आपली इच्छाशक्ती

आपली इच्छाशक्ती इतकी तकलादू का?

तुम्ही पूर्ण विचार करून, जमल्यास चार चौघांचा सल्ला घेऊनच तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी वा सिगरेट ओढणे थांबवण्यासाठी किंवा टीव्हीच्या समोर बसून उगीचच्या उगीच रिमोटशी चाळे न करण्यासाठी काही (जालीम) उपाय शोधले असतील व त्याप्रमाणे वागण्यासाठी मनाची पूर्ण, जय्यत तयारीनिशी कारवाई करतही असाल. यासाठीचा तुमचा तो ओसंडून वाहणारा उत्साह, अभिनिवेश पाहिल्यास खरोखरच काही (नव्हे एक - दोन) दिवसातच त्या वाईट सवयीतून तुमची मुक्तता होईल असेच सगळ्याना वाटू लागेल. परंतु काही दिवसातच ये रे माझ्या मागल्या! शेवटी तुम्ही, स्वत:च आपणहून 'ती वेळ बरोबर नव्हती' वा 'आपली इच्छाशक्तीच तोकडी पडते' असे थातुर मातुर सांगून वेळ मारून नेत असता. खरे की नाही?

माझ्या मते यात काही तरी चुकत असावे. इच्छाशक्ती म्हणजे कुठली तरी सुप्त आंतरिक शक्ती, शरीराच्या कुठल्यातरी कोपर्‍यात दडून बसलेली, - आपण उठवले की ताडकन उठणारी व आपले ईप्सित पूर्ण करणारी असे काहीतरी आहे हे गृहीतकच मुळात गैरसमजूतीवर आधारलेले असावे. ही गैरसमजूत मूळ मुद्द्यापासून आपल्याला दूर नेत असल्यामुळे ती कदाचित पुढे मागे धोकादायकही ठरू शकेल. मुळात आपण जे काही करत असतो त्यात कार्यभाग पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाबरोबरच काही प्रमाणात समाधान, आराम मिळवण्याच्या प्रयत्नातही आपण असतो. त्यामुळे वाईट सवयी घालवण्याच्या प्रयत्नात समाधान मिळत नसल्यास सगळा केर मुसळात. आपला लठ्ठपणा कमी व्हावा, आपले आरोग्य सुदृढ असावे, बाष्कळ वेळ न घालवता काही सर्जनशील काम करावे या इच्छेसाठी आपल्याला जडलेल्या वाईट सवयी दूर करण्याच्या प्रयत्नाच्या वेळीसुद्धा आपल्याला काही प्रमाणात समाधान मिळत नसल्यास आपण ते प्रयत्न सोडून टाकतो. प्रयत्न न करण्यासाठी इच्छाशक्तीचे पिल्लू आपण हळूच सोडतो. आपल्या इच्छा - आकांक्षा व आपले परिश्रम काही वेळा एकमेकाविरुद्ध उभे असतात. काही गोष्टी ताबडतोब हव्या असतात व काही दीर्घ काळानंतर मिळाल्यातरी चालण्यासारख्या असतात. अशा प्रसंगी नेहमीच ताबडतोबीच्या प्रयत्नांची सरशी होत असते. दोन महिन्यानंतर येणार्‍या परीक्षेसाठी आतापासून अभ्यास करायला हवे हे कितीही बरोबर असले तरी मित्र - मैत्रिणीबरोबर आज रात्री चित्रपट पाहण्यातली मजाच और असते.

व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना दोन प्रकारच्या व्यसनाधीन मानसिकतेशी सामना करावा लागतो. एक गट मागचा पुढचा वा अंतिम परिणामाचा विचार न करता भावनेच्या भरात उत्स्फूर्तपणे पेग रिचवणार्‍यांचा असतो. पेग भरल्याशिवाय चैन पडत नाही. गटागटा पिऊन संपविल्याशिवाय समाधान होत नाही. दुसरा गट मात्र स्वत:ला फसवत बाटलीच्या बाटली रिकामा करत असतो. आज अमक्याचा वाढदिवस, आज तमक्याचा शोक दिवस असे काही तरी निमित्त शोधत, 'मी फक्त अपवादात्मक परिस्थितीतच पेगला हात लावतो', या तंद्रीत असतो. 'दारू काय? मी केव्हाही सोडू शकतो' हे पालूपद मात्र चालूच असते. त्याच्या दृष्टीने सर्व दिवस अपवादात्मकच असतात. आपण स्वत: फार हुशार आहोत या समजुतीमुळे आपण केव्हा व्यसनाच्या आहारी गेलो याचीच त्याला कल्पना नसते.

यावर एक उपाय सुचवावेसे वाटते. वाईट सवय मोडण्यासाठी कुणाच्या मनावर विसंबून न राहता बाह्य, कृत्रिम बंधन घातल्यास काही प्रमाणात सुधारणा घडू शकेल. कायद्याचा वचक, सवयींना पूरक अशा गोष्टी उपलब्ध नसणे, भावनिक आव्हान, इत्यादीमुळेसुद्धा वर्तणुकीत फरक पडण्याची शक्यता असते. ग्रीक पुराणात युलिसिसची मिथ्यकथा आहे. युलिसिस युद्धसज्ज जहाजातून जात असताना त्याला जहाजाच्या डोलकाठीला बांधून ठेवण्याची सक्त ताकीद तो नाविकांना देत होता. व इतर सैनिकांना कानात बोळे घालण्याचा हुकुम तो देत होता. कारण समुद्र पार करताना समुद्रात वावरणार्‍या सायरन भगिनी आपल्या सुमधुर आवाजात सैनिकांना हाक मारून समुद्रात उडी मारण्यास भाग पाडत असत. आवाज ऐकू न आल्यास किंवा उडी मारणे शक्य न झाल्यास जीव वाचण्याची शक्यता असल्यामुळे युलिसिसने असल्या विचित्र अटी घातलेल्या होत्या.

आपण कितीही निश्चयी असलो तरी बाहेरच्या गोष्टींना आकर्षित होऊन, नको त्या गोष्टींच्या मागे लागतो. त्यामुळे अशा घातक वस्तूपासून दूर राहिल्यास वा सवयीला पूरक वस्तू दुर्लभ असल्यास, किंवा त्या मिळवण्यासाठी भरपूर धोका, परिश्रम वा पैसा लागत असल्यास सामान्य कुवतीचा माणूस त्याचा नाद सोडू शकतो. म्हणूनच सुलभतेने मादक पदार्थ वा दारू मिळू नये म्हणून अशा पदार्थावर बंदी घालण्याचा आग्रह धरला जात असतो. आपला निश्चय ढळत असल्यामुळे असल्या बाह्य व कृत्रिम बंधनांची गरज भासते. कुठल्यातरी चांगल्या बंधनात स्वत:ला अडकून घेतल्यास वाईटापासून दूर होणे शक्य होते.

कमकुवत मानसिकता हे अविवेकीपणाचे लक्षण समजले जाते. कारण मनाने कमकुवत असलेले सारासार विचार न करता भावनेला बळी पडून उत्स्फूर्तपणे कृती करत असल्यामुळे स्वत:च्या पायावर दगड घालून घेत असतात. मुळात अशा प्रसंगी काहीतरी arguments करत मनाची समजूत घातली जात असते. काही तत्वज्ञांच्या मते कमकुवतपणा नव्हे तर मनाचा (चुकीचा) निश्चयी बाणा हा अविवेकीपणाकडे नेणारा ठरतो.

उदाहरणार्थ, रोज एक पाकीट सिगरेट अनेक वर्षे ओढणारा एके दिवशी सिगरेट सोडण्याचा निश्चय करतो. दिवस ठरवतो, वेळ ठरवतो. त्यानंतर समोर असलेल्या सिगरेट कागदाची नळी करून त्यात तंबाखू भरून ओढू लागतो. वरवर पाहता त्यानी सिगरेट सोडली हे खरे वाटत असले तरी आताचा हा नवीन उपद्व्याप खरोखरच सिगरेट सोडण्याच्या दिशेने जाणारा ठरेल का? कारण येथे चारमिनार ओढावे का विल्स ओढावे का गोल्डफ्लेक ओढावे हा नसून तंबाखूच्या दुष्परिणामापासून लांब राहणे हा कळीचा मुद्दा असतो. ढोबळमानाने विचार केल्यास अजून एक सिगरेट ओढल्यामुळे आकाश कोसळणार नाही यात काही चुकीचे नाही. परंतु अजून एक का नको, दोन का नकोत, तीन का नकोत..... सिगरेटपासून खरोखरच मुक्ती हवी असल्यास ब्रँड बदलून नव्हे तर तंबाखूजन्य पदार्थापासून मुक्त होणे गरजेचे ठरते. म्हणूनच अजून एक, अजून एक हे त्याच्या दृष्टीने अविवेकी ठरत नाही. त्यामुळे आजचा हा शेवटचा झुरका याला काही अर्थ नाही. हीच गोष्ट दारूचा शेवटचा पेग (वा हा एकच प्याला!) किंवा हाच माझा शेवटचा केकचा तुकडा किंवा मी उद्यापासून जिमला जाणार असे म्हणणार्‍यासाठी लागू होईल.

येथे प्रश्न एक सिगरेट वा केकचा एक तुकडा याचा नसून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही उपाय करणार आहोत की नाही हा आहे. केकचा एक तुकडा खाल्यामुळे तुमचे वजन दुप्पट होणार वा आजच जिमला गेल्यामुळे तुम्ही सडपातळ होणार असे काही नाही. परंतु काही कृती करण्यासाठी (वा न करण्यासाठी) आपल्याकडे काही ना काही कारणं हजर असतात व काही गोष्टी करण्यासाठी एकही योग्य कारण आपल्याला सापडत नाही. हा विरोधाभास असून त्याचा स्वीकार करण्याची तयारी हवी. म्हणूनच कुठलेही तर्क न वापरता कृती करणार्‍यापेक्षा मर्यादित अर्थाने तर्काचा वापर करून आपल्या कृतीचे समर्थन करणार्‍याबद्दल यानंतर जास्त सहानुभूती दाखवायला हवी.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

अनेक वर्षांपूर्वी गंगाधर गाडगीळांची किडलेली माणसे ही गोष्ट वाचलेली आठवते. त्यात घारू अण्णा एक वैश्विक सत्य बोलतात. जे उपस्थित सर्वांनाच पटते, पण त्यात सर्वांचे दोष उघड होत असतात. त्यामुळेच ले़खकाने "त्यांचे बोलणे सर्वांनाच पटले होते, आणि म्हणूनच कुणालाच आवडले नव्हते" असा वाक्यप्रयोग केला आहे.

इथेही या लेखाबाबत असेच म्हणावे लागते. लेखात व्यक्त केलेल्या शब्दाशब्दाशी सहमत आहे. परंतू अशा प्रकारे संगणकाच्या पडद्यारूपी दर्पणात आमच्यातील उणीवांचे प्रतिबिंब दाखविलेले लेखन नावडले गेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

सर्वप्रथम पुस्तकविश्व वर मनापासून स्वागत!

नेमके लेखन!
१. एखाद्या गोष्टींचे व्यसन असणे
२. ते व्यसन आहे हे स्वतःशी कबूल करणे
३. ते इतरांसमोर कबूल करणे
४. हे व्यसन अपायकारक आहे/असु शकते हे जाणणे
५. ते कबूल करणे
६. त्यावर उपाय आहे हे मान्य करणे
७. त्यावर उपाय करणे

यांपैकी विविध पायर्‍यांवर अनेकांना आपण बघतो.
त्यातही कित्येक जण पाच पायरीवर अडकलेले असतात. सहावी पायरी मात्र गाठणे कठीण जाते.
इच्छाशक्ती कामाला येते ती इथे!

मस्तच लेख! असेच उत्तमोत्तम लेख इथे येतील त्यांची वाट पाहत आहोत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वप्रथम पुस्तकविश्व वर मनापासून स्वागत!

मै-कहाँ-हुं?

सहावी पायरी मात्र गाठणे कठीण जाते.
इच्छाशक्ती कामाला येते ती इथे!
मस्तच लेख! असेच उत्तमोत्तम लेख इथे येतील त्यांची वाट पाहत आहोत

सहमत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"ऐसी" चे नाव पुस्तकविश्व करण्यात आलेले आहे हे सांगितल्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा हा हा!
असो. आता पाचर मारली असल्याने बदल करता येणे अशक्य आहे.
प्रभाकरराव, 'ऐसीअक्षरे'वर मनापासून स्वागत! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पहिल्या वाक्यातला दुसरा शब्द वगळता तंतोतंत सहमत. Wink लेख आवडला.

मराठी आंजाचं व्यसन सोडायचा विचार बरेच दिवस करत होते; आता तो विचार करण्याचंही व्यसन लागलं आहे का अशी वेळ आली आहे. आणि हे पण मी आज पाच मिनीटं व्यायाम जास्त करू या असं म्हणत एकीकडे वेफर्स तोंडात टाकत लिहीते आहे.

तंबाखू, दारू, अंमली पदार्थ यांचं व्यसन लागलेलं आपल्याला आणि इतरांना चटकन लक्षात येऊ शकतं, त्यामुळे पुढच्या क्रिया करणं तत्त्वत: फार कठीण नसतं. पण उदाहरणार्थ मराठी आंतरजाल, वाचताना, विचार करताना नखं कुरतडणे, संध्याकाळी हात पाय हलवणे (व्यायाम म्हणा, खेळ म्हणा) या माझ्या सवयींना व्यसन म्हणावं का रूटीन असा अनेकदा प्रश्न पडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख आवडला, पण मला या बाबतीत थोडा वेगळा विचार मांडावासा वाटतो.

व्यसन या शब्दाला थोडं बाजूला ठेवू कारण त्याला वाईट संदर्भ आहेत. गर्द, कोकेन सारखी आयुष्य नष्ट करणारी व्यसनं ते सिगरेट ओढणे, दारू पिणे ते अगदी अतिरेकी सिनेमा पहाण्याची आणि आंतरजालावर वावरण्याची सवय या सर्वांनाच व्यसन म्हटलं जातं.

खरं तर हा आनंदाचं कर्ज घेणं की रोखीत व्यवहार करणं असा सवाल आहे. आत्ता या क्षणी एखादी जिलबी खाल्ल्याने किंवा अभ्यास न करता सिनेमा बघितल्याने मला एक क्ष आनंद मिळेल. तेच जर का मी हा मोह टाळला तर पुढे कधी काळी मला त्याच्या दुप्पट आनंद मिळण्याची काही एक शक्यता आहे हे मला माहीत आहे. पण या दूरच्या शक्यतेपेक्षा कदाचित आत्ता या क्षणाचा नक्कीपणा महत्त्वाचा ठरू शकतो. कारण शक्यता फोल जाऊ शकतात. या गणितात आत्ताकडे झुकतं माप देण्याचं कुठेतरी आपल्या जनुकांत आहे. लहान मुलांबाबत अनेकांनी हे प्रयोग केलेले आहेत. वानगीदाखल एक उदाहरण. पण असे अनेक व्हिडियो गूगलमध्ये marshmallow test शोधलं की सापडतील.

या 'आत्ता'ला स्वीकारण्यामध्ये कदाचित अभ्यासापासून पळण्याचा प्रयत्न असू शकतो, किंवा समाजाच्या अपेक्षांनी लादलेलं वर्तन जाणूनबुजून टाळून आपल्या मनचं करण्याची बंडखोरी प्रवृत्तीही असू शकते. त्यामुळे उद्याच्या कदाचित सुखापेक्षा आत्ताच्या खात्रीच्या सुखाचं मूल्य अधिकच वाढतं.

सर्वसाधारणपणे ही इच्छाशक्ती वाढवावी, उद्यावर भरवसा ठेवून आजचे सुखाचे क्षण टाळावेत असा सल्ला अनेक बाबतीत दिला जातो. तो चूक नाहीच. पण त्याचबरोबर या क्षणात जगा, प्रत्येक दिवस शेवटचा असल्याप्रमाणे जगा, स्वच्छंद (स्पॉंटेनियस) जगा असेही सल्ले मिळतात. मग नक्की कसं वागावं असा प्रश्न पडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असेच विचार येतात मनात पण असे शब्दबद्ध करू शकत नाही.
पैशाप्रमाणे सुखालाही टाईम व्हॅल्यु असतेच त्यामुळे ड्रग्ज, दारू, सिगारेट आदी भविष्य हमखास खराब करणार्‍या घातक गोष्टी सोडल्यास इतर सौम्य गोष्टींचे किंचित व्यसन असायला हरकत नाही असे वाटते.
इच्छाशक्तीच्या नावाखाली आपल्या मनाचे उगाचच दमन तर होत नाही ना इकडेही लक्ष दिले पाहिजे.
आधीच आपल्याकडे सामाजिक बंधने कमी नाहीत. साधं चुंबन घ्यायला कित्येकांची तिशी उजाडते. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is NOT a plan!

लेख अत्यंत रोचक आणि मार्मिक विचारांचा आहे. प्रत्येक ओळ पटणारीच आहे. पण "उपाय" याबाबत ठोस विधान काही दिसत नाही.

अर्थात या सर्वाला उपाय नाहीच असं मान्य केलं तर मग हरकत नाही..

अशा लिखाणाने संस्थळ श्रीमंत होत असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यसनी माणसात बदल कसा होतो...? हे ज्यांना खरोखरच पहायची/अनुभवायची/अभ्यासायची इच्छा असेल,त्यांनी अ‍ॅल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस या संघटनेच्या जगभरातल्या कुठल्याही समुहात चालणार्‍या मिटिंग्ज चा वेल विशर म्हणुन उपस्थित राहुन अनुभव घ्यावा... भारतातही ए.ए.च्या भरपुर शाखा कार्यरत आहेत...

http://addictionsupport.aarogya.com/support/meeting-list-of-aa-in-india....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

लेख फार आवडला.
अनेकदा इतके नैराश्य येते की जाऊ दे ना तेजायला, प्रयत्नच नको करायला - अशी पराभूत मनस्थिती होते. ते मात्र डाउनवर्ड स्पायरल असतं.
यावरती म्हणजे वाईट सवयी मोडणे या विषयावरती उगाच नाही लेखकांनी पैसे छापले. भयंकर क्लिष्ट गोष्ट आहे ती.
.
'बडी सिस्टिम' कदाचित उपयोगी पडू शकते. म्हणजे आपल्यासारखीच वाईट सवय असलेली व्यक्ती निवडुन, एकमेकांवरती लक्ष ठेवायचं, एकमेकांना सवयीचा आढावा द्यायचा, मुख्य म्हणजे मोटिव्हेट करायचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

ऐसी या फोरमचा विधायक उपयोग करण्यात जे लोक अग्रेसर आहेत त्यात नानावटी टॉप क्रमांकात येतात. अर्थात याचा विपरीत अर्थ ऐसी फोरमचा अन्य लोक विघातक किंवा फुटकळ उपयोग करतात असा कोणी लावु नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको