थँक्यू पद्मजा, जस्ट फॉर बीइंग!

पद्मजा गेली.

'बायकांचं ललित लिखाण एकतर आक्रमक कंठाळी उत्कट असतं, नाहीतर गुलजार खवासदृश भावनाप्रधान' असा बोचरा शेरा मारणार्‍या एका मित्राला मी पद्मजा फाटक भेट दिली होती. तेव्हा बर्‍यापैकी वाचन असणारा आणि तरीही पद्मजाच्या लेखनाशी अपरिचित असणारा हा माणूस तिच्या अभिनिवेशरहित मिश्कील मुक्तपणानं हरखून गेला होता. माझं काहीही कर्तृत्व नसताना पद्मजाच्या जिवावर मीच कॉलर ताठ केल्याचं आठवतं!

पण त्याबद्दल तिलाही आक्षेप नसताच. तिला हे फुकटचं भाव खाणं कळलं असतं, तर त्यातली दाद तेवढी बरोब्बर पोचवून घेऊन ती मिश्कीलपणे हसली असती फक्त.

तशी ती फार प्रसिद्ध नव्हती. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात असेलही. पण तो काळ माझ्या फारच लहानपणी घडून गेलेला. पुढे मी वाचायलाबिचायला लागून मराठीतले लोकप्रिय, वादग्रस्त आणि थोरबीर लेखक ओलांडून तिच्यापर्यंत पोचले, तोवर तिची लोकप्रियता ओसरली होती. माझ्या पिढीत तरी कुणाला तिचं नाव फारसं ठाऊक नसे. तिचं 'आवजो' नावाचं पुस्तक मला मिळालं ते योगायोगानं. आमच्या शाळेत बक्षिसादाखल पुस्तकं देण्याची प्रथा होती. कुणी एक उत्साही शिक्षक जाऊन घाऊक उपदेशपर, नैतिक, सुसंस्कारी आणि बजेटात बसणारी पुस्तकं खरेदी करून आणत. त्यात मला 'आवजो' कसं मिळालं, हे एक नवलच आहे. पण मिळालं खरं. तोवर पुलं आणि वपु आणि श्रीमान योगी यांत अडकलेल्या मला एकदम नवंच कायतरी सापडलं त्यात. अमेरिकेचं प्रवासवर्णन हे अगदी अन्यायकारक वर्णन होईल त्या पुस्तकाचं. अमेरिकन कुटुंबांत राहून पद्मजानं घेतलेले अनुभव, त्यातून प्रातिनिधिक मराठी मध्यमवर्गीय
कुटुंबांना त्यांच्याशी ताडून पाहणं, त्यांच्या धारणा-समज-गैरसमज-पद्धती न्याहाळून पाहणं, टोकदार मिश्कील शेरे नोंदणं आणि काठाकाठानं स्वत:लाही पारदर्शकपणे तपासत राहणं होतं त्यात. तिची स्वतःची नास्तिकवजा प्रार्थनासमाजिष्ट पार्श्वभूमी, तिचं टीव्हीवरचं करियर, तिचं वाचन आणि धारदार बुद्धिमत्ता, तिच्यातली आधुनिक लेकुरवाळी शहरी विवाहिता आणि तिचा रोखठोक प्रामाणिकपणा... हे सगळं त्यातून दिसत राहिलं. मग ते नुसत्या अमेरिकन प्रवासवर्णनांहून बरंच काय काय झालं. आंतरजालीय मराठीच्या स्फोटानं अमेरिका अगदी जवळ येण्यापूर्वीच मला अमेरिकेतल्या बर्‍याच समकालीन गोष्टींबद्दल एक अपूर्वाईरहित दृष्टी मिळाली होती, त्याचं मूळ या पुस्तकात आहे बहुतेक.

त्यानं हरखून मी तिची बाकी पुस्तकं शोधायला घेतली, तर 'गर्भश्रीमंतीचं झाड' हे एक लोकांना ठाऊक असलेलं नाव मिळालं. पण इतकी गाजलेली पुस्तकं 'औटऑफप्रिंट आहे' असं सांगण्यात आपल्याकडच्या लोकांना काय गंमत वाटते कुणास ठाऊक, पुस्तक दुर्मीळ. मग स्नेह्यांच्या कपाटांना क्लेम लावणं आलं. अनेक सव्यापसव्य करून ते पुस्तक मिळालं नि त्यातली गुलमोहर, गोनीदा आणि इरावती अशा कैच्याकै गोष्टींनी खुळावलेली अगदी ताजी पद्मजा भेटली. मग 'सोनेलूमियेर'ची एक पिवळी पडलेली प्रत. त्यातली ड्रायव्हिंग शिकणारी, आंबे हापसणारी आणि अगदी नॉनसमीक्षकी रसिकतेनं रोदँचं प्रदर्शन बघणारी पद्मजा भेटली. तोवर आपण या बाईच्या प्रेमात पडलो आहोत, हे मी कबूल करून चुकले होते. 'राही' आणि 'दिवेलागण' हे तिचे अगदी आडवाटेचे कथासंग्रह. पण तेही मी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कृपेनं मिळवले. एरवी चरित्रांना नाकं मुरडणारी मी. पण तिच्या प्रेमापोटी मी ताराबाई मोडकांचं तिनं लिहिलेलं चरित्रही वाचलं. मग 'माणूस माझी जात' मिळालं. त्यातली मुंबईकरांची अजब आणि दिसे न दिसेशी नाजूक संवेदनशीलता नोंदणारी पद्मजा मला तोवर सवयीची झाली होती.

आधुनिक शहरी आयुष्यात ती मनापासून रमलेली असे. परंपरांशी तिला फार कधी भांडावं लागलं नाही आणि ती तशी भांडलीही नाही. त्यामुळे असेल, किंवा तिचा मूळचा गंमत्या स्वभावच असेल, पण तिच्यात कडवटपणा कसा तो नावाला नसे. माणसांच्या वागण्यातली विसंगती नोंदतानाही ती त्यांच्यातला ओलसर माणूसपणा अचूक टिपून घेई. ती पहाटे लिहायला बसे, तेव्हा तिला डिस्टर्ब न करता अलगद दार ओढून घेणारी तिच्या कॉलनीतली वॉचमनपत्नी काय; किंवा विरार लोकलच्या ऐन गर्दीत धावत्या गाडीत चढणार्‍या बाईला सुखरूप वर खेचून मग काळजीपोटी तिच्या मुस्काटीत देणारी लोकलकरीण काय! एरवी सहज निसटून गेली असती, अशी ही शहरी संवेदनेची रानफुलं बघायची तिला खास नजरच होती.

'हसरी किडणी' हे याहून तसं वेगळं पुस्तक. किडण्या निकामी होणं ही एकच गोष्ट पुरेशी धसकवणारी. त्यात आणि परदेशात शिकायला असताना (मध्यमवयात परदेशात वार्धक्यशास्त्र नावाचा नवाच विषय शिकायला गेलेली असताना!) आपल्या किडण्या कामातून गेल्याचं कळणं. त्यात वैद्यकीय विम्याचं संरक्षण नाही. ट्रान्सप्लाण्टचा खर्च आवाक्याबाहेर. मुलं शिकत असलेली. किडण्यांच्या बरोबरीनं अजून नाना रोगांचे अनपेक्षित हल्ले. यांत कुणाचीही सोकॉल्ड मिश्किली कोळपून गेली असती, तर ते सहज समजण्यासारखं होतं. पण ही बाई उपद्व्यापीच! मित्रपरिवारातून आर्थिक बळ मिळवणं, ते करताना मिंधेपण न येऊ देणं, आजारातून उठल्यावर या पुस्तकाच्या रूपानं आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिद्दीनं लिहिणं - तिचं तिलाच जमू जाणे. त्या पुस्तकात किडणीच्या आजारपणाबद्दलचे सगळे तपशील येतातच. शिवाय आपण एक समाज म्हणून या दुखण्याशी कसे वागतो, आपली वैद्यकीय व्यवस्था कोणत्या प्रतीची आहे, आपल्याकडच्या अनेक थोर पारंपरिक पॅथ्या यासंदर्भात कुठल्या पातळीवर आहेत ही थक्क करून टाकणारी सामाजिक निरीक्षणं तिनं त्यात नोंदली आहेत. खेरीज या निमित्तानं तिला नव्यानं गवसलेली आणि कुटुंबातली गृहीत धरलेली मैत्रं आहेत. आपत्कालात माणसं कशी कसाला लागतात आणि तावूनसुलाखून कशी लखलखून बाहेर पडतात, याचं निरीक्षण करणारा एक पोटप्रकल्प आहे. या पुस्तकानं पोटात घेतलेलं तिचं आत्मचरित्र, सामाजिक-वैद्यकीय निरीक्षणं आणि निव्वळ माहिती - यांच्या आवाक्याशी स्पर्धा करणारं दुसरं पुस्तक मराठीत नाहीच.

त्याची तुलना तिनं माधव नेरूरकरांसोबत लिहिलेल्या 'बाराला दहा कमी' या ग्रंथाशीच करावी लागेल. अण्वस्त्रनिर्मितीचा इतिहास हे या पुस्तकाचं ढोबळ वर्णन. अर्थातच ते अपुरं आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थिती, वैज्ञानिकांबद्दलचे समजगैरसमज, युद्ध आणि अस्त्रं यांबाबत वैज्ञानि़कांच्यात असलेलं-नसलेलं सजगपण, त्यांचे आंतरदेशीय संबंध-मैत्र-जळफळाट-हेवेदावे आणि सहकार्य, महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या वर्तुळात घडलेल्या घडामोडी आणि प्रत्यक्ष अण्वस्त्रनिर्मितीची गोष्ट. मग त्या भयानक संहारानंतर सर्वसामान्य माणसांवर, राज्यकर्त्यांवर, वैज्ञानिकांवर झालेले परिणाम... हेही पुस्तक गेल्या वर्षीपर्यंत 'औटॉफप्रिंट' होतं. चारेक महिन्यापूर्वी ते 'राजहंस'नं पुन्हा बाजारात आणलं.

बायका आणि दागिन्यांशी असलेले त्यांचे (आणि तिचे स्वतःचे) संबंध, दगडांची झाडं बनवण्याची खास अमेरिकी कला, तिच्या आजारपणात तिला आलेले काही अतींद्रिय अनुभव आणि खास पद्मजा-पद्धतीत शोधलेली त्यांची स्पष्टीकरणं, लहान मुलांचं साहित्य, आइनस्टाइनचं घर... यांवरचं तिचं लिहिणं आजारपणानंतर आणि वाढतं वय जमेस धरूनही विलक्षण ताजं-तरुण होतं. 'स्मायली', 'टेडी बेअर', ओरिगामीत भेटणारा जपानी करकोचा अशा गोष्टींवर लिहून त्यांच्याशी आधुनिक समाजांचे असलेले लडिवाळ संबंध उलगडून दाखवावेत, तर ते तिनंच.

आता वाटतं, आपल्याला तिला हे सगळं सांगता आलं असतं. ते राहून गेल्याची खंत करावी का? तर नयेच. कारण आइनस्टाइनच्या डॉक्टरांना भेटायची संधी असतानाही भेटावं की भेटू नये, अशा आट्यापाट्या स्वतःशीच खेळत, संकोचापोटी ती भेट हुकवल्याचं तिनंच एका ठिकाणी नोंदलं आहे. आणि आपल्याला आइनस्टाइन 'आधीच आणि निराळा भेटला' होता की, अशी सारवासारव करत आपल्या संकोचाचं लब्बाड स्पष्टीकरणही दिलं आहे.

तिला माझी गोची बरोबर ठाऊक असणार!

थॅंक्यू पद्मजा, जस्ट फॉर बीइंग. Smile

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

छानच लिहिलंय. बाराला दहा कमी वगळता इतर साहित्याशी परिचय नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वाह...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान ओळख! धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

संयत, समयोचित पण कढ न काढणारं कृतज्ञ आपुलकीने केलेल्या लेखनाबद्दल धन्यवाद मेघना.
लोकसत्तेच्या संपादकीयातल्या एका लेखात " फाटक यांचे बालसाहित्य (तीन पुस्तके) वेगळे असूनही त्याची चर्चा झाली नाही." असं लिहलंय.
१.चिमुकली चांदणी,
२.चमंगख चष्टीगो,
तिसरे ?
पैशाचे झाड हरविलेली दुनिया, हिंद विजय सोसायटीचे पगडी आजोबा (?)
ही पुस्तके कुणी पाहिली आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, ही तिन्ही पुस्तकं मला मिळालेली नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फार छान ऒळ्ख करून दिली आहेस.
मासिकातील लेख वगळता पद्मजा फाटकांचं फारसं काही वाचलेलं नाही. अर्थात त्या लेखांमधूनही त्यांचं अनुभवासाठी खुलं असलेलं मन आणि त्या मनावर ओरखडा उमटू न देता त्या अनुभवांचं मजेत वर्णन करण्याची विलक्षण हातोटी या मुळे ते लिखाण लक्षात राही. नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना आलेल्या अनुभवांवर लिहीलेला एक लेख वाचलेला आठवतोय. खुपच वर्षांपुर्वी किर्लोस्कर किंवा स्त्री मासिकात "चौथा कमरा" या सदरात त्यांची ओळखही वाचल्याचं आठवतय. "बापलेक" मधील सुरुवातीचं मनोगतही वेधक आहे. (तेवढंतरी परत शोधून वाचावं असं वाटतय तुझं लिखाण वाचून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह ! किती मनस्वी ओळख करून दिलीत. धन्यवाद. पद्मजांनी लिहिलेलं काहीच मी वाचलेलं नाहीये ते आता आवर्जून मिळवून वाचेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान ओळख करुन दिली मेघना. त्याचं संस्थळावर /अंतरजालावर उपलब्ध असं काही लिखाण आहे का? असल्यास वाचायला नक्कीच आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, आंतरजालावर काही नाही. तुला लायब्र्या वा दुकानं हुडकावी लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मनस्वी लेखन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'बायकांचं ललित लिखाण एकतर आक्रमक कंठाळी उत्कट असतं, नाहीतर गुलजार खवासदृश भावनाप्रधान'
इरावती कर्वे, मेघना पेठे, सुनीता देशपांडे, गौरी देशपांडे, आशा बगे, शोभा चित्रे, मीना प्रभू, मंगला निगुडकर आणि अगदी मंगला गोडबोलेसुद्धा वाचून वरील वाक्याशी सरसकटपणे सहमत व्हावे असे वाटत नाही.(यातल्या इरावतीबाई आणि काही अंशी निगुडकर वगळता ज्या नको त्याच लेखिका तुम्ही वाचल्यात असे कुणी म्हटल्यास त्याला सपशेल सहमती) तसे सरसकटीकरण कोणत्याच बाबतीत करु नये हे बरे. पण लक्षात राहिलेल्या स्त्री लेखिकांमध्ये पद्मजा फाटकांचे नाव येत नाही हेही खरेच. पद्मजा म्हणजे लेडी प्रवीण असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटणार नाही. 'मजेत' हे उपनाम म्हणजे तर... असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

लक्षात राहिलेल्या स्त्री लेखिकांमध्ये

सन्जोप राव यांजकडून ही असली द्विरुक्ती?! काय दिवस का काय म्हणायचे हे? Wink

सिरियसली: होय, तिचं नाव तसं ठळक टायपात दिसत नाही, हे खरंच. पण मला तिच्या लिहिण्यातला पडद्याआड ठामपणे उभा असलेला स्त्रीवाद, निधर्मीपणा आणि नास्तिक्य, चिकित्सक वृत्ती हे सगळं फार आवडतं. या गोष्टी वॄत्तीचा भाग असणं आणि तरीही अभिनिवेश टाळणं, फार अवघड. 'लेडी प्रवीण' हे मात्र ठार अमान्य. 'तुमच्या लिखाणात गुलमोहर, चॉकलेटं आणि मोर जरा जास्तच वेळा येतात बुवा!' अशी तक्रार तिच्याकडे कुणीतरी केल्याचं तिनं नोंदलं असलं तर्रीही. (तशी 'तुमच्या लिखाणात बायकांच्या टाचा जरा जास्तच वेळा येतात बुवा!' अशी तक्रार तर दस्तुरखुद्द तुमच्या जीएंबद्दलही कुणीशी केल्ये की! म्हणून काय त्यांना 'भारतीय फ्रॉइड' का म्हणायचं आहे?) खट्याळ, मिश्कील, 'मजेत' लेखन असे तिचं. पण लोकांना नि स्वतःलाही तपासून पाहण्याची वृत्ती अगदी 'अप्रवीण'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

@जीए : टाचांसोबत "उघड्या पाठीच्या बायका" विसरलात.. त्याही बरेचदा डोकावून(च) जातात जीएकथांमधे. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण लेख ! मी 'हसरी किडनी' आणि 'माणुस माझी जात' ही दोनच पुस्तके वाचली आहेत त्यांची. शोधायला हवीत बाकीची आता .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लिहिलंयस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहीले आहे. आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. शैली तर नेहमीच आवडते.
मला स्वतःला पद्मजाबाईंची पुस्तके 'क्षणभर विरंगु़ळा' अश्या पद्धतीची वाटत. वाचताना बरे वाटे, पण नंतर फार काही लक्ष्यात राहात नसे किंवा ठसा उमटत नसे. त्या मानाने शोभा चित्रे यांच्या लिखाणातून दिसलेली अमेरिका अधिक आवडली होती. किंवा मला वाटते अजिता काळे- (नाव बरोबर असावे) ज्या समुपदेशन करीत-त्यांचे अनुभव अधिक सखोल वाटले होते. आणकीही एकदोन नावे होती.
आणखी म्हणजे काही ठिकाणी त्यांचा सूर स्वतःबद्दल थोडा चढा, आढ्यतेचा आणि अन्यायग्रस्ततेचा लागला आहे तो अजून स्मरणात आहे. मीना नेरुरकरांचे 'धन्य ती गाय्नॅक कला' आणि सुप्रसिद्ध 'आहे मनोहर तरी' ही त्याची अधिक प्रगत उदाहरणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पद्मजा आणि शशिकांत फाटक ह्या जोडप्याशी पहिली ओळख झाली ती साधारण २००१ च्या सुमारास. दोघांच्या मोकळ्या आणि अतिशय 'उबदार' वागाण्यामुळे 'पद्मजा मावशी' पर्यंत कधी मजल गेली ते कळलच नाही. पुढे अनेकवार भेटीगाठी झाल्या, उतारवयात दोघे इथे अमेरिकेत एकटे, मुले दूर देशी (एका मुलीच्या आयुष्यात थोडी खळबळ), गम्भिर आजारपणावर केलेली मात आणि त्यामुळे आलेली कडक पथ्ये ह्या कुठल्याही गोष्टीचा मनावर परिणाम होउ न देता निर्मळ, मोकळे हसू कायम मावशी आणि काकांच्या चेहेर्‍यावर दिसे. पुढे २००५ च्या सुमारास काका गंभिर आजारी पडले तेव्हासुदधा जपलेला प्रखर विवेकवाद आणि भावनाबंबाळ न होता घेतलेला काकांचा 'लाइफ सपोर्ट' काढायचा खंबिर निर्णय तिचा खरा कस दाखवून गेला. मग पुढे ती भारतात परत गेली आणि भेटी कमीच झाल्या.

तिच्याकडे गेलो की बर्‍याच वेळेला ती नेहेमी एक प्रश्न विचारायची "तुम्ही आत्ता किती बिझि आहात?, कमी, नेमके हवे तेवढे की जास्त' आणि त्यातून विचारांचे नवे नवे धागे पुढे जायचे.

आज ते गर्भश्रीमंतीचे झाड लोपले Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि हा प्रतिसाद, दोन्ही आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदितीची री ओढते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम लेख आणि तसेच प्रतिसाद..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फाटकांपेक्षा चित्रेबाई चांगल्या म्हणजे शिरवळकरांपेक्षा बाबा कदम चांगले असे म्हटल्यासारखे आहे.'गोठलेल्या वाटा' वर एक आक्रस्ताळी, आदळाआपट करणारा भगवती पुडीसारखा लेख लिहिला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

चित्रेबाईंच्या लिखाणातून दिसलेली अमेरिका ही मला पद्मजाताईंच्या लिखाणातल्या अमेरिकेपेक्षा अधिक आवडली होती.
फाटकांच्या लिखाणापेक्षा चित्रे यांचे लिखाण चांगले असे नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रेबाईंच्या लिखाणातून दिसलेली अमेरिका ही मला पद्मजाताईंच्या लिखाणातल्या अमेरिकेपेक्षा अधिक आवडली होती.
फाटकांच्या लिखाणापेक्षा चित्रे यांचे लिखाण चांगले असे नव्हे.

मान्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मनस्वी लेखन आवडलं. पद्मजा फाटकांशी 'ओळख' म्हणावी तर ती त्यांच्या लेखनापेक्षा त्यांच्या टीव्हीवरच्या कामानिमित्ताने आणि स्त्रीवादी विचारांमुळे आमच्या आईवडिलांकडून झाली होती. गेल्या वर्षी प्रत्यक्ष भेट झाली. त्या छोट्याशा भेटीतूनही त्यांचं हसतंखेळतं व्यक्तिमत्व जाणवत राहिलेलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण आवडलं.

फाटक बाईंचं "आवजो" वाचलं होतं. एकंदरीत त्यांचं लिखाण काही महत्त्वाची विधानं करणारं वाटलं नाही. मात्र लिखाणाची शैली, हसतखेळत विसंगती दाखवण्याची वृत्ती, लहानशा गोष्टींमधलं मर्म उलगडून दाखवणं यांसारख्या गोष्टी लक्षात राहिलेल्या आहेत.

पद्मजा फाटकांच्या निधनाबद्दल वाईट वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

या धाग्यावर हा संभाव्य वाद अस्थानी ठरेल, मला मान्य आहे. पण असो. तुमच्या मते महत्त्वाचं विधान करणारं ललित लेखन कोणतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दोन दिग्गजांनी फाटकांच्या लिखाणाबाबत आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत 'हसतखेळत' हे विशेषण वापरलेलेले वाचून गंमत वाटली. हसरे, खेळकर, अरळ, पदर सुटलेले लेखन करणे आणि कदाचित स्वतःची (हसरी) दु:खे वगैरे लपवून क्या हर हसीं के पीछे खुशी ही होती है बाबुमोशाय असे जगणे हा व्यक्तिविशेष होऊ शकतो हे वाचून अधिकच गंमत वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

पदर सुटलेले लेखन हि प्रतिमा हॉन्टींग वाटली.
माझा आवडता लेखक डोस्टोव्ह्स्की असाच व्हीस्कीशिअस लिहायचा.
मला एक प्रश्न पडलाय पद्मजा बाई आहे की माणुस

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला एक प्रश्न पडलाय पद्मजा बाई आहे की माणुस
बाईमाणूस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

एखाद्या लेखकाचे मूल्यमापनच होऊ नये, इतकी आंधळी भक्ती निदान या संस्थळावर तरी कुणाबाबत नव्हती, नाही. त्यामुळे पद्मजा फाटक यांच्या लेखनाच्या मर्यादा चर्चण्याला कुणी हरकत घेण्याचे कारण नाही. पण काही गोष्टी काही विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळा बोलण्यात काहीएक औचित्य असते. ते काही प्रतिसादांत पाळल्यासारखे वाटले नाही, म्हणून ते खटकले. पण ते एक असो.

लेखकांच्यातही वर्गवार्‍या असतात. वपुंची किंवा दवण्यांची हमखास रेवडी उडवण्याचे दिवस सध्या आहेत. उद्या कदाचित पु.लंची पाळी असेल. उलटपक्षी काही लेखक आवडणे हेच मुळी आपल्या थोर अभिरुचीचे व्यवच्छेदक लक्षण मानण्याची फ्याशन सध्या आहे. ते बदलत असते. पण लोकप्रियता कमी वा जास्त असली, तरी दर्जा वेगवेगळा असतो, विधाने आणि शैली निरनिराळ्या असतात, वाचक निराळा असतो हे मान्य केलेच पाहिजे. पद्मजा फाटक गेल्या म्हणून काय झाले? त्या तरी या वर्गवारीतून कशा सुटणार! पण म्हणून एकाच भाषेत वा समाजात या सगळ्या प्रकारच्या लेखकांनी एकाच वेळी असणे शक्य नाही, असे नसते. तशी गरजही नाही. कायम कोणत्यातरी उपदेशपर नैतिक मूल्याची पाटी हाती घेऊन उभे ठाकलेले साहित्य हेच खरे साहित्य असे म्हणणे जितके हास्यास्पद होईल, तितकेच तीव्र दु:खामुळे मानवी आयुष्याबद्दल झालेल्या साक्षात्कारातून प्रसवलेले साहित्य, तेच तेवढे खरे साहित्य, असे मानणेही तोकडे आणि हास्यास्पदच होईल. तसे काहीतरी गृहीतक संजोप राव यांच्या प्रतिसादात दिसलेसे वाटले. कदाचित माझा दृष्टिदोषही असेल. असो.

पद्मजा फाटक यांच्या लेखनातील विधानाबद्दलः
सचिन तेंडुलकरबद्दल मागे (बहुधा) किरण नगरकरांनी (चूभूदेघे) एक विधान केले होते. सचिन तेंडुलकर हे मुंबई क्रिकेटला आलेल्या बहराचे कारण नसून परिणती होती, अशा आशयाचे ते विधान. त्याची इथे आठवण झाली. एका विशिष्ट सामाजिक पार्श्वभूमीची परिणती असल्यासारखे फाटक यांचे लेखन मला वाटे. समाजाने आवश्यक मानलेल्या परंपरा मानल्या नाहीत तरीही नास्तिक, विवेकी, स्त्रीवादी, शहरी, आधुनिक, तर्काधारी विचारांसह आयुष्य मजेने आणि संवेदनशीलतेने जगता येते. त्यासाठी सतत लढायला उभे ठाकावे लागू नये, अशी परिस्थिती माणसाला माणसासाठी निर्माण करता येणे शक्य आहे. 'असण्यातला आनंद' हीदेखील लाँग सेलिब्रेटेड दु:खाइतकीच ताकदवान वृत्ती आहे, आणि ती अंगी असणे म्हणजे संवेदनाशून्य असणे नव्हे... अशी अनेक गृहीतके आणि सिद्धताही मला त्यांच्या लेखनाच्या मुळाशी दिसत. आश्वासक वाटत. त्यामुळे त्यांच्या लेखनाला काहीशा खवचटपणे वापरलेले 'हसत खेळत' हे विशेषण, एका विशिष्ट लेखनगटात त्यांची सरसकट केलेली जिम्मा, त्यांच्या लिखाणात महत्त्वाचे विधान नसण्याची मुसुंनी केलेली तक्रारवजा नोंद... हे मला पटले नाही.

अर्थात - हरकत कशी घेणार म्हणा! आपापली मते आणि आपापले पूर्वग्रह. चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मूल्यमापन/समीक्षा करून काय फायदा असा प्रश्न मला नेहेमी पडतो. मूल्यमापन म्हणजे नक्की काय असाही प्रश्न पडतो. कोणाची आवड भारी हा वाद अत्यंत निरुपयोगी आहे असे माझे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कोणाची आवड भारी हा वाद अत्यंत निरुपयोगी आहे असे माझे मत आहे.

मार्मिक. पण असे वाद टाळू म्हणता टळत नाहीत, हेही एक आहेच. शिवाय समीक्षा वाचकाला आणि समीक्षकाला आनंद, नि लेखकाला दिशा देऊ शकते, हेही आहे. हां, समीक्षेतही बर्‍यावाईट वर्गावार्‍या असतात, त्याला कोण काय करणार? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उद्या कदाचित पु.लंची पाळी असेल ?

अहो आहात कुठे, आम्ही चाळीतून बिल्डींगमधे राहण्यास गेलो तेव्हाच पु.लं.ची पाळी आली होती.
'आत्ता तुझी पाळी, मीच देतो टाळी' किंवा 'हर लेखक का एक दिन होता है' हे सुविचार तुम्ही वाचले असतीलच.

टीप : तुम्ही ऐकलेल्या सुविचारांत आणि मी लिहिलेल्या सुविचारांत / म्हणींमधे एक शब्दाचा बदल केला आहे. तेवढा मान्य व्हावा.

आता लेखाच्या विषयाकडे : बर्‍याच वर्षांपूर्वी 'राही' वाचलं होतं. 'हसरी किडणी' हातात घेऊन ठेऊन दिलं होतं. पद्मजा फाटक यांना मनःपुर्वक श्रद्धांजली. काही पुस्तकांची नावे किंवा मुखपृष्ठावरची चित्रे बघूनच पुढे वाचण्याच्या धीर होत नाही.

बायामाणसांच लिखाण मी शक्यतो वाचण्याच टाळतच असतो. घर संसाराभोवतीच फिरणारी वर्णन वाचायचा मनापासून कंटाळा. मात्र इंदिरा संतांचं लिखाण वाचल्यापासून इतर लेखीकांचं लिखाणही चांगल असू शकतं याबद्दल जाणीव झाली. आता कमीतकमी लायब्ररीत गेल्यावर एक दोन पाने चाळून पाहण्यापर्यंत उत्सुकता गेली आहे मात्र अजूनही पुर्ण पुस्तक वाचायचा धीर होत नाही. मात्र एका लेखिकेच्या नारायण धारप स्टाईलच्या कथांचे पुस्तक पुर्ण वाचून संपविले होते. चांगल्या जमल्या होत्या कथा.
नाव आठवत नाहीये लेखिकेचे पण पहिले नाव बहुधा 'जयश्री' होते बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील प्रतिसाद बहुधा विनोदी आणि उपरोधात्मक असावा पण काही वर्तुळांमध्ये पुल टिंगलटवाळीचा विषय बनले आहेत हे खरेच आहे. विनोदी लिखाण हे इतर साहित्यप्रकारांच्या तुलनेत लवकर कालबाह्य होते. आणि मग पुढची पिढी 'का बुवा हे लेखन इतके लोकप्रिय झाले होते?' असा प्रश्न विचारू लागते. शाब्दिक विनोद लगेचच मागे पडतात असे म्हणतात पण प्रसंगनिष्ठ विनोदही जगण्याचे संदर्भ बदलल्याने त्याहूनही लवकर शिळे होतात. कसदार विनोदी लिहिणारे फार कमी निपजतात. बाकी सगळे राजकीय टीकाटिप्पण्या आणि विडंबने यावर वेळ मारून नेतात. विशेषतः स्तंभलेखक.
स्त्रीसाहित्याविषयीचा मुद्दा देखील थोड्याफारप्रमाणात खरा आहे. मुळातच स्त्रिया, त्यातूनही भारतीय स्त्रिया लेखनवाचनाच्या क्षेत्रात उशीरा प्रवेश करू शकल्या. त्यामुळे चांगले काही किंवा अस्सल काही लिहू शकणार्‍या स्त्रियांची संख्या मर्यादित राहिली आहे. शिवाय स्त्रियांचे अनुभवविश्व आतापर्यंत फार तोकडे होते. आणि व्यापक अनुभव गाठीशी असले तरी 'घे अनुभव आणि लिही त्यावर' असे होत नसते. साहित्यनिर्मिती ही एक वेगळी प्रक्रिया असते. नव्यानव्या आणि तरल कल्पनांचा गोफ विणता येणे, कल्पनाविश्वातून ताकदीची कॅरॅक्टर्स उभी करणे, एक संहिता निर्माण करता येणे आणि त्यातून जीवनभाष्य प्रत्ययाला येणे हे खरेच अवघड आहे. उत्तम साहित्याच्या या कसोटीवर दुर्दैवाने फारच थोड्या महिला-साहित्यिक उतरतात. कारणे काहीही असोत. असे पुरुषसाहित्यिकही थोडेच आहेत म्हणा पण एक व्यापक पट साहित्यातून उभा करण्यात स्त्रियांना फारसे यश लाभलेले नाही हेही खरेच. हे मत मराठीसाहित्यापुरतेच समजावे.
सध्या ललित साहित्याच्या दालनात विद्रोही लिखाणाला भाव आहे. किंबहुना विद्रोह हेच एक साहित्यमूल्य झाले आहे. आयुष्यात आपल्याला कश्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि त्यातून आपण कसे तावूनसुलाखून बाहेर पडलो या त्याच त्याच प्रकारच्या यशोगाथा वाचायचा कंटाळा येतो. कवितांतूनही चिरंतन विचारापेक्षा कंठाळी बंडखोरपणा दिसतो. दलित साहित्याचेही असेच भजे होते आहे. आपला संघर्ष हाच काय तो खरा संघर्ष असे ठरवल्यामुळे त्यापलीकडे विचारांचा परीघ वाढत नाही आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती होत नाही. सुरुवातीच्या काळात यश मिळाले आणि लोकप्रियताही मिळाली पण आता दलित साहित्याला अर्धशतक होत असताना त्यांच्याकडून थोड्या वेगळ्या आणि अधिक अपेक्षा आहेत. अर्थात या प्रवाहांमुळे मराठी साहित्य अधिक समृद्ध झाले, त्यात विविधता आली हे आहेच.
श्रद्धांजलीच्या धाग्यावर अवांतर झाले आहे. पण मूळ धाग्यात पद्मजाताईंच्या साहित्याविषयी मूल्यमापनात्मक काही लिहिलेले असल्याने त्याविषयी आपापली मते व्यक्त करणे हे आलेच.
पद्मजा फाटक यांना श्रद्धांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील प्रतिसाद बहुधा विनोदी आणि उपरोधात्मक असावा

प्रतिसाद विनोदी आणि उपरोधात्मक नाहीये. तो फारच सिरियसली दिलेला आहे. पण ते असो. तुम्हाला चुकून तो तसा वाटला असेल तर तो माझ्या लिहिण्याचा दोष समजावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम साहित्याच्या या कसोटीवर दुर्दैवाने फारच थोड्या महिला-साहित्यिक उतरतात. कारणे काहीही असोत. असे पुरुषसाहित्यिकही थोडेच आहेत

मी जितके वाचन केले आहे त्यातील एकुण लेखकांपैकी मला आवडलेल्या लेखकांची टक्केवारी आणि मी वाचलेल्या लेखिकांपैकी मला आवडलेल्या लेखिकांची टक्केवारी काढल्यास साधारण सारखीच भरावी.

मुळातच लेखिकांचे प्रमाण लेखकांपेक्षा कमी असल्याने चांगल्या लेखिकांची अ‍ॅबसोल्युट संख्या कमी वाटत असावी.

बाकी तुम्ही म्हणता ती कारणेही पटणीय आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

श्रेणी देताना चुकून 'सर्वसाधारण'वर टिचकी मारली गेली. ती 'विनोदी' समजावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाजाने आवश्यक मानलेल्या परंपरा मानल्या नाहीत तरीही नास्तिक, विवेकी, स्त्रीवादी, शहरी, आधुनिक, तर्काधारी विचारांसह आयुष्य मजेने आणि संवेदनशीलतेने जगता येते. त्यासाठी सतत लढायला उभे ठाकावे लागू नये, अशी परिस्थिती माणसाला माणसासाठी निर्माण करता येणे शक्य आहे. 'असण्यातला आनंद' हीदेखील लाँग सेलिब्रेटेड दु:खाइतकीच ताकदवान वृत्ती आहे, आणि ती अंगी असणे म्हणजे संवेदनाशून्य असणे नव्हे... अशी अनेक गृहीतके आणि सिद्धताही मला त्यांच्या लेखनाच्या मुळाशी दिसत. आश्वासक वाटत.

अगदी चपखल वर्णन. आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वपुंची किंवा दवण्यांची हमखास रेवडी उडवण्याचे दिवस सध्या आहेत. उद्या कदाचित पु.लंची पाळी असेल.

उद्या???

विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू पु.ल., ती तर आम्ही आजच उडवतो.
..........
दुर्दैवाने व.पु. किंवा दवण्यांबद्दल हे म्हणवत नाही. (आणि म्हणूनच त्यांची रेवडी उडवायला आम्ही सहसा जातही नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>यांच्या लिखाणात महत्त्वाचे विधान नसण्याची मुसुंनी केलेली तक्रारवजा नोंद... हे मला पटले नाही. <<<

भुस्कुटे यांचा त्रागा नीटसा कळलेला नाही. त्यापुढे त्यांनी "आपापली मते आणि आपापले पूर्वग्रह. चालू द्यात." असेही म्हण्टलेले आहे ते रोचक आहे. ज्यानेत्याने आपापली मते मांडणे "अनुचित" ठरत असेल तर मग बोलणेच खुंटते.

व्यक्तीच्या जाण्याबद्द्ल शोक व्यक्त केला आहे आणि त्यांच्या लिखाणातल्या माझ्या समजुतीप्रमाणे असलेल्या उंचीची आणि मर्यादांची मांडणी - माझ्यामते कुठलंही औचित्य न ओलांडता - केलेली आहे. इतउप्पर त्याचा केलेला निषेध हा इंग्रजीत Rant आणि मराठीत त्रागा या वर्गवारीत मोडतो. अर्थात मतं आणि पूर्वग्रहांप्रमाणे त्रागा व्यक्त करणं हेही "चालू द्यात" Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अनौचित्य अंगावर ओढवून घ्यायचेच असेल, तर काय बोलणार! "चालू द्या"! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जी.ए. वरील प्रतिक्रीया तर फारच मौजमजेच्या होत्या.
मस्त धागा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लेख आणि शैली मनापासून आवडली. पद्मजा फाटकांचे काही वाचलेले नाही पण लेख वाचून नक्की वाचावेसे वाटले. श्रद्धांजलीच्या धाग्यावर लेखकाचे मूल्यमापन होऊ नये असे नाही पण आपल्या प्रिय लेखिकेला उद्देशून लिहिलेला असा मनस्वी लेख वाचून खरेतर माझे त्या लेखिकेकेबद्दल प्रतिकूल मत असते तरी ते पुन्हा तपासून पहावे असे वाटले असते. लेखकाचे मूल्यमापन या संदर्भात 'राही' यांच्या प्रतिक्रिया फार आवडल्या (त्या नेहमीच आवडतात). धाग्याचे औचित्य न ओलांडताही त्यांनी फाटकांच्या लिखाणाबद्दल जे प्रतिकूल मत व्यक्त केले आहे ते विचारार्ह्य वाटले. त्यांच्या मराठी महिला साहित्याच्या प्रतिसादाच्या संदर्भात अलिकडेच वाचलेले व्हर्जिनिया वूल्फचे "अ रूम ऑफ वन्स ओन" हे पुस्तक आठवले.

कारणे काहीही असोत.

हे जे राही म्हणताहेत त्याचे व्हर्जिनिया वूल्फने इंग्रजी महिला साहित्याच्या संदर्भात केलेले विश्लेषण अतिशय नेमके, चतुर आणि वाचनीय आहे. शंभर वर्षांपूर्वी जे इंग्रजी महिला साहित्यासाठी नेमके होते ते आजच्या मराठी महिला साहित्यासाठी नेमके लागू आहे हे विशेष.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'राही' यांच्या प्रतिक्रिया फार आवडल्या (त्या नेहमीच आवडतात)

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लेख आणि शैली मनापासून आवडली.

लेखकाचे मूल्यमापन या संदर्भात 'राही' यांच्या प्रतिक्रिया फार आवडल्या (त्या नेहमीच आवडतात).

अनुमोदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या आजीच्या वयाच्या लेखिकेबद्दल असं एकदम, 'पदमजा' गेली' हे वाक्य डोळ्यांना खटकलं.मी त्यांचे बरेचसे साहित्य मासिकांतूनच वाचले होते. जे वाचले त्यावरुन तरी संजोप रावांशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0