भाषा तुझी-ती-माझी

भाषा

तुझी-ती-माझी
एका गावातील एक शिक्षक. एके दिवशी शाळा आटपून घरी येतो तर दरवाज्यात / पुढयात एक पत्र. आपल्याला कोण आणि का पत्र लिहिल? आपल्या तर मागे-पुढे कुणी नाही मग चुकुन आपल्या घरात पत्र पोस्टमन काकांनी टाकलं की काय? पण असं कसं होईल? काकांना तर अख्या गावातला कोपरा न कोपरा माहीत आहे मग ते चुकीच्या पत्त्यावर कसे बरे देतील? अशी प्रश्नांची मालिका डोक्यात चालू असताना बाहेर वीज कडाडली आणि तो प्रश्नांच्या जंजाळातून बाहेर आला. जणू काही त्याच्या डोक्यातील वाढत्या प्रश्नांची मालिका खंडित करण्यासाठीच ती वीज कडाडली होती. एवढ्या प्रश्नांचा विचार करण्यापेक्षा त्या पत्रावरच्या मजकुरावर लक्षं केंद्रित केलं असतं तर एवढे प्रश्नच पडले नसते. पत्र पाहिल्यावर त्या शिक्षकाला कळलं की ते बाहेरील देशातून आलं आहे. त्या पत्रावर परदेशी स्टॅम्प होता. परदेशातून ते पत्रं आलं होतं आणि त्यावर पत्ता चक्क त्याच्याच घरचा होता परंतु नाव मात्र त्याचे नव्हते. कुणीतरी चुकुन आपल्या घरचा पत्ता दिला असावा, उद्या पोस्ट-ऑफीस मध्ये जाऊन पत्र परत करू किंवा पोस्टमन काका भेटले तर त्यांना ते योग्य व्यक्तीच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करू असं ठरवून शिक्षक त्याच्या नित्य / दैनंदिन कामाला लागला.

दुसर्‍या दिवशी शिक्षक पत्र घेऊनच घरा-बाहेर पडला. शाळेत जातानाच त्याला वाटेत पोस्टमन काका भेटले. “अहो काका हे पत्र माझं नाही, पत्ता माझाच आहे पण त्या पत्रावरील नाव माझं नाही आणि तुम्ही तर मला चांगलेच ओळखता तरी तुम्ही माझ्या घरात हे पत्र टाकलं?”. हे ऐकल्यावर पोस्टमन काका म्हणाले “गुरुजी तुमचं बरोबर आहे म्हणणं की हे नाव तुमचं नाही परंतु अश्या नावाची एकही व्यक्ती ह्या गावात आत्ता नाही. तुम्ही ज्या घरात आत्ता राहता त्या घरात तुमच्या आधी एक गृहस्थ तिथे रहायचे परंतु अचानक गाव सोडून निघून गेले. बरं कुठे गेले हे कुणालाही माहीत नाही. आमचं काम आहे दिलेल्या पत्त्यावर पत्र पोहोचवणं ते मी केलं.” शिक्षकाने मग त्यांना सुचवले की तुम्ही ते पत्र जिथून आले आहे तिथे परत पाठवा. पण पोस्टमन काका ही गोष्ट त्यांच्या मर्जीने करू शकत नव्हते कारण ते बाहेरच्या देशातून आलेलं पत्र होतं जे परत पाठवण्यासाठी ते आपल्या खिशातून पैसे का खर्च करतील आणि ते त्यांना परवडण्यासारखं देखील नव्हतं. पोस्ट-ऑफीस देखील ह्याची जबाबदारी घेणार नाही असे समजल्यावर शिक्षकाने ठरवले की आपण ते पत्र परत पाठवायचे आणि त्याबरोबर संदेश देखील पाठवायचा की “तुम्हाला हवी असलेली व्यक्ती आता इथे राहत नाही आणि ती व्यक्ती कुठे गेली ह्याबद्दल कुणालाही कल्पना नाही”. शाळा सुटल्यावर घरी आलं की पहिले ह्या पत्राचा सोक्षंमोक्षं लावायचा असे त्या शिक्षकाने ठरवले.

शाळेतुन परतल्यावर सगळी जेवणं–आवरणं उरकल्यावर तो शिक्षक पत्र घेऊन ठरवलेला मजकूर लिहायला बसला. त्यावेळी त्याला त्या पत्रात काय आहे हे बघण्याचा मोहं सारखा होत होता. परंतु दुसर्‍या व्यक्तिचं पत्र असं उघडून वाचणं उचित नाही हे माहीत असूनही त्याला पत्र वाचण्याचा मोहं आवरता आवरत नव्हता. शेवटी “परदेशातून माणसाने पत्र पाठवले आहे म्हणजे तसच काहिसं महत्वाचं असेल आणि महत्वाचं असलच तर आपण त्या व्यक्तीचा शोध घेऊन निरोप द्यायला हवा, आणि असे करणे आपलं कर्तव्य आहे किंवा ह्यालाच तर माणुसकी म्हणतात” असं स्वतःच्या सोयीचं कारण शोधून आणि मनाला पटवून, मनाची समजूत काढून त्याने ते पत्र उघडलं. पण रसभंगं झाला कारण ते पत्र ना धड त्याच्या राष्ट्रभाषेत होतं ना धड इंग्लीश मध्ये होतं (जी भाषा तो शाळेत शिकवायचा). ती भाषा लिहिणार्‍याची म्हणजेच परदेशी बोली भाषा असावी असा त्याने अंदाज लावला. आता काय करावं? उगाच पत्र उघडलं असं झालं त्याला. पण थोड्यावेळाने, एखाद्वे भाषेचा शिक्षक असल्यामुळे, ती भाषा कोणती आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता त्याच्या मनात वाढु लागली. ही भाषा कुणाला माहीत असावी ह्याचा शोध घेऊन आणि एखाद्वे ती भाषा जाणणार्‍या व्यक्तीला माझ्या अगोदर ह्या घरात राहणार्‍या व्यक्ती विषयी काही माहीत असावे कारण ही भाषा मोजक्याच व्यक्तींना येत असावी आणि त्यांना एक-मेकांविषयी माहिती असावी कदाचित असा विचार करून त्याने ते पत्र खणात जपून ठेवले आणि सगळं उदयावर सोडून देऊन झोपी गेला.

पुढच्या २-३ दिवसातच त्या शिक्षकाला कळले की शेजारच्या गावात एक वृद्ध गृहस्थाला ही भाषा एखाद्वे येत असावी. सुट्टीच्या दिवशी शेजारच्या गावात त्याने जायचे ठरवले. पुढे त्या गावात जाऊन त्या गृहस्थाला तो भेटलाही. परंतु त्यांना त्या भाषेचे संपूर्ण ज्ञान नव्हते आणि अशी भाषा जाणणार्‍या शिक्षकाच्या गावातील व्यक्तीबद्दल त्यांना माहितीही नव्हती. हां एक माहिती कळली की त्या पत्रात विशेष असं काही नव्हतं आणि ते पत्र एका स्त्रीचं होतं. त्यामुळे शिक्षकाने त्या पत्रावरील व्यक्तीचा शोध घेण्याचे विचार मनातून काढून टाकले आणि पत्र जिथून आले होते तिथे परत पाठवायचे ठरवले. त्या स्त्रीला आता तिच्या पत्रा बरोबर अधिकचा मजकूर लिहून पाठवायचा होता परंतु तिला इंग्रजी भाषेचं ज्ञान नसलं तर? असा विचार करून त्या वृद्ध गृहस्थालाच त्या शिक्षकाने आग्रह करून त्यांच्याकडून परदेशी भाषेतच मजकूर लिहून घेतला आणि तो मजकूर पत्रा सोबत जोडुन पत्र पोस्टात टाकले.

आता त्या पत्राचा शिक्षकाला तसा विसर पडला होता. कारण ते पत्र परतीच्या वाटेवर जाऊन बरेच दिवस झाले होते. आणि एक दिवस शाळेतुन घरी आल्यावर बघतो तर पुन्हा परदेशातून त्याच पत्त्यावरून पत्र आलय.

ह्यावेळी आलेल्या पत्रात इंग्लीश भाषेचा उपयोग जास्त होता. कदाचित वृद्ध गृहस्थाच्या तोडक्या-मोडक्या परदेशी भाषेच्या ज्ञानाचा अंदाज तिला पत्र वाचून आला असावा. ह्या वेळेचं पत्र हे पूर्णपणे शिक्षकाला अनुसरून होतं. त्या पत्रातील थोडक्यात मुद्दे असे की आधी त्या स्त्री ने आभार मानले होते शिक्षकाचे आणि त्यानंतर माफी देखील मागितली होती शिक्षकाला झालेल्या तसदी बद्दल. तिला पत्र पाठवावसं वाटलं होतं त्या मागे कारण हे होतं की तिला स्वतःप्रमाणेच परदेशी भाषा जाणून घेण्यात उत्सुकता दाखवणार्‍या शिक्षकाचं कौतुक वाटलं होतं आणि अश्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी ती उत्सुक होती. आपल्या प्रमाणे वेग-वेगळ्या भाषा जाणून घेणारी व्यक्ती कुणी आहे आणि अपघाताने का होईना पण आपला त्याच्याशी संपर्क झाला आहे ह्याचा तिला आनंदच होत होता. हाच आनंदं तिने पत्रात देखील व्यक्त केला होता. अर्थात तिला शिक्षका विषयी फारशी माहिती नव्हती परंतु तिने परतीच्या पत्रा बरोबर आलेल्या मजकुरा वरुन काय घडलं असेल ह्याचा अंदाज बांधला होता जो बर्‍यापैकी अचूक होता. ह्या पत्रात तिने स्वतः बद्दल थोडीशी माहिती दिली होती आणि एक अपेक्षा देखील व्यक्त केली होती की तिला एक-मेकांच्या मातृ किंवा राष्ट्र भाषेत पत्र व्यवहार करायला आवडेल. ह्याला तिची इच्छा देखील म्हणू शकतो. शिक्षकाची देखील उत्सुकता वाढली होती. त्याने त्या पत्राला उत्तर पाठवायचे ठरवले परंतु एक अडचण होती की तिच्या इच्छेप्रमाणे तिच्या भाषेत उत्तर लिहावयाचे होते. पुन्हा त्याने त्या वृद्ध गृहस्थाचे गाव गाठले. ही भाषा शिकण्यासाठी काही साहित्य, संग्रह मिळतो का ह्याची रीतसर विचारपूस करून ते साहित्य मिळवण्यासाठी जुळवाजुळव करायचा प्रयत्न केला. त्याच्या प्रयत्नाला यश देखील आले. आता त्याला शब्दांचे अर्थ समजून घेऊन, शब्दांची जुळवा-जुळव करून आपलं म्हणणं पत्राद्वारे तिच्यापर्यंतं पोहचवायचं होतं. तब्बल एक महिना लागला त्याला हे करण्यासाठी. रोज शाळेतुन आल्यावर त्याचा हाच उद्योग असायचा. सुट्टीच्या दिवशी तर पूर्ण दिवस तो त्या पत्राला द्यायचा. का करत होता तो एवढं सगळं हे त्याला देखील सांगणं कठीण होतं. एखाद्वे नवीन भाषा शिकण्याची ओढ त्याला तसं करण्यास भाग पाडत होती. शेवटी महिन्याभराने का होईना त्याचे पत्र पूर्णपणे लिहून झाले आणि पोस्टात देखील गेले. त्याने त्या पत्रात स्वतःबद्दलची आणि स्वतःच्या राष्ट्रभाषेची मोजकीच माहिती दिली होती. पहिल्यांदी त्या स्त्रीचं पत्र मिळाल्यावर काय काय घडले ते मात्र त्याने सविस्तर लिहिले होते. त्याने जेवढी मेहनत घेतली होती तेवढीच तिने देखील मेहनत घेऊन शिक्षकाच्या राष्ट्रभाषेत प्रत्युत्तरा दाखल पत्र पाठवलं होतं.

पत्रव्यवहार किंवा पत्रांची देवाण-घेवाण आता नित्य-नियमाने होऊ लागली होती. फार नाही पण महिन्यातुन एकदाच पत्र पाठवलं जायचं एक-मेकांना. तसही नवीन भाषा असल्यामुळे प्रत्येक शब्दांचा अर्थ समजून लिहायला वेळही लागायचा. एखाद्वे दोघेही तरुण असल्यामुळेच हे सगळं करण्यासाठी एवढी उर्जा त्यांच्यात निर्माण होत असावी. दोघांची भाषा अजुन तरी तोडकी-मोडकीच होती परंतु त्यासाठी कित्ती मेहनत लागते ह्याचे त्यांना भान असल्यामुळे ते एक-मेकांना सांभाळून आणि समजून घेत होते.

अश्या प्रकारे पत्र लिहिणं आणि त्यांची देवाण-घेवाण होणं किंवा एक-मेकांना पत्र पाठवणं ह्या उपक्रमाला सुरवात होऊन आता २-३ वर्ष झाली होती. आता भाषेवर बर्‍यापैकी प्रभुत्व दोघांनी मिळवलं होतं. एक-मेकांना ते दोघेही बर्‍यापैकी ओळखू लागले होते. आता दोघांनाही एक-मेकांना भेटण्याची ओढ लागली होती. निदान एक-मेकांना बघण्याची तरी इच्छा होत होती. पण जाणीवपूर्वक दोघांनीही तसे न करण्याचा निर्णय घेतला होता. तसा हा निर्णय एकजुटिनेच घेतला होता परंतु तो घेण्यात पुढाकार त्या तरुणीचा होता. त्या तरुणीने स्वतःच्या आई-वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर पूर्ण जीवन समाजसेवेसाठी अर्पण करायचे ठरवले होते. संसारात पडायचे नाही ह्या निर्णयावर ती ठाम होती. तसे एक-मेकांना पत्राबरोबर आपापले फोटो पाठवण्यात किंवा चित्र पाठवण्यात काहीच हरकत नव्हती. परंतु समोरील व्यक्तीला पाहिल्यावर किंवा चित्र रूपात का होईना भेटल्यावर तिचा समाजसेवेचा निर्णय डगमगला असता अशी तिला भीती वाटत होती. ह्या भीती मध्ये किती तथ्य आहे ह्या वर चर्चा करता आली असती पण शिक्षकाने तिच्या निर्णयाचा मान राखून तिच्या निर्णयाला होकार दिला होता. त्यातून भेटण्याची शक्यता तर फारच कमी होती कारण दोघांची आर्थिक परीस्थिती एवढी प्रबळ नव्हती की ते परदेशवारी करून एक-मेकांना भेटू शकले असते. त्यातून एक-मेकांना प्रत्यक्षात न बघताही पत्रा रूपाने एक-मेकांच्या मनात एक-मेकांची जी प्रतिमा निर्माण झाली होती तिला दोघांनाही धक्का लावायची इच्छा नव्हती.

सुरवातीच्या काळात एक-मेकांच्या संस्कृती विषयी पत्रात उल्लेख व्हायचा. नंतर नंतर पत्रात एक-मेकांच्या भुतकाळाची उजळणी व्हायची. आता तर त्यांना एकमेकां विषयी काहीच माहीत नसावं असा विषय कदाचितच उरला असावा. तरी देखील ते नित्य-नियमाने पत्र पाठवत होते. जणू काही त्यांच्या मनाला आणि शरीराला एक प्रकारची शिस्तच लागली होती. पत्र पाठवणं ही जणू काही त्यांच्यासाठी मूलभूत गरज झाली होती. त्या दोघांनाही कळून चुकले होते की त्यांना एक-मेकांची सवय जडली होती. आपुलकी, उत्सुकता, गरज, सवय, आकर्षण अशा अनेक भावनांचा संगम झाला होता. ते एक-मेकांच्या प्रेमात अखंडं बुडाले होते ह्याची त्यांना पूर्ण कल्पना आली होती. प्रत्यक्षात खूप दूर असले तरी पत्राद्वारे ते दोघेही खूप जवळ आले होते. तसे ते दोघेही खूप रूपवान किंवा देखणे नव्हते परंतु नाकी-डोळे वाईटही नव्हते. तरी देखील एक-मेकांना न पाहण्याच्या निर्णयावर ते ठाम होते. (भेटणं तर अशक्यच असल्यामुळे तो विचार त्यांना नंतर कधी शिवलाच नव्हता)

प्रेमात पडल्यावर सुरवातीच्या दिवसात जी उर्जा असते ना तशीच आणि तेवढीच उर्जा त्यांच्या पत्रातून उफाळुन वर येत होती. ती त्याला पत्रात वेग-वेगळ्या मुद्रा (हसणे / वाईट वाटणे इत्यादी.) दाखवण्यासाठी टिकल्यांचा वापर करायची. जरी कालांतराने त्या टिकल्यांनी त्या पत्राची साथ सोडली तरी त्याने त्या सगळ्या टिकल्या जपून ठेवल्या होत्या. दोघांच्याही घरात प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ बनू लागले होते. पत्रातून पाक-क्रिया पाठवल्या जायच्या. शिक्षकाच्या घरी काम करणार्‍या आज्जी काहीही तक्रार न करता शिक्षकाने दिलेल्या नवीन नवीन पाक-कृतींचा आधार घेऊन जसं जमेल तश्या पद्धतीने त्याला पदार्थ बनवून वाढत होत्या. त्या आज्जींची तक्रार एकच होती किंवा आग्रह होता की त्या शिक्षकाने ह्या पत्रांचा वेडेपणा सोडून, एखादी छानशी मुलगी पाहून संसार करावा. आज्जींच्या मागे त्यांची एकुलती एक तरुण नात होती तिला अनुसरून आज्जी नेहमी लग्नाचा आग्रह करत असतील असं त्याला वाटायचं कारण आज्जी नंतर त्यांच्या नातीचं कुणी नव्हतं. पण शिक्षकाने त्याकडे फारसं लक्षं / महत्व दिलं नाही. शक्यतो लग्नाचा विषय टाळलाच. आज्जी देखील बर्‍याच वर्षांपासून त्याची आणि घराची काळजी घेत असल्यामुळेच त्या अधिकार वाणीने लग्ना बद्दल बोलण्याचं धाडस करू शकत होत्या. असो. विषय प्रेमाचा चालला होता ना?. हां.. त्या दोघांनी कधीही प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती किंवा तशी त्यांना गरजही भासली नव्हती. आधी परदेशातल्या अनेक कवींचे संग्रह शोधून त्यातील काही ओळींचा आधार घेत त्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. पण कालांतराने उसन्या कवितांचा आधार घेणारे ते दोघेही आता चक्क स्वतः कविता करू लागले होते. म्हणजे भाषेवर कित्ती प्रभुत्व मिळवलं असेल त्यांनी ह्याचा अंदाज लगेच लागेल. पण तसही काळही बराच लोटला होता.

पत्र पाठवता पाठवता ३० वर्ष कधी लोटली हे त्यांचं त्यांना देखील कळलं नाही. शिक्षक आता निवृत्त झाला होता. दोघांचेही चेहरे आणि शरीर अनुभवांची झलक दाखवू लागले होते. आता ते दोघेही मोजक्याच शब्दात बरच काही सांगू लागले होते. खरं तर तशी त्यांना आता शब्दांची फारशी गरजच उरली नव्हती. कोरं-करकरीत (रिकामं) पत्र तसच पाठवलं असतं ना तरी त्यांच्या भावना हृदया पर्यंत पोहोचल्या असत्या. आता पत्रातून अनुभव, समजुतदारपणा, निस्वार्थपणा, निर्मळता सहज दिसत होती. तसे पत्रातले विषय सुद्धा बर्‍याच काळा पासून प्रत्येक देशाच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितींशी निगडीत होते. काळजी देखील तितकीच घेतली जात होती, नाही असं नाही. रीतसर औषध-पाण्याची देखील चौकशी केली जायची आणि कधी फसवं उत्तर आलं तर तेही पकडलं जायचं. थोडक्यात सांगायचं तर पत्र देखील वयस्कर आणि अनुभवी झाली होती. तरी महिन्यातून एकदा पत्र पाठवणं हा क्रम कधीच बदलला नव्हता. महिन्यातून एकदा पत्र जाणे हा नियम आजतगायत मोडला नव्हता. पण एक दिवस हा नियम मोडला.

तो (शिक्षक) अस्वस्थ झाला होता. तिचं पत्र आलं नव्हतं. काय झालं असेल? तिच्या तब्येतीला काही झालं तर नसेल ना? नाही नाही सगळं ठीक असेल. पोस्टाचीच काहीतरी चुक झाली असेल. पण एवढ्या वर्षात असं कधीच झालं नाही मग आत्ताच का? काहीतरी अघटीत घडलं नसेल ना?.. गाठिशी अनुभव असला, वयानुसार कितीही प्रगल्भता, समजुतदारपणा अंगी बाळगला गेला असला तरी एकदा भीती मनात घर करू लागली की सारासार विचारसरणी खुंटते हेच खरं. त्याचही तसच झालं. टेलिफोन यंत्रणा जरी तोपर्यंतं विकसीत झाली असली तरी आजतागायत त्यांना कधी त्याची किंवा त्या साधनांची गरजच भासली नव्हती. काय करावे कळत नव्हते त्याला. शेवटी चक्क दोन महिन्यांनी जेव्हा तिचं पत्र आलेलं पाहिलं तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. पण काही सेकंदातच त्याच्या शरीराने त्याला तो वृद्ध झाल्याची जाणीव करून दिली तेव्हा तो भानावर आला. भानावर येताच क्षणी मात्र त्याला पुन्हा भीती वाटू लागली. तिने दोन महिन्यांनी का बरे पत्र लिहिलं असेल? तिला पत्र लिहिणं शक्य झालं नसेल असं काय घडलं असेल? काही तिच्याबाबतीत???.... त्याला पत्र उघडायचं होतं पण धीर होत नव्हता. त्याने देवा समोर ते पत्र ठेवले आणि प्रार्थना केली की पत्रात सगळं काही ठीक असावं किंवा तिची खुषाली असावी. पण... तसं काही झालं नाही. ह्या वेळी तर पत्रात तिचं हस्ताक्षर सुद्धा नव्हतं. तिने कुणाकडून तरी ते लिहून घेऊन त्याला पोस्ट केलं होतं. तिला कशल्याश्या दुर्गम आजाराने ग्रासलं होतं. तिची अवस्था इतकी नाजूक होती की ती स्वतःच्या हाताने पत्र देखील लिहु शकत नव्हती. बरेच दिवस तर तिची शुद्धच हरपली होती. त्या पत्रात तिने लिहिलं होतं “माझ्याकडे आता फारसा वेळ नाही आणि ह्या आजाराने माझी मानसीक अवस्था देखील ढासळत चालली आहे. तुला बघण्याचा मोहं मला आता आवरता येत नाही आहे. तुला भेटण्याची खूप इच्छा होत आहे. हवं तर माझी ही शेवटची इच्छा समज. पुरी करशील ही इच्छा माझी? येशील मला भेटायला? मी जाईस्तोवर राहशील माझ्या बरोबर? आत्ता पर्यंतं खूप केलं आहेस तू माझ्यासाठी आणखीन हे एक करशील? मी वाट बघतेय”. काही वेळ तो सुन्न झाला. काय करावे ते त्याला कळत नव्हते. जायचं तर होतच पण हात-पाय जागचे हलत नव्हते. थोड्या वेळाने तो ह्या धक्क्यातून सावरला. असं हात-पाय गाळुन चालणार नाही. जायची तयारी करू लागला. आर्थिक परीस्थीती आजही चांगली नव्हती. पण त्याला घर विकण्याचा निर्णय घ्यायला एका क्षणाचाही विलंब लागला नाही. सगळी जमापुंजी, घर आणि घरातल्या सगळ्या वस्तू विकून जमा झालेले धन घेऊन तो निघाला. तिच्या आठवणी, तिची पत्रं आणि तिने पाठवलेल्या वस्तू ह्या केवळ त्याच्या बरोबर होत्या. खरं धन तर त्याच्यासाठी तेच होतं.

ज़ल-मार्गाने म्हणजेच जहाजाने जायचं होतं. प्रवासाला वेळ तर लागणारच होता. दीर्घ काळ चालणार्‍या ह्या प्रवासात त्याचा एकदाही डोळा लागला नव्हता. डोळे जड झाले की मिटायचे पण मिटताच क्षणी तिची हाक ऐकू यायची “ये लवकर, मी वाट बघतेय”. प्रवासातला एक-एक दिवस त्याला कित्येक वर्षांचा वाटत होता. उगाचच त्याचा राग तो घड्याळावर काढत होता. अशा वेळी नेमकी घड्याळं हळू धावतात. त्यालाही माहीत होतं घड्याळाचा ह्यात काही दोष नाही. तो आपला त्याच्या शिस्तीत चाललाय. मुळात आपला संयम सुटत आहे हे त्यालाही कळत होतं. शेवटी अनेक दिवसांच्या (जो त्याच्यासाठी जणू काही अनेक ज़न्मांचा काळ होता) प्रवासा नंतर तो तिच्या पत्यावर पोहोचला. पण….

हो.. उशीर झाला होता त्याला. तिच्यावर अंत्य-संस्कार झाले होते. अर्थातच तेथील पारंपारीक प्रथे प्रमाणे सगळे संस्कार पार पडले होते. तिने जाता-जाता तिचं राहतं घर त्याच्या नावावर केलं होतं. तिला खात्री होती की तो नक्की येणार. त्या घरात तिने स्वतंत्र खोलीत त्याच्या सगळ्या गोष्टी जपून ठेवल्या होत्या, सगळी पत्रं आठवणींच्या रूपात जपून ठेवली होती. प्रत्यक्षात तिने ते सगळं नुसतच जपून नाही तर सगळं सजवून ठेवलं होतं. त्यानंतर तो त्याच घरात, शक्यतो त्याच स्वतंत्र खोलीत, शेवट पर्यंतं राहीला. का कुणास ठाऊक पण ती गेल्याचं कळल्या पासून तो एकदाही रडला नाही. जणू काही ती जाताना त्याच्या डोळ्यातील अश्रू बरोबर घेऊन गेली होती. पण एवढी वर्ष शाळेत मुलांना शिकवणारा, सतत बोलणारा तो आता मात्र पूर्णपणे अबोल झाला होता. जणू काही त्याच्यासाठी काळ पूर्णपणे एकाच जागी थांबला होता, काळ पुढे सरकतच नव्हता. पण एक गोष्ट मात्र आजही नित्यक्रमाने चालू होती. आजही तो दर महिन्याला पत्र लिहीत होता आणि तिने संग्रह केलेल्या म्हणजेच तिच्या साठवणीत / आठवणींमध्ये जमा करत होता. अंतर एवढचं होतं की आता लिहिलेल्या त्याच्या पत्राला उत्तर येत नव्हतं.
****
[कधी कधी चुकीची गाडी पकडल्या नंतरही माणूस योग्य जागी पोहोचतो. तसच काहिसं त्या दोघांच्या बाबतीत घडलं होतं. चुकुन आलेल्या पत्राचा प्रवास पुढे असा काही घडेल असं त्यांच्या ध्यानी-मनी देखील नसेल. प्रेम “दिसणं”आणि प्रेम “असणं”ह्या मध्ये अंतर काय, कसं आणि कित्ती असतं हे त्यांच्याकडे पाहून एखाद्वे कळणार नाही पण जाणवेल नक्की.]
****
शिरीष फडके
कलमनामा - दिवाळी २०१४

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)