारख्या ‘परकीय’ भाषांतून आलेले असतात. येथील कट्टर हिंदुधर्मीयांच्या ‘उपवासा’ला चालणारे बहुतेक पदार्थ – उदा. बटाटा, साबुदाणा, डाळिंब-सफरचंदासारखी बहुतेक फळे, चहा, कॉफीसारखी बहुसंख्य पेये, सुका मेवा – परकीय भूमीतून अलिकडच्या काळात भारतात आलेली असतात व ती त्यांनी आपली मानलेली असतात. इतकी ही सम्मिलित संस्कृती ह्या देशाच्या रक्तात मिसळलेली आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि एका नव्या राष्ट्राचा जन्म झाला, ही एक अभूतपूर्व घटना होती. त्यापूर्वी हा खंडप्राय देश एक राष्ट्र म्हणून कधी उभा राहिला नव्हता. स्वातंत्र्यलढ्याच्या सर्व प्रक्रियेत आपण राष्ट्र आहोत म्हणजे नेमके काय आहोत, ‘आपण’ म्हणजे कोण, आपल्याला स्वातंत्र्य कोणापासून व कशापासून मिळवायचे आहे अशा अनेक प्रश्नांची साधकबाधक चर्चा झाली. धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते – हिंदू व मुस्लिम राष्ट्रवादी – स्वातंत्र्यलढयापासून दूर राहिले. मार्ग सशस्त्र क्रांतीचा असो की अहिंसात्मक लढ्याचा, रा. स्व. संघ, हिंदू महासभा किंवा मुस्लिम लीग हे सर्व त्यात कोठेही नव्हते. अपवाद करायचा झाल्यास सावरकरांच्या पूर्वायुष्याचा करता येईल. पण काळ्या पाण्याच्या शिक्षेवरून परतल्यावर तेही स्वातंत्र्यलढ्यापासून दूरच राहिले. स्वातंत्र्यसंग्रामात सिंहाचा वाटा अर्थातच गांधीजी व कॉंग्रेस पक्षाचा होता. पण समाजवादी व साम्यवादी प्रेरणा घेऊन कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांचे ह्या लढ्यातील योगदानही महत्त्वाचे होते. स्वतंत्र भारत कसा असावा ह्याच्या चिंतनात गांधीवादी, समाजवादी-साम्यवादी व आंबेडकरवादी ह्या सर्व विचारप्रवाहांचे मोठे योगदान होते. त्यांचे आपसातील मतभेद कितीही गंभीर असले तरी स्वातंत्र्य-समता-बंधुता ह्या त्रयीवर आधारलेल्या राष्ट्राची निर्मिती ह्या मुद्द्यावर त्यांच्यात एकमत होते. अन्यधर्मीयांच्या द्वेषावर आधारित ‘स्व’ची संकल्पना व त्या आधारावर आखलेला राष्ट्रवाद ह्या सर्वांना अमान्य होता. इ. स. १९४०-४५ पर्यन्त हा पुरोगामी प्रवाह इतका बलशाली होता की हिंदू व मुस्लिम राष्ट्रवादाला येथे पाय रोवणे कठीण झाले होते. पण स्वातंत्र्य जवळ आले आणि इंग्रजांनी जाणीवपूर्वक पोसलेल्या हिंदू-मुस्लिम दुहीला सुगीचे दिवस आले. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आधी मांडला सावरकरांनी. त्याचा फायदा मिळाला ‘हिंदू आपल्याला सुखाने जगू देणार नाही’ असा बुद्धिभेद करणाऱ्या मुस्लीम लीगला. सांप्रदायिक दंगे इतके अनावर झाले की त्यापेक्षा फाळणी परवडली, असे म्हणून देशाच्या नेत्यांनी पाकिस्तान निर्मितीला मान्यता दिली. आज फाळणीच्या नावाने गांधी व कॉंग्रेसच्या नावाने खडे फोडणाऱ्या वीरांनी त्याविरोधात कोणतेही आंदोलन उभारल्याचा पुरावा नाही.

संघवर्धनाचा अन्वयार्थ

खरे तर बांगलादेशच्या निर्मितीनंतर धर्माधारित राष्ट्रवादाचा सिद्धांत मोडीत निघाला. वंशशुद्धी व एकारलेल्या राष्ट्रवादाची कलेवरांचे हिटलर व मुसोलिनीबरोबर दफन झाले, पण त्यांना गुरुस्थानी मानणारी व स्थापनेनंतर ७-८ दशके निष्प्रभ ठरलेली रा. स्व. संघासारखी संघटना आज केंद्रात व बहुसंख्य राज्यात सत्तेवर आहे व ह्या देशातील सर्व जाती-जमाती-वर्गात तिच्या पाठीराख्यांची संख्या वेगाने वाढते आहे, ह्याचा अन्वयार्थ आपण कसा लावणार?

ह्याच्या अपश्रेयाचा सर्वात मोठा मानकरी (?) आहे कॉग्रेस पक्ष. खरे तर १९३०च्या दशकातील प्रांतिक सरकारांच्या अनुभवावरून गांधीजी सावध झाले होते व स्वातंत्र्यानंतर सत्ता मिळाल्यावर कॉंग्रेसवाले किती भ्रष्ट व निगरगट्ट होऊ शकतात ह्याचा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस पक्ष खालसा करण्याची सूचना केली होती. पण फाळणीने डागाळलेले स्वातंत्र्य मिळाल्यावर लागलेल्या दंग्यांची आग विझविण्यात त्यांची शक्ती खर्च पडली व त्यापाठोपाठ हिंदू राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली. कॉंग्रेसने त्यांच्या मृत्यूचे भरपूर भांडवल केले. त्यांच्या नावावर सत्तेचा यथेच्छ उपभोगही घेतला. त्यांच्या नावाची माळ जपत त्यांच्या तत्त्वांना पायदळी तुडविण्याचे कार्य ह्या पक्षाने इमानेइतबारे केले. जनता दलाचा प्रयोग फसल्यावर जितकी काही बिगर कॉंग्रेसी सरकारे केंद्रात किंवा राज्यात आली, ती एक तर अंतर्गत वादांमुळे कोसळली किंवा कॉंग्रेसी संस्कृतीची सारी वैशिष्ट्ये, उदा. घराणेशाही, भ्रष्टाचार, दिल्लीश्वरांचे लांगूलचालन, लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व दरबारी राजकारणावर भर- त्यांनी आत्मसात केली. ठोस पर्यायांच्या अभावामुळे तर कॉंग्रेसची मस्ती अधिकच वाढली. गरीब, दलित, अल्पसंख्य, पुरोगामी इ. मतदार आपल्याशिवाय जाणार कुठे? अशा गुर्मीत वागणाऱ्या अशा कॉंग्रेसला पर्याय मिळताच आता मतदारांनी धडा शिकवला आहे.

आपला खरा वारसा टाकून देऊन देशाला संघ परिवाराच्या कृतक् अस्मितांच्या गर्तेत ढकलण्याच्या अपश्रेयाचे दुसरे मानकरी (?) आहेत तथाकथित गांधीवादी. त्यांतही सरकारी गांधीवादी, संधिसाधू गांधीवादी, संस्थाबद्ध गांधीवादी असे पोटभेद आहेत. पण ह्या सर्वांनी मिळून जाणतेपणी किंवा अजाणता एक गोष्ट केली, ती म्हणजे खरा गांधी लोकांपासून दडवून ठेवला. एक गुळगुळीत, निरुपद्रवी, त्याच्या तीन माकडांप्रमाणे जगातील साऱ्या असत्य-विद्रूप-अमंगल गोष्टींकडे दुर्लक्ष करून भजन करणारा गांधी त्यांनी लोकांपुढे ठेवला. गांधींची प्रतीके- मग ती खादी असो, ग्रामसफाई असो की ग्रामोद्योग – त्यामागील राजकीय आशय काढून घेऊन त्यांची कलेवरे गांधीभक्तांनी सजवली. त्यामुळे राष्ट्रपित्याला आपली मानणारी मुलेच ह्या देशात उरली नाहीत. हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी गांधीनी प्राण वेचले, पण आज कोणाही मुस्लिम नेत्याला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटत नाही. बहुजनसमाजाला सत्तेकडे नेणाऱ्या मार्गाचा आराखडा त्यांनी बनवला. ग्रामोद्योगाला चालना देणे म्हणजे सर्व उत्पादक जातींना उत्पादन व्यवस्थेत न्याय्य वाटा मिळवून देणे; कॉंग्रेस संघटनेचे लोकशाहीकरण म्हणजे दलित-आदिवासी-बहुजनांना राजकीय सत्तेत सहभाग व नेतृत्व देणे; अशी त्यांची भूमिका होती. मात्र बहुजनांना गांधींबद्दल कसलेच प्रेम नाही. गांधींच्या अस्पृश्यताविरोधी लढ्याच्या अनेक मर्यादा असतील, पण सवर्णांच्या जाणीवजागृतीचा त्यांचा प्रयत्न हा बाबासाहेब आंबेडकरांच्या शोषितांच्या assertionच्या लढ्याला पूरक होता, हे नाकारून चालणार नाही. मात्र आज दलितांच्या मते ब्राह्मणवादाचे प्रतीक संघ परिवार नसून गांधी आहे. लाखो स्त्रियांना देशाच्या स्वातंत्र्याच्या राजकीय लढ्यात सामील करणे, अहिंसा, सेवावृत्ती व संवेदनशीलता ह्या ‘बायकी’ गणल्या जाणाऱ्या गुणविशेषांना राजकीय लढ्यात महत्वाचे स्थान देणे हे गांधींचे विशेष योगदान. पण त्याची बूज स्त्री-अभ्यासकांनी किंवा स्त्री-आंदोलनाने ठेवली नाही. ह्याचे कारण गांधीनी ह्या समाज घटकांसाठी काय केले ह्याचे विश्लेषण गांधीवाद्यांनी त्यांच्यासमोर ठेवले नाही. रचनात्मक काम करणाऱ्या अनेकांनी त्यासाठी आपली आयुष्ये वेचली, पण त्यांच्या कामाचा सांधा त्यांना बदलत्या समाजजीवनाशी जुळविता आला नाही. एकूण गांधी हा एक आदर्शवादी, कालबाह्य वेडा फकीर होता, असाच निष्कर्ष गेल्या तीन पिढ्यांनी काढला आणि गांधींकडे व त्यांच्या विचारांकडे पाठ फिरवली. ह्यासाठी गांधीवादी प्रामुख्याने जबाबदार आहेत.

परंपरा व पुरोगामित्व

संघविचाराला भारतीय विमर्शाच्या केंद्रस्थानी आणून बसविण्यात सर्वात जास्त हातभार लावला आहे तो स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या आक्रमक वाचावीरांनी. सांसदीय राजकारणातील आपली नेमकी भूमिका त्यांना कधीच सापडली नाही. कॉंग्रेसला विटलेल्या जनतेने अनेकदा त्यांना सत्ता दिली, पण ती टिकविणे त्यांना जमले नाही. मिळालेली सत्ता पूर्ण काळ भोगणेही त्यांना शक्य झाले नाही. त्याना विग्रह-वजाबाकीचे राजकारण समजले, पण बेरजेचे राजकारण कधी उमजले नाही. त्यातील बहुतेकांनी गांधी समजून न घेताच त्याच्यावर फुली मारली. कारण गांधी समजून घेणे म्हणजे ह्या देशाची गुंतागुंतीची परंपरा समजून घेणे. पुरोगाम्यांना वारसा लाभला एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील सामाजिक सुधारकांचा. आपल्या परंपरेतील त्याज्य काय आहे, हे त्यांना बरोबर माहीत आहे व त्याविरुद्धचा त्यांचा संतापही रास्त आहे. पण जणू काही आपणच ह्या भरतखंडातील आद्य बंडखोर असा त्यांचा आविर्भाव असतो. परंपरेविरुद्ध विद्रोहाचीही एक परंपरा असते, भारतासारख्या प्राचीन देशात तर ती अतिशय जोरकस असते व ह्या विद्रोहाच्या परंपरेशी नाते जुळविल्यानेच आपला विद्रोह समाजात स्वीकारला जाऊ शकतो, हे भान त्यांना राहिले नाही व ह्याचा सर्वात जास्त लाभ संघ परिवाराला मिळाला. परंपरेविषयी अभिमान ही प्रत्येक समाजाची दुखरी जागा असते. त्यात अडकून पडून वर्तमानाकडे दुर्लक्ष करू नये, त्यातील त्याज्य भाग उराशी कवटाळू नये, त्यासाठी मूल्यविवेक वापरावा, ह्याचा आग्रह धरताना त्यातील समृद्ध बाबी आमच्या आहेत, हे देखील ठामपणे सांगितले, तरच समाजाला तुमच्याविषयी विश्वास वाटतो. आपल्या परंपरेत योग, आयुर्वेद, प्राचीन दर्शने, शास्त्रीय कला, कैलास-अजिंठा व ताजमहाल-लाल किल्ल्यासारखे स्थापत्याचे आविष्कार, लोककला अश्या अनेक अभिमानास्पद बाबी आहेत. दुर्दैव असे की त्या पश्चिमेत प्रतिष्ठा पावल्या की मगच आपल्याला त्यांचे महत्त्व वाटते. ह्या देशात प्राचीन काळी खरोखर समृद्धी होती. ज्ञान-तंत्रज्ञान विकसित होते. कला-मानव्यशास्त्रेदेखील प्रगत होती. बौद्ध काळात तर आपली वैचारिक समृद्धी चरमावास्थेला पोहचली होती. तेव्हापासून अठराव्या-एकोणिसाव्या शतकापर्यंत परकीयांनी लुटून नेण्यासारखे आपल्याकडे खूप काही होते, हा इतिहास आहे. त्याचा अभिमान बाळगत असतानाच आपण सातत्याने पराजित का होत राहिलो, आपली ज्ञान-तंत्रज्ञानाची परंपरा लुप्त केव्हा व का झाली, मानवतेला काळिमा लावणाऱ्या रूढी-परंपरा आपल्या रक्तात कशा रुजल्या ह्याचा सातत्याने शोध घेणे ही आपली समाज म्हणून, राष्ट्र म्हणून जबाबदारी आहे. होते असे की संघ परिवार सोन्याचा धूर, अनश्व रथ, पुष्पक विमान अश्या फँटसीत रमतो व जे काही त्याज्य आहे, ते परकीयांकडून आले, असे म्हणून जबाबदारी झटकतो. शंबूक, एकलव्य, चिलया बाळ व सीतात्याग ह्यांचे काय करावे हे त्यांना कळत नाही. ह्याविरुद्ध, आमचे पुरोगामी, परंपरा म्हणजे जणू बाजारगप्पा आहेत, असे मानून त्यांच्याकडे पाठ फिरवितात. धर्म ह्या गोष्टीची तर त्यांना इतकी अॅलर्जी आहे की खुद्द कार्ल मार्क्सच्या त्या सुप्रसिद्ध वचनाचा पूर्वार्ध ते सोयीस्कर रीत्या विसरून जातात. मार्क्स म्हणाला होता- “धार्मिक वेदना ही एकाच वेळी खऱ्याखुऱ्या वेदनेचा आविष्कार व खऱ्या वेदनेविरुद्ध उठविलेला आवाज आहे. धर्म हा दबल्यापिचलेल्यांचा हुंदका, बेदर्द दुनियेचे हृदय, तसेच आत्मा गमाविलेल्या व्यवस्थेचा आत्मा आहे. ती जनसामान्यांची अफू आहे. ” ह्यातील ‘अफू’वरच लक्ष केंद्रित केल्यामुळे धर्माच्या विधायक भूमिकेकडे दुर्लक्ष होते. सर्वसामान्य माणसाला दुःखात, संकटात आधार वाटू शकेल अशा प्रति-ईश्वराची निर्मिती न करताच धर्म व ईश्वराला ‘रिटायर’ करणे शक्य नाही, हे न कळल्यामुळे पुरोगामी ह्या देशात कालबाह्य होऊ लागले आहेत. त्यामुळे हा देश ह्यातील सर्व परंपरांसह त्यांनी संघाला आंदण दिला आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती त्यांनीच निर्माण करून ठेवली आहे. विवेकानंदांसारखा भाकरीचे तत्त्वज्ञान मांडणारा व येशू ख्रिस्त-पैगंबरांचे माहात्म्य समर्थपणे मांडणारा आधुनिक संतही त्यांनी न वाचताच नाकारला. मग संघ परिवाराने त्याला आपल्या कवेत घेऊन हिंदुत्वाचा प्रणेता केले, ह्यात आश्चर्य ते कोणते?

गेल्या २३ वर्षात आपण स्वीकारलेल्या खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खा-उ-जा) चे जीवनाच्या सर्व क्षेत्रांत अतिशय खोल व दूरगामी परिणाम झाले आहेत. भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने पैसा मिळविणे हेच सर्वात मोठे मूल्य मानले जाऊ लागले आहे. सांस्कृतिक सपाटीकरण व एकजिनसीकरणाची प्रक्रिया जगभरात वेगाने सुरू झाली आहे. स्थानिक भाषा, संस्कृती कोंडीत सापडल्या आहेत. काही तर नामशेषही झाल्या आहेत. माणसे कमालीची असुरक्षित बनली की मग ती अस्मितेच्या भोवऱ्यात सापडतात. जात-धर्म- कालबाह्य रूढी-परंपरा ह्यात आपले स्वत्व, ओळख व निवारा शोधू लागतात. जगभरात धार्मिक पुनरुज्जीवनाची लाट आली, तशीच ती भारतातही दाखल झाली. त्यामुळे धर्माचे बाजारीकरण झाले. आसारामबापूसारखे ‘संत’ पूजनीय बनले. ह्यामागील जनसामान्यांची मानसिकता लक्षात न घेता धर्मावरच हल्ला चढविल्यामुळे आज सर्वसामान्य जन हे पुरोगामी संघटना-चळवळींपासून दुरावले आहेत. त्यांना संघविचार मनापासून पटतो असे नाही, पण पुरोगाम्यांची वृत्ती त्यांना संघ-विचाराकडे लोटते, हे आपण विसरून चालणार नाही.

कॉंग्रेसचे नाकर्तेपण, डाव्यांची नेहमीची संभ्रमावस्था व जागतिकीकरणामुळे अस्मितेच्या राजकारणाला आलेले उधाण ह्याचा पुरेपूर फायदा संघ परिवाराने उठवला. त्याचबरोबर जवळजवळ सहा-सात दशके त्यांनी सत्तेपासून दूर राहून उमेदवारी केली, ह्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे. ‘रा. स्व. संघ हा तरुणाईचे लोणचे घालण्याचा कारखाना आहे’ असे एक विचारवंत म्हणत असत. हे खरे आहे. संघात डोके बंद करण्याची प्रक्रिया अतिशय सफाईने चालवली जाते. त्यामुळे स्वतंत्र विचार करू शकणारी, प्रज्ञावंत मंडळी संघविचाराच्या आसपास फिरकत नाहीत. पण ह्या विचारांशी निष्ठा बाळगून लाखो तरुण-प्रौढ व्यक्तींनी स्वतःला संघाच्या कामात समर्पित केले आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. लहानपणी घडणारे संस्कार नंतर वज्रलेप बनतात, ह्या साध्या सिद्धांतावर संघाचा पाया रचला गेला. त्याच तत्त्वाने मुलांवर लहानपणीच डोके खुले ठेवण्याचे, प्रश्न विचारण्याचे संस्कार करणे शक्य आहे. राष्ट्र सेवा दलाची निर्मिती ही catch them young ह्याच विचाराने झाली होती व त्याने पुरोगामी विचारांना बळदेखील पुरविले होते. आज सेवादल मृतवत् झाले आहे, पण संघ जोरात आहे, कारण तो तिथेच थांबला नाही. जी व्यक्ती जिथे असेल तिथे राहून ती संघविचाराला पूरक काय करू शकेल, ह्याचा बारकाईने विचार संघाने केला आहे. त्यामुळे शाखेबाहेरील लाखो कार्यकर्ते व कोट्यवधी सहानुभूतिदार त्यांना मिळविता आले व विशेष म्हणजे टिकविता आले. माणसे कशी जोडावीत हा एक धडा तरी पुरोगाम्यांनी संघाकडून घेतलाच पाहिजे. कारण त्यांचे स्पेशलायझेशन विचारधारेच्या नावाने माणसे तोडण्यात आहे.

आज संघाजवळ सुस्पष्ट कार्यक्रम आहे, मोदींसारखे धूर्त, मायावी नेतृत्त्व आहे व जनमताचा सावध पाठिंबा आहे. पण तेव्हढ्या आधारावर हिंदुराष्ट्रनिर्मितीच्या ध्येयापर्यंत पोहोचणे शक्य नाही, ह्याचे भानही त्यांना आहे. राजकीयदृष्ट्या अधिक शक्तिशाली पायावर उभे राहिल्यावर आपण ते करूच, हेदेखील संघाला माहित आहे. ह्याविषयी अंधारात आहेत ते पुरोगामी प्रवाह. म्हणूनच दहा तोंडाने बोलणाऱ्या संघाचे कुठले तरी एक वचन ग्राह्य धरून ते भरकटत जातात किंवा संघ/मोदी आता मवाळ झालेत असे मानून गाफील राहतात. पाण्याचे तापमान एकदम वाढवले तर चटके अशक्य होवून लोक त्याबाहेर उद्या मारतात, पण ते हळूहळू वाढविले तर लोकांना त्याची सवय होते हे संघाला नीट माहीत आहे. म्हणूनच मोदी भाषा वरकरणी मवाळ करून गांधींचा सोयीस्कर जप करू लागले आहेत. मोहन भागवतांच्या दसरा प्रवचनात त्यांनी भारताच्या महान विभूतींमध्ये गांधी, विनोबा, जयप्रकाश नारायण ह्यांची नावे घेतली. पण त्याचवेळी संघाने राम मंदिराचा, लव्ह जिहादचा मुद्दा सोडलेला नाही. वेंडी डोनिजरच्या पुस्तकावर घातलेली बंदी, त्यापाठोपाठ गुजरात दंगलीसारख्या अनेक संवेदनशील विषयांवरील पुस्तकांच्या प्रकाशकांनी घेतलेली माघार, दिनानाथ बात्रांचे ‘शैक्षणिक प्रयोग’, छोट्या छोट्या दंग्यातून सांप्रदायिक वातावरण धुमसत ठेवण्याची संघाची रणनीती ह्या बाबी आपल्याला काय सांगतात? साईबाबांची पूजा करू नका, असा ‘फतवा’ निघाला. आता लौकरच सुफी संत, हिंदूंना पूजनीय असणारी पीराची ठिकाणे ह्यांची पाळी येईल. हिंदू-मुस्लिम सामायिक संस्कृतीच्या एकेक प्रतीकावर विचारपूर्वक हल्ला होईल. पूर्वी दिलीपकुमार मुसलमान म्हणून त्याच्या बदनामीचे बरेच प्रयत्न करून झाले. शर्मिला टागोरने एका यवनाशी लग्न केले, म्हणून तिच्यावर व पतौडीवर चिखलफेक करून झाली. आता आंतर-धर्मीय विवाह (म्हणजे अर्थातच हिंदू मुलगी व मुसलमान मुलगा) करणाऱ्या सेलेब्रिटीना लक्ष्य केले जाईल. ‘एक दिवस भारतात हिंदू अल्पसंख्य होतील’, ‘गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी दिल्यामुळे त्यांचा ‘वध’ करावा लागला’, ‘मोदी हे जगाच्या पाठीवरचे, किंबहुना मानवी इतिहासातले सर्वात लोकप्रिय नेते आहेत’ – ह्या व अश्या कंड्या आंतरजालावर व सोशल मीडियात वारंवार पिकवल्या जातील. एरव्ही हिंदुराष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाकडे वाटचाल करताना संघ परिवार एकटा पडला असता. पण आता संघाच्या गाडीला मोदींचे इंजिन जोडले गेले आहे. जागतिकीकरणाची सारी ऊर्जा हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी वापरण्याची त्यांची रणनीती आहे. भारताची नैसर्गिक संसाधने जर वापरण्यास मिळणार असतील, भारताची बाजारपेठ व कवडीमोलाने मिळणारा बांधीव कामगारवर्ग सहज उपलब्ध होणार असतील, तर अमेरिका भारतातील धर्मनिरपेक्षतेचे, लोकशाहीचे काय होते ह्याची फिकीर करणार नाही, हे त्यांनी हेरले आहे. उलट ज्या मोदींना व्हिसा नाकारला, त्यांना निरंकुश सत्ता मिळावी, ह्यासाठी आपले सामर्थ्य त्यांच्यामागे उभे करण्यास ती मागे-पुढे पाहणार नाही ह्याचीही त्यांना खात्री आहे. म्हणूनच हिंदुराष्ट्रनिर्मितीच्या रस्त्यावरील अडचणी दूर करण्यात संघ परिवार गुंतला असताना खुद्द मोदी आपले लक्ष ‘विकासाचा रथ सुसाट कसा दौडेल ह्याची काळजी वाहण्यात आपली ऊर्जा खर्च करतील. ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली आता भारतातील सारी नैसर्गिक संसाधने जल-जंगल-जमीन-खनिजे - बहुराष्ट्रीय कंपन्यांना कवडीमोलाने खुली करून दिली जातील. पर्यावरणाच्या मुद्द्यावरून विकासाचा कोणताही प्रकल्प रोखला जाणार नाही ह्याची यथोचित काळजी विकासपुरुष घेतील. एकात्मिक मानवतावाद व ग्रामीण विकासाचा जप करीत शेतकऱ्याला शेतजमिनीवरून बेदखल करण्याचा कार्यक्रम राबविला जाईल. नरेगा, पर्यावरण सुरक्षा अधिनियम, माहितीचा अधिकार, लोकपाल, भूमी संपादन अधिनियम ह्यांसारखे देशातील गरिबांच्या हिताचे, लोकशाही मजबूत बनविणारे कायदे, योजना गुंडाळून ठेवल्या जातील, किंवा त्यांना पुरेसे पातळ करण्यात येईल. जागतिकीकरणाची फळे चाखणारा मध्यमवर्ग, केव्हाच विकली गेलेली संचार माध्यमे ह्या सर्व बाबींचे सहर्ष स्वागत करेल. प्रश्न उरतो तो फक्त निम्न मध्यमवर्ग व गरीबांचा. (त्यातील बहुसंख्य संघाच्या व्याख्येनुसार हिंदू!) पण विकासाच्या वेदीवर कुणाला तरी बलिदान करावे लागेल आणि बळी नेहमी अजापुत्राचा देतात हे हिंदुधर्मनिष्ठांना कोणी सांगायला नको.

अर्थात हे करताना संघाची मदार असेल आपल्या गोबेल्सतंत्रावर आणि संघविरोधकांच्या विखुरलेपणावर. ‘आधी जातीअंत की वर्गसंघर्ष?’, ‘दलितांचे खरे शत्रू गांधीच’, ‘समाजवादी एकजुटीचे पहिले पाऊल कोणते?’, ‘फुले-आंबेडकर की मार्क्स-फुले-आंबेडकर की मार्क्स-माओ की शिवाजी-फुले-आंबेडकर की नुसते आंबेडकर?’ अशा अंतहीन व अति-महत्त्वाच्या विमर्शात अडकलेल्या मंडळीना आपल्यातला एकेक जण कमी होतोय हे भान आपली स्वतःची पाळी येईपर्यंत येणार नाही, हे संघ परिवार जाणून आहे.

चौखूर उधळलेला हिंदुत्वाचा अश्व ठाणबंद व जेरबंद करणे ही काळाची गरज आहे. कारण तसे न झाल्यास भारताची शकले होण्यास वेळ लागणार नाही. निव्वळ बंदुकीच्या धाकाने विविध समाजघटक एकत्र नंदू शकत नाहीत. पूर्वीही ते शक्य नव्हते. आता माध्यमस्फोटांच्या काळात ते केवळ अशक्य आहे. बाजाराच्या लालसेने ते एकत्र राहतील किंवा कोट्यवधी अजापुत्रांचा बळी सोयिस्कररीत्या विसरला जाईल, अशी वल्गना कोणी केली, तरी तसे घडण्याची शक्यता नाही. त्यामुळे उरतो तो एकच मार्ग, ज्या मार्गाने चालत जाऊन ह्या देशाने कित्येक सहस्रकांची वाटचाल केली. ‘तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा’. सकलांना कवेत घेऊन, सर्वांना आपले मानून मार्गक्रमण करण्याचा. सर्वसमावेशकतेचा, अर्थपूर्ण सहजीवनाचा.

हिंदुत्त्व की सहजीवन हा निर्णय आपल्याला करायचा आहे आणि आपल्याजवळ फारसा वेळ उरलेला नाही.

ravindrarup@gmail. com

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (4 votes)

प्रतिक्रिया

बराचसा अभिनिवेश, कै च्या कै गृहीतके आणि त्यांचे भलत्या पातळीला जाऊन केलेले एक्स्ट्रापोलेशन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताची सगळ्यात महत्वाची शक्ती असलेल्या जागृत लोकशाहीच्या पोटेन्शियलकडे केलेलं सोयीस्कर दुर्लक्ष (नाही, म्हणजे त्यांना जो काही अश्वमेधाचा घोडा, चौखूर उधळलेला वारु वगैरे अडवायचा आहे ते काम 'पब्लिक' मतदानयंत्रातून इमाने इतबारे करतच असतं. आणि ते ही कोणीही न सांगता....)

न राहावून अतिशय अवांतर: रुक्मिणी रवींद्र पंढरीनाथ... इतने सारे नाम? बाकी लोग कहां हैं? Wink

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> बराचसा अभिनिवेश, कै च्या कै गृहीतके <<

उदाहरणार्थ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एक मोठे गृहीतक असे आहे -

लेखक म्हणतात की हिंदू धर्माचं स्वरूप अघळपघळ, नानाविविध उपासनापद्धतींनी सजलेलं आहे आणि संघाचा अजेंडा हिंदुत्वाला त्यांना अभिप्रेत असलेल्या रेजिमेंटेड हिंदू धर्मात परावर्तित करणे हा आहे. यासाठी संघाची सगळी यंत्रणा काम करत आहे आणि त्यांचा वारू की कायसासा चौखूर उधळलेला आहे. इथे गृहीतक हे आहे की सर्वसामान्य 'हिंदू' जनता मुकाट्याने असे संघप्रणित बदल स्वीकारेल/स्वीकारत आहे. इथे एक लक्षात घ्यायला हवे की बाकी कशाबद्दलही आपलं पब्लिक एक वेळ सेन्सेटिव्ह नसलं तरी पण स्वतःचे पूजापाठ/उपासना पद्धती याबाबतीत ढवळाढवळ लोक कदापि मान्य करणार नाहीत. त्यामुळे सरसकट एकच प्रकारचा हिंदू धर्म सर्वांच्या गळी उतरवणं संघालाच काय कोणालाही शक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही अगदी हेच लिहावयाचे होते. एक तर आम्हां लोकांना कुणी अंडर-एस्टिमेट करू नये आणि दुसरे म्हणजे संघाला ओवर-एस्टिमेट करू नये.
वरच्या लेखात उल्लेखिलेले भ्रष्टाचार, घराणेशाही आणि दिल्लीकरांचे (नागपूरकरांचे?)लांगूलचालन हे गुण भाजपमध्येही आहेतच.
सर्वसाधारणसमाजातील लोक जर निवडून येत असतील तर सर्वसाधारणांतले गुणदोष लोकप्रतिनिधींमध्ये असणारच. जे आडात, तेच पोहोर्‍यात. पाण्याची चव बदलणार नाही.
एखाद्या देशाच्या इतिहासात दहा-पंधरा वर्षे ही नगण्य असतात.
गांधींसारखा एखादा महामानवच इतिहास बदलू शकतो. बाकीच्यांना इतिहास बदलवतो; जरी त्यांनी इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला तरी.
शिवाय आम्ही रसातळ गाठला आहे असे जर (आम्ही) म्हणत असू तर या पुढची पायरी ही आणखी खोल जाणेअशी असूच शकत नाही. ती पुरुत्थान हीच असू शकते. मोदी ऑर विदाउट मोदी.
आणि जर अजून रसातळ गाठला नसेल,(काँग्रेसच्या राज्यात वगैरे,) तर अजून आणि आता स्कोप आहेच..!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पब्लिक फक्त सेन्सिटिव आहे ते 'फक्त' पूजापाठ/उपासनापद्धतीबाबत. नवरात्रात रात्रीपर्यंत गरबा वाजवायला मिळाला किंवा गणपतीविसर्जनाला रात्रभर स्पीकर लावता आला की पब्लिक खूष. याउप्पर पब्लिकला देणेघेणे आहे असे वाटत नाही. शिवाय धर्म म्हणजे फक्त पूजापाठ किंवा उपासनापद्धत नाही. सोशल व टीवीसारख्या माध्यमांमधून विशिष्ट जाहिरातबाजी करुन असं करता येणं शक्य आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुळे सरसकट एकच प्रकारचा हिंदू धर्म सर्वांच्या गळी उतरवणं संघालाच काय कोणालाही शक्य नाही.

अगदी सहमत.

संघप्रणित ऑर्गनाइझ्ड-प्लॅन्ड-मॅनेज्ड कार्यक्रमामागे असलेल्या संघ-परिवाराच्या यंत्रणेच्या क्षमतेवरील गैरवाजवी विश्वास.

जाताजाता एक प्रश्न - जेव्हा भारताची दैदिप्यमान वर्षे होती तेव्हा अशाप्रकारची अंब्रेला/ओव्हरार्किंग ऑर्गनायझेशनल बॉडी त्यामागे कार्यरत होती का ? व "मुख्यत्वे त्या बॉडीच्या कार्याचा परिपाक" म्हणून भारत दैदिप्यमान झाला - असे म्हणता येईल का ? (व अशाच बॉडीच्या अस्तित्वाचा हवाला देऊन संघ तिचे रेप्लिकेशन करण्याचे शिवधनुष्य उचलित आहे का ?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर बहुसंख्य लोक मध्यवर्गी झाले समजा, अजून काही डझन वर्षांनी, तर सरकारनी बहुसंख्यांचं हीत बघावं की गरिबांचं असा प्रश्न पडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तेव्हा अर्थातच धोरणे बदलतील ना,... लोकशाही टिकली तर?
अल्पसंख्य गरीबांना काही संरक्षण मिळेल..गॅस सिलेंडर मोफत मिळतील, तेव्हाच्या गरीबांकडे हॉट प्लेट्स असतील तर त्या सवलतीने मिळतील, त्यांना वीजदरात कपात मिळेल, वगैरे.
आणि तेव्हाचे अर्थज्ञ 'आता आम्ही पण गरीब होतो बुवा. गरीब राहाणं आणि गरीब होणं सोप्पं आणि फायदेशीर दिसतंय एकूण' असे म्हणून आय्वरी टॉवर मधून बाहेर येतील कदाचित! (गरीबही टॅक्स-पेयर झाले तर टॅक्स-पेयरचा पैसा मोफतखाती घातला असेही म्हणता येणार नाही!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज संघाजवळ सुस्पष्ट कार्यक्रम आहे, मोदींसारखे धूर्त, मायावी नेतृत्त्व आहे व जनमताचा सावध पाठिंबा आहे.

संघाजवळ सुस्पष्ट कार्यक्रम आहे व ते संघटित पणे काहितरी अघटीत करण्याची मोठ्ठी योजना वगैरे करत आहेत प्रकारचे लेख जरा जास्त ताणलेले वाटतात.
संघ की इतकी मोठी शक्ती आहे व त्यातही "एकच" व त्यातही सुस्पष्ट कार्यक्रम संघाकडे आहे या मागचा तर्क वाचायला आवडेल.

उलट बदलत्या काळात भाजपाचे होऊ घातलेले काँग्रेसीकरण व मोदीकेंद्रीत (व्यक्तीकेंद्रीत) प्रवास बघता संघ सत्तेच्या मिशाने मोदींमागे (फरफटत) चालला आहे मात्र काही काळात या दोन शक्तींमध्ये संघर्ष होईल व भस्मासुराप्रमाणे एकाला पायबंद बसेल असे वाटू लागले आहे.

===

एकूणात लेख काही बाबतीत मार्मिक असला तरी जरा अभिनिवेशी आणि थोडा फारफेच्ड वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चौखूर उधळलेला हिंदुत्वाचा अश्व ठाणबंद व जेरबंद करणे ही काळाची गरज आहे. कारण तसे न झाल्यास भारताची शकले होण्यास वेळ लागणार नाही. निव्वळ बंदुकीच्या धाकाने विविध समाजघटक एकत्र नंदू शकत नाहीत. पूर्वीही ते शक्य नव्हते. आता माध्यमस्फोटांच्या काळात ते केवळ अशक्य आहे. बाजाराच्या लालसेने ते एकत्र राहतील किंवा कोट्यवधी अजापुत्रांचा बळी सोयिस्कररीत्या विसरला जाईल, अशी वल्गना कोणी केली, तरी तसे घडण्याची शक्यता नाही. त्यामुळे उरतो तो एकच मार्ग, ज्या मार्गाने चालत जाऊन ह्या देशाने कित्येक सहस्रकांची वाटचाल केली. ‘तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा’. सकलांना कवेत घेऊन, सर्वांना आपले मानून मार्गक्रमण करण्याचा. सर्वसमावेशकतेचा, अर्थपूर्ण सहजीवनाचा.

हिंदुत्त्व की सहजीवन हा निर्णय आपल्याला करायचा आहे आणि आपल्याजवळ फारसा वेळ उरलेला नाही.

तुफान विनोदी प्यारेग्राफ आहे. लेखकास इनो घेण्याची गरज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख आवडला. संघाला ओवरएस्टिमेट केले आहे हे खरेच असले तरी त्यांचा धोका आहेच. गांधी-नेहरुंच्या कच्छपि लागलेले मोदी हेच आता संघापासून वाचवतील असे वाटते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज भाजपला बहुमत मिळालं आहे, म्हणून संघ आणि संघाच्या बगलेतल्या, निरनिराळे चेहरे आणि अजेंडे असलेल्या संघटना जोरात आहेत. त्या अनेक मुखांतून एकच तत्त्वज्ञान बोलताहेत असं आज म्हणणं सोपं आहे. पण हेच विधान डाव्या संघटनांनाही लागू आहेच की. त्यांची बाजू आज पराजित आहे इतकंच काय ते. की संघाची झाली ती 'लोकांना दाखवण्यासाठी मुद्दामहून म्यानेज केलेली वेगवेगळी तोंडं' आणि डाव्यांची झाली की मात्र लगेच 'शकलं'? हे अगदीच वरवरचं आणि तात्कालिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सीम्स लॉजिकल इनफ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संघाची वेगवेगळी तोंडं म्हणण्याची पद्धत बरीच जुनी आहे, अनौपचारिक गप्पांमध्ये मला आठवतं तेव्हापासून ऐकलेलं आहे. त्याचं कारण सगळ्यांचे दाखवायचे दात वेगवेगळे असतात, आदिवासींचं कल्याण, स्त्रियांचं संघटन, इ. पण खायचे दात वेगळे नाहीत.

संघ आणि भाजप निराळे आहेत, हे वाक्य अधिक परिचयाचं असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तीनही भाग आवडले. ज्यामच मनोरंजक होते. विशेषतः खालील वाक्ये निबंध लेखनासाठी फारच उपयुक्त आहेत.

हिंदू हा मुळात धर्मच नाही

भारत हे मुळात एक राष्ट्र नसून अनेकविध राष्ट्रांचा समूह आहे.

पण हे केवळ विसंगतीचे गाठोडे नाही.

‘समृद्ध अडगळ'

हा खंडप्राय देश हा जगाच्या इतिहासातील सहजीवनाचा एक अभूतपूर्व असा प्रयोग आहे.

इतकी विविधता अबाधित ठेवून जर हा देश गुण्यागोविंदाने नांदू शकला, तर जगात शांततामय सहजीवनाला भवितव्य आहे.

ठरलेल्या दिवशी देवळात जाऊन ठराविक पद्धतीने उपासना करणारा एकेश्वरी पंथ हा हिंदुत्ववाद्यांचा आदर्श आहे. मुस्लिमांचे कडवेपण व चर्चची चिरेबंदी रचना ह्यांचे त्यांना अतीव आकर्षण आहे.

त्यामुळे हिंदुत्वाचा उदय म्हणजे हिंदू धर्माच्या प्राणतत्वाचा नाश.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी सहमत. मताच्या पिंकांच्या टेम्प्लेट्स अगदी नीट आखीवपणे बनवून त्यांचा उपयोग केल्यामुळे लेख पाडणे अतिशय सुलभ झालेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपल्या देश, संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वारसा इत्यादी बाबत काही न माहित असलेल्या व्यक्तीचा लेख.
शिवाय संघा बद्धल तर काहीच माहिती नाही. काही न माहित असलेल्या व्यक्तीने काही न माहित असलेल्यांसाठी लिहिलेला लेख. त्यामुळे वाचताना मजा आली.

संघ सर्वधर्म समभाव या परंपरेला मानणारा आहे, कुणाला ही घाबरण्याची गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0